अजूनकाही
ताव्यावरची भाकरी पलटी केल्याशिवाय ती नीट भाजली जात नाही, अशी ‘आप’ल्याकडे लोकोक्ती आहे. याचाच अर्थ परिवर्तनाशिवाय प्रवाही जीवन नाही. मग ते व्यक्तीचे असो की, समाजाचे. शेतकऱ्यांच्या भाषेत कोळपणी-डवरणीपेक्षा नांगरणी जमिनीला अधिक सुपीक बनवते, कारण त्यात जमिनीची मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होत असल्याने जमिनीत पुरेसा ऑक्सिजन खेळवला जातो.
समाजाच्या राजकीय जीवनातही असाच नवा प्राणवायू खेळता राहणे आवश्यक आहे. नसता क्रॉनिक व्याधी विकसित होत जातात. अशा आजाराला केवळ बाह्योपचारी औषधांच्या बूस्टर मात्राच्या भरवशावर काही दिवस रेटून नेता येतात, पण त्याला अंगभूत स्वास्थ्य लाभत नाही. म्हणून हे परिवर्तन आवश्यक.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
देशाच्या वेगवेगळ्या पाच भौगोलिक सुभ्यांमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या. त्यात पूर्ण सत्तापरिवर्तन पंजाबमध्ये झाले. जुन्यांचा सपशेल त्याग आणि पूर्णत: नव्याचा स्वीकार करण्याला पंजाबने प्राधान्य दिले, हे या विधानसभा निवडणुकीचे खास वैशिष्ट्य ठरले आहे.
पंजाबात राजकीय पक्ष लोकांपुढे कुठलेही मुद्दे घेऊन जावोत, लोकांनी मात्र सताड जुना पिंड सोडून नव्या आकांक्षा, नव्या आशा आणि नवे स्वप्न पाहात, नवी वाट निवडताना एका नव्या पक्षाला सत्तेची वाट मोकळी करून दिलेली आहे.
पंजाब निवडणूक निकालाचा लोकशाही संदेश हा आहे की, पंजाबी लोकांनी मुख्यमंत्रीपदाच्या भोवती सत्तेचा खेळ खेळू पाहणाऱ्या नेत्यांना पुरते बाहेर केले आहे. त्यात सहा महिन्यांपूर्वीचे मुख्यमंत्री कॅपटन अमरिंदरसिंग, मावळते मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवरून ‘आप’ल्या आकांक्षा लपवू शकलेले नाहीत, असे नवज्योतसिंग सिद्धू आणि पंजाबचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले सर्वांत जेष्ठ नेते आणि अकाली दलाचे सर्वेसर्वा असलेले प्रकाशसिंग बादल यांना सपशेल पराभूत करत मुख्यमंत्रीपदाच्या कक्षेच्या कोसो दूर फेकले आहे. इतके की, यापैकी कुणालाही सत्तेचा जुगाड करण्याच्या अवस्थेतही ठेवले नाही.
या दिग्गजांना पराभूत करण्यात ‘‘आप’’चे उमेदवार यशस्वी ठरले, हे यातलं वेगळेपण. ज्यांनी यांचा पराभव केला, त्यांची सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी विचारात घेतली, तर हे सर्व विजयी उमेदवार सामान्य परिस्थितीतून आलेले आहेत. नवज्योतसिंग सिद्धू यांना पराभूत करणाऱ्या जीवन ज्योत कौर यांचे सर्वसामान्य आणि दुर्बल घटकांतील महिलांमध्ये मासिक पाळी व आरोग्य याबद्दल जागरूकता करण्याच्या कामात योगदान असल्याने त्यांना पंजाबात ‘पॅड वूमन’ म्हणून ओळखले जाते. ही ओळख लोकांच्या सेवेतून आलेली आहे, हे सांगायला नको.
काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा खांदेपालट केल्याने पक्षाला रामराम ठोकून नवीन पक्ष स्थापन करत भाजपसोबत निवडणूक आघाडी करणारे अमरिंदरसिंग यांनाही त्यांच्याच बालेकिल्ल्यात पतियाळाच्या माजी महापौराने पराभूत केले.
चरणजित सिंह चन्नी यांना दोन्ही म्हणजे भदौर आणि चमकौर विधानसभा मतदारसंघातून पराभूत करणारे ‘आप’चे सर्वसामान्य कार्यकर्ते आहे. त्यात अनुक्रमे लाभसिंह उगोके एक मोबाईल दुरुस्ती करणारे, तर दुसरे चेन्नी यांच्याच नावाचे डॉ. चरणजितसिंग हे नेत्रतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.
पंजाबच्या राजकारणातले सर्वांत जेष्ठ आणि भीष्माचार्य म्हणता येईल, असे प्रकाशसिंग बादल पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांचा आणि त्याच्या पुत्राचाही या वेळी ‘आप’च्या अनुक्रमे गुरमीत सिंह खुदियन आणि जगदीप कंबोज यांनी त्यांच्या लांबी या बालेकिल्यात पराभव केला. पंजाबच्या या निवडणुकीत सर्वांत मोठा पराजय बादल घराण्याला झाला. तब्बल तीन दशकानंतर बादल परिवाराच्या सदस्यांशिवाय पंजाबची विधानसभा असणार आहे. या निवडणुकीत प्रकाशसिंग बादल आणि त्यांचे चिरंजीव सुखबीरसिंग बादल यांच्यासह त्यांच्या परिवाराशी नाते असणारे अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणाहून ‘आप’कडून पराभूत झालेले आहेत. अनेकदा सत्तेत असलेल्या आणि एका प्रदेशाची सांस्कृतिक, राजकीय अस्मिता असलेल्या एका पक्षप्रमुखाच्या व्यक्ती आणि घराण्याच्या वाट्याला, असे दिवस येणे किती मोठे परिवर्तनाचे दिवस पंजाबात आलेत, याची ही ऐतिहासिक नोंद ठरणार आहे.
पंजाबच्या या निवडणुकीचे वेगळेपण हे की, ‘आप’ने बादल घराण्याच्या विरोधात उमेदवार केवळ उभे केले नाहीत, तर त्यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. सर्वसाधारणपणे कुठल्याही प्रस्थापित राजकीय घराण्याच्या उमेदवाराविरोधात विरोधक ‘आप’ला सशक्त उमेदवार देत नाही. म्हणजे अंतर्गत सूर आणि एकमेकाला मदत करण्याचे साटेलोटे निभावत असतात. इथे ‘आप’मुळे असे काहीही झालेले नसल्याने पंजाबात हा एक वेगळा इतिहास रचला गेला. तोही सरदारांनी सरदारांना पाडण्याचा. सत्तेसाठीचे राजकारण करणाऱ्या घराण्यांना मागे खेचताना बादल घराण्याबाबत मात्र पंजाबी जनतेने सख्त पाऊल उचलल्याचे दिसून येते.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
पंजाबात उसळलेले शेतकरी आंदोलन शिरोमणी अकाली दलाच्या केंद्रातील सत्ता सहभागामुळे पक्षासह बादल घराण्याला अधिक मारक ठरले. तर त्यामुळे आपण पंजाबात अधिक सुरक्षित आहोत म्हणून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत लोकांपासून दुरावा निर्माण झाल्याचा परिणाम काँग्रेसच्या वाट्याला आला. या परिस्थितीचा लाभ घेण्याची नेमकी संधी ‘आप’ने पंजाबात उचलली, प्रचारतंत्राचा लक्षित आणि परिणामकारक वापर करण्यातही ‘आप’ देशात आघाडीवर आहे. दिल्लीपासून जवळ असल्याचा लाभ ‘आप’ला घेता आला. तसा उत्तर प्रदेशात घेता आला नाही.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
पंजाबी लोकांनी परिवर्तन स्वीकारले. ‘आप’सारखा नवा आणि नवखा पर्याय निवडला. ‘आप’ला दिल्लीत शहरी प्रश्नांवर काम करता आले. पंजाब वेगळा आहे. सीमावर्ती राज्य आहे. कृषिप्रधान आहे. कृषक वर्गाचे प्रश्न दिल्लीपेक्षा नक्कीच वेगळे असून ‘आप’साठी आणि त्यांच्या निवडून आलेल्या नेतृत्व आणि उमेदवारांसाठीही नवीन आहेत. पंजाबला दिल्लीची ‘एकला चलो’वृत्ती नेतृत्व फारसे खपत नाही, हा इतिहास आहे. त्यात ‘आप’च्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान दिल्लीच्या इशाऱ्यावर चालणारे असल्याचे निवडणुकीतूनच दिसून आलेले आहे. या पार्श्वभूमीवर ‘आप’ला संधी तर मिळाली, पण मोठे आव्हानही त्यांच्यापुढे आहे. त्याला ‘आप’ कसा सामोरा जातो, यावर पंजाबसाठीची पुढील वाटचाल महत्त्वाची ठरणार आहे. यशस्वी झाले, तर पंजाबात लोकाभिमुख आणि सामान्यांचा सहभाग असणारे लोकशाहीचे नवे पर्व साकार होईल.
पंजाबची निवडणूक आणखी वेगळी ठरते, ती यासाठी की, पंजाबात काँग्रेस आणि अकाली दलाची मुळे खिळखिळी करण्यात ‘आप’ला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुढील निवडणुकीत काँग्रेस आणि अकाली दलाशिवाय नव्या स्पर्धकाला जमीन तयार करून देण्याचे कामही येणाऱ्या काळात ‘आप’कडून आपसूक होणार आणि आजच्या पंजाबी राजकीय भूमीवरची ती उद्यासाठीची उपजही असणार. या अर्थानेही पंजाबची झालेली निवडणूक पंजाबच्या राजकीय परिवर्तनाची ‘गेम चेंजर’ असेल.
..................................................................................................................................................................
sangmadhyam@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment