एका बाजूला आपल्याला आपले मानवी आयुष्य अर्थहीन वाटत असते. परस्परविरोधी आकांक्षांचा पाठलाग करताना आणि परस्परविरोधी जबाबदाऱ्या पाळताना आपल्याला हे मानवी आयुष्य व्यर्थ आहे, असे वाटत राहिलेले असते. त्याच वेळी आपल्यात काहीतरी सुंदर आणि महत्त्वाचे आहे, असेही आपल्याला वाटत असते. एकदा मानवी आयुष्यातील अर्थावर पकड आली की, सारे श्रेय आपल्या हाती लागेल, असे आपल्याला वाटत असते. फिलॉसॉफीवरील गप्पांची ही मालिका म्हणजे त्या मानवी आयुष्यातील श्रेयाचा शोध आणि पाठलाग!
..................................................................................................................................................................
लेखांक चौथा
सकाळी सकाळी फिलॉसॉफरची नोट आली.
“मिताली, गेल्या वेळी आपण या जगाबद्दलचे दोन विरुद्ध विचार पाहिले. दोन्ही विचार आपापल्या जागी अत्यंत बरोबर वाटतात, एक्सायटिंग वाटतात. पण करणार काय? हे दोन्ही विचार एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालून एकमेकांच्या विरोधात उभे असलेले आपल्याला दिसत राहतात. आपण कुणाची बाजू घ्यायची? कुठलेही एक मत स्वीकारायला हरकत नाही, पण त्या आधी दुसरे मत आपल्याला खोडून काढता आले पाहिजे.”
मिताली आता फिलॉसॉफीमध्ये रमत चालली होती. तिने कुठलाही विचार शांतपणे वाचून तो पूर्णपणे समजून घ्यायची सवय स्वतःच्या मनाला लावून घेतली होती. सगळं उडत उडत वाचायची सवय तिने मोडून काढली होती. फिलॉसॉफरच्या नोट्स ती परत परत वाचत होती. पार्मेनिडीजवरची नोट तर तिने परत परत वाचली, समजून घेतली होती. त्याचे म्हणणे तिला खोडून काढता येत नव्हते. शून्यातून काहीही निर्माण होत नाही आणि जे अस्तित्वात आहे, ते शून्यात लय पाऊ शकत नाही, हे दोन विचार मान्य करायला तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण हे दोन विचार मान्य केले, तर या जगात ‘बदल’नावाचा प्रकार असूच शकत नाही, हा विचार मान्य करावा लागत होता. उदा. जन्म म्हणजे शून्यातून काहीतरी निर्माण होणे आणि मृत्यू म्हणजे अस्तित्वात असलेले काहीतरी शून्यात जाणे. जर शून्यातून काहीही निर्माण होऊ शकत नसेल तर कसला जन्म? जर शून्यामध्ये काहीही विलय पाऊ शकत नसेल, तर कसला मृत्यू? आणि जन्म-मृत्यू नसतील तर कसले बदल? कसला उगम आणि कसला लय?
मितालीला पुन्हा एकदा पार्मेनिडीजचं कौतुक वाटलं.
चारचौघांपेक्षा वेगळं आयुष्य जगणारे हे लोक. तीव्र बुद्धिमत्ता असलेले. तिच्या लक्षात आले की, फक्त बुद्धिमत्ता असून फारसे काही होत नाही. आपली बुद्धी वापरायची असेल तर कमालीचे धैर्य माणसात असावे लागते. आपल्या बुद्धीने कितीही सांगितले, तरी आपल्या काळातील समाजाने स्वीकारलेल्या विचारांपासून दूर जाण्याचे धैर्य किती व्यक्तींमध्ये असते?
पार्मेनिडीजपेक्षा तिला हेराक्लिटसचा विचार जास्त जवळचा वाटत होता. तो म्हणत होता की, या जगात स्थिर असे काहीच नाही. या जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये क्षणोक्षणी बदल होत असतात. ऑल थिंग्ज फ्लो!
मितालीला हे जग सातत्याने बदलताना दिसत होते आणि त्यामुळे तिला हेराक्लिटसचा विचार जवळचा वाटत होता.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
मितालीने नोट वाचायला सुरुवात केली-
“मिताली, या दोन विरोधी विचारातील नाट्य जॉस्टीन गार्डर या नॉर्वेच्या लेखकाने फार सोपे करून मांडले आहे. ते असे -
पार्मेनिडीज - १) या जगात बदल नावाची गोष्ट असूच शकत नाही. २) आणि त्याचमुळे, आपल्याला हे जग बदलताना दिसत असेल तर आपल्याला आपल्या संवेदनांवर विश्वास ठेवता येत नाही.
हेराक्लिटस - १) या जगातील प्रत्येक गोष्ट सातत्याने बदलत असते... २) आपण आपल्या संवेदनांवर विश्वास ठेवू शकतो.”
मिताली दोन फिलॉसॉफरनी काढलेल्या दोन विरुद्ध निष्कर्षांकडे बघत राहिली.
पार्मेनिडीजचे म्हणणे तिला खोडून काढता येत नव्हते आणि पार्मेनिडीजला पूर्णपणे खोडून काढल्याशिवाय हेराक्लिटसवर पूर्णपणे विश्वास ठेवणे योग्य नव्हते.
मिताली फ्रस्ट्रेट झाली, तरी ती विचार करत राहिली. तिला वाटले, आपली बुद्धी वापरायची ही प्रोसेस किती ग्रेट आहे, किती एक्सायटिंग आहे!
मितालीच्या मनात पुढचा विचार आला की, या खोड्यातून फिलॉसॉफी कशी सुटली असेल?
तिने नोट वाचायला सुरुवात केली-
“या प्रश्नावर एम्पेडोक्लीस विचार करत होता. एम्पेडोक्लीस (इसपू - ४९०-४३०) इटलीमधील सिसिली येथे जन्मला. त्याने विचार केला की, पार्मेनिडीज आणि हेराक्लिटस यांच्यातील तिढा सुटत नव्हता याचे कारण - हे जग एकाच पदार्थामधून किंवा गोष्टीमधून जन्माला आले आहे, असा विचार हे दोघेही करत होते. कधीही न बदलणारा एकच घटक या जगाच्या मुळाशी असेल असे जर मान्य केले, तर या जगातील बदल कसे होतात हे सांगणे अशक्य होते. पण कधीही न बदलणारे एकापेक्षा जास्त घटक या जगात आहेत, असे मानले तर या जगात बदल कसे होतात, हे सांगणे अगदीच शक्य होते.
“एकट्या पाण्यापासून मासा कसा तयार होईल? एकट्या पाण्यापासून फुलपाखरू कसे तयार होईल? शुद्ध पाणी हे नेहमी शुद्ध पाणीच राहणार. या अर्थाने पार्मेनिडीज बरोबर होता. या जगात बदल होत नाहीत! पण त्याच वेळी एम्पेडोक्लीसने हेराक्लिटसचासुद्धा एक मुद्दा मान्य केला. तो म्हणजे - आपल्याला आपली इंद्रिये जे जग दाखवत आहेत, त्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि आपली इंद्रिये आपल्याला दाखवत असतील की, या जगात बदल होत आहेत, तर तेही आपण मान्य केले पाहिजे.
“या तिढ्यातून मार्ग काढण्यासाठी एम्पेडोक्लीसने विचार केला की, हे जग कधीही न बदलणाऱ्या चार घटकांचे बनलेले आहे. ते घटक म्हणजे, पृथ्वी, हवा, अग्नी आणि पाणी. हे चार घटक वेगवेगळ्या प्रमाणात एकत्र आले की, या जगातल्या वेगवेगळ्या गोष्टी तयार होतात. जेव्हा एखादी गोष्ट नष्ट होते, तेव्हा हे चार घटक पुन्हा एकदा वेगवेगळे होतात. या चार घटकांचे मूळ अस्तित्व कधीही बदलत नाही. या चार घटकांपासून ज्या गोष्टी बनलेल्या असतात, त्यांचा कुठलाही परिणाम या घटकांच्या मूळ प्रकृतीवर होत नाही.
