अजूनकाही
प्रसिद्ध चित्रकार दिलीप धोंडीराम बडे यांचं ५ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ६८व्या वर्षी औरंगाबादमध्ये निधन झालं. त्यांच्याविषयीचा हा एक लेख...
..................................................................................................................................................................
दिलीप बडेची ओळख आम्हा दोघांच्याही विद्यार्थिदशेपासूनची. आम्ही दोघंही मराठवाड्यातले पण, ओळख झाली ती मात्र मुंबईत. तेव्हा तो ‘जे.जे.’ला होता आणि मी मुंबईत पोटासाठी पत्रकारितेच्या धबडग्यात नुकतंच शिरलो होतो. तेव्हा आठवड्यातून एखादी तरी चक्कर ‘जेजे’ ला मारण्याचा माझा रिवाज होता. कारणं दोन. एक म्हणजे जगण्याची दिशा अजून सापडलेली नव्हती आणि दुसरं म्हणजे दिशा न सापडण्याचं ते सैरभैरपण ‘जे.जे.’च्या परिसरात गेलं की, हळूहळू विरत जात असे. मित्रांच्या भेटी आणि तिथले रंगभ्रम मन शांत करत असे. त्या काळात कुणीतरी ‘अरे, हा तुमच्या मराठवाड्याचा.’ अशी ओळख करुन दिली. आम्ही एकमेकांच्या चौकशा केल्या, पुढच्या काही भेटीत चौकशीतलं जुजबीपण कायम राहिलं. खरं तर, आम्ही दोघंही एकमेकांच्या खूप निकट कधीच आलो नाही, पण जेव्हा केव्हा भेटत असू, तेव्हा दुरावा मुळीच नसे.
अशीच काही वर्षे गेली. मी पणजी, कोल्हापूर, सातारा, चिपळूण मार्गे एकदाचा नागपूरला पडाव टाकला. पत्रकारितेतही बऱ्यापैकी स्थिरावलो. तेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मी भक्तिभावानं हजेरी लावत असे. त्यापैकी सर्वात संस्मरणीय ठरलं ते १९८३ झाली झालेलं अंबाजोगाईचं साहित्य संमेलन. या संमेलनात ह. मो. मराठेंची ‘माणूस’ म्हणून ओळख झाली. कोलकात्याच्या वीणाताई आलासेंची पक्की ‘जान-पहेचान’ झाली. ज्याचा पुढे मी उल्लेख ‘स्वामी’ करत असे आणि माझ्या पत्रकारितेतल्या दीर्घ प्रवासाचा सख्खा साक्षीदार ठरलेल्या श्याम देशपांडेची ओळख झाली.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या कल्पक सजावटीचं नेतृत्व दिलिप बडे याचं होतं. आमची पुन्हा भेट झाली. आम्ही कडाडून भेटलो. त्याची प्राध्यापकी, चित्रं वगैरे आणि माझ्या पत्रकारितेबद्दलच्या गुजगोष्टी झाल्या. ज्या असोशीनं आम्ही भेटलो तितक्याच तटस्थपणे आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. मग आमच्या अधूनमधून भेटी होत राहिल्या. त्या सभा, समारंभात किंवा चक्क रस्त्यावरही. अशा भेटीत गिलेशिकवे चालत. एकमेकांच्या घरी येण्याचं वचन आम्ही एकमेकांना दिलं आणि ते कधीच पाळलं नाही; हेही आमच्या मैत्रीचं एक वैशिष्ट्य म्हणायला हवं.
दिलिप ‘जे.जे.’तच प्राध्यापक झाला. मग औरंगाबादलाही आला. कला महाविद्यालयाचा डीन वगैरे झाला. शासकीय सेवेत बढत्या आणि बदल्या होत असतात, तशा त्या त्याच्या होत गेल्या, तसंच त्या पत्रकारितेत माझ्याही बाबतीत झाल्या. ही एकमेकांची खबरबात राखत आम्ही असू.
महत्त्वाचं म्हणजे या काळात दिलीप एक चित्रकार म्हणून चांगलाच प्रस्थापित झाला. आमच्या पहिल्या भेटीपासून लक्षात आलेलं दिलीपचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो विलक्षण मनस्वी होता. डोईवरचे किंचित मागे वळवलेले केस, उत्सुकतेच्या डोहाकाठचे डोळे, थोडसं फुगीर नाक, कपाळावर आठ्यांचं जाळं आणि दाढीधारी गोलसर चेहरा आणि काहीशी स्थूल शरीरयष्टी असं दिलीपचं वैशिष्ट्यं होतं. तो हसतही माफक असे; त्यापैकी निम्म हसणं त्याच्या दाढीत विलीन होत असे. त्याच्याकडे बघितल्याबरोबर तो शासकीय अधिकारी-कर्मचारी किंवा कार्पोरेटमध्ये काम करणारा नाही हे सहज जाणवत असे, पण तो चित्रकार आहे अशी चाहूल सगळ्यांनाचा लागत असेच असं नाही. मात्र दिलीप बडे हे नाव ऐकलं की, त्याच्या ओळखीचे रंग आपोआप गडद होत जात असतं.
हे घडण्याचं कारण या मधल्या काळात ‘पोर्ट्रेट’कार म्हणून त्याचं झालेलं नाव. महात्मा जोतीबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे अशा काही पोर्ट्रेट्सनं दिलीपला नाव, वलय आणि स्थैर्यही दिलं. पोर्ट्रेट करणारे महाराष्ट्रातले जे काही समकालीन चित्रकार होते, त्यात दिलीपचं नाव आवर्जून आणि आदरानं घेतलं जाऊ लागलं. स्थैर्य येऊनही दिलीपचं मनस्वीपण काही कमी झालं नाही हे मात्र खरं. मोठी क्षमता असूनही दिलीप पोर्ट्रेटच्या वर्तुळातच अडकत गेला, यांची खंत किमान मला तरी वाटत असे.
१९७७पासून पत्रकारितेच्या निमित्तानं मराठवाड्याबाहेर मुशाफिरी केल्यावर मी ९८मध्ये ‘लोकसत्ता’चा विशेष प्रतिनिधी म्हणून माझी औरंगाबादला बदली झाली. दिलीप बहुधा लोकसत्ताचा वाचक असावा. मग एक दिवस तो गुलमंडीवरच्या आमच्या कार्यालयात आला. एव्हाना त्याचा संप्रदायही निर्माण झाला असावा. कारण आधी तो येणार असल्याची, मग आल्याची वर्दी आली आणि मग तो आला. औरंगाबादच्या माझ्या या छोट्या वास्तव्यात आमच्या बऱ्याच भेटी झाल्या, पण आम्ही काही कौटुंबिक पातळीवर एकत्र आलो नाही. असा काही विषय निघाला की, आम्हा दोघांतही एक अवघडलेपण येत असे. पुढे ते आम्ही नकळत स्वीकारुनही टाकलं. त्यामुळे अर्थातच आमच्या मैत्रीवर फार काही परिणाम झाला नाही. मात्र ही मैत्री गहरी झाली नाही, हे खरंच.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
दिलीपचा स्वभाव मनस्वी असला तरी विविध संस्था आणि चळवळींशी तो घट्ट बांधला गेलेला आहे, हे औरंगाबादच्या त्या वास्तव्यात सहज लक्षात आलं. अनेकांच्या पाठीवर त्याचा खंबीर हात असे, पण तो त्यानं कधी दृश्यमान होऊ दिला नाही, हेही लक्षात येत गेलं. अर्थात त्याचं मला फारसं आश्चर्य वाटलं नाही कारण चळवळ दिलीपच्या रक्तातच होती. अनेक वर्षांपूर्वी एक पँथर म्हणून सक्रीय असलेला तरुण दिलीप बडे मी पाहिलेला होता.
फरक इतकाच की, तरुण वयातला त्याचा तो अंदाज आता खूपच समंजस आणि प्रौढही झालेला होता. जे काही बोलायचं ते मध्यम आवाजात आणि ठामपणे, हे त्याचं तरुणपणी जाणवलेलं वैशिष्ट्यं कायम असल्याचं आमच्या औरंगाबादच्या भेटीत जाणवलं. त्याच्या कृतीलाही भर्राटपण नाही, तर एक शांतपणा असे. आमच्या याही अशा भेटीत त्याच्या स्टुडिओला भेट देण्याचे वादे ठरले, पण ते कधीच निभावले गेले नाहीत.
२४ मार्च २००३ रोजी मी पुन्हा औरंगाबाद सोडलं आणि नागपूर, दिल्ली अशी वारी करून २०१५ मध्ये पुन्हा औरंगाबादला परतलो; स्थायिकच झालो. कुठल्याशा चित्र प्रदर्शनात दिलीपची भेट झाली. मधल्या काळातल्या क्षेमकुशलचा बॅकलॉग भरुन निघाला. आठेक दिवसांनी दिलीपचा फोन आला. त्याला त्याचं एक चित्र मला भेट द्यायचं होतं. दुसऱ्या दिवशी चाणक्यपुरीतल्या आमच्या घरी तो आला, ते तीन पेंटिंगस् घेऊन. ब्रेकफास्ट करताना भरपूर गप्पा झाल्या. बेगम मंगलाची आणि त्याची ओळख करुन दिली. त्याच्या परिचित मृदु शैलीत त्यानं माझ्या बेगमशीही गप्पा मारल्या. आणलेल्यापैकी एक चित्र मी निवडावं असा दिलीपचा आग्रह होता. मी अमूर्त शैलीतलं चित्र निवडलं. त्याला जरा आश्चर्य वाटलं ते ओळखून मी दिलीपला म्हणालो, ‘पोर्ट्रेटच्या प्रवाहात वाहात जाऊन अॅबस्ट्रॅक्टची सावली तू विसरलास गड्या.’ मग सुहास बहुळकर यांचं ‘चित्रकार गोपाळ देऊसकर’ हे पुस्तक मी त्याला भेट म्हणून दिलं. शब्द आणि चित्रांचा असा मेळ म्हणजे आमची मैत्री होती. नंतरही अधूनमधून आम्ही ओझरते भेटलो आणि अचानक बातमी आली- दिलीपच्या निधनाची. कुठलंच मरण समर्थनीय नसतं.
कुणाचंही मरण समर्थनीय नसतं, मग दिलीप बडेचंही मरण कसं काय समर्थनीय असेल? पानगळीचा मोसम नसतानाही एखादं पान असं अचानक गळून पडणं समर्थनीय कसं ठरेल? पानं गळण्याच्या या वार्ता कधी थांबणार आहेत, कुणास ठाऊक!
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment