मराठीतील प्रसिद्ध चित्रकार, मुखपृष्ठकार बाळ ठाकूर उर्फ भालचंद्र शिवराम ठाकूरदेसाई यांचं ८ जानेवारी २०२२ रोजी वयाच्या ९२व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर त्यांच्यावर काही मराठी दैनिकांमध्ये श्रद्धांजलीपर लेखही छापून आले. प्रसिद्ध चित्रकार, मुखपृष्ठकार रविमुकुल यांनी ‘पद्मगंधा’च्या दिवाळी २०२१च्या अंकात लिहिलेला हा लेख त्यांच्या परवानगीसह खास ‘अक्षरनामा’च्या वाचकांसाठी... हा लेख ठाकूरांच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि त्यांच्या रेषेचं मर्म उलगडून दाखवतो.
.................................................................................................................................................................
आठ-दहा वर्षांपूर्वीची गोष्ट.
‘आशययन’ या दिवाळी अंकासाठी (संपादक - प्रकाश खाडिलकर) मी घेतलेल्या ज्येष्ठ चित्रकार वसंत सरवटे यांच्या मुलाखतीचा संदर्भ देऊन बाळ ठाकूरांना फोन लावला. त्यांचीही अशीच सविस्तर मुलाखत घ्यायची इच्छा सांगितली.
‘‘छे हो, माझी मुलाखत? काहीतरीच. नको, नको!!’’ अतिशय घाईघाईने त्यांनी उत्तर दिलं.
‘‘अगदी अनौपचारिक, सहज गप्पा मारू. कधी येऊ सांगा! सरवटे यांच्याबरोबरही अशाच गप्पा मारल्या होत्या आम्ही.” मी आणखी थोडं त्यांना सैल करावं म्हणून बोलत होतो.
‘‘सरवटे फार मोठे आहेत. त्यांच्यासारखं मला बोलता येणार नाही.’’ त्यांना हे बोलणं संपवण्याची घाई झाली होती.
‘‘ठीक आहे, आता मी काही बोलत नाही, पण तुम्ही जरा विचार करा, पुढच्या आठवड्यात पुन्हा फोन करतो.’’ आता जरा ताणलं तर थोडीही शक्यता शिल्लक राहणार नाही म्हणून मी आवरतं घेतलं.
दोन-चार दिवसांत कुरिअरने एक पाकीट आलं. वर पूर्ण पानभर ब्रशनेच मोठ्या अक्षरात माझा पत्ता लिहिला होता. असा पत्ता मी यापूर्वी आणि पुढेही (त्यांच्याकडूनच काही आलं तर, ते सोडून) पाहण्याची शक्यता नव्हती. अक्षरांवरूनच ओळखलं, हे ठाकूरांचंच. कारण त्यांचं ब्रशचं खास लेटरिंग दुसऱ्या कुणी कॉपी करणं शक्य नव्हतं.
पाकिटात त्यांची कुणीतरी घेतलेल्या थोड्या अॅकॅडेमिक स्वरूपाच्या मुलाखतीची फोटोकॉपी होती. शेवटचं पान नसल्यामुळे मुलाखत कुणी घेतली होती, ते कळलं नाही.
पूर्वतयारी म्हणून ठाकूरांनी हे पाठवलं होतं. माझ्या आशा जरा पालवल्या. मी मुंबईला कधी जाता येईल, याचा विचार करत होतो.
पुन्हा दोन-तीन दिवसांनी ठाकूरांचाच फोन आला.
‘‘कुरिअर मिळालंय. मी वाचलंय ते. पण मला जरा...’’ माझं बोलणं तोडत अस्वस्थपणे म्हणाले, ‘‘यातून मला मोकळं करा. तुम्ही ते (मुलाखतीचं) सांगितल्यापासून मला दुसरं काही सुचत नाही. ‘मौजे’ची चित्रंही राहिलीत. काही करता येत नाही मला.’’
त्यांच्या बोलण्यात अगतिकता दिसत होती.
मला अपराधी वाटलं. आपल्या मुलाखतीसाठी एका ज्येष्ठ सर्जनशील कलावंताला त्याची चित्रं पारखी व्हावीत, हे काही खरं नव्हतं. चित्रं महत्त्वाची. त्याहीपेक्षा ठाकूरांची मन:स्थिती. मी नाद सोडला.
‘‘थँक्यू!’’ ठाकूर सुटल्यासारखे बोलले.
मध्ये दोन-एक वर्षं गेली.
‘ओल्या वेळूची बासरी’ या ग्रेस यांच्या पुस्तकातली माझी चित्रं पाहून ठाकूरांचा फोन आला. अगदी अनपेक्षित. ‘‘ग्रेसची तुमची ड्रॉइंग्ज छान आहेत!’’ अगदी मोजक्या शब्दांत अभिप्राय. फार अघळपघळ बोलणं नाही. पण एवढ्या एका उदगारानेही मला फार आनंद झाला.
पुढे तर त्यांनी त्यांची आणखी वेगळी, मोठी पावती दिली. ग्रेस यांच्या माझ्या एका चित्रावरून ‘मौज’मध्ये त्यांनी चित्र केलं होतं. त्यांच्यासारख्या एका ज्येष्ठ चित्रकाराची अशी दाद! मग कधीतरी माझं काही आवडलं की, क्वचित फोन येत असे. एके दिवशी असाच त्यांचा फोन आला.
‘‘सध्या मी कोकणात माझ्या गावी - भांबेड इथे आहे!’’ खरं तर हे नाव लगेच लक्षात आलं नाही. पुढे अनेक वेळा उच्चार झाल्यावर ‘भांबेड’ हे लांजा तालुक्यातलं राजापूरजवळचं एक खेडं आहे, हे मनात ठसलं.
‘‘मागे तुम्ही म्हणाला होता, तर आता केव्हाही गप्पा मारायला या!’’
‘‘लवकरात लवकर येतो!’’ मी हे गाव कुठे आहे, कसे जायचे याचा कसलाही विचार न करता आनंदाने पटकन म्हणालो आणि मनातल्या मनात तयारीलाही लागलो. कुमारला (गोखले) पहिला फोन केला. तो लगेच तयार झाला. माझ्याच गाडीने कसलीही घाई न करता जायचं आणि परतायचा विचार आताच करायचा नाही. एक-दोन दिवस, अगदी तीन दिवस लागले तरी चालेल असं ठरवलं.
दुसरा फोन प्रकाशक मित्र अनिल कुलकर्णी यांना. त्यांचाही लगेच होकार आला आणि मार्च (२०१४) महिन्यातल्या एका सकाळी आम्ही तिघे निघालो.
ठाकूरांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर फाट्याला वळून पुढे विचारत विचारत निघालो. अधूनमधून मोबाईलवरून ठाकूरांचं मार्गदर्शन घेत होतोच. ड्रायव्हिंग अर्थात अनिलराव. तिघांनाही गप्पांचा सोस आणि प्रत्येकाकडे धमाल किस्से. शिवाय छान बरोबरीचं नातं, त्यामुळे मस्त आनंदात प्रवास चालू होता. अध्येमध्ये चहा, सिगरेटीसाठी थांबत थांबत. कारण कुणालाच कसली घाई नव्हती.
भांबेड या गमतीशीर नावाच्या गावात शिरलो. इकडे तिकडे तुरळक घरं. काही घरांवर डिश अँटेना, पण एकूण दर्शन जरा बाजूला पडलेल्या, संथ गतीनं राहणाऱ्या खेड्यासारखंच. ठाकूराचं घर मात्र अजूनही पुढंच होतं. एकदोघा कोकणी आखूड लुगडं नेसलेल्या बायकांना विचारलं,
‘‘बाळ ठाकूरांचा वाडा कुठंय?’’
‘‘म्हाइत न्हायी, पण ठाकूर देसायाचा पुढं हाय.’’
शेताच्या बांधानं कार धावत होती. एकदाचं पुन्हा पुन्हा विचारून खात्री करून घेत गाडी मोकळ्या जागी लावली. गाडीतल्या कॅमेऱ्याच्या बॅगा बरोबर घेऊन उतरलो. डावीकडे एका खोलात दुमजली, पुरातन, कौलारू ऐसपैस घर दिसलं. हाच ठाकूरांचा वाडा. साताठ जुन्या पद्धतीच्या उंच दगडी पायऱ्या उतरून खाली गेल्यावर सारवलेलं अंगण आणि कोपरा धरून दोन पाख्यात बांधलेला इंग्रजी एल आकाराचा वाडा.
दुपार संपून पाच वाजायला आलेले. वातावरणात एक शांतता पसरत चाललेली.
‘या!’ अगदी पातळ आवाजात ठाकूरसरांचं स्वागत. पांढरी सुती कोपरी आणि पायजमा असा साधा पेहराव. अस्सल कोकणस्थी वर्ण आणि धारदार नाक पाहताक्षणी नजरेत भरणारं, थोडं निरखून पाहिल्यावर दिसणारं मोठं कपाळ मस्तकात विलीन झालेलं. त्यामुळे डोक्यावर मागे हटलेल्या पांढऱ्या-करड्या केसांची अर्धवर्तुळाकार झालर. हनुवटीवर शुभ्र कातरलेली दाढी, ठळक रेखीव ओठांवर तशीच मिशी आणि फिक्या ब्राऊन बुबुळांची शांत स्थिर नजर.
घराचं छत तसं फार उंच नाही, पण भक्कम लाकडी सरांचं. जमीन शेणाने सारवलेली. डावीकडे मोठा जुना झोपाळा. जडशीळ पण वयामुळे मध्ये वाकलेला.
वर्षानुवर्षं ज्यांची चित्रं पाहत, आपण अवर्णनीय आनंद लुटत आलोय, असे ज्येष्ठ चित्रकार श्री. बाळ ठाकूर एक पाय खाली सोडून झोपाळ्यावर बसल्यावर एक छान दृश्य तयार झालं. शिवाय या फ्रेममध्ये पाण्याचा तांब्या-फूलपात्र, झोपाळ्याच्या कडीत अडकवलेलं वर्तमानपत्र, कडेला एक घडी घातलेली शाल हा ऐवज आल्यावर परिपूर्णता आली. आम्ही फोल्डिंगच्या खुर्चीवर बसलो. तिथल्या वातावरणामुळे आमच्यातही एक सैलपणा भिनला होता.
‘‘तुम्ही ठाकूर-देसाई की ठाकूर?’’ मी.
‘‘ठाकूरदेसाई! पण इकडेच. बाकी पुण्या-मुंबईत ठाकूर एवढंच.’’ सरांचा आवाज अगदी बारीक, हवेच्या सूक्ष्म कंपनांतून तयार होणारा असा. फार लक्ष देऊन ऐकावं लागणार.
एका स्टीलच्या ताटातून चहाचे कप घेऊन एक तरुण, मुलगा आला. हा त्यांचा नातू. भिंतीवर एक जुनी तसबीर. बहुतेक सरांच्या दिवंगत पत्नींची असणार. जांभ्या दगडाच्या भिंतीत इथेतिथे कोनाडे, अध्येमध्ये जाडजूड खांब आणि उजवीकडे एक लाकडी भक्कम जिना वर जायला. हवा/प्रकाश येण्यासाठी घराच्या एल मधला कोन फक्त उभ्या सळ्यांचा ठेवलेला. एवढ्या ऐसपैस घरात खोल्या मात्र दोन-तीनच असाव्यात. बाकी सगळा मोकळा मामला. घरात या मुलाची आई असेल. बाकी कसला वावर दिसत नव्हता.
‘‘बाळ ठाकूर हे तुमचं मूळ नाव?’’ मी चहा घेता घेता विचारलं. सर स्वतः चहा घेत नव्हते.
‘‘नाही, घरचं नाव हे. शाळेत हजेरीपटावर नाव भालचंद्र शिवराम ठाकूरदेसाई, पण घरच्याच नावानं शाळेतही सगळे ‘बाळ’ म्हणायचे. मग तेच झालं नाव.’’
‘‘शाळा इथलीच?’’
‘‘नाही, इथे शाळा नव्हती. पहिली-दुसरीला इंदूरला.’’
‘‘इंदूर?’’ माझा आवाज आपसूकच मोठा आला.
‘‘हो, माझा काका होता तिथे, त्याच्याबरोबर राहत होतो. नंतर मात्र इथे राजापूरला!’’ ‘राजापूर’मधला ‘जा’चा उच्चार जहाज, जायफळमधल्या ‘ज’ सारखा. अस्सल कोकणस्थी.
‘‘वाड्याची रचना फारच वेगळी, मस्त आहे.’’ कुमार म्हणाला.
‘‘शंभर वर्षांपूर्वीचा आहे.’’
“दिसतंच आहे, अहो केवढ्या भक्कम तुळया आहेत. हे बघा, पुढच्या तुळईला लावलेल्या झोपाळ्याच्या कड्या झिजून तुटल्यावर हा आता इकडे दुसऱ्या तुळईला लावलाय.” अनिलचं तंबाखू चोळता चोळता निरीक्षण.
“सागवान आहे ना?”
“नाही! फणशी!” सरांनी अनिलचा हा अंदाज चुकवला.
“काय?” आम्हा तिघांनाही हा उच्चार कळला नव्हता.
“फणशी! फणसाचं! कारण सागवानाला तेव्हा बंदी होती. फक्त सरकारी कामासाठी सागवान वापरत.”
“तेव्हा म्हणजे?”
“१९०५ साली. तेव्हा हा वाडा पूर्ण झाला. त्या वर्षी तीन गोष्टी झाल्या. हा वाडा झाला. माझ्या वडिलांचा जन्म झाला आणि त्याच वर्षी आमच्या या वाड्यावर मोठा दरोडा पडला.” अगदी अलिप्तपणे सर बोलत होते. स्वर पूर्णपणे निर्लेप.
“आमची ‘खोती’ होती. त्या वेळी वाड्यात लोकांची वर्दळ खूप होती. आसपासच्या खेड्यापाड्यातले लोक त्यांचे प्रॉब्लम्स घेऊन यायचे. वडील सरपंच होते. ते हयात असेपर्यंत पंचायतीची एकदाही निवडणूक नाही झाली.”
“पण आता हे सगळं मेंटेन करायचे तर-” कुमार.
“होत नाही. साधं झाडायला, सारवायलाही बाया मिळत नाहीत इथं. शहरात मिळतात पण खेड्यात नाही. पूर्वी घरावर ‘नळे’ असायचे, नंतर मंगलोरी कौलं घातली. ‘नळे’ मिळत नाहीत. कुणी तयारच करत नाही. दोन-तीन वर्षांनी जमिनीची भुरवणी करावी लागते.”
“भुरवणी?” हा शब्द नवीनच होता..
“हो! म्हणजे जमीन खोदून पुन्हा ठोकून ठोकून नीट करायची. नेहमीच्या वापरामुळे घरभर पोपडे निघतात. बारीक-मोठे खड्डे पडतात. ते पुन्हा सगळं करून घ्यावं लागतं. आता पुढच्या पिढीला ते नको आहे आणि आता हा वाडाही फार जुना झालाय, डागडुजीही करता येत नाही म्हणून वरच शेजारी छोटं घर बांधायला घेतलं आहे.”
“तुम्ही इथे भांबेडला कधी आलात?... म्हणजे मुंबई सोडून.”
मी मुंबईत सतत राहण्याची सवय असलेल्या माणसाला असा निर्णय घेताना कठीण गेलं असेल, या विचाराने प्रश्न केला.
“झाले दोन महिने, आलो की, तीन-चार महिने राहतो. येताना भरपूर काम घेऊनच येतो.”
“म्हणजे मुंबई ‘सोडली नाही?’ ”
“नाही. अगदी शाळा-कॉलेजमध्ये असल्यापासून मी सुट्टीत इकडे यायचो. तो परिपाठ अजून चालू आहे. त्या अर्थाने मी ‘मुंबईकर’ कधी झालोच नाही!”
माझ्यासारख्या. मनात अजूनही गावाची ओढ असलेल्या स्थलांतरिताला हे आजही कुणीतरी करतंय, याचा खूप आनंद होत होता.
आता संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. सोनेरी केशरी ऊन बाहेर पसरलं होतं. कुमार आणि मी अधूनमधून फोटो काढत होतोच, तितक्यात सरांनी आमच्याकडे पाहत पाचही बोटांची पुरचुंडी करून ओठापाशी नेत विचारलं,
“याची सोय काय? आणि राहणं?”
खरं तर आम्ही याचा विचारच केला नव्हता, पटकन बोलून गेलो, “राजापूरला! किती वेळ लागेल तिथे पोचायला?”
“तासभर”
- “ठीक आहे. मग आम्ही आता निघतो. उद्या सकाळी पुन्हा येतो. मग पुन्हा बोलू.” कॅमेरे आवरत आम्ही निघायची तयारी केली.
पायऱ्या चढून वर आल्यावर अनिल कुलकर्णी यांनी राजापूरला प्रकाशक मदन हजेरी यांना फोन लावला. त्यांचं बोलणं झाल्यावर म्हणाले,
“चला. झालं काम. हजेरी गावातच आहेत. हॉटेलात जायची गरज नाही.”
रात्री राजापुरात पोचलो. गाव मोठं असलं तरीही रस्त्यावर विजेचे खांब अगदी तुरळक आणि त्यावरचे बल्ब हे खांब दाखवण्यापुरता उजेड पाडणारे. लाल मातीचे अरुंद रस्ते.
हजेरीकडे पोचलो. त्यांची माझी अशी ही पहिलीच भेट. त्यांच्या प्रकाशनाची मी काही कामेही केली होती. पण त्यांचा मुलगा कुणाल हाच माझ्याकडे काम घेऊन यायचा. कुमारचा तर हा पहिलाच परिचय. माझ्यासारखाच तोही संकोचून गेला होता. पण हजेरींनी मनापासून स्वागत केलं. आनंद साजरा करून पुढे एका खास मालवणी, घरगुती खानावळीत मासळीचं चवदार जेवणही दिलं.
रात्री झोपताना दिवसभराचा शीण गादीवर पसरून दिला. तरीही आज प्रत्यक्ष भेटलेले बाळ ठाकूर आणि कैक वर्षापासून नित्य भेटणारी त्यांची रेषा यांचा स्लाइड शो मन:पटलावर चालू होता. स्मरणात स्पष्टपणे दिसणारी त्यांची कितीतरी चित्रं सतत झपाझप येत-जात होती.
‘मौज’ दिवाळी अंकाचं शीर्षक ते अनुक्रमणिकेतली ‘नामोल्लेख नसलेली चित्रे : बाळ ठाकूर’ कितीतरी वर्षांपासून पाहत आलो. खरं तर असा ‘न’ उल्लेख नंतर नंतर सुरू झाला. जेव्हा आणखी काही चित्रकार ‘मौज’ दिवाळी अंकातून येऊ लागले, तेव्हा. पूर्वी फक्त ‘मुखपृष्ठ आणि आतील चित्रे : बाळ ठाकूर’ असाच श्रेयनिर्देश असायचा. ‘मौज’ची खास टायपातली छपाई, मांडणी आणि ठाकुरांची चित्रं, लेटरिंग्ज यांमुळे इतर सर्व अंकांत हा अंक एक स्वतंत्र अस्तित्व कायम राखून होता.
सलग, लयदार आणि प्रचंड आत्मविश्वास असलेली बाळ ठाकूरांची कागदातूनच उमटून आलीय अशी वाटणारी स्वयंभू, ‘सिद्धहस्त रेषा’. पूर्ण चित्रच काय, नुसती रेषाही निरखत राहावी अशी. कुठल्या बिंदूवर ती सुरू होऊन इतके अनपेक्षित, विलोभनीय आळोखेपिळोखे देत ती कशीकशी संचार करते, ते दरवेळी थक्क होऊन पाहत राहावं.
ठाकूरांनी त्यांच्या इलस्ट्रेशनमध्ये ‘ग्रे’चा वापर केल्याचे कधी पाहिले नाही. कायम काळीभोर लवलवती रेषा आणि कधीकधी जोडीला दणदणीत अखंड कातळासारखा कभिन्न घनाकार- जाड ब्रशच्या एखाद्याच फटक्यात साकारलेला. केसासारखी रेषा आणि असा काळा यांचं नातं, प्रमाण कसंही असे. कधी अगदी तुरळक रेषा आणि मोठ्ठी करंद भिंत, तर कधी तारेच्या कुंपणाच्या बार्बड् वायरसारखे वेटोळे वेटोळे आणि मध्येच/बाजूला एखादा काळा तुकडा, तर कधी रेषा आणि घनाकार समप्रमाणात. नुसत्या रेषांची त्यांची विलक्षण दर्शने आहेतच, शिवाय व्यक्तिचित्र करताना, घरातल्या, इमारतीतल्या, गल्ल्यांतल्या सावल्या दाखवताना गुंफलेली क्रॉसशेडिंगची सुरेख जाळी, नवीन चित्रकारांनी भिंगातून पाहून ती जरूर अभ्यासावी, म्हणजे आपण जे क्रॉसशेडिंग करतो, ते किती ‘हमालकाम’ आहे, याचं प्रत्यंतर येईल.
आपल्याकडे साहित्यसंमेलनाच्या लोगोची एक परंपरा आहे. (संमेलनपूर्व त्याचे ‘अनावरण’ हाही अलीकडे काही वर्षे अस्सल मराठी लग्नाअगोदरच्या ‘मेहंदी’ (की रस्सम) सारखा कार्यक्रम असतो.) ज्या गावात/भागात संमेलन त्या भागातलं ग्रामदैवत, पुस्तक, पेन, दौत, मोरपीस, समई/मशाल/ज्योत यांच्याबरोबरच ज्ञानेश्वर, तुकाराम यांची एखादी ओळ + आयोजक संस्थेचं नाव अशी अगदी दाटीवाटी असते. स्वागत समितीच्या चार-पाच ‘डोकेबाज’ सदस्यांनी चित्रकाराला वेठीला धरून ही अदभुत ‘निर्मिती’ केलेली असते.
कऱ्हाडच्या संमेलनाने मात्र या सर्वांना बाजूला सारून सरस्वतीचं वाहन- एकच एक मोर घेतला होता. ब्रशच्या कमीत कमी स्ट्रोक्समध्ये बाळ ठाकूरांनी असा डौलदार मोर साकारून संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या पदाला साजेशी कलाकृती दिली होती. (अ. भा. साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष : एक साहित्यिक- ही कल्पना कशीशीच आहे नाही?)
सकाळी उठल्यावर कोकणातल्या त्या निवांत, निघोर सुवेळी चहा घेता घेता कुमारनं आम्हा तिघांचेही फोटो काढले. कृतज्ञता म्हणून श्री. मदन हजेरी यांचं एक छोटं फोटोसेशन केलं. कुमारकडून फोटो काढून घेण्यासाठी मराठी नाट्य-चित्रसृष्टीतले मोठमोठे नट-नट्या कशा रांगेत असतात, हे मी अनेक वर्षांपासून पाहत आलो होतो. त्या पार्श्वभूमीवर हजेरी यांचा हेवाच वाटावा.
दुपारी जेवून मगच ठाकूरांकडे जावं असं ठरवलं होतं, म्हणून हजेरी यांच्या सांगण्यावरून वाटेतल्या धोपेश्वर गावात जाऊन ‘तपापेश्वरा’चं दर्शन घ्यायचं ठरलं. हेही आनंदाचं आणि आपसूक समोर आलेलं. ‘धूतपापेश्वर’ या आयुर्वेदिक कंपनीच्या देवादिकांच्या कॅलेंडरवरची ‘धू’ला दीर्घ उकार असूनही उकाराला गाठ नसलेला त्या कंपनीचा लोगो सहज आठवला.
लाल मातीच्या कच्च्या भेंडांच्या, कडक जांभा दगडाच्या भिंती असलेल्या गल्लीच्या तोंडाला गाडी लावली आणि चालत निघालो. दहा वाजून गेले होते तरीही पंचा गुंडाळलेला एखादाच कोकणी शरीरयष्टीचा माणूस खांद्यावर प्लस्टिकची घागर घेऊन सावकाश चालताना दिसला. मध्येच वरच्या बाजूला धुणं वाळत बालणारी एक बाई. बाकी सामसूम.
महादेवाच्या या जुन्या मंदिरातली सर्वांत लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे छताला लावलेल्या फराऱ्या-पताका. घरगुती गणपतीच्या डेकारेशनसाठी पूर्वी सर्रास वापरली जायची तसली पंख्यासारखी उघडायची वर्तुळं. पण इथे ती प्रचंड आकारात आणि अजूनही वेगवेगळ्या पद्धतीनं इथल्या कसबी कारागिरांनी लावून साकारलेली. अगदी भक्तिभावाने. समांतर वळत मन, फिरत जाणाऱ्या रांगांमधलं अंतर अगदी काटेकोरपणे जपलेलं.
फोटो काढणं अपरिहार्य होतं.
थोडं रमतगमत वेळ काढून एका हॉटेलमध्ये साधं जेवण केलं. म्हटलं, रात्री निवांतपणे पुढे परतीच्या प्रवासात साग्रसंगीत जेवण करू, आता महत्त्वाची गोष्ट ठाकूरांना बोलतं करायची. पुन्हा ठाकूरवाड्यावर...
‘‘सुट्टीत तुम्ही इथं येत होता. अजूनही येता. मग मुंबईचे कुणी लेखक-मित्र इथं येतात का?’’ घराचाच संदर्भ घेऊन मी पुन्हा विचारलं.
‘‘फार नाही, एकदा श्रीपू आले होते.” पुन्हा नेमकं, तेवढंच उत्तर.
“जरा तुमच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल विचारतो. राजापूरला तुमचं मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालं. मग चित्रकार व्हायचं हे कसं ठरवलंत? घरात कुणी चित्रं काढत होतं? कुणाची चित्रं पाहत होता का?”
“मॅट्रिकच्या परीक्षनंतर मोठी सुट्टी होती. घरी मासिकं, पुस्तक वडील आणायचे, कारण त्यांचं कामानिमित फिरणं असं. त्यातली चित्रं पाहणं, वाचन व्हायचं. कधी ते सांगता येत नाही, पण आपण चित्रकार व्हावं असं वाटायचं, पण कसं होतात, ते माहीत नव्हतं. तेव्हा कुठून तरी कळलं की, मुंबईला जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकला शिकवतात. मी पत्र टाकलं, ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई’ एवढंच लिहून. पण ते तिकडे पोचलं आणि माझ्याकडे खेड्यात त्यांनी माहितीपत्रक पाठवलं. जायचं ठरवलं पण मुंबईला इतक्या दूर एकट्याने जाणं अवघड होतं. शेवटी एका माणसाच्या सोबतीने ‘सदर्न मराठा रेल्व’ने, पुढे मोटरने कोल्हापूर-मिरज-पुणे असं करत प्रचंड गर्दीतून मुंबईला पोचलो. प्रकाशक वा.रा. ढवळे यांच्याकडे ओळखीतून राहिलो. ‘जगन्नाथ चाळ, गिरगाव’ हा माझा पहिला पत्ता. ते वर्ष होतं १९४७.”
“जे.जे.त पेंटिंग की कमर्शियल? आणि तुमचे विषय काय होते? आमच्या वेळी मी इलस्ट्रेशन आणि कॅलिग्राफी-टायपोग्राफी हे दोन मुख्य विषय घेतले होते. तुमचेही बहुतेक तेच...”
“नाही, असे स्पेशल विषय तेव्हा नव्हते. कमर्शिअलला जे शिकवलं जायचं, त्याचा पुढे काहीही उपयोग झाला नाही.” आवाज बारीकच पण विधान ठाशीव.
एक निरीक्षण इथे नोंदवतो- प्रकाशनक्षेत्रात ज्या चित्रकारांनी अर्थपूर्ण, लक्षवेधी, विचारप्रवृत्त करणारं काम केलं, करत आहेत, ते बहुतेक सगळे कमर्शियल आर्टचा डिप्लोमा डिग्री केलेले आहेत. या अभ्यासक्रमाचा तसा थेट संबंध काहीही नसला तरीही पेटिंग/स्कल्प्चर अशा विभागापेक्षा एक प्रकारचा मोकळेपणा कमर्शियलच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतो. त्यातूनच मग बिनधास्तपणे चित्रांत/अक्षरांत वेगवेगळे प्रयोग करून पाहण्याचा ऊर्मी येते. नियमबद्ध झापडबंद निर्मिती होत नाही.
“तुम्ही नोकरी कधी केली का?”
“तर! जाहिरात कंपन्यांत बरीच वर्षं. प्रथम हिंदुस्तान थॉम्प्सन, नंतर सिस्टाज, उल्का...”
“उल्कात र. कृ. जोशी होते ना? ते तुमच्या बरोबरचे!”
कुमारला र. कृ. हे आद्य म्हणावेत असे कॅलिग्राफर असल्यामुळे सहज आठवले.
“थोडे सिनिअर! ‘उल्का’त मी जास्त वर्षं होतो. पंधरा.”
“तिथल्या कामात तुमचा सहभाग काय असायचा? तुम्ही रमलात जाहिरातींमध्ये?”
“पडेल ते काम करायचं. आर्ट डायरेक्टर सांगेल ते. कोंडमारा व्हायचा, पण नोकरी करणं भाग होतं. जाऊ द्या हो! यावर बोलणं बरं नाही!’’ हा विषय त्यांना नको होता. थोडा वेळ शांतता.
