अजूनकाही
आपला प्रिय भारत देश या वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. खरं म्हणजे ही मोठी आनंदाची, आनंदोत्सवाची बाब आहे. पण त्याहीपेक्षा आपण काय कमावलं, काय गमावलं? आपण कुठे होतो आणि कुठे जातो आहोत, याचा शांतपणे अंतर्मुख होऊन प्रत्येक देशवासीयानं विचार केला पाहिजे.
जगभरात नव-स्वतंत्र देश आहेत. त्यात भारत हा एक वैशिष्ट्यपूर्ण देश आहे. भारत हा विविधतेत एकतेचा देश म्हणून ओळखला जातो. इथे एकही समाज असा नाही की, ज्याचं भारतात योगदान नाही. विविध धर्म, संस्कृती, विविध भाषा, वेशभूषा, भौगोलिक विविधता अशा विविधतेने समृद्ध असा एक देश भारत आहे आणि त्यातच त्याचे सौंदर्य आहे. भारतातली धर्मनिरपेक्ष लोकशाही ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते. इतकेच नाही तर उदारमतवाद, मानवतावाद शिकवणाऱ्या मधुराभक्ती आंदोलनासारख्या संत चळवळी इथे झाल्या. शिवाजी महाराज, रजिया सुलतान, सम्राट अकबर, अहिल्याबाई होळकर यांच्या कल्याणकारी राज्य परंपरेने आपला ठसा उमटवला. महात्मा फुलेंसारखं समाजसुधारक नेतृत्व, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, रुकैया, सखावत हुसैन अशा स्त्रियांनी समतेच्या चळवळीत आपली पावले उमटवली. पुढे भारताला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हा देश प्रगतीपथावर चालत राहावा, म्हणून ज्या सर्वसामान्य माणसांनी त्याग केला, अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, देशाचे स्वातंत्र्य इतर कशाहीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे, अशा हजारो स्त्री-पुरुषांनी लढा दिला, त्या सर्वांनी हा देश घडवला आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला सदैव जागतं ठेवणारे नेतृत्व महात्मा गांधी, पं. नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, स्वातंत्र्य चळवळीत लढाऊ भूमिका निभावलेल्या स्त्रिया- कस्तुरबा, सरोजिनी नायडू, अरुणा असफ अली, सुचेता कृपलानी आणि देशातल्या असंख्य स्त्री-पुरुषांच्या बरोबरीने स्वातंत्र्यलढ्यात तर लढल्याच, पण संविधान निर्मितीमध्येही आपले योगदान दिले. स्वतंत्र भारतातला उदारमतवाद आणि मानवी मूल्यांची बांधीलकी, यामुळे जगाकडून आदर मिश्रित कौतुक ज्या भारताला मिळाले, तो भारत या सर्वांच्या सहभागामुळे घडवला गेला आहे.
बुद्धिभेद, जातभेद, धर्मभेद
मात्र आज भारतातील परिस्थिती या सर्व गोष्टींची जाणीवसुद्धा पुसली जावी, अशी झाली आहे. गतकाळातील काही गोष्टी, भविष्यकाळात काही चांगले घडवू शकतील, अशा गोष्टी, सारासार विवेकबुद्धीने मूल्यमापन करणे, या गोष्टी झपाट्याने लयाला जाताना दिसत आहेत. स्वातंत्रोत्तर काळात देशातील विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास आणि भारतीय संविधानाची बांधीलकी ठेवून, सर्वसामान्य नागरिकांचा विकास, जगात सन्मानाला पात्र ठरेल, अशा देशाची निर्मिती ही अशा आकांक्षा ठेवण्यात आली आणि त्याप्रमाणे अनेक पावले उचलण्यात आली. आज मात्र हे सर्व नाकारण्याची नकारात्मक भूमिका या देशाच्या सर्वसामान्य नागरिकाने हाती सत्ता सोपवल्यानंतर घेतली जात आहे.
आज प्रत्येक ठिकाणी आम्ही आणि ते असा मंत्र आळवला जात आहे. समाजातही आम्ही आणि ते ही भावना निर्माण करून देश युद्धभूमीत परावर्तित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतातली विविधतेत एकता लयाला जाताना दिसत आहे. वस्तुतः भारत अधिक सुंदर अधिक सक्षम बनवण्यासाठी विविधतेत एकता टिकवून ठेवणे आणि सर्व प्रकारची विषमता नष्ट करण्याचे प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, पण आज त्याऐवजी सर्व प्रकारची विषमता आणि परस्परांविषयी द्वेष वाढवण्याचे राजकारण केले जात आहे.
इतकेच नाही तर भारताच्या संविधानाधारे आणि लोकशाही प्रक्रियेतून सत्तेत गेलेले लोकप्रतिनिधी जाहीरपणे आणि उद्दामपणे ‘देश के गद्दारोंको गोली मारो’ अशा स्त्रियांना अपमानकारक असलेल्या आणि कायद्याला धाब्यावर बसवणाऱ्या घोषणा देतात. या देशात द्वेषपूर्ण विचार डोक्यात पेरलेले तरुण-तरुणी ‘सुली डील’, ‘बुल्ली बाई’सारख्या माध्यमातून एखाद्या समाजाच्या स्त्रियांचा लिलाव करतात, ही भारताची संस्कृती आहे का? एकीकडे आम्ही स्त्रियांना देवता मानतो, असं म्हणायचं आणि स्त्रियांना अपमानित करायचं. जगातील कोणत्याही देशात देशाचं भवितव्य ही तरुण मुले असतात, पण अशी इतर समाजातील स्त्रियांचे अॅपद्वारे लिलाव करणारे तरुण-तरुणी देशाचं भवितव्य तर सोडाच, पण घरातल्या स्त्रियांचा तरी सन्मान करू शकतील?
असंवेदनशीलतेचा कळस
एकीकडे हे तर, दुसरीकडे सर्वसामान्य माणूस पिळून काढला जातो आहे. हजारो-लाखो बेरोजगार तरुण, नोटाबंदीच्या काळात उद्ध्वस्त झालेले लहान व्यावसायिक, कोविडच्या काळात मैलोनमैल उपाशीपोटी पायी चालत जाणारे श्रमिक आणि लहान मुले हे दृश्य विदारक होते. पण त्याहीपेक्षा भयंकर होते या रस्त्यावरून चालत जाणाऱ्यांचा, त्या पायपीटीदरम्यान मृत्यू झालेल्यांचा तपशील आमच्याकडे नाही, हे भारताच्या संसदेत सत्ताधाऱ्यांनी सांगणं. महासत्ता नि विश्वगुरू बनू पाहणाऱ्या देशाचं हे लक्षण असू शकत नाही.
महाकवी खलील जिब्रान म्हणतो, “मेरे मित्रो और हमराहीयो, वह देश दयनीय है जो अंधविश्वासों से भरा हैं, लेकिन धर्म से शून्य हैं, वह देश भी दयनीय हैं, जो उस कपडे को पहनता हैं, जिसे वह स्वयं नहीं बुनता और वह देश भी दयनीय हैं, जो मृत्यु के जुलूस मे चलते समय के अलावा कभी भी अपनी आवाज नहीं उठाता, अपने खंडहरों के अलावा कहीं भी अपनी डिंग नही हांकता और कभी भी बगावत नहीं करता, सिवा तब तक की गर्दन तलवार और पत्थर के बीच रख दी गई हो, और वह देश भी दयनीय हैं जिसका राजनीतिज्ञ एक लोमडी हो, जिसका दार्शनिक एक बाजीगर हो और जिसके कलाकार पैबंद लगाते और बहुरुपिया बनते हो.”
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
धोक्याची वळणे
खलील जिब्रान देश दयनीय होण्याला यासाठी केवळ सत्तेला नाही, तर जनतेलाही जबाबदार धरतो. गांधीजी असं म्हणतात की, लोकांना आपल्या लायकीप्रमाणे सरकार मिळतं. तेव्हा जनतेने आपली लायकी वाढवत नेली पाहिजे. त्याहीपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक इशारा या देशाला १९५०मध्ये देऊन ठेवला आहे. घटना समितीच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी सांगितलं की, “२६ जानेवारी १९५० रोजी भारत स्वतंत्र होईल. या देशाच्या स्वातंत्र्याचे काय होईल? आपले हे स्वातंत्र्य अबाधित राहील की, पुन्हा एकदा देश ते हरवून बसेल? हा पहिला विचार माझ्या मनात येतो. आपल्याला विभाजित करणाऱ्या असंख्य जाती आणि संप्रदायांच्या स्वरूपातील आपले पुरातन शत्रू आजही अस्तित्वात आहेत. भारतीय आपला पंथ, परंपरा याहून आपला देश अधिक श्रेष्ठ मानतील की पंथ, परंपरा यांना देशापेक्षा अधिक महत्त्वाचे स्थान देतील? राजकीय पक्षांनी आपली पंथवादी संप्रदायवादी भूमिका देशापेक्षा श्रेष्ठ मानली, तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्या खेपेला धोक्यात येईल आणि कदाचित ते कायमचेच नष्ट होईल. या संभाव्य धोक्यापासून आपण सर्वांनी राष्ट्राचे निर्धारपूर्वक रक्षण करायला हवे.”
डॉ. बाबासाहेबांनी दिलेला हा इशारा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातला महिलादिन साजरा करताना नीट लक्षात घेतला पाहिजे.
‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १ मार्च २०२२च्या अंकातून साभार
.................................................................................................................................................................
लेखिका रझिया पटेल ज्येष्ठ अभ्यासक, सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
raziapg@mail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment