गांधीजींचे व्यक्तिमत्त्व, गांधीविचारांचे काही पैलू, यावर प्रकाश टाकणाऱ्या या पहिल्या खंडात, सर्वच अभ्यासकांनी गांधींचे व्यक्तित्व आणि विचार यांचे केवळ आकलनच मांडले नाही, तर गांधी विचारांच्या प्रस्तुततेचेही अधोरेखन केले आहे!
ग्रंथनामा - झलक
किशोर बेडकिहाळ
  • ‘गांधी : जीवन आणि कार्य’ या खंडाचे मुखपृष्ठ
  • Fri , 04 March 2022
  • ग्रंथनामा झलक गांधी - जीवन आणि कार्य Gandhi - Jivan aani Karya किशोर बेडकिहाळ Kishor Bedkihal

सेवाग्राम कलेक्टिव्ह आणि साधना प्रकाशन यांच्या संयुक्त प्रकल्पाअंतर्गत साकारलेल्या

१) गांधी : जीवन आणि कार्य - संपादक - किशोर बेडकिहाळ

२) गांधीवाद आणि समकालीन विचारविश्व - संपादक अशोक चौसाळकर

३) गांधी - खुर्द आणि बुद्रुक - संपादक रमेश ओझा

या त्रिखंडात्मक वैचारिक ग्रंथाचे आज पुण्यात संध्याकाळी ‘विश्वकोश निमिती मंडळा’चे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांचे हस्ते प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने पहिल्या खंडाला ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकिहाळ यांनी लिहिलेल्या सविस्तर प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

म. गांधी हे विसाव्या शतकातले एक महान व्यक्तिमत्त्व. अहिंसात्मक व सत्याग्रही प्रतिकाराचा मार्ग जगाला दाखवणारे व त्यावर अंमल करणारे एक युगपुरुष. निर्वैर, निर्भय व समतेवर आधारित जगाचे स्वप्न पहाणारे विचारवंत. निसर्ग व मानवी जीवन यांच्या एकात्मतेच्या आधारावर मानवी जीवनाची उभारणी करू इच्छिणारे व समस्त पुढच्या पिढ्यांसाठी पृथ्वीवरची संपदा सुरक्षित राहील यासाठी अथक व प्रगल्भ विचार करणारं व्यक्तिमत्त्व. धर्मा-धर्मातील वैर संपून सर्व धर्मातील चांगुलपणाचा एकत्रित प्रत्यय देणाऱ्या धर्माची गरज सांगणारे धर्मपुरुष अशी म. गांधींची अनेक रूपे या जगाने पाहिली. जेव्हा जेव्हा जगात हिंसा, संहारक युद्धे, वंश/धर्मद्वेष उफाळून येतो, जेव्हा जेव्हा पर्यावरणाच्या ऱ्हासाची चर्चा सुरू होते तेव्हा तेव्हा जगाला म. गांधी आठवतात, गांधी ही सांत जीवनाची अनंत काळची आस आहे. अशा या व्यक्तिमत्त्वाचा द्वेषही केला गेला, खूनही केला गेला पण तरीही गांधी शिल्लकच आहेत. एक लाखाहून अधिक पुस्तके गांधींवर लिहिली गेली, आजही लिहिली जाताहेत. तत्त्वचिंतक, वैज्ञानिक, अभ्यासक, कार्यकर्ते पुन्हा पुन्हा गांधींच्या विचारांशी झटापट करताहेत व त्यात आपला मार्ग शोधताहेत.

गांधीजी द. आफ्रिकेतील आपले कार्य उरकून भारतात आल्यापासून ते त्यांची हत्या होईपर्यंत व आजतागायत गांधींवर विविध भाषांत लेखन होते आहे. मराठीतही त्यांच्यावर बरेच लेखन झाले आहे. पण ते अर्थातच सुटे-सुटे, प्रासंगिक आहे. ग्रंथरूपाने मराठीत गांधींवर फारच कमी लिहिले गेले आहे. धनंजय कीरांचे सावरकरी भूमिकेतून लिहिलेले सदोष चरित्र, द. न. गोखल्यांचे दोन महामानव (हेही सावरकरी प्रभावाखालील) अशी पुस्तके सोडली तर नलिनी पंडितांचे ऐतिहासिक दृष्टीतून लिहिलेले गांधींवरील पुस्तक व गांधीविचारांचा अन्ययार्थ लावणारे सु. श्री. पांढरीपांडे यांचे लेखन वगळता मराठीत गांधींवरील लेखन सुटे-सुटे झाले आहे. गांधी विचारांचा मागोवा घेणारे, गांधींच्या व्यक्तिमत्त्वाचा मागोवा घेणारे लेखन जसे आहे, तसेच धर्मकारण, अर्थकारण, स्त्री-पुरुष विचार, राज्यविचार अशा विविधांगी पद्धतीने हे लेखन झाले आहे. गांधींच्या विचारातील अलक्षित पैलूंवर विवेचनात्मक म्हणता येईल, असे डॉ. यशवंत सुमंत यांचे अलीकडचे पुस्तक गांधी समजून घेण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे. तरुण मराठी वाचकांच्या हाती गांधींबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल काहीएक सामुग्री असायला हवी, या भूमिकेतून मराठीत गांधींवर लिहिलेल्या अनेक लेखांमधून काही निवडक लेख तीन खंडांच्या रूपाने वाचकांना उपलब्ध करून देण्याच्या प्रकल्पातील हा पहिला खंड.

या खंडात टिळक, रविंद्रनाथ टागोर, पं. नेहरू, आचार्य भागवत या मान्यवरांच्या लेखनाबरोबरच अनेक साहित्यिक, अभ्यासक यांच्या लेखनाचाही समावेश केला आहे. दुसऱ्या खंडात गांधी व अन्य विचारवंत यांचा तौलनिक विचार करणारे लेखन आहे. तर तिसऱ्या खंडात गांधी व जीवनाची इतर क्षेत्रे याबाबतच्या लेखनाचा समावेश आहे. या तीनही खंडातील लेखनाने म. गांधींविषयी जिज्ञासा असणाऱ्या, अभ्यास करू इच्छिणाऱ्यांना आधारभूत साहित्य मिळेल अशी आशा आहे. या आशेनेच हे खंड वाचकाच्या हाती देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

गांधींचे मराठीतले पहिले चरित्र कै. सौ. अवंतिकाबाई गोखले या कार्यकर्ती विदुषीने लिहिले व तेही गांधींचा चंपारण्य सत्याग्रह चालू असताना. अवंतिकाबार्इंनी गांधींचे चरित्र लिहिले व त्याची प्रस्तावना लिहिण्यासाठी टिळकांना विनंती केली. टिळकांना गांधींच्या कार्याची एव्हाना माहिती झाली होती. म्हणूनच टिळक गांधींबद्दल काय लिहितात, याची उत्सुकता स्वाभविक आहे. या प्रस्तावनेत टिळकांनी गांधीचा कट्टर देशभक्त असा उल्लेख केला आहे. गांधींच्या चरित्रातील वेगळेपण शोधताना (जे त्यांच्या यशालाही कारणीभूत होते असे टिळकांना वाटले) गांधींच्या शीला (किंवा चारित्र्य) ची महत्ता प्रतिपादली आहे व गांधींचे चरित्र सामान्य माणसास आदर्शभूत होण्यासारखे आहे. असाही अभिप्राय दिला आहे. महाराष्ट्रातील लोकांनी त्यांच्या चरित्राचा नीट अभ्यास करावा अशीही शिफारस केली आहे.

या खंडातील दुसरा लेख रविंद्रनाथ टागोर (ठाकूर) यांचा आहे. टागोर हे गांधींचे समकालीन. १९१४-१९४१ हा गांधी-टागोरांच्या संपर्काचा व संबंधांचा काळ. उभयतांमधील पत्रव्यवहार प्रसिद्धच आहे. अनेक बाबतीत टागोरांचे गांधींशी मतभेद होते पण गांधी उभे करत असलेल्या कार्याविषयी मात्र टागोर नि:शंक होते. या निबंधात टागोर प्राचीन भारताची परिस्थिती विशद करतात व ब्रिटीश काळातल्या तिच्या अवनतीची मीमांसा करतात.

या खंडातील तिसरा लेख आचार्य स. ज. भागवतांचा आहे. आचार्य भागवत हे गांधीवादी परंपरेतील विद्वान मानले जातात. त्यांच्या समग्र वाङ्‌मयाचे दोन्ही खंड पाहिले तरी त्यांच्या बहुआयामी विद्वत्तेची कल्पना येईल. गांधीजींचे जीवनदर्शन उलगडण्याचा प्रयत्न त्यांनी या लेखात केला आहे.

या खंडातील चौथा लेख महाराष्ट्रातील प्रकांड पंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा आहे. लेख अगदी छोटा आहे, गांधी हत्येनंतर नागपुरी केलेल्या भाषणाचा सारांश आहे. पण एवढ्या छोट्या लेखात तर्कतीर्थांनी गांधींचे केवढे नि वेगळे दर्शन घडवले आहे याचा प्रत्यय येतो.

वसंत पळशीकर हे महाराष्ट्रातील गांधी विचाराचे कसलेले अभ्यासक. गांधींवर त्यांनी पुष्कळ मौलिक लेखन केलेले आहे. गांधी विचार समजावून घेण्याची एक पद्धत, रीत या लेखात पळशीकरांनी उलगडला आहे. सत्य आणि अहिंसा ही गांधीजींच्या विचारांची पायाभूत तत्त्वे. गांधीजींचे सर्व जगणे यांच्या आधारे पहाता येते. गांधींच्या सत्यशोधनाचा पाया काय होता? ते कशाच्या आधारे सत्य शोधीत या प्रश्नाचे सविस्तर विश्लेषण पळशीकरांनी केले आहे.

मे. पुं. रेगे हे महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचे व्यासंगी अभ्यासक, त्याचप्रमाणे सामाजिक-सांस्कृतिक प्रश्नांचे मीमांसक. त्यांनी १९७० साली वाचलेला एक निबंध ‘गांधीजी आणि बदलती मूल्ये’ या खंडात समाविष्ट केला आहे. प्रा. रेगे यांनी असे निरीक्षण नोंदवले की गांधीजींना, त्यांच्या मूल्यांना नव्या पिढीच्या विचारात काही स्थान दिसत नाही. कार्यक्षमता, बलिष्ठ (लष्कर + विज्ञान) राष्ट्र व व्यक्तिगत उन्नती यावरच त्यांचा भर आहे. हे साध्य करण्यासाठी पारंपरिक वा गांधी नीतीची/मूल्यांची गरज नाही.

प्रा. नरहर कुरुंदकर हे महाराष्ट्राला व्यासंगी विचारवंत म्हणून माहीत आहेत. १९६७च्या आसपास ‘जागर’ नावाचा त्यांचा राजकीय लेखसंग्रह आला. म. गांधींविषयी त्यांचा प्रदीर्घ लेख यात आहे. सर्वसामान्य माणसे करतात त्याहून वेगळी मांडणी कुरुंदकर गांधींबद्दल करतात व ती वैशिष्ट्यपूर्णही आहे. गांधी आणि स्वातंत्र्य चळवळ हा गांधीच्या आयुष्यातला भाग महत्त्वाचा खरा पण त्यापेक्षाही मानवजातीच्या भवितव्यासंदर्भात गांधींकडे पहाणारे जे अभ्यासक आहेत (उदा. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, वसंत पळशीकर) त्यात कुरुंदकरांची गणना करावी लागेल. गांधींचे हे मूल्यमापन ही कुरुंदकरांच्या विलक्षण प्रतिभेची साक्ष देते. गांधींचे अर्थकारण आदि बाबी इथे दुय्यम होतात. म्हणूनच मानवजातीच्या भवितव्यासंदर्भात कुरुंदकर ‘गांधी’ उभा करतात.

खंडात ‘म. गांधी आणि समाज सुधारणा’ हा कुरुंदकरांचा लेख (१९७६ सालचा) समाविष्ट केला आहे. या लेखात कुरुंदकर गांधींच्या धर्मविषयक, समाज सुधारणा विषयक भूमिकेवर विस्ताराने लिहितात.

प्रा. सु. श्री. पांढरीपांडे हे गांधी विचारांचे मूलगामी भाष्यकार, समीक्षक आहेत. गांधी-परंपरा आणि परिवर्तन हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा लेख या खंडात समाविष्ट केला आहे.

गांधीजींच्या चिंतनात मानवी जीवनाला व्यापणाऱ्या राज्यसंस्थेविषयक चिंतन फार महत्त्वाचे आहे. गांधीजींना अपेक्षित असणाऱ्या पर्यायी समाजाच्या कल्पनेच्या दृष्टीने हे चिंतन महत्त्वाचे आहे. या चिंतनाचे विश्लेषण व गांधींची राज्यविषयक विचारांची सखोल मीमांसा वसंत पळशीकरांनी एका लेखात केली आहे.

‘परंपरा आणि परिवर्तन’ हा एक प्रा. सु. श्री. पांढरीपांडे यांचा लेख या संग्रहात घेतला आहे. प्रा. पांढरीपांडे यांचा ‘गांधींचा अहिंसाविचार’ हा लेखही या संग्रहात घेतला आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

आजच्या राज्यघटनेत ‘गांधीविचार’ किती प्रमाणात आहे? या प्रश्नाचा विचार न्या. नरेंद्र चपळगांवकर यांच्या ‘राज्यघटनेतील गांधीविचार’ या लेखात दिसेल. वस्तुत: हा लेख न्या. चपळगांवकर यांच्या म. गांधी आणि भारतीय राज्यघटना या राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील हे एक महत्त्वाचे प्रकरण आहे. त्यातल्या त्यात राज्यघटनेची उद्देशिका हेच गांधी विचाराचे घटनेतील प्रतीक मानावे लागते. मार्गदर्शक तत्त्वांतील काही तरतुदी, घटनेची उद्देशिका, अस्पृश्यता निर्मूलनाचे कलम, अलीकडे पंचायतींना मिळालेले अधिकार, धर्मस्वातंत्र्याच्या कल्पना अशा काही बाबीच आज राज्यघटनेतील गांधी विचार म्हणून दाखवता येतात. न्या. चपळगांवकर यांचा हा लेख तपशीलासह या वास्तवाचे भान देतो.

‘हिंदस्वराज्य’ हे गांधींचे १९०८-०९ सालचे पुस्तक भारतीय राज्यकारणाच्या चर्चाविश्वातले हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक मानले जाते. ‘हिंदस्वराज्य’ वरचे दोन लेख या खंडात समाविष्ट केले आहेत. यातील पहिला लेख प्रसिद्ध अभ्यासक व राज्यशास्त्राचे नामवंत अध्यापक डॉ. अशोक चौसाळकरांचा आहे. दुसरा लेख गांधी विचाराच्या व्यासंगी तरुण अभ्यासक व राज्यशास्त्राच्या प्राध्यापक डॉ. चैत्रा रेडकर यांचा आहे. डॉ. रेडकर यांच्या लेखाचा मध्यवर्ती रोख ‘हिंद स्वराज्य’ हे समाजसापेक्ष विकासाचे प्रतिमान म्हणून उभे करण्याचा आहे.

‘गांधी विचारातील समता संकल्पना : एक पुनर्विचार’ हा डॉ. यशवंत सुमंत या व्यासंगी अभ्यासकांचा लेख या खंडात मुद्दाम समाविष्ठ केला आहे. डॉ. यशवंत सुमंत हे अलिकडच्या काळातील गांधी विचारांचे समर्थ भाष्यकार मानले जातात. विशेषत: गांधी-आंबेडकरांची परस्परपूरकता सिद्ध करणाऱ्या (आधीच्या अभ्यासकांपेक्षा) चर्चा विश्वात अत्यंत मोलाची भर त्यांनी घातली आहे. गांधी विचारातील अनेक कल्पनांचे नव्या संदर्भात डॉ. सुमंतानी विवरण केले आहे. त्यांच्या पूर्वसुरीपेक्षा डॉ. सुमंतानी गांधी विचारातील समता संकल्पना, ब्रह्मचर्य, आर्थिक तत्त्वज्ञान यांचे वेगळे पैलू समोर आणले आहे. गांधीविचार हा पुन्हा मराठी चर्चाविश्वात सुप्रतीपांत करण्याचे श्रेय नि:शंकपणे डॉ. सुमंताना द्यावे लागेल.

गांधीजींचे आर्थिक विषयावरील चिंतन हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. यंत्रप्रधान औद्योगिक व्यवस्थाच उत्पादन, पुरवठा व जीवनमानातील वाढ या बाबी पुरवू शकेल, अशी १९ व २० व्या शतकातील धुरिणांची धारणा होती. गांधीजी तर यंत्रविरोधकच म्हणूनच माहीत होते ते अज्ञानामुळे. गांधीजींचे अर्थशास्त्र हे मागासांचे अर्थशास्त्र आहे. ‘रोजगार, आर्थिक विकास आणि गांधी विचार’ या विषयावर वसंत पळशीकरांनी वाचलेला निबंध या खंडात समाविष्ट केला आहे. गांधीजींच्या विचारातून रोजगार, दारिद्र्य, आर्थिक विकास या प्रश्नांची उकल करण्याचा एक सकस प्रयत्न या निबंधात दिसतो.

गांधींची धर्मसंकल्पना व समाजसुधारणा याचा अन्वयार्थ लावणारा स्मृती शेष प्रा. नरहर कुरुंदकरांचा एक लेख याच खंडात आहे. त्यावर लिहिताना प्रस्तुत लेखकाने कुरुंदकरांशी असणाऱ्या मतभेदाचा धावता उल्लेख केला होता. याचा अधिक विस्तार करणारा व गांधींची धर्मकल्पना व सुधारणा यांचा गाभा शोधणारा एक लेख यात प्रस्तुत लेखकाने लिहिला आहे व त्याला आजच्या ‘धर्म’ स्वरूपाचा/तथाकथित धार्मिकतेचा संदर्भ आहे.

अरुण खोपकर हे प्रख्यात कला समीक्षक म्हणून आपणा सर्वांना माहीत आहेत. त्यांचा एक अतिशय वेगळा लेख या खंडात समाविष्ट केला आहे. गांधींना आतापर्यंत अनेक रूपात पाहिले गेले आहे पण कवि-कलावंत गांधी म्हणून क्वचित्‌च पाहिले गेले. गांधींची चित्रपट/कला/साहित्य या विषयीच्या मतांची कधीच गंभीरपणे दखल घेतली गेली नाही. अरुण खोपकरांचा लेख गांधींना कवि-कलावंताच्या भूमिकेत पहातो.

संशोधक, अभ्यासकासारखे गांधी अकादमिक अर्थाने विचारवंत नव्हते. त्यांचे बहुतेक लेखन प्रासंगिक, संवादात्मक, वृत्तपत्रीय, पत्रव्यवहार यातून दिसते. या त्यांच्या सुट्या लेखनातून ‘गांधीवाद’ नावाची समग्र व बांधेसूद विचारप्रणाली व्यक्त होईल असे लेखन गांधींचे नाही. तरीही ‘गांधीवाद’ नावाची एक विचारधारा प्रत्यक्षात कार्यरत आहे. त्यामुळे तिची दखल घेणे भाग आहे. गांधी विचारांना एखाद्या प्रणालीमध्ये बंदिस्त करणे योग्य नाही, गांधी सतत परिवर्तनशील होते हे सारे मान्य करूनही निश्चित उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी एक विचार व्यवस्था म्हणून गांधीवादाने कामगिरी बजावली आहे व बजावत आहे हे वास्तव राहतेच. याच वास्तवाचा वेध या खंडात गांधी विचारांच्या प्रसिद्ध अभ्यासक डॉ. चैत्रा रेडकरांनी घेतला आहे. हा वेध घेत असताना गांधीवाद ही केवळ राष्ट्रवादी विचारधारा आहे असे नाही, गांधीवादाची चर्चा ही राष्ट्रवादाच्या अतित जाऊन करायला हवी (नव्हे आवश्यक आहे) हा रेडकरांचा इशारा आवर्जून लक्षात घ्यायला हवा. कारण त्यामुळे या विचारप्रणालीचे वेगळेपण व क्रांतिकारकता लक्षात येणार नाही.

गांधी मार्गाच्या सामर्थ्य आणि मर्यादांचा विचार अनेक तत्त्वचिंतकांनी केला आहे. त्यात स्वतंत्र दृष्टीचे मार्क्सवादी विचारवंत दि. के. बेडेकर यांचे नाव/लेखन महत्त्वाचे आहे. या खंडात त्यांचा अगदी छोटा पण विचारप्रवृत्त करणारा ‘गांधीमार्ग : सामर्थ्य आणि मर्यादा’ हा लेख मुद्दाम समाविष्ट केला आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

गांधी विचाराने प्रेरित होऊन ध्येयवादाच्या आधारे आपले जीवन व्यतीत करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी लेखकात वि. स. खांडेकरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांच्या कांदबऱ्या, विशेषत: क्रौंचवधकडे बोट दाखवता येते. गांधीवादापेक्षाही गांधी मोठे आहेत असे एक वाक्य त्यांच्या एका कादंबरीत नायकाच्या तोंडी वाचल्याचे स्मरते. खांडेकरांच्या अनेक भाषणातून (प्रस्तुत लेखकाने ऐकलेल्या) ढासळत्या राजकीय-सामाजिक परिस्थितीविषयीचे भाष्य करताना गांधीविचार हा आधारभूत असे. १९६९ साली गांधी जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी लिहिलेल्या एका लेखाचा समावेश ‘एक महामानवाचे एक भव्य स्वप्न’ या खंडात समाविष्ट केला आहे.

या खंडात म. गांधी आणि महाराष्ट्र हा प्रा. गं. बा. सरदार यांचा लेख मुद्दाम समाविष्ट केला आहे. गांधीजी आणि महाराष्ट्र यांची नाळ स्वातंत्र्य चळवळीच्या काळात जुळली हे खरेच. पण अ. भा. राजकारणाची सूत्रे टिळकांकडून गांधींकडे गेली म्हणजेच महाराष्ट्राकडून गांधींकडे गेली ही या संबंधांची सुरुवात होती. गांधी आफ्रिकेतून परत येऊन साबरमतीत त्यांनी आश्रम काढला व १५ वर्षे त्यांचे वास्तव्य तेथे राहिले. प्रा. सरदारांनी पुढची १८ वर्षे त्यांचा अनुबंध महाराष्ट्राशी राहिला. गांधी-महाराष्ट्र यांच्या अनुबंधाचा काळ हा महाराष्ट्रातील विलक्षण चैतन्याचा, जागृतीचा काळ आहे. प्रा. सरदारांनी म्हटल्याप्रमाणे सक्षम समर्थक व कडवे विरोधक गांधींना महाराष्ट्रातच मिळाले. भारतीय राजकारणातील महत्त्वाच्या तीनही प्रवाहांचे भक्कम अस्तित्व महाराष्ट्रात होते. (गांधींचा गुरूही महाराष्ट्रातलाच होता) महाराष्ट्रातील बुद्धिजीवींच्या एका गटाने (यात केळकर प्रभुतींचा गट जसा आहे तसा मार्क्सवाद्यांचाही आहे) गांधी विचार/राजकारण कधीच आपले मानले नाही. टिळकपंथीय जहाल (पण प्रत्यक्षातले मवाळ) नाईलाजाने काँग्रेसबरोबर गेले तरी तेथे मनाने समरस झाले नाहीत याची नेमकी नोंद प्रा. सरदारांनी घेतली आहे. गांधींच्या विचारात महाराष्ट्रातील जहालांचा प्रतिकारवाद व नेमस्तांचा उदारमतवाद यांचा समन्वय साधलेला आहे हे प्रा. सरदारांनी दाखवून दिले आहे पण त्याचबरोबर आधीच्या राजकारणाच्या सर्व मर्यादांवर गांधीनी मात करून एक नवे राजकारण उभे केले, याचेही सूचन केले आहे. गांधीजींना महाराष्ट्रातील जहाल व नेमस्त यांचा मुकाबला करावा लागला नाही, हे प्रा. सरदारांचे निरीक्षण मार्मिक आहे. टिळकपंथी जहालांबाबतही प्रा. सरदारांचे निरीक्षण असेच मार्मिक व महत्त्वाचे आहे. बहुतांश टिळकपंथीय जहाल हे सरकारी नोकऱ्यात होते. ते सुरक्षिततेच्या काळात टिळकांच्या कार्याला हातभार लावीत पण सरकारची वक्रदृष्टी (अर्थातच टिळकांवर) झाली की गायकवाड्याच्या आसपासही फिरकत नसत. सरकारची भीती व अनुयायांच्या मर्यादा याचे उत्तम सूचन प्रा. सरदारांनी व्यक्त केले आहे. गांधींनी लोकांना या भीतीवरच मात करायला शिकवली त्यामुळे काँग्रेसमधील सर्वसामान्यांचा सहभाग वाढला. महाराष्ट्राने गांधींना व काँग्रेसला बळ दिले त्याची बीजे यात आहेत असेच म्हणावे लागेल. महर्षी वि. रा. शिंदे, बहुजनांचा काँग्रेस प्रवेश, गांधीजींना महाराष्ट्रात लाभलेले अनुयायी, कार्यकर्ते, अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्यात महाराष्ट्रातील विविध विचारांच्या कार्यकर्त्यांचे योगदान, गांधी विचारांचे निर्माण झालेले भाष्यकार, यांची नोंद प्रा. सरदारांनी घेतली आहे.

महाराष्ट्रातील बुद्धिमतांच्या मनात गांधीविचार का मूळ धरू शकला नाही याचे योग्य असे विश्लेषणही प्रा. सरदारांनी केले आहे. मराठी ललित साहित्यात उमटलेल्या गांधीविचारांच्या पडसादाची ओझरती नोंदही या लेखात आहे. गांधी चळवळीतून प्रेरणा घेऊन देशाला आपले जीवन समर्पित करणाऱ्या पक्षांचाही उल्लेख प्रा. सरदार करतात. आणखी एका गोष्टीची नोंद इथे करावयास हवी (जी सरदारांच्या विवेचनात नाही) महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, शे. का. पक्ष, लालनिशाण या सारख्या मार्क्स-लेनिनच्या तत्त्वज्ञानावर विश्वास असणाऱ्या डाव्या पक्षांची आंदोलनेही सत्याग्रही मार्गाने, शांततामय मार्गाने होतात याचे कारणही या पक्षांचे धुरीण गांधींच्या चळवळीतून घडले होते. विचारप्रणाली कोणतीही असो, गांधींची चळवळ व्यापक असल्याने व ती आघाडीच्या रूपात असल्याने हे शक्य होते. गांधींच्या कालखंडाचा आंदोलनांच्या पद्धतीवर परिणाम झाला आहे. प्रा. एन. डी. पाटील, याचे प्रतिनिधिक उदाहरण म्हणून सांगता येतात. महाराष्ट्राने गांधीविचार तत्त्वज्ञानात्मक पातळीवर जरी स्वीकारला नाही तर त्यांच्या मार्गाचा प्रभाव पडलेला आहे. गांधी व महाराष्ट्र यांचा असा हा आगळा-वेगळा अनुबंध प्रा. सरदारांनी सुरेख रेखाटला आहे.

या खंडाची सुरुवात लो. टिळकांच्या लेखाने झाली व शेवट पं. नेहरुंच्या लेखाने होतो आहे. टिळकांच्या काळात गांधींचे नेतृत्व उदयाला येत होते, नेतृत्वाच्या संक्रमणाचा काळ होता. ‘साधनानाम अनेकता’ यावर टिळक कायम असले तरी गांधींच्या मार्गाच्या यशाची शक्यताही त्यांना वाटत होती, म्हणूनच तर गांधीचा सत्याग्रहाचा मार्ग शास्त्रपूत झाला आहे असे त्यांनी म्हटले होते. व याद्वारा गांधींच्या नेतृत्वाला एक प्रकारे त्यांनी हिरवा कंदील दाखवला होता. नेहरूंचा काळ हा गांधींच्या नेतृत्वाखाली चळवळीतल्या सक्रियतेचा होता. गांधीमार्गाचा परिणाम, किमया, गांधींचे नेतृत्व, आंदोलनाची त्यांची पद्धत, जनमासाचे त्यांचे अचूक आकलन, जनतेवरील त्यांचा प्रभाव या साऱ्याचा अनुभव व अनुभुतीचा हा काळ होता. स्वातंत्र्याच्या चळवळीत नेहरू-गांधी हा अनुबंध तयार झाला, गडद झाला, पण उभयतांपैकी कोणाच्याच व्यक्तिमत्त्वाचा त्यातून लोप झाला नाही. स्वत:ची स्वतंत्र व्यक्तिमत्त्वे ठेवूनही हा अनुबंध फारच घट्ट होता. म्हणूनच नेहरूंनी केलेले गांधींचे आकलन महत्त्वाचे आहे. नेहरूंच्या या लेखामध्ये त्यांचा गांधींशी असलेला भावनिक अनुबंध जसा व्यक्त होतो, तसेच त्या पलिकडे जाऊन गांधींच्या कोणत्या गुणांचा देशाला फायदा झाला, याचाही ताळेबंद व्यक्त होतो.

गांधींची मूल्ये, त्यांच्या भूमिका, त्यांच्या कृश शरीरातील पोलादी निर्धार, धैर्य, त्यांच्या जीवनपद्धतीतील सौंदर्य, गांधींची धार्मिकता-आध्यात्मिकता, जनतेच्या मनोधर्माची जाणीव, नैतिक कायद्याच्या श्रेष्ठत्वाची त्यांची जाणीव, गांधींच्या आवाजाची जादू, स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र धोरणाला त्यांच्या शिकवणुकीची झालेली मदत, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा धोरणांवर असलेला प्रभाव, या साऱ्या बाबींचा आढावा नेहरुंच्या या लेखात येतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

गांधी गेले, तेव्हा आमच्या जीवनातील प्रकाश मावळला, अशी जी प्रतिक्रिया नेहरूंनी व्यक्त केली होती ती चुकीची होती याची प्रांजळ कबुली नेहरुंनी या लेखा शेवटी दिली आहे. गांधीजींच्या असण्याने, कार्याने निर्माण झालेल्या तेजाचा प्रकाश सामान्य नव्हता, तर तो हजारो वर्षांनंतरही चमकत राहील, या मनोज्ञ शब्दात नेहरुंनी आपली भावना व्यक्त केली आहे. हा लेख संकलनात्मक स्वरूपात जरी असला तरी त्याची सलगता वाचकांना जाणवेल. नेहरू-गांधी हा समास भारताच्या सार्वजनिक जीवनात जवळजवळ ३० वर्षे एकत्र होता. गांधींच्या हत्येनेच तो विलग झाला. एवढ्या दीर्घकाळाचा हा अनुबंध खरोखरीच नेहरुंच्या रसरशीत लेखाने व्यक्त झाला आहे.

असा हा ‘गांधींजींविषयी’ चा खंड. गांधीजींचे व्यक्तिमत्त्व, गांधीविचारांचे काही पैलू यावर प्रकाश टाकणारा. यात लिहिणारे मयत व हयात लेखक नामवंत अभ्यासक आहेत. या खंडाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ पाच पिढ्यांमधल्या अभ्यासकांच्या लेखांचा यात समावेश आहे. टिळक-टागोरांची एक पिढी, नेहरु-आचार्य भागवत यांची एक पिढी, कुरुंदकर-पळशीकर यांची एक पिढी, चौसाळकर-सुमंत यांची एक पिढी व आताची चैत्रा रेडकरांची पिढी अशा पाच पिढ्यांच्या प्रतिनिधिक लेखकांचा हा संग्रह. या सर्वच अभ्यासकांनी गांधींचे व्यक्तित्व आणि विचार यांचे केवळ आकलनच मांडले नाही, तर यातल्या प्रत्येक लेखातून गांधी विचारांच्या त्यांच्या-त्यांच्या कालखंडातील प्रस्तुततेचेही अधोरेखन आहे. पहिल्या मराठी गांधी चरित्राला टिळकांनी प्रस्तावना लिहिल्याला शंभर वर्षे होऊन गेल्यावरही गांधींचे व्यक्तित्व, गांधीविचार अभ्यासकांना खुणावत आहे, चिकित्सेचा मोह घालत आहे इतके सामर्थ्य गांधी विचारात असल्याचीच ही खूण आहे. गांधींजींविषयीचे हे लेखन आजच्या विद्यार्थी, युवक, अध्यापक, अभ्यासक, संशोधक यांना आजही उपयोगी ठरेल असा विश्वास वाटतो.

‘गांधी : जीवन आणि कार्य’ (खंड १) - संपादक किशोर बेडकिहाळ

सेवाग्राम कलेक्टिव्ह आणि साधना प्रकाशन

पाने - ५५०

मूल्य - ५५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......