‘‘चहा घेऊ या का?’’ सरांनीच विचारलं.
‘‘हो चालेल!’’ आम्हा सर्वांनाच चहा आणि थोडा ब्रेक हवा होता.
चहा झाल्यावर मी त्यांच्या चित्राकडे वळलो,
‘‘तुमचं पहिलं कव्हर कोणतं? आठवतं का?’’
“ ‘मौज’चं- ‘रात्र आणि इतर एकांकिका!’ तेंडुलकर.
“चित्राखाली तुमची सही तेव्हाही नव्हती का?’’
जाहिरातक्षेत्रात काम करणारा चित्रकार कायम अंधारात राहतो. अशा क्षेत्रात तब्बल पंचवीस-एक वर्षं काम करूनही प्रकाशनक्षेत्रात संधी आल्यावर बाळ ठाकूरांनी एकाही चित्रावर नाव न टाकणं हे आश्चर्यकारक, थोडं विचित्रही होतं. म्हणून हा प्रश्न होता.
“नाही! तेव्हाही चित्रावर सही नाही!”
“काही खास कारण?”
“आपलीच जाहिरात आपण कशाला करायची?” सरांचं उत्तर.
बोलणंच खुंटलं.
“तुमची म्हणून एक खास रेषा आहे. इतकी सलग, लयदार रेषा कोणत्या पेनाने काढता?” मी जरा वेगळ्या वळणावर गाडी नेली.
“पेन नाही, ब्रश!”
“ब्रश? इतकी केसासारखी रेषा ब्रशने?”
“त्यासाठी मी तासन् तास सराव करायचो. रद्दी पेपरचा गठ्ठा घेऊन विन्सर अँड न्यूटनची इंक आणि फाइन ब्रश घेऊन प्रयोग करत बसायचो.”
अगदी अविश्वसनीय अशी ही गोष्ट होती.
“म्हणजे जाड-बारीक रेषाही अशाच? मला वाटलं होतं, गिलोट कंपनीच्या फाकणाऱ्या निबने तुम्ही असं करत असणार!” कुमारनं आणखी खात्री करून घेण्याच्या उद्देशानं विचारलं..
“निबने मला जमलं नाही. कधीकधी बारीक पॉइंटचं बॉलपेनही वापरलं. फाइन पिगमेट लायनरही! (हे एक प्रकारचं पेन असतं- एकसारख्या जाडीची दीर्घ रेषा काढायचं पेन) गायवाडीला मधुकर (आडनाव नीट ऐकू आलं नाही) यांच्या स्टुडिओत मी तासन् तास बसायचो. सोनार होते ते. त्यांच्याकडून रेषेचा सुरुवातीचा प्रवास झाला. नंतर नंतर मला माझी रेषा सापडली. पण श्रेय त्यांचं.”
“आणखी एक- तुमच्या चित्रातली पात्रं ही खास तुमचीच वाटतात. विशेषत: डोळ्यांची मोठी बुबुळे, थोडे अॅबनॉर्मल डोळे. शिवाय बायका किंचित उंच, उभट चेहरा, केसांचा अंबाडा... याचा कोकणाशी काही संबंध आहे का?”
मान हलवत सरांचं उत्तर- “सांगणं अवघड आहे.”
“छापून झाल्यावर तुमची चित्रं तुम्ही परत मिळवता का? अशी किती चित्रं असतील आता तुमच्याकडे?”
“नाही, तशी काही चित्रं माझ्यापाशी नाहीत. एकतर त्या काळात आमच्याकडून चित्र प्रकाशकाकडे, तिथून मग लॉक मेकरकडे आणि पुन्हा तिथून प्रेसकडे. चित्राची अवस्था काय होत असेल! शिवाय छापून झाल्यावर कुणालाच मूळ चित्राची आठवणही येत नसे. मीही त्या बाबतीत उदासीन होतो. ‘मौज’मध्ये छापलेली चित्रं मात्र महिन्याभरात पुन्हा माझ्याकडे व्यवस्थित परत यायची. ही श्रीपुची देणगी!”
थोडा विचार करून मी ठाकूरांना म्हणालो,
“सर, तुम्हाला प्रत्यक्ष काम करताना पाहायचंय.”
नकाराची मी अपेक्षा ठेवलीय होती. कारण सहसा अशा गोष्टीसाठी बुजुर्ग चित्रकार तयार नसायचे.
“हो!” सहज स्वरात उत्तर, “वर जावं लागेला!”
लाकडा जिन्याने आम्ही वर गेलो. चांगलंच प्रशस्त दालन होतं. पुढचा डावीकडचा भाग काळोखात, मोडकळीला आलेला, वापरात नसलेला. अलीकडे समोर एक उघडा दरवाजा. त्याला लागूनच खाली घोंगडीची जमिनीशी एकजीव झालेली चौकट आणि तिला मध्ये घेऊन वर्तुळाकार पुस्तकांचे बारीक बारीक गठ्ठे. जलतरंगासाठी पाण्याची भांडी मांडावीत तसे.
“अशी ही पुस्तकं -?”
“हाताशी नेहमी लागणारी, चालू कामासाठी.” ठाकूर मांडी घालून बसत म्हणाले,
“मी असाच चित्रं काढायला बसतो.” त्यांनी मांडीवर बोर्ड घेतला. ब्राऊन इंकने अगोदरच एका साध्या कागदावर ड्रॉईंग करून ठेवलं होतं. त्यांनी ते रंगवायला घेतलं. ब्रश चक्क एक-दोन नंबरचा बारीक. समोर पाण्याचा मग, दोन-चार पोस्टर कलरच्या बाटल्या. अगदी पातळ पारदर्शक रंगांचं लेपन करत, अधूनमधून बोलत काम चालू. डावीकडच्या दरवाजातून खूप सुंदर, चित्रासाठी योग्य असा प्रकाश येत होता.
“मला वाटलं होतं, तुम्ही वॉटर कलर वापरत असणार!”
“ते लवकर वाळून जातात आणि मग काम करायला त्रासदायक ठरतात. म्हणून हेच पास्टर कलर ट्रान्स्परन्ट करून वापरतो. इंक आणि हे, एवढंच मी वापरतो. ऑइल कलरला कधीच हात लावला नाही.” सांगण्यात कसलीही खंत नाही की, आपणही इतर एवढी माध्यमं वापरली नाहीत वगैरे. कसलाही बडेजाव नाही.
“सर, चित्रासाठी पूर्ण हस्तलिखित वाचता का?”
“हो, पण ते अंदाज येईपर्यंत!”
“एखाद्या कथेतलं प्रादेशिक वातावरण, व्यक्ती, त्यांचे पेहराव किंवा एखादं कॅरेक्टर असं असं दिसत असेल अशी कल्पना मनात येते. त्यासाठी काही रेफरन्स घेता का?”
“तशी वेळ फार कमी वेळा येते. त्यासाठी मग मी रेफरन्स शोधतो... कारण त्याशिवाय जमणार नाही ते उभं करायला.”
त्यांच्याशी बोलता बोलताच माझं आजूबाजूला पाहणं चालू असतं. एका भिंतीला दोन मोठी पसरट पुस्तकांची शेल्फ. धूळभरली. पुस्तकं जुनी असणार आणि सरांशिवाय इतर कुणी त्याला कधी हातही लावत नसणार.
“तुमची रेषा बघून वाटतं, तुम्ही स्केचिंगही भरपूर केलं असणार!”
“पूर्वी जायचो लाइव्ह स्केचिंग करायला, व्ही.टी.वर. उभं राहून बरंच स्केचिंग करायचो!”
“अशा काही वह्या आहेत का तुमच्याकडे?”
“नाहीत!” एकच शब्द.
आम्ही दोघं बोलत असताना कुमारला एका कोपऱ्यात कागदाचा एक गठ्ठा दिसला. झटकन पाहत त्यानं आमचं लक्ष वेधलं.
अगदी मिळेल त्या कागदावर पेन, ब्रश, क्रेयॉन वापरून केलेली ती अप्रतिम चित्रं होती. मोठा ठेवाच हाती लागला. आमच्या बरोबर मग सरही आपलीच चित्रं नव्यानं पाहू लागले.
“यातली काही केवळ स्वत:साठी केली आहेत. छापण्यासाठी नाहीत. वर्तमानपत्रात आलेल्या फोटोवरून.”
स्वयंभू रेषेचा विलास, गुंतवळ्यासारखी ब्रशने केलेली लेटरिंग्ज, क्रेयॉनने उमटवलेली योगासनाच्या अनेक पोझेसची ठाशीव ड्रॉइंग्ज. प्रत्येक कागद काळ्या रेषेच्या जादूने मंतरलेला.
“आज हे तुमच्यामुळेच कित्येक दिवसांनी पाहिलं.’’ सरांच्या चेहऱ्यावर किंचित हसू, समाधान. पुढे मिश्कीलपणे म्हणाले, “व्यवस्थितपणा नाही, त्यामुळे इतिहास (माझी) दखल घेणार नाही!”
“यातली मी काही घेऊन जाऊ का?”
“हरकत नाही. उपयोग होणार असेल तर -” पुन्हा निरीच्छ.
“एक विचारतो, तुम्हाला तुमची आवडणारी कोणती चित्रं आहेत?”
“मला माझी चित्रं आवडत नाहीत.” अतिशय सावकाशपणे उच्चारत स्पष्ट उत्तर. ‘का?’ असं विचारण्यात अर्थ नव्हता.
“मी तुमची कितीतरी अप्रतिम चित्रं सांगू शकेन - तुमचं एक डबलस्प्रेड इलस्ट्रेशन ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या दिवाळी अंकात आलं होतं - कुसुमाग्रजांची कविता होती -”
“कुत्रे!” सरांना चित्र आठवलं.
“काय अप्रतिम चित्र होतं! कुमार, दोन्ही पानं भरून कर्ण रेषेत रानटी कुत्र्यांची एक झुंड शेपट्या उंचावून पुढे चालली आहे. एकमेकांना घासत, पुढे सरकत प्रत्येक कुत्र्याची, दिसेल त्याचा घास घ्यायची हिंस्र वासना रेषेरेषेतून व्यक्त होत होती. त्या चित्रातून अगदी कुत्र्यांचा ल्हा... ल्हा... असा आवाजही मला ऐकू येत होता.” ते चित्र तेव्हाच एकदा पाहिलं होतं, पण अजूनही स्पष्टपणे आठवतं.
“आणीबाणीच्या काळातल्या अंकात ही कविता आली होती.” सरांनी आणखी माहिती दिली. ते चित्र तुमच्याकडे आहे का, विचारण्यात अर्थ नव्हता.
प्रचलित किंवा रूढ पद्धतीने माध्यमांची हाताळणी हे बाळ ठाकूर यांच्यापासून खूप दूर होतं. पोस्टर कलरची वॉटर कलरसारखी हाताळणी साध्या गळगळीत कार्डवर हे त्यातलंच एक वेगळेपण. इतर कोणत्या चित्रकाराचं असं काम पाहता येणार नाही. त्यामुळेही ठाकूरांची एक शैली निर्माण झालीय. गुळगुळीत कागदावर पातळ रंग व्यवस्थित शोषले न जाता सुरुवातीला आणि शेवटी ब्रशच्या फटकाऱ्याबरोबर रंग साचून राहतो. त्यावर पुन्हा दुसरा स्ट्रोक आल्यावर खालचा आणि वरचा असा मिळून पुन्हा एक वेगळाच परिणाम दिसून येतो. याचाच वापर करत ठाकूर रंगीत चित्रं करतात.
“तुमचं तात्यांच्या ‘बनगरवाडी’वरचं चित्रही मला खूप आवडतं.” मी आणखी एक उदाहरण दिलं.