“हा मुद्दा उलगडून सांगताना एम्पेडोक्लिसने रंगांचे उदाहरण दिले आहे. एकच एक लाल रंग असेल तर कुठलाही चित्रकार हिरवी पाने रंगवू शकणार नाही. पण त्याच चित्रकाराला जर पिवळा, लाल, हिरवा आणि काळा असे रंग दिले, तर तो हे मूळ रंग वेगवेगळ्या प्रमाणात एकत्र करून शेकडो रंग तयार करू शकतो.”
मितालीचा कोंडलेला श्वास मोकळा झाला. पार्मेनिडीज आणि हेराक्लिटसने तयार केलेला खोडा एम्पेडोक्लीसने सोडवला होता.
मितालीने पुन्हा नोट वाचायला सुरुवात केली -
“ठीक आहे, हे जग चार मूळ घटकांचे बनले आहे. पण, त्यांना या जगातील विविध गोष्टी तयार करण्यासाठी एकत्र कसे आणले जाते आणि या जगातील गोष्टी संपवण्यासाठी विघटित कसे केले जाते?
“एम्पेडोक्लीसने सांगितले की, या जगात दोन ‘फोर्सेस’ आहेत. हे फोर्सेस या चार घटकांना एकत्र आणतात आणि विघटित करतात. एक म्हणजे प्रेमाचा फोर्स आणि दुसरा म्हणजे संघर्षाचा फोर्स. (Love And Strife) प्रेमशक्ती मूळ घटकांना एकत्र करते आणि संघर्षशक्ती त्यांना विघटित करते. म्हणजे आता या जगातील पदार्थांबरोबरच या जगातील शक्ती किंवा बलांचाही विचार केला गेला.
“येथे आपण अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ‘सब्स्टन्स’ हा वेगळा प्रकार आहे आणि ‘फोर्स’ हा वेगळा प्रकार आहे; हे येथे पाश्चात्य जगाच्या विचारांच्या इतिहासात पहिल्यांदा खऱ्या अर्थाने अधोरेखित झाले. आजही आधुनिक विज्ञान ‘मूलद्रव्ये’ आणि निसर्गातील गुरुत्वाकर्षणासारखी ‘बले’ याच भाषेत विचार करताना आपल्याला पाहायला मिळते. (Elements And Natural Forces). मूलद्रव्ये आणि गुरुत्वाकर्षणासारखी बले यांच्यामधील संघर्ष आणि मेळ म्हणजेच हे आपले विश्व असे आजचे विज्ञान सांगते.
“गुरुत्वाकर्षणासारख्या बलाची संकल्पना माहीत व्हायला मानवाला सर आयझॅक न्यूटनपर्यंत म्हणजे आठराव्या शतकापर्यंत वाट पाहावी लागणार होती. एम्पेडोक्लिसने त्या प्राचीन काळात निसर्गातील बलांची संकल्पना मांडणे हेच फार मोठे होते. त्याने मांडलेली संकल्पना मोघम स्वरूपाची होती, हे आपण मान्य करू. पण अशी संकल्पना पुढे येणे महत्त्वाचे होते.
“एम्पेडोक्लिस म्हणत होता की, पृथ्वी, हवा, अग्नी आणि पाणी ही या जगातील मूळ अस्तित्वे आहेत. या जगाची ‘रूट्स’ आहेत. यांना या जगाची मुळे म्हणायचे कारण असे की, ही ‘अनजनरेटेड’ आहेत. म्हणजे ही मुळे जगाच्या सुरुवातीपासून आहेत. यांचा जन्म झालेला नाही.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
ही मुळे किंवा मूलरूपे एका विशिष्ट प्रमाणात एकत्र आली की, हत्ती तयार होतो. अजून वेगळ्या प्रमाणात एकत्र आली की, आंब्याचे झाड तयार होते. या जगातील सर्व गोष्टी अशाच तयार होतात. काही काळाने ही एकत्र आलेली मूलरूपे एकमेकांपासून विलग झाली की, तो जीव मृत्यू पावतो किंवा ती गोष्ट विलय पावते.
