अजूनकाही
पहिल्यांदा भेटायला आला, तेव्हा तरुण डॉ. सुहास जेवळीकरच्या अंगावर अॅप्रन होता. तेव्हा मी अपरिहार्यपणे ‘नेहरू युवक केंद्रा’चा ‘अर्ध्याहून अर्धा’ वेळेचा ग्रंथपाल होतो. त्या कामाचे दरमहा ५० रुपये वेतन मिळे. त्यातून माझा दरमहा खानावळीचा दोन्ही वेळच्या जेवणाचा ४५ रुपये खर्च भागत असे, पण ते असो. नेहरू युवक केंद्रासोबतच ‘औरंगाबाद युथ सेंटर’चं कामही मी करत असे. युवक विकासाच्या विविध योजनांसाठी या दोन केंद्रांना केंद्र आणि राज्यांच्या सरकारकडून निधी मिळत असे. त्या वेळी आयोजित केलेल्या एका काव्य स्पर्धेच्या निमित्तानं सुहास पहिल्यांदा भेटला, तेव्हा नजरेत भरला तो त्याचा अॅप्रन, मोत्यासारखं सुवाच्च अक्षर आणि त्यांची लफ्फेदार स्वाक्षरी. पुढे या दोन्ही केंद्राच्या अनेक उपक्रमात तो सहभागी झाला आणि त्यानं पारितोषिकही मिळवली. त्या वेळी त्याला अनेकदा रोख रकमेसह प्रमाणपत्रंही मिळाली. त्या काही प्रमाणपत्रावर सरचिटणीस म्हणून माझी स्वाक्षरी असल्याचं आणि ती प्रमाणपत्र जपून ठेवल्याचं सुहासनं एकदा मध्यंतरी मला सांगितलं होतं.
बडबड्या सुहासची माझी मैत्री बहरत गेली, ती त्याच्याच वैद्यक महाविद्यालयाच्याच परिसरात. वैद्यक अभ्यासक्रमात त्याला सिनिअर असलेले रवींद्र जोशी, प्रदीप मुळे, मिलिंद देशपांडे, अविनाश येळीकर हे माझे मित्र होते. माझा तो खूपच संघर्षाचा काळ होता आणि अडल्या वेळी हे दोस्तयार माझी नड भागवत असत. त्यामुळे वैद्यक महाविद्यालयामधील ओपीडी, रुग्णांचे वॉर्डस, ग्रंथालय, बॉईज होस्टेल या जागा मलाही चांगल्याच परिचित होत्या. वैद्यक महाविद्यालयाचा कॅटिनवाल्या शेट्टीला तर मी वैद्यक महाविद्यालयाचा विद्यार्थी नसल्याचं अनेक दिवस ठाऊकही नव्हतं. वैद्यक शाखेचा विद्यार्थी समजूनच तो माझ्याशी व्यवहार करायचा.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
वैद्यक महाविद्यालयाच्या सततच्या चकरामुळे सुहासशी नियमित भेटीगाठी सुरू झाल्या. पावणे सहा फुटाच्या आसपास उंची, चापून बसवलेले केस, जाडसर ओठ, भल्या मोठ्या फ्रेमचा चष्मा, किंचित स्थूल शरीरयष्टी असं तो तेव्हा होता. त्यानं बोलायला सुरुवात केल्याशिवाय त्याची छाप समोरच्यावर पडत नसे. सुहास माणूसघाणा नव्हता. माणसांच्या गोतावळ्यात रमणं त्याला मनापासून आवडत असे. समोरच्यानं एकदा बोलणं ऐकलं की, तो सुहासच्या प्रेमातच पडत असे.
शिवाय मित्र जोडण्याची सुहासची एक खास शैली होती. सिगरेट-बिडीवाल्यासोबत एखादा झुरका मारत, खर्रा-तंबाखूवाल्यासोबत छोटीशी फक्की तोंडात टाकत. चहावाल्यासोबत चहा आणि मंतरलेल्या सोनेरी पाणीवाल्यासोबत चिअर्स करत; असं सर्वांशी मिसळून जाण्याची सुहासशी खासीयत होती. शिवाय तेव्हा तरुण असलेल्या सुहासला पुस्तकं आणि वृत्तपत्र वाचनाचा अतोनात छंद होता, गाता येत नसलं तरी गाणं समजण्याचा कान होता, चित्रात रुची होती आणि चित्रपटाचा तो शौकीन असल्यानं समोरच्याशी संवाद साधण्याची त्याला अडचण नव्हतीचं. त्यामुळे पहिल्या पाच-दहा मिनिटातच समोरच्याला त्याचा पूर्वजन्मीचा वगैरे मित्र वाटावा, इतकी नाळ जोडण्यात सुहास पटाईत होता. त्या काळात म्हणजे १९७५मध्ये मी त्याला ‘पाणी’ म्हणत असे. कारण कोणालाही मैत्रीच्या पाण्यात विरघळवून टाकण्यात त्याची हातोटी होती.
पुढे १९७७च्या उत्तरार्धात मी औरंगाबाद सोडलं आणि तब्बल २१ वर्षांनी पुन्हा औरंगाबादला परतलो. एव्हाना सुहास पूर्ण डॉक्टर आणि औरंगाबादच्याच वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक झालेला होता. एखाद्या यशस्वी शिक्षकाच्या मागे असतो तसा चार-दोन तरी शिष्यांचा थवा त्याच्या भोवती भिरभिरतांना दिसे. त्यांची लोकशाहीवादी भूमिकाही ठाम झालेली होती आणि डाव्यांच्या वर्तुळात त्याचा वावर वाढलेला होता. स्वप्रतिमेच्या प्रेमात पडल्यासारखी त्याची देहबोली झालेली होती. सुहास अंगानंही धिप्पाड म्हणता येईल असा चांगला भरलेला आणि एक प्रौढ माणूस दिसू लागला होता. मात्र त्याच्या बोलण्या आणि वागण्यात तरुणपणीचा सुहास डोकावत होता. त्याचं लग्नही झालेलं होतं. सिडकोतल्या त्याच्या घरी नेऊन एकदा त्यानं पत्नी आणि त्याच्या कन्येचीही आवर्जून ओळख करुन दिली.
एव्हाना कवी, ललित लेखक, आरोग्य विषयक स्तंभलेखक, कार्यक्रमाचा निवेदक आणि विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, असं सुहासचं व्यक्तिमत्त्व चहू अंगानं बहरुन आलेलं होतं. अनेक कविता, गाणी, शेर, हकिकती-आठवणी त्याला मुखोद्गत झालेल्या होत्या आणि त्या आधारे एखादी मैफिल ताब्यात घेऊन कशी गाजवावी, याचं तंत्र त्याला चांगलचं अवगत झालेलं होतं. औरंगाबादेत राहूनही त्याचा संपर्क महाराष्ट्रभर खूपच विस्तारला गेला होता. बाहेरगावहून औरंगाबादला आलेला कवी, लेखक, कलावंत, असा कोणताही पै-पाहुणा सुहासचा पाहुणचार स्वीकारल्याशिवाय त्याच्या गावी परतू शकत नव्हता. थोडक्यात, औरंगाबादच्या सांस्कृतिक विश्वाचं समकालीनांसाठी डॉ. सुहास जेवळीकर हे ‘ग्रामदेऊळ’ झालेलं होतं.
सुहासचं आणखी एक लक्षात आलेलं वैशिष्ट्यं म्हणजे, तो सगळं काही रसिकपणे घेत होता. लेखन असो की, श्रवण की, कार्यक्रम की, अगत्य, त्यात तो स्वत:ला पूर्ण झोकून देत होता. त्यामुळे आनंद आणि नावलौकिकाचं एक गहिरं समाधान त्याला मिळत होतं.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
१९९८ ते मार्च २००३च्या काळात दोन-तीन वेळा त्याचं अगत्य त्याच्या घरी जाऊन घेता आलं. त्याचं घर एखाद्या लेखक, कलावंताला शोभेसं अतिशय नेमकं देखणं होतं. स्वतंत्र बंगला, त्यात त्याची लेखनाची खोली, अत्यंत शिस्तीत लावलेली पुस्तकं, लेखनाच्या टेबलावर एखादं अर्धवट वाचलेलं पुस्तक, कागद, पेन वगैरे जामानिमा, अगदी फोटोवरही व्यवस्थित केलेल्या नोंदी, मंतरलेल्या सोनरी पाण्याचा आस्वाद घेण्यासाठी स्वतंत्र बैठक, तिथे संगीताचा खजिना आणि सुहासच्या आग्रही अगत्याला त्याची पत्नी डॉक्टर असलेल्या संध्या हिचा सक्रिय दुजोरा, असं ते सगळं विदग्ध वातावरण.
या सर्वांत टोकाचं झोकून देणं ही सुहासची खासीयत तेव्हा मला पहिल्या भेटीत खूप भावली, पण नंतर जसजशा पार्ट्यात भेटी होऊ लागल्या, तस-तसं तो असोशीकडे झुकतो आहे का काय, असं का कोण जाणे, मला तरी वाटायला लागलं.
सुहासचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे त्याला काम सांगावं आणि निर्धास्त व्हावं. गरजूंना मदत करण्याची त्याची सहृदयता कायम तेवतच असायची. कुणा गरजूला वैद्यक महाविद्यालयात त्याच्याकडे पाठवलं की, सुहास सर्व ती काळजी (प्रसंगी खिशाला खार लावून) घेतो, हे एव्हाना मला ठाऊक झालेलं होतं, पण त्याबद्दल तो कधीच काही बोलत नसे. तो गरजू माणूस पुन्हा कधी चुकून आपल्याला भेटलाच तर डॉ. जेवळीकरांनी कशी मदत केली, हे आवर्जून सांगत असे. मात्र हेच नेमकं तो डॉ. जेवळीकरांना कळवायला विसरून गेला असे. अर्थात सुहासला त्याचं कधीच वैषम्य वाटलं नाही. शासकीय वैद्यक सेवेतील त्याचं चारित्र्य अभिमान वाटावा असं स्वच्छ होतं, पण त्या सेवेतील भ्रष्ट आणि कोडेगपणाबद्दल त्याच्या मनात निर्माण झालेला विषाद बोलतांना जाणवायचा.
सुहास हा रसिकता आणि उत्सुकतेच्या झाडावर विहरणारा पक्षी होता. २००० साली एकदा काहीतरी गप्पा सुरू असताना नागपूर आणि उत्तर भारतात धुळवडीचा दिवस पहाटेपासून संध्याकाळपर्यंत कसा ‘नशा’मय आणि खादाडीनं धूमधडाक्यात भरलेला असतो, याबद्दल मी सांगितलं. त्या वर्षीची औरंगाबादची धुळवड आमच्या घरी सुहासनं तशीच साजरी करायला लावली. एवढंच नाही तर त्यात डॉ. मिलिंद देशपांडे, डॉ. अमृत महाजन, डॉ. नंदू सबनीस या मित्रांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही सामील करुन घेतलं. (त्यानंतर कोणत्याच रंगोत्सवात मी सहभागी झालो नाही.) दोन-चार भेटीनंतर एकदा तरी सुहास त्या धुळवळीची आठवण काढत असे.
बेडरपणा म्हणा का धाडसीपणा हेही सुहासचं आणखी एक वैशिष्ट्यं. विशेषत: डॉक्टर झाल्यावर तर ते ठळकपणे समोर आलं. समोरचा माणूस वय, अनुभव आणि विद्वता या पातळ्यांवर कितीही ज्येष्ठ असला तरी सुहास त्याला बिनधास्तपणे थेट ‘अरे–तुरे’नं भिडत जातो, असं लक्षात आलं. सुरुवातीला त्याच्या या धाडसाचं मला कौतुक वाटलं, पण औरंगाबादला स्थायिक झाल्यावर हे धाडस आव आणल्यागत वाटायला लागलं. मात्र, सुहासच्या या आव आणण्याला कोणतेही ‘गैर’ रंग कधीच चिकटलेले नव्हते, हेही तेवढंच खरं; तो त्याचा आत्मानंद होता. दोन-तीन ज्येष्ठांनीही खाजगीत त्या संदर्भात माझ्याकडे सौम्य शब्दात नाराजी व्यक्त केली हे आठवून एका रात्री डॉ. मिलिंद देशपांडेकडे झालेल्या पार्टीत मी त्याला त्याबद्दल रागावलोही होतो. माझं हे रागावणं त्यानं कोणत्याही वेगळ्या अर्थानं घेतलं नाही, हेही आवर्जून सांगायला हवं. त्याचा हा मनाचा मोठेपणा माझ्या मनावर चांगलाच ठसा उमटवून गेला.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
दिल्ली सोडून औरंगाबादला स्थायिक झाल्यावर शाहू पाटोळेच्या ‘अन्न हे अपूर्ण ब्रह्म’ या पुस्तकाच्या प्रकाशनात सुहास प्रमुख पाहुणा आणि मी अध्यक्ष होतो. भाषण करताना सुहासचं जे दर्शन किमान मला तरी घडलं ते फारसं सुखावह नव्हतं. बोलताना तो अडखळत होता. बोलतांना त्याच्या ओठातून फेस बाहेर येत होता, अंगातही किंचित, पण जाणवण्याइतकी थरथर होती. सुहास त्याच्या रसिकतेच्या सीमा ओलांडून असोशीच्या चक्रव्यूहात शिरल्याचं हे लक्षणं वाटलं. वयाचे इशारे लक्षात न घेता प्रसिद्धीच्या वलयात तो चांगलाच रमलेला असल्याचंही बोलतांना जाणवलं. त्याबद्दल त्याच्या आणि मिलिंद देशपांडेकडे स्पष्टपणे भीती आणि नाराजीही व्यक्त केली, पण बहुधा तोपर्यंत बराच उशीर झाला होता. नंतर बेगम मंगलाच्या प्रदीर्घ आजारपणात मी गुंतून गेलो. सुहासच्या भेटीगाठी खूपच कमी झाल्या, नंतर करोना आला. डॉ. मिलिंद देशपांडे, डॉ. अविनाश येळीकर आणि अशात जयदेव डोळे कडून सुहासच्या तब्येतीचं वर्तमान समजत होतं. खिळखिळा झालेला त्याचा देह बघण्याची माझी हिंमतच झाली नाही; मित्रांनी अनेकदा सुचवूनही ती भेट मी ठरवून टाळत गेलो. रसरशीत, डौलदार आणि बहरात असताना बघितलेल्या सुहास जेवळीकर नावाच्या झाडाला, पानगळ होताना बघणं शक्यच नव्हतं.
...आणि मग भल्या पहाटे आली ती त्याच्या अपेक्षित मृत्यूची वार्ता. ती आल्यावर कितीतरी वेळ मी सुन्नपणे बसून राहिलो. सुहास तसा वयानं माझ्यापेक्षा धाकटा होता. धाकट्याच्या मृत्यूचे वळ दिसत नाहीत, पण ठसठसत राहतात…
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment