स्त्रीत्वाचा अंदाज घेता येतो. स्त्रीत्व दूर असेल तर समजूनही घेता येते. सेलिब्रेटसुद्धा करता येते, पण हेच स्त्रीत्व आयुष्यात आले की, हरप्रकारचे गोंधळ सुरू होतात
पडघम - महिला दिन विशेष
श्रीनिवास जोशी
  • कविवर्य बा. भ. बोरकर आणि त्यांच्या ‘आनंदभैरवी’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Tue , 08 March 2022
  • पडघम महिला दिन विशेष जागतिक महिला दिन International Women's Day बा. भ. बोरकर Balakrishna Bhagwant Borkar आनंदभैरवी AanandBhairavi जीवनसंगीत Jeevansangeet

इयत्ता नववीमध्ये असताना माझ्या डोक्यात एक विचार आला. शालेय पुस्तकात अर्धे गद्य आणि अर्ध्या कविता असतात. संपूर्ण कविता असलेले पुस्तक असते का? मी सोलापूरच्या ‘सरस्वती बुक डेपो’मध्ये जाऊन तसे विचारले. विक्रेत्याने मला माळ्यावरून जुनाट पुस्तकांचा सुतळीने बांधलेला एक गठ्ठा मला काढून दिला. त्यात बा. भ. बोरकरांचे ‘आनंदभैरवी’ हे पुस्तक होते. किंमत होती तीन रुपये. मी ते पुस्तक घेतले आणि घरी आलो. पुस्तकात संपूर्ण कविताच. धडे नाहीतच. मला फार मजा वाटत होती.

सहज चाळताना एक कविता उघडली गेली. ती कविता वाचून मी बेहोश झालो.

मुलींच्या डोळ्यांवरची कविता! मला नुकतेच प्रेम वगैरे कळू लागले होते. मुलींचे खरे सौंदर्य हे त्यांच्या डोळ्यातच असते, हे कुठेतरी वाचलेले वाक्य मला पटले होते. कविता हा फक्त उत्तरे देऊन मार्क मिळवायचा प्रकार नसून, थेट आयुष्याशी निगडित असा प्रकार आहे, याचा मला या कवितेमुळे कळत-नकळत साक्षात्कार झाला!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

मला बेहोश करणारी ती कविता होती -

डोळे तुझे बदामी

डोळे तुझे बदामी देती मला सलामी

त्यानेच हा असा मी झालो गडे निकामी

लागे न चित्त धामीं लागे न चित्त कामीं

मोठे लबाड लुच्चे डोळे तुझे बदामी

जख्मी करून जीवा हसती वरून नामी

भरितात मीठ ऐसें डोळे तुझे बदामी

बोली मिठास त्यांची कावा तरी गनीमी

भुलवून मारणारे डोळे तुझे बदामी

होती क्षणांत भोळे होती क्षणी वहीमी

छळती परोपरींनी डोळे तुझे बदामी

जरि हाल चालती हे दे नित्य ही गुलामी

सुल्तान मोंगली हे डोळे तुझे बदामी

मी धुंद मोर कामी फुलवून रोमरोमीं

हे नाटकी इमानी डोळे तुझे बदामी

बोरकरांची १९४७ सालची ही कविता, त्यांच्या ‘आनंदभैरवी’ या १९५० सालच्या कविता संग्रहातली. एखाद्या मुलीच्या प्रेमामुळे टोटली निकामी होण्याची आयडिया मला खूप आवडली. अभ्यास वगैरे अजिबात करायचा नाही. टोटली गॉन केस व्हायचे. मनात फक्त ती आणि ती आणि तीच!

नववीत असताना वर्गातली एक मुलगी माझ्याकडे बघत असे, कारण मीसुद्धा तिच्याकडे बघत असे! अभ्यास वगैरे करताना मला पुस्तकांच्या पानामध्ये तीच दिसायची. प्रेमामुळे काय होते, हे बोरकरांनी अगदी बरोबर लिहिले होते - ‘लागे न चित्त धामी लागे ना चित्त कामी!’ मला ही ओळ तंतोतंत पटली! बोरकरांनी पुढे लिहिले होते - ‘बोली मिठास त्यांची कावा तरी गनिमी!’

अगदी बरोबर! ही मुलगी माझ्याकडे बघत होती. पण तिला माझ्यात इंटरेस्ट आहे, याची कसलीही कबुली नाही! वर्गाच्या बाहेर दिसली की, तिच्या डोळ्यात ओळख वगैरे अजिबात दिसत नसे! गनिमी कावा! बोरकरांनी बरोबर लिहिले होते!

ती असे करत होती, तरी माझी अजिबात तक्रार नव्हती. ती आपल्याकडे बघत असूनसुद्धा आपल्याला ओळख दाखवत नाही, याचा मला अर्थातच त्रास होत असे. पण म्हणून तक्रार काही नव्हती. ती आपल्याकडे वर्गात बसल्या बसल्या का होईना पाहाते आहे, यात मी खुश होतो! एक प्रकारची गुलामी मी स्वीकारली होती तिच्या डोळ्यांची! बोरकरांनी बरोबर लिहिले होते -

जरि हाल चालती हे दे नित्य ही गुलामी

सुल्तान मोंगली हे डोळे तुझे बदामी

परवा मला या लेखाचा विचार करताना तिचे डोळे आठवले आणि वाटले; हो बरोबर, तिच्या सौंदर्याच्या सिंहासनावर बसून तिचे ते सुलतानी डोळे माझ्यावर एखाद्या दुष्ट सुलतानासारखी सुलतानी करत होते. मला गुलाम करून टाकले होते त्यांनी!

माझ्या हृदयात जे जे घडत होते, ते सारे या कवितेने मला उलगडून दाखवले होते. अभ्यास वगैरे सोडून आपण हे काय करत आहोत, असा गिल्ट माझ्या मनात तयार होत होता. या कवितेने तो घालवला. प्रेम ही अनावर गोष्ट जरी असली तरी ती गिल्टी वाटून घ्यायची गोष्ट नाही, असे या कवितेने मला सांगितले. आपले आणि अर्थात तिचेही प्रेम ही सेलिब्रेट करायची गोष्ट आहे, हा आधार या कवितेने मला दिला!

या कवितेमुळे मी कवितांच्या प्रेमात पडलो. या एका कवितेनं मला कवितांचा नाद मला लावला. मी खूप कविता वाचू लागलो. बोरकर, कुसुमाग्रज, बापट, माडगूळकर, पाडगावकर, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे हे सगळे माझे आवडते कवी झाले. मी हाताला पैसे लागले की, पुस्तके आणू लागलो. वाढदिवसाला काय पाहिजे असे आईने विचारले की मी - ‘पुस्तकांसाठी पैसे’ असे म्हणू लागलो. लवकरच मला खूपसे कवी त्यांच्या शैलीसह ओळखीचे झाले. कवितेच्या दोन-चार ओळी जरी वाचनात आल्या तरी केवळ शैलीवरून तो कवी मी ओळखू लागलो.

‘डोळे तुझे बदामी’नंतर मला ‘आनंदभैरवी’ या काव्यसंग्रहातली ‘माझी बेगम’ ही कविता आवडली. खट्याळ शृंगार करणाऱ्या प्रेयसीचे चित्र बोरकरांनी या कवितेत रंगवले आहे. ते चित्र, माझ्या स्त्री-सौंदर्याच्या दर्शनाने नुकत्याच धडधडू लागलेल्या हृदयावर एक घाव घालून गेले. ही कविता बोरकरांनी लिहिली तेव्हा ते ३९ वर्षांचे होते. त्यांना स्त्रीत्व चांगलेच ठाऊक होते. मी ही कविता वाचली, तेव्हा मी १४ वर्षांचा होतो. त्यामुळे या कवितेचा मला नीटसा अंदाज यायला पुढची पाच-सात वर्षे जावी लागली. पण, लहान असलो तरी या कवितेवर मी पहिल्याच वाचनात खुश झालो होतो! 

माझी बेगम

माझी बेगम आली - प्यारी - माझी बेगम आली

मस्त मोंगली विलास सगळे उधळित ही भंवताली

डोळ्यांतुनी वाळ्याचे अत्तर हासत हासत जाळी

केश रेशमी, गाल मख्मली, आधरिं शराबी लाली

वचनी बुलबुल, गायनिं कोकिळ, कवनी पिक कुरवाळी

न्हाली ही शृंगाररसाने प्रतिभालंकृति ल्याली

सुमधुर स्वप्ने, दिव्य भविष्यें फुलवित गालीं, भाली

श्वासें जाळी धूप, कटाक्षे उरांत खंजिर घाली

आणि तत्क्षणीं घाव चुंबुनी होई रंगरसेली

हासत नाचत ये चंदेरी माझी गझल-कवाली

अन् रक्ताची मैफल उडवी हृदयीं रंग महालीं.

विलासी आणि प्रियकरावर मुक्तपणे आशिकी करणारे हे स्त्री-रूप पाहून मी गार झालो! आमच्या वर्गात मुली होत्या. पण वर्गातील मुले आणि मुली त्या काळी बोलत नसत. वर्गातील एक मुलगी माझ्या शेजारी राहायला होती. आम्ही शाळेबाहेर बोलत असू, पण शाळेत नाही.

मला मुलींशी बोलायचे असायचे. पण कसे बोलायचे? काय बोलायचे? मुलींशी आपण मोठे झाल्यावरच बोलायचे असते का? असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात फिरत असत. अशा कुचंबलेल्या वातावरणात बोरकरांची ही बेगम मस्त मोगली विलास उधळीत आली! मी मनात म्हणालो - ‘च्यायला हा प्रकार मस्त आहे!’

पुढे अकरावीमध्ये मुली मुलांशी बोलू लागल्या, त्यांच्याकडे बघून हसू लागल्या. त्या हसल्या की, मनामध्ये आनंदाची एक झुळुक गेल्यासारखे वाटे. मी मनात म्हणालो, ‘हेच ते वाळ्याचे अत्तर जाळले जाणे!’ अत्तर जाळल्यावर तो सुगंधी धूर दरवळत राहतो, तशी यांची ही हसरी नजर मनात दरवळत राहते. त्यामुळे हृदय धडधडू लागते. हृदयाचे धडधडणे म्हणजेच हृदयात उडणारी रक्ताची मैफल!

ओठांवरची लाली शराबी कशी असते, हे कळायला अनुभवाच्या अनेक पायऱ्या चढून जायला लागले. तीच गोष्ट बेगमेच्या श्वासातल्या जळणाऱ्या धुपाची! तेवढी जवळीक मी विद्यापीठात गेलो, तेव्हा शक्य झाली. त्या क्षणीही बोरकरांची ही कविता बरोबर होती.

मला अजून एक गोष्ट भिडली. ‘माझी गझल कवाली’ ही शब्दमाला. स्त्री हे काव्य आहे, हे मला जाणवून गेले. स्त्रीचे सौंदर्य लौकिक असले तरी तिची मोहिनी, तिचा चार्म अलौकिक असतो. तिच्या सौंदर्यामध्येसुद्धा काहीतरी अलौकिक असतेच म्हणा! स्त्री ही तिच्या प्रियकराची कविता असते, गझल असते, कवाली असते. कविता ही शब्दांमधली जादू असते, स्त्रीची मोहिनी ही या जड जगातली जादू असते. मी बोरकरांवर बेहद्द खुश होत गेलो!

या जगात स्त्रीचा अपमान होताना मी लहानपणापासून पाहात आलो होतो. इथे बोरकरांनी स्त्रीला तिच्या स्थानावर प्रतिष्ठापित केले होते. मला जाणवणाऱ्या स्त्री रूपातील अलौकिकत्वाला भाषा दिली होती.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

मी थोडा मोठा झाल्यावर हळूहळू मला ‘माझी बेगम’मधील प्रतिभा आलंकृतीचा संदर्भ कळत गेला. शृंगार रसात नाहून प्रतिभेचे अलंकार धारण करणारी ती! हसरी, खट्याळ, मोहक, अलौकिक, शृंगार रसात नाहलेली अशी बुद्धिमान स्त्री! सुंदर भावनांनी अनावर झालेली बुद्धिमान स्त्री!

बोरकर स्त्रीला फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवत आहेत, असे मला त्या काळात वाटत राहिले. तिच्या शरीरातील रूपापेक्षा तिला ते फार उंच घेऊन गेले आहेत, असे मला वाटत राहिले. स्त्रीचे शरीर म्हणजे फक्त स्त्री नव्हे. ते केवळ हिमनगाचे टोक असते. खरे स्त्रीत्व तिच्या शरीराच्या पलीकडेच असते, हे भान मला हळूहळू येत गेले.

बोरकर, कुसुमाग्रज, बापट, पाडगावकर आणि पु. शि. रेगे यांनी स्त्रीत्व सेलिब्रेट केलेले आहे. या कवींमुळे स्त्रीत्वाचे सेलिब्रेशन हा माझ्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनून गेला.

माझ्या मनातील स्त्री-प्रतिमा या कवितेने घडवली. या कवितेनंतर आयुष्यात मी कुठल्याही स्त्रीला कधीही नुसत्या शरीराच्या करन्सीमध्ये मोजू शकलो नाही. शरीरापलीकडच्या स्त्रीचा मी शोध घेत राहिलो. यामुळेच मला आयुष्यात खूप जिवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्या.

स्त्रीचे शरीर ही केवळ एक वीणा आहे. स्त्रीचे मन हे त्या वीणेवर वाजणारे संगीत आहे, हे भान मला या कवितेने दिले. त्यामुळे पुढे आयुष्यात स्त्रीला समजून घेणे मला अवघड गेले नाही. बोरकरांच्या कवितेने जो पाया घातला, त्या भरणीवर मला मीरा आणि राधा समजून घेता आल्या. शेक्सपियरची दुःखी ऑफिलिया आणि आनंदी रोझलिंड समजून घेता आली. टॉलस्टॉयची आनंदी आयुष्य जगणारी किटी शरबाटस्की आणि त्याची आत्महत्या करणारी अ‍ॅना कॅरेनीना समजून घेता आली. डोस्टोव्हस्कीची बेफाम आयुष्य जगणारी ग्रुशेन्का समजून घेता आली. पण काय करावे, स्त्री हे एक मोठे गूढ आहे. इतका सर्व विचार केला तरी माझ्याबरोबर आयुष्य जगलेल्या कुठल्याही स्त्रीला मला समजून घेता आले नाही. तिथे ना बोरकर कामाला आले, ना त्यांची कविता! जनरल स्त्रीत्वाचा अंदाज घेता येतो. स्त्रीत्व दूर असेल तर समजूनही घेता येते. सेलिब्रेटसुद्धा करता येते. पण हेच स्त्रीत्व प्रेयसी म्हणून, बायको म्हणून किंवा मैत्रीण म्हणून आयुष्यात आले की, हरप्रकारचे गोंधळ सुरू होतात.

मायकेल होल्डिंग वगैरे फास्ट बोलर लोकांच्या बॉल स्विंग होताना टीव्हीवर मॅच बघताना आपल्याला दिसतात. पण, आपण तिथे बॅटिंग करायला गेलो की, हे स्विंग होताना दिसत नाहीत; तसेच काहीसे हे सारे आहे. फास्ट बोलरचे बॉल फेस करणे आणि एखाद्या व्यक्तिमत्त्व असलेल्या स्त्रीला फेस करणे अगदी सारखे असते. विकेट पडत राहतात! असो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

स्त्री ही मुख्यत्वेकरून तिच्या शरीराच्या पलीकडेच असते, हे कळणाऱ्या लोकांना स्त्रीत्व हे एन्जॉय करण्यासाठी कसे आहे, हे नेमके समजते. ज्यांना थोर साहित्यकारांनी स्त्री कशी रेखाटली आहे, याचे भान असते, त्यांना स्त्रीत्व सेलिब्रेट कसे करायचे, हे अगदी नेमकेपणाने समजते. पण सामोरी आलेली स्त्री कुणाला समजते का? साक्षात फ्रॉइडला जे कळले नाही, ते इतरेजनांना कसे कळावे?

पुढे मग मला बोरकरांचा ‘जीवनसंगीत’ हा काव्यसंग्रह मिळाला. त्यातल्या ‘येई सखी’ या कवितेने स्त्रीबद्दलचा एक नवा विषय माझ्या मनात घातला.

येइं सखी

येइं सखी हसतमुखी हळूहळू वर जाऊं

अणुअणुंनी पार्थिवता गाळित जग पाहू.

 

नील गहन शांत गगन

विरल त्यांत चंद्रकिरण

जणुं अथांग आर्द्र नयन

ही शराब प्राशुनि बेफाम धुंद होऊं.

 

पर्णांचे मृदु कंपन

लहरींचे आंदोलन

कलिकांचे तरल श्वसन

नसनसांत खेळवीत विकलगात्र होऊं.

 

शीतलतेचे अंजन

वायूचे रूप धरुन

स्फूर्तीचे पंख करुन

या अनंत विस्तारी रंगुनी तरंगूं.

 

शीतल करू चंद्रासन

या अथांग यमुनेंतून

संगम-उत्सव करुन

कणकणांत हिम भरीत शांतकाय होऊं.

स्त्री-पुरुषांचे प्रेम आणि निसर्गातील सौंदर्य हे एकमेकांशी संलग्न विषय आहेत, हे मला या कवितेत कळले. पानांची कंपने, लाटांची आंदोलने आणि कळ्यांची श्वसने हे सगळे सौंदर्य आणि प्रेमभावनेतील सौंदर्य यात कुठले तरी भारीतले नाते आहे, हे माझ्या लक्षात आले. विकलगात्र होऊ म्हणजे काय, हे मला अजिबात कळले नाही. सोलापुरात कुणाला हे विचारायला मी गेलो नाही, ही एक चांगली गोष्ट मी केली. नाहीतर माझे काव्यवाचन तेव्हाच बंद पडले असते!

आपल्या आवडत्या मुलीबरोबर चंद्रासनावर म्हणजे चंद्राच्या असनावर बसायची आयडिया फारच मोहक होती. मला फार आवडली. पण या चंद्रासनाचा एक मिश्किल संदर्भ रतिक्रीडेशीसुद्धा आहे, हे मला उशीरा कळले. येथे चंद्रासन हे पद्मासन वगैरे आसनाच्या अर्थाने घ्यायचे आहे. खालच्या ओळीत आपण ‘संगम-उत्सव’ करू असे म्हणून बोरकरांनी चंद्रासनाचा अर्थ स्पष्ट केला आहे. पण मला तो कसा कळावा? अनुभवहीनाला साहित्यातील गहनता कशी कळावी? पुढे पंचविसाव्या वगैरे वर्षी मला बोरकरांचा हा चंद्रासनाचा रंगेल आणि मिश्किल श्लेष कळला. शेवटच्या ओळीतील आपण शांतकाय होऊ, याचा अर्थ मला अजिबात कळला नव्हता.

मुलींच्या संदर्भातील विचार आले असता प्रत्येक मुलगा एक्साईट होतो, तरीही ‘येई सखी’ या कवितेत कवी आपण शांतकाय होऊ असे का म्हणत आहे - असा प्रश्न मी दहावीत असताना माझ्या एका वहीमध्ये लिहून ठेवलेला आठवतो. कायेतली ही शांतता ऑर्गेझमनंतरची शांतता आहे, हे लक्षात आल्यावर मला बोरकरांच्या तिरकस रंगेलपणाचे कौतुक फार दिवस वाटत राहिले.

याच वेळी बोरकरांची ‘मुशाफिरा’ ही अतिशय गाजलेली कवितासुद्धा माझ्या वाचनात आली. वर दिलेल्या कविता सुंदर होत्या, तशीच ‘मुशाफिरा’ ही कविता सुंदर होती. पण या कवितेत ज्याला ‘भारीतले’ म्हणता येईल असे काहीतरी होते.

मुशाफिरा

चालसी किती जगे, किती युगे मुशाफिरा?

एकटेपणा तुझा असह्य हो चराचरा!

 

सांज दाटली शिरीं

परतलीं घरा भिरीं

सावळ्या रुखावळींत धुर मात्र कांपरा.

 

स्तब्ध मार्ग तांबडा

वळत जाय वाकडा

मोडक्या पुलाकडून तार जाय बंदरा.

 

काळवंडली जळें

चिंचही ना सळसळे

वाटतें भयाण सर्व! सलत आंत कातरा.

 

आसपास ना कुणी

भय भरे उगी मनीं

एक रात्र होऊं या परस्परांस आसरा.

 

या इथे वडातळीं

पाय टाकुनी जळीं

जागुनी वदूं कितीक काल, गुंफुनी करां.

 

शीणभाग घालवूं

अन् विकल्प मालवूं

प्रीतिची निगूढता निशेंत आणुंया भरा.

 

आपले झरे मुके

करूं जुळून बोलके

गात गात विस्तरून भेट देऊ सागरा.

हालचाल आणि शांतता यांच्या सीमारेषेवरची संध्याकाळ! सांज शिरावर दाटून आलेली आहे. पाखरांची भिरी घरट्यात परतली आहे. संध्याकाळच्या प्रकाशात हिरवी वृक्षराजी सावळी दिसू लागली आहे. त्या वृक्षराजीमधील घरांमध्ये चुली पेटल्या आहेत आणि त्यातला कापरा धूर वृक्षराजीच्या वर येऊन आसमंतात पसरत चाललेला आहे. तांबड्या मातीचा मार्ग स्तब्ध झाला आहे. शेजारचा मोडका पूलसुद्धा स्तब्ध आहे. आणि खालच्या पाण्यातून ‘तार’ म्हणजे नाव चाललेली आहे. वाहत्या पाण्यातून हळूहळू चाललेली नावसुद्धा स्तब्ध असल्यासारखीच दिसते. चलन आणि स्तब्धता यातली सीमारेषा! सगळे भयाण होत चालले आहे. खाडीमधले पाणी काळवंडले आहे. अंधारात चिंचसुद्धा शांत झाली आहे. अशा वातावरणात तिचे अंतर कातर झाले आहे.

अशा या वातावरणात प्रेयसी आपल्या प्रियकराला म्हणते आहे की, ही एक रात्र तरी आपण एकमेकांचा आसरा होऊयात! तेव्हा मला जाणवले तरी कळले नव्हते. गूढ निसर्गसौंदर्याचा जिवंत कॅनव्हास या प्रेमकवितेतील प्रेमभावनेला लाभलेला आहे. ‘एक रात्र होऊं या परस्परांस आसरा’ ही ओळ वाचल्यावर मला प्रेमाविषयी जाणवली, पण स्पष्टपणे न उमगलेली अजून एक गोष्ट त्या वयात माझ्या लक्षात आली - प्रेम म्हणजे आसरा!

कॉलेजातल्या सुरुवातीच्या वर्षात मला एकटेपणाने ग्रासले होते. पुण्याच्या एस. पी. कॉलेजमध्ये खूप वृक्षराजी होती. मी तिथे एखादा कट्ट्यावर रोज संध्याकाळी एकटाच बसत असे. या कवितेतील प्रेयसीचे आवाहन मलाच आहे, असे तेव्हा वाटून गेले. माझा एकटेपणा मलाच नाही, तर या सगळ्या चराचराला खरंच असह्य होतो आहे का? का बोरकरांच्या कवितेतील प्रेयसीलाच फक्त तिच्या प्रियकराबद्दल तसे वाटते आहे? खरंच या जगाला कुणाच्या एकटेपणाबद्दल कुणाला काही फिकीर असते का?

खूप खूप वर्षांनंतर मला कळले की, सुंदर प्रेम ही या जगाची खरंच एक प्रखर अशी तहान आहे. तुम्ही एकांतात असाल तर या जगाचे काही म्हणणे नसते. पण तुम्ही एकटेपणात जर जळत असाल, तर जगाला ते खरंच सहन होत नाही. कुणीतरी तुमचा एकटेपणा घालवायचा थोडातरी प्रयत्न करायला येतेच येते!

माझ्या त्या एकटेपणात ती कविता मला सांगत होती की, प्रेम म्हणजे एकटेपणापासून दूर होणे. कुणाचा तरी आसरा होणे. कुणाच्या तरी आसऱ्याला जाणे. शिवाय बोरकरांच्या कवितेतील स्त्री म्हणत होती - ‘गात गात विस्तरून भेट देऊ सागरा.’ कुठला सागर होता हा? तृप्तीचा? आनंदाचा? का प्रेमाचा?

या विस्ताराबद्दल त्या वयात काही कळणे अशक्य होते. स्त्रीविषयीचे खरे प्रेम आणि या जगातील महन्मंगलाविषयीचे प्रेम यातले गूढ कनेक्शन त्या वयात कसे कळावे? ते पुढे गझलेने माझ्या लक्षात आणून दिले.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

.................................................................................................................................................................

माझा कवितांचा हा नाद पुढे वाढत गेला. शेक्सपियर, मिल्टन, वर्ड्स्वर्थ, कोलरीज, कीट्स, शेली, पाब्लो नेरुदा, रेनर मारिया रिल्के असे देशोदेशीचे खूप कवी वाचले. एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग, माया अँजेलो, आणि सिल्व्हिया प्लाथ अशा खूप कवयित्री वाचल्या. उमर खय्याम, जलालुद्दीन रूमी आणि गालिब सारखे कवी वाचून झाले.

मराठी कवितेने मला घडवले. साहित्याकडे नेले. तत्त्वज्ञानाकडे नेले. तिने दाखवलेल्या रस्त्यावरून पुढे जाता जाता मला ऑस्कर वाईल्ड, मार्क ट्वेन, जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि विन्स्टन चर्चिल ही विनोदाची तीर्थक्षेत्रे पाहायला मिळाली. टॉलस्टॉय आणि डोस्टोव्हस्की यांची ओळख झाली. सॉक्रेटिस, प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल सेंट ऑगस्टीन, स्पिनोझा, कांट, नीत्शे, मार्क्स ते काम्यू आणि सार्त्र असा प्रवास घडला.

महासरस्वतीच्या मंदिरातील या दालनांत मी अवगाहन वगैरे काही केलेले नाही. या दालनांच्या पायऱ्यांवर जरा वेळ बसलो आहे एवढेच. कवितेने पुढे मला योगी अरविंद यांच्या कवितेकडे नेले. तुकारामाकडे नेले. एकूण भारतीय संस्कृती, उपनिषदे आणि एकूण अध्यात्मविचाराकडे नेले.

आज आठवले की, गंमत वाटते. या सगळ्याची सुरुवात बोरकरांच्या अत्यंत खट्याळ अशा ‘डोळे तुझे बदामी’पासून झाली. साहित्यिक प्रेरणेचा रस्ता मानवी सृजनाच्या प्रेरणेतून सुरू होतो असे म्हणतात ते खरे असावे!

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......