उतू जाणाऱ्या सुखातही दुःखाचे चटके देणारा विकास हवा की, अभावातही आंतरिक सुख देणारे समाधान हवे, हे ठरवण्याची निर्णायक वेळ आज आली आहे!
ग्रंथनामा - झलक
प्रभाकर ढगे
  • ‘लोकशाही समजून घेताना’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि भूतानमधील काही मुलं
  • Fri , 11 March 2022
  • ग्रंथनामा झलक लोकशाही समजून घेताना Lokshahi Samjun Ghetana दीपक पवार Deepak Pawar लोकशाही Democracy भूतान Bhutan सकल राष्ट्रीय आनंद निर्दोशांक Gross National Happiness Index

२५ जानेवारी हा ‘राष्ट्रीय मतदार दिन’. त्यानिमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्यातर्फे ‘लोकशाही समजून घेताना’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात महाराष्ट्रातील ३३ मान्यवर लेखकांच्या लोकशाहीच्या विविध पैलूंचा आढावा घेणाऱ्या लेखांचा समावेश आहे. या पुस्तकातील लेख ‘अक्षरनामा’वर २ फेब्रुवारीपासून क्रमश: प्रकाशित करत आहोत...

..................................................................................................................................................................

वैश्विक राजकारण आणि अर्थकारण नियंत्रित करणारी जागतिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेतील प्रत्येक नागरिक बेभरवशाच्या आर्थिक विवंचनेत जगत असतो, असे म्हटले जाते. या दारुण आणि करुण वस्तुस्थितीचा स्वीकार करण्याचे धाडस आजही अमेरिकेला होत नाही आणि सतत येणाऱ्या महामंदीचे अरिष्टही अमेरिकन नागरिकांची पाठ सोडत नाही. अमेरिकेतील आर्थिक महामंदीचा इतिहास सतराव्या शतकापर्यंत जाऊन पोहोचतो. १७९० सालच्या पहिल्या आर्थिक आणीबाणीपासून २०१०च्या महामंदीपर्यंत अमेरिकेने आर्थिक अराजकाचे चटके वारंवार सोसले आहेत. आजपर्यंत लहान-मोठ्या सुमारे ४७ महामंदींचे फटके खाल्लेल्या अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये नक्की काय दोष आहेत, यावर आता खुद्द अमेरिकन अर्थतज्ज्ञही विचार करू लागले आहेत.

युरोप खंडातील अनेक देशात कमी-अधिक फरकाने याच स्वरूपाच्या आर्थिक मंदीचे चित्र पाहायला मिळते. खनिज संपत्ती, औद्योगिक प्रगती, विज्ञान-तंत्रज्ञानातील क्रांती, आधुनिक दळणवळणाच्या साधनांचा विकास, कुशल मनुष्यबळ, ज्ञानाधारित कला-कौशल्यांवरची मक्तेदारी, या सर्वांच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या या स्वयंपूर्ण व विकसित राष्ट्रावर आर्थिक मंदीचे संकट येण्यामागची कारणे आणि त्यावरचे उपाय, यावर सध्या जगभरात चर्चा होऊ लागली आहे. हे संकट रोखायचे कसे, यावरचा उपाय मात्र कोणालाच सापडत नाही. शेअर बाजाराच्या निर्देशांकाप्रमाणे क्षणात उसळी घेणारी आणि दुसऱ्या क्षणात भुईसपाट होणारी अर्थनीती क्षणभंगूर ठरण्याचे कारण अजून स्पष्ट होत नाही. अर्थविश्लेषकांची आणि विद्वानांची त्यावरची मते व निरीक्षणे परस्परविरोधी आहेत. सर्वसमावेशक निष्कर्षांच्या अंतिम पायरीपर्यंत कोणाला पोहोचता येत नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

जगाला आर्थिक महामंदीपासून वाचवायचे असेल, तर सर्वच राष्ट्रांनी आता सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी)ऐवजी, सकल राष्ट्रीय समाधान (जीएनएच) या एककावर आपल्या अर्थव्यवस्थेचे मोजमाप केले पाहिजे. आर्थिक मंदीला रोखण्याचा हाच एक मार्ग आहे, असा दावा दक्षिण आशियातील अतिशय चिमुकले राष्ट्र असलेल्या भूतान या देशाचे पंतप्रधान दरवर्षी संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक अधिवेशनात करतात आणि जगाचे लक्ष वेधून घेतात.

अवघ्या सात लाख लोकसंख्येचा आणि ३८ हजार ३९४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला हा देश, आपल्या छोटेपणामुळे जागतिक पातळीवर प्रभाव गाजवू शकत नाही. त्यामुळे या देशाची वैशिष्ट्यपूर्ण सकल राष्ट्रीय समाधान (जीएनएच) यावर आधारलेली अर्थव्यवस्थाही फारशी चर्चिली जात नाही. पाश्चात्यांनी पौर्वात्यांचे काही स्वीकारायचे नाही, या युरोपीयन अहंगंडाच्या मानसिकतेतून कदाचित ते घडत असावे. पण, भूतान सांगतो त्या पद्धतीच्या अर्थव्यवस्थेचा विचार कधी ना कधी करावाच लागेल, अशा एका बिकट स्थितीजवळ अनेक विकसित देश उभे आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणूनच अर्थव्यवस्थेचे अनर्थ रोखण्याच्या शक्यतांवर विचार झाला पाहिजे, अशी आर्थिक विश्लेषकांची मनोधारणा झाली आहे.

विकसित आणि विकसनशील या दोन्ही विकासाच्या व्याख्यांचा नव्याने पुनर्विचार करण्याची गरज अनेक विचारवंत व समाजधुरीणांना वाटू लागली आहे. ‘विकास’ नावाच्या संकल्पनेचा अतिरेक, वेग, गती, जीवघेणी स्पर्धा, अथक भ्रमंती, भ्रमणध्वनी, संगणक, डिजिटलायझेशन, माहितीचे सुसाट दळणवळण, ज्ञान-विज्ञानाचे बदलते स्वरूप; अशा आजच्या दमछाक करून टाकणाऱ्या काळात ‘नॉट डुईंग मच, स्लो डाऊन, स्टेप बॅक’ - या संकल्पनांचा उदय होऊ लागला आहे. आधुनिक मानवी समाजाच्या जीवनशैलीचा वेग आणि समाधानाचे गणित याचा ताळमेळ कुठेतरी बसला पाहिजे, यावरचे चिंतन आता गांभीर्याने केले जात आहे. मानवी प्रगतीसाठी सुरू असलेला प्रचंड विकास नावाचा वेग कुठेतरी थांबायला हवा की नको, यावरही चर्चा केली जात आहे.

मानवी जीवन सुखी आणि समाधानी असावे, यासाठी प्राचीन काळापासून विचारमंथन सुरू झाले. विद्वानांचा विद्वान मानला जाणारा ग्रीक विचारवंत सॉक्रेटिस (ख्रिस्तपूर्व ४६९-३९९)नेही मानवी दुःखाबाबत विचार केला होता. पाश्चिमात्य देशामध्ये सुखाचा विचार तात्त्विक पद्धतीने करणाऱ्या सॉक्रेटिसने जगण्याच्या अनेक पर्यायांवर चिंतन केले आहे. समाधानावरचे उत्तर शोधण्यासाठी त्याने स्वतःवरच अनेक प्रयोग केले. तासनतास अनेक प्रकारच्या औषधी रसायनात पडून राहणे, योगाभ्यास करणे, कडक हिवाळ्यात अनवाणी पायांनी बर्फावरून चालणे, अतिरिक्त मद्यपान करून पाहणे, असे अनेक प्रयोग आपल्या आत्मिक प्रेरणेने करून पाहिले. जन्म आणि मृत्यू यांचे रहस्य उलगडण्यासाठी तो खटाटोप करत राहिला. जन्म व मृत्यू यांवरचे त्याचे चिंतन मार्मिक आहे.

त्याने म्हटले आहे, आपण अस्तित्वहीन असतो किंवा मृत्यूनंतर संवेदनाहीन होतो; किंवा असेही म्हणता येते की, आपला आत्मा एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर करत असतो. आजच्या शास्त्रीय विचारसरणीचा सॉक्रेटिस हा जनक मानला जातो. मानवी आयुष्यावरच्या त्याच्या मूलभूत चिंतनात सत्यासत्यता, जीवनाचा खरा मार्ग यावर चिंतन करत त्याने प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सत्याबाबतची रुची, आत्म्याची शुद्धता व जीवनातील उदात्तता, सहिष्णुता, धैर्य व न्याय, याबाबतची आत्मीयता बाळगण्याचा त्याने आग्रह धरला.

सॉक्रेटिसचे शिष्य असलेले आरिस्टीपस व अ‍ॅन्टिस्थेन्स या दोघांनी आपल्या गुरूच्या शिकवणीला जीवनाच्या आणखी जवळ नेण्याचा प्रयत्न केला. सुख व समाधानाचे तत्त्वज्ञान विकसित करणारा तत्त्ववेत्ता म्हणून आरिस्टीपसची ओळख आहे. सॉक्रेटिसपेक्षाही वेगळी मांडणी करून त्याने जीवनाचा उद्देश व ध्येय यावर सखोल चिंतन केले. अ‍ॅन्टिस्थेन्सनेही भारतीय जीवनाचा सौंदर्याच्या अंगाने अभ्यास केला. त्याने बुद्ध तत्त्वज्ञान, योगशास्त्र आणि चिनी तावाईझम युरोपीय देशांत प्रथम प्रकाशात आणले. जीवनातील शांतता, साधेपणा, नैसर्गिकता, माधुर्य, मूल्य, तणावमुक्तता, आंतरिक समाधान व स्वयंप्रेरणेचा शोध, याद्वारे त्याने समाधानी आणि सुखी आयुष्याच्या परिपूर्तीचा मार्ग सांगितला.

सॉक्रेटिसचा आणखी एक शिष्य प्लेटोनेही मानवी आत्म्याबाबत आपले चिंतन मांडले आहे. कारण, इच्छा आणि आशा या तत्त्वांशी त्याने आत्म्याची सांगड घातली. ही तत्त्वे समान पातळीवर असतात, तेव्हा माणूस सुखी असतो, असा प्लेटोने दावा केला. चांगल्या समाजनिर्मितीसाठी त्याने काही सिद्धांत सांगितले. त्यासाठी समाजाचे नेतृत्व प्रज्ञावंतांनी करावे, असेही सुचवले. समाधानाचे तत्त्वज्ञान हे आनंदी समाजाच्या केंद्रस्थानी असावे, असे तो म्हणे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

समाधानाचा शोध घेणाऱ्या तत्त्वज्ञानांच्या नामावलीत एपिक्युरस याचेही नाव घेतले जाते. हव्यास नाही तर त्रासही नाही, अशी जीवनवादी विचारसरणी सांगणारा हा तत्त्वज्ञानी; आनंदी व सुखी आयुष्य, शांततेचा आग्रह, भीतीपासून मुक्तता, दुःखविरहित स्थिती, सीमित गरजांसह स्नेहीजनांसोबत जगणे, हेच समाधानी आयुष्याचे रहस्य असल्याचे सांगतो. सकारात्मक विचारसरणी हा सुखी आयुष्याचा पाया आहे, अशा विचारांचे चिंतन रोज व्हावे. त्याचा प्रभाव जगण्यावर पडून काळजी, चिंता कमी होऊ लागते. आंतरिक समाधान हे आंतरिक शांततेला जन्म देते. शांत आयुष्यातच समाधान अवतरते.

एपिक्युरस या अवस्थेला बुद्धत्व (देवत्व) प्राप्त होण्याची स्थिती म्हणतो. असा माणूसच मग आपल्या सभोवतालच्या समाजात समाधानाचा प्रभाव पसरवतो, असे एपिक्युरसला वाटते.

हिंदू धर्माच्या जीवनपद्धतीमध्ये सुखाचा व समाधानाचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘पातंजल योगसूत्रां’मध्ये दिसून येतो. त्यातील चौथ्या पाठास ‘समाधीपाठ’ असे म्हटले जाते. तनाच्या समाधानाकडे नेणारी प्रक्रिया त्यात वर्णिलेली आहे. ‘गीते’मध्ये कर्म, भक्ती, ज्ञान व योग हे चार मार्ग मानवी समाधानाचे असल्याचे सांगितले आहे. ‘ईशोपनिषदा’तही आपली संपत्ती सर्वांना वाटून द्यावी, दुसऱ्याच्या संपत्तीची हाव बाळगू नये, आपल्या उत्पन्नातील काही भाग समाजाला द्यावा, असा उपदेश आढळतो.

मायकेल दी मॉन्टेग्र (१५६३-१५९२) हा फ्रेंच राजकारणी व तत्त्वज्ञ, समाधान तत्त्वज्ञानाला आधुनिक जीवनशैलीशी जोडून घेतो. आनंदी व समाधानी जगण्यासाठी मानवी जीवनाचे कायदे असले पाहिजेत, यावर त्याने चिंतन केले. एपिक्युरसप्रमाणेच समतोल जीवन जगण्याचा मायकेलचा आग्रह होता. जगण्यातील सहजसुलभ भावना व नैसर्गिकता कायम ठेवायला हवी, असे त्याचे म्हणणे होते.

ऑर्थर शॉपेनहॉवर (१७८८-१८६०) हा जर्मन तत्त्वज्ञ, लेखक तथा प्राध्यापक याच समाधानी जगण्याचे सूत्र पुढे नेतो. दुःख हेच वास्तव आहे. समाधान हा आभास आहे. दुःख व निराशेच्या वर्तुळात आयुष्य हेलकावे खाते. प्रत्येक आयुष्य म्हणजे दुःखाचा इतिहास आहे. त्यात छोट्या-मोठ्या अपघातांचे सातत्य चालू आहे, असे सांगत समाधानासाठी आयुष्य कसे जगावे, याची शिकवण शॉपनेहॉवर याने दिली. त्याला ही प्रेरणा बौद्ध तत्त्वज्ञानापासून मिळाली.

जर्मी बेंथम (१७४८-१८३२) हा ब्रिटिश न्यायमूर्ती तथा तत्त्वज्ञानी गृहस्थ समाजसुधारक म्हणूनही ओळखला जातो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, महिलांना समान हक्क यासाठी त्याने आग्रह धरला. माणूस किती समाधानी आहे, यावर त्याची जीवन जगण्याची इतिकर्तव्यता अवलंबून असल्याचे बेंथम सांगतो.

अनेक संशोधनानंतर समाधानाचे तत्त्वज्ञान आता बरेच प्रभावी बनले आहे. सकारात्मक व नकारात्मक परिणाम, सुयोग्य जीवनशैली, जीवनमानाचा दर्जा व आयुष्यातील समाधान यावरही आता विविध ठिकाणी संशोधन सुरू आहे. ग्रीक तत्त्वज्ञांनी समाधानी जगण्याचा विचार मांडला. त्याला शास्त्रीय अभ्यासाची व संशोधनाची जोड विसाव्या शतकात मिळाली. बुद्ध तत्त्वज्ञानाचा आधार घेत पाश्चिमात्य तत्त्वज्ञांनी युरोपात ही विद्याशाखा विकसित केली. स्वयंसाहाय्यता, सकारात्मक मानसशास्त्र, चिंतनशीलता याद्वारे अनेक तत्त्वचिंतकांनी समाधान तत्त्वज्ञान विकसित करण्यास सहकार्य केले. त्यामध्ये जोसेफ मर्फी, डेल कार्नेजी, नॉर्मन विन्सेंट पेल, वायन डायर, मरियन विल्यमसन, ओप्रा विन्फ्री, तसेच बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचा हातभार लागलेला आहे. युरोपीय देशात समाधानाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यास या लेखकांचे तथा तत्त्वज्ञांचे योगदान कारणीभूत ठरले आहे. ‘समाधानाचे तत्त्वज्ञान’ (Sonja Lyubomirsky) या पुस्तकाने युरोप-अमेरिका खंडात मानवी सुख व समाधान याबाबतच्या विचारांना चालना देण्याचे काम केले.

समाधानी समाज असणे म्हणजे नेमके काय, या प्रश्नाचे उत्तर आर्थिक भाषेत देण्याचा प्रयत्न ब्रिटिश अर्थतज्ज्ञ रिचर्ड लेआर्ड यांनी (१९३४) केला आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे संस्थापक संचालक असलेल्या लेआर्डने म्हटले आहे, “पाश्चिमात्य देशातील नागरिकांनी आपली स्थावर मालमत्ता जमवण्याचा हव्यास धरण्यापेक्षा आंतरिक समाधान विकसित होण्याकडे लक्ष दिले असते, तर ते अधिक सुखी झाले असते. स्वार्थ आणि हव्यास यामुळे समाधानी वृत्ती नष्ट झाली. पाश्चिमात्य लोकांनी समाधानाच्या तत्त्वज्ञानावर अधिक संशोधन करण्याची गरज आहे. सर्वोच्च समाधानप्राप्तीसाठी आता सर्वांचेच हे ध्येय असणे आवश्यक आहे.”

रिचर्ड लेआर्डच्या मते, पाश्चिमात्य लोक इतरांच्या तुलनेत कितीतरी शतके आधी धनवान बनले असले, तरी ते समाधान प्राप्त करू शकले नाहीत. गेल्या ५० वर्षांच्या अभ्यासाने हेच सिद्ध केले आहे की, लोक सुखी नाहीत. याचाच अर्थ, लोकांची बहिस्थ श्रीमंती वाढली, पण आंतरिक दुःख मात्र कमी झाले नाही. मानवी समाजाच्या आधुनिक जगण्याची भरभराट होऊनही दुःख व वेदना कमी झालेल्या नाहीत. उलट, गेल्या शतकभरात त्यात दहापटीने वाढ झाली आहे.

पाश्चिमात्य देशांतील अनेक तत्त्वज्ञ, विचारवंत, अर्थतज्ज्ञ व समाजसुधारक यांना संपत्ती आणि समाधान यांमधील विरोधाभासाचे आकलन झाले आहे. आधुनिक जीवनशैली, विकासाचा हव्यास, स्थावर मालमत्तेचे स्तोम, हे जगातील खरे सुख व समाधान खरेदी करू शकत नाही, या सत्याचा साक्षात्कारही त्यांना होत आहे. पण, जागतिक पातळीवरील सत्तेचे राजकारण, समाजव्यवस्थेचे व्यापारीकरण, अर्थकारणाचे अराजक, सर्वव्यापी विकास नावाच्या संकल्पनेचा राक्षसी हव्यास, प्रगतीची आंधळी शर्यत, या सर्वांचा वेग एवढा प्रचंड आहे की, तो रोखून धरण्याची हिंमत आज कुठलाही देश किंवा नेता करू शकत नाही.

सगळे जण एकतर तात्कालिक फायद्याचे लाभार्थी बनले आहेत किंवा स्थलकालाच्या पलीकडचे भविष्य वेधण्याची दूरदृष्टी हरवून बसले आहेत. आंतरराष्ट्रीय नफेखोर बाजारपेठांनी काहींना वेढले आहे. काहींना अपरिपक्वतेच्या अभावी न्यूनगंडाने घेरले आहे, तर काहींना अतिरेकी विकासाच्या अहंगंडाने पछाडले आहे. त्यामुळे मानवी जीवनाचे इतिकर्तव्य, साफल्य, सुख आणि समाधान या मूलभूत मूल्याबाबतच कमालीची गडबड, गोंधळ आणि गफलत केली जात आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

समाधानाच्या तत्त्वज्ञानाचे प्रेरणास्रोत बुद्ध विचारात आहे, हे आता सर्व जगाने मान्य केलेले आहे. गौतम बुद्ध (६२३-५४३) ही भारताने जगाला दिलेली तत्त्वप्रणाली असल्यामुळे समाधानाच्या तत्त्वज्ञानाची मूळ भूमी भारतच आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी ‘सर्वोत्तम भूमिपुत्र : गौतम बुद्ध’ या पुस्तकातील प्रस्तावनेत म्हटले आहे, “ज्याने आपल्या जीवनाचा अर्थ म्हणजेच उद्दिष्ट सिद्ध, सफल वा साकार केले आहे, अशा कृतार्थ मानवाला सिद्धार्थ म्हणतात. सिद्धार्थ हा गौतम आणि बुद्ध यांना जोडणारा दुवा आहे. प्रत्येकातील सिद्धार्थामध्ये बुद्ध होण्याची क्षमता असते. ती साकार होण्याच्या दिशेने कोण, किती प्रवास करतो, यावर त्याच्या सिद्धार्थतेचे प्रमाण ठरते.... याचा अर्थ, त्याच्या ठायी प्रज्ञा, शील, करुणा या माणसाला उन्नत करणाऱ्या तिन्ही घटकांचा असीम विकास झाला. त्यांच्यातील मनुष्यत्वाने अमर्याद उंची गाठली.”

गेली अडीच हजार वर्षे जे तत्त्वज्ञान जगाला भुरळ घालते आहे, त्या बुद्ध तत्त्वज्ञानाचे आजच्या अत्याधुनिक जगण्याशी काय नाते आहे, याचा अभ्यास जगात वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. बुद्ध विचारांची जगण्याशी पर्यायाने आज मानवी जीवनाचा प्रमुख आधार बनलेल्या अर्थविचारांशी सांगड घालण्याचा प्रयत्न याच मानसिकतेतून होत आहे.

बुद्ध, धम्म, आणि संघ या त्रिसूत्रीद्वारे जगातील दुःख निवारण्याचा मार्ग सांगणाऱ्या बुद्धाने - व्यक्ती, कुटुंब व समाज - यांचे कल्याण साधणाऱ्या जीवनशैलीचा ध्यास घेतला. पाश्चिमात्य विद्वान व शास्त्रज्ञांनी लावलेले आधुनिक विज्ञानातील शोध हे अवघे चारशे वर्षांपूर्वीचे आहेत, तर संपूर्ण दुःखनिवारणाचा, कारणकार्याचा बुद्धाने मांडलेला सिद्धांत अडीच हजार वर्षांपूर्वीचा आहे. आजच्या शास्त्रीय कसोटीवर सिद्ध होणारी सैद्धान्तिक भूमिका बुद्धाने कितीतरी शतके आधी मांडली होती. व्यक्तिगत आणि सामाजिक स्वरूपाचे अज्ञान, गैरवाजवी आसक्ती, बुद्धिवादाऐवजी दैववादाचे उदात्तीकरण, सामाजिक विषमता, निरर्थक कर्मकांड यांत गुंतून पडल्यामुळे मानवी जीवनातील दुःख कसे वाढत गेले, याची बुद्धाने केलेली चिकित्सा मर्मग्राही आहे.

आपण सांगतो त्या धम्माचा विचार प्रवाहाविरुद्ध ध्यास घेणारा आहे. तृष्णेविरुद्ध संयम, हिंसेविरुद्ध अहिंसा, असत्याविरुद्ध सत्य, अज्ञानाविरुद्ध ज्ञान ही या विचाराची व आचाराची सूत्रे आहेत. मध्यममार्गाच्या आचरणाचा सिद्धांत स्पष्ट करताना बुद्धाने दुःखावर मात करण्याची एक जीवनशैली विकसित केली. त्यालाच त्यांनी ‘अरिय अष्टांगिक मार्ग’ हे नाव दिले.

सम्यक दृष्ट, प्रयत्न, कर्म, उपजीविका, जागरूकता, संकल्प, वाचा, समाधी हे ते आठ मार्ग होय. चार अरिय सत्य म्हणजे दुःखाचे अस्तित्व मान्य करणे, ते निर्माण होण्याचे कारण शोधणे, दुःख नष्ट करता येते, हे सांगणे आणि त्यावरचा उपाय सुचवणे. अरिय म्हणजे श्रेष्ठ सत्य, अशी त्यांनी मांडणी केली. मानवी जगण्याच्या कारणकार्याविषयीची बुद्धाची मांडणी अत्यंत साधी व सोपी होती. पण, नंतरच्या काळात ती गुंतागुंतीची बनवली गेली, असा अभिप्राय गोमंतकीय विचारवंत धर्मानंद कोसंबी यांनी नोंदवलेला आहे.

अज्ञान, अंधश्रद्धा, अविद्या हे जर दुःखाचे मूळ कारण असेल; तर ते दुःख निवारता येणेही शक्य आहे. दुःखाचे ज्ञान होणे ही दुःखावर मात करण्याची पहिली पायरी आहे. अविद्येमुळे मानवी मनात तृष्णा, लोभ, द्वेष, मोह, मत्सर असे विकार निर्माण होतात. दुःखाचे कारण आणि आकलन दुःख दूर करण्यासाठी आवश्यक आहे. एरिक फ्रॉम या तत्त्ववेत्त्याने ‘टू हॅव ऑर टू बी’ या पुस्तकात बुद्धाच्या दुःखनिवारणाचे तपशीलवार वर्णन केले आहे.

बुद्धाचा उपदेश केवळ भिक्खूपुरताच मर्यादित नव्हता. सांसारिक जीवन जगणाऱ्या उपासकांनाही बुद्धाने उत्थानसंपदा, आरक्षसंपदा, कल्याणमित्रता आणि समजीविता या चार तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. क्रियाशील आणि प्रयत्नवादाचे महत्त्व प्रपंच यशस्वीतेसाठी गरजेचे आहे. लोभ आणि मोहाला आवर घालून संतुलित व्यवहार कसा करावा, श्रीमंत असताना कंजूषवृत्ती न बाळगणे, अधाशीपणा व हाव टाळणे, ऋण काढून सण साजरा न करणे, अशी आचारसंहिता बुद्धाने सांसारिक जीवन जगणाऱ्यांना घालून दिली आहे. चौदा प्रकारची अनिष्ट कर्मे टाळली, तर आयुष्य सुखा-समाधानाने जगता येते, हे त्यांनी सांगितले. या १४ अनिष्ट कर्मांमध्ये प्राण्यांची हिंसा, चोरी, व्यभिचार व खोटे बोलणे यांस ते चार आत्मक्लेश म्हणतात. लोभ, द्वेष, मोह आणि भय, याबाबतीतील चुकांचे दुष्परिणाम सांगितले. मद्यपान, अवेळी  भटकणे, नाचगाण्यांचे व्यसन लागणे, जुगार खेळणे, गुन्हेगारी मित्रांची संगत करणे, आळसात पडून राहणे, या सहा गोष्टींमुळे उपभोग वृत्तीचा नाश होतो. मद्यपान हे संपत्ती विनाश, भांडण, दुर्धर आजार, बदनामी, निर्लज्ज वृत्ती व बुद्धीचा दुबळेपणा वाढण्यास कारण ठरते. जो माणूस ही १४ कर्मे टाळतो, त्याला सुख सोडून जात नाही, असे त्यांनी शेवटच्या गाथेमध्ये सांगितले आहे.

जगातील राजेशाही संस्थाने आणि राजांची सिंहासने याविरुद्ध कुठे ना कुठे अधूनमधून उठाव सुरू असतात. नागरी स्वातंत्र्य आणि राजकीय हक्कांविषयी जागृती यासाठी आंदोलने होतात. दक्षिण आशियातील पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका, मालदीव, म्यानमार, नेपाळ या देशांत हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीचा संघर्ष सातत्याने चाललेला असतो. नागरी हक्कांची पायमल्ली, राजकीय, हडेलहप्पी, मूलतत्त्ववादी विचारांचे वर्चस्व, अशा अराजकाच्या वातावरणात लोकांची लढाई चालू असते. राजेशाही अथवा हुकूमशाही आपली राजकीय सत्तेवरील हुकमत सहसा सोडत नाही.

अशा स्थितीमध्ये भूतान या देशामध्ये एक क्रांतिकारक घटना घडते. देशाच्या सर्वोच्चपदी असलेला राजा स्वतःहून आपल्या सत्तेचे लोकशाहीला दान करतो आणि प्रजातंत्राची सुरुवात करून देतो, ही अशक्य वाटणारी गोष्ट भूतानमध्ये घडली. भूतानचे चौथे राजे जिग्मे सिंगे वांगच्युक यांनी २५ सभासदांचे खास कार्यकारी मंडळ नियुक्त करून; सुलभ, कार्यक्षम, पारदर्शी व जबाबदार नागरी प्रशासनाचा श्रीगणेशा केला. २००० साली या मंडळाने शासनव्यवस्थेचे पुनर्विलोकन करून सुधारणा सुचवल्या. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी २००१मध्ये समिती नेमण्यात आली. लोकशाही स्थापनेत स्वतः पुढाकार घेऊन या राजाने स्वतःबाबतचा तसेच सिंहासनाचा आदर व प्रतिष्ठा राखून ठेवली.

२००५ मध्ये भुतानी राज्यघटनेचा मसुदा तयार झाला. भूतानच्या राज्यघटनेनुसार प्रशासनाचे स्वरूप लोकशाहीयुक्त सनदशीर राज्यसत्ता असे आहे. सार्वभौम सत्तेची सूत्रे भूतानी जनतेच्या हातात आहेत. राजे जिग्मे सिंग्ये वांगच्युक यांनी एक आणखी महत्त्वाचे पाऊल टाकले. अवघ्या ४६व्या वर्षी सिंहासन सोडून त्यांनी आपला मुलगा जिग्मे खेसर नामग्याल वांगच्युक यांच्या हाती सत्ता सोपवली. सध्या ते भूतानचे पाचवे राजे आहेत. २००८ साली पहिली सार्वत्रिक निवडणूक होऊन जनतेचे सरकार सत्तेवर आले. ९ एप्रिल २००८ रोजी जिग्मे थिनले हे भूतानचे पहिले पंतप्रधान बनले.

सकल राष्ट्रीय समाधान ही एक मानवी चेहऱ्याची अर्थनीती मानली जाते. विकासाच्या प्रक्रियेत संपत्ती आणि साधनांचा समतोल हा अध्यात्म, भावनिकता आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये यांच्याशी जोडला गेला आहे. ‘मूल्याधिष्ठित विकास’ असे या अर्थनीतीचे वर्णन राजे वांगच्युक यांनी केले आहे. चार प्रमुख तत्त्वप्रणाल्यांवर आधारलेल्या सकल राष्ट्रीय समाधान नीतीमध्ये समान सामाजिक-आर्थिक विकास, सांस्कृतिक उन्नयन, पर्यावरण संवर्धन आणि सुशासन यांवर भर दिलेला आहे. त्यानुसार देशाची पंचवार्षिक योजना तयार केली आहे. नऊ विषय क्षेत्रे आणि ७२ पर्याय यांद्वारे समाधानाचा निर्देशांक ठरविण्यात येतो. दर दोन वर्षांनी राष्ट्रीय पाहणी करून त्यामध्ये काही दुरुस्त्या केल्या जातात. पर्यावरणीय एकात्मता, वेळेचा वापर, शिक्षण, आरोग्य, मानसिक आरोग्य, राहणीमानाचा दर्जा, सुशासन, सामाजिक सहिष्णुता व संस्कृती ही नऊ विषयक्षेत्रे नक्की करण्यात आली आहेत. सकल राष्ट्रीय समाधान नीतीचा निर्देशांक या सर्व एककांवर आधारलेला आहे.

भौतिक आणि आत्मिक विकासाची परस्परपूरक सांगड घातल्याशिवाय समाजाचा समन्यायी विकास होऊ शकत नाही, असे भूतानला वाटते. बुद्धांच्या सम्यक समाज विकासाच्या सिद्धांतावर आधारलेल्या सकल राष्ट्रीय समाधान नीतीची आजच्या आधुनिक जगण्याशी सांगड घालण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. शारीरिक, मानसिक व आत्मिक आरोग्य, वेळेचा सदुपयोग, सामाजिक व सार्वजनिक सहिष्णुता, सांस्कृतिक संवर्धन, शिक्षण, पर्यावरण, राहणीमान, सुशासन, या सर्वांवर बुद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव आहे. विकासाच्या मोजमापाचे ते वेगळे परिमाण आहे.

२००६मध्ये सकल राष्ट्रीय समाधान नीतीच्या संकल्पनेत सामाजिक-आर्थिक विकासाचे परिमाण नव्या काळास सुसंगत करण्यात आले. आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन संस्थेचे अध्यक्ष जोन्स यांनी हे नवे प्रारूप सुचवले. त्यानुसार विकासाच्या सात विषय-क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय, मानसिक व भावनिक आरोग्य विचारात घेतले जाते. त्यानुसार दरडोई उत्पन्न वाढवले जाते. सकल राष्ट्रीय समाधान अर्थनीतीच्या मर्यादा, बलस्थान आणि आजच्या काळाशी असलेला सुसंगतपणा यावर भूतानमध्ये व इतर देशांमध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवाद झाले आहेत. त्यामध्ये या अर्थनीतीला पोषक असे बदलही सुचवले आहेत. विकासाच्या अर्थनीतीचे भूतानचे हे प्रारूप अनेकदा टीकेचे लक्ष्यही ठरले आहे. सकल उत्पादनाचे, स्थानिक उत्पादनाचे मापदंड जगातील सर्व देश आज वापरत आहेत. विकासाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्याची हीच सर्वव्यापी पद्धत आहे. व्यक्तीचे समाधान निश्चित करताना भौतिक भरभराटीला नगण्य ठरवणे योग्य नाही, अशी टीका केली जाते.

बुद्ध तत्त्वज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था निर्माण करणाऱ्या भूतान सरकारने जनतेला समाधानाचे वचन किंवा हमी दिलेली नाही. सुख ही संकल्पना आत्मिक समाधानाच्या जाणिवेवर बेतलेली आहे. समाधान बाहेरून मिळवता येत नाही, ते आतून जाणवते. सकल राष्ट्रीय समाधान नीतीद्वारे सरकारने लोकांना तसे पर्यावरण उपलब्ध करून दिले आहे. मानवी मन आणि शरीर यांचा मिलाफ साधणारे साधन म्हणून आपण विकास प्रक्रियेकडे पाहिले पाहिजे, असे भूतान सरकारला वाटते. भौतिक प्रगती हेच मानवी विकासाचे मोजमाप न मानता, आत्मिक उन्नतीची किंवा भावनिक व मानसिक गरजांची त्यास जोड दिली पाहिजे. भूतानची राज्यघटना या मूल्यांचा आग्रह धरणारी आहे. या तत्त्वांना अनुसरूनच पंचवार्षिक योजना, प्रकल्प, धोरणे राबवले जातात. लोकशाही शासन हे शांतता, स्थैर्य आणि सामंजस्य वाढीचे साधन ठरावे, या दिशेने भूतानचे प्रयत्न सुरू आहेत.

‘दैनिक कोण कुन्सेल’चे संपादक वांगच्युक यांच्या मते, “राजकीय परिपक्वता, दूरदृष्टीचे शहाणपण असलेले नेतृत्व, लोकशाही संस्कृती आणि नीतीमूल्ये यांचे भान असलेला समाजच आत्मिक समाधानाच्या पातळीवर पोहोचू शकतो. भूतानची सकल राष्ट्रीय समाधान नीती याच नैतिकतेचा आग्रह धरणारी असल्यामुळे, सकल स्थानिक उत्पादन नीती समर्थक देशांतील नागरिकांना अपवाद वाटत असली, तरी एक ना एक दिवस जगाला तिच्याकडे वळावेच लागेल.”

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................  

आधुनिक मानवी समाजाचा विकास आणि त्यातील विसंगती यावर मार्मिक भाष्य करणारी कविता दलाई लामा यांनी लिहिलेली आहे - “आमच्या इमारतींची उंची वाढली, पण माणुसकी मात्र खुजी झाली. माणूस चंद्रावर पोहोचला, पण शेजारची चौकशी होत नाही. औषधांचा सुकाळ पण आरोग्य मात्र महाग”. या आशयाच्या या कवितेत आजच्या सुखलोलुप जगण्यातील फोलपण वर्णिलेले आहे. विकास, प्रगती, भरभराट, स्पर्धा, महत्त्वाकांक्षा यांचा वेग एवढा वाढला आहे की, त्यामध्ये निवांतपणा, समाधान या गोष्टींना जणू थाराच राहिलेला नाही.

‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर नॉट डूईंग मच’ या ‘हळू चाला’ चळवळीचे भारतातील समर्थक ज्ञानेश्वर मुळे यांनी आजच्या विकास नावाच्या जीवघेण्या जीवनशैलीचे विश्लेषण समर्पक शब्दांत केले आहे. ते म्हणतात, “माणसाने आपल्या जीवनाला अकारण व्यग्र करून टाकले आणि त्याच्या समस्त दुःखांची सुरुवात झाली. आजच्या कोणत्याही दुःखाच्या, समस्येच्या किंवा संकटाच्या मुळाशी अनावश्यक उत्साह, सक्रियता, अनाठायी परिश्रम, पाठलाग कारणीभूत आहे. शहरे वाढवली, घरोघरी टीव्ही व सेलफोन आला. वीज, शाळा एवढीच प्रगती? या प्रगतीत जंगल, नद्या, गाव, भाषा, संस्कृती, जैवविविधता, सागर, भूगर्भ सगळ्यांची वाट लावली, कोणती प्रगती?”

प्रगती आणि विकासाच्या वेगाचा अतिरेकी ध्यास घेणारा अमेरिकन नागरिक आज युरोपियन देशांच्या तुलनेत आपली झोप कमी करून एका वर्षात तेरा महिने काम करतो. तरीही तो स्वतःला कायम असुरक्षित समजत असतो. ही विकासाची सूज की, प्रगतीचा बुडबुडा? दुसरीकडे विकासविषयक अनेक उणिवा आणि अभाव असतानाही चिमुकला भूतान आत्मिक समाधानाचा ध्यास धरतो आहे. उतू जाणाऱ्या सुखातही दुःखाचे चटके देणारा विकास हवा की, अभावातही आंतरिक सुख देणारे समाधान हवे, हे ठरवण्याची निर्णायक वेळ आज आली आहे, एवढे मात्र नक्की!

..................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................

लेखक प्रभाकर ढगे मुक्त पत्रकार व ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.

dhage.prabhakar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......