आजच्या तरुणाची ‘ही’ अवस्था तर, ‘उद्याच्या माणसा’चे चित्र कसे असेल? मला तरी ते चित्र तंत्रसज्ज आदिमानवासारखे मुक्त, निसर्गप्रेमी दिसते. मनाची ती खरी ‘लोकशाही’ अवस्था!
ग्रंथनामा - झलक
दिनकर गांगल
  • ‘लोकशाही समजून घेताना’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 04 March 2022
  • ग्रंथनामा झलक लोकशाही समजून घेताना Lokshahi Samjun Ghetana दीपक पवार Deepak Pawar लोकशाही Democracy उत्क्रांती Evolution डिजिटल युग Digital Era तंत्रज्ञान Technology

२५ जानेवारी हा ‘राष्ट्रीय मतदार दिन’. त्यानिमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्यातर्फे ‘लोकशाही समजून घेताना’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात महाराष्ट्रातील ३३ मान्यवर लेखकांच्या लोकशाहीच्या विविध पैलूंचा आढावा घेणाऱ्या लेखांचा समावेश आहे. या पुस्तकातील लेख ‘अक्षरनामा’वर २ फेब्रुवारीपासून क्रमश: प्रकाशित करत आहोत...

..................................................................................................................................................................

लोकशाही ही माणसाने संशोधलेली समाजव्यवस्थापनाची सर्वोत्कृष्ट पद्धत मानली जाते. माणसाने एकत्र, समूहाने जगण्याचे काही प्रकार; अराजक, समूह, गट, सरदारकी (सरंजामशाही), राजेशाही, अशा स्वरूपात त्याआधी कित्येक सहस्र, वर्षे अनुभवले होते. त्या सर्व ठिकाणी त्याला गैर व्यवस्थापन व जुलूम-जबरदस्तीच अनुभवास आली. अगदी कल्याणकारी राजा असला, तरी त्याची भलेपणाची मनमानीही जनता सहन करू शकत नाही. लोकशाहीचे बावनकशी सोने अशा विविध अनुभवांतून तावूनसुलाखून बाहेर आलेले आहे. ती पारख भारतीय जनता गेली सत्तर-पंचाहत्तर वर्षे करत आहे. लोकशाहीचे हे वर्णन मनोरम आहे, कोणाही व्यक्तीस आकर्षक वाटेल असे आहे. स्वाभाविकही आहे, कारण लोकशाही जीवनाची तत्त्वे तीन-चारशे वर्षांत विविध प्रयोगांतून विकसित होत आली आहेत.

त्याबरोबर, समूह जीवनातील आणखी एक गृहीतक आहे; ते म्हणजे, मनुष्य हा समाजप्रिय, कुटुंबप्रिय प्राणी आहे. म्हणजे तसे आपण गायी-गुरांच्या, वाघ-सिंहांच्या, समुदायाने स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या बाबतीत म्हणत नाही. ते कळपाने राहतात, थव्याने उडतात, पण ते कोणाचे कोण नसतात. मनुष्य वस्त्या मात्र समूह जीवनाच्या नियोजनानुसार वसलेल्या दिसून येतात. कुटुंब एका घरात राहते, विशिष्ट प्रकारे - जात, धर्म, नोकरीपेशा वगैरे - वर्गीकृत केलेले लोक विशिष्ट वस्त्यांत वा देशांत राहतात. भारतात तसा अभिमान लोकांना राज्यांचा, जातिसमूहांचा, घराण्यांचा वाटत असतो; आणि अमेरिकेत गेले तर तो अभिमान इटली-आयर्लंड या मूळ देशांचा जाणवून येतो. माणसांच्या व्यक्तित्वांना या ओळखी वा अस्मिता आवश्यक वाटतात. माणसांना विशाल समुदायात मिसळताना त्या हव्या असतात. लोकशाहीत कधी-कधी त्या लक्षणीय व प्रबळही होतात. तशा वेळी माणसाला त्याचे पूर्वीचे टोळीजीवन आठवले, असेही म्हणता येऊ शकते. अफगाणिस्तानात तो अनुभव वारंवार येतो, परंतु आपल्याकडेही काही पुढारी टोळी जीवनातून आले असावेत, असे त्यांचे वर्तन वाटते ना!

विचारचर्चेच्या ओघात असे जुने संदर्भ निघाले की, माझे मन मला पार पुरातत्त्व काळापर्यंत घेऊन जाते. मग मला कित्येक वेळा आफ्रिकेतून निघालेला पहिला माणूस-आदिमानव दिसतो. एक, दोन, तीन अशी आदिमाणसे... वाढत वाढत काही सहस्र, काही लक्ष व मग कोटी या संख्येने जगभर पसरलेली दिसतात. सध्या ती सातशे कोटींच्या आसपास आहेत, हेही जाणवते. त्यांचा साधारण लाखभर वर्षांचा इतिहास. ती चित्रे अमूर्त, अस्पष्ट असतात. आकाशात ढग जसे जात असतात ना, तसेच काहीसे ते असते. त्यात आदिमानवांनी लावलेला आगीचा शोध, त्यांचे राहण्यास अनुकूल भूमीचे शोध, त्यांचे त्यांना झालेले शरीरावयवांचे आकलन, त्यांचे शेतीत स्थिरावणे, अशा अनेक गोष्टी भासतात. सगळे एकात एक मिसळलेले असते. नंतर मग आफ्रिका हा केवळ आरंभबिंदू राहतो. माणसे जगभर पसरली आणि कोठेही-कशीही स्थिरावली, ते जाणवते. त्यात भूस्खलन, समुद्रपट्ट्यांचा विस्तार असे सारे असते. पृथ्वीवर आधी पाच खंडे होती, ती सहा कशी झाली? डोंगरपर्वत, दऱ्या तयार कशा झाल्या? उंचच्या उंच हिमालय उभा कसा राहिला? त्यामुळे उत्तरेकडून येणारे वारे अडवले गेले आणि भारतीय उपखंड नावाचा सुरक्षित, समशीतोष्ण हवामानाचा, जवळ-जवळ सर्वत्र सुपीक असा भूप्रदेश तयार झाला. त्याबद्दल मनात आत्मीय भावही जागा होतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

आरंभीच्या आफ्रिकेतील माणसांच्या पाठोपाठ जगाचा असा भूगोल दिसू लागतो. समुद्र व जमीन यांचे नाते स्पष्ट होते. तेथे माझ्या नजरेसमोरची अमूर्त, धूसर चित्रसरिता संपते आणि वेगवेगळ्या संस्कृतींचा प्रवास चक्क दिसू लागतो. इजिप्त, ग्रीस, मेसोपोटेमिया, अशा आद्य सात संस्कृतींची वैशिष्ट्ये कळू लागतात; मनावर बिंबू लागतात. कृषी, कायदे, धर्म, शिक्षण, अर्थव्यवस्था, कला, असे सारे घटक त्यात येतात. त्यांचा अभ्यास व विकास... माणसाने केवढी मजल मारली ना! त्यातच असते शासन-प्रशासन; म्हणजेच समाजाचे व्यवस्थापन. मनुष्यसमूहांनी शिस्तीत, नीटनेटके जगावे म्हणून तर हा सारा विकास घडून आला - घडवून आणला ना! त्या संस्कृतींतील आदानप्रदान, व्यापार-व्यवहार, सारे अचंबित करणारे असते. सिल्क रूटसारखे युरोप-आशिया यांना जोडणारे प्राचीन व्यापारी मार्ग, त्यावरून झालेली दौड ते अगदी दोन-अडीचशे वर्षांपूर्वी युरोपीयनांनी अमेरिकेत केलेली वसाहत आणि तेथेच, पुढे त्यांनी आणलेले कायद्याचे राज्य, प्रस्थापित केलेली लोकशाही. लोकांनी लोकांसाठी तयार केलेले लोकांचे राज्य! तो मंत्र इतका साधासोपा, सरळ, निरागस, निष्पाप, भातुकलीच्या खेळात मुलांनी म्हणावा तसा वाटतो! पण, केवढी शक्ती आहे त्या मंत्रात! जगातील बहुसंख्य देशांचे व्यवस्थापन आज त्या मंत्राने होत आहे. ज्या देशांत हुकूमशाहीसमान राज्यव्यवस्था आहे, त्यांनादेखील त्या-त्या ठिकाणी ती या मंत्राच्याच आधाराने आणावी लागली आहे.

माणसे, माणसांच्या टोळ्या, त्या टोळ्यांतून आलेली राजेशाही आणि त्यांच्यामधील ती धमासान युद्धे! त्यांतील वीरांचे पराक्रम, त्यांच्या कथा, त्यांतून मिळणारे स्फुरण. त्यातूनच तयार झालेले भेदाभेद. आरंभीची माणसे किती निष्पाप, निरागस असतील ना! परंतु त्यांना प्रत्येकाला जेव्हा ‘स्व’ची जाणीव होत गेली असेल, तेव्हा हिताहिताची भावना तयार झाली असणार आणि त्यातूनच निर्माण झाले माणसा-माणसांचे हितसंबंध. त्या हितसंबंधांनी मानवी संस्कृतीत साऱ्या विकृती निर्माण केल्या. माणूस इतिहास विसरला तर किती सुखी होईल! ना राहील अन्याय-अत्याचार, ना जुलूम-जबरदस्ती-अतिरेक, असे एक विचार सांगतो. पण लक्षात ठेवले पाहिजे की, त्याबरोबर सगळी प्रगतीही विस्मरणात जाईल. नकोत त्या गोष्टी निवडून विसरता येत नाहीत. त्याकरताच तर मानवी मनात दुष्टभाव निर्माण होणार नाहीत, असे संस्कार प्रत्येक संस्कृतीत सतत कोणत्या ना कोणत्या निमित्ताने चालू होते आणि आता, एकूण मनुष्यजातीचा तो प्रयास आहे. विकृतीतून निर्माण झालेली मानवी संस्कृतीतील सर्वात भीषण कुप्रथा म्हणजे पाश्चिमात्य देशांतील गुलामी आणि भारतातील जातिभेद.

पण त्याचबरोबर हे नोंदले पाहिजे की, मानवी संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे बिघाड येत गेले, तरी ती गेली दोन हजार वर्षे सतत प्रगतिशील, पुरोगामी राहिली आहे. तोही इतिहासाचा भाग आहे. माणसाने जगण्यासाठी शांततेचे, सौहार्दाचे नवनवे तत्त्वज्ञान त्यातून निर्माण केले आहे. त्यातूनच जीवनाचा अर्थ शोधला आहे. कोठेही-कोणताही अतिरेक दिसला की, तो लगेच, इतिहासक्रमाने दुरुस्त केला जातो. ताज्या संदर्भासाठी रशियाचे उदाहरण घेऊ. कारण, मानवी इतिहासाच्या चढउताराचा तो आलेख रशियात गेल्या शंभर वर्षांत उद्बोधकरित्या दिसून येतो. तेथे झारशाही नष्ट होऊन कम्युनिस्ट राजवट आली, लेनिनसारखा द्रष्टा नेता क्रांतियुद्धास लाभला. त्या उच्च मूल्याधारावर प्रस्थापित झालेली राज्यव्यवस्था स्टालिनच्या जुलमी कारवायांमुळे निरर्थक ठरली. नोकरशाहीने मूल्याधार नाहीसा केला. त्यातून गोर्बाचेव्ह देशाला सावरत आहे तो पुतिनशाही अवतरली आहे. रशिया स्टालिनने केलेल्या त्या पडझडीतून अजूनही सावरत आहे. त्यांच्या प्रभावाखालील त्या प्रदेशातील छोटीमोठी राज्येही जगण्यासाठी नवा आधार, नवा मंत्र शोधत आहेत. परंतु एक आहे की, लोकांना या इतिहासक्रमात प्राप्त झालेली ताकद अबाधित आहे, हे तेथील छोट्यामोठ्या उद्रेकांतून, चळवळींतून अगदी कोरोना काळातही दिसून आले. किती तडफ, जगण्याची जिद्द आहे त्या लोकांत! ‘नो मॅन्स लँड’ नावाचा अप्रतिम चित्रपट तेथील दोन छोट्या स्लोव्हाक देशांतील घटनांवर काही वर्षांपूर्वी बनला होता. त्याला ऑस्कर अॅवार्डही मिळाले होते. त्याची आठवण त्या भागातील घटना पाहिल्या की होत असते. छोटी राज्ये ही मानवी भावभावनांनी अधिक प्रेरित होत असतात, असे जाणवते.

त्या उलट गोष्ट चीनची. साठ-सत्तर वर्षे झाली, माओने तेथे कम्युनिस्ट पक्षाला जवळ-जवळ एकहाती सत्ता मिळवून दिली. तेथील जनतेला सर्व सुखे आहेत. चीनची तुलना भारताशी होते. भारत हा लोकशाही देश, उलट चीनमध्ये एकपक्षीय, कम्युनिस्ट राजवट. तेथे विरोध, भिन्न मत सहन केले जात नाही, ते चिरडून टाकले जाते. जगात जवळ-जवळ सर्व देशांत मुक्ततेचे वारे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वाहिले, पण चिनी जनतेला ती कांक्षाच उरलेली नाही. माओ आणि त्यानंतरचे चिनी पुढारी यांनी तेथील जनतेची मने जणू बधिर करून टाकली आहेत की, जनता मुक्त विचार करूच शकत नाही! म्हणजे तेथील पती-पत्नीदेखील स्वतःला एक मूल हवे की, दोन-तीन हे ठरवू शकत नाहीत. म्हणजे आतापर्यंत तेथे जोडप्याला एक मूल असे बंधन होते. आता जगभर तरुणांची संख्या घटत आहे व वृद्धांची वाढत आहे, तर चीनने जोडप्याला तीन वा अधिक मुले हवीत, असा फतवा काढला आहे. मनाचा केवढा हा बंदिस्तपणा! पण या अपवादात्मक गोष्टी. इतर सर्व देशांत माणूस स्वतंत्र भासतो, त्याच्यातील विकृती सतत दुरुस्त करून घेतो, असे आढळून येईल.

जातिभेद, वर्णद्वेष अशा प्रकारच्या विकृती इतर देशोदेशीही आहेतच; पण माणसांनी त्या साऱ्याही दुरुस्त करत आणल्या आहेत. पाश्चिमात्य देशांत ‘black lives matter’ ही मोहीम दोन वर्षांपूर्वी सुरू झाली. बघता-बघता, कोरोना काळ असूनही त्या चळवळीने अमेरिका, युरोप, आफ्रिका अशी तीन खंडे व्यापली. ती काळ्या माणसांच्या हक्क रक्षणासाठी होती. ती जगभर आर्ततेने फैलावली. ही जाणीव नवी आहे. ही चळवळ हे आजच्या संस्कृतीचे लेणे आहे. त्या मोहिमेतील एक प्रसंग मात्र मानवी जीवनातील-संस्कृतीतील हास्यास्पद विसंगतीचा म्हणून मनात ठसून राहिला आहे, तो नोंदला पाहिजे. माणसाचे मानसिकदृष्ट्या पुढे जाणे व मागे येणे हे त्यातून दृगोचर होते.

इंग्लंडमधील एका शहरात, गुलाम विकत घेणाऱ्या गलेलठ्ठ हस्तकाचा पुतळा ऐतिहासिक निशाणी म्हणून अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत उभारला व जपला होता. ‘ब्लॅक लाइव्हज’ निदर्शकांनी तो पुतळा पाडून टाकला! आता, इतिहासाची ती खूण जपायची तर ती माणसाला त्याच्याच संस्कृतीतील अत्यंत दुष्ट प्रथेची आठवण देत राहणार; ती खूण पाडून टाकायची तर माणसाने स्वत:चा इतिहास स्वत: पुसून टाकल्यासारखे होणार! कोणाही सुसंस्कृत माणसास ते सहन होणार नाही. माणसाच्या मनाची प्रगल्भावस्था व त्याच्या मनातील स्खलन अशा दोन्हींचे दर्शन अशा घटनांमधून होते. माणसाच्या ज्ञानसाधनेच्या परंपरेत अशा ऐतिहासिक खुणांना किती अपार महत्त्व आहे, हे ते अभ्यासकच जाणोत! अशी मोठी मौज मानवी संस्कृतीच्या इतिहासात ठायी ठायी आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

लोकशाही तत्त्वांचा विकासदेखील गेल्या तीन-चार शतकांत टप्प्याटप्प्याने होत गेलेला आहे. त्यांतील फ्रेंच व अमेरिकन राज्यक्रांती हे टप्पे मोठे असले, तरी संसदीय पद्धतीचा विकास मुख्यत: इंग्लंडमध्ये घडून आला. त्या काळातील इंग्लंडचा इतिहास असाच, अनेक विसंगतींनी भरलेला आहे. म्हणजे, त्यांना उदारमनस्क म्हणायचे की जुलमी, अन्यायकारी?

अगदी ठळक, ठसठशीत उदाहरण म्हणजे ब्रिटिश सुधारक लोक देशांतर्गत नागरिकांना, विशेषत: महिलांना विविध तऱ्हेच्या मुभा देण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांचा खटाटोप त्यांचे जगभर पसरलेले साम्राज्य राखून ठेवण्यासाठी देखील चालू होता! पण, इंग्लंडमधील व पुढे अमेरिकेतील प्रयत्नांतून जगभरच्या आम लोकांचा मतदानाचा हक्क अबाधित झाला हे सत्यच. निवडणुकीचे ते लोण देशोदेशी पसरले. ब्रिटिशांना व अन्य युरोपीय देशांना त्यांची साम्राज्ये अखेरीस बरखास्त करावी लागली.