“एम्पेडोक्लिसचे एक वाक्य प्रसिद्ध आहे - “There is neither birth nor death for any mortal, but only a combination and separation of that which was combined, and this is what amongst laymen they call ‘birth’ and ‘death’.
(या जगात जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. फक्त (मूलरूपांचे) एकत्र येणे आहे आणि त्यांचे विलग होणे आहे. या एकत्र येण्याला आणि विलग होण्यालाच सामान्य लोक ‘जन्म’ आणि ‘मृत्यू’ म्हणतात.)
“प्रेम आणि संघर्ष या बलांमुळे ही मूलरूपे एकत्र येतात आणि विलग होतात. प्रेम आणि संघर्ष यांच्यात सततचे युद्ध सुरू असते. या युद्धाला अंत नाही. थोडक्यात सांगायचे तर एम्पेडोक्लिसचे म्हणणे असे की, या जगात सत्याच्या दोन पातळ्या आहेत. एक म्हणजे ‘सत्याची’ पातळी आणि दुसरी ‘थोड्या कमी सत्याची’ पातळी.
“चार मूलरूपे आणि दोन बले ही सत्याची पातळी आणि त्यांच्या एकमेकांमध्ये एकत्र येण्यामुळे जन्मणाऱ्या आणि त्यांच्या विलग होण्यामुळे मरणाऱ्या जगाची थोड्या कमी सत्याची पातळी. अजून सोप्या भाषेत बोलायचे तर वरच्या पातळीवरचे सत्य आणि खालच्या पातळीवरचे सत्य. वरच्या पातळीवर जन्म-मरण किंवा उद्गम-लय नसतो. बदल नसतो. खालच्या पातळीवर जन्म-मरण किंवा उद्गम-लय असतो. म्हणजेच आपल्या डोळ्यांना दिसणारा बदल असतो.
“या पुढे जाऊन एम्पेडोक्लिस प्रेम आणि संघर्ष या दोघामुळे या विश्वात चार टप्प्यांचे चक्र कसे तयार होते ते सांगतो. पहिल्या टप्प्यात चारही मूलरूपे प्रेमाने एकत्र बांधली गेलेली असतात. या वेळी संघर्ष तत्त्व अतिशय क्षीण असते. या टप्प्यात सगळे काही प्रेमाने बांधले गेले असल्यामुळे स्तब्ध असते. पुढे दुसऱ्या टप्प्यात संघर्ष वाढतो. त्यामुळे मूलरूपे वेगवेगळी होऊ लागतात. पण प्रेमतत्त्वसुद्धा या वेळी चांगल्या प्रमाणात अस्तित्वात असते. प्रेम आणि संघर्ष या फोर्सेसच्या प्रभावामुळे चार मूलरूपे वेगवेगळ्या प्रमाणात एकत्र येऊन हे विश्व अस्तित्वात येते. पुढे तिसऱ्या टप्प्यात संघर्ष इतका वाढतो की, सगळे विश्व विघटित होते. चौथ्या टप्प्यात पुन्हा एकदा प्रेमाचा फोर्स वाढू लागतो आणि पुन्हा एकदा हे जग तयार होते. या पुन्हा तयार झालेल्या विश्वाचा प्रवास पुन्हा एकदा पहिल्या टप्प्याकडे सुरू होतो. हा प्रवास पूर्ण झाला की, पुन्हा एकदा सगळे काही प्रेमामध्ये स्तब्ध होऊन जाते.
हा विषय पूर्ण करण्याआधी एक लक्षात घेतले पाहिजे. एम्पेडोक्लिसने आपल्या चार तत्त्वांना देवांची नावे दिलेली आहेत.
Hear first of all the four roots of all things :
Zeus the gleaming, Hera who gives life, Aidoneus,
And Nêstis, who moistens with her tears the mortal fountain.
(चमकणारा झिउस, जीवनदायिनी हेरा, आयडोनियस आणि या पार्थिव जीवनाचे कारंजे आपल्या अश्रूंनी भिजवणारी नेस्टीस.)
कोणत्या देवतेचे नाव कोणत्या तत्त्वाला दिले गेले आहे यावर वाद आहेत. या देवतांच्या नावांमुळे एम्पेडोक्लिसची ही तत्त्वे सक्रीय तत्त्वे आहेत, असे काही फिलॉसॉफर्सचे म्हणणे आहे. वेगवेगळ्या बलांचा परिणाम होणारे अणु-रेणू असतात तशी ही निष्क्रिय तत्त्वे नाहीत.
एवढे झाल्यावर एम्पेडोक्लिसने हे जग आपल्या इंद्रियांना कसे जाणवते कसे हेसुद्धा सांगितले आहे. आपली इंद्रियेसुद्धा चार मूलरूपांनी बनली आहेत. बाहेरच्या जगातील मूलरूपे इंद्रियांतील मूलरूपांकडे आकर्षित होतात आणि आपल्याला जग दिसते किंवा जाणवते.
For it is by earth that we see earth, by water water,
By aether divine aether, and by fire destructive fire,
And fondness by fondness, and strife by baleful strife.
(आपल्यामधील पृथ्वीतत्त्वामुळे आपल्याला पृथ्वी दिसते, पाण्यामुळे पाणी दिसते. आपल्यामधील वायुतत्त्वामुळे आपल्याला हवा जाणवते आणि आपल्यामधील अग्नितत्त्वामुळे आपल्याला अग्नी दिसतो.)
एम्पेडोक्लिसचे म्हणणे असे की, बाहेरच्या जगातील मूलतत्त्वांमधून उत्सर्ग (effluence) निघत असतो आणि तो आपल्या इंद्रियांपर्यंत पोहोचला की, आपल्याला त्या गोष्टीचे ज्ञान होते. उदा. चंद्राचा उत्सर्ग, म्हणजे चंद्राचे काही कण आपल्यापर्यंत पोहोचले की, आपल्याला चंद्र दिसतो.
मिताली, हा उत्सर्गाचा विचार तुला विचित्र वाटेल, पण या जगाचे ज्ञान होण्यासाठी आपल्या इंद्रियांपर्यंत काहीतरी पोहोचयला पाहिजे, यावर विश्वास ठेवून एम्पेडोक्लिसने आपला विचार मांडला होता. ‘देवाने सांगितले तुला दिसेल आणि मानवाला दिसू लागले’, असा विचार करायचा नाही, हे एम्पेडोक्लिसने ठरवले असणार. आज आपल्याला माहीत आहे की, प्रकाशाचे किरण आपल्या डोळ्यापर्यंत ‘पोहोचले’ की, आपल्याला ‘दिसते’. हवेच्या लहरी आपल्यापर्यंत ‘पोहोचल्या’ की, आपल्याला ‘ऐकू’ येते. आपल्या इंद्रियांना ज्ञान होण्यासाठी आपल्या इंद्रियांपर्यंत काहीतरी ‘पोहोचत’ असणार, हा एम्पेडोक्लिसचा विचार फार महत्त्वाचा होता.
मिताली, तुला आश्चर्य वाटेल, पण काही फिलॉसॉफर्सच्या मते डार्विनच्या उत्क्रांतीच्या विचारांची मुळेसुद्धा एम्पेडोक्लिसच्या विचारांमध्ये शोधता येतात.”
मितालीने डोळे विस्फारले. कसं शक्य आहे? ती उत्सुकतेने वाचू लागली.
“एम्पेडोक्लिसच्या फिलॉसॉफीप्रमाणे या जगातील प्राणी कुणी ‘तयार’ केलेले नाहीत. ते या मूलरूपांच्या परस्पर वाद-संवादातून हळूहळू तयार होत गेलेले आहेत.
From it [scil. the earth] blossomed many faces without necks,
Naked arms wandered about, bereft of shoulders,
And eyes roamed about alone, deprived of brows.
पृथ्वीमधून मान नसलेले अनेक चेहरे उमलून आले, नुसतेच हात खांद्यांशिवाय इकडे-तिकडे भटकू लागले, डोळेसुद्धा भटकू लागले भिवयांचा आधार न घेता.
एम्पेडोक्लिसच्या मते पहिल्यांदा काही प्राण्यांना मानवांची डोकी होती, काही मानवांना प्राण्यांची डोकी होती. काही माणसांना पुढे आणि मागे अशा दोन्ही बाजूला डोकी होती. दोन्ही बाजूला वक्ष होते. असे सगळे असले तरी या सर्वांमधील या जगात जगण्याच्या लायकीचे जे प्राणी होते, तेवढेच बाकी उरले. जे लायक नव्हते, ते नष्ट झाले.
पार्मेनिडीजमध्ये जसा एक कण आईनस्टाईन होता, हेराक्लिटसमध्ये जसा खूपसा नीत्शे होता, तसाच एम्पेडोकलिसमध्ये थोडासा डार्विन होता.”
मितालीच्या मनात अजिबात संशय उरला नाही. ग्रेट माणूस! मितालीने एम्पेडोक्लिसला दाद दिली. तिने तसा मेसेज पाठवला. फिलॉसॉफरने पुढे लिहिले होते -
“पार्मेनिडीज आणि हेराक्लिटस या द्वंद्वातून आपण एम्पेडोक्लिसकडे आलो. आता आपल्याला एम्पेडोक्लिसकडून अनाक्सागोरसकडे जायला हवे. पण त्या आधी एम्पेडोक्लिसच्या व्यक्तिमत्त्वातील एक इंटरेस्टिंग भाग आपल्याला पाहायला हवा. एका बाजूला तो जसा निसर्गाचा फिलॉसॉफर होता, तसाच तो आध्यात्मिकसुद्धा होता. त्याच्याकडे बुद्धिप्रामाण्यवाद होता, तसाच अध्यात्मवादसुद्धा होता.
विश्वाबद्दलच्या आपल्या विचारातून त्याने माणसाच्या मूळ देवत्वाबद्दलचाही विचार मांडला. त्यातूनच त्याचा पुनर्जन्माबद्दलचा विचारही पुढे आला.
पहिल्या स्थितीमध्ये, प्रेमाच्या पूर्णावस्थेत सर्व जण देवच असतात. पुढे संघर्ष तत्त्व ती अवस्था भंग करते. देव स्थितीतून ‘डीमन’ तयार होतात. ग्रीक संस्कृतीमध्ये डीमन म्हणजे सैतान नव्हे. डीमन ही देवांचीच एक सब-कॅटेगरी आहे. देवांचीच एक श्रेणी आहे.
या डीमनना ‘प्रेममय’ स्थितीतून ३०,००० सीझन्ससाठी बाहेर काढले जाते. मग सुरू होतो जन्मोजन्मीचा प्रवास. एम्पेडोक्लिसने स्वतःच्या प्रवासाविषयी लिहिले आहे -
For as for me, once I was already both a youth and a girl
a bush and a bird, and a sea-leaping, voyaging fish.
(माझे सांगायचे तर मी होतो एक तरुण आणि एक मुलगी
एक झुडुप आणि एक पक्षी, आणि समुद्रच्या समुद्र पार करून जाणारा एक मासा.)
प्रेममय स्थितीतून बाहेर पडल्यावर अधोगती होत राहते. पहिल्यांदा प्राण्यांचे जन्म दिले जातात. मग प्रगती झाल्यावर झाल्यावर झाडांचे. नंतर मग माणसाचा जन्म मिळतो. पहिल्यांदा खून करणारा, युद्ध वगैरे करणारा हिंसक माणूस तयार होतो. नंतर मग प्रेमतत्त्वाचे महत्त्व कळल्यावर प्रगती सुरू होते. प्रगत स्थितीमध्ये द्रष्टे, कवी, ज्ञानी आणि नेते यांचे जन्म मिळतात. शेवटी प्रेम तत्त्व वाढत जाईल, तसा तसा माणूस देवत्वाच्या जवळ जात राहतो.
At the end they become seers, hymn singers, doctors,
And leaders for humans on the earth,
And then they blossom up as gods, the greatest in honors.
(आणि सर्वांत शेवटी ते (डीमन्स) बनतात द्रष्टे, कवी, ज्ञानी आणि नेते या पृथ्वीवरील माणसांचे.
आणि नंतर ते बहरून जातात देवत्वामध्ये, होतो सर्वोच्च सन्मान त्यांचा.)
