पुरुषी संस्कृतीविरुद्धचे स्त्री-स्वातंत्र्य युद्ध अनेक शतके ‘समांतर रीती’ने जगातील बहुतेक सर्व सभ्यतांमध्ये विकसित झाले. त्या त्या काळात उपलब्ध असलेली विविध महाकाव्ये, पुराणे, कथा-कविता, नाटके, भक्तिकाव्ये, स्त्रीगीते इत्यादी स्त्रीसाहित्य अशा विविध माध्यमांचा अतिशय खुबीने वापर करून स्त्रियांनी आपली दुःखे वेशीवर टांगण्याचा अथक प्रयत्न केला. त्यात त्यांना काही सुहृद पुरुषांची साथ मिळाली.
स्वातंत्र्य, समता, आणि समृद्धीच्या पुरुषी पक्षपाताविरुद्ध स्त्रियांनी प्राचीन काळापासून केलेल्या युद्धाला यश आले विसाव्या शतकात. २८ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला ‘महिला दिन साजरा’ करण्यात आला. त्याच्या पुढच्याच वर्षी १९१०च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेनुसार ८ मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून निश्चित करण्यात आला. हे भान भारतात झिरपायला ३३ वर्षे लागली. मुंबईत पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा केला गेला. पुण्यात हे भान १९४३नंतर ३२ वर्षांनी आले. पुण्यात ८ मार्च १९७१ रोजी मोठा मोर्चा काढण्यात आला. (ही भारतातील, महाराष्ट्रातील स्त्रीवादी चळवळीची सुरुवात होती. त्यानंतर स्त्रीवादाची तीन स्थित्यंतरे झाली, आता ती चौथ्या स्थित्यंतराकडे वळते आहे.) दरवर्षी तो मोठ्या उत्साहात जगात, आपल्या राष्ट्रात-महाराष्ट्रात गावोगावी, सर्वत्र साजरा करण्यात येतो. आजही अर्थात तो साजरा होत आहे.
पक्षपाती ‘बंधुत्व’
स्वातंत्र्य, समता, आणि समृद्धी या तीन मूल्यांसोबत ‘बंधुत्व’ हे मूल्यही महत्त्वाचे आहेच. खरे तर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि समृद्धी असा क्रम लावण्याची पद्धत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते ही मूल्ये त्यांनी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली नसून बौद्ध तत्त्वज्ञानातून घेतली आहेत. पण ‘बंधुत्व’ (brotherhood) शब्द किंवा संकल्पना परिपूर्ण समतावादी स्वरूपाची नाहीच, ती ‘ठार पुरुषी’ आहे. ‘बंधुत्व’मध्ये ‘स्त्री’चा समावेश आहे, असे म्हणणे हा पुरुषी कावेबाजपणा आहे. She मध्येच he आहे असे दावा करणारी ती मखलाशी आहे. स्त्रीवादी संकल्पनाच निर्माण करायची तर ‘भगिनीत्व’ (sisterhood) असा केला केला पाहिजे. पण तसा शब्द अजून स्त्रीवादी (खरे तर समतावादी) चर्चाविश्वात येउच दिला गेलेला नाही. कारण मुळात मानवी वर्तनाचा ढाचाच ‘पुरुषी’ आहे. ज्यांनी ‘बंधुत्व’ या मूल्यांचा उद्घोष केला ते सारे त्यावेळी ‘पुरुष’ च होते.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
गौतम बुद्धाला स्त्रियांविषयी कितीही कणव, करुणा असली, ‘दुःख हे पहिले सत्य आहे’ याची मानवी घोषणा त्याने केली असली तरी बुद्धही पुरुषच होता. परिणामी एका अर्थी बौद्ध तत्त्वेही पक्षपातीच ठरतात. बुद्ध धर्म हजारो वर्षे टिकला असता, पण स्त्रीच्या प्रवेशामुळे हा धर्म आता पाचशेच वर्षे टिकेल, असे बुद्ध का म्हणाला असेल, असा प्रश्नही आज नव्या संदर्भात उपस्थित केला पाहिजे आणि यथार्थ उत्तराचा शोध घेतला पाहिजे.
स्त्रियांना विसाव्या शतकापर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. ‘मत’चा अर्थ दोन प्रकारचा आहे. पहिला प्रचलित राजकीय अर्थ ‘मत’ (vote) ‘दान’ देणे. आणि दुसरा अर्थ ‘वैचारिक मत’ (opinion) देणे. खरे तर हा दुसरा अर्थच मूळ मानवी अर्थ असून पहिला अर्थ त्याचा स्थूल लोकशाहीच्या संदर्भात दिला गेलेला कृत्रिम राजकीय आविष्कार आहे. कोणत्याही बाबतीत स्त्रीने आपले ‘मत’ - विचार व्यक्त करून नयेत, हे बंधनच तिच्या वैचारिक आणि राजकीय भूमिकेचे खच्चीकरण आहे/होते. परिणामी ‘अस्सल मतदान’ प्रक्रिया तिला कधीच उमगली नाही. ती विसाव्या शतकात उमजून आली. जिला बाप, नवरा, मुलगा, जावई निवडण्याचे स्वातंत्र्य नाकारले होते, तिला ‘सरकार’ निवडण्याचे स्वातंत्र्य पुरुषी व्यवस्थेने कधीच दिले नव्हते. तिला फक्त आई, बायको, मुलगी आणि सून होण्याची सक्ती होती. त्याविरुद्धच स्त्रियांनी दिलेला लढा विलक्षण, अद्भूत आहे, यात शंका नसते.
स्त्रियांचे दोन वर्ग : शोषित आणि शोषक
इथे मी दोन मुद्दे मांडू इच्छितो. स्त्रिया शोषित होत्या, काही प्रमाणात अजूनही शोषित आहेत, हा पहिला मुद्दा. दुसरा, काही स्त्रिया शोषणात सहभागी तरी आहेत किंवा थेट शोषकच आहेत हा. दुसरा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे.
शोषित स्त्री कोण? तर, आर्थिक, शैक्षणिक, वैचारिक इत्यादी मागासलेल्या स्त्रिया म्हणजे अस्सल शोषित स्त्री. त्यात सर्वधर्मीय, सर्ववर्णीय आणि सर्वजातीय कष्टकरी, घरकामवाली, वेश्या, भिकारी, अशिक्षित, अत्यल्पशिक्षित इत्यादींचा समावेश होतो. त्यांच्यात काही प्रमाणात आर्थिक, शैक्षणिक, वैचारिक इत्यादी मागास लिंगांतरितांचाही समावेश करता येईल. या साऱ्या पुरुषी वर्चस्वाच्या बळी आहेत. त्यांची टक्केवारी खूप मोठी आहे. त्यांची मुक्ती अजूनही खूप लांब आहे.
या शोषित स्त्री वर्गाच्या संपूर्ण स्वातंत्र्याबाबत कोणताही आक्षेप असू नये. या वर्गाच्या अंतर्गत रचनेतही शोषण आहेच. जसे की भिकारी आणि वेश्याव्यवसायात स्त्रियाच इतर स्त्रियांचे शोषण करतात. पण हे वास्तव पुरुषी नियंत्रणाखाली असल्याने अंतिमतः ते पुरुषी शोषण ठरते. सामाजिक विषमतेमुळे हे शोषण अपरिहार्य ठरते. देशाच्या मजबूत रचनेसाठी ‘युद्ध’ अनिवार्य ठरते. आणि सैनिकांसाठी अमलीपदार्थ, उत्तेजक मादक मेंदूबधीर करणारी विविध द्रव्ये आणि वेश्या अनिवार्य ठरतात. त्यातून त्यांचे हिंसक निर्मिती उद्योग फोफावतात. आता आधुनिक भांडवलीकरण झाल्यामुळे या ‘दुरित निर्मिती उद्योगां’ना सामाजिक गरजेचे स्वरूप मिळते. अशा दुरितांना मी ‘अनिवार्य सामाजिक दुरित’ म्हणेन. ‘दुरितांचे तिमिर जावो’ म्हणून ते कधीही जात नसते. (कदाचित त्यासाठी ‘सत्ययुग’ यावे लागेल... आणि ती आपल्या हयातीत शक्यता नाहीच. कारण ‘कलियुगाच्या ४ लाख ३२ हजार वर्षांपैकी आत्ता कुठे ५००० वर्षे संपू पाहताहेत..!?)
आता, आक्षेपाचा मुद्दा निर्माण होतो तो दुसऱ्या वर्गाबाबत- शोषक स्त्रियांबाबत. हा वर्ग आर्थिक, शैक्षणिक, वैचारिक मागासलेला नाही. हा समृद्ध वर्ग आहे. हा वर्ग निर्माण कसा होतो? तर, व्यापक स्त्रीमुक्ती चळवळीचा अनिवार्य निष्कर्ष म्हणून या ‘वर्गा’चा उदय होतो. लोकशाही समाजव्यवस्था आणि इहवादी धोरणाचा एक निष्पादित वर्ग म्हणून पुरुषांपेक्षा वेगळा असे या वर्गाचे स्वरूप आहे. हा वर्ग पुढारलेला कसा असतो? तर..
ज्ञान, सौंदर्य, धर्म
स्त्रिया जिथे अतिशय प्रगतीपथावर आहेत, ती वानगीदाखल काही क्षेत्रे पाहू. जसे की ज्ञान, सौंदर्य, धर्म. या क्षेत्रात या सुशिक्षित वर्गातील स्त्रियांची आघाडी दिसून येते. पण तर्क आणि नीती या क्षेत्रात त्या पिछाडीवर असल्याचे आढळते.
ज्ञानक्षेत्र म्हणजे शिक्षण. उदाहरणार्थ, मुक्ता साळवे, रमाबाई रानडे, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्यामुळे स्त्रीशिक्षणाची ज्ञानगंगा वाहती झाली. शिक्षणाचा सार्वत्रिक फैलाव झाला. ‘शिकलेली बायको’ या चित्रपटाचा जमाना बराचसा आज संपत आला. आदिवासी भागात अजूनही शिक्षणाची आबाळ असली तरी ‘शिक्षण महत्वाचे आहे’ ही जाणीव निर्माण झाली आणि मागणी पुढे येऊ लागली. प्राथमिक शिक्षण ते उच्च विद्यापीठीय स्तरावर स्त्रियांचा सहभाग आढळतो. स्त्री-शिक्षक सर्वत्र दिसतात. शिक्षण क्षेत्रात शिक्षिका ते शिक्षकेतर कार्यालयीन कर्मचारी वर्ग हा उच्च स्त्रीवर्ग आहे, हे अधोरेखित करू. चतुर्थश्रेणी आणि सफाई स्त्री कर्मचारी यातून वगळू. कारण मूलतः शोषित वर्गातील आहेत.
‘सौंदर्यशास्त्र’ या वैचारिक क्षेत्रात मानवी निर्मित कला, ललितकला आणि त्यांचा सौंदर्यानुभव यांचे चिंतन होते. हा सैद्धांतिक पातळीवर खास तत्त्वज्ञानाचा विषय असून त्याचे उत्तम उपयोजन साहित्यशास्त्रात दिसून येते. मानवी सौंदर्याचे चिंतन म्हणून ‘सौंदर्य’ प्रांतात सौंदर्याची प्रमाणे आणि परिमाणे स्त्रीकेंद्रीच आहेत. अनुषंगिक प्रेमसाहित्यविश्वात प्राचीन काळापासून सौंदर्याचे प्रतीक म्हणून केवळ ‘स्त्री’चं ‘केंद्रस्थानी’ आहे. संगीत, नृत्य, नाट्य, कथा-काव्य-महाकाव्य इत्यादी कलांमध्ये स्त्रीसौंदर्य मूलभूत मानले गेले. त्याचा विरोध करण्यासाठी ‘स्त्रीवादी सौंदर्यशास्त्र’ ही विकसित झाले. त्यातही दडलेल्या वर्णवर्गजातवादाविरुद्ध ‘काळा स्त्रीवाद’ मांडण्यात आला.
धर्म आणि स्त्री हा अतिव्यापक विषय आहे, पण आपण इथे मर्यादित अर्थाने स्त्री स्वातंत्र्याच्या संदर्भात हा संबंध पाहू. धर्मक्षेत्रात प्राचीन काळापासून स्त्रिया ‘वस्तू’ होत्या, वर्णजातीच्या वाहक होत्या आणि आजही आहेतच. पण आधुनिक काळात केवळ लोकशाही आणि शिक्षण, यामुळे त्या ‘स्त्री-पुरोहित’ पदापर्यंत जाऊ शकल्या, ही समाधानकारक बाब आहे. हे अर्थात केवळ हिंदू व काही प्रमाणत बौद्ध धर्माबाबत घडले आहे. जैन, शीख त्याचप्रमाणे इस्लाम, ख्रिस्ती, धर्मातही स्त्री पुरोहित नाही. ती क्रांती अजून घडायची बाकी आहे. (कधीतरी घडेल असे वाटवून घेऊ!!).
हिंदू धर्मात अजून स्त्री धर्माचार्य-शंकराचार्य होऊ शकलेली नाही. ‘स्त्री-शंकराचार्य’ हे नामाभिधानही पुरुषीच असल्याने त्याचे ‘स्त्रीकरण’ करायचे तर एक काम करता येईल. शंकराचार्यांना वादात जिने हरवले, ती होती पंडित वाचस्पतीमिश्रची अर्धांगिनी सरसावाणी उर्फ सरस्वती. तिच्या नावाने ‘सरस्वतीचार्या’ असे पद निर्माण केले तर काहीएक ‘समता’ प्रस्थापित झाली, असे म्हणता येईल! हाच नियम इतर यच्चयावत साऱ्या धर्मांचा बाबतीत करता येईल. (खरे तर जैन धर्मातील ‘मल्लिबाई’ अशी ‘तीर्थंकर’ होती. पण तिचे ‘मल्लिनाथ’ करून ‘पुरुषीकरण’ आले. या विरुद्ध हिंदूच (सेक्युलरवादीच) काय, पण जैन स्त्रीही उठाव करू शकत नाही. ती कितीही शिकलेली असली तरी)
हे सारे मी अतिसंक्षिप्त स्वरूपात मांडत आहे. ते विस्ताराने मांडणे शक्य आहे.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
ज्ञान, सौंदर्य व धर्म या क्षेत्रात स्त्रियांनी पुरुषी वर्चस्वाला मोठा धडा दिला आहे, यात शंकाच नाही. पण या वैचारिक व मानसिक प्रक्रियेत उच्च व शिक्षितवर्गात गेलेल्या बहुतेक स्त्रियाही शोषणाच्या सहकर्त्या झाल्या, हे दुखःद आहे. कसे ते पाहू:
तर्क म्हणजे युक्त आणि सत्य विचार करण्याचे बुद्धिवादी किंवा बुद्धिप्रामाण्यवादी क्षेत्र. आणि ‘नीती म्हणजे व्यापक सार्वत्रिक स्वरूपाचे समाजहित ज्या कृतीने होते ती कृती’ अशी एक खुली कल्पना मांडतो. नीतिविचार खूपच जटील आणि वादग्रस्त आहे. दोन्हीत स्त्रियांची स्थिती फारशी स्त्युत्य नाही.
शिक्षणामुळे शिक्षिका ते ‘कुलगुरू’ (हाही शब्द पुरुषी आहे, हे अधोरेखित करतो) ते राष्ट्रपतीपदापर्यंत शिक्षण, कायदा, व्यवस्थापन, पत्रकारिता, इत्यादी हजारो क्षेत्रात स्त्रीचे नेतृत्व आढळते, हे खरे. पण वास्तव वेगळे आहे, हे साध्या सामाजिक निरीक्षणाच्या आधारे सांगता येईल, असे वाटते.
स्त्रीचा नीतीशी लावण्यात आलेला संबंध केवळ विवाहसंस्थेशी जोडला गेला, पण नीती म्हणजे केवळ विवाहांतर्गत संबंध नाही. तो सामाजित नीतीचा एक भाग झाला. ज्ञान, नीति आणि तर्क बाबतीत जिथे केवळ उच्चशिक्षित स्त्रियांचं आहेत ती समाजकारण, अर्थकारण, शिक्षणकारण, राजकारण क्षेत्रे पाहू. यातून (अध्यात्मकारण व धर्मकारण वगळू. खरे तर तेही वगळता येणार नाही. कारण कोणत्याही मंदिरासमोर शिकलेल्या मुली व स्त्रियांचीच गर्दी जास्त असते!)
व्यावसायिक नैतिकता
समाजकारण ते राजकारण या व्यापक सामाजिक क्षेत्रात स्त्रियांची ‘व्यावसायिक नैतिकता’ समजून घेण्यासाठी ‘व्यावसायिक नैतिकता’ या संकल्पनेचा चा अर्थ पाहू -
नैतिकतेच्या बाबतीत व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजशरणता हा मोठा संघर्ष असतोच असतो, त्यात दुमत नाही. हा झगडा अधिक वाढू नये, म्हणूनच ‘व्यावसायिक नैतिकता’ (Professional Ethics) अनिवार्य ठरते.
मराठीत ‘व्यवसाय’ आणि ‘धंदा’ हे दोन शब्द इंग्लिशमधील ‘Business’ या शब्दाचे भाषांतर या अर्थाने वापरण्याची प्रथा आहे; पण ‘व्यवसाय’ हे Professionचे आणि ‘धंदा’ हे Businessचे यथार्थ भाषांतर म्हणता येईल. ‘व्यवसाय’ (Professional) आणि ‘धंदा’ (Business or trade) हे केवळ दोन वेगळे शब्दच आहेत, असे नव्हे तर त्या एकमेकांपासून वेगळ्या करता येण्याजोग्या दोन स्वतंत्र ‘संकल्पना’ आहेत.
व्यवसाय म्हणजे काय? तर ‘ज्यात या ना त्या स्वरूपात एक अथवा अनेक व्यक्तींकडून केवळ सार्वजनिक हिताची सेवा दिली जाते किंवा ती सेवा दिली जावी अशी अपेक्षा आहे, ते Profession’.
धंदा म्हणजे काय? तर ‘ज्यात मालक किंवा भागधारकांना आर्थिक लाभ मिळावा, आणि तो ‘सतत मिळत राहावा’ हाच एकमेव उद्देश आहे, तो Business’.
व्यावसायिक माणूस (Professional) ज्या क्षेत्रात काम करतो, त्या व्यवसायानुसार त्याने कोणते नीतिनियम पाळावेत याचे निकष ठरतात. ज्याने काही कौशल्ये प्राप्त केली आहेत, त्यांचा वापर कसा करावा, याचे ज्ञान त्यास आहे आणि या कौशल्ये व ज्ञानाचा वापर केवळ ‘सार्वजनिक हित’ या उद्दिष्टासाठी करतो; त्यांच्या आधारे करत असलेल्या कामात तो एका निश्चित निष्कर्षांप्रत येऊ शकतो, त्यास व्यावसायिक म्हटले जाते. हे काम सर्वसामान्य माणूस करू शकत नाही. कारण ही कौशल्ये आणि ज्ञान त्याच्याकडे नसतात. व्यावसायिकास याचा मोबदला मिळतो, पण तो निश्चित नसतो. व्यावसायिकाकडे प्रामाणिकपणा, सचोटी, पारदर्शकता, विश्वासार्हता, आत्मविश्वास, कायदापालनाची प्रवृत्ती, निष्ठा, आदर हे गुण असावेत, अशी अपेक्षा असते. डॉक्टर, शिक्षक, सुतार, पत्रकार, वकील, बिगर-सरकारी संस्थेतील कर्मचारी, कॉर्पोरेट कर्मचारी ही काही उदाहरणे.
एवढेच नव्हे तर लोकशाहीत कोणताही लोकप्रतिनिधी ते प्रधानमंत्री व राष्ट्रपती ही राजकीय मंडळी व्यावसायिकच मानली जातात. त्याचप्रमाणे लोकशाहीतील संपूर्ण नोकरशाही ही देखील व्यावसायिकच आहेत. कोणत्याही नोकराचे कामावर रुजू होण्याआधी काहीएक कौशल्याधारित प्रशिक्षण पूर्ण करून घेतले जाते. नोकरशाहीत वैद्यकीय, कायदा, शिक्षण, लष्कर, नागरी संरक्षण दल (पोलीस) विशेषतः संपूर्ण देशव्यापी महसूल विभागाचा समावेश होतो.
याउलट, धंद्यात कौशल्यापेक्षा ‘निव्वळ नफा’ हेच उद्दिष्ट असते. नफा मिळत नसेल तर धंदा बंद करता येतो, दुसरा सुरू करता येतो. धंदेवाईक माणूस केवळ भांडवलाच्या आधारे धंदा करतो. तो तज्ज्ञ व्यावसायिकाला नोकरीला ठेवू शकतो, त्याच्या कौशल्याचा व ज्ञानाचा उपयोग करून तो नफा मिळवतो. नफेखोरीच्या धंद्यात नीतिनियमांचा प्रश्न येत नाही; पण व्यवसाय आणि धंदा एकत्र आले की, त्यांच्या मिसळणीतून नवेच प्रश्न निर्माण होतात. मालकाला धंदा हवा असतो आणि व्यावसायिक असलेल्या नोकराला अधिक वेतन हवे असते; कारण त्याला मालकाचा नफा दिसत असतो; पण नफ्याच्या प्रमाणात वेतन देण्याची मालकाची इच्छा नसते. इथे नैतिक संघर्ष आणि इतर व्यवस्थापनाचे संघर्ष निर्माण होतात.
लोकशाही धंदा की व्यवसाय?
इथे एक प्रश्न उपस्थित करू. लोकशाही हा धंदा आहे की, व्यवसाय आहे? लोकशाही हा धंदा नाही, हे उघडच आहे. साहजिकच लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही हादेखील धंदा नाही; तर केवळ व्यापक समाजहित साधणारा व्यवसाय आहे, असा निष्कर्ष निघतो.
दुसरा प्रश्न उपस्थित करू- ‘प्रातिनिधिक लोकशाहीच्या सत्ताक्षेत्रात कोणत्या तत्त्वांच्या आधारे निर्णय घेतले जातात?’ त्याचे उत्तर ‘संसदेतील बहुमताच्या आधारे घेतले जातात’ असे दिल्यास ते चुकीचे आहे. ‘बहुमतशाही’ हा तार्किक चकवा आहे. कारण येथे ‘राजकीय निर्णयामागील समर्थन आणि बौद्धिक स्पष्टीकरण कसे केले जाते?’ हा मुद्दा असतो आणि त्याचे सविस्तर उत्तर अपेक्षित आहे.
उदाहरणार्थ असे पाहा की, एखाद्या खासगी उद्योगसमूहाचा मुख्य कार्यकारी अधिकारी काही निर्णय घेतो. उत्पादन क्षमतेत वाढ, नवीन ग्राहकवर्ग निर्माण करणे, बाजार ताब्यात घेणे, इतरांशी विक्रीसाठी करार करणे, कर्मचारी वर्ग वाढ किंवा कपात हे त्याचे सारे निर्णय अखेरीस फक्त एकाच उद्दिष्टासाठी असतात, तो म्हणजे केवळ ‘नफेखोरी’.
याउलट लोकशाहीतील राजकीय निर्णयामागे केवळ सामान्य जनतेचे हितरक्षण आणि हितवृद्धी हेच उद्दिष्ट असते. लोकशाहीतील कायदे व त्यातील वेगवेगळ्या दुरुस्ती, अनेक पातळीवरील नियम, अनेक अध्यादेश, राज्यीय-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय करारमदार, विविध संस्थात्मक सुधारणा इत्यादी निर्णय राजकीय नेते किंवा संसद घेते. या राजकीय निर्णयकर्त्यांचे उपाय त्यांच्या कार्यप्रणालीशी सलोखा साधणारे आणि एकात्म असतात. त्यांचा संबंध बेरोजगारी कमी करणे, अंर्तगत सुरक्षा वाढवणे, शांतता सलोखा राखणे, शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे, या उपयांशी निगडीत असतात. त्यामागे एकच समान सूत्र किंवा तत्त्व असते, ते म्हणजे ‘सर्वभूतहितरती’- सर्वांचे कल्याण. राज्यकर्त्यांकडून घेतले जाणारे सारे निर्णय केवळ या एकाच ध्येयासाठी असून ते सारे ‘सर्वभूतहितरती’ या ध्येयाशीच निगडीत आहेत, हे समर्थनीयरित्या दाखवून देता आले पाहिजे. त्याचे वेगळे तर्कशास्त्र निर्माण करावे लागते.
असे ‘निर्णयाचे तर्कशास्त्र’ रचणे-निर्माण करणे हे फक्त आणि फक्त लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या ‘नोकरशाही’चेच असते. ते सामान्य जनतेचे नसते. कारण त्यांना तेवढा वेळ नसतो आणि ती कुवतही नसते. म्हणूनच त्यांनी त्यांचे प्रतिनिधी निवडलेले असतात, नोकरशाहीचा असह्य भारही ते उचलत असतात.
स्त्रिया आणि लोकशाही
आता, इथे खासगी धंदे व त्यांची नोकरशाही तूर्तास विचारात न घेता केवळ लोकप्रतिनिधी आणि सरकारी नोकरशाही ही दोन क्षेत्रे विचारात घेऊ. आणि ती स्त्री-पुरुष दोघांनी मिळून बनलेली आहे.
लोकप्रतिनिधी म्हणजे सरपंच ते पंतप्रधान व राष्ट्रपती. आता, ह्याच्या स्वातंत्र्याबद्दल काय बोलावे. सरपंचपदाचा ‘लिलाव’ होतोपासून ..... काय उदाहरण मांडावे उमजत नाही! हे सारे ‘भ्रष्टाचारवान’ आहेत. या साऱ्यात गेल्या एक-दोन दशकात उच्चशिक्षित स्त्रिया आल्या आहेत, हेही वास्तव आहे. आणि ती अभिमानाची गोष्ट आहे.
पण राजकारणातील या स्त्रियांची तार्किक विचार करण्याच्या शक्तीचे स्वरूप काय? उत्तर दिसतच असते..
बरे, लोकशाहीचा दुसरा भाग नोकरशाही; ही पुरुषीव्यवस्था आहे, हे वास्तव मान्य केले तर नोकर स्त्रियांची कर्तव्ये ‘व्यावसायिक नीती’ला अनुसरून होतात का? भ्रष्टाचाराच्या बरबटीत पुरुषांबरोबर स्त्रियाही शेजारी बसलेल्या आहेत, हे चित्र तर आहेच ना? नोकरशाहीतील स्त्रिया (काही अतिशय सन्माननीय व आदरणीय अपवाद वगळता. या स्त्रियांविषयी मला खूपच आदर आहे. या स्त्रिया साहित्य, संगीत, काव्य, शास्त्र इत्यादीत रस घेणाऱ्या उत्तम दर्जाच्या संवेदनशील व्यक्ती आहेत. अशी माणसे ही ‘आकाशाचे खुंट’ असतात. आणि प्रत्येक क्षेत्रांत अशा काही आदरणीय स्त्रिया आणि पुरुष असतातच, हे आपले- लोकशाहीचे सद्भाग्य!) आपले स्वातंत्र्य ‘पणाला’ लावू शकत नाहीत, असेच आढळते. ‘ताडीच्या झाडाखाली बसून दूध प्यायला तरी लोक तुम्ही ताडीच प्यायलात’ असे म्हणणार यात शंका नाही. उदाहरणार्थ पाहा की, कोणत्याही कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यापासून मोठा साहेब (मोसा) आणि सर्वांत मोठा साहेब (समोसा) उर्फ मंत्री महोदय यांच्यापर्यंत ताडीचा दर्प येत असतो. उदाहरणार्थ, पुण्याच्या माजी पोलस आयुक्त रश्मी शुक्ला, नॅशनल स्टॉक एक्सेंजच्या माजी कार्यकारी अधिकारी चित्र रामकृष्ण ही दोन ठळक नावे पाहा. या केवळ सरकारी नोकरदार आहेत, त्या मुक्त स्त्रिया आहेत का?
हे सरकारी नोकरशाहीतील चित्र आहे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
आता, या सरकारी नोकरशाहीतील व राजकारणातील स्त्रियांचा अपवाद करू, त्यांना ‘स्वतःचे वस्तूकरण’ करून घेणे अनिवार्य आहे, असे मानू.
तिसरे क्षेत्र पाहू की, जिथे ‘केवळ आणि केवळ’ शिक्षित व उच्चशिक्षिततच स्त्रिया असतात. त्या इतक्या उच्चशिक्षित असतात की, इतरांना, साऱ्या समाजाला शिकवण्याची त्यांना कायदेशीर परवानगी मिळते! शिकून सवरून त्या संसार किंवा नोकरीच करत नसतात किंवा दोन्ही करून समाजाला हितोपदेश देण्याचे, विशेष कौशल्याधारित ज्ञान देण्याचे पवित्र धर्मकार्यही करत असतात.
शिक्षणक्षेत्रातील स्त्रिया या ‘मुक्त, विचारी, लोकहितवादी’ आहेत का? शिक्षक व प्राध्यापक ते कुलगुरू व्हाया प्राचार्यपदी विराजमान होतात. नेमणूक मिळवण्यापासून निवृत्त होईपर्यंत त्या जे काही करतात, ते त्यांच्या शिक्षणाला साजेसे आहे, याचे पुरावे देणे कठीण आहे.
‘स्त्रियांचे राजकारण’ हा जगातील अतिशय प्राचीन व गंभीर विषय आहे. क्लिओपात्रा ते कैकेयी, कुंती, गांधारी, द्रौपदीपासून ते आजच्या सरपंचताईपर्यंत काय आणि कसे वर्णन करावे त्या बाबत माणूस मूढावस्थेत सहज प्रवेश करतो. सत्तेच्या राजकारणातील स्त्रियांचे राजकारण आणि शिक्षण क्षेत्रातील स्त्रियांचे सत्तेसाठी केलेले राजकारण हा अतिशय कठीण विषय आहे. तो वेदान्तातील ‘अनिर्वचनीय’ (अवाक्!) संकल्पनेने करता येईल. नाहीतरी शंकराचार्यांनी ‘माया’साठी ‘अनिर्वचनीय’ आणि सदसदविलक्षण’ असा शब्द वापरला आहेच!
थोडक्यात, सत्तेचे राजकीय क्षेत्र, सरकारी नोकरशाही आणि सरकारी व निमसरकारी शिक्षणक्षेत्रात ही तीन क्षेत्रे अतिशय उच्चशिक्षित व प्रशिक्षित स्त्रियांनी केलेले नेतृत्व वाखाणण्याजोगे आहे, यात शंका नाही. पण त्यांच्या ‘मुक्त स्वतंत्र आणि लोकहितवादी’ असण्याविषयी आता प्रश्न निर्माण होतात, हा मुद्दा मी अधोरेखित करत आहे. कारण तिन्ही क्षेत्रे केवळ समाजहिताशी निगडीत आहेत. मूलतः पुरुषी शोषणव्यवस्थेत समाजहित फाफलले आहे, पण त्याचे नवे भागीदार स्त्रियांनी असणे आक्षेपार्ह आहे, असे मला म्हणायचे आहे. कारण स्त्रिया या मूलतः शोषित आहेत, याचे भान त्यांनी विसरणे आत्मघातकी आहे. पुरुषी शोषण व्यवस्थेत सहभाग देणे, हे अधिक जखडले जाणे आहे.
सरसकट साऱ्या स्त्रिया अशा असतात, असे मला म्हणायचे नाही, पण एकही स्त्री किंवा एकही उदाहरण तसे असेल ‘स्त्रिया मुक्त झाल्या आहेत’ या संपूर्ण सिद्धांताला बाधा येते.
दोन मुद्दे
शोषक बनलेल्या काही स्त्रियांच्या बाबतीत दोन मुद्दे उपस्थित होतात. पहिला संपूर्ण स्त्री स्वातंत्र्याचा आणि त्या स्वातंत्र्यातून उद्भवणाऱ्या आत्मशोधाचा ज्याचा प्रवास नैतिक सचोटीकडे जाणारा आहे. दुसरा जातीयवादाच्या प्रखर विरोधी लढ्यातील स्त्रीच्या सहभागाचा.
व्यक्ती म्हणून स्वातंत्र्य आहे, पण स्वातंत्र्याची रचना आत्मविकासाची सर्वागीण परिमाणे कवेत घेण्यासाठी झाला का? स्त्रिया ‘नैतिक व्यक्ती’ (moral person) म्हणून विकसित झाल्या का? सामाजिक नीतीच्या रचनेत त्यांनी कोणते नवे योगदान दिले? पुरुषीव्यवस्थेत ‘सुशिक्षित मुक्त, स्वतंत्र विचाराच्या स्त्री’चे स्वातंत्र्य पणाला लागते. स्त्रीला तिच्या पारंपरिक शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण इत्यादीने लाभणारे स्वातंत्र्य उपभोगण्याइतकी ती ‘मुक्त विचारांची’ स्त्री तयार झाली आहे का? स्त्रिया नकळत शोषक बनल्या आहेत की हेतूतः बनल्या आहेत? असे प्रश्न महत्त्वाचे आहेत.
संपूर्ण स्वातंत्र्य याचा अर्थ व्यक्ती जे काही काम करण्यास पात्र असते, ते काम पूर्ण क्षमतेने करणे. त्यात कोणतेही दबाव मान्य न करणे. ‘व्यावसायिक स्त्री’ या नात्याने मूलभूत शिक्षण अन व्यावसायिक शिक्षण यांचा उपयोग केवल समाजहितासाठी करणे.
ज्ञानाचा उपयोग योग्य तर्कशक्तीचा विकास यासाठी करायचा की डोकेबंदसाठी? मुळात ‘पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त भावनाशील असतात’, या विधानात स्त्रियांवर तर्काशी घटस्फोट घेतल्याचा आरोप होत असतो, तेच सिद्ध करायचे काय? या घटस्फोटाचे, तर्कबंदीचे कारण काय असेल? याचा शोध घेणे आवश्यक आहे. ‘माणूस भावनाशील आहे’ हे विधान बरोबर आहेच, पण ‘पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त भावनाशील असतात’ हे विधान चूक ठरवण्यात स्त्रियांनी, प्रस्तुत संदर्भात नोकरशाहीतील स्त्रियांनी किती प्रयत्न केले आहेत किंवा करत आहेत, याचा शोध घेणे आवश्यक आहे.
आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवून कोणतीही व्यक्ती राजकारणी, नोकरशहा किंवा शिक्षक बनू शकते. स्त्री त्याला अपवाद नाही. मला असे एक उदाहरण माहीत आहे की, एका कर्मचारी महिलेला लाच न घेण्याचा भयानक त्रास झाला. त्या महिलेच्या एका दिवसात नऊ बदल्या करण्यात आल्या. त्या सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ कारकून होत्या. त्या पाकिटे स्वीकारण्यास तयार नसल्याने बदली झाली. एका टोकापासून दुसऱ्या टोकाच्या ऑफिसात. तिथे त्यांना विचारण्यात आले की, काय निर्णय आहे? त्यांनी निर्णय सांगितला. मग पुन्हा त्यांची बदली केली, पुन्हा नव्या ऑफिसात तेच झाले. असे सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत नऊ वेळा बदली प्रकरण झाले. त्या महिलेने सारे आदेश गोळा केले आणि साहेबांना सांगितले की, ‘हे आदेश घेऊन मी वृत्तपत्रात जात आहे’. तत्काळ सारे साहेबलोक ‘शुद्धीवर’ आले. पण परिणामी महिलेची बढती, निवास इत्यादीत राजकारण झाले. पण तिने सारे सहन केले. तिचे वय आज ७५चे आहे. ते सारे आदेश तिची आयुष्यभर ढाल बनून राहिले. ती महिला केवळ १० उत्तीर्ण होती. उच्चशिक्षित नव्हती. ज्याला आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असते, शिक्षणाची लाज राखायची असते, त्या माणसाने ‘त्येन त्यक्तेन भुन्जीथा’चे धोरण स्वीकारले पाहिजे.
स्त्री स्वातंत्र्य आणि जातीनिर्मूलन
बऱ्याच प्रमाणात आज स्त्रिया वर्णजातीविरोधी आहेत, याचा अनुभव चळवळीत आणि विद्यापीठीय अभ्यासक्रमात दिसून येतो. जातीनिर्मूलनात स्त्रियांचा फार मोठे योगदान लाभू शकते. ते त्यांनी अपेक्षित प्रमाणात दिलेले नाही. ‘दिलेले नाही’ असे म्हणण्यात त्यांचे ‘स्व-तंत्र’, विचारी व शिक्षित असणे गृहीत धरले आहे. कोणतीही उच्चशिक्षित स्त्री जर ‘माझ्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत’ असे म्हणू पाहत असेल तर ती परतंत्र, गुलाम आहे असे होते. मग अशा स्त्रीला ‘महिला दिन साजरा करण्याचे नैतिक अधिकार राहत नाहीत.
जातविरोधी आंदोलन समाजातील सगळ्यांनी केलेले नाही, तसे होतही नाही. आधी ते दलितांनी केले. त्याची सुरुवात मुक्ता साळवे, म. फुले-सावित्रीबाई यांनी केली. हे ब्राह्मणेतर होते. त्यांना शोषणमुक्ती हवी होती, ती त्यांनी केली. पण आता व्यापक पातळीवर ब्राह्मण स्त्रियांनी वर्णजातीविरोधाचा लढा उभा केला पाहिजे. त्याचे बळ त्यांना उपनिषदांपासून मिळू शकते.
‘ब्राह्मण’ हा शब्द आध्यात्मिक, नैतिक व सामाजिक समता, बंधुत्व मानणाऱ्या पात्र-लायक ब्राह्मणांसाठी वापरला जातो. पात्र ब्राह्मण आजही आहेत समाजात, कमी आहेत, पण आहेत.
उपनिषदात चार महावाक्ये आहेत.
‘अहं ब्रह्मास्मि’ - ‘मी ब्रह्म आहे’ ( बृहदारण्यक उपनिषद १/४/१० - यजुर्वेद)
‘तत्त्वमसि’ - ‘तूही ब्रह्म आहेस’ ( छान्दोग्य उपनिषद ६/८/७- सामवेद )
‘अयम् आत्मा ब्रह्म’ - ‘हा आत्मा ब्रह्म आहे’( माण्डूक्य उपनिषद १/२ - अथर्ववेद )
“सर्वं खल्विदं ब्रह्मम्’ - ‘सर्व (म्हणजे विश्व) ब्रह्मचं आहे” ( छान्दोग्य उपनिषद ३/१४/१- सामवेद )
गेल्या काही शतकात पाचवे वाक्य ‘महावाक्य’ म्हणून स्वीकारले गेले. ते असे :
‘प्रज्ञानं ब्रह्म’ - ‘प्रज्ञानचं ब्रह्म आहे’ ( ऐतरेय उपनिषद १/२ - ऋग्वेद)
याचा अर्थ वरील मूळ चार वाक्ये समजून घेण्याची बुद्धी हीच ब्रह्म आहे. तिला ‘प्रज्ञा’ किंवा ‘ऋतंभरा प्रज्ञा’ म्हणतात.
आता, हा ब्रह्मवाद युक्तिवादासाठी मान्य केला, तर सनातनी ब्राह्मणांची महाचूक अधोरेखित होईल. ती अशी की, ‘ब्राह्मण’ संकल्पनेचा तात्त्विक अर्थ केवळ ‘अहं ब्रह्मास्मि’ असाच गृहीत धरून केवळ स्वतःकडे पाहिले. ते स्वतःला ब्राह्मण समजत राहिले.
दुसरे महावाक्य ‘तूही ब्रह्म आहेस’ आणि चौथे महावाक्य ‘सर्व (म्हणजे विश्व) ब्रह्मचं आहे’ सनातन ‘ब्राह्मण वर्णा’ ने हेतूतः दुर्लक्षित केले. परिणामी इतरांना शूद्र ठरवले, त्यांना ज्ञानबंदी केली.
आता, इथे इतर वर्णाचे पुरुष होतेच, त्यात साहजिकच स्त्रियाही होत्या. ते ‘इतर सारे’ शूद्र झालेच. पण ‘इतरांमध्ये’ सनातन्यांनी खुद्द ‘त्यांच्याही स्त्रिया’ आणल्या. म्हणजे ‘ब्राह्मण स्त्रिया’ आणल्या. आई, बहीण, मुलगी आणि सून, या मुख्य स्त्रिया आणि त्यांच्याद्वारे लाभणाऱ्या आजी मावशी, काकू, आत्त्या इत्यादी साऱ्याचा स्त्रिया शूद्र ठरवल्या. परिणामी ‘समस्त ब्राह्मण स्त्री’ शुद्रच ठरवली गेली.
हे तर्कशास्त्र प्रत्येक ब्राह्मण स्त्रीने नीटपणे समजून घेणे आवश्यक आहे.
म्हणूनच तिचा मुख्य शत्रू तिचे जातीयवादी आवडते बाबा, उपआवडता दादा, उपोपआवडता ‘आमचे हे’ उर्फ आजच्या भाषेतला ‘हा, तो’ इत्यादीच असतात. आणि ‘तो/हे’पासून आलेला ‘वंशाचा दिवटा’ हा नवा शत्रू असतो. हा दिवटा म्हणजे जातीयवादी असेल तर तो बापाची गादी चालवणारा भावी शत्रू- त्याच्या बायकोचा-मुलांचा... आणि त्याला समांतर उपदिवटा म्हणजे ‘अगदी मुलासारखा वाटणारा थोर वंशदाता ‘जावईबापू’! (दुर्दैवाने ही लागण सर्वच जातींना झाली आणि एक अतिशय टुकार तद्दन फालतू व नीच जातीय व्यवस्था तयार झाली)
अशा रीतीने स्त्री-रूपी अर्धी मानवजात मनुवादी ब्राह्मणांनी शूद्र ठरवली...
सर्व महावाक्ये नीटपणे मांडण्याची उच्च नैतिक जबाबदारी आदि शंकराचार्यांनी घेतली आणि त्यांनी अद्वैत तत्त्वज्ञान मांडले. त्यांनाही आधी ‘अहं’ची लागण झालीच होती. पण एका चांडाळाने त्यांना त्यांना ‘सर्वच ब्रह्मन्’ असेल तर शूद्र ब्रह्म का नाही? असा साधा प्रश्न विचारल्यावर त्यांना स्वतःची चूक उमजली. पण ज्यांचे वर्णन अप्पलपोटी सनातनी ब्राह्मण असे करता येईल, त्या सनातनी ब्राह्मणांनी शंकराचार्यांनाही वाळीत टाकले!
शंकराचार्यांच्या आधीपासूनच दुसऱ्या शतकपासूनच हे असे ‘ब्राम्हण’ (‘म्हशी’तील ‘म्ह’ वान ‘ब्राम्हण’) अस्तित्वात आहेत. त्यांनी आर्यभट, ब्रह्मगुप्त आणि वराहमिहीर यांनाही असेच छळले.
नंतर ज्ञानेश्वर, तुकोबा, चोखोबा, मग गांधी ते गौरी लंकेशपर्यंत थेट खूनच केले...
याचा अर्थच असा की, हजारो वर्षे लोटूनही ब्राह्मण वर्ण व जातीचा प्रवास इतर चार महावाक्यांकडे अजूनही झालेला नाही. ते ‘अहं बामनाअस्मि’मध्येच कैद होऊन पडले आहेत. ते एका अर्थाने प्लेटोच्या गुहेतील ‘अज्ञानाच्या साखळदंडा’ने बांधल्यासारखे आहेत.
मानवतेचे शत्रू
प्लेटो अशांना मानवतेचे शत्रू म्हणतो. ही माणसे तर्काला, सुसंगत विचार करण्याला महत्त्व देत नसतात. प्लेटोच्या मते, समाजात ‘ज्ञानाचे प्रेमी’ जसे असतात, तसे समाजात ‘ज्ञानाचे द्वेष्टे’ किंवा ‘ज्ञानशत्रू’ लोक असतात. ज्ञानमित्र आणि ज्ञानशत्रू ही केवळ पुरुषांचीच विभागणी आहे, असे नाही, तर स्त्रियांचेही ‘ज्ञानमित्र’ आणि ‘ज्ञानशत्रू’ असे प्रकार असतात, असे तो निदर्शनास आणून देतो. ज्या स्त्रिया विचारच करत नाहीत त्या ‘ज्ञानशत्रू’ स्त्रिया. प्लेटो स्त्री-पुरुषांची तुलना करताना व स्त्रियांचे समाजातील स्थान स्पष्ट करताना त्यांचे ‘तत्त्वज्ञानाचे प्रेमिक’ किंवा ज्ञानप्रेमी ‘तत्त्ववेत्त्या स्त्रिया’ आणि आणि ज्ञानद्वेष्ट्या ‘तत्त्वज्ञानाच्या शत्रूस्त्रिया’ असा उल्लेख करतो (Republic V 456a).
तार्किक दुष्टपणा (Misology)
‘माणसाचा सर्वांत धोकादायक शत्रू कोण, त्याच्यापासून का व कसे सावध राहावे’, याचा उपदेश करताना सॉक्रेटीस ‘तार्किक दुष्टपणा’ (Misology) हाच माणसाचा ‘शत्रू’ आहे, हे स्पष्ट करतो. तो म्हणतो, “मित्रहो, एक भीती आपल्याला टाळली पाहिजे, ती टाळली नाहीतर आपण ‘तर्काचे शत्रू’ (misologists) होऊ. माणसाचे जितके वाईट होण्याची शक्यता आहे, त्यात तर्काचे शत्रू होण्याइतके सर्वाधिक वाईट काहीच नाही. कारण समाजात जसे ‘माणसांचे तिरस्कर्ते-शत्रू’ (misanthropist) असतात तसे वैचारिक कल्पनांचे किंवा विचारांचे शत्रू (misologists) देखील असतात. आणि या दोघांचा उगम एकाच कारणापासून होतो, ते कारण जगाविषयीचे अज्ञान हेच आहे !”
आत्मपरीक्षण न करणारी माणसे हीच शत्रू
ही अशी एकांगी विचार करणारी, स्वतःचेच खरे समजणारी, आत्मपरीक्षण न करणारी, इतरांविषयी गैरसमज करून घेणारी आणि म्हणून त्यांचा तिरस्कार करणारी माणसे हीच ‘माणसांचे तिरस्कर्ते', विचारांचे शत्रू, तर्काचे शत्रू आणि तत्त्वज्ञानाचे शत्रू’ असतात, असे सॉक्रेटीस म्हणतो.
तर्कविरोध आणि मानवविरोध
सॉक्रेटीसच्या मते एखाद्याचा लोकांवरील वर्तनातील चांगुलपणावर विश्वास असेल, तर तो सर्वच लोक मुळातून सचोटीने वागणारे आणि प्रमाणिक आहेत, असे समजतो. पण एखाद्याने जरी फसवले तरी तो सर्वांचा तिरस्कार करू लागतो. म्हणजे वर्तनातील चांगुलपणाचे जसे सार्विकीकरण होते, तसे दुष्टपणाचेही सार्विकीकरण होते. अगदी असेच तर्काच्या व विचाराच्या बाबतीतही घडते. एखादा माणूस तर्कावर योग्य युक्त व सत्य न्याय देणारे बौद्धिक साधन म्हणून विश्वास ठेवतो, पण कालांतराने त्याच्या लक्षात येते की, हे तर्क वेगवेगळ्या स्वार्थी कारणांसाठी वापरले जाते, तेव्हा तो माणूस तर्काचा तिरस्कार करू लागतो. विशेषतः मित्र असे करतात, तेंव्हा सारेच भावविश्व उध्वस्त होते! मग सारीच बुद्धिमान माणसे तर्काचा, तर्कशक्तीचा, आणि तत्त्वज्ञानाचा, तात्त्विक चिंतनाचा असा दुरुपयोग करतात, असे त्याला वाटू लागते. तेच त्याचे ‘ज्ञान’ बनते. मग असा माणूस त्या केवळ एखाद्या-दुसऱ्या दुरुपयोग करणाऱ्या माणसाचा शत्रू होता होता साऱ्या मानवजातीचाच शत्रू होतो! कालांतराने त्याचे स्वतःचे विपरीत तर्कशास्त्र व तत्त्वज्ञान तयार होते. तो ‘आपल्या त्या तर्कशास्त्रावर व तत्त्वज्ञानावरच श्रद्धा ठेवतो, मग तेच तर्कशास्त्र व तत्त्वज्ञान त्याच्या सोबतच्या इतरांना शिकवतो. हे तर्कशास्त्र बुद्धीच्या नव्हे, तर भावनेच्या अंकित होते. तर्कविरोध आणि मानवविरोध अशा रीतीने एकत्रच जन्माला येतात.
अतार्किकता हा आत्म्याचा रोग
प्लेटोच्या मते, अंध मत, विश्वास यांनाच सत्य मानणे आणि तर्क खरा न मानणे (युक्तिवाद अथवा चर्चा करण्यात सत्य नसते, अशी श्रद्धा बाळगणे) हा तर्काचा तिरस्कार आहे. अतार्किकता हा मानसिक आजार असून तो आत्म्याला होणारा रोग आहे. हा रोग अत्यंत निकडीचा, इमर्जन्सीने दुरुस्त केला पाहिजे. हा रोग झाला की, लोकांना बोलण्यात, चर्चा करण्यात आत्मविश्वास वाटत नाही. काही काळाने त्यांना या रोगाची सवय होते, मग ते अज्ञानाच्या गुहेतील अंधारे आयुष्य जगू लागतात. शरीर आणि त्याच्या इछाच खऱ्या समजून ते जणू काही धूसर गोंधळल्या अवस्थेत जन्मभर राहतात. असा आत्मा रोगट बनतो. अतार्किकता हा आत्म्याचा रोग होतो. मग तो केवळ आत्मनाश करतो.
बुद्धिमान माणसांची विशेष जबाबदारी
प्लेटोच्या या संकल्पनेतून दोन गोष्टी आढळतात, असे आज आपण म्हणू शकतो. पहिली गोष्ट अशी की, ‘माणूस बुद्धिमान प्राणी आहे’. पण दुसरी गोष्ट अशी की, समाजात सर्वच माणसे बुद्धिमान नसतात; काही माणसे बुद्धिमान असतात तर बरीच माणसे साधी, भाबडी असतात.
‘ज्ञानाचे प्रेमिक’च्या विरुद्ध ‘अज्ञानाचे प्रेमिक’ असे कधी नसते, हे खरे. पण ज्यांना हुशार बुद्धिमान व्यक्ती म्हणून ओळखले जाते त्यांनी बुद्धीचा गैरउपयोग केला की, ते ‘अज्ञानाचे प्रेमिक’ बनतात. सॉक्रेटिसच्या मते प्रज्ञानाला विरोध होतो, तो केवळ बुद्धिमत्तेकडून. तर्कबुद्धीला नीतीचा आधार नसेल, तर बुद्धिमान तर्कज्ञ हाच समाजाला धोका असतो. तर्कबुद्धी विघातक कामासाठी वापरली की, ती आत्म्याचा नाश करतेच पण समस्त मानवजातीचाही नाश करते. बुद्धिमान लोकांच्या स्वार्थामुळे साध्या सरळ माणसाचा आधी बुद्धीवरील, मग तर्कावरील विश्वास उडतो आणि नंतर खुद्द बुद्धिमान माणसावरील विश्वास लयास जातो. मग ‘सारी माणसे अशीच स्वार्थी असतात’, असे साध्या सरळ सामान्य माणसाचा विश्वास जणू ‘पक्के ज्ञान’ बनते. पुढे जाऊन ती श्रद्धाच होते. हा भाबडा माणूस मग कशावरही विश्वास ठेवू लागतो. तो हळूहळू मानवता विरोधी बनतो.
सामान्य माणसाची अशी शोकांतिका म्हणजे समाजाची शोकांतिका होते. असे घडू नये, यासाठी बुद्धिमान माणसाने किंवा ज्ञानी माणसाने बुद्धिमान असण्याबरोबर सद्गुणी असणेही अनिवार्य असते. बुद्धिमान पण दुर्गुणी माणसे, सॉक्रेटीसच्या मते खरी ज्ञानी नसतातच, ती केवळ ‘मिथ्या ज्ञानी’ असतात. तत्त्वचिंतनाचे, समाजाचे हेच शत्रू असतात.
प्लेटोच्या म्हणण्यानुसार या बुद्धिमान माणसांवर नैतिक वागण्याची विशेष सामाजिक जबाबदारी असते. कारण असा बुद्धिमान, ज्ञानी माणूस जेव्हा साध्या भाबड्या माणसाला फसवतो, तेव्हा त्या भाबड्या माणसाचा माणुसकीवरील विश्वास संपतोच पण त्या दुष्ट अनुभवातून त्या भाबड्या माणसाचे स्वतःचे स्व-तंत्र तर्कदुष्ट तर्कशास्त्र बनते. ते दुष्ट मानसिकता निर्माण करते. ते तर्कदुष्ट तर्कशास्त्र निर्घृण भयकारी हिंसक होण्याचा धोका संभवतो. असा माणूस मग सत्ताधीश झाला की, साऱ्या मानवजातीलाच धोक्यात आणू शकतो. लोकशाहीत असे घडू शकते.
तर्काचे शत्रुत्व - भारतीय दृष्टीकोन
भारतीय परंपरेत ‘तर्काचे शत्रू’ अशी संकल्पना नाही; उलट पण त्याच्या पुढे जाऊन उलट ‘तर्क हाच शत्रू’ मानला गेला. भारतीय समाजव्यवस्था मूलतः पक्षपाती आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही वर्णव्यवस्था आणि हजारो जातींमध्ये विभागली गेलेले समाजगट आणि स्त्री-पुरुष लिंगभेद व्यवस्थेमुळे समाजातील प्रचंड मोठा हिस्सा असलेले लोक विचारशक्तीच हरवून बसले.
‘महाभारता’त एक प्रसंग आहे. तो यक्ष आणि धर्मराज यांच्यातील संवाद आहे (महाभारत वनपर्व यक्षप्रश्न ३१४.११९) यक्ष धर्मराजाला प्रश्न विचारतो की, ‘कोणता मार्ग धर्ममार्ग आहे?’ (का पंथ:?) धर्मराज उत्तर देतो, -
तर्कः अप्रतिष्ठः श्रुतयः विभिन्नाः ।
न एकः मुनिः यस्य मतं प्रमाणम् ।
धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम् ।
महा-जनः येन गतः सः पन्थाः ॥
अर्थ : “तर्काला प्रतिष्ठा नाही, मजबूत पाया नाही. श्रुती (वेद) त्याचा अर्थ वेगळे वेगळे सांगत आहेत, स्मृतीही वेगवेगळा अर्थ लावत आहेत. जगात असा एकही मुनी (ऋषी) पृथ्वीवर नाही की, ज्याचे वचन प्रमाण मानले जाते, ज्याची शिकवण सर्वमान्य आहे. धर्माचे गूढ गुहेत लपल्यासारखे आहे. अशा स्थितीत महाजन म्हणजे मोठी माणसे, आदरणीय व्यक्ती ज्या मार्गाने गेल्या तो मार्ग चोखाळावा. (तोच धर्ममार्ग आहे.)”
आता, तर्क अप्रतिष्ठित का? कारण, हिंदूंच्या मते, मानवी जीवनाचे ध्येय मोक्ष आहे आणि त्यात तर्क अडथळा आणतो. ऋषिमुनी मात्र तर्काच्या, बुद्धीच्या पलीकडे जाऊन, ज्ञान-अज्ञानाच्या पलीकडे जाऊन मोक्ष मिळवतात. त्यात बुद्धी, तर्क अडचण ठरते. म्हणून तर्काला प्रतिष्ठा नसते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
.................................................................................................................................................................
आणि कोणत्याही भारतीय स्त्रीला मोक्षाचा अधिकार हिंदूधर्म देत नाही. इतरही कोणताही धर्म देत नाही. त्यात ब्राह्मण स्त्रियाही आल्याच. म्हणून वर्णजातीला विरोध करण्याइतपत मुक्त असणे, स्वतंत्र असणे हाच स्त्रीस्वातंत्र्याचा अस्सल अर्थ मानला पाहिजे.
खरी स्त्री-मुक्ती
तेव्हा भारतीय समाजातील अज्ञानी, अडाणी, दरिद्री, शोषित, वंचित स्त्रिया जाऊ द्या, पण सुशिक्षित, उच्च-सुशिक्षित स्त्रियांची भूमिका आता निश्चित होणे, हाच त्यांच्या मुक्तीचा मार्ग ठरणार आहे. लोकहित साधणारे लोकप्रतिनिधी, सरकारी नोकरशाहीतील स्त्रिया आणि शिक्षण क्षेत्रातील समग्र स्त्रियांनी ज्ञान, तर्क आणि नीती यांचा आदर करणे आवश्यक आहे. एकही स्त्रीने अपवाद होणे समग्र स्त्री-मुक्तीला धोकादायक आहे. समाजहितासाठी कोणतेही शिक्षण घेतलेल्या कोणत्याही जातीधर्माच्या स्त्री पुढील हे आवाहन आणि आव्हान आहे. त्यात त्यांना समानधर्मी पुरुषांची साथ नक्कीच मिळेल, यात शंका कसली?!
आणि शत्रू बाहेर नाही, घरात, शेजारी, देशातच आहे. त्याला सहयोगी करून घेणे आवश्यक आहे. ते कदाचित बेरजेचे राजकारण होईल. त्यासही तार्किक विचार जरूर करणे, नितांत गरजेचे आहे.
कोणत्याही शिक्षित स्त्रीपुढील आव्हान
आता, हे सारे विश्लेषण केवळ लोकप्रतिनिधी, सरकारी नोकरशाहीतील स्त्रिया आणि शिक्षण क्षेत्रातील समग्र स्त्रियांपुरते नाही. हे शिकलेल्या कोणत्याही स्त्रीपुढील आव्हान आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा, व्यवस्थापन, पत्रकारिता, इत्यादी प्रत्येक स्त्रीसाठी आहे. वैद्य तर देवदूत, देवच असतो. देवाने भक्ताला कधीच फसवायचे नसते. कायदा हा न्यायासाठी असतो. पत्रकारिता केवळ ‘समाजहिता’साठीच असते.
सर्व प्रकारच्या शोषणातून मुक्त झाल्याशिवाय अस्सल अर्थाने स्त्री-मुक्ती साध्य होणार नाही, असे वाटते.
.................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास हेमाडे तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक, व्यावसायिक तत्त्ववेत्ते आणि सामाजिक विश्लेषक आहेत.
shriniwas.sh@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment