या खंडात म. गांधींच्या विचारांची परीक्षा जगातील इतर थोर विचारवंतांच्या विचारांच्या संदर्भात केली आहे. त्यात सॉक्रेटिसपासून आचार्य विनोबा भावे व जयप्रकाश नारायण यांच्यापर्यंतच्या विचारवंतांचा समावेश आहे!
ग्रंथनामा - झलक
अशोक चौसाळकर
  • ‘गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व’ (खंड २)चे मुखपृष्ठ
  • Fri , 04 March 2022
  • ग्रंथनामा झलक गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व Gandhivichar aani Samkalin Vicharvishva अशोक चौसाळकर Ashok Chausalkar

सेवाग्राम कलेक्टिव्ह आणि साधना प्रकाशन यांच्या संयुक्त प्रकल्पाअंतर्गत साकारलेल्या

१) गांधी : जीवन आणि कार्य - संपादक - किशोर बेडकिहाळ

२) गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व - संपादक अशोक चौसाळकर

३) गांधी - खुर्द आणि बुद्रुक - संपादक रमेश ओझा

या त्रिखंडात्मक वैचारिक ग्रंथाचे आज पुण्यात संध्याकाळी ‘विश्वकोश निमिती मंडळा’चे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांचे हस्ते प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने दुसऱ्या खंडाला ज्येष्ठ अभ्यासक अशोक चौसाळकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

हा खंड म. गांधींचे जीवन व कार्य या विषयावर प्रस्तावित तीन खंडांपैकी दुसरा खंड असून त्यात म. गांधींच्या विचारांची परीक्षा जगातील इतर थोर विचारवंतांच्या विचारांच्या संदर्भात केली आहे. त्यात सॉक्रेटिसपासून आचार्य विनोबा भावे व जयप्रकाश नारायण यांच्यापर्यंतच्या विचारवंतांचा समावेश करण्यात आला आहे. यातील बहुतेक लेख १९५०नंतर लिहिलेले आहेत. लेखकांमध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, आचार्य जावडेकर, ना. ग. गोरे, पु. ह. पटवर्धन, प्रा. मे. पुं. रेगे, श्री. वसंत पळशीकर, अम्लान दत्त यांचा समावेश होतो. हे लेख वेगवेगळ्या काळात लिहिलेले आहेत. त्यामुळे त्यामागे कोणतेही एक सूत्र नाही. प्रत्येक लेखकाने एका विशिष्ट अशा विचारवंताच्या विचारांच्या संदर्भात गांधीविचारांची चर्चा केली आहे. त्यामुळे गांधी विचारांच्या आकलनास एक व्यापक अशी संदर्भ चौकट प्राप्त झाली आहे.

या गं्रथातील लेखांची विभागणी मुख्यत: तीन भागात करण्यात आली आहे. पहिल्या भागातील तीन लेख प्राचीन तत्त्वज्ञांच्या संदर्भात आहेत. त्यात गांधी व गीता, गांधी व ख्रिस्त, गांधी व सॉक्रेटिस  या तीन लेखांचा समावेश होतो. दुसरे तीन लेख टॉलस्टॉय, जेफर्सन, मार्क्स व लेनिन यांच्या संदर्भात आहेत. दुसऱ्या भागात गांधींच्या समकालीन विचारवंतांचा; जे त्यांच्यापेक्षा वयाने जास्त होते, त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात फुले, रानडे, टिळक, गोखले, टागोर व राजचंद्र यांचा समावेश केला आहे. तिसऱ्या भागात पं. नेहरू, विनोबा, जयप्रकाश, डॉ. लोहिया, एम. एन. रॉय व डॉ. आंबेडकर यांच्यावरील लेखांचा समावेश केला आहे. या ग्रंथातील लेखांमध्ये गांधी आणि इतर विचारवंत यांच्या विचारांची तुलना केलेली नाही. त्या विचारवंतांच्या विचारांच्या संदर्भात गांधीविचार जास्त चांगल्या प्रकारे आपणास कसा समजून घेता येईल हे समजते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

या ग्रंथातील पहिल्या भागातील लेखांचे लेखक नामवंत विचारवंत आहेत. त्यात आचार्य जावडेकर, तर्कतीर्थ जोशी, श्री. वसंत पळशीकर, अल्डस हक्सले व आचार्य विनोबा भावे यांचा समावेश होतो.

आचार्य जावडेकर टिळक आणि गांधी या दोन्ही तत्त्वज्ञांची तुलना करताना असे म्हणतात की, टिळकांची बुद्धी एका विद्वान मीमांसकाची होती, तर गांधींची बुद्धी जास्त प्रतिभाशाली व समकालीन समस्यांच्या संदर्भात गीतेचा अर्थ शोधणारी होती. गीतेत कृष्णाने निष्काम कर्मयोगाचा आणि सशस्त्र युद्धाचा पुरस्कार केला, त्याने स्वजनप्रीतीच्या मोहजालात न अडकता आपले नियत कर्म करण्याचे सांगितले. पण गांधींच्या मते आज मला गीता सशस्त्र युद्ध करावयास सांगत नाही, कारण अनावश्यक कर्म, आत्मौपम्य बुद्धी, समत्व बुद्धी आणि हिंसक युद्ध यांच्यात मेळ बसू शकत नाही, पण समाजात अन्याय होतात आणि म. गांधींच्या मते या अन्यायाचा प्रतिकार सत्याग्रहाच्या साह्याने केला पाहिजे. हा सत्याग्रही संघर्ष देशांतर्गत अन्यायाच्या विरुद्ध जास्त परिणामकारकरित्या केला पाहिजे, अशी गांधींची शिकवण होती असे आचार्य जावडेकर सांगतात. भारतीय अध्यात्मास सामाजिक नीतिशास्त्रांची जोड दिली पाहिजे, असे त्यांचे मत होते.

म. गांधी आणि सॉक्रेटिस या दोन महापुरुषांनी आयुष्यभर सत्याचा शोध घेतला आणि ज्ञान व सद्‌गुण यांच्यातील संबंध प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारावर तपासण्याचा प्रयत्न केला. सॉक्रेटिसचे जीवन आणि कार्य याबाबत गांधींच्या मनात उत्सुकता होती. आपल्या ‘इंडियन ओपिनियन’ या साप्ताहिकात त्यांनी त्याची ओळख ‘ए स्टोरी ऑफ सोल्जर ऑफ ट्रूथ’ या नावाने करून दिली. एप्रिल-मे १९०८मध्ये सहा लेखांची लेखमाला लिहून त्यांनी त्याला आद्य सत्याग्रही असे संबोधले. या लेखाचे लेखक श्री. वसंत पळशीकर यांचे असे मत आहे की, म. गांधी व सॉक्रेटिस यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात साम्य असून त्या उभयतांचे असे मत होते की, सत्याचे ज्ञान हेच खरे शहाणपण असते आणि नीतीचे अधिष्ठान सत्य हेच आहे. या दोघांनी सखोल आणि सूक्ष्म अशी धर्मचिकित्सा केली आणि सार्वजनिक जीवनाचे अंतर्बाह्य शुद्धीकरण करण्यावर त्यांचा भर होता. म्हणून गांधी म्हणतात की, ‘आपण सॉक्रेटिससारखे जगावयास आणि मरावयास शिकले पाहिजे.’

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी येशू ख्रिस्त आणि म. गांधी यांची तुलना करून असे मत व्यक्त केले की, गांधींची रामराज्याची कल्पना त्यांनी यहुदी व ख्रिश्चन धर्मापासून घेतली. दोघांचाही खून स्वजनांनीच केला. ख्रिस्त राजकारणी साधू नव्हता पण गांधी राजकारणी संत होते. त्यांचा प्रयत्न राजकारणाचे शुद्धीकरण करण्याचा होता. गोखल्यांच्या ‘राजकारणाचे नैतिकीकरण’ या तत्त्वाचे ते पुरस्कर्ते होते. पण राजकारण हे स्वभावत:च कुटिल असल्यामुळे त्यात भाग घेणाऱ्या साधुपुरुषास सत्त्वापासून च्युत व्हावे लागते, असे जोशींचे मत दिसते. पण म. गांधी त्यांच्या या मताशी सहमत झाले नसते.

प्रख्यात तत्त्वज्ञ, अमेरिकेचे स्वातंत्र्यवीर आणि घटनेचे शिल्पकार थॉमस जेफर्सन यांच्या विचारांची प्रख्यात विचारवंत अल्डस हक्सले यांनी गांधींच्या विचारांशी तुलना केली आहे. त्यांच्या मते अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या गांधींची अंत्ययात्रा लष्करी वाहनावरून व लष्करी इतमामाने काढण्यात आली हा राष्ट्रवादाचा प्रभाव होता. आज भारतीय राष्ट्र इतर राष्ट्रांचीच नक्कल करीत आहे! त्यांच्या मते, जेफर्सन सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा व प्रत्यक्ष लोकशाहीचा पुरस्कर्ता होता. गांधींनी पण या दोन संकल्पनांचा पुरस्कार केला होता. जेफर्सनप्रमाणे गांधींना पण राजकारण, धर्म आणि नीती यांच्यात एक प्रकारचे सामंजस्य हवे होते. गांधींची विकेंद्रीकरणाची व सत्याग्रहाची कल्पना प्रत्यक्षात आली नाही, पण त्यामुळे आपले व आपल्या भावी पिढ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या मते, अनेक बाबतीत गांधींचे विचार जास्त क्रांतिकारक आणि धर्मविषयक विचार अधिक वस्तुनिष्ठ होते.

म. गांधी काऊंट लिओ टॉलस्टॉय यास आपला आदर्श मानत होते. श्री. भगवंत क्षीरसागर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण लेखांत उभयतांतील अनुबंध स्पष्ट केले आहेत. गांधी असे म्हणतात की, सत्याग्रहाची जाणीव मला प्रथम ‘न्यू टेस्टामेंट’मध्ये झाली. भगवद्‌गीतेने माझ्या विचारांना दृढ केले. टॉलस्टॉयच्या ईश्वराचे राज्य तुमच्या हृदयातच आहे’, याने मला प्रेरणा दिली. संयम, सत्याची पूजा आणि ब्रेड लेबर या गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकलो. आपले ‘हिंद स्वराज्य’ हे पुस्तक त्यांनी टॉलस्टॉयकडे पाठवले होते व ते त्यांनी वाचले होते. आपल्या दक्षिण आफ्रिकेतील आश्रमाचे नाव त्यांनी ‘टॉलस्टॉय फार्म’ असे ठेवले होते.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

गांधी आणि मार्क्स हे दोघेही परिवर्तनाचा विचार मांडणारे विचारवंत. १९४७मध्ये गांधींनी भारताच्या स्वातंत्र्यलढा यशस्वी केला. रशियातील बोल्शेव्हिक क्रांती, १९४९ची चिनी क्रांती आणि आशियाई देशांत कम्युनिझमचे वाढते आकर्षण यामुळे मार्क्सच्या तत्त्वज्ञानाबद्दल अविकसित देशात एक प्रकारचे नवे आकर्षण निर्माण झाले. त्यातूनच गांधी आणि मार्क्स यांच्या विचारांची तुलना केली जाऊ लागली.

तसा काहीसा प्रयत्न श्रीपाद अमृत डांगे यांनी त्यांच्या ‘लेनिन विरुद्ध गांधी ’ या इंग्रजी पुस्तकात १९२१मध्ये केला होता. १९५०-५१मध्ये श्री. किशोरभाई मश्रुवाला या ज्येष्ठ गांधीवादी विचारवंताने ‘गांधी अँड मार्क्स’ या पुस्तकात दोघांच्या विचारांचा तुलनात्मक अभ्यास केला. या पुस्तकाला आचार्य विनोबा भावे यांनी प्रस्तावना लिहिली. त्यात त्यांनी मार्क्सवादाच्या काही सिद्धान्तांवर टीका केली. मश्रुवाला यांचे मत होते की, यापुढे सामना हा साम्यवाद व गांधीवाद यांच्यातच होणार आहे. हे दोन्ही विचार परस्परांच्या विरुद्ध उभे आहेत.

या दोन्ही गांधीवाद्यांची भूमिका आचार्य जावडेकरांना पसंत पडली नाही. ते मार्क्सवादाचे चिकित्सक अभ्यासक आणि गांधीवादाचे ज्येष्ठ भाष्यकार होते. त्यांच्या मते गांधीवादाची मांडणी जरी अर्थपूर्ण असली तरी तो अपूर्ण आहे, त्यामुळे गांधीवादास मार्क्सवादाची जोड देणे आवश्यक आहे. गांधीवाद परिपूर्ण आहे. मार्क्सवाद नियतीवादावर, भौतिकवादावर व हिंसेवर आधारलेला आहे. त्यांना साध्य-साधन विवेक मान्य नाही. विनोबा व मश्रुवाला यांच्या या विधानांवर जावडेकरांनी टीका केली आणि ‘नवभारत’ मासिकात एप्रिल १९५२ ते डिसेंबर १९५२ या काळात चार सविस्तर लेख लिहून त्यांच्या विचारांचे खंडन केले.

राजेश्वरी देशपांडे यांनी आचार्य जावडकेरांनी गांधी आणि मार्क्सच्या विचारांचे पुनर्वाचन कसे केले हे सांगून आपला सत्याग्रही समाजवादाचा विचार समकालीन समस्यांच्या संदर्भात कसा मांडला याचे विवेचन केले आहे.

१९२२मध्ये कम्युनिस्ट नेते श्री. अ. डांगे यांनी ‘लेनिन विरुद्ध गांधी’ हे इंग्रजी पुस्तक लिहून पहिल्यांदा गांधीवाद आणि साम्यवाद यांची तुलना केली. त्या काळात एम. एन. रॉय आणि रजनी पाम दत्त सारखे मार्क्सवादी गांधींच्या विरोधात होते. डांगे हे टिळकांचे अनुयायी. नंतर ते असहकाराच्या चळवळीत सामील झाले. लेनिनच्या विचारांच्या अनुरोधाने ते असे मत मांडतात की, समाजवादी चळवळींनी वसाहतवादविरोधी चळवळ राष्ट्रीय चळवळीसोबत चालवावी. त्यास केवळ मध्यमवर्गीयांचा पाठिंबा असून चालणार नाही. त्यास शेतकरी व कामगार यांचा पाठिंबा हवा. राष्ट्रीय स्वातंत्र्यानंतर भांडवलशाहीच्या जागी समाजवाद आणणे, हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. गांधींचा मार्ग हा अहिंसक सत्याग्रहाचा असून त्याचा उद्देश ब्रिटिश राज्याचा पाया कमजोर करणे हा आहे. त्यामुळे भारतीय क्रांतीचा मार्ग हा अहिंसक क्रांतीचा मार्ग आहे, असे त्यांनी लिहिले. सर्वसाधारणपणे लेनिनच्या मार्गाची भलावण करीत असताना त्यांनी ही गोष्ट मान्य केली की गांधींना लेनिनप्रमाणेच गरिबी व हुकूमशाही नष्ट करावयाची आहे. गांधी आणि मार्क्स हे विचारवंत आजही आकर्षणाचे विषय आहेत. कारण जगातील दैन्य दूर करून स्वतंत्र माणसांचा शोषण व शासनमुक्त समाज त्यांना स्थापन करावयाचा आहे.

दुसऱ्या भागातील लेखात आधुनिक भारतातील काही ज्येष्ठ नेते व विचारवंत आणि गांधी यांच्यातील परस्पर संबंधांची चर्चा करण्यात आली आहे. त्यातील टिळक, गोखले, आणि राजचंद्र यांनी गांधींच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्या ‘टुवर्ड्‌स अंडरस्टँडिंग गांधी’ या अपूर्ण पुस्तकात प्रा. दि. के. बेडेकर असे प्रतिपादन करतात की, गांधींच्यावर भारतातील प्रबोधन चळवळीचा मोठा प्रभाव पडला होता. गांधी व दादाभाई, रानडे, गोखले आणि टिळक यांच्यातील अनुबंधांची चर्चा प्रा. बेडेकर, वसंत पळशीकर, तर्कतीर्थ जोशी आणि डॉ. भारती पाटील यांनी केली आहे.

वसंत पळशीकर यांनी म. फुले व म. गांधी यांच्यातील समान तत्त्वे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते, दोघेही सत्याचे पुरस्कर्ते होते आणि अन्यायाचे विरोधक होते. अस्पृश्यता निवारण्यासाठी त्यांनी लढा दिला. शेतकऱ्यांचे दैन्य त्यांना पाहवत नव्हते. श्रमाची प्रतिष्ठा आणि व्यक्तिस्वातंत्र्य दोघांनाही महत्त्वाचे वाटत होते.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

प्रा. बेडेकरांच्या मते, गांधी हे न्यायमूर्ती रानडे यांचे शिष्य होते. त्यांनी वास्तववादाचा मार्ग अव्हेरला आणि आपणास इष्ट वाटणारा मार्ग स्वीकारला. गोखले हे रानडे यांचे शिष्य तर गांधी हे गोखल्यांचे शिष्य. राजकारणाच्या नैतिक स्वरूपाचा गोखल्यांनी आग्रह धरला आणि त्यांच्या घटनात्मक प्रतिकारातील काही सूत्रांचा गांधींनी विकास केला. डॉ. पाटील यांनी आपल्या लेखात दक्षिण आफ्रिकेतील संघर्षात गोखल्यांनी गांधींना कसा पाठिंबा दिला हे सांगितले आहे. पण गांधी व गोखले यांत मतभेद होते. गांधी अद्वैतवादाचे पुरस्कर्ते तर गोखले अज्ञेयवादी. गोखले आधुनिकतेचे पुरस्कर्ते तर गांधी आधुनिक संस्कृतीस ‘सैतानी’ संस्कृती म्हणणार. गांधींचा सत्याग्रह जहालांच्या पुढचा, तर गोखले मवाळ व नेमस्त. पण तरीही त्यांचे जवळचे संबंध होते.

लोकमान्य टिळक व गांधी हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील दोन थोर नेते. टिळकांच्या हातून चळवळीचे नेतृत्व म. गांधींकडे गेले. आचार्य जावडेकर यांनी असे प्रतिपादन केले आहे की, टिळकांचा वारसा गांधींनी पुढे चालवला. पण प्रा. बेडेकर यांनी असे मत होते की, टिळकांच्या विचारात संघर्ष व त्याग  यांना प्राधान्य देणारा ‘सामुराई’ राष्ट्रवाद प्रधान होता. त्यांच्या मते विविध जात, धर्म व वंश यात विभागलेल्या व परस्परांशी स्पर्धा करणाऱ्या मानवी समाजात परस्पर संघर्षातून सामाजिक समतोल प्रस्थापित होतो.

आपल्या लेखात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी या दोन महापुरुषांच्या कार्याचे विवेचन करताना असे म्हटले आहे की ब्रिटिश साम्राज्यशाहीला निडरपणे तोंड देणारा टिळक हा वीरपुरुष होता व गांधींनी त्यांच्यापुढे जाऊन वसाहतवाद मोडीत काढला. टिळकांना भारतात विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारलेला आधुनिक लोकशाही समाज स्थापन करायचा होता, तर गांधींना विकेंद्रित लोकशाही व ग्रामस्वराज्य यावर आधारलेला नवा समाज स्थापन करायचा होता.

आपल्या वैचारिक जडणघडणीमध्ये टॉलस्टॉय, राजचंद्र आणि रस्कीन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असे म. गांधींचे मत होते. धर्म जाणिवेचा विचार केला तर राजचंद्र हे टॉलस्टॉयपेक्षा श्रेष्ठ होते, असेही त्यांनी म्हटले आहे. गांधी आणि राजचंद्र हे समवयस्क. प्रा. बेडेकर यांच्या मते, रायचंदभार्इंमुळे  (राजचंद्र यांना स्नेहीमंडळी रायचंदभाई म्हणत असत.) गांधींना एक नवे आत्मभान प्राप्त झाले. अंत:करणातील स्वयंप्रेरणा व मनाचे सामर्थ्य यांचा लाभ झाला. सत्याचा शोध घेताना आत्मनिष्ठा आणि अंत:करणाची शुद्धी महत्त्वाची आहे. त्यासाठी कोणत्याही एका धर्माची वा धर्मग्रंथाची गरज नाही हे त्यांनी गांधींना सांगितले.

रवींद्रनाथ आणि म. गांधी यांचे जवळचे संबंध होते, पण दोघेही स्वतंत्र बुद्धीच्या व्यक्ती होत्या. प्रख्यात विचारवंत अम्लान दत्त यांनी त्यांच्या विचारांचा परामर्श घेताना असे म्हटले आहे की, अहिंसा, ग्रामीण विकास व शिक्षण यात त्यांना रुची होती. गांधी एका स्वातंत्र्य चळवळीचे नेते होते आणि चळवळ चालवण्याची पद्धत आणि राष्ट्रवाद यांच्याबद्दल त्यांची स्वतंत्र मते होती. टागोर विज्ञानाचे पुरस्कर्ते होते तर गांधींना सर्वसामान्य माणसास चिरडणारे विज्ञान व तंत्रज्ञान नको होते.

या विषयावरचा दुसरा लेख ‘स्वदेशी समाज व स्वराज्य’ या विषयावर श्री. वसंत पळशीकर यांनी लिहिला असून त्यांनी टागोरांच्या ‘स्वदेशी समाज’ या निबंधाची गांधींच्या ‘हिंद स्वराज्य’शी तुलना केली आहे. या दोन्हींचा उद्देश भारताचे उत्थान कशा प्रकारे करावे हाच होता.

आचार्य जावडेकर यांच्या मते टिळकांच्या साम्राज्यविरोधी लोकशाही राजकारणाचा वारसा गांधींनी चालवला. सावरकर स्वत:ला टिळकांचे अनुयायी मानीत असले तरी त्यांचे हिंदुत्ववादी राजकारण अविवेकावर आधारलेले होते आणि टिळकांच्या विवेकी व राष्ट्रीय राजकारणाचा त्याचा संबंध नव्हता. टिळक व गांधी ही हिंदू संस्कृतीने जगाला दिलेली देणगी आहे.

सावरकर हे गांधींच्या विचारांचा उजव्या दृष्टिकोनातून विरोध करणारे असले तर एम. एन. रॉय हे डाव्या व मार्क्सवादी दृष्टिकोनातून गांधीविचारांचा विरोध करीत होते. नंतरच्या काळात त्यांनी मार्क्सवादाचा त्याग केला आणि नवमानवतावादाचा पुरस्कार केला. ते धर्मनिपेक्षता, इहवाद व विवेकवाद यांचे कडवे पुरस्कर्ते होते. ख्यातनाम तत्त्वज्ञ प्रा. मे. पुं. रेगे यांनी रॉय व गांधी यांच्या विचारांचा सम्यक दृष्टिकोनातून आढावा घेतला आहे.

सावरकर, रॉय यांच्याप्रमाणेच डॉ. आंबेडकर हे गांधींचे विरोधक होते. ते त्यांच्या राजकारणाचे व हिंदूधर्म समर्थक भूमिकांचे विरोधक होते. गांधींची धर्मकल्पना, वर्णाश्रमास पाठिंबा, अहिंसेचे स्तोम, त्यांची ग्रामस्वराज्याची कल्पना यांना पण त्यांचा विरोध होता. गांधी आणि आंबेडकर यांच्या संबंधाबाबत श्री. वसंत पळशीकर यांनी विस्तृत विवेचन केले आहे.

डॉ. चैत्रा रेडकर यांनी डॉ. आंबेडकर आणि गांधी यांच्यामध्ये संवादाच्या वाटा कोणत्या असू शकतात, याचे विवेचन केले आहे. त्यांच्या मते, अनेक बाबतीत दोघांच्या भूमिका परस्परविरोधी होत्या, तर काही बाबतीत त्या परस्पर पूरक होत्या. आजच्या संदर्भात परिवर्तनाची निकड लक्षात घेता त्यांच्यामध्ये परस्परपूरक असणारे मुद्दे पुढे नेण्याची गरज आहे.

आचार्य विनोबा भावे यांच्याबद्दल लिहिताना डॉ. पराग चोळकर असे म्हणतात की, विनोबा गांधींचे शिष्य असले तरी ते स्वतंत्र विचारांचे होते. त्यांनी गांधींच्या विचारांना सर्वांगांनी समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. अध्यात्मक्षेत्रात विनोबांचे जे योगदान आहे, त्यात त्यांनी गांधींनी दिलेल्या अंतर्दृष्टीचा मोठा वाटा आहे, असे मत ते व्यक्त करतात.

पं. नेहरू व गांधी यांच्यातील मनोज्ञ अशा अनुबंधांची चर्चा रावसाहेब पटवर्धनांनी त्यांच्या लेखात केली आहे. नेहरू हे समाजवादी, अज्ञेयवादी, आधुनिकतेचे पुरस्कर्ते, औद्योगीकरण व संसदीय राजकारण श्रेयस्कर मानणारे. गांधी या सर्व गोष्टींच्या विरोधात पण काँग्रेस नेत्यांत सर्वात जास्त जवळीक गांधी-नेहरूंच्यामध्ये! रावसाहेबांनी या दोन नेत्यांमधील साम्य व भेद यांची चर्चा करीत असता असे मत व्यक्त केले की, भारतीय राष्ट्रवाद साम्राज्यशाही विरोधी असून तो सर्वांगीण समाज स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो. त्याचे स्वरूप सर्जनशील आणि विधायक आहे.

पं. नेहरू आणि सुभाषचंद्र हे काँग्रेसचे दोन तरुण नेते. दोघेही डाव्या विचारांचे व गांधीचे अनुयायी. पण १९३८-३९मध्ये गांधी आणि सुभाष यांच्यात मतभेद झाले व सुभाषनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन स्वत:चा पक्ष स्थापन केला आणि देशाबाहेर जाऊन स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ‘आझाद हिंद फौजे’ची स्थापना केली. गांधी व सुभाष यांच्यातील संबंधांची चर्चा ज्येष्ठ समाजवादी नेते श्री. ना. ग. गोरे यांनी केली आहे.

जयप्रकाश नारायण व गांधी यांच्यातील परस्पर संबंधांची चर्चा प्रा. एस. एस. पांढरीपांडे यांनी केली आहे. मानवी जीवनाची एकसंधता व एकात्मता, अध्यात्म आणि राजकारणातील अभिन्नता आणि साध्य - साधन विवेक ही गांधींच्या विचारांची तीन सूत्रे जी आत्मसात करण्याचा जयप्रकाशांचा प्रयत्न होता, असे पांढरीपांडे सांगतात.

डॉ. राममनोहर लोहिया हे मोठे विचारवंत आणि समाजवादी चळवळीचे नेते होते. त्यांच्या विचारांवर मार्क्सपेक्षा म. गांधींच्या विचारांचा खोल असा प्रभाव होता. काही बाबतीत गांधी विचारांची त्यांनी नव्याने मांडणी केली. ही मांडणी तिसऱ्या जगातील देशांच्या दृष्टीकोनातून करण्यात आली होती. त्यांच्या मते, भांडवलशाही आणि मार्क्सवाद एकाच उत्पादन प्रक्रियेचे भाग आहेत. त्यात तिसऱ्या जगातील देशांच्या साधनसंपत्तीचे आणि स्वदेशातील कामगारांचे शोषण होते. त्यांच्या मते, गांधींनी सातत्याने समाजातील शोषितांसाठी संघर्ष केला आणि लोकांना अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची शिकवण दिली. सत्याग्रह हा लोकशाही व्यवस्थेसाठी आवश्यक असतो, असे मत व्यक्त करून त्यांनी सिव्हिल नाफर्मानीची कल्पना मांडली. फावडा, तुरुंग व मतपेटी ही त्याची साधने. त्यांची चौखंबा राज्याची कल्पना आणि सप्तक्रांतीचा सिद्धान्त हा एक प्रकारे गांधी विचारांचाच विकास होता.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

प्रसिद्ध विचारवंत प्रा. नरहर कुरुंदकर यांनी गुरुजी (मा. स. गोळवलकर) व गांधी यांच्यातील संबंधांची चर्चा एका लेखात केली आहे. त्यांच्या मते, आपल्या मूळ भूमिका कायम ठेवून जर संघाने गांधींना प्रात: स्मरणीय म्हटले असेल, तर ते म्हणणे औपचारिक ठरते. गांधींनी आजीवन इंग्रजांशी संघर्ष केला, संघाने केला नाही. गांधींनी विविध समाजसुधारणांचा पुरस्कार केला. संघाची त्या बाबतची भूमिका संशयास्पद आहे. गांधींचा राष्ट्रवाद सर्वसमावेशक व ऐक्यकारक आहे. संघ त्यातून काही लोकांना वगळतो. गांधींनी भारत अखंड ठेवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हिंदुत्ववाद्यांनी जरी तोंडाने अखंड भारताचा पुरस्कार केला, तरी तत्त्वत: ते द्विराष्ट्रवादाचे पुरस्कर्ते आहेत. त्यामुळे संघाने आपली मूळ भूमिका बदलल्याशिवाय त्यांच्या गांधी प्रात: स्मरणीय होते या म्हणण्यास अर्थ नाही, असे प्रा. नरहर कुरुंदकर यांचे मत आहे.

गांधींच्या विचारांचा या विविध लेखकांनी जो वेगवेगळ्या अंगांनी अभ्यास केला, विकास केला त्याचे आकलन करण्यास हे लेख साह्यभूत होतील, असा विश्वास वाटतो. म. गांधींचे विचार विश्वव्यापक आणि समृद्ध आहेत आणि या विचारांचा विकास नंतरच्या लोकांनी पण केला आहे. आजच्या आपल्या समस्या समजून घेण्यासाठी व त्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांचा आपणास उपयोग होणार आहे.

गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व’ (खंड २) - संपादक - अशोक चौसाळकर

सेवाग्राम कलेक्टिव्ह आणि साधना प्रकाशन

पाने - ४५०

मूल्य - ४५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......