आपण एम्पेडोक्लिसचा हा आध्यात्मिक विचार पाहिला याचे कारण असे की, या अध्यात्मवादाचा पाया एम्पेडोक्लिसच्या बुद्धिवादामधून आलेल्या विचारांमध्येच आहे. अध्यात्म विचार माणसाला सोडत नाही हेच खरे. असो.
एम्पेडोक्लिस ज्ञानी माणसाचे जीवन जगला, कारण त्याच्या मते तो देवत्वाच्या जवळ गेला होता. शेवटी शेवटी एम्पेडोक्लिसला ‘देवत्वा’मध्ये ‘बहरून’ जायचे होते. डायोजिनस लिअर्टियस या फिलॉसॉफर्सची चरित्रे लिहिणाऱ्या लेखकाने लिहिले आहे की - एटनाच्या ज्वालामुखीत उडी मारून एम्पेडोक्लिसने या जगातील प्रवास संपवला.
एम्पेडोक्लिसचा शेवट असा झाला की, नाही यावर वाद आहेत. काहीही असले तरी एम्पेडोक्लिसमध्ये बुद्धिवाद आणि अध्यात्मवाद असे दोन्ही होते हे नक्की.
हे सगळे जरी असले तरी आज एम्पेडोक्लिस मुख्यत्वेकरून ओळखला जातो, तो त्याने पार्मेनिडीज आणि हेराक्लिटस यांच्या विचारातले द्वंद्व सोडवले म्हणून.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
एम्पेडोक्लिसचे महत्त्वाचे विचार आपण पुन्हा एकदा पाहू.
१) सत्याची दोन प्रतले असतात. एक खरे सत्य आणि दुसरे कमी खरे सत्य.
२) कधीही न बदलणाऱ्या चार मूलरूपांनी हे जग बनलेले आहे. न बदलणाऱ्या चार घटकांपासून बदलणारे जग तयार झाले आहे.
त्याच्या या विचारांमुळे मनवाने एक मोठी प्रगती केली. आज आपण ‘पिरिऑडिक टेबल’ बघतो. त्यात या जगातील अनेक ‘मूलद्रव्ये’ रचलेली आपण बघतो. ही ‘मूलद्रव्ये’ विविध बलांमुळे एकत्र येतात आणि जगातील अनेक गोष्टी बनतात, हे आपण अगदी लहानपणी शिकलेलो असतो. या साऱ्या प्रगतीची सुरूवात एम्पेडोक्लिसपासून झाली, असे म्हणता येईल.
एम्पेडोक्लिसचा हा विचार या पुढच्या काळात अनाक्सागोरस आणि डेमॉक्रिटस यांनी पुढे नेला. पुढच्या गप्पांमध्ये आपण या दोघांच्या विचारांकडे जाणार आहोत.”
मितालीने नोट खाली ठेवली. ती विचार करत राहिली. सत्याची दोन प्रतले आणि ‘न बदलणाऱ्या’ रूट्सपासून ‘बदलणारे’ जग. सगळेच भन्नाट होते. तिने फिलॉसॉफरला लिहिले - “किती प्रतिभाशाली होते हे लोक! छाती दडपून जाते आपली. मी विचार करते आहे, या साऱ्या फिलॉसॉफर लोकांचा. काय घेता येईल यांच्याकडून मला? मलाही यांच्यासारखे व्हायचे आहे. या जगाचा ठाव घ्यायचा आहे. मी रात्रंदिवस फिलॉसॉफी वाचत राहू का?”
फिलॉसॉफरचा मेसेज आला - “खूप वाचून फिलॉसॉफी शिकता येत नाही. त्यापेक्षा थोडी फिलॉसॉफी मनापासून वाचावी आणि त्यातून ‘फिलॉसॉफिकली’ विचार करायला शिकावे. ते जास्त महत्त्वाचे आहे.”
..................................................................................................................................................................
या सदरात आतापर्यंत प्रकाशित झालेले लेख -
Philo म्हणजे प्रेम आणि Sophos म्हणजे श्रूडनेस. शहाणपणाविषयीचे प्रेम म्हणजे फिलॉसॉफी!
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment