अजूनकाही
आपल्याकडील अनेक उजव्यांना रशियाचे एकाधिकारशहा व्लादिमीर पुतीन यांचा प्रचंड पुळका आहे. कारण तो त्यांच्या हुकूमशहाच्या प्रतिमेत तंतोतंत बसतो. त्यांनाही अशाच हुकूमशहाची प्रतीक्षा आहे. सध्या त्यांनी पुन्हा एकदा पुतीन यांच्या पाठराखणीची भूमिका घेतलेली आहे. आणि त्यातून उगवला आहे एक षड्यंत्र सिद्धान्त. सध्या तो फेसबुक आणि व्हॉट्सॲपवरून फिरत आहे. ती नेमकी काय भानगड आहे, हे नीट समजून घेतले पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशिया-युक्रेन युद्धात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. याचे कारण एकच - भारताचा नाईलाज. पण त्यावरून टीका होत आहे. ती नैतिक भूमिकेतून. पुतीन हे आक्रमक आहेत. त्यांचा निषेध करायलाच हवा, अशी ही भूमिका. मोदी तसे करत नाहीत. आता याचे काही तरी वेगळे स्पष्टीकरण द्यायला तर हवे. त्यातून मग सांगण्यात आले की, युक्रेन हा संयुक्त राष्ट्रांत कशी भारतविरोधी भूमिका घ्यायचा वगैरे. पण हे काही फारसे जोरदार होत नव्हते. प्रोपगंडामध्ये ‘बिग लाय’ नावाचे तंत्र असते. इतके अविश्वसनीय खोटे सांगा की, लोकांना वाटावे ते खरेच असणार. तर यातूनच पुढे आला एक षड्यंत्र सिद्धान्त - युक्रेनने मोदींच्या हत्येचा म्हणे प्रयत्न केला.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
१७ जुलै २०१४ रोजी मोदींचे विमान युक्रेनच्या हवाई सीमेतून येत असताना ते पाडण्याचा म्हणे प्रयत्न झाला होता. तशीच योजना होती. पण झाले असे की, काही तरी तांत्रिक बिघाडाने म्हणे ते विमान उशिरा निघाले. आणि त्याऐवजी पाडण्यात आले मलेशियाचे प्रवासी विमान.
पण खरेच तसे घडले होते का?
१) त्या दिवशी म्हणजे १७ जुलै २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सायं. ६.५०च्या सुमारास वाजता मलेशियाचे एमएच १७ हे विमान युक्रेन-रशिया सीमेवर पाडण्यात आले. तो भाग होता रशियावादी बंडखोरांच्या ताब्यातला. ते जमिनीवरून हवेत मारा करण्यात येणारे बक क्षेपणास्त्र डागून पाडण्यात आले. हे क्षेपणास्त्र रशियन बनावटीचे आहे. ते रशियातून आणण्यात आले होते.
२) ज्या भागात ते विमान पाडण्यात आले, त्यावर युक्रेन सरकारचे नियंत्रण नव्हते.
३) या भागात अशी क्षेपणास्त्रे तैनात आहेत. बंडखोरांकडे ती आहेत. अशा बातम्या त्या आधी काही महिन्यांपासून विविध आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत होत्या.
४) ही घटना घडली, तेव्हा त्या एअरस्पेसमध्ये त्या वेळी मलेशियाच्या विमानाशिवाय अन्य तीन विमाने होती. एक होते एअर इंडियाचे बोईंग ७८७ फ्लाईट ११३. ते दिल्लीहून बर्मिंगहमला चालले होते. दुसरे होते तैवानी ईव्हीए एअरचे बोईंग ७७७ फ्लाईट ८८. ते पॅरिसहून तैपेईला चालले होते. आणि मलेशियाचे विमान जेथे पाडण्यात आले, त्या स्थळापासून अगदी जवळ होते सिंगापूर एअरलाईन्सचे बोईंग ७७७ फ्लाईट ३५१. हे ‘अगदी जवळ’ म्हणजे किती जवळ? तर तब्बल ३३ किमी दूर अंतरावर!
आता मुद्दा मोदीजींच्या विमानाचा.
१) विविध विमानसेवांच्या विमानांना प्रवासाच्या वेळी विशिष्ट एअर-वे निर्धारित करून दिलेला असतो. त्यांनी त्याच फ्लाईट प्लॅननुसार, त्याच मार्गावरून प्रवास करायचा असतो.
२) त्या दिवशी त्या भागात आपली दोन विमाने होती. एक होते एअर इंडियाचे फ्लाईट ११३ हे प्रवासी बोईंग ७८७ विमान. त्याचा मार्ग मलेशियन विमानाच्या मार्गापासून किती जवळ होता? तर तब्बल ७५ किमी अंतरावर.
३) दुसरे विमान जाणार होते मोदीजींचे - एअरइंडिया वन. त्याचा एअर-वे त्या दुर्घटनाग्रस्त विमानापासून किती अंतरावर होता - तर तब्बल २०० किमी.
४) याचा अर्थ मोदीजींच्या विमानाला कोणताही धोका नव्हता. किंबहुना ते टार्गेटवर नव्हतेच. मोदीजींच्या विमानाला कोणताही धोका नव्हता, हे मोदी मंत्रीमंडळातील नागरी विमानोड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनीच जाहीर केले होते.
५) दुसरी गोष्ट - मोदीजींचे विमान फ्रँकफर्टहून उडाले ११.२२ जीएमटीला. म्हणजे भारतीय वेळेनुसार साधारणतः सायंकाळी पाचच्या सुमारास. ते ज्या भागात ती दुर्घटना घडली, त्या डोनेस्क नजीक होते, क्षेपणास्त्र हल्याच्या एक तास उशीरानंतर.
थोडक्यात काय, तर त्या दिवशी त्या भागातून मोदीजींचे विमान गेले हे खरे. पण ते पाडण्याचा डाव होता असे नाही. तसा कट असता, तर ते दहशतवादी क्षेपणास्त्र घेऊन मोदींच्या विमानाच्या मार्गापासून २०० किमी अंतरावर बसले नसते. आणि एक तास आधीच त्यांनी दुसरे विमान पाडले नसते. मोदींच्या विमानाला उशीर झाला म्हणून चुकून दुसरेच विमान पाडले, असे करायला ते दहशतवादी म्हणजे महामार्गावर दरोडे घालणारे भुरटे वाटमारे वाटले की काय?
पण तसे भासवले जातेय. याचे कारण स्पष्ट आहे. मोदींना मारण्याचे प्रयत्न कसे सतत सुरू असतात, हे दाखवून ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळायचे आणि त्याचबरोबर युक्रेनविषयी भारतीयांच्या मनात - खरे तर येथील भक्तांच्या मनात - विखार निर्माण करायचा. त्यातून मोदींच्या तटस्थ भूमिकेला समर्थन निर्माण करायचे. यासाठीच हा कॉन्स्पिरसी थिअरीचा खेळ सुरू आहे. त्यामुळे त्या विमान दुर्घटनेमागील एक दहशतवादी इगोर गिर्कीन याला त्यांनी चक्क युक्रेनवादी नागरिक करून टाकले. त्याला म्हणे भारताच्या दबावामुळे अटक करण्यात आली. त्यांना हे माहीतच नाही की, त्याला अटक झालेलीच नाही. मुळात हा गिर्कीन होता रशियन. तेथील गुप्तचरसंस्था एफएसबीचा तो माजी अधिकारी होता. आणि युक्रेनविरोधात तेथे लढत होता. बंडखोरांचा सेनापती होता. नंतर २०१६मध्ये त्याने रशियन नॅशनल मुव्हमेन्ट नावाचा अतिराष्ट्रवादी विचारांचा पक्षही स्थापन केला. म्हणजे या षड्यंत्र सिद्धांतानुसार मोदींच्या हत्येचा प्रयत्न कोणी केला असेल, तर तो रशियावादी आणि युक्रेनविरोधी बंडखोर नेत्याने.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
या सगळ्यात एक सातत्य मात्र दिसते. मोदी अडचणीत आले, निवडणुका असल्या की, तातडीने मोदींच्या हत्येच्या कटाविषयीच्या बातम्या झळकू लागतात. त्यातलीच ही एक - जरा वेगळ्या प्रकारची कथा.
या कथेचा एक पैलू मात्र हे षड्यंत्रसिद्धान्तकार विसरले. तो म्हणजे - जर युक्रेनने मोदींविरोधात कट केला, यात थोडाही सत्यांश असेल, तर मग आपण युक्रेनविरोधात रान पेटवायला हवे होते. तेव्हा योग्य पुराव्यांअभावी नसेल ते करता आले. पण आता तर चांगली संधी होती. अजिबात भेकडपणा न करता युक्रेनविरोधात थेटच भूमिका घ्यायला हवी होती. तेथे मानवतावादी भूमिकेतून मदत वगैरे पाठवायला नको होती. मोदी सरकार तसे करत नाही, यातून त्यांची प्रतिमा घाबरट अशी होते, हे या प्रोपगंडाकारांच्या लक्षातच आलेले नाही, असे दिसते.
संदर्भ -
१. https://www.thehindu.com/news/national//article60341162.ece
२. https://timesofindia.indiatimes.com/india/modi-flew-out-minutes-before-mh17-crash/articleshow/38648592.cms
३. Crash Of Malaysia Airlines flight MH17, Hrabove, Ukraine, 17 July 2014 : The Hague, Oct 2015.
(मलेशिया विमान अपघाताचा तपास करणाऱ्या डच सेफ्टी बोर्डचा अहवाल.)
४. https://www.bbc.com/news/av/world-europe-37499811
..................................................................................................................................................................
हेही पहा\वाचा
‘महाभारता’तल्या कर्णाचे कवच कुंडले गमावल्याने जे झाले, तशी अवस्था आज युक्रेनच्या वाट्याला आली आहे!
व्लादिमीर पुतिन युक्रेनसोबतचे युद्ध आधीच हरले आहेत...
रशिया-युक्रेन संघर्ष : अमेरिका, युरोपियन राष्ट्र, नाटो, चीन आणि भारत
................................................................................................................................................................
लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांचे ‘प्रोपगंडा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
ravi.amale@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment