अजूनकाही
प्रारंभीच एक बाब मोकळेपणानं मान्य करतो की, नुकत्याच झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या निकालांबाबतचे माझे अंदाज चुकलेले आहेत! भाजप राज्यात जागानिहाय क्रमांक एकचा पक्ष होईल, मुंबई महापालिकेत भाजपला ७० ते ७५ जागा आणि नागपूर महापालिकेत ७५ ते ८० जागा मिळतील, अन्य महापालिकात या पक्षाची कामगिरी अत्यंत चांगली असेल; जिल्हा परिषदात काँग्रेस आणि विशेषत: राष्ट्रवादीचा वरचष्मा राहील असा माझा अंदाज होता. तो पार धुळीला मिळवल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो. महाराष्ट्र भाजपचा निर्विवाद चेहरा म्हणून इतक्या लहान वयात स्थान प्राप्त केल्याबद्दलही फडणवीस यांचं कौतुक करतो. फडणवीस यांचं हे स्थान कायम राहावं; त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची वेगानं, चौफेर विकासाच्या दिशेनं वाटचाल व्हावी यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा देतो. (नागपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे भोंगाडे वाजवण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा वाटा आहे, हेही इथं नमूद करायलाच हवं. ‘औकात हा शब्द नागपुरी असल्याचं मला तरी ठाऊक नाही, पण ‘भोंगाडे’ हा खास नागपुरी शब्द आहे! ‘भोंगाडे वाजवणं’ म्हणजे धुव्वा उडवणं/धुळीस मिळवणं असा आहे. परमस्नेही नितीन गडकरी यांची सन्मानपूर्वक आठवण म्हणून तो शब्द इथं वापरण्यात आलाय!)
अत्यंत प्रतिकूल राजकीय-सामाजिक-आर्थिक-जातीय परिस्थितीत फडणवीस यांनी हे यश एकहाती मिळवलेलं आहे. ज्यांनी फडणवीस यांचं ‘ब्राह्मण्य’ काढलं त्या जाणता राजा शरद पवार यांचं, महाराष्ट्रावर अशी एकहाती ‘हुकमत’ निर्माण करण्याचं स्वप्न गेल्या चार दशकांत कधीच पूर्ण झालं नाही. ज्यांना महाराष्ट्र उभा-आडवा पाठ आहे असं म्हटलं जातं, त्या पवार यांच्या डोळ्यादेखत वयाची जेमतेम पंचेचाळीशी पार केलेल्या (आणि ब्राह्मण) फडणवीस यांनी मात्र ते यश मिळवलं आहे. ज्या वयात हे स्वबळाचं स्वप्न पाहायला पवार यांनी सुरुवात आणि त्या दिशेनं वाटचाल सुरू केली (आठवा ‘पुलोद’चा प्रयोग आणि ते सरकार तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बरखास्त केल्यावरही महाराष्ट्रावर पडलेली पवार नावाची जबरदस्त मोहिनी!) त्या वयात फडणवीस यांनी हे निर्विवाद स्वप्न सिद्ध केलेलं आहे.
राजकीय पटलावरील पवार पन्नाशी आणि देवेंद्र पंचविशी पार करत असताना हे घडतंय, याला योगायोग म्हणायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला तर त्यात एक ‘काव्यगत राजकीय नातेसंबध’ दिसतो आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्युनंतर अचानक पक्षाच्या राज्य शाखेचं स्वीकारावं लागलेलं नेतृत्व, मग विधानसभा निवडणुकीत १२३ जागा, नगर परिषदा-पंचायतीच्या निवडणुकीत घवघवीत यश आणि आता राज्याच्या आठ महापालिका तसंच ग्रामीण भागावर बसवलेली घट्ट पकड, असं राजकीय यश शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांनाही मिळवता आलेलं नव्हतं. ठाकरे आणि शिवसेनेसमोर भाजपचं असं आव्हान उभं करणं ‘शत-प्रतिशत’ची भाषा करणाऱ्या प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनाही ते शक्य झालेलं नव्हतं. जे भल्याभल्यांना जमलं नाही ते फडणवीस यांनी करून दाखवलं आहे. म्हणूनच फडणवीस यांच्या या यशाचं बावन्नकशीपण आणि झळाळी आणखी वाढलेली आहे.
हा जनमताचा भाजपच्या बाजूने मिळालेला कौल आहे, असा अर्थ काढला जात असला तरी आणि तो कौल देताना मतदारांना फडणवीस यांच्या स्वच्छ प्रतिमेची, ते देत असलेल्या विकासाच्या शब्दाची, नरेंद्र मोदी नावाची भुरळ पडली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; तर हे भाजप सरकारने केलेल्या कामाला मिळालेली पोचपावती आहे, असा दावा पक्षाच्यावतीने केला जात आहे. त्या सर्वांत काही प्रमाणात तथ्य आहेच. मात्र मतदानात मिळालेला कौल काहीही असो, रयतेच्या मनातील भावना मात्र राज्य आणि केंद्रातील सरकारांच्या विरोधातील तसंच अति तीव्र आहेत, यावर निकालापूर्वी केलेल्या लेखन आणि ‘एबीपी माझा’वर केलेल्या प्रतिपादनावर अजूनही मी ठाम आहे. भाव पडल्याने बळीराजाच्या मनात असंतोष खदखदत आहे, निश्चलनीकरणाने (नोटाबंदी) बहुसंख्य शेतकरी मोडून पडलेला आहे; छोटे व्यापारी, तळहातावरचं जिणं जगणारा वर्ग बेहाल झालेला आहे. बाहेरून आलेल्यांना निवडणुकीत झुकतं माप मिळाल्यानं भाजपमधील निष्ठावंत नाराज आहेत.
मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या कार्यशैलीविषयी पक्षाच्या एका गोटात नाखुशीची भावना आहे. जे रयतेच्या हिताचे निर्णय घेतल्याचा दावा फडणवीस करतात; त्याचे फायदे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेले नाहीत. कारण प्रशासनावर फडणवीस यांची पकड बसलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे हे विसरताच येणार नाही. हे दाहक वास्तव मतात परावर्तित झालं असतं तर भाजपला या निवडणुकीत दणकून मार पडला असता, याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही दुमत नाही. तसं न घडल्यानं मुख्यमंत्री आणि भाजपचे अन्य नेते, मंत्री गोडगैरसमजाच्या प्रदेशात रममाण होण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही. कोणतीही गल्लत न करता कौल आणि वास्तव यातील भेद नीट ओळखून; कामात सुधारणा न करता यापुढेही फडणवीस आणि त्यांचं सरकार वागणार असेल तर, महाराष्ट्राच्या राजकारणातील ती भविष्यातली फार मोठी हाराकिरी ठरणार, याबद्दल कोणतीही शंका नाही, हे कटू असलं तरीही आज नोंदवून ठेवायलाच हवं आणि कुणी तरी धोक्याचा हा इशारा देण्याचं धाडस दाखवायलाच हवं.
या निवडणुकीत झालेल्या मतदानाची जी आकडेवारी हाती आली आहे, त्यावरून संख्याबळ आणि मतं कमी झाली असली तरी काँग्रेसची पाळंमुळं राज्यात अद्याप शाबूत आहेत हेच पुन्हा एकदा दिसून आलंय. आधी लोकसभा, मग विधानसभा, त्यानंतर नगर परिषद आणि पंचायती आणि आता महापालिका व जिल्हा परिषदा निवडणुकात काँग्रेस पक्ष दारुण पराभवाला सामोरा गेलेला आहे. पराभवाची ही मालिका खंडित होत नाहीये, यावरून यापूर्वी झालेल्या प्रत्येक पराभवातून या पक्षाचे नेते कोणताही धडा शिकलेले नाहीत हेच सिद्ध होतंय. खरं तर, राज्यातले प्रमुख विरोधी पक्ष असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शैथिल्यग्रस्त मनसेची या निवडणुकीतील देहबोलीच पराजयाची होती. पूर्ण महाराष्ट्र सेना विरुद्ध भाजप म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याभोवतीच केंद्रित झालेला होता. मुंबईत काय किंवा नागपूर, सोलापूर, पुणे, औरंगाबाद, नाशिकमध्ये काय...
खरं म्हणजे, सगळीकडे काँग्रेसचे छोटे आणि मोठे नेते परस्परांत इतके वचावचा भांडत होते की, ते निवडणुका लढवणं विसरले असून स्वपक्षीयांची कुलंगडी जाहीरपणे धुणं हेच त्यांचं जणू जीवितकार्य उरलं असल्याचं चित्र होतं. त्यातून सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विलास मुत्तेमवार, गुरुदास कामत, नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात... अशा अनेक नेत्यांच्या प्रभावाची बेटं भाजपच्या भगव्यात बुडाली! काँग्रेसचे हे नेते या निवडणुकांच्या काळात ना कधी एकदिलानं प्रचारासाठी एकत्र आले, ना त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसला तारण्याचे प्रयत्न केल्याचं दिसलं-जाणवलं. प्रत्येक नेता आणि त्याचा कार्यकर्ता काँग्रेसचा झेंडा घेऊन एकटा चालत पक्षाची छकलं उडवण्याची कामगिरी मनापासून बजावत असल्याचं चित्र होतं. नागपुरात तर आपल्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षावर शाई ओतण्याचा महापराक्रम करण्याची मजल मारण्याचं अतुलनीय धैर्य काँग्रेस नेत्यांकडून दाखवलं गेलं, तर मुंबईत संजय निरुपम शिवसैनिक असल्यासारखे काँग्रेससाठी कबर खोदताहेत आणि त्यांचे पक्षांतर्गत विरोधक त्या ‘पवित्र’ कार्यात हिरीरीनं सहभागी झालेले आहेत, असंच दिसत होतं.
राष्ट्रवादीच्या तर एकाही नेत्यानं जीव झोकून, पूर्ण सामर्थ्यानं राज्यभर प्रचार केलेला दिसला नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे दोन्ही नेते ‘मुंबईत शिवसेना नंबर एकचा पक्ष असेल’ असं ज्या उघडपणे शेवटच्या टप्प्यात सांगू लागले, त्यातून या नेत्यांनी त्यांच्याकडची मतं सेनेकडे तर वळवली नाही ना, अशी शंका निर्माण होत होती. मनसेनं शेवटच्या क्षणी युतीसाठी हात पुढे करून मराठी मतदारांसमोर शिवसेना हाच पर्याय असल्याचं सूचित करणं, हा तर राजकीय अगतिकतेचा कळसच होता. विरोधी आघाडीवरच्या या सर्व कृती आणि भाजप तसंच शिवसेनेसाठी अनुकूल ठरल्या.
विरोधी पक्ष गलितगात्र आणि जनता मनातली खदखद मत म्हणून व्यक्त करायला तयार नाही; इतकी अनुकूल परिस्थिती अलीकडच्या तीन-साडेतीन दशकात महाराष्ट्रात कोणत्याही व्यक्ती आणि/किंवा सत्ताधारी पक्षासाठी निर्माण झालेली नव्हती. अशी संधी जर शरद पवार यांना १९८० साली मिळाली असती तर कदाचित आजचा महाराष्ट्र विकासाच्या सर्व आघाड्यावर अग्रेसर असता, सर्वार्थानं पुरोगामित्वाचा नायक असता; देशातील राजकारणाला त्यामुळे एक निर्णायक वळण देण्याची संधी महाराष्ट्राला (पक्षी : शरद पवार) मिळाली असती आणि पवार यांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न कदाचित विरून गेलं नसतं. पवारांना मिळाली नाही ती सुवर्णसंधी फडणवीस यांना मिळाली आहे. आता तरी दौरे कमी करून मंत्रालयात ठाण मांडून प्रशासन गतिमान करणं, घेतलेल्या निर्णय आणि केलेली घोषणांची अमलबजावणी झाली किंवा नाही यावर नजर ठेवण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा निर्माण करणं आणि ‘लष्कर-ए-देवेंद्र’मधील डागाळलेपण दूर करणं, यावर फडणवीस यांना गंभीरपणे भर द्यावा लागणारा आहे; अन्यथा पुढील निवडणुकीत स्वप्नभंगाची ठसठसणारी जखम म्हणा की वैफल्य अटळ आहे.
मतदार आणि विरोधी पक्षांनी दिलेल्या या दुर्मिळ संधीचं देवेंद्र फडणवीस सोनं करतात आणि आणखी पुढची मजल मारतात की, शरद पवार यांच्याप्रमाणं स्वप्नभंगातून आलेल्या वैफल्याची विरलेली वस्त्रं घालून आणखी काही वर्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वावरताना दिसतात, याबद्दल आजच काही सांगता येणं कठीण आहे. पण फडणवीस यांच्या बाबतीत काय घडतं ते पाहणं मोठ्या उत्सुकतेचं आहे, यात मात्र शंका नाही.
(अधिक संदर्भासाठी वाचा प्रस्तुत भाष्यकाराचा लेख- ‘छत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती...’ लिंक- http://goo.gl/MK2H5y)
.............................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
parikshit rumale
Sun , 05 March 2017
फक्त जर तर वर आधारित पुर्वग्रहदुषित मत