युक्रेनची लोकशाही आणि जगातली नव-शांतता या दोन्ही गोष्टी नाजूक आहेत. त्यामुळे त्या कधीही मोडून पडू शकतात, किंवा टिकूही शकतात...
पडघम - विदेशनामा
युव्हाल नोआ हरारी
  • युक्रेन-रशिया युद्धाचं एक छायाचित्र आणि शांततेचं एक प्रतीक
  • Wed , 09 March 2022
  • पडघम विदेशनामा रशिया Russia सोव्हिएत रशिया Soviet Union युक्रेन Ukraine नाटो NATO अमेरिका America पुतीन Putin

युक्रेन युद्धसंघर्षाच्या मुळाशी इतिहासाच्या स्थायीभावासंबंधात आणि मानवजातीच्या स्वभावासंबंधात एक मूलभूत प्रश्न दडलेला आहे. तो म्हणजे-बदल शक्य आहे का? स्पष्ट बोलायचे तर, माणसे ज्या पद्धतीने वागताहेत, त्यांची ती वागणूक बदलणे शक्य आहे का, किंवा स्वतःमध्ये काहीही बदल न घडवून आणता, नव्या नेपथ्यासह माणूस हा गतकाळातल्या शोकांतिका पुनःपुन्हा घडवून आणत राहिल्याने अनंत काळापर्यंत इतिहासाची पुनरावृत्ती होतच राहणार आहे का?

दोन विचारप्रवाह

विचारवंतांचा एक वर्ग माणसात बदल घडेल, हे ठामपणे नाकारतो. हा वर्ग असा युक्तिवाद करतो की, हे जग एका जंगलासारखे आहे. जिथे सशक्त हे अशक्तांचा सर्रास बळी घेतात. अशा वेळी, सशक्तांच्या अत्याचाराला बळी पडण्यावाचून देशाला केवळ लष्करी ताकदच वाचवू शकते. यापूर्वीसुद्धा हे असेच घडत आले आहे नि यापुढेही हे असेच घडत राहणार आहे. ज्यांचा या जंगलच्या कायद्यावर विश्वास नाही, ते केवळ स्वतःलाच भ्रमात ठेवत नाहीयेत, तर समग्र अस्तित्वच नाहक पणाला लावत आहेत. अशाने ते फार काळ तगून राहण्याची शक्यता दुरापास्त आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

विचारवंतांचा दुसरा वर्ग असे मानतो की, तथाकथित जंगलचा कायदा हा मुळी नैसर्गिक कायदा नाहीच आहे. मानवाने स्वतः तो रुजवलेला आहे आणि मानवच तो कायदा बदलू शकतो. ती क्षमता त्याच्यामध्ये नक्कीच आहे. माणूस नेहमीच जंगलच्या कायद्यानुरूप वागत आला आहे, या जनसमजुतीच्या अगदी उलट कामगिरी मानवी इतिहासात नोंदली गेलेली आहे. पुरातत्वशास्त्राच्या नोंदीनुसार ज्याला संघटित युद्ध म्हणता येईल, ते १३ हजार वर्षांपूर्वी लढले गेले आहे. अगदी त्या आधीच्या काळातसुद्धा पुरातत्वशास्त्रज्ञांना संघटित युद्धाचे पुरावे मिळालेले नाहीत. तसेही गुरुत्वाकर्षणाप्रमाणे युद्धसंघर्ष हे मानवी अस्तित्वाला बळकटी देणारे नैसर्गिक तत्त्व नाही. युद्धाची तीव्रता आणि युद्धाचे घडून येत राहणे हे तंत्रज्ञानात्मक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर अवलंबून आहे. जसजसे या घटकांत बदल घडून येतात, तसे युद्धसंघर्षाचे स्वरूप  बदलत  राहते.

अणवस्त्रसज्जतेचा असाही परिणाम

या बदलाचे पुरावे आपल्या आसपास दिसत, जाणवत आले आहेत. गेल्या काही पिढ्यांपासून अणवस्त्र सज्जतेमुळे महासत्तांमधली युद्धे सामूहिक आत्महत्येच्या निर्बुद्ध कृतीसम ठरली आहेत. याचा उलटा परिणाम असा झाला आहे की, जगभरातल्या ताकदवान देशांना संघर्षाला विराम देण्यासाठी कमीत कमी हिंसक मार्गांचा अवलंब करण्यास भाग पडत आले आहे. एकीकडे दुसरे महायुद्ध आजवरच्या मानवी इतिहासातले सर्वांत भीषण, सर्वांत लक्षवेधी असे उदाहरण ठरले आहे. मात्र, त्यानंतरच्या सात दशकांमध्ये जगातल्या ताकदवान राष्ट्रांमध्ये थेट आमने-सामने असे युद्ध झालेले नाही.

याच सात दशकांच्या काळात, जागतिक अर्थव्यवस्थेचे उत्पादनांच्या पारंपरिक साधनांऐवजी ज्ञानाआधारित परिवर्तन घडून आले आहे. त्यापूर्वी सोन्याच्या खाणी, गव्हाची शेते किंवा तेलविहिरी आदी घटक संपत्तीसंचयाचा मुख्य स्त्रोत होते. आज संपत्तीच्या मुख्य स्त्रोताची जागा माहिती-ज्ञानाने घेतली आहे. त्यामुळे जसे बाहुबळाचा वापर करून तेलविहिरी बळकावता येत होत्या, तसे आड कोणी कोणाच्या ज्ञानावर ताबा मिळवू शकत नाही. याचा परिणाम असा झालेला आहे की, चढाई करण्यातला एरवी होणारा फायदा इथे जवळपास मिळेनासा झालेला आहे.

अंतिमतः जगाच्या संस्कृतीत आमूलाग्र परिवर्तन घडून आले आहेत. मात्र, इतिहासातले हुण, शक आणि रोमन काळातले अनेक अभिजन युद्धसंघर्षास अनुकूल होते, नव्हे अनेक प्रसंगात युद्धसंघर्षाकडे फायद्याचा सौदा म्हणून पाहत होते. अगदी ‘सरगॉन दी ग्रेट’पासून (सुमेरियन साम्राज्याचा अधिपती) बेनिटो मुसोलिनीपर्यंतच्या महत्त्वाकांक्षी राज्यकर्त्यांनी इतर देशांवर चढाई करूनच स्वतःला एक प्रकारे अजरामरत्व (होमर आणि शेक्सपिअरसारख्या साहित्यकारांनी त्यांच्या कर्तृत्वाला कोंदणही मिळवून दिले आहे!) प्राप्त करून घेतले आहे. जनमानसावर चर्चसंस्थेचाही मोठा प्रभाव राहिलेला आहे. या चर्चेने युद्धसंघर्षाला कूकर्म तर मानले आहे. परंतु ते अपरिहार्यदेखील आहे, असाही दृष्टीकोन बाळगलेला आहे.

शांततावाद्यांचा वाढता प्रभाव

मात्र, गेल्या काही दशकांपासून बहुदा इतिहासात पहिल्यांदाच युद्धाला अनैतिक आणि टाळता येण्याजोगी कृती मानणाऱ्या बुद्धिवादी अभिजनांचा या जगात प्रभाव वाढलेला आहे. अगदी जॉर्ज डब्ल्यू बुश आणि डोनाल्ड ट्रम्प किंवा अगदी मर्केल किंवा अर्दोगॉन हे गतकाळातल्या अ‍ॅटिला (मध्य आणि पूर्व युरोपातला राजा), हुण, गॉथ (जर्मन टोळीवाले) या राजकारणी आणि राज्यकर्त्यांच्या तुलनेत नक्कीच वेगळे ठरले आहेत. कारण, इतर देशांवर चढाई करून ते जिंकून घेण्यापेक्षा आधुनिक काळातल्या नेत्यांचा भर स्वदेशातल्या सुधारणांवर अधिक राहिलेला आहे. एकीकडे कला आणि वैचारिक क्षेत्रात पाब्लो पिकासोपासून स्टॅनली क्युब्रिकपर्यंतच्या कलावंतांनी गतकाळातल्या युद्धसंघर्षांचे उदात्तीकरण करण्याऐवजी, त्यातली भयावहता आपल्या कलेतून पुढे आणण्यास प्राधान्य दिल्याचे दिसले आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

या होत गेलेल्या बदलामुळे जगातल्या बहुसंख्य शासनसत्तांनी आपले हितसंबंध जोपासण्यासाठी युद्धसंघर्षाचा मार्ग अवलंबण्याचे टप्प्याटप्प्याने थांबवले आहे. तर अनेक ताकदवान देशांनी शेजारी देशांवर कब्जा मिळवून तो भूभाग आपल्या देशाला जोडण्याचे विखारी स्वप्न प्रत्यक्षात उतरवणेही सोडले आहे. त्यामुळे केवळ लष्करी ताकदीमुळे उरुग्वेने ब्राझिलला देशावर चढाई करण्यावाचून रोखले किंवा मोरक्को हा देश लष्करी ताकदीमुळे स्पेनला चढाई करण्यापासून रोखू शकला, यात तितकेसे सत्य नाही.  

युद्धसंघर्षातली घट

युद्धसंघर्षात कालानुक्रमे होत गेलेली घट आजवरच्या वेगवेगळ्या आकडेवारी आणि अहवालातून पुरेशी स्पष्ट आहे. १९४५पासून परकीय आक्रमकांनी इतर देशांवर चढाई करून सीमारेषा बदलल्याच्या घटना जवळपास नगण्य आहेत किंवा जगातला एकही मान्यता असलेला देश परकीय आक्रमणामुळे जगाच्या नकाशावरून नष्टही झालेला नाही. परंतु, याचा अर्थ इतर प्रकारांतले संघर्ष थांबलेले आहेत, असे नाही. कारण, याच काळात अनेक देशांत फुटीरवादी चळवळी फोफावल्या आहेत. नागरी युद्धाने पेट घेतलेला आहे. तरीही सगळ्या प्रकारातले संघर्ष जमेस धरले तरीही, एक गोष्ट ठामपणे मांडता येते ती म्हणजे, एकविसाव्या शतकातल्या पहिल्या दोन दशकांत आत्महत्या, रस्ता अपघात आणि शारीरिक स्थूलपणातून उद्भवणाऱ्या आजारामुळे बळी पडलेल्यांची संख्या हिंसाचारातून झालेल्या मनुष्यहानीपेक्षा खूप मोठी राहिली आहे. म्हणजेच बदुंकीची भुकटी साखरेपेक्षा कमी धोकादायक राहिली आहे.

शांततेची बदलती व्याख्या

युद्धसंघर्षात होत गेलेली घट ही मानसिक आणि संख्याशास्त्रीय अशा दोन्ही पातळ्यांवरील दखलपात्र प्रक्रिया राहिली आहे. या दरम्यान शांतता म्हणजे काय या व्याख्येचा बदललेला अर्थ हा या प्रक्रियेतला लक्षवेधी पैलू म्हणून पुढे आला आहे. तत्पूर्वीच्या इतिहासात शांततेचा अर्थ, ‘युद्धसंघर्षाला तात्पुरता विराम’ हाच होता. १९१३ मध्ये जेव्हा लोक असे म्हणायचे की, फ्रान्स आणि जर्मनीमध्ये शांतता प्रस्थापित झाली आहे. तेव्हा त्याचा अर्थ जर्मन आणि फ्रान्सचे सैनिक थेटपणे युद्ध करत नाहीत, असा होता. त्यांना हेही ठाऊक होते की, हा विरामकाळ कधीही संपेल आणि दोन्ही देश पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकतील आणि युद्धाचा उद्रेक होईल.

मात्र, अलीकडच्या काही दशकांत ‘शांतता’ या शब्दाचा अर्थ ‘युद्धसंघर्षाची अशक्यता’ असा रूढ झाला. अनेक देशांसाठी शेजारी देशाने आक्रमण करून ताबा मिळवणे, ही बाब जवळपास अशक्यप्राय बनली. अर्थात मी स्वतः मध्यपूर्वेतल्या देशामध्ये राहतो, त्यामुळे या प्रवाहाला अपवाद ठरलेल्या घटनांचीही मला पूर्ण जाण आहे. परंतु, अपवादानेच तर नियम सिद्ध होत आलेला आहे, ही गोष्टसुद्धा या ठिकाणी विसरता येत नाही.

लष्करी सामग्रीवरचा घटता खर्च

याचा एक अर्थ, नव-शांतता हा काही संख्याशास्त्रीय चमत्कार नाही किंवा हिप्पी मंडळींनी पाहिलेले दिवास्वप्नही नाही. कारण, नव-शांततेच्या प्रत्यक्षातल्या प्रभावाचे प्रतिबिंब देशोदेशीच्या अर्थसंकल्पामध्ये पडलेले आपल्याला पाहायला मिळाले आहे. गेल्या अनेक दशकांमध्ये जगातल्या बहुसंख्य देशांत सुरक्षिततेची भावना बळावल्याने लष्करी सामग्रीसाठी राष्ट्रीय सकल उत्पन्नातील जेमतेम ६.५ टक्के रकमेचीच तरतूद करण्यात येऊन अर्थसंकल्पात आरोग्य, शिक्षण आणि कल्याणकारी योजनांवर अधिक खर्च करण्यात  आलेला आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

जे घडतेय ते स्वागतार्ह आहे. परंतु माणसाचा स्वभाव युद्धसंघर्षात घडलेला बदल गृहित धरून वागण्याचा आहे. तेही खरेच आहे, कारण आजवरच्या इतिहासातही ही सर्वार्थाने नवलाई ठरली आहे. त्यापूर्वी हजारो वर्षे देशोदेशीच्या राज्यसत्तांनी आणि त्यावर ताबा असलेल्या राजपुत्राने, सुलतानाने आणि राजामहाराजांनी आपल्या संपत्तीतल्या सर्वाधिक वाटा लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी खर्च केलेला आहे. त्यांनी प्रजेचे आरोग्य आणि शिक्षणावर अभावानेच खर्च केलेला आहे.

पर्यायांची योग्य निवड

युद्धसंघर्षाचे निवळत जाणे हा काही दैवी चमत्कार नव्हता की, निसर्ग नियमांतल्या बदलातून ते घडले नव्हते. हे सारे माणसाने योग्य वेळी यथायोग्य पर्यायांची निवड केल्याने घडले होते. किंबहुना, युद्धसंघर्षाचे टप्प्याटप्प्याने निवळत जाणे, ही माझ्या नजरेत आधुनिक नागरी संस्कृतींची सर्वांत मोठी आणि सर्वोच्च पातळीवरची नैतिक कामगिरी आहे. दुर्दैवाने, ही कामगिरी माणसाने केलेल्या योग्य पर्याय निवडीतून मुख्यत्वे साकारली गेली असल्याने त्यात उलटफेराचीही शक्यता मोठी राहिली आहे.

एकीकडे तंत्रज्ञान, संस्कृती आणि अर्थव्यवस्था या सातत्याने बदलत आहेत. त्यांच्यात स्थित्यंतर घडून येत आहे. अलीकडच्या काळात सायबर शस्त्रांचा झालेला उदय, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) बळावर आकार येत गेलेल्या अर्थव्यवस्था आणि नव्याने निर्माण होत गेलेली लष्करी संस्कृती यातून आपण यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या नव्या युगातल्या महाभयावह युद्धाला धग मिळण्याची शक्यताही बळावली आहे. म्हणूनच शांततेचा सर्वार्थाने आनंद घ्यायचा असेल, तर आपल्यातल्या जवळपास प्रत्येकाने अत्यंत सजगपणे पर्यायांची निवड करणे अत्यावश्यक बनले आहे. याच्या अगदी उलट, समजा कोणा एका बाजूने चुकीचा पर्याय निवडला गेला, तर त्याची परिणती थेट युद्धसंघर्षात होणार आहे.

बदलते जागतिक मानस

किंबहुना, याचमुळे रशियाने ज्या बेमुर्वतपणे युक्रेनच्या भूमीवर आक्रमण केले आहे, ते पाहता, जगातल्या प्रत्येकाला काळजी वाटणे गरजेचे आहे. यापुढे जर सशक्त राष्ट्रांनी आपल्या शेजारी कमकुवत राष्ट्रांमध्ये घुसखोरी करून भूभाग ताब्यात घेणे, ही सर्वसामान्य बाब बनली, तर याचा थेट परिणाम जगभरातल्या लोकांच्या आचार-विचारांवर होणार आहे. त्यांच्या जाणीवा आणि वर्तणुकीवर होणार आहे. यात जंगलचा कायदा परतून आल्याचा सगळ्यात पहिला आणि मोठा परिणाम जगातल्या सर्व देशांनी इतर सर्व गरजा दुय्यम ठरवून सर्वाधिक खर्च लष्करी साधनांवर करण्यात होणार आहे. जे पैसे शिक्षक, परिचारिका आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर खर्च व्हायला हवे, ते पैसे रणगाडे, क्षेपणास्त्रे आणि सायबर शस्त्रास्त्रे खरेदी करण्यावर खर्च होणार आहे. जंगलचा कायदा परतून आल्याचा आणखी एक दुष्परिणाम देशोदेशीच्या सहकार्य आणि सौहार्दावर होणार आहे. पर्यावरण रक्षण, घातक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गुणसूत्र अभियांत्रिकी या मानवी ऱ्हासास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना रोखण्यावर होणार आहे. अशा परिस्थितीत जो देश तुम्हाला नेस्तनाबूत करण्यासाठी सज्ज आहे, त्याच्याशी सहकार्य करणे सोपे नसणार आहे. यात जसजशी पर्यावरण बदलापायी आणि कृत्रिम बुद्धिमत्ताधारित शस्त्रास्त्र निर्मितीपायी देशादेशांमध्ये स्पर्धा वाढणार आहे, तसतसा थेट युद्धसंघर्षाचा धोका वाढणार आहे. त्यातून विनाशाचे एक वर्तुळ पूर्ण होऊन मानवजातीच्या अंतास ते कारणीभूत ठरणार आहे.

इथे, तुम्हाला असे वाटत असेल की, ऐतिहासिक बदल अशक्यप्राय आहेत, मानव जात जंगलातून बाहेर येणे कदापि शक्य नाहीये, आता एकच पर्याय शिल्लक आहे, तो म्हणजे एकतर भक्षक व्हायचे वा भक्ष्य ठरायचे. मग हाच जर पर्याय असेल तर जगातले बहुसंख्य नेते इतिहासात आपली नोंद आक्रमक भक्षक व्हावी, यासाठीच सर्व शक्ती पणाला लावतील. आपले नाव आक्रमकांच्या यादीत समाविष्ट करतील. आणि मग दुर्दैवाने देशोदेशीच्या विद्यार्थ्यांना इतिहासाच्या विषयात गुण मिळवण्यासाठी त्यांचे स्मरण ठेवणे भाग पडेल.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

.................................................................................................................................................................

पण या सगळ्या अनिश्चिततेत बदल कदाचित शक्य असेल? कदाचित जंगलचा कायदा ही अपरिहार्यता नव्हे, तर एक पर्याय असेल? मग असे असेल, तर जो कोणी नेता शेजारी देशावर आक्रमण करण्यासाठी पुढे सरसावेल, त्याला मानवी स्मृतींमध्ये खास स्थान मिळेल नि हे स्थान राक्षसी महत्त्वाकांक्षा असलेल्या तैमूरलंगपेक्षाही तळाचे असेल. एक असा नेता, असा माणूस ज्याने मानवाच्या आजवरच्या सर्वात मोठ्या कामगिरीची माती केली, अशी त्याची नोंद होईल. आपण जंगलातून बाहेर पडतोय, असे वाटत असतानाच हा नेता आपल्याला पुन्हा एकदा हिंसक जंगलात खेचून घेईल.

परिवर्तन हेच सातत्य

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये यापुढे काय घडणार, हे या क्षणी मला सांगता येणार नाही. परंतु एक इतिहासकार म्हणून माझा परिवर्तनावर विश्वास आहे. मला नाही वाटत हा भाबडेपणा आहे, हा तर वास्तववादी विचार आहे. आजवरच्या मानवी इतिहासात एकच गोष्ट सातत्यपूर्ण राहिली आहे, ती म्हणजे-परिवर्तन. ते कसे घडवून आणायचे, हे आपण खरे तर सध्या युद्धाची झळ अनुभवत असलेल्या युक्रेनियन नागरिकांकडून शिकायला पाहिजे. कारण, युक्रेनियनांच्या कितीतरी पिढ्यांनी केवळ आणि केवळ हिंसाचार आणि अनन्वित अत्याचार अनुभवला आहे. त्यांनी जवळपास दोन शतके झारच्या हुकूमशाहीचा (पहिल्या महायुद्धानंतर ही झारशाही कोसळली) सामना केलेला आहे. त्यानंतर अगदी थोडाच काळ युक्रेनच्या वाट्याला स्वातंत्र्याचे वारे आले. ते गावा-शहरांत खेळते न खेळते तोच कम्युनिस्ट लाल सेनेने युक्रेनवर रशियन सत्ता प्रस्थापित केली. त्या काळात युक्रेनियनांना होलोडोमरने निर्माण केलेल्या भूकबळीचा सामना करावा लागला. स्टालिनने लादलेली दहशत सहन करावी लागली. नाझींच्या आक्रमणाला तोंड द्यावे लागले आणि नंतरचा बराच मोठा काळ कम्युनिस्ट हुकुमशाहीच्या टाचेखाली काढावा लागला. जेव्हा सोविएत युनियनचे विघटन झाले, तेव्हा तर जणू इतिहासानेच शाश्वती द्यावी, अशा पद्धतीने पुन्हा एकदा युक्रेनवर अत्याचार लादले गेले. थोडक्यात, युक्रेनने गेल्या कितीएक पिढ्या अत्याचारापेक्षा दुसरे काय अनुभवले?

तरीही अन्याय अत्याचाराने पिचलेल्या युक्रेनियनांनी अगदी वेगळ्या पर्यायाची जाणीवपूर्वक निवड केली. भीषण गरिबी आणि चहूबाजूंनी कोंडी करणारे अनंत अडथळे समोर दिसत असूनसुद्धा युक्रेनने लोकशाहीची निवड केली. प्रयत्नपूर्वक तिची प्रस्थापना केली. त्यामुळे रशिया किंवा बेलारुसच्या अगदी उलटवयुक्रेनमध्ये लोकशाही प्रक्रियेत आजचे विरोधक उद्याचे सत्ताधारी झाले. त्यातही २००४ आणि २०१३मध्ये अधिकारशाहीचा धोका दाटून आला, दोन्ही वेळी युक्रेनियन लोकशाहीच्या रक्षणासाठी बंड करून उठले. त्यांच्यासाठी लोकशाही ही एक ताजी, नवी गोष्ट आहे. अगदी जशी नव-शांतता ही जगासाठी नवी गोष्ट आहे. युक्रेनची लोकशाही आणि जगातली नव-शांतता या दोन्ही गोष्टी नाजूक आहेत. त्यामुळे एका बाजूला त्या कधीही मोडून पडू शकतात. भंग पावू शकतात. तर दुसऱ्या बाजूला त्या टिकूही शकतात आणि खोलवर मुळेही धरू शकतात. प्रत्येक जुनी गोष्ट कधीतरी नवी असतेच. शेवटी, हे सारे माणसाच्या पर्याय निवडीपाशी येऊन विसावते.

‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १ मार्च २०२२च्या अंकातून साभार

.................................................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी लेख ‘इकॉनॉमिस्ट’ या जगप्रसिद्ध इंग्रजी साप्ताहिकाच्या पोर्टलवर ९ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

https://www.economist.com/by-invitation/2022/02/09/yuval-noah-harari-argues-that-whats-at-stake-in-ukraine-is-the-direction-of-human-history

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......