“आतली चित्रं (व्यंकटेश) माडगूळकरांनी केली होती, कव्हर माझ्याकडे का, हे मला शेवटपर्यंत कळलं नाही.” इतक्या वर्षांनंतरही त्यांना हे आठवलं.
“ ‘बनगरवाडी’च्या त्या आवृत्तीसाठी मी फोटो काढले होते, त्यावरून तात्यांनी स्केचेस केली होती. तुम्ही केलेलं मुखपृष्ठही मीच काढलेल्या फोटोवरून केलेलं आहे. विशेष म्हणजे ती सावळी बाई तेव्हाही मला फार आवडली होती. ती मागे वळून बघत असताना मी क्लिक केलं होतं आणि त्याच फोटोवरून तुम्ही कव्हर केलंत. मला खूप आनंद झाला होता की, मला आवडलेलाच फोटो तुम्ही निवडलात!”
“पण मला तर वाटतं, माडगूळकर नाहीत, तर मग कव्हरसाठी रविमुकुल का नाही?”
यावर काही बोलणं शक्य नव्हतं. मी आणखी पुढे त्यांना नेलं. .
“सर, तुम्ही चित्रासाठी कुठल्या लेखकाबरोबर, संपादकाबरोबर चर्चा करायचात का?”
“नाही. ते मला जमायचं नाही. मला ‘एक्स्प्रेस’ करता येत नाही.”
“पण मग कधी कुठल्या लेखकाने तुम्हाला सूचना केली, सांगितलं का, की हे चित्र मला असं असं हवं आहे म्हणून.”
“सुरुवातीला कधी कधी सांगितलं असेल, पण आठवत नाही. दुसरी गोष्ट, ‘मौज’मध्ये श्रीपुंकडे सर्वाधिकार होते. बाकी कुणी लेखक कसा सांगू शकेल” हसत त्यांनी ‘मौज’चा दबदबा अधोरेखित केला.
“इतकी वर्षं, शेकडो पुस्तकांसाठी तुम्ही चित्रं केलीत, असंख्य इलस्ट्रेशन्स केलीत, या प्रवासात कोणत्या लेखकाशी खास मैत्री, जाणं-येणं वगैरे झालं का?”
“खानोलकरबरोबर माझं चांगलं होतं. लोकलच्या प्रवासातही आम्ही बरोबर असायचो. त्या वेळी ‘रहस्यरंजन’मध्ये त्याची ‘झाडे नग्न झाली’ ही लघुकादंबरी आली होती. तीच त्याने नंतर वाढवून ‘रात्र काळी घागर काळी’ केली. सदू रेगेही माझा चांगला मित्र होता. शिवाय अशोक शहाणे. चांगलं जमायचं आमचं. अशोक त्याच्या ‘प्रास’ प्रकाशनासाठी खूप प्रयोग करायचा!”
“कुठल्या लेखकाला तुमचं काम बेहद्द आवडलं आणि तुम्हाला दिलखुलास दाद दिली, असं कधी किंवा कुणाची पत्रं?”
“दळवींनी कौतुक केल्याचं आठवतं - त्यांचं ‘सारे प्रवासी घडीचे’ केलं होतं तेव्हा.”
“सर, ते एक तुमचं अगदी वेगळं मुखपृष्ठ आहे! लेटरिंग आणि चित्र तुमच्या नेहमीच्या शैलीतलं नाही.” मला एकाच रंगात टिंटेड (रंगीत) पेपरवर छापलेलं ते मुखपृष्ठ आठवलं.
“आणखी एक वेगळं, अर्थपूर्ण मुखपृष्ठ तुमचं आठवतं ते ‘डांगोरा’ (त्र्यं. वि. सरदेशमुख)चं. कोकणातल्या पारंपरिक ‘चित्रकथी’सारखं.”
‘शॅडो पपेट!”
‘मग असा अगदी वेगळा प्रयोग केल्यावर आणि समजा संपादक, प्रकाशक, लेखक यांना कळलाच नाही, तर तुमची त्या वेळी भावना काय असते? इतके कष्ट वाया गेल्यासारखे वाटतात का?”
“सोडून द्यायचं झालं!” अगदी सर्वच चित्रकारांच्यावतीने त्यांचं समर्पक उत्तर.
आता चार वाजून गेले होते. त्यांच्या अनेक चित्रांबद्दल बोलता आलं असतं. पण आता परतीला लागणं आवश्यक होतं.
कुमारनं आणि मीही एव्हाना जमेल तितके फोटो काढले होते, कुमारनं जास्त. आम्ही आवराआवरी केली.
“सर, आता एक शेवटचा आणि थोडा रूक्ष प्रश्न -
“आम्ही, म्हणजे माझ्या पिढीचे चित्रकार आमच्या कामाची बिलं करतो. तुम्ही तशी करायचात का?”
“चित्राचं बिल! कधीही नाही. जमलंच नाही. व्यवहार जमला नाही.”
माझा अंदाज खरा ठरला होता.
“मग बऱ्याच जणांनी तुमचा निश्चितच गैरफायदा घेतला असणार!” मी मनातली खदखद एकदाची बोलून दाखवली.
“असं मी म्हणत नाही, कारण दोष आपलाच, पण हा व्यवस्थितपणा नसेल तर माणूस कमर्शियल आर्टिस्ट म्हणून यशस्वी होत नाही.”
खाली आलो.
फिकट बदामी रंगाचा टी शर्ट आणि पायजामा या पेहराव्यातल्या चित्रकाराला - बाळ ठाकूर या रेषासिद्धी प्राप्त चित्रकाराला, त्यांच्याच शंभर वर्षं जुन्या वाड्याच्या पायरीवर बसायला सांगून काही फोटो घेतले.
प्रत्येक फ्रेमगणिक ते अधिकाधिक निर्लेप होत गेल्याचं जाणवत होतं.
.................................................................................................................................................................
लेखक रविमुकुल प्रसिद्ध चित्रकार, मुखपृष्ठकार आहेत.
vkravimukul@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment