स्त्रीवादी जाणिवांत आक्रस्ताळेपणा नसलेली आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेतील दुटप्पीपणा व वर्चस्ववाद यांविषयी लिहिताना तोल ढळू न देणारी वैशिष्ट्यपूर्ण कविता
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
विकास पालवे
  • कवयित्री योगिनी सातारकर-पांडे आणि त्यांच्या ‘शब्द जायबंदी होण्याचे दिवस’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Thu , 03 March 2022
  • ग्रंथनामा शिफारस योगिनी सातारकर-पांडे Yogini Satarkar-Pande शब्द जायबंदी होण्याचे दिवस Shabd Jaybandi Honyache Divas

योगिनी सातारकर-पांडे यांच्या ‘शब्द जायबंदी होण्याचे दिवस’ या कवितासंग्रहाला प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठान, नांदेड यांचा ‘प्रसाद बन ग्रंथगौरव पुरस्कार’ आणि कल्याण सार्वजनिक वाचनालयाचा ‘कवी माधवानुज काव्य पुरस्कार’ असे दोन पुरस्कार हल्लीच जाहीर झाले आहेत. त्या निमित्ताने या कवितासंग्रहाचा परिचय करून देणारा हा लेख...

..................................................................................................................................................................

मराठी काव्यविश्वात ज्या कवयित्री आपले अनुभव, काव्यशैली, काव्यप्रतिमा यांद्वारे वैशिष्ट्यपूर्ण कविता लिहीत आहेत, त्यांत योगिनी सातारकर-पांडे यांचाही समावेश करता येईल. त्यांच्या ‘शब्द जायबंदी होण्याचे दिवस’ या दुसऱ्या कवितासंग्रहातील कविता वाचल्यानंतर याची प्रचीती येते. त्यांच्या कवितांतून मुख्यतः स्त्रीच्या जगण्याची विविध रूपं आविष्कृत झालेली आहेत. पण या कविता केवळ स्त्रीवादी अनुभवविश्वापुरत्याच मर्यादित राहत नाहीत. त्यांत आंतरिक आणि बाह्य जगाशी सततचा चाललेला संवाद-विसंवाद, प्रेम भावनेची नाजूक अभिव्यक्ती, मध्यमवर्गीय आत्ममुग्धता यांबद्दलही अतिशय संयत अशी मांडणी पाहायला मिळते.       

समाजात भौतिक प्रगती जसजशी होऊ लागते, तसतशी आंतरिकदृष्ट्या माणसं एकमेकांपासून विलग होऊ लागतात, असा अनुभव आहे. आधुनिक विकासाची ही अपरिहार्य परिणती आहे, असंही म्हटलं जातं. अशा परिस्थितीत कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला बाह्य जगाशी स्वतःला जोडून घेता येत नाहीय किंवा त्या जगाशी आपला नीट संवाद प्रस्थापित करता येत नाहीय, असं वाटू लागतं. ‘खोल खोल माझ्या आत’ या कवितेत हीच स्थिती व्यक्त झालेली आहे. ती काही तरी सांगू पाहते तर ‘शहराच्या निर्लेप गर्दीवर जरासाही ओरखडा उमटत नाही’ असं तिच्या अनुभवाला येतं. ती ‘मूक गच्च काळोखात’ या कवितेतही आयुष्यात घडणाऱ्या सामान्य गोष्टी ज्यांच्याशी वाटून घेता येतील असं कोणीही सापडत नसल्याची कबुली देते. ‘कुणाला सांगावं बोटांवर विसरून राहिलेल्या / फुलपाखराच्या रंगाबद्दल / कुणाशी बोलावं चौरस्त्यावर एक मूल जात होतं / केविलवाणं’ अशी आर्त सुरातील विचारणा ती करते. पण ‘कितीतरी वेळ आपण बोलतोय पण कुणीच येत नाहीय’ असा अनुभव तिला येतो, ‘शब्द फुटत नाहीयेत की विरताहेत मधल्यामध्येच’ अशी संभ्रमावस्था होते, ‘ऐकू जात नाहीयेत का शब्द भवतालच्या कोलाहलात’ असा हतबल करून टाकणारा प्रश्न तिला पडतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

आपल्या आजूबाजूच्या माणसांशी जर आपण नीट जुळवून घेऊ शकत नसलो, तर नकळतच एक तुटलेपण पदोपदी जाणवायला लागते. कवयित्री ‘वजा होत चाललेय बहुतेक’ या कवितेत याच प्रकारच्या अनुभवाची अभिव्यक्ती करते. खिडकी, दार, आरसा अशा सगळ्या बाबी त्यांच्या त्यांच्या नेमून दिलेल्या जागेवर आहेत, पण त्यांच्या असण्याचं जे प्रयोजन आहे, ते पूर्ण करण्यात कवयित्री असफल ठरते. म्हणूनच तिला ‘सगळ्या भवतालातून आपण बहुतेक वजा होत चाललोय’ अशी विकल करणारी जाणीव होते. ती बाह्य जगात बसणाऱ्या तडाख्यांनी विद्ध होऊन आतल्या जगाकडे वळण्याचा प्रयत्न करते, तिथे ‘निर्मम अंधार’ असला तरी त्या अंधाराचीच तिला असोशी वाटू लागते (‘माघारी फिरण्याचे सगळे पर्याय’).

जगणं अर्थहीन वाटू लागलेल्या व्यक्तीला त्याच्याही नकळत काळोखाची ओढ वाटायला लागते. कवयित्रीच्या असे अनुभव व्यक्त करणाऱ्या कवितांत काळोखाची प्रतिमा अनेकवार समोर येते. ती ‘अस्तित्वाचा अथकपणे अर्थशोध घेत राहणं’, ‘काळोखात सामावल्याची टोचरी तीव्र जाणीव होणं’, अशी सैरभैर झालेली स्थिती ‘एकांताच्या सरळ रेषेत’ या कवितेत व्यक्त करते. ‘काळोख उमलून आलाय’ या शीर्षकातच कवितेचा आशय एकवटलेला आहे. ‘आयुष्याच्या कातळात कितीही आत आत पोखरत गेलं तरी काळोखाच्याच खिडक्या उघडत राहणं’ आणि ‘कितीही सजग राहिलं तरी काहीतरी निसटून चालल्याची जाणीव होत राहणं’, या मनोवस्थांतून तिची पोरकी होत गेलेली स्थिती लक्षात येते. तिचं एकटेपण आणि हतबलता पृष्ठभागावर येते (‘इथे तिथे सर्वत्र’).

तिची स्वतःच्या आत उतरून उत्खनन करण्याची असोशीही अनेक कवितांत दिसून येते. जगताना निरनिराळ्या कारणांमुळे होणारी जिवाची तगमग किंवा पायाखालच्या जमिनीला वारंवार बसणारे हादरे आणि त्यामुळे होणारी दमछाक, उलघाल, वाट्याला येणारं एकटेपण ‘प्राणांतिक’, ‘उलघाल’, ‘आपल्याकडे रोखलं गेलेलं...’, ‘एक अख्खा दिवस’, ‘निर्लेप’, ‘हे एकटेपण’, ‘खिडकी’, ‘मधल्यामध्ये’, अशा अनेक कवितांत फार प्रभावीपणे अभिव्यक्त झालेलं आहे.

या सगळ्या कोलाहलातच तिची सृजनशील निर्मितीची धडपड सुरू असते. तिच्या आत अनेक शब्दांची, काव्यप्रतिमांची जी गजबज असते, ती कवितेच्या निर्मितीला आकार द्यायला प्रोत्साहित असते. ती ‘कोणती अनिवार ओढ असते’ या कवितेत लिहिते, ‘कितीही करपवलं परिस्थितीने / तरी कवितेची मुळं / तग धरून राहतात / आतल्याआत धग सोसत / निमूटपणे.’ तिच्या ‘भर उन्हाळ्यातल्या...’ या कवितेत दृश्यात्मकता आहे. रोज ज्या गोष्टी घडत असतात त्याच एका उन्हाळ्यातल्या दुपारी कवयित्रीच्या अवतीभवती घडत असतात आणि तिच्या ‘मनात मात्र न मावणाऱ्या फडफडणाऱ्या शब्दांचा अतोनात कोलाहल’ सुरू असतो. कविता लिहिणाऱ्याच्या आत कायम शब्द, प्रतिमा, रूपकं यांच्याशी संवाद सुरू असतो जो त्याला कधीच स्वस्थ बसू देत नाही, हे यातून सूचित केलं आहे.

या कवितासंग्रहातील महत्त्वपूर्ण भाग आहे तो स्त्री जाणिवा व्यक्त करणाऱ्या कवितांचा. समाजात पुरुषसत्ताक व्यवस्थेचं प्राबल्य असल्यामुळे स्त्रीची अनेक पातळ्यांवर होणारी कुचंबणा अनेक कवितांचा विषय झालेली आहे. ‘जे उमटतंय आता या कागदावर’ ही कविता म्हणजे स्त्रियांच्या वाट्याला शतकानुशतकं जे दुःख येत राहिलं, त्याला दिलेली प्रतिक्रिया आहे, स्त्रियांनी भोगलेल्या दुःखांची गाथा आहे. कवयित्री स्वतःला समस्त स्त्री जातीच्या दुःखांशी जोडून घेते. ‘मी सांगू पाहतेय माझं असं काही / आणि कागदावर उमटताहेत शब्दांऐवजी अश्रू / बायाबापड्यांनी वळचणीला टांगलेल्या दुःखाचे’ अशा शब्दांत ती आपली अनुभूती व्यक्त करते. ‘ऊन’ या कवितेत ऊन आणि अंधार अशा दोन्ही काळांत तरुण मुलींच्या वागण्यात, बाह्य जगात वावरण्यात कशा पद्धतीने अंतर पडत जातं हे सांगून मुलींसाठी असुरक्षित, धोकादायक अशा भवतालच्या पर्यावरणावर टिप्पणी केली आहे. ‘उन्हाच्या कवडशांत’ मनमुरादपणे खेळणाऱ्या मुली अंधार पडताच सावध होऊ लागतात आणि त्या घरी परततात ‘काळोखाच्या या अनाम राज्यात / अचानकच / अबोल प्रौढ गंभीर स्त्रिया होऊन’ असं जेव्हा ती लिहिते, तेव्हा समाजातल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेची दहशत मुलींच्या मनात निरागसपणे खेळण्याच्या वयापासून कशी घर करू लागते, हेच अधोरेखित करते.

स्त्रीचं सुंदर असणं पुरुषाला आवडतं, अनेक जण तिच्या तरुण दिसण्यावर भाळतात पण ‘...फक्त दोन सीझर्सनी शिवलेलं पोट / आणि तीन गर्भपाताच्या ओझ्याने मोडलेली कंबर / दिसत नाही कोणाला...’ असं ती ‘इतकंच’ या कवितेत लिहिते. स्त्रीच्या मूळ दुःखांपासून कसे सगळे अनभिज्ञ असतात किंवा तिथपर्यंत पोहोचतच नाहीत याचं संसूचन यातून होतं. ‘अर्थ’ ही छोटीशी कविता मोठा अर्थावकाश घेतलेली कविता आहे. ‘बाई असण्याचा अर्थ सिझरच्या उसवत जाणाऱ्या टाक्यातून उमगतो’ ही ओळ समग्र स्त्री जातीच्या दुःखाचा तळ गाठणारी आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

स्त्रीला समाजात वावरताना पुरुषसत्ताक विचारसरणीशी पदोपदी संघर्ष करावा लागतो, दुय्यम लेखलं जाण्याचा, वरचढ ठरत असल्यावर चारित्र्यावर संशय घेतला जाण्याचा सामना करावा लागतो हे जळजळीत वास्तव 'माझ्याबद्दल कळावं म्हणून' या कवितेत आविष्कृत केलेलं आहे. या व्यवस्थेला तिचं केवळ ‘बाई’ असणंच पुरेसं आहे, तिच्यात असणारे इतर गुण, कौशल्यं यांची काहीही निकड वाटत नाही हे ती ‘लोलक’ या कवितेत आवडत्या आणि नावडत्या राणीच्या गोष्टीचं रूपक वापरून मांडते.

या परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता स्त्रियांत निर्माण होत नाही, कारण कौटुंबिक पातळीवर त्यांना खुद्द स्त्रियांकडूनच प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला जात असतो (‘संयमाने आणि धीराने’). तिला निवड करण्याची संधी मिळते तेव्हा ‘कोणत्या बाजूला कोसळायचं’ याचीच निवड करता येते, कारण ती कायम ‘वेदनेच्या पुलावर मधोमध तोल सावरून उभी असते’ असं कवयित्री ‘निवड’ या कवितेत लिहिते. तसेच ‘स्वीकार आणि नकाराचा लंबक’ या कवितेची सुरुवात करतानाच ती लिहिते, ‘स्वीकार आणि नकाराचा लंबक / तसाही हलतच राहिलाय / आदिमकाळापासून / केवळ पुरुषाकडून पुरुषाकडेच.’ हा एकाच पद्धतीचा आशय वारंवार व्यक्त होण्यामागे सगळी सत्ता कायम पुरुषांभोवतीच केंद्रित झालेली होती आणि स्त्रियांना त्यात कस्पटासमान लेखलं जायचं हे ठळक करण्याचा प्रयत्न दिसून येतो.

स्त्रियांची सामाजिक, कौटुंबिक पातळ्यांवर होणारी मानसिक घुसमट, सहन कराव्या लागणाऱ्या वेदना, कुटुंबात राहूनही वाट्याला येणारं एकाकीपण यांची अभिव्यक्ती ‘स्वगत : तिचं’, ‘रिवाज’, ‘समग्र अपरिहार्यता केवळ’ आदी कवितांतून केलेली आहे. ‘उजळत जातोय माझाही चेहरा’ या कवितेत ती तिच्या आजीने सांगितलेल्या शहाणपणाच्या चार गोष्टींचा उल्लेख करते. तिच्या आजीचं भाकरी थापण्यासंदर्भात जे काही बोलणं सुरू असतं, ते केवळ भाकरी थापण्याचं आख्यान राहत नाही. त्यात अनेक सूचितार्थ गोवले गेलेले आहेत जे पुन्हा एकवार स्त्रियांच्या दुखऱ्या अनुभवांवर प्रकाश टाकतात.

कवयित्री केवळ स्त्रियांना सहन कराव्या लागणाऱ्या यातनांचीच नोंद घेते असं नाही, तर त्यांना उपलब्ध होणाऱ्या मर्यादित अवकाशातही त्या कशा तऱ्हेने आपलं स्वत्व जपण्याचा प्रयत्न करत असतात हेही अनेक कवितांतून दाखवून देते. ‘फिनिक्ससारखीच राखेतून उठणारी पुन्हा पुन्हा’ या कवितेत ‘एकटीनं संसार रेटून नेणाऱ्या’ स्त्रीचं चित्र उभं केलेलं आहे. ही स्त्री घरी-दारी कष्ट तर उपसतेच पण कौटुंबिक स्तरावर होणाऱ्या शारीरिक हिंसाचाराचाही सामना करते. तरीही तिची आपल्या वाट्याला आलेल्या भूमीवर पाय घट्ट रोवून उभं राहण्याची वृत्ती पाहून कवयित्रीला ‘...कळत जातं बये मला / बाईमाणूस काय चीज आहे / फिनिक्ससारखीच राखेतून उठणारी / पुन्हा पुन्हा’ हा प्रत्यय येतो.

ती ‘अंधार मागे सारून फक्त एक पाऊल टाक’ असा सल्ला ‘बाई ! तू तर’ या कवितेत देते. याच कवितेत ‘तू तर काळोखातून / उजेडाच्या पायांनी चालत आलीयस’ असं लिहून ती स्त्रियांना त्यांच्या संघर्षमय इतिहासाची आठवण करून देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसते. याच तऱ्हेने ती ‘उद्या पुन्हा उगवेल’ या कवितेत स्त्रियांमध्ये आशावाद जागवण्याचा हेतूने लिहिते, ‘पंख लावून उडता येईलच / याचा नाहीय भरवसा / तेव्हा / पावलांपुरता प्रकाश / आणि / पावलांवरचा विश्वास / निदान सोडू तरी नकोस.’ ती ‘सत्वाचं निळं कमळ’ या कवितेत आपलं सत्त्व शाबूत ठेवलं आणि समाधान कशात आहे, हे शोधलं तर कोणत्याही मुलीला गोष्टीमध्ये जसं हिमगौरीला राजकुमाराची वाट पाहावी लागते, तशी कुणाची वाट पाहण्याची गरज राहणार नाही अशा पद्धतीचा आशय व्यक्त करून तरुणींत आत्मभान जागृत करण्याचा प्रयत्न करते.

स्त्रियांना कितीही मानखंडना, उपहास, उपेक्षा सहन करावी लागली तरी ती सोशिकपणे सृजनशीलता शाबूत ठेवून 'इतिहास घडवत जाते' असं ती ‘इतिहास घडवत जाते बाई’ या कवितेत लिहिते. याच संदर्भात ‘बघ जमतंय का’, ‘निश्चय’, ‘शाश्वत’, ‘एकांताच्या सरळ रेषेत’ याही कविता लक्षणीय आहेत.

शहरातल्या गरीब समूहाचं, भौतिक सुखसोयी पूर्ण करणाऱ्या घटकांचं तटस्थपणे केलेलं निरीक्षण ‘शहर : काही संदर्भ’ या कवितेत उमटलेलं आहे. ती शहर आणि शहरातल्या लोकांविषयी जी काही निरीक्षणं नोंदवते त्यावरून तिला शहराची दुखरी नस सापडली आहे असं वाटत राहतं. तिच्या ‘आपण आहोत चिंतेत’ या कवितेत भवतालचा रखरखाट तर आलाच आहे पण त्याबाबतची मध्यमवर्गीय आत्ममुग्धताही अधोरेखित केली गेली आहे. बाहेरच्या जगातले अनेक घटक ‘मनातल्या मनात आकांत’ करत असले तरी ‘अवाढव्य चिंतेच्या खोल खोल समुद्रात’ गुंतून पडण्याच्या वृत्तीवर मात्र ओरखडाही उमटत नाही, हे कवयित्री अतिशय समर्पक अशा उपमा योजून व्यक्त करते.

अशा परिस्थितीत सगळीकडे दुःख पसरून राहिलं आहे असंही तिला जाणवतं. ‘दुःख : काही संदर्भ’ या कवितेत अवतीभवती पसरून असलेल्या दुःखांची वेगवेगळी रूपं मांडलेली आहेत. ती लिहिते, ‘दुःख असतं / रस्त्याच्या कडेला कोवळा अश्राप जीव / अनाथालयातलं पोरकं सुनं बालपण / तरुण विधवेचं पांढरं एकटेपण / वृद्धाश्रमात मरणासन्न म्हातारपण.’ यावरून हे लक्षात येतं की, ही दुःखं केवळ व्यक्तिगत नाहीत, समाजातल्या निरनिराळ्या घटकांची ही दुःखं आहेत.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

प्रेम म्हणजे काय असतं किंवा ‘अडीच अक्षरांचा खरा अर्थ’ कशात सामावलेला आहे, याबद्दल अनेकांनी विपुल लेखन केलेलं आहे. तरीही कवयित्री ‘अडीच अक्षरांचा अर्थ’ या कवितेत प्रेमाची अतिशय साध्या शब्दांत अभिव्यक्ती करते. तिच्या मते, ‘द्वेषाचे निखारे डोळ्यात उतरू न देणं, कटुतेने मनाचा तळ ढवळू न देणं, सहवेदनेचं नितळ पाणी वाहतं राखणं, संवादाचा हलता पूल सांभाळणं’ याच कृत्यांत प्रेमाचा अर्थ सामावलेला असतो.

या संग्रहातील अनेक कवितांत झाडाची प्रतिमा वारंवार आलेली आहे. ‘झाड’ या शीर्षकाची एक कवितादेखील आहे. या कवितेत ती लिहिते, ‘उन्मळून पडण्याच्या हजार शक्यता / सामोऱ्या येत जातात / तरीही मुळं घट्ट ठेवत / पाय रोवून उभं राहण्याचा वारसा देणारा / झिरपत गेलेला इतिहास असतो / झाडाच्या आत वस्तीला.’ ती झाडांच्या असण्यातून आपल्या जगण्याला आधार देणारं तत्त्वज्ञान रचू पाहते. ‘मुळाबरहुकूम’ या कवितेत झाडांच्या प्रतिमांचं उपयोजन मानवी जगण्यातल्या निराधार अवस्थेवर, तुटलेपणावर भाष्य करण्यासाठी केलं असल्याचं जाणवतं.

झाडं, पक्षी यांच्याकडे काही न मागताही मनाला सुखावणाऱ्या बाबी ते देऊन जातात पण माणसांकडे काही नाही मागितलं तरी ते संशयाने पाहू लागतात, असा अनुभव ‘मी म्हटलं’ या कवितेत आला आहे. ती ‘जन्म आणि मृत्यूचा मध्य सांधत’ या कवितेत आजूबाजूच्या कोलाहलात आधार देणारी एखादी जागा असावी हे व्यक्त करताना पुन्हा झाडांचीच प्रतिमा वापरते. ‘परतून येणाऱ्या पाखरासाठी / उभं असतं जसं झाड / अमर्याद आभाळाचा आणि जमिनीचा / मध्य सांधत युगानुयुगे’ असं ती लिहिते. ‘कोणताच सूर्य उगवणार नसल्याच्या पार्श्वभूमीवर’ या कवितेत कुणाच्या तरी ओढीने व्याकूळ झालेली अवस्था चित्रित केलेली आहे. तिची कुमसून जाणारी मनोवस्था व्यक्त करण्यासाठी ती झाडावरचं उरलेलं शेवटचं पान गळून पडल्याची प्रतिमा योजते.   

‘शब्द जायबंदी होण्याचे दिवस’ या शीर्षक कवितेत सद्य:काळातील अस्थिर, बेभरवशी जगण्यावर टिप्पणी केलेली आहे. शब्दांनाच जायबंदी व्हावं लागावं असा हा विपरीत काळ आहे. शब्दच जायबंदी झाले की, नेमका अर्थ प्रवाहित होण्याची शक्यता गोठून जाते, त्यामुळे असे दिवस हे ‘संशयाच्या सुया आरपार टोचत रोखून पाहतायत’ असं वाटलं तर त्यात अवास्तव असं काही नाही. काही स्वप्नं, इच्छा यांचा आधार घेत जगता यावं म्हणून भरवसा देणारी ‘एकही गोष्ट आसपास असू नये का’ हा तिचा रुदन करणारा सवाल, अशी एकही गोष्ट आजूबाजूला नाहीय याकडे अप्रत्यक्षपणे निर्देश करतो. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

ती ‘काळोख उमलून आलाय’ या कवितेत याच भवतालच्या निष्ठुर वातावरणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करताना लिहिते, ‘काळ आपल्या सहस्त्र मुळानी / संपवू पाहतोय आशेची धुगधुगी / आतल्याआत आक्रसतेय स्वप्नांची माती / आणि वास्तवाच्या धगीत / होतोय भवताल कासावीस.’ भवतालची परिस्थिती कितीही कोलाहल आणि हिंसा यांनी तुडुंब भरलेली असली तरी या परिस्थितीशी दोन हात करत ‘आता शोधायलाच हवा / आवर्तातून बाहेरचा मार्ग’ असं म्हणत पुन्हा एकदा उभं राहण्याचं आवाहनदेखील ‘निमूट नामशेष होण्याच्या शक्यता’ या कवितेत करते. कितीही वाताहत झाली तरी एक आंतरिक सत्याचा स्पर्श असलेली छोटीशी कृतीदेखील या परिस्थितीचा प्रतिकार करू शकते हे सांगताना ती लिहिते, ‘मौनाच्या पडझडीनंतर / काळाच्या कातळावर उगवून आलेला / एक शब्द / परतवून लावतो / निमूट नामशेष होण्याच्या हजारो शक्यता.’

मानवी जीवनातल्या वेगवेगळ्या अनुभवांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न या संग्रहातील कवितांत केलेला आहे. स्त्रीवादी जाणिवांच्या कविताही कुठेही आक्रस्ताळेपणा न करता, वरच्या पट्टीतील सूर न लावता स्त्रियांच्या वेदना-यातना अभिव्यक्त करतात. पुरुषसत्ताक व्यवस्थेतील विसंगती, दुटप्पीपणा आणि वर्चस्ववाद यांविषयी निराळ्या प्रतिमा, उपमा योजून काव्यात्मकतेचा तोल ढळू न देता लिहिलेलं आहे. यापुढील कवितांत कवयित्रीला आणखी मोठा अनुभवांचा अवकाश कवेत घेण्याची गरज आहे, असं मात्र वाटतं.             

‘शब्द जायबंदी होण्याचे दिवस’ - योगिनी सातारकर-पांडे

ग्रंथाली प्रकाशन, मुंबई

पाने - १२०

मूल्य - १५० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक विकास पालवे प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहेत.

vikas_palve@rediffmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......