२५ जानेवारी हा ‘राष्ट्रीय मतदार दिन’. त्यानिमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्यातर्फे ‘लोकशाही समजून घेताना’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात महाराष्ट्रातील ३३ मान्यवर लेखकांच्या लोकशाहीच्या विविध पैलूंचा आढावा घेणाऱ्या लेखांचा समावेश आहे. या पुस्तकातील लेख ‘अक्षरनामा’वर २ फेब्रुवारीपासून क्रमश: प्रकाशित करत आहोत...
..................................................................................................................................................................
लोकशाही मानसिकता कशी घडते? याचा विचार करताना लोकशाही आणि मानवी मन यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. लोकशाही ही एक निव्वळ राजकीय पद्धती आहे की, माणसाचे मन ज्या प्रकारे काम करते, त्यावर या राजकीय पद्धतीची स्थिरता आणि विकास अवलंबून आहे? लोकशाहीपणा हा माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असतो का? लोकशाहीपणाने वागणे याचे मानसशास्त्रीय स्पष्टीकरण आहे का? मानवी मनातले लोकशाहीकरण वाढवता येणे शक्य आहे का? इत्यादी प्रश्न या निमित्ताने पडतात. त्यांची उत्तरे शोधताना मानसशास्त्राच्या अनेक विद्याशाखांचा आपल्याला उपयोग होतो. यामध्ये प्रामुख्याने राजकीय मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, सांस्कृतिक मानसशास्त्र, उत्क्रांतीवादी मानसशास्त्र, बोधनिक मानसशास्त्र यांचा समावेश करता येईल.
या लेखामध्ये साधारणपणे पुढील भाग आहेत : लोकशाही आणि मानसशास्त्र यांचा एकत्र विचार करतानाची गृहीतके; लोकशाही प्रक्रियांना मदत करणाऱ्या मानसिक प्रक्रिया; लोकशाही प्रक्रियांमध्ये अडचण निर्माण करणाऱ्या मानसिक प्रक्रिया; भारताचे सांस्कृतिक आणि राजकीय वातावरण यांचे अर्थ; आणि वास्तविक लोकशाहीच्या समर्थनार्थ लोकशाही मानसिकतेचे नागरिक विकसित करणे.
गृहीतके आणि पार्श्वभूमी
लोकशाही आणि मानसशास्त्र यांचा संबंध लावताना आपल्याला काही गृहीतके मांडावी लागतात. ती साधारण पुढीलप्रमाणे आहेत :
- लोकशाही ही आपल्याला ज्ञात असलेली सर्वात उत्तम अशी राजकीय प्रणाली आहे.
- मानवी मनाची रचना ही लोकशाही राजकीय प्रणालीसाठी म्हणून झालेली नाही.
- मानवी मनाचे अनेक भाग असतात, त्यातील काही लोकशाही प्रक्रियांना अनुकूल असतात आणि काही प्रतिकूल असतात.
- मानवी वर्तन हे कोणत्याही एका गोष्टीने निर्धारित होत नाही. मानवी वर्तन हे अनेक कारणांनी निर्धारित होते. हे वास्तव माणसांच्या राजकीय वर्तनासाठीही लागू पडते.
मानसशास्त्राच्या विविध शाखांचा आणि त्यातील सैद्धांतिक प्रगतीचा वापर नियोजन-रचना करण्यासाठी होऊ शकतो, ज्याने लोकशाहीसंबंधी सामाजिक प्रक्रिया प्रगल्भ आणि सुदृढ होतील.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
आपण जेव्हा लोकशाहीचा विचार करतो, तेव्हा आदर्श लोकशाही आणि आपण वास्तवात जिथे आहोत, यातील तफावत कायमच असते. सांविधानिक आणि संस्थात्मक असे लोकशाहीचे दोन्ही भाग असले, तरीही त्यांचे वास्तविक मानवी वर्तनामध्ये परिवर्तन, हे लोकशाहीचे वास्तविकीकरण असते. सांविधानिक आणि संस्थात्मक रचना बनवताना, त्या पाळण्याची क्षमता या मानवी समूहांमध्ये आहे का आणि ती निर्माण करण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील, याचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे.
