जगातल्या प्रभावी विचारवंतांची यादी खूप मोठी आहे, पण यातील सगळेच अखंडपणे दीर्घकाळापर्यंत प्रभावी राहिले असे नाही. काही विचारवंत आदर्शात्मक मांडणीमुळे अभ्यासापुरतेच व विशिष्ट सैद्धांतिक विचारचौकटीच्या संशोधनापुरतेच मर्यादित राहिले. तर काहींना मुद्दाम स्वयंघोषित संशोधक, अतिरेकी अनुयायी, हितसंबंधी गट व अभ्यासक पुरस्कृत चाकोरीत बंदिस्त करण्यात आले. त्यामुळे अशा विचारवंतांच्या विचारआयुष्याची वाढ खुंटली. आणि ते विशिष्ट वर्ग, संकल्पनापुरते मर्यादित राहिले. मोजकेच विचारवंत असे आहेत की, जे विचार व व्यवहारात टिकून आहेत. त्यापैकीच एक डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
आंबेडकरांना विशिष्ट अशा कोणत्याही विचारसरणीत बसवणे कठीण आहे. दलित चळवळीचे प्रणेते, कायदातज्ज्ञ, राज्यघटनाकार, सामाजिक व राजकीय विचारवंत, अर्थतज्ज्ञ, जलतज्ज्ञ अशा वेगवेगळ्या शब्दांत त्यांचा गौरव केला जातो आणि संबंधित विषयांमध्ये मोठ्या प्रमाणात अभ्यासही केला जातो. पण ‘स्त्रीवादी आंबेडकर’ म्हणून फक्त काही अभ्यासक वर्गापुरताच त्यांचा गौरव होतो. जरी त्यांच्या या विचारकार्याचा म्हणावा तसा गौरव झालेला नसला आणि स्त्रीवादी म्हणवणाऱ्या बहुसंख्य स्त्रियांना व कार्यकर्त्यांना याची जाणीव नसली, तरी आंबेडकरांनी उभारलेल्या चळवळींतून व त्यांच्या विचारप्रक्रियेतून स्त्री-सशक्तीकरण झाले. आंबेडकरांच्या विचार व कार्यातून झालेल्या स्त्री सशक्तीकरणाचा विचार स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर अशा दोन टप्प्यात करता येतो.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
स्वातंत्र्यपूर्व काळ
हा पारतंत्र्य, दलित आणि स्त्री अशा तिहेरी शोषणाचा काळ होता. यात दलितांना न्याय, हक्क प्राप्त करून देण्यासाठी आंबेडकरांनी उभारलेल्या चळवळीत केवळ पुरुषांनाच संघटीत केले नाही, तर स्त्रियांनाही सामिल करून घेतले. चळवळीची सूत्रे त्यांच्या हातात दिली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे १९१३मध्ये त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती घडवून आणण्यासाठी ‘अत्यंत समाज कमिटी’ स्थापन करण्यात आली. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे या सभेच्या कार्यकारिणीत किसन फागोजी बनसोडे यांची पत्नी तुळसाबाई बनसोडे ही एकमेव स्त्रीसदस्य होती. म्हणजे सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीच्या प्रारंभीच परिवर्तन केवळ षुरुषांसाठी व पुरुषांकरवी होणे महत्त्वाचे नाही, तर परिवर्तन हे स्त्री-पुरुषांसाठी व स्त्री-पुरुषांकरवी झाले पाहिजे, हे विचार आंबेडकरांनी पुढे आणले.
१९१९मध्ये आंबेडकरांनी ‘Cast in India’ नावाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय ठरलेला निबंध लिहिला. यात जातीव्यवस्था आणि स्त्रियावरील अन्याय यांची सांगड घालत असताना आंबेडकरांनी म्हटले होते, ‘स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारे बंदिस्त करण्यासाठी जातीव्यवस्थेचं अस्तित्व टिकवलं जातं. ‘अतिरिक्त’ स्त्रियांच्या समस्या हाताळण्यासाठी सती, केशवपन, बालविवाह आणि विधवाविवाहस बंदी, या प्रथा निर्माण करण्यात आल्या. तसेच जातही विवाहसंस्थेबाबत स्त्रियांवर बंधन लादते, तर पुरुषांना मोकळीक देते.’
१९२०मध्ये ‘भारतीय बहिष्कृत’ माणगाव परिषद डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. या परिषदेत आंबेडकरांनी देवत्वाच्या नावाखाली फाजील देवपण देऊन स्त्रियांचे शोषण करणाऱ्या ‘मुरळी व देवदासी’ प्रथेविरुद्ध जागृती केली व ही प्रथा संपुष्टात यावी, असे मत मांडले. याचा परिणाम असा झाला की, बेळगाव जिल्ह्यात एस. एम. माने, देउ इंगळे, बी. एच. वराळे, मारुती रावण इ. अनुयायांनी मुरळी व देवदासी प्रथेविरूद्ध चळचळ उभी केली. या परिषदेत आंबेडकरांच्या स्फूर्तीने प्रेरित झालेल्या तुळसाबाई बनसोडे व सावित्रीबाई यांनी भाषणं केली होती.
मुंबई विधिमंडळाने १९२३ मध्ये अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठे, शाळा, बाजार, मंदिरे खुले असावे, असा ठराव पास केला. याची अंमलबजावणी म्हणून आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह २० मार्च १९२७ रोजी केला. यात असंख्य स्त्रियांनी सहभाग घेतला. या सत्याग्रहास संबोधित करत असताना आंबेडकरांनी म्हटले होते, ‘स्त्रियांनी मुलांना शिक्षण द्यावे, ज्ञान व विद्या केवळ पुरुषांची मक्तेदारी नाही. स्त्रियांनी निटनिटके कपडे परिधान करावे व स्वच्छ राहावे. व तसेच गुलामगिरीचे प्रतिक असलेल्या दागिन्यांना फेकून द्यावे.’ आजच्या काळातील स्त्रिवादी चळवळीतील स्वअवकाश जपणे, पुरुषार्थ व सामाजिक निर्बंधाविरुद्धच्या विचारसरणीतील अंश ९० वर्षांपूर्वीच्या या भाषणात दिसून येतात.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
याच महाड परिषदेत ‘मनुस्मृती दहना’चा ऐतिहासिक ठराव पास करण्यात आला. स्त्रियांना दुय्यम लेखणाऱ्या व पुरुषार्थाच्या आड केलेल्या बलात्कारासारख्या भयंकर हिंसक कृत्यास व पुरुष पतनास स्त्रीला जबाबदार ठरवणाऱ्या, तसेच षुरुषांस पत्नीत्याग योग्य वर्ज्य समजून स्त्री-विक्रीचा पुरस्कार करणाऱ्या ‘मनुस्मृती’च्या दहनाच्या या ठरावास गंगुबाई सावंत या भगिनीने अनुमोदन दिले होते. ही ऊर्जा आंबेडकरांच्या वैचारिक पाठबळीचे घोतक होते. यानुसार २५ डिसेंबर १९२५ रोजी ‘मनुस्मृती’चे दहन करून आंबेडकरांनी स्त्रियांना सामाजिक गुलामगिरीतून मुक्त केले. त्यामुळे २५ डिसेंबर हा दिवस ‘स्त्री मुक्ती दिन’ म्हणून महाडमध्ये साजरा केला जातो. देशपातळीवर साजरा व्हावा, अशी मागणी अनेक पातळीवर केली जाते, पण याला म्हणावा तेवढा पाठिंबा मिळत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली स्त्री सक्षमीकरणाचे या ठिकाणी दोन प्रकट उदाहरणे देता येतील. ७ एप्रिल १९३० साली एका अस्पृश्य स्त्रीला ब्राह्मणवादी पुजाऱ्याने मंदिरात जाण्यापासून रोखले व मंदिराबाहेर लोटले. या कृतीचा उत्तर म्हणून त्या स्त्रीने पुजाऱ्याच्या श्रीमुखात ठेवून दिली. ही चपराक केवळ पुजाऱ्याला नव्हती, तर ब्राह्मणवृत्तीच्या संकुचित समाजालाही होती.
दुसरे उदाहरण म्हणजे १९३१मध्ये राधाबाई वडाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन, ‘देऊळामध्ये प्रवेश, पाणवठ्यावर पाणी भरण्याचा हक्क, राजकीय हक्क प्राप्त करून व्हाइसरॉयच्या शेजारच्या खुर्ची बसता आलं पाहिजे यासाठी आंदोलन करू’ असे सांगितले. हे विचार म्हणजे केवळ सामाजिक हक्क वा न्याय प्राप्त करण्यासाठीचे नव्हे, तर राजकीय हक्क प्राप्त करून सत्ता सहभागाच्या महत्त्वाकांक्षेचे आहेत. आंबेडकरांकडून मिळालेली ही प्रेरणा खूप मोठी आहे.
आंबेडकरांच्या विचारातील स्त्री-मुक्तीसाठी महत्त्वाचा ठरलेला विचार म्हणजे ‘maternity Bill’ होय. १९४२ साली आंबेडकर बॉम्बे एक्झिक्युटिव्ह कौंसिलमध्ये लेबर मिनिस्टर असताना स्त्री-संमतीशिवाय जबरदस्तीने केले जाणारे गर्भपात बेकायदेशीर ठरवले होते. तसेच गर्भावस्थेदरम्यान आणि बाळाच्या जन्मानंतर विश्रांतीची नितांत आवश्यकता असते, असे सांगत स्त्रियांना प्रसुतीकाळात सवलती देण्याचा विचार त्यांनी मांडला होता. यावरच ‘Maternity Bill’ आधारलेले आहे.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
याला अनुसरून आणखी एक अभूतपूर्व गोष्ट अशी की, २००८ साली ‘लॅन्सेट’ या ब्रिटिश मेडिकल जर्नलने गर्भावस्था व बालकांच्या मेंदूवाढीविषयीचा एक संशोधनपर अहवाल ‘पहिले हजार दिवस’ या मथळ्याखाली प्रकाशित केला. नेमका हाच विचार आंबेडकरांनी १९२०मध्ये संतती नियमन, गर्भावस्था व प्रसुतीनंतरचे स्वास्थ, या विषयावर बोलताना सांगितला होता.
आंबेडकरांच्या प्रभावशाली विचाराचा प्रभाव असा की, जुलै १९४२मध्ये ‘All India depressed class women conference’ आयोजित केली होती. ज्यात २५ हजार स्त्रियांचा सहभाग होता. या परिषदेच्या अध्यक्षा सुलोचणाबाई डोंगरे या होत्या. या परिषदेत ‘संतती नियमन, बालक व मातेचे स्वास्थ्य’ करण्यात आली. पुढे यातून १९४४ कानपूर व १९४५ साली मुंबई या ठिकाणी स्वतंत्र सभा घेण्यात आल्या. आंबेडकरांच्या अशा अनेक विचारांचे अस्तित्व आजतागायत टिकून आहे.
स्वातंत्र्योत्तर काळातील जीर्णमतवाद्यांसोबत लढा
स्वातंत्र्यानंतर आंबेडकरांनी दोन अमूल्य असे ठेवे भारतीयांना दिले. एक म्हणजे ‘भारतीय राज्यघटना’ आणि दुसरी म्हणजे ‘हिंदू कोड बिल’. राज्यघटनेने पुरुषांबरोबरच स्त्रियांनाही सर्व राजकीय हक्क बहाल केले. जगातल्या मुख्य प्रवाहात आणले, तर ‘हिंदू कोड बिल’ हे स्त्रियांच्या सर्वकष स्वातंत्र्याचा जाहीरनामा, समानतेवर आधारित सर्वंकष असे परिवर्तन होते.
‘हिंदू कोड बिल’ म्हणजे पुरुषसत्ताक, जातिव्यवस्था व धर्मसत्तानी मिळून बनवलेल्या साखळदंडातून सर्व जातीतील स्त्रियांची मुक्ती. जातीच्या वेगळेपणाची तथाकथित ओळख असणारी जातीविशिष्ट, कर्मकांड, रूढी-परंपरा स्त्रियांवर लादून जातीव्यवस्था घट्ट केली जाते.हे लक्षात घेऊन त्यांनी विवाह, घटस्फोट, वारसा, मालमत्ता, दत्तकविधान, आंतरजातीय विवाह या संदर्भातील जातीनिहाय कायद्यांना या बिलात नकार दिला होता. हे बिल परंपरावादी व जीर्णमतवाद्यांविरोधात पुकारलेले युद्धच होते.
मात्र या बिलाला सनातनी वर्ग, अनुत्सुक राजकीय पुढारी व सवर्ण हिंदूंतील वर्णश्रेष्ठत्वाने पछाडलेल्या लोकांचा विरोध होता. २४ फेब्रुवारी १९४९ रोजी संसदेत हे बिल मांडण्यात आले. त्यावर संसदेत बराच गदारोळ झाला. अनेक काँग्रेस खासदारांचा, हिंदू महासभेचा तसेच डॉ.राजेंद्रप्रसादांनी ही विरोध दर्शवला.
‘हे हिंदू संस्कृतीविरोधी बिल असून हिंदू परंपरेनुसार स्त्रियांना काडीमोड देण्याचा हक्क नाही’, असे राजेंद्रप्रसादांचे मत होते. तसेच संसदेबाहेरही संत करपत्रिजी महाराजांच्या नेतृत्वाखाली अनेक धार्मिक गट एकत्र आले होते. त्यांनी हजारो संतासोबत आणि श्रद्धाळूंसोबत संसदेवर मोर्चा नेला. मंत्रीमंडळानेही बिलास विरोध दर्शवला. पं.नेहरूही राजकीय दबावाखाली झुकले गेले. शेवटी हे बिल नामंजूर झाले. दोन वर्षं मेहनतीने बनवलेल्या बिलाची अशी दुर्दशा झाली आणि त्याबद्दल कोणालाही फारसे वाईट वाटले नाही, हे पाहून आंबेडकरांनी १० ऑगस्ट १९५१ रोजी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
‘सामाजिक न्यायासाठी हे बिल गरजेचे आहे. इतर बिलाच्या तुलनेने या बिलाचे महत्त्व अधिक आहे. जर स्त्रियांच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून आर्थिक सुधारणांचे बिल मंजूर होत असतील तर ‘शेणाच्या ढिगावर महाल उभा करण्याच्या प्रयत्नासारखं ते आहे’, राजीनाम्याच्या भाषणातील या उद्गारात आंबेडकरांची भारतीय स्त्रियांप्रतीची तळमळ दिसून येते. ज्या काळी राजकारणी सीता व सावित्री आदर्श नारी म्हणून गुणगान करत होते, तेव्हा आंबेडकरांनी स्त्रियांच्या शिक्षण हक्क, संतती नियमनाचा हक्क व विवाह विच्छेदनाच्या हक्कासाठी सत्ता सोडली. आंबेडकरांनी सत्तेसाठी तत्त्व सोडले नाही, पण तत्त्वासाठी सत्तात्याग केला.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
‘हिंदू कोड बिल’ नामंजूर करण्यात आले असले तरी टप्याटप्याने का होईना त्यास स्वीकारावेच लागले. Hindu marriage Act 1955, Hindu Succession Act 1956, Hindu Adoption and Maintenance Act 1956, Hindu Minority and Guardian ash Act 1956 हे सर्व कायदे ‘हिंदू कोड बिला’चीच अपत्ये आहेत.
सत्तेतून बाहेर पडल्यानंतरही आंबेडकरांनी स्त्री-मुक्तीची चळवळ थांबवली नाही. येवला येथील नमांतर घोषणेप्रमाणे स्त्रियांनीही अनेक सभा, बैठकांतून आंबेडकरांना पाठिंबा दर्शवला. शेवटी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या असंख्य अनुयायासह आंबेडकरांनी धर्मांतर केले. यात २ लाख स्त्रिया होत्या, हे विशेष. धर्मत्याग करून आंबेडकरांनी स्त्री-मुक्तीची सर्वांत मोठी, एक ऐतिहासिक क्रांती घडवली.
आंबेडकरांचे १९४२ च्या भाषणातील “स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजीत असतो”, हे उद्गार त्यांच्या स्त्री सशक्तीकरणाच्या विचारांचे सार आहे. तसेच कठीण परिस्थिवर मात करून ‘भीमरायामुळेच मला दोन वेळेचं जेवन भेटतंय’ अशी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या कडूबाई खरातांकडे स्त्री-सशक्तीकरणाचे एक आदर्श उदाहरण म्हणून पाहता येते. त्याच्या गीतातील पुढील ओळी आंबेडकरांबद्दल बरेच काही सांगून जातात-
‘माझ्या भीमानं माय सोन्यानं भरली ओटी’.
.................................................................................................................................................................
लेखक प्रा.श्रीकृष्णा बाबूराव पांचाळ ‘राजर्षी शाहू महाविद्यालया’(लातूर)मधील राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक आहेत.
pkrashna1994@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sachin Shinde
Fri , 11 March 2022
खूपच अप्रतिम आणि वैचारिक मांडणी करून बाबासाहेबांचे कर्तृत्व सांगणारा लेख
Pratibha D
Thu , 10 March 2022