परिणामत: जगभरची दीडदोनशे राष्ट्रे गेल्या सत्तर-ऐंशी वर्षांत स्वतंत्र झाली आणि त्या-त्या राष्ट्रांतील जनतेने, त्यांच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन स्वराज्ये स्थापन केली. ती बहुतेक सर्व राज्ये अनेक अडथळे पार करत-करत लोकशाही राजवटींचे अनुभव घेत आहेत. निवडणूक हे त्या राजवटीचे प्रमुख लक्षण मानले जाते व त्यामुळे मतदान या गोष्टीस लोकांच्या जीवनात अनन्य असे महत्त्व प्राप्त होते. प्रत्येक व्यक्तीचे मत महत्त्वाचे; मग ती व्यक्ती शिक्षित असो वा अशिक्षित-अडाणी. मतदानामुळे लोकांना हवा तो उमेदवार राज्यकर्ता म्हणून निवडून देता येतो व अशा तऱ्हेने, लोकशाही ही विशाल संकल्पना राजकारणाला येऊन भिडते आणि ती राजकारणापुरती मर्यादित राहते. ती समाजव्यवस्थापनाची एक रीत होऊन जाते. ती गफलत ‘शाही’ या संज्ञेमुळे होते का? त्या आधी राजेशाही होती, कोठे हुकूमशाही होती, म्हणून ही झाली लोकशाही - लोकांची शाही, लोकांची राजवट!

लोक सगळे उठून, एकत्र मिळून तर राज्य चालवू शकत नाहीत, म्हणून त्यांच्या प्रतिनिधींनी करण्याचे राज्य म्हणजे लोकशाही राज्य, अशी कल्पना बनत गेली. त्यामध्ये विविध तऱ्हा विकसित झाल्या, परंतु गाभा कायम राहिला की, लोकांनी प्रतिनिधी निवडून द्यावे आणि लोकांनी निवडून दिलेल्या त्या प्रतिनिधींनी मिळून त्या-त्या समाजाचे व्यवस्थापन करावे. ते सूत्र गाव पातळीपासून देश पातळीपर्यंत तेच असल्याचे आढळून येईल. ग्राम व्यवस्थापनापासून राष्ट्र व्यवस्थापनापर्यंतची सुविधा निर्माण करण्याकरता निवडून देण्यात येणारे प्रतिनिधी आणि त्यांच्या सभा (ग्रामसभा, नगरसभा, विधानसभा, लोकसभा) म्हणजे लोकशाही, असा आणि एवढाच अर्थ मनात ठसला गेला आहे.

लोकशाही ही संकल्पना लोकेच्छा, लोकमानस म्हणून खरोखरीच अभूतपूर्व व कल्पनातीत श्रेष्ठत्वाची आहे. ती व्यक्तीला तिच्या कुवतीनुसार सर्वोत्तम उत्कर्ष साधण्यास मदतशील ठरू शकते. परंतु, लोकशाही ही संकल्पना समाजव्यवस्थापनासाठी म्हणून उपयोजिली गेली व मर्यादित झाली. ती राजकारण या विद्याशाखेशी बांधली गेली, लोकशाही संकल्पनेचा अभ्यास व तिची मांडणी तशाच राजकीय स्वरूपाची होत गेली.

खरे-खोटे माहीत नाही, परंतु भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महात्मा गांधी यांच्या तोंडचे एक वाक्य सांगितले जाते, ते आशयपूर्ण आहे. ते ब्रिटिशांना उद्देशून आहे. गांधी त्यांना म्हणतात, “तुम्ही मला स्वातंत्र्य देणारे कोण? मी माझा स्वतंत्र आहे!” कदाचित गांधी ते वाक्य म्हणतात म्हणून ते भारतीय समाजाचे प्रातिनिधिक वाक्य आहे, असे म्हणता येईल. परंतु, त्यात व्यक्तीला स्वत:च्या हक्कांची जाणीव आहे, स्वाभिमानाची जाणीव आहे, तशी जबाबदारीचीही जाणीव आहे आणि ही जाणीव हाच लोकशाही कल्पनेचा गाभा आहे. स्वत:च्या जीवनाचे व्यवस्थापन स्वत: करणे!

ते सूत्र समूहाला लागू केले की, गणित थोडे बदलेल. हक्क, स्वाभिमान, जबाबदारी हे गुणविशेष व्यक्तीचे आहेत. ते समूहाला लागू होत असताना त्यात अनेक वळणे व वळसे तयार होतात. त्यात स्पर्धा, चढाओढ शिरू शकते आणि लोकशाही संकल्पनेचा मूळ गाभा, जे व्यक्तिस्वातंत्र्य त्यालाच बाधा येऊ शकते. टीव्हीवरील जाहिरात आठवते? ‘माझा मुलगा मला पळण्याच्या शर्यतीत हरवेल, तेव्हा मी खरी जिंकलेली असेन!’ आईच्या व्यक्तित्वाचा हा विलोप किती उदात्त आहे ना! ही आहे व्यक्तिस्वातंत्र्याची समज!

व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार करत असताना, मला पुन्हा आदिमानवाचे, तो पृथ्वीतलावर मोकळेपणाने फिरत असतानाचे रूप आठवते. त्याला धोका पाऊस-वादळवाऱ्याचा, रानटी पशुपक्ष्यांचा व तशाच नैसर्गिक घटकांचा होता. मनुष्यनिर्मित संकटे त्या काळी जवळ-जवळ नसणार. म्हणजे, त्याच्या वाटा चुकत असतील, खड्ड्यांचे अंदाज बिनसत असतील, पण त्या चुकांतून तो शिकत असेल. ती त्याने मानवी संस्कृतीच्या दिशेने टाकलेली पावलेच होती. माणसांच्या स्वभावाची, मन:प्रकृतीची घडण ही अशीच होत गेली.

हा विषय असाच विस्तारत नेला तर मानवी मनाच्या आजच्या गुंतागुंतीचा बोध होऊ शकतो. ही उत्क्रांती जाणण्यासाठी चार्ल्स् डार्विन, सिग्मंड फ्रॉईड आणि त्यांच्यासारखेच समाजशास्त्रज्ञ खूप उपयोगी पडतात. परंतु, मूळ आहे ते प्रत्येक व्यक्तीची स्वेच्छा, तिचे स्वातंत्र्य. त्या स्वातंत्र्याचा घात केव्हा होऊ लागला, तर दुसऱ्या माणसाची इच्छा, त्याचे स्वातंत्र्य यांचा संकोच त्याच्याकडून होऊ लागला तेव्हा. स्वाभाविकच दोघांचे हित वेगवेगळे झाले. ते एकात्म असेल तर दोन व्यक्ती पूरक होतात आणि दोघांच्या हितात फरक निर्माण झाला तर त्या विरोधक बनतात. असे हिताचे आणि त्यातून संबंधांचे राजकारण लोकशाहीत सुरू होते.

उत्क्रांतीच्या इतिहासात भाषेचा शोध हे माणसाला गवसलेले पहिले मोठे तंत्र. त्यातून ‘कम्युनिकेशन’ सोपे झाले. आचार्य अत्रे यांची १९३०च्या दशकातील ‘बोलका ढलपा’ नावाची कथा आहे. त्यात दोन गृहस्थ लाकडाच्या ढलप्यावर कोळशाने लिहून एकमेकांना निरोप देतात. त्यांच्या घरचा निरक्षर, अडाणी गडी त्या ढलप्याची ने-आण करतो. तो - त्या दोन गृहस्थांना एकमेकांचे म्हणणे कसे बरे कळत असेल - या कल्पनेने अचंबित होतो!

भाषेचे सूत्र साधारण तीस हजार वर्षांपूर्वी माणसाला कळले. मग जगभरच्या विविध मानवी समुदायांनी त्यांच्या-त्यांच्या भाषा विकसित करत नेल्या. माणसे त्यांच्या मनांतील भावनाविचार तोपर्यंत चित्रादी अन्य माध्यमांतून व्यक्तवत असणार. कोकणातील कातळशिल्पे, मध्यप्रदेशातील भीमबेटकासारख्या गुहांतील चित्रे, यांचे अर्थ व त्यांची उपयोगिता याबाबत निश्चित विधान काहीच करता येत नाही. परंतु, भाषेचा व अक्षरलेखनाचा शोध लागल्यानंतरच्या मानवी प्रगतीचा आलेख बऱ्याच विश्वासार्ह पद्धतीने मांडता येतो. कारण, एका माणसाने लिहिलेले - तो बोललेला दुसऱ्या माणसास इत्थंभूत कळू शकते. माणसांचे भावनाविचार एकमेकांना समजू लागल्यावर मोठीच गंमत उडाली असणार. माणसांचे समूह उल्हसित झाले असणार, माणसाला त्याची सृजनाची शक्ती जाणवली असणार व म्हणून त्याला स्वत:चे सभोवतालापेक्षा वेगळेपणही स्पर्श करून गेले असणार. त्यातूनच तर मानवी समूह (टोळ्या) निर्माण झाले असणार. मानवी संस्कृतीतील तो काळ मनाशी गुंफत बसलो तर तो मोठा मनोरंजक खेळ होतो. त्यात तर्कशक्तीलाही आव्हान असते.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

माणूस जाणता झाल्यावर त्याला घडवण्यात विचारांचा वाटा मोठा आहे. विचार कधी स्वतंत्रपणे प्रभावी ठरत गेले, कधी ते धर्माच्या अंगाने पसरले. भारतासारख्या देशात तर धर्मविचार ही जीवनरीत बनून गेली. तेच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य अभिमानाने सांगितले जाते. येथे अनेक धर्मपंथ झाले, वेगवेगळे तत्त्वज्ञान मांडले गेले, मानवी जीवनाचा अर्थ काय? आणि मी तरी कशासाठी - ‘को ऽ हम’ - असे मूलभूत प्रश्न माणसाने आरंभापासून चर्चिले, त्याचे भौतिक जीवन आणि वैचारिक-भावनिक जीवन यांचा शोध तो विविध कलांच्या अंगांनी घेत गेला. काही काळ, ती व्यवस्था निकोप वाटली असणार, पण त्यातून भीषण रूढींनी जीवनाचा कब्जा घेतला आणि एवढ्या मोठ्या भूभागावरील सारा समाजच्या समाज कित्येक शतके अज्ञानांधकारात बुडून गेला!

पण दुसरीकडे, युरोप खंडात माणूस जागा झाला. त्याने त्याची विचारशक्ती व तर्कशक्ती जागती ठेवली. ती माणसाला कोठच्या कोठे घेऊन गेली आहे! तो युरोपातील रेनेसान्सचा काळ मोठा विलोभनीय आहे. तो शोध अजून संपला आहे असे वाटत नाही. विज्ञानाचे उपयोजित अंग -तंत्रविज्ञान - गेल्या शतकभरात चहू अंगांनी विस्तारले आहे. आल्विन टॉफलरसारखे भविष्यवेत्ते त्यालाच औद्योगिक क्रांतीच्या पुढील टप्पा असे म्हणतात. मात्र रेनेसान्सच्या काळात नवनव्या शोधांबरोबर नवनवे विचारमंत्र आले, कला-तत्त्वज्ञानातील सिद्धांत मांडले गेले. तसे तंत्रविज्ञानातील सध्याच्या शोधांच्या बरोबरीने घडत नाही. वैचारिक प्रगल्भतेत माणूस कमी पडत आहे. लोकशाही संकल्पनेचा वाढत्या व्यक्तिस्वातंत्र्यासंबंधात अर्थ लावताना त्यामुळेच अडचणी निर्माण होत आहेत का?

लोकशाही हे मानवी जीवनविकासाच्या तत्त्वज्ञानातील एक तत्त्वज्ञान, विचारपद्धत आहे. तशा तऱ्हेने ते विविध देशांच्या घटनांमध्ये समाविष्ट आहे. त्यात लोकांकडे त्यांच्या जीवनाचे व्यवस्थापन सोपवणे अभिप्रेत आहे. ते केंद्रित पद्धतीने प्रतिनिधीगृहांमार्फत साधले जाऊ शकते वा विकेंद्रित पद्धतीने गाव-गावे त्यांचे निर्णय ती घेऊ शकतात.

गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा (लेखा) गावी तसा एक प्रयोग यशस्वी करून दाखवण्यात आला आणि त्यानंतर विदर्भातील आणखी काही गावांनी त्यांच्या पद्धतीने तो धडा अनुसरला. पण, तो प्रयोग सार्वत्रिक म्हणून यशस्वी होऊ शकला नाही. लोकशाही विचारांच्या दृष्टीने तेवढे औत्सुक्यपूर्ण लक्षही तिकडे वेधले गेले नाही. दरम्यान, लोकशाही नावाची राज्यपद्धत, प्रशासनाची रीत राजकारण्यांनी आणि व्यावसायिक नोकरशहांनी पळवून नेली आहे. तिच्यावर ताबा त्या मंडळींचा आहे आणि त्यांनी आमजनांना परावलंबी करून वेठीस धरले आहे. एक वेगळ्याच प्रकारची आर्थिक हितसंबंधांची गुलामी. लोकशाही म्हणजे सत्तेचे राजकारण असा अर्थ रूढ होऊन गेला आहे. गांधीजींनी ब्रिटिश पार्लमेंटचे व तेथील राजकारणाचे वर्णन ‘वेश्या व्यवसायासमान’ असे ‘हिंदस्वराज’ या त्यांच्या पुस्तकात केले आहे.

योगायोगाने, तंत्रविज्ञानाचा विस्तार त्याच काळात सुरू झाला. तंत्रविज्ञान ही अद्भुत सिद्धी माणसाला गेल्या शतकभरातच प्रत्ययाला आलेली आहे. तंत्रविज्ञानाची गेल्या तीन दशकांतील प्रगती तर ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ या गतीने होत आहे. त्यामुळे जगभरची माणसे दिपून गेली आहेत व त्याच वेळी त्यांची त्यांना स्वसामर्थ्याची चाहूल लागली आहे. तेथे कोणी त्यांचा नेता नाही. तरीही त्यांना काही उलगडेनासे झाले आहे.

‘पिपली लाइव्ह’ या सिनेमातील बकरीवाल्या सर्वसामान्य माणसाची चित्रपट संपल्यानंतरची हकिगत काय असेल बरे? आधुनिक मीडियाने त्याला भंडावून सोडले, त्याचा नको जीव केला, तो बकरीवाला गर्दीत नाहीसा झाला, तो नाहीसाच झाला! ‘पिपली लाइव्ह’ ही आजच्या कम्युनिकेशनच्या युगातील मीडिया नाट्याची गोष्ट आहे. फार वास्तव आहे. तो अडाणी माणूस जसा ‘हरवून’ गेला, तशीच स्थिती सध्या सर्वसामान्य माणसाची झालेली आहे. त्याला कशाचा उलगडाच होत नाही. अर्जुनाची भ्रांत अवस्था, मात्र गीता सांगण्यास श्रीकृष्ण आहे कोठे? हे नवे-नवे ज्ञान त्याला कोठे घेऊन जाणार आहे?

तंत्रविज्ञानाचा विकास गेल्या शतकभरात वेगाने, तरी टप्प्याटप्प्यानेच होत गेला आहे. ते टप्पे निरखता येतात. प्रथम त्याचा प्रभाव भौतिक जीवन सुखी करणारा होता. त्या सोयी स्वयंपाकघरापासून प्रवासाच्या साधनांपर्यंत जाणवत गेल्या. माणूस आनंदी होत गेला, सुखी होत गेला. त्याचे श्रम कमी झाले. ‘फाइव्ह डे वीक’सारख्या गोष्टी आल्या. मग त्याला कम्युनिकेशनमधील दिव्यता जाणवू लागली. ती सुरुवात टेलिव्हिजनने झाली आणि इंटरनेटने जग क्षणार्धाच्या टप्प्यात आणले. मग मोबाइल हे साधन आणि त्यामधील कॅमेऱ्याची सुविधा! बापरे बाप! माणसाची स्वत:ची सारी ताकद व्यक्त करण्याचे केवढे शस्त्र त्याच्या हाती आले!

माझे या नव्या काळाबद्दलचे काही लेखन मी ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ नावाच्या पुस्तकात काही वर्षांपूर्वी संकलित केले आहे. खरोखरीच, माणसाच्या हाती आलेल्या मोबाइलच्या छोट्या पडद्यावर एवढे अफाट जग मावलेले आहे! त्याला जे दर्शन हवे ते त्याने निवडावे. जगात अंतरच उरलेले नाही. ‘भूगोल इतिहासजमा झाला’ ही त्या काळातील ‘पॉप्युलर स्लोगन’ होती. मुंबई-सॅनफ्रान्सिस्को विमान प्रवासास चोवीस तास लागतात. तो असह्य झालेला प्रवासी तेव्हा वदता झाला, की हे लोक (म्हणजे तंत्रवैज्ञानिक) असे का करत नाहीत? प्रवाशाला विमानाने आकाशात न्यायचे आणि पृथ्वी पश्चिम दिशेला गोल फिरवायची की आले सॅनफ्रान्सिस्को! तेथे प्रवाशाला खाली उतरवायचे. सारा प्रवास पाच ते सात मिनिटांचा. त्यातील फँटसी सोडून द्यावी, पण ती सर्वसामान्य माणसाच्या डोक्यात यावी, एवढे तंत्रविज्ञान तळापर्यंत येऊन भिडले आहे. आता, मुंबई-सॅनफ्रान्सिस्को हा प्रवास सोळा-अठरा तासांवर आला आहेच! दरम्यान, पुढील टप्प्यात तंत्रविज्ञान ‘कम्युनिकेशन’मध्ये असे चमत्कार करत वैद्यक व इतर मूलभूत विज्ञान विषयांत फार भरीवपणे साहाय्यभूत होत, मनुष्य जीवनात कायमस्वरूपी स्थिरावत आहे.

तंत्रविज्ञानाने माणसाचे जीवन आमूलाग्र बदलणार आहे, हे प्रत्येक माणसास जाणवत आहे. माणसाच्या वापरात असलेल्या वस्तू व पद्धती यांपैकी पासष्ट टक्के वस्तू व पद्धती येत्या दहा वर्षांत बदलून जातील, असा अंदाज आहे. त्यामुळे माणसांच्या जीवनपद्धतीत मूलभूत परिवर्तन संभवते. ‘कुटुंबसंस्था दहा वर्षांनंतर शिल्लक असेल का?’ यासारख्या आत्यंतिक महत्त्वाच्या विषयावर खुल्या चर्चा सहजपणे सोशल मीडियावरील ग्रूप्सवर ऐकण्या-वाचण्यास मिळतात. हा मानवी व्यवस्थेतील मूलभूत बदल वाटत नाही? तो कळतोय पण वळत नाही, अशी स्थिती आहे.

अशा वेळी मला दोन गोष्टी ठाशीवपणे जाणवतात : एक म्हणजे, आपण सायबर विश्व नीट जाणून घेत नाही. दोन म्हणजे, बहुधा त्यामुळे मानवी जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा-जीवनोद्देशाचा विचार त्यानुसार विद्वानांच्या पातळीवर केला जात नाही. सायबर विश्वाचे प्रमुख गमक आहे व्यक्तिस्वातंत्र्य. ते जगात गेली तीस वर्षें अधिकाधिक वाढत चालले आहे. तंत्रवैज्ञानिक जगाच्या परमोच्च पातळीवर ते सूक्ष्मापर्यंत पोहोचलेले असेल. माणसाला दुसऱ्या माणसाची गरज भासेल, तेव्हाच तो दुसऱ्याशी संपर्क साधेल. कसा ते गरजेवर ठरेल. एरवी तो स्वान्त असेल. गेल्या तीस वर्षांत सामुदायिक चळवळी कोसळल्या, आंदोलने बंद पडली, त्याचे कारण माणसे स्वतंत्र व वेगवेगळ्या विचारांची होत चालली. त्यांना समुदायाची गरज राहिली नाही. मग माणसा-माणसांतील हे ‘कनेक्शन’ कसे असेल? मला दोन उदाहरणे उद्धृत करावीशी वाटतात. तलत महमूदचा (आणि असा प्रत्येक गायकाचा) फॅन क्लब जगभर चालतो. ती मंडळी त्या गायकाच्या जुन्या गाण्यांत रमतात, त्याच्या सुरावटींची नवनवी मांडणी करतात. ती आयुष्यात एकमेकांना कधी भेटली नाहीत, भेटणार नाहीत. हे उदाहरण सायबर विश्वातील माणसांच्या एकात्म भावनेचे आहे. तो भाव फक्त तलत महमुदच्या (वा त्यांच्या आवडत्या गायकाच्या) गाण्यापुरता असणार आहे. एरवी त्या माणसांचा या जगात एकमेकांशी काही संबंध असणार नाही वा येणार नाही.

आणखी एक उदाहरण. अरुण जतकर हे अमेरिकेतील इंजिनीयर. ते पुण्याच्या ‘नूतन मराठी विद्यालय’ शाळेत असताना, एक कविता शिकले होते. ती त्यांना उतारवयात एकाएकी आठवली. त्यांना कवी आठवेना. ते बेचैन झाले. त्यांनी इंटरनेटचा आधार घेतला. त्यांना कळले, की तो खंडकाव्यातील एक तुकडा आहे. ते सत्य त्यांना इंटरनेटच्या माध्यमातून तीन वर्षांनी गवसले! दरम्यान, त्यापोटी त्यांचा किती लोकांशी संपर्क झाला! त्यांचे जगातील अनेक छंदविषय, अभ्यासविषय चोखाळून झाले. ते एका वेगळ्याच आनंदात जगले! तंत्रविज्ञानाने माणसांच्या भौतिक गरजा घरच्या घरी भागवल्या गेल्यावर (जाणा, सर्व ऑनलाइन व्यवहार) त्याला फक्त अशा प्रकारची मानसिक-भावनिक-वैचारिक ओढ सतावत राहील व ती कशी पुरवावी, हे सायबर जगभरातील समछंदी लोक त्यास सुचवतील.

आम्ही ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’मध्ये मराठी भाषा-संस्कृती याबद्दलची माहिती संकलित करतो. आम्ही त्यास मराठी माणसांचे सायबर राज्य असेच संबोधतो. तेथे मराठी माणसाच्या मनाचे/बुद्धीचे अधिराज्य असावे, अशी कल्पना आहे. भौतिक गरजा भागवले जाण्याचे नमुने कोरोना काळात पाहता आले. स्थलांतरित मजुरांची परवड, आरोग्य व्यवस्थेची काही वेळा उडालेली दैना अशी संकटे भीषण होतीच; पण त्याच वेळी वर्क फ्रॉम होम, अत्यावश्यक सेवांची तरतूद, मोठे लसीकरण असे सुव्यवस्थापनही त्या काळात प्रत्ययास आले. त्याचा आधार आधुनिक तंत्रविज्ञान हा होता. त्या संबंधीचा अभ्यास नीट झालेला नाही.

तंत्रविज्ञान काळात त्याला समबल असा मंत्र/सिद्धांत लाभलेला नाही असे मी म्हटले, ती माझी समजूत आहे. विज्ञान, तर्कबुद्धी एकोणिसाव्या-विसाव्या शतकांत प्रबळ झाली आणि माणसाचे सर्व प्रश्न विज्ञान सोडवणार असे वाटले. परंतु, विसाव्या शतकाच्या अखेरच्या दोन-तीन दशकांत तंत्रज्ञानाने साऱ्या जगाचा ताबा घेतला. प्रगतीचा तो झपाटा सहन होईना. भविष्यवेधी वैज्ञानिकदेखील मानवी संस्कृतीचे वेगवेगळे टप्पे सांगताना हतबल झाले. थोर वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग जीवनाखेरीस निराशा व्यक्त करू लागले.

युवाल नोवा हारारी हे लेखक त्यांच्या लेखनाने सध्या जगभर गाजत आहेत. त्यांनी त्यांच्या ‘होमो डेअस - ए ब्रीफ हिस्टरी ऑफ टूमारो’ या पुस्तकात देखील निराशेचा, हतबलतेचा हलका सूर लावला आहे. माणसाचे देवत्व (dues – human God) म्हणजे व्यक्तीचे सामर्थ्य आहे. तो ते सामर्थ्य पणाला लावत नाही ही त्यांची तक्रार आहे. मात्र खरोखरीच, व्यक्ती तेवढी सामर्थ्यशाली बनू शकेल असे तंत्रज्ञानाचा प्रवास सांगतो. तंत्रविज्ञान त्याच्या आर्टिफिशल इंटेलिजन्स स्वरूपात माणसाच्या वरचढ होईल का, अशी भीती सर्वांनाच वाटत आहे.

करोना काळाने माणसांना समाजसंबंधांबाबतीत देखील वेगळे आत्मचिंतन करण्यास भाग पाडले आहे. कारण, ‘सोशल डिस्टन्सिंग’चा नवा मंत्र या काळाने दिला आहे. स्वभावत: माणूस एकटाच आहे. कुत्रे, मांजरे, मासे (पेट्स) पाळण्याचे वेड सध्या वाढत आहे. माणसाचा गिरिभ्रमण करण्याचा कल गेल्या काही दशकांत सहस्रपटींनी वाढला आहे. सायकलवाले, त्यांचे क्लब गावोगावी फोफावले आहेत. ही लक्षणे माणसाच्या पर्यावरण स्नेहाची जेवढी आहेत, तेवढीच त्याला एकटेपण अधिकाधिक प्रिय होत असल्याची आहेत! त्याला जेव्हा गरज लागते तेव्हा तो इतर माणसांना भिडतो. त्याच्या सर्व गरजा भागवण्यासाठी तंत्रविज्ञान त्याच्या हाताशी आहे!

जीवनावश्यक सेवेत गुंतलेल्या एका कर्मचारी संस्थेच्या सीईओने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी कृतज्ञतेचा, शुभेच्छांचा व्हिडिओपट प्रसृत केला आहे. तो माझ्या पाहण्यात आला. ते सीईओ म्हणतात, “उद्या निर्बंध संपतील, आपला सर्व स्टाफ कामावर येऊ लागेल, तरी आपले काम बराच काळ त्याच नियमांनी चालू ठेवावे लागेल. गर्दी करून चालणार नाही. अगदी जाण्यायेण्याच्या आपल्या प्रवासी बस पस्तीस प्रवाशांसाठी असल्या तरी त्या बसमध्ये पंधरा जणच बसू शकतील!”

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

हा संदेश येणाऱ्या काळाचा आहे. चीन हा भारतासारखाच खूप लोकसंख्येचा देश आहे. तेथे मी टेलिव्हिजनवर पाहतो, तेव्हा माणसे माणसांना चिकटलेली, गर्दी केलेली, हव्यासाने धावत असलेली दिसत नाहीत. तेथे साधनसंपत्ती बरीच आहे, सोयीसुविधा खूपच आहेत. भारतात तो अभाव आहे, त्यामुळे भारतात अधिक सुज्ञपणाने वागावे लागेल. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे अशी समजूत करून दिली गेलेली आहे. परंतु, वास्तवात माणूस त्याचे हित पाहून संबंध जोडत असतो, हे विचारसूत्र नीट ध्यानी घेतले, तर माणसाच्या समाजप्रियतेची व्याख्या बदलावी लागेल. ती आजच्या डिजिटल युगात ‘माणूस हा नेटवर्कने जोडलेला प्राणी आहे’ अशी करावी लागेल!

पुन्हा मला ते आदिमानवाचे चित्र दिसते. तो एकटा लाख वर्षांपूर्वी जग पादाक्रांत करत निघाला आहे. त्याने सोयीसोयीने माणसे जोडली आहेत. आजचा तरुण - समोर लॅपटॉप, हातात मोबाइल - मला त्या आदिमानवासारखाच भासतो. तो त्याला हवी ती गोष्ट मिळवतो, कोठेही जोडला जाऊ शकतो. त्याची वेगवेगळी ‘नेटवर्क’ असतात, तो वेगवेगळ्या ‘कम्युनिटीं’चा मेंबर असतो. ती नेटवर्क वा त्या कम्युनिटी त्या तरुणाच्या जीवनाचा भाग होऊ इच्छित नाहीत, ना तो तरुण ‘नेटवर्क’ना वा ‘कम्युनिटीं’ना त्यांच्या जीवनात शिरकाव करू देत. आजच्या तरुणाची ही अवस्था तर उद्याच्या माणसाचे चित्र कसे असेल? मला तरी ते चित्र तंत्रसज्ज आदिमानवासारखे मुक्त, निसर्गप्रेमी दिसते. मनाची ती खरी लोकशाही अवस्था!

पर्यावरणवाद्यांच्या मनात सध्या जसे निसर्गाचे चित्र असते, तसे ते कदाचित नसेल. पण एक ध्यानी घेतले पाहिजे, की माणूस हेदेखील निसर्गाचे अपत्य आहे आणि त्याचा असा विकास हादेखील निसर्गप्रणीत असेल! अशा तंत्रसज्ज माणसांचे लोकशाही व्यवस्थापन हेदेखील तितकेच प्रगल्भ, त्या संकल्पनेच्या विशुद्ध स्वरूपातील असेल, असा विश्वास मला वाटतो.

..................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................

लेखक दिनकर गांगल ‘ग्रंथाली वाचक चळवळी’चे आणि ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे संस्थापक आहेत.

dinkargangal39@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......