‘सर्वंकष’ : वितंड नव्हे, विमर्श! किंबहुना, अशा वैचारिक विमर्शाची आवश्यकता कोणत्याही काळापेक्षा आज सर्वाधिक आहे!
पडघम - सांस्कृतिक
रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
  • ‘सर्वंकष’ या त्रैमासिकाच्या आतापर्यंत प्रकाशित झालेल्या तीन अंकांची मुखपृष्ठे
  • Wed , 09 March 2022
  • पडघम सांस्कृतिक सर्वंकष Sarvankash

‘सर्वंकष’ हे नवे मराठी त्रैमासिक आम्ही सुरू केले त्याला आता नऊ महिने होतील. त्याचा तिसरा अंक नुकताच वाचकांच्या हातात पडला. या पुढचा, म्हणजे पहिल्या वर्षाचा अखेरचा अंक ‘साहित्य संमेलन’ विशेषांक असेल. तो उदगीर साहित्यसंमेलनाच्या आधी, एप्रिलच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात उपलब्ध होईल. देशभरात फॅसिझमच्या सावल्या गडद होत असताना व करोनामुळे आर्थिक जगाचे प्राण कंठाशी आले असताना आम्ही एक स्पष्ट वैचारिक भूमिका घेऊन नवे नियतकालिक काढण्याचे धाडस केले व आता ते चांगले आकाराला येत आहे. त्यामागील आमची भूमिका, आजपर्यंतची वाटचाल व सजग मराठी वाचकांकडून असणाऱ्या आमच्या अपेक्षा, यांबद्दलचे हे प्रकट चिंतन.

सुरुवातीला ‘सर्वंकष’ हे काय प्रकरण आहे आणि ‘आम्ही’ म्हणजे कोण, हे सांगतो.

हे नियतकालिक सुरू करताना आम्ही मित्रांना एक आवाहन केले होते. त्यातील महत्त्वाचा भाग असा  –

या काळात नवे नियतकालिक? (काय वेडबिड लागलंय?)

‘काळ तर मोठा कठीण आलाय’ असे आपण कित्येक पिढ्यांपासून बोलत आलो आहोत. आजचा काळ खरोखरच आपणा सर्वांची कसोटी पाहणारा आहे, यात शंका नाही. विचार व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आकुंचित करण्याचे प्रयत्न हरघडी सुरू आहेत. माध्यमे, प्रशासन व न्यायालये – सर्वच विकल झाली आहेत किंवा विकली गेली आहेत. व्यवस्थेच्या विरोधात उठणारा प्रत्येक आवाज - मग तो शेतकरी, श्रमिकांचा असो, विद्यार्थी-युवकांचा, की लेखक-कलाकारांचा – दडपून टाकण्यात येत आहे. सत्ताधाऱ्यांहून वेगळे मत मांडणाऱ्या विशीतल्या युवकांपासून ऐंशीच्या घरातील वृद्धांपर्यंत सर्वांना तुरुंगात डांबणे, धमक्या, दहशत, हल्ले, देशद्रोही म्हणून हाकाटी, बदनामी अशा दमनयंत्रणेला सामोरे जावे लागत आहे. संविधानाचे प्राणतत्त्व – समता, बहुविधता, न्याय, बंधुता, यांवर आधारित लोकतांत्रिक भारत – आज संकटात आहे. ते जतन करण्यासाठी त्यावर विश्वास असणाऱ्या सर्वांनी निकराचे प्रयत्न करणे आता अत्यावश्यक झाले आहे. किंबहुना, अशा वैचारिक विमर्शाची आवश्यकता कोणत्याही काळापेक्षा आज सर्वाधिक आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

आपल्या समाजावर आलेले संकट बहुआयामी आहे. केवळ एका विशिष्ट विचारसरणीला दोष देऊन आपल्याला त्यातून सुटून जाता येणार नाही. पुरोगामी म्हणवणाऱ्या सर्व प्रवाहांनी गेल्या अनेक दशकात केलेल्या असंख्य घोडचुका, त्यांना आपल्या ऐतिहासिक भूमिकांचे झालेले विस्मरण, सर्वसामान्य जनतेपासून त्यांची तुटलेली नाळ, त्यांनी स्वतःचे व परस्परांचे केलेले खच्चीकरण अशा अनेक कारणांनी आपण हे संकट आपल्या समाजावर ओढवून घेतले आहे. त्यातून बाहेर पडायचे असेल तर आपल्याला सुरुवात परखड आत्मचिकित्सेने करावी लागेल.

दुर्दैवाने आज हे भान समता-न्याय मानणाऱ्या, वर्ग-जात-स्त्रीदास्य अंताची भाषा बोलणाऱ्या समूहांमध्येही विकसित झालेले नाही, तर इतरांची काय कथा? विषमता व शोषणाचे समर्थन करणाऱ्या शक्ती दिवसेंदिवस प्रबळ होत आहेत, परस्परांशी हातमिळवणी करत आहेत. मात्र पुरोगामी प्रवाह परस्परांशी भांडण्यात शक्तिपात करत आहेत. समोरच्या व्यक्तीचे विचारस्वातंत्र्य मान्य करून संवादाच्या अंगाने जाणारा विमर्श सुरू करणे, ही काळाची गरज आहे. ती पूर्ण करताना विविध गटातटांत विखुरलेल्या विचारी समूहांमध्ये सेतू बांधणे व त्यांना विचारधारांच्या पुनर्मांडणीकडे नेणे गरजेचे आहे. ‘सर्वंकष’ या नव्या नियतकालिकाचा हाच उद्देश आहे.

सर्वंकष कशासाठी?

- मराठी विचारविश्वातील साचलेपणा दूर करून मुक्त विमर्श घडवण्यासाठी

- विविध पुरोगामी विचारधारांमध्ये मोकळा संवाद सुरू करण्यासाठी

- वर्तमानकाळातील गुंतागुंत आणि गतकाळातील संदर्भ समजून घेत भविष्याचे चिंतन मांडण्यासाठी

- सातत्याने बदलणाऱ्या जगाला समजून घेण्यासाठी आणि जग बदलण्यासाठी लागणाऱ्या नवनवीन सैद्धान्तिक, वैचारिक आणि तात्त्विक चर्चांचा पाया घालण्यासाठी

- सत्यमार्गी, सत्यशोधकवृत्ती आणि सम्यक् दृष्टीने घडलेली ‘सर्वंकष समज’ विकसित करण्यासाठी  

- नवी स्वप्ने आणि कल्पना यांना अवकाश देण्यासाठी

- एकविसाव्या शतकातील ‘आयडिया ऑफ इंडिया’चा पाया रचण्यासाठी

- ललित X वैचारिक, जात X वर्ग X स्त्रीदास्य यांसारखी कृतक् द्वंद्वे संपवण्यासाठी

‘पुरोगामी’ ही शिवी का बनली?

ही भूमिका थोड्या विस्ताराने मांडण्याची गरज आहे. एकेकाळी मराठीत उत्तम राजकीय-सामाजिक विमर्शाची परंपरा होती, जी आता अतिशय क्षीण झाली आहे. सामाजिक माध्यमांतून होणाऱ्या चर्चेत किमान सभ्यतेचे नियमही पाळले जात नाहीत, तेथे घडतो तो निव्वळ वितंडवाद. मराठीत आजही अनेक वैचरिक नियतकालिके आहेत, जी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत  आपले कार्य प्रामाणिकपणे करीत आहेत. मात्र आपापल्या वैचारिक कोंडाळ्यांपलीकडे ती पोहचत नाहीत. आजच्या काळातील प्रश्न अतिशय गुंतागुंतीचे आहेत. ते समजून घेण्यासाठी आपल्याला आपापल्या जुन्या चौकटी सोडून बाहेर पडावे लागेल. त्यांचे उत्तर शोधण्यासाठी विविध विचारधारांना परस्परांशी संवाद करावा लागेल. आपल्या चुका प्रामाणिकपणाने मान्य कराव्या लागतील.

आज दिसते असे की, सर्व पुरोगामी इतरांच्या चुका शोधून परस्परांवर तुटून पडण्यात आपली तुटपुंजी शक्ती वाया घालावत आहेत. समाजवाद्यांनी संघाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य कसे केले, याविषयी इतर लोक सविस्तर विवेचन करतील. मार्क्सवाद्यांना जात समजली नाही, याबद्दल फुले-आंबेडकरवादी बोलतील. सर्वोदयवाद्यांच्या वैचारिक भोंगळपणाबद्दल ते सोडून इतरांचे एकमत असेल. जागतिकीकरणानंतर अधिक कठीण झालेल्या वर्गीय समस्या समजून घेण्याची (आपण सोडून) इतर कोणाची तयारी नाही, हा राग मार्क्सवादी आलापत बसतील. स्त्री-पुरुष समतेचा प्रश्न आज कोणाच्याही अजेंड्यावर नाही. पण त्याचा जाब विचारण्याची हिंमत आज स्त्रीवाद्यांमध्ये उरलेली नाही. तसे केल्यास ‘आधी आपले वर्गीय-जातीय चरित्र बघा’, असे उत्तर दिले जाईल, अशी त्यांना भीती वाटते.

दुर्दैवाने वर मांडलेल्या सर्व मुद्द्यांत काही ना काही तथ्य नक्कीच आहे. पण त्यापलीकडे जाऊन सारे पुरोगामी प्रवाह इतके क्षीण का झाले, ‘पुरोगामी’ ही शिवी का बनली, याचा गंभीरपणे विचार करताना कोणी दिसत नाही. प्रत्येक प्रश्नाला जात, वर्ग, स्त्री-पुरुष असमानता आणि सांप्रदायिकता हे सर्व पैलू असताना त्यांतील एकाचाच विचार, तोही आमच्याच चष्म्यातून करा, हा दुराग्रह सोडल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

आजचे राजकीय संकट हे ‘आयडिया ऑफ इंडिया’ मोडीत काढू पाहणाऱ्यांच्या ‘आम्ही विरुद्ध ते’ अशा विभाजनवादी मांडणीला आलेले फळ आहे. दुर्दैवाने त्याचा मुकाबला करू पाहणाऱ्या शक्तीही त्यांच्याच खेळीला बळी पडून नव्या विभाजनरेषा आखताना आपल्याला दिसतात. समाजात जात, वर्ग, धर्म, लिंग यांवर आधारित भेद आहेत, हे मान्य करूनही सर्वांच्या हिताचा विचार करणारी सर्वंकष मांडणी आपल्याला करावी लागेल. सर्वांना सहभागी करून नेटाने चर्चा पुढे न्यावी लागेल, याला पर्याय नाही, असे आम्ही मानतो. जागतिक पातळीवरील  विचारधारेच्या अभावाचे संकट आपण दूर करू शकत नाही. पण आपण जिथे असू तिथे डोळे उघडे ठेवून व जमिनीवर पाय घट्ट रोवून नवा विचार करणे आपल्या हातात आहे व ते आपण केलेच पाहिजे.

आम्ही कोण?

श्री. रामदासजी भटकळ यांचा पुढाकार व मार्गदर्शन; रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ यांच्या नेतृत्वाखाली विविध विद्याशाखांचे प्रशिक्षण घेतलेली, विविध विचारधारा मानणारी व परस्परपूरक क्षमता असणारी तरुण चमू – सर्वश्री गणेश कनाटे, दीपक पवार, देवकुमार अहिरे, जयदीप हर्डीकर, श्याम पाखरे व सर्वश्रीमती अनुराधा मोहनी व प्रज्वला तट्टे. सल्लागार मंडळात सर्वश्री अलीम वकील, यशवंत मनोहर, गणेश देवी, रमेश ओझा व संजीव चांदोरकर हे मान्यवर.

आतापर्यंत आम्ही काय केले?

वर उल्लेखलेले वैश्विक आव्हान स्थानिक पातळीवर पेलणे कठीण काम आहे. मात्र गेल्या नऊ महिन्यांत आम्ही त्या दिशेने काही आश्वासक पावले नक्की टाकली आहेत. ‘आरक्षण’ हा आजच्या काळातील सर्वाधिक विवादास्पद प्रश्न आहे, ज्यावर जनमानसात कमालीचे ध्रुवीकरण झाले आहे. गंमत म्हणजे बहुतेकांची या बाबतीत आपल्या जातसमूहाच्या दृष्टीने एक व इतरांच्या बाबतीत विरुद्ध भूमिका असते. आम्ही या प्रश्नावर लागोपाठ दोन विशेषांक काढले, ज्यांतून प्रामुख्याने आरक्षण व  जातिअंत, ओबीसी, स्त्रिया, मुस्लीम, ख्रिश्चन, शेतकरी जाती या समूहांचे आरक्षण, खाजगी क्षेत्रातील आरक्षण, द. आफ्रिकेतील क्रिकेट संघात कृष्णवर्णीयांना दिलेले आरक्षण, अशा विविध पैलूंची सविस्तर चर्चा करण्यात आली होती.

त्याशिवाय जात्याधारित आरक्षणाचा लाभ कोणाला होतो, आरक्षणातून जातींतर्गत नवे वर्ग निर्माण होऊ नयेत यासाठी करावयाची उपाययोजना, सामाजिक समतेसाठी आरक्षणाखेरीज अन्य पर्याय कोणते अशा अनेक प्रश्नांची खुलेपणाने चर्चाही करण्यात आली. सामाजिक समतेसाठी आरक्षण हे पहिले पाऊल असले तरी ते पुरेसे नाही; मुख्य प्रश्न भांडवली व्यवस्थेतील संसाधनांच्या फेरवाटपाचा आहे, हा मुद्दा त्यातून जोरकसपणे समोर आला.

आरक्षणाच्या अंमलबजावणीचा प्रश्न संबंधित समूहांच्या राजकीय बळावर अवलंबून असतो, हे तथ्यही त्यातून वारंवार अधोरेखित झाले. मराठा समूहासारख्या शेतीआधारीत समाजगटाची आरक्षणाची मागणी शेतीच्या अरिष्टातून उद्भवलेली आहे व त्याला आरक्षण हे उत्तर नाही, असे परखड प्रतिपादनही त्यातून समोर आले. ही चर्चा पुढील अनेक अंकांतून चालत राहील व त्यातून या जटिल प्रश्नाकडे पाहण्याची विविधांगी दृष्टी विकसित होईल असा आम्हाला विश्वास आहे.

‘सर्वंकष’चा पहिला अंक हा ‘गांधी-१५०+ विशेषांक’ होता. सायकलवर बसलेल्या गांधीजींचे चित्र असणारे त्याचे मुखपृष्ठ हा चर्चेचा विषय बनला होता. (‘सर्वंकष’च्या सर्व अंकांची मुखपृष्ठे आकर्षक आहेतच, पण अंकाच्या थीमला न्याय देणारीही आहेत.) या अंकातील लेखांनी गांधींचे व्यक्तित्त्व व कर्तृत्व यांचा घेतलेला वेध अनोखा व आजच्या काळाशी अतिशय सुसंगत असा होता. उदाहरणार्थ, ‘नई तालीम’ या त्यांच्या शिक्षण विषयक प्रयोगाची चर्चा गांधी तत्त्वज्ञानाच्या आधारे न करता ती आजचे मेंदूविज्ञान व ज्ञाननिर्मिती शास्त्र यांच्या संदर्भात करण्यात आली आहे आणि ज्ञाननिर्मितीसाठी ‘नई तालीम’ने सुचवलेली पद्धत ही आजच्या संदर्भात सर्वांत वैज्ञानिक पद्धत आहे, म्हणून ती स्वीकारणीय आहे, असे प्रतिपादन रमेश पानसे यांच्या लेखातून करण्यात आले आहे.

गांधी हे एका जनसमूहाला वंदनीय महात्मा वाटतात, तर दुसऱ्याला खलपुरुष. कितीही प्रयत्न केला तरी त्याला टाळता का येत नाही, असा एकाचा प्रश्न, तर त्याला हा देश का नाकारतो आहे, हा दुसऱ्यापुढचा पेच. या दोन्ही प्रश्नाचे मूळ एकच आहे व तेच गांधींच्या चिरंतनत्वाचे रहस्य आहे, अशी अतिशय मौलिक मांडणी रमेश ओझा यांनी या अंकात केली आहे. भालचंद्र नेमाडेंची मुलाखत हा एरवीच मराठी साहित्यक्षेत्रात चर्चेचा विषय असतो. या अंकात त्यांनी त्यांच्या वैचारिक विकासाचे गांधीविचाराशी असणारे नाते उलगडून दाखवले आहे. एका अर्थाने देशीवादाची भूमिका व गांधीविचार या दुर्लक्षित पैलूवर चर्चा होण्याचा अवकाश या मुलाखतीने खुला केला आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

प्रत्येक अंकात विशेषांकातील थीमसोबत सामायिक प्रश्नांवर विचारांना चालना देणारे लेखन प्रकाशित करण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. विजय तांबे यांचा चौथ्या औद्योगिक क्रांतीवरचा लेख, परिमल माया सुधाकर यांचा सीरियातील राज्यविहीन समाजनिर्मितीच्या प्रयोगाविषयीचा लेख, तारक काटे यांनी छत्तीसगढमध्ये सरकारपुरस्कृत ग्रामीण पुनर्रचनेच्या    प्रयोगाबद्दल केलेले लिखाण म्हणजे मराठीतील त्या विषयांवरील पहिले महत्त्वाचे विवेचन आहे. त्यासोबतच रवींद्रनाथ आणि राष्ट्रवाद, संत कवयित्रींच्या काव्यलेखनामागील मुक्तिसंकल्पना, लॉकडाऊनच्या काळातील श्रमिकांची फरफट आणि हवामान बदलाचे शेतीवर झालेले भयावह परिणाम टिपणारे रिपोर्ताज असे महत्त्वाचे लेखन आम्ही प्रकाशित करू शकलो, याचा आम्हाला अभिमान आहे.

‘वैचारिक विरुद्ध ललित’ हे मराठी साहित्यात अकारण निर्माण केले गेलेले द्वंद्व मोडीत काढण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत. म्हणून सकस वैचारिक लेखनासोबत सविस्तर व परखड पुस्तक व कला समीक्षणे, नवी दृष्टी देणारे ताजे ललित लेखन, अन्य भाषांतील मौलिक लिखाणाचा अनुवाद तुम्हाला ‘सर्वंकष’मध्ये वाचायला मिळेल.

अनुपम मिश्र या कार्यकर्ता-लेखकाची पर्यावरण-साहित्य-संस्कृती-भाषा यांबद्दल नवी दृष्टी देणारी मुलाखत, बाबुषा कोहली व बच्चालाल उन्मेष यांच्या हिंदी कवितांचे अनुवाद, अभिजित बॅनर्जी व एस्थर डफलो यांचे ‘पुअर इकोनॉमीक्स’, रुटगर  ब्रेगमनचे ‘ह्युमन काइंड’, खालिद होसेनीचे  ‘सी प्रेयर’, आणि गणेश देवींचे ‘द क्वेश्चन ऑफ सायलेन्स’ या अनोख्या इंग्रजी पुस्तकांचा सविस्तर परिचय करून देणारे समीक्षापर लेख अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. त्याशिवाय आम्ही ‘ठेवणीतील पाने’ नावाने अतिशय महत्त्वाच्या, पण आता विस्मृतीत गेलेल्या मराठी लेखांचे पुनर्मुद्रणही करतो. एका अर्थाने आपला सांस्कृतिक ठेवा जपण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. अंकाबद्दलची ख़ुशीपत्रे न छापता महत्त्वाच्या लेखांतील मुद्द्यांचे खंडन-मंडन करणारा प्रतिसाद छापून ती चर्चा पुढे चालवणे हे आमचे धोरण आहे.

मराठीत चांगले वैचारिक लेखन होत नाही, विशेषतः आजची नवी पिढी तर त्या बाबतीत कुचकामी आहे, अशी तक्रार सर्वत्र होत असताना आम्ही अनुवादाला कमी जागा देत मौलिक मराठी लेखन प्रकाशित करत आहोत. आमच्या लेखकांमध्ये सुमारे ३० टक्के तरुण लेखक आहेत, हे चित्र नक्कीच आशादायक आहे, असे आम्हाला वाटते.   

पुढचा अंक ‘साहित्यसंमेलन विशेषांक’ असल्यामुळे त्यात ललितलेखनाला काहीसे झुकते माप मिळणार आहे. मराठीतून चांगली प्रेमकविता लुप्त होते आहे की काय, अशी भीती वाटावी, असे आजचे वातावरण आहे. म्हणून आम्ही विशीपासून सत्तरीपर्यंतच्या मराठी कवींच्या आजच्या उत्कट, जिवंत, रसरशीत प्रेमकवितांचे संमेलन या अंकात भरवणार आहोत. एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या-तिसऱ्या दशकात, आधुनिकोत्तर, बाजारशरण जगात जगताना माणसं कशी प्रेम करतात, आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती कशी करतात, त्यातून या काळाविषयी, त्याच्या आव्हानांविषयी, त्यांवर मात करून जगण्याच्या उर्मींविषयी आपल्याला काही मोलाचे कळू शकेल. त्याशिवाय नव्या पिढीला साहित्य, अभिव्यक्तीची माध्यमे, साहित्यसंमेलनासारखी साहित्यव्यवहाराची माध्यमे यांच्याबद्दल काय वाटते, हेही आम्ही या अंकातून जणू घेण्याचा प्रयत्न करत आहोत. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

.................................................................................................................................................................

अंकातील समृद्ध आशयाला प्रसन्न व आकर्षक मांडणीची जोड मिळावी, येणाऱ्या मजकुराचे कसून संपादन व्हावे, मजकुराची रचना आकर्षक असावी, या बाबींबद्दल आम्ही आग्रही आहोत. सजग वाचकांसोबतच सांस्कृतिक-राजकीय-सामाजिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या व्यक्तींपर्यंत हा अंक पोहचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. डिजिटल युगाची आव्हाने लक्षात घेऊन अंकाची डिजिटल आवृत्ती काढणे, वेबसाईटवर महत्त्वाचा मजकूर प्रकाशित करणे, जुन्या अंकातील मजकूर खुला व सहज शोधता येईल, अशा पद्धतीने उपलब्ध करणे, अशा अनेक कल्पना आम्ही भविष्यात राबवणार आहोत. ते करण्यासाठी आम्हाला मानवी, तांत्रिक व व्यवस्थापकीय संसाधनांची नितांत आवश्यकता आहे.

सद्हेतू, प्रामाणिक प्रयत्न, चिकाटी यांना आम्ही कमी लेखत नाही. पण मराठीत महत्त्वाच्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक मुद्द्यांवर नवा विमर्श उभा करणे, हे मूठभर लोकांचे काम नाही. ते करू पाहणाऱ्यांना सजग वाचकांचे व जाणत्या लोकांचे भक्कम पाठबळ मिळणे व त्यामागे व्यवस्थापन-विपणन-वितरण व्यवस्था उभी राहणे आवश्यक आहे. सध्या तरी मोठ्या संख्येने वर्गणीदार नोंदवणे व छोट्या देणगीदारांचे नेटवर्क उभारणे, ही आमची तातडीची गरज आहे.

या प्रयोगात आपण आमच्यासोबत उभे राहाला असा आम्हाला विश्वास आहे.

.................................................................................................................................................................

रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ

editor.sarvankash@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......