साधारणपणे एका ढोबळ शालेय प्रशिक्षणातून लोकशाहीला अनुकूल मानसिकता तयार होऊ शकते, या गृहीतकावर सांविधानिक आणि संस्थात्मक लोकशाही रचना बनवल्या जातात. बरेचदा संबंधित समूहाच्या मानसिकतेचा विशेष विचार त्यात होत नाही. त्यामुळे आदर्श लोकशाही प्रणालीपासूनचे आपले अंतर आणि लोकशाहीबद्दलची अनास्था किंवा निराशा टिकून राहते. आपण एक समाज म्हणून एका आदर्श लोकशाही प्रणालीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. काही देश किंवा समाज यांचा हा प्रवास थोडा पुढे गेला असेल इतकेच. कोणताही देश किंवा समाज हा आदर्श लोकशाही प्रणालीपाशी पोहोचलेला नाही.
याची अनेक कारणे आहेत. याचे एक कारण हे मानवी मनाच्या रचनेमध्ये आहे. साधारणपणे, मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात, मानवी समाजात औपचारिक राजकीय व्यवस्था स्थापन करण्याचा कालखंड तुलनेने छोटा आहे. यातल्या मोठ्या कालखंडामध्ये जे प्रश्न सोडवण्यासाठी मानवी मनाची जडणघडण झाली, ते प्रश्न प्रामुख्याने अन्न-निवारा, जोडीदार निवड, अपत्य पालन-पोषण, सामूहिक वर्चस्व निर्माण करणे, आणि इतर आक्रमकांपासून स्वतःचा बचाव करणे व गरज पडल्यास आक्रमकपणे वागणे, हेच होते.
मानवी इतिहासामध्ये लोकशाही राजकीय पद्धतींचा विकास आणि उत्क्रांती ही अतिशय अलीकडची गोष्ट आहे. प्राचीन समाजामध्ये लोकशाहीचे उगम शोधता आले (उदाहरणार्थ, अथेन्स); तरी अमेरिका, भारत यांसारख्या मोठ्या खंडप्राय देशांमध्ये लोकशाही प्रक्रिया पूर्ण सुरळीतपणे राबवणे, ही आधुनिक कालखंडात घडलेली गोष्ट आहे. मानवी मनाची जी रचना झाली आहे, ती प्रामुख्याने कुठल्याही प्रकारच्या लोकशाह्यांची प्रक्रिया राबवण्यासाठी झालेली नाही. किंबहुना, या राजकीय प्रक्रियेतले काही भाग मानवी मनाला एका मर्यादित अर्थाने परके आहेत. त्यामुळे मानसशास्त्र आणि लोकशाही यांचा एकत्रित विचार करताना, मानवी मनाची रचना आणि त्याच्या मर्यादा नोंदवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. या लेखामध्ये अशा काही बाबींचा विचार केला आहे, ज्या लोकशाही प्रक्रियांना फारशी मदत करत नाहीत, किंबहुना अडचणी तयार करतात. तर मानवी मनाचे असे काही घटक आहेत, की जे लोकशाही प्रक्रियांना उपयुक्त ठरू शकतात.
सर्वसाधारणपणे, मानसशास्त्रज्ञ जेव्हा मानवी मनाचा विचार करतात, तेव्हा परस्पर-अवलंबित्व नसलेले दोन घटक महतत्त्वपूर्ण मानतात. एक, बोधनिक (कॉग्निटिव्ह) प्रक्रिया, आणि दुसरा, अबोधनिक प्रक्रिया. बोधन म्हणजे आपल्या आजूबाजूच्या जगाचे आणि आपल्या प्रक्रियांचे ज्ञान असणे. या मानसिक प्रक्रियांमध्ये अवधान, प्रतिमांचे ज्ञान, तात्कालिक आणि दीर्घकालीन स्मृती, विचार, तर्क, निर्णय घेण्याची प्रक्रिया, भाषा, बुद्धिमत्ता, समस्या सोडविणे, इत्यादींचा समावेश होतो. या प्रक्रिया आपल्याला विशिष्ट क्षमता प्रदान करून देतात, जसे की, अमूर्त तर्क करण्याची क्षमता, अंकांचा वापर करण्याची क्षमता, भाषेचा वापर तर्कामध्ये करण्याची क्षमता, इत्यादी. या प्रक्रिया जशा मनामध्ये घडतात, तसेच मनाला या गोष्टीची जाणीव किंवा ज्ञान असते, की या प्रक्रिया मनामध्ये घडत आहेत. ही मेटा-कॉग्निटिव्ह जाणीवही बोधनाचा भाग आहे. अबोधनिक प्रक्रियांमध्ये मानवी व्यक्तिमत्त्व, विविध कार्यांसाठी लागणाऱ्या मानवी प्रेरणा, मानवी भावभावना, विविध गोष्टींमध्ये असलेली रुची किंवा आवड, आपली मते, इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.
लोकशाही प्रक्रियांना अनुकूल मानसिक प्रक्रिया
लोकशाहीला अनुकूल बदल घडवण्यासाठी दोन प्रमुख अक्ष मानता येतात : औपचारिक कायदा आणि अनौपचारिक सामाजिक नियम. या दोन्हीमध्येही कोणतेही बदल न घडता वरवरचे सामाजिक बदल घडत राहतात. लोकशाहीला अनुरूप कायद्यातील बदल घडल्याने (उदा. माहिती अधिकार कायदा, इत्यादी.) काही बदल होतात, परंतु त्याबरोबर अनौपचारिक सामाजिक नियम (उदा. या अधिकारांचा वापर करण्याची सामाजिक धीटाई) जर झाले नाहीत, तर औपचारिक बदलांचा परिणाम मर्यादित राहतो. अनौपचारिक सामाजिक नियम लोकांशी अनुरूप बदलणे हे सुदृढ लोकशाहीसाठी आवश्यक असते. अनौपचारिक सामाजिक नियम आपला-परका या आधारावर असमान वागणूक देण्यास अनुमती देतात आणि लोकशाही वास्तवात उतरवणे रोखतात. लोकशाही प्रक्रियांना अनुकूल मानसिक प्रक्रिया पुढीलप्रमाणे सांगता येतील :
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
लोकांमधील मानसिक बदल : लोकशाहीच्या मार्गाने चळवळीचे समर्थन करणारे नेतृत्व असले पाहिजे. बहुतेक नेते लोकशाही व्यवस्थेद्वारे किंवा लोकशाही व्यवस्था आणण्याचे आश्वासन देऊन सत्ता मिळवतात. पण, सत्तेत आल्यानंतर त्यांना निरंकुश पद्धतीने कारभार चालवायचा असतो. लोकशाही व्यवस्थेसाठी अनुकूल सांविधानिक आणि संस्थात्मक रचना लागते. लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करण्याकरता संस्थात्मक समर्थन निर्माण करण्यासाठी राजकीय संधी असणे आवश्यक आहे.
खूप कमी संशोधन व चर्चा केलेली बाब म्हणजे, लोकांमधील मानसिक बदल. लोकशाही नागरिक बनण्यासाठी आवश्यक असलेली सामाजिक आणि मानसिक कौशल्ये सामान्य जनतेने वेळेवर आत्मसात केली पाहिजेत. हा बदल दोन स्तरांवर व्हायला हवा. पहिला- सामूहिक स्तरावर आणि दुसरा- वैयक्तिक स्तरावर. सामूहिक स्तरावरील बदलामुळे व्यापक वैयक्तिक स्तरावर बदल शक्य होतात. अगदी थोड्याच व्यक्ती सामूहिक समर्थनाशिवाय लोकशाही नागरिकत्वाची वैशिष्ट्ये साध्य करू शकतात, परंतु एकटी व्यक्ती म्हणून त्यांचा प्रभाव नेहमीच मर्यादित राहील. अनेकांनी लोकशाही अनुरूप बदल घडवायचे असतील, तर सामूहिक स्तरावर बदल घडणे आवश्यक आहे. वैयक्तिक पातळीवरील बदल हा सर्वांत अवघड आहे. हा बदल प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत घडावा लागतो आणि तो संथ असतो. असे बदल करण्यासाठी संस्थात्मक रचना आणि राजकीय इच्छाशक्ती आवश्यक असते. त्याच्या अभावी, लोक पुन्हा लोकशाही व्यवस्था बळकट करण्यापासून दूर जातात. यासाठी राजकीय लवचीकपणा महत्त्वाचा ठरतो. राजकीय लवचीकपणा म्हणजे दिलेल्या कालावधीत राजकीय वर्तनात किती प्रमाणात बदल करणे शक्य आहे याचा विचार. लोकशाही नागरिक बनण्यासाठी जे मानसिक बदल लोकांनी घडविले पाहिजेत, त्यासाठी ही लवचिकता आवश्यक असते.
लोकशाहीतील राजकीय चर्चा आणि रचनात्मक विवाद : नागरिकांची समस्या समजून कोणत्या कृतीमुळे समस्या सोडवल्या जातील, याचा सर्वोत्तम तर्कसंगत निर्णय घेण्यास नागरिकांना मदत करणे, लोकशाही प्रक्रियेतील नागरिकांचा सहभाग वाढवणे, हे लोकशाहीतील राजकीय चर्चेचे हेतू असतात. यात राजकीय विवाद होतात. यामध्ये रचनात्मक विवादांचे काही मानसशास्त्रीय पैलू संशोधकांनी अभ्यासले आहेत. चर्चा करणाऱ्या नेत्यांमधील निर्णय घेण्याची गुणवत्ता आणि समस्या सोडवणे, विचारपूर्वक तर्क करणे, दुसऱ्याचा दृष्टीकोन समजून घेणे, सर्जनशीलता, आकलन सुधारण्यासाठी प्रेरणा, इत्यादी बाबी लोकांचा लोकशाही चर्चेमधील सहभाग वाढवतात.
राजकीय सहिष्णुता आणि परस्पर विश्वास : सुलीवन आणि त्रनसु या अभ्यासकांनी राजकीय सहिष्णुता आणि परस्पर विश्वास या दोन लोकशाहीसंबंधी मनोवैज्ञानिक प्रवृत्तींचा सखोल आढावा घेतला आहे. त्यांच्या निष्कर्षानुसार, प्रथम, राजकीय सहिष्णुता म्हणजे सशक्त लोकशाहीसाठी नागरिकांनी राजकारणात सहभागी होण्यासाठीच्या इतरांच्या प्रयत्नांना सहन करणे आवश्यक आहे. इतर लोक कदाचित लोकप्रिय नसलेल्या विचारांना प्रोत्साहन देत असतील तरीही, त्यांच्या प्रयत्नांना समजून घेतले पाहिजे. संशोधन असे दर्शवते की, नागरिकांची राजकीय सहिष्णुता लोकशाही मूल्यांप्रति असलेल्या त्यांच्या बांधीलकीच्या जोरावर, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या आधारे आणि इतरांकडून त्यांना किती धोका वाटतो आहे त्या प्रमाणात प्रभावित होते. दुसरे, सशक्त लोकशाहीसाठी राजकारणात सहभागी होणारे नागरिक आवश्यक असतात. संशोधन असे दर्शविते की, परस्पर विश्वास आणि राजकीय संस्कृतीची इतर वैशिष्ट्ये राजकारणात नागरिकांचा सहभाग वाढवतात.
तदानुभूती : कल्पनेने दुसर्याच्या अंतरंगात शिरून त्याच्या भावना जाणून घेण्याची कुवत म्हणजे तदानुभूती (एम्पथी). लोकशाहीच्या सुदृढ विकासासाठी लोकांनी इतरांच्या भूमिका समजून घेणे आवश्यक असते. जर इतरांच्या भूमिका समजून घेतल्या नाहीत, तर अतार्किक संघर्ष वाढण्याची शक्यता असते. तदानुभूतीची क्षमता वाढवणे शक्य आहे. अशा क्षमतांची वाढ करणे उपयुक्त ठरते.
मनाचा खुलेपणा आणि उदारमतवाद : मनाचा खुलेपणा हा व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा घटक आहे. व्यक्तिमत्त्वाच्या पंचघटक सिद्धांतामध्ये अनुभवाचा खुलेपणा हा एक घटक मानला जातो. यात जे उपघटक आहेत, त्यात मूल्यांबाबतचा खुलेपणा हा एक महत्त्वपूर्ण उपघटक आहे. मनाचा किंवा अनुभवाचा खुलेपणा अधिक असणाऱ्या व्यक्ती या उजव्या विचारसरणीच्या सत्ताधिकारवादापासून अतिशय दूर असतात, त्यांच्यात सामाजिक वर्चस्वाची भावना अतिशय कमी असते. त्या परस्परविरोधी विचार सहज ऐकू शकतात आणि विचारांच्या परस्परविरोधाचा त्यांना कोणताही मानसिक त्रास होत नाही. ही व्यक्तिमत्त्वाची घडण लोकशाहीच्या विकासाला उपयुक्त ठरते. उदारमतवाद हा लोकशाही मूल्यांच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक असलेला मानसिक घटक असून, तो मनाच्या खुलेपणाशी खूप जवळून जोडला गेला आहे.
माहितीपूर्ण स्व-ओळख शैली विरुद्ध मानक स्व-ओळख शैली : आपण कोण आहोत, हे व्यक्ती ज्या आधारावर ठरवतात, त्याला त्यांची स्व-ओळख शैली असे मानले जाते. माहिती आधारित स्व-ओळख शैली असलेल्या व्यक्ती अधिकाधिक माहिती गोळा करून, मगच कुठल्याही निष्कर्षाप्रत येतात. याउलट, सामाजिक मानकांचा वापर करून स्व-ओळख बनवणाऱ्या व्यक्ती माहितीचा फार विचार करत नाहीत. माहितीपूर्ण स्व-ओळख शैली हा लोकशाही प्रक्रिया विकसित करण्यासाठी एक उपयुक्त घटक मानला गेला आहे.
लोकशाही प्रक्रियांना प्रतिकूल मानसिक प्रक्रिया
हे नमूद करणे आवश्यक आहे की, आपल्या मानसिक प्रक्रिया या लोकशाहीसाठी म्हणून तयार झालेल्या नाहीत. त्यामुळे त्या लोकशाहीसाठी उपयुक्त नाहीत किंवा लोकशाही मानसिकतेचे नागरिक विकसित होण्यामध्ये त्या प्रतिकूल भूमिका बजावत असतील, तरी इतर अनेक ठिकाणी माणसांना त्यांचा उपयोग होत असतो. त्यामुळे ज्या घटकांची चर्चा आपण प्रतिकूल घटक म्हणून करू, ती कोणतीही मूल्याधारित भूमिका नाही, ती केवळ एक उपयुक्ततावादी भूमिका आहे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
केंब्रिज विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर फ्युचर ऑफ डेमॉक्रसी’चा ४० लक्ष लोकांचा अभ्यास करून तयार करण्यात आलेला जागतिक अहवाल असे दर्शवतो की, लोकांचे लोकशाहीबद्दलचे असमाधान वाढते आहे, ही चिंतेची बाब आहे. भारतातले असमाधानाचे प्रमाण जगाच्या तुलनेत काहीसे कमी आहे. याचा अर्थ, लोकशाहीवरील विश्वास कमी होण्यासाठीचे घटक जगाच्या काही भागात प्रभावशाली ठरत आहेत. जॉर्जिया विद्यापीठाच्या प्रा. मोघादम यांनी लोकशाही आणि मानसशास्त्र या विषयावर महत्त्वपूर्ण लिखाण केले आहे. त्यांच्या मते, सर्व लोकशाही देश हे लोकशाही अमलात आणण्यापासून अद्यापही दूर आहेत. याची काही कारणे ते नमूद करतात. अनेकदा क्रांती होऊनही हुकूमशाही विरोधात असलेल्या शक्तींनी, पुन्हा लोकशाही प्रस्थापित होण्याला खोडा घातल्याचे इतिहास आपल्याला दर्शवतो. लोकशाहीला अनुरूप अनौपचारिक सामाजिक नियम आणि आवश्यक राजकीय लवचीकतेचा अभाव हे ते प्रमुख अडथळे आहेत.
‘सायकॉलॉजी ऑफ क्लोज माइंडेडनेस’ या पुस्तकाचे लेखक कृग्लांसकी यांनी बंद मनाच्या गरजेवर महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. ते असे दाखवून देतात की, बदलासाठी खुली नसलेली माणसे पर्यायांचा विचार करणे त्वरित टाळतात आणि आहे त्या मानसिक स्थितीमध्ये अधिक काळ बसून राहतात. त्यामुळे लोकशाही मानसिकतेचे नागरिक विकसित होण्यात मन बंद करून घेण्याची गरज अधिक असणे, हा एक प्रतिकूल घटक असू शकतो. लोकांची मने त्यांच्या समजुतींशी विसंगत असलेल्या माहितीसाठी बंद असू शकतात. या प्रकारच्या विसंगतीला बर्याचदा ‘अतार्किक’ असे संबोधले जाते. मात्र अलीकडील संशोधन असे सूचित करते की, खुले किंवा बंद मनाचे असणे हे अपरिवर्तनीय नाही. आपल्या गरजेनुरूप व्यक्ती मनाचे बंद होणे सुरू ठेवू शकतात किंवा थांबवू शकतात. पुरेशी माहिती असताना खुलेपणा बाळगणे हे व्यक्तीसाठी उपयुक्त नसल्यामुळे कृग्लांसकी असे मानतात की, बंद मनाचे असणे हे कायमच अतार्किक नाही.
लोकशाहीमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींना आपली काहीएक राजकीय ओळख बनवावी असे वाटते आणि त्या ती बनवत राहतात. ही राजकीय ओळख बनवण्याची प्रक्रिया भावनिक पातळीवर फेरफार करून हवी तशी बनवणे, राजकीय पक्षांच्या सोयीचे असते. त्यामुळे भावनिक भांडवलाचा खेळ करून राजकीय ओळख बनवणे-टिकवणे, या गोष्टी केल्याने लोकशाहीच्या विकासाला अडथळा निर्माण होतो. अर्थात, हे थांबवणे किंवा यावर काही कायदेशीर मर्यादा आणणे शक्य नसते. लोकांची लोकशाही प्रक्रियेबाबतची आणि स्वतःच्या आकलनाबद्दलची प्रगल्भता वाढवणे हा यावर एकमेव उपाय आहे. जगभरातील अनेक लोकशाह्यांमध्ये लोकानुनयी राजकारण हे महत्त्वाचे राजकीय साधन बनले आहे. यातून सामूहिक आत्मप्रीतिवाद तयार होऊन त्याचा लोकशाही प्रक्रिया विकसित होण्यात अडथळा होतो आहे.
उजव्या विचारसरणीचा सत्ताधिकारवाद : उजव्या विचारसरणीचा सत्ताधिकारवाद हा एक व्यक्तिमत्त्व प्रकार आहे, जो नैसर्गिकरीत्या त्यांच्या अधिकारातील व्यक्तींच्या अधीन राहतो. त्या अधिकार्यांच्या नावाने आक्रमकपणे वागतो आणि विचार व वर्तनत परंपरागत आहे. थिओडोर अॅडोर्नोने ही संकल्पना विकसित केली. अशा व्यक्ती आपला नेता जे काही सांगेल ते कोणताही प्रश्न न विचारता ऐकतात. नेत्यांबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यावर त्या अत्यंत आक्रमक होतात. प्रसंगी हिंसाचार करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. पारंपरिक प्रथा-परंपरा पाळणे याबाबत त्या अत्यंत आग्रही असतात. धार्मिक बाबींमध्ये त्यांची भूमिका पारंपरिक असते. लैंगिक वर्तनाबाबतचे कठोर पारंपरिक नियम या व्यक्ती पसंत करतात. अशा प्रकारच्या विचारसरणीला चालना मिळाली असता, लोकशाहीचा विकास कमी होतो आणि हुकूमशाही वर्तनाला प्रोत्साहन मिळते. सर्वच संशोधने उजव्या विचारसरणीचा सत्ताधिकारवाद हा लोकशाही विकासाला घातक आहे, हे स्पष्टपणे दर्शवतात.
सामाजिक वर्चस्वाभिमुखता : सामाजिक वर्चस्वाभिमुखता ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. हा मानसिक गुण अधिक प्रमाणात असलेले लोक स्वतःच्या समूहाला महान मानतात आणि इतर सर्व समूहांना कनिष्ठ दर्जाचे मानतात. आपण आहोत त्या समूहामध्ये राहणे आणि तसे दर्शवणे हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. या व्यक्तींना सामाजिक उतरंडीमधील स्वतःचे आणि इतरांचे स्थान महत्त्वाचे वाटते आणि त्यातली असमानता टिकवून ठेवण्याला त्या प्राधान्य देतात. वर्चस्व गाजवणे आणि असमानता टिकवणे, ही या मानसिकतेची दोन महत्त्वाची लक्षणे आहेत. ही दोन्ही लक्षणे लोकशाही मानसिकतेचे नागरिक विकसित करण्यास अडचणी निर्माण करतात.
भारतातील सांस्कृतिक आणि राजकीय वातावरण यांचा अन्वयार्थ
भारतीय सांस्कृतिक आणि राजकीय पटल हे विविधतेने भरलेले आहे. राजकीय पक्ष आणि त्यांच्या लोकशाहीविषयक धारणा, विविध राज्यांमधल्या लोकांच्या लोकशाहीविषयी धारणा आणि तेथील राजकीय वातावरण हे वेगवेगळे आहे. त्याला अनेक ऐतिहासिक-सांस्कृतिक कारणे आहेत. वर उल्लेख केलेले बहुतेक घटक भारतीय सामाजिक राजकीय परिस्थितीमध्ये काही प्रकारच्या सुधारणेसह लागू पडतात. व्यक्तिकेंद्री आणि समूहकेंद्री यामध्ये भारत हा साधारण समूहकेंद्राकडे झुकत असला, तरीही गेल्या दोन-तीन दशकांमध्ये शहरीकरण आणि त्या आधारे व्यक्तिकेंद्रीकरणही वाढले आहे. आमच्या काही संशोधनांमध्येही ग्रामीण भागातून व्यक्तिकेंद्री प्रतिसाद आम्हांला मिळू लागले आहेत.
भारतातला जो समूहकेंद्री समाज आहे, तो वेगवेगळ्या उतरंडी मानणारा आहे. त्यामुळे त्या उतरंडीतील कोणत्या समूहाचा भाग होऊन व्यक्ती वर्तन करते, त्यावर त्याचे अंतिम वर्तन ठरते. हाच न्याय राजकीय वर्तनालाही लागू पडतो. समूहकेंद्री समाज हे त्याग आणि समर्पण यांना भावनिक पातळीवर जास्त महत्त्व देतात. याचा उपयोग व दुरुपयोग दोन्ही होऊ शकतो. सत्तेपासूनचे अंतर (पॉवर डिस्टन्स) या घटकाचा विचार करताना, भारतीय लोक स्वतःला सत्तेपासून दूर समजतात. यामुळे निर्मितीच्या प्रक्रियांमध्ये थेट सहभागी होणे ते सतत टाळतात. याचा लोकशाहीच्या विकासाला फारसा फायदा होत नाही.
लोकशाहीच्या समर्थनार्थ लोकशाही मानसिकतेचे नागरिक विकसित करणे
लोकशाहीला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी नागरिकांमध्ये कोणती मुख्य मूलभूत वैशिष्ट्ये असणे आवश्यक आहे? प्रा. मोघादम यांनी अशी दहा मानसशास्त्रीय वैशिष्ट्ये मांडली आहेत: १) स्वत: विचार/भावना/विश्वास/वर्तन याविषयीच्या योग्य-अयोग्यतेबद्दल शंका घेणे (‘मी चुकीचा असू शकतो’). २) पारंपरिक, पवित्र श्रद्धांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे (हे अवघड असले तरी सामाजिक विकासासाठी आवश्यक). ३) पुराव्याच्या प्रकाशात मते तपासणे. ४) अस्पष्टता आणि बदलासाठी मोकळेपणा, उच्च सहिष्णुता विकसित करणे. ५) जे आपल्यापेक्षा वेगळे आहेत (जात, भाषा, धर्म, वर्ग, लिंग/लिंगभाव, राज्य-ओळख, इ. बाबतीत) त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे व त्यांच्याकडून विविध बाबी शिकण्याची तयारी असणे. ६) विविध स्रोतांकडून माहिती आणि मते मिळवणे. ७) नवीन अनुभवांसाठी मोकळेपणा असणे. ८) इतरांसाठी नवीन अनुभव तयार करणे. ९) लोकशाहीसाठी योग्य-अयोग्य ठरविण्याची तत्त्वे विकसित करणे. १०) सक्रियपणे उच्च मूल्यांचे अनुभव शोधत राहणे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
यातले काही महत्त्वाचे मुद्दे अधिक तपशिलात मांडले आहेत. स्वतःच्या विश्वासावर किंवा विचारावर शंका घेणे, याचा अर्थ आपण कमजोर आहोत असे नसून, आपण कदाचित चुकीचे असू शकतो किंवा यापेक्षा अधिक चांगला आणि बरोबर विचार करणे शक्य आहे, हे स्वीकारणे. अस्पष्टतेबद्दलचा मोकळेपणा किंवा खुलेपणा यावर आधीच्या मुद्द्यांमध्ये लिहिले आहे. हा गुण विकसित करण्यासाठी व्यक्तीने स्वतःहून प्रयत्न करणे आवश्यक आहे. वांशिक केंद्रवाद किंवा स्व-सामूहिक केंद्रवाद म्हणजे आपल्या समूहामध्ये राहणे, आपल्या समूहाला पसंती देणे आणि इतर समूहांपासून दूर राहणे होय. असे करणे हे सामान्य मानवी वर्तन असते, सोपे असते. त्याचे मानसिक, सामाजिक आणि आर्थिक फायदेदेखील असतात. परंतु, हे वर्तन हुकूमशाही पद्धतीच्या राजकीय व्यवस्थेला अनुरूप असे आहे.
लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये याउलट वर्तन अपेक्षित असते. आपल्याहून जे वेगळे लोक आहेत, त्यांना समजून घेणे आणि सर्वसमावेशक असणे, हे लोकशाहीशी सुसंगत वर्तन आहे. त्याहीपेक्षा पुढे जाऊन अवघड गोष्ट आत्मसात करण्याची आवश्यकता आहे; ती म्हणजे, आपल्याहून वेगळ्या असलेल्या समूहाकडून शिकणे.
यातून समाजामध्ये वेगळ्या प्रकारची मानसशास्त्रीय कौशल्ये विकसित होतात. आपल्याच प्रकारचे विचार करणे आणि आपल्यासारख्याच लोकांकडून शिकणे, हे कितीही सोपे असले, तरी ते लोकशाही व्यवस्थेला फारसे मदत करत नाही. नवीन अनुभवांसाठी मोकळेपणा विकसित करणे म्हणजे केवळ विविधता ‘सहन’ करणे नव्हे, तर आपल्या समूहाबाहेरील लोकांसोबत सक्रियपणे नवीन अनुभव शोधणे. हे केवळ अमूर्त शिक्षणापुरते मर्यादित नाही. इतर लोकांकडून मी काय शिकू शकतो? हा विचार करण्याची सदैव आवश्यकता आहे. इतरांसाठी नवीन अनुभव तयार करणे, यातून व्यक्ती 'इतरांना' म्हणजे रूढार्थाने त्याच्या समूहाबाहेरील जे आहेत, त्यांना समूहाच्या जीवनात विश्वासू भागीदार म्हणून प्रवेश करण्याची परवानगी देणे. याद्वारे सर्व-सांस्कृतिकता निर्माण होऊन मूलभूत मानवी समतेवरचा विश्वास दृढ होणे शक्य होते.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
लेखक डॉ. विवेक बेल्हेकर मुंबई विद्यापीठात मानसशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
vivek.belhekar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment