अजूनकाही
प्राच्यविद्या पंडित, बौद्ध व पाली ग्रंथांचे प्रकांड पंडित प्रा. डॉ. मोहन गोविंद धडफळे यांच्या संकलित लेखांचा संग्रह ‘संमोहनम्’ या नावाने नुकताच मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित झाला आहे. महेश अ. देवकर व लता महेश देवकर यांनी संपादित केलेला हा संग्रह ‘देशना बौद्ध आणि संबंधित विद्या अध्ययन संस्था’ आणि ‘पाली आणि बौद्ध अध्ययन विभाग’, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित करण्यात आला आहे. या पुस्तकातील हा एक लेख...
..................................................................................................................................................................
काहीच दिवसांपूर्वी दै. ‘सकाळ’च्या अंकात ठळक मथळ्याखाली दिलेले वृत्त वाचण्यात आले- “अभिजात मराठी समितीने त्यांचा एकूण असा अहवाल दिला आहे की, मराठी ही संस्कृतइतकीच जुनी भाषा आहे. समितिसदस्यांनी त्यांच्या दृष्टीकोनातून काही भक्कम पुरावेही दिले आहेत.”
आजवर साधारणपणे वैदिक (छंदस्) व संस्कृत (भाषा) या प्राचीन आर्यभारतीय भाषा, पाली, प्राकृत, व अपभ्रंश या मध्यकालीन आर्यभारतीय भाषा व सिंधी, पंजाबी, राजस्थानी, गुजराथी, हिंदी, मराठी या नव्य प्रादेशिक आर्यभारतीय बोली असे मानण्यात येत होते. त्यात तसे गैर काहीच नाही. रा. गो. भांडारकर (विल्सन फिलॉलॉजिकल व्याख्याने), कृ. पां. कुलकर्णी (मराठी भाषा - उद्गम व विकास), प्रा. वाग्वैद्य अ. मा. घाटगे, प्रा. वाग्वैद्य शं. गो. तुळपुळे व वाग्वैद्या अॅन फेल्डहाऊस, ‘मराठी भाषा’ या महादेवशास्त्री जोशी यांच्या सांस्कृतिक कोशातील व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मराठी विश्वकोशातील नोंदीत मराठी ही महाराष्ट्री प्राकृताच्या अपभ्रंशातून निपजलेली प्रादेशिक बोली असल्याचेच योग्य प्रतिपादन करण्यात आले आहे. रंगनाथ शामाचार्य लोकापूर, आद्य रंगाचार्य जहागिरदार यांनी ‘ज्ञानेश्वरी’वर कन्नडचा प्रभाव, तर प्रा. वाग्वैद्य प्र.ग. लाळे यांनी ‘ज्ञानेश्वरी’वर आंध्र तेलुगूचा प्रभाव दाखविला आहे. ‘ज्ञानेश्वरी’आधी (इ.स. बारावे शतक) महानुभावी गद्य साहित्य व या दोहोंमध्ये एक मराठी गणितविषयक ग्रंथ आढळतो.
या सर्वांचा अर्थ मराठीआधी कन्नड व तेलुगू या भाषा होत्या. कन्नड साहित्य साधारणपणे सहाव्या शतकापासून आढळते, तर मराठी साहित्य आठव्या-नवव्या शतकापासून आढळते. अशा परिस्थितीत वैदिक संस्कृत इ.स.पू. अडीच हजार वर्षांपर्यंतचे जुने असेल तर मराठी ही संस्कृतइतकीच जुनी म्हणायची का, याचा कालसापेक्ष विवेकपूर्वक विचार आवश्यक ठरतो.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
समजा, मराठी ही अभिजात भाषा ठरली नाही म्हणून काय झाले? आजमितीस असंख्य मराठी भाषकांची ती मातृभाषा आहे. त्यात असंख्यांचा व्यवहार चालतो; उत्तमोत्तम कथा, कादंबरी, नाट्य, वैचारिक साहित्य, काव्य मराठीतच निपजत आहे. मीही एक मराठीभाषक आहे. नुकतेच ‘मराठी असे आमुची मायबोली’ या शीर्षकाखाली ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या अंकात (अंक ३४१, पृ. ५० ते ५२, २०१२) मी लेख लिहिला. मला माझ्या मायबोलीचा रास्त अभिमान आहे. अभिजात भाषांपेक्षाही अधिक रकमेचे अनुदान आजच्या जीवित व्यवहारभाषेला केंद्र व राज्य शासन, विद्यापीठ अनुदान आयोग, खाजगी विश्वस्त निधी, उदार उद्योगपती यांच्याकडून मिळावे असे मला वाटते, पण यासाठी माझी मायबोली अभिजात व संस्कृतइतकीच जुनी असल्याचे अनैतिहासिक व म्हणूनच अवास्तव विधान करायची मला गरज वाटत नाही.
अभिजात हे विशेषण आंग्ल भाषेतील ‘classical’ याचा मराठी (संस्कृत) पर्याय आहे. ग्रीक व लॅटीन भाषा, साहित्य, शिल्प, संस्कृती यांसाठी ते वापरले जाते. भारतीय वैदिक संस्कृत, पाली, प्राकृत या अभिजात आहेत. इसवी सनोत्तरात अस्तित्वात आलेली माझी मराठीमाय अभिजात कशी असेल? आद्य रंगाचार्य व शं. बा. जोशी यांसारख्या पंडितांना मराठी भाषा व संस्कृतीवर कन्नडची छाप आढळते. कावेरीपासून गोदावरीपर्यंतचा विस्तृत भाग हा कन्नड प्रदेश असा कविराजमार्गातला उल्लेख आहे. १२९४ साली झालेल्या यादव सेऊणांच्या पराभवानंतर कन्नडचा प्रभाव ओसरला. (या संदर्भात) ‘मराठीचे माहेर’ (वि. भि. कोलते) हा लेख वाचावा. ‘ज्ञानेश्वरी’त ‘मऱ्हाटी’ हा शब्द भाषाविषयक कमी तर सरळ, सोपे या अर्थाने अधिक प्रमाणात आल्याचे ते म्हणतात (पृ.४८६).
संस्कृत (पं. वसंतराव गाडगीळ), प्राकृत (प्रा. वाग्वैद्य पोतदार), पाली (प्रा. मो. गो. धडफळे आजमितीस मातृभाषेइतकेच सफाईदार रीतीने बोलू शकतात. पण या भाषा आजवर बोली राहिल्या नाहीत; त्यांना म्हणूनच अभिजात म्हणणे योग्य आहे. पण आज असंख्य मराठी जनांची मराठी ही बोली आहे. तिला अभिजात म्हणणे एका परीने या बोलीला बोल लावल्यासारखे होईल, याचा विचार समितिसदस्यांनी करायला नको का? माझा व त्यांचा काही वैयक्तिक हेवादावा नाही; किंबहुना हे सदस्य कोण याचीही मला माहिती नाही. आहे तो केवळ वैचारिक मतभेद.
माझ्या वाचनात आलेल्या वृत्तांतात अनेक अशा प्रकारची विधाने आहेत की, ज्यांचा स्वीकार करण्यास अडचणीच अडचणी येतील. उदा., महाराष्ट्री-मराठीतला (म्हणजे काय?) आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ ‘गाथासप्तशती’ सुमारे दोन हजार वर्षे जुना आहे. मान्य आहे; पण हा ग्रंथ महाराष्ट्री-प्राकृतातील ग्रंथ आहे. महाराष्ट्री-मराठीतील नाही. एकच उदाहरण पुरेसे आहे. उ अणिच्चलणिप्पन्दा भिसिणीवत्तम्हि रेहइ वलाआ (संस्कृत - पश्य, निश्चलनिष्पन्दा बिसिनीपत्रे ऽस्मिन् राजते बलाका, गाथासप्तशती ४). काय मराठी कळलं? सामान्यपणे भाषावैज्ञानिक सांगतात की, मराठी ही प्रांतिक (प्रादेशिक) व्यवहारभाषा महाराष्ट्री प्राकृताच्या जैन वा जैनेतर अपभ्रंशातून निपजली आहे. महाराष्ट्री, मागधी, शौरसेनी, व पैशाची या वैदिक व संस्कृतच्या चार प्रमुख प्राकृत शाखा आहेत.
या लेखातच म्हटले आहे की, प्राचीन महाराष्ट्री (मराठी नव्हे) भाषेतील आलं, बहिणी, लछमन, ठाणं, पाशी असे अनेक शब्द जसेच्या तसे ग्रामीण महाराष्ट्रातील बोली भाषांमध्ये अजूनही वापरले जातात. योग्यच आहे. आलं (म्हणजे आर्द्र, ओले; सुके झाले तर ती सुंट होते.), बहिणी (भगिनी), कळमन (लक्ष्मण), ठाणं (स्थान), पाशी (पार्श्व).
वाचलेल्या वृत्तांतात असे स्पष्ट प्रतिपादन करण्यात आले आहे की, गुणाढ्याच्या बृहत्कथेत येणारे असंख्य मराठी शब्द यावरून मराठीची प्राचीनता निर्विवादपणे सिद्ध होते. मुळात प्रश्न असा आहे की, आमच्या मान्यवर अभिजात मराठी भाषा समितीच्या संशोधक पंडितांना गुणाढ्याची बृहत्कथा - जी आजवर एकाही संस्कृत संशोधकाला प्राप्त झाली नाही - ती कोठून प्राप्त झाली? व या असंख्य मराठी शब्दांतील एक तरी शब्द ते उद्धृत करू शकतील का? मुळातील गुणाढ्याचा ‘बडुकहाई’ हा ग्रंथ पैशाची भाषेतील पूर्णपणे अनुपलब्ध ग्रंथ आहे. त्याची केवळ दोन संस्कृत संस्करणेच उपलब्ध आहेत - क्षेमेन्द्राची ‘बृहत्कथामञ्जरी’ व सोमदेवाचे ‘कथासरित्सागर’. हे दोन्ही ग्रंथ संस्कृतात आहेत, त्या संस्कृतात आलेले असंख्य मराठी शब्द कोणते? मुळात माझ्या मताने ‘बडुकहाई’ याचा संस्कृत अनुवाद ‘बृहत्कथा’ हाच चुकीचा आहे. ‘बडुकहाई’ म्हणजे ‘वृद्धकथा’ (पहा, उदयनकथाकोविदग्रामवृद्धान, मेघदूत ३०).
मराठी भाषेचा व्युत्पत्तिकोश लिहिणाऱ्या प्रा. वाग्वैद्य भाषाशास्त्रज्ञ कृ.पां. कुलकर्णी (यांच्या नावाचा एक पथ पुण्यात आहे.) यांनी ‘मराठी भाषा - उद्गम व विकास’ हा चिकित्सित ग्रंथ लिहिला आहे. “प्राकृत-अपभ्रंश भाषांच्या नंतरच्या ह्या (भाषा) होत. ह्यांचा जन्म इ.स. ७०० पासून इ.स. १००० पर्यंतच्या काळात झाला असला पाहिजे” (१९५७ : १३५) [असे ते म्हणतात]. कृ.पां. कुलकर्णी ह्या भाषागटात उरिया, राजस्थानी, गुजराथी इत्यादी प्रादेशिक भाषांबरोबरच मराठीचाही निर्देश करतात.
मराठी ही संस्कृतइतकीच जुनी असेल तर संस्कृत इ.स. ७०० ते इ.स. १००० या काळातील असायला हवी. पृ.१५० वर कुलकर्णी महोदय म्हणतात की, एक मत असे आहे की, वेदसमकालीन ज्या बोली होत्या, त्यापासून मराठी उद्भवली व ह्याला आधार म्हणजे वेदात जे संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत व प्राकृत भाषांच्या स्वभावाशी जुळणारे विशेष सापडतात ते होत. या प्रतिपादनाला आमचे समितिसदस्य आनंदाने एकमेकांना टाळ्या देऊ लागतील, याच्या आधीच कुलकर्णी महाशय त्यांच्या आनंदावर विरजण टाकतात. पुढच्याच वाक्यात (कित्ता) ते म्हणतात - “परंतु असल्या ह्या तुटपुंज्या पुराव्यावर मराठी भाषा त्या भाषांपासून उद्भवली असे म्हणता येणार नाही.” आता आली का पंचाईत! पृष्ठ क्र. १५९ वर कृ.पां. कुलकर्णी म्हणतात, “महाराष्ट्रातील लोकसमाज कोणतीही एक विशिष्ट प्राकृत भाषा बोलत नसून निरनिराळ्या प्राकृत भाषा बोलणारे निरनिराळे समाज होते व ते एकवटून त्याच्या मिश्रणाने बनलेल्या मिश्र प्राकृतापासून मराठी भाषा बनली.”
आता सर्वमान्य भाषातज्ज्ञ म्हणतात की, प्राकृतांचा उद्गम संस्कृतापासून झाला (संस्कृतं प्रकृतिः, तत आगतं प्राकृतम्). संस्कृतापासून (प्राचीन आर्यभारतीय भाषा) प्राकृत (मध्य भारतीय आर्य भाषा) व त्यापासून सिंधी, पंजाबी, गुजराथी, मराठी अशा नव्य आर्यभारतीय भाषा हा समंजस क्रम सोडून कसे चालेल?
माझे प्रबंधमार्गदर्शक प्रा. वाग्वैद्य अ.मा. घाटगे यांच्या मताचा आधार घेऊन समितिसदस्य आठव्या शतकातच महाराष्ट्री भाषेने अभिजात दर्जा मिळवला होता, असे म्हणत आहेत. गुरुवर्य घाटगे प्राकृततज्ज्ञ व भाषातज्ज्ञही होते. त्यांनी वापरलेला शब्द उद्धरणानुसार महाराष्ट्री (एक प्रमुख प्राकृत) असा आहे, मराठी असा निश्चितच नाही. श्री. व्यं. केतकर, राजारामशास्त्री भागवत, दुर्गा भागवत यांची उपोद्बलक वाटणारी विधानेही मुळात तसे सांगत असावीत, असे वाटत नाही.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
वृत्तांताच्या अखेर “महाराष्ट्री किंवा मराठी भाषा ही किमान अडीच हजार वर्षे जुनी असल्याचे स्पष्टपणे दिसून येते” असे समितीचे मत दिले आहे. अर्धसत्याचा हा उत्कृष्ट नमुना आहे. महाराष्ट्री ही प्राकृत आहे. तिला वर्णन यथायोग्य लागू पडते. मराठी म्हणजे महाराष्ट्री नव्हे. ती आधुनिक प्रादेशिक बोली आहे
शासनाने या सर्वांचा विचार करावा. मराठी अभिजात असो वा नसो; तिला प्रभूत अनुदान मिळावे. समितिसदस्यांचा यथायोग्य सार्थ सन्मान व्हावा, हीच माझी इच्छा आहे.
वृत्तांतात एक विधान असे आहे की, मराठीचे वय १५०० ते २००० वर्षांपेक्षा जास्त असल्याचे सांगणारे किमान ऐंशी-अधिक ग्रांथिक पुरावे एकट्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत उपलब्ध आहेत. या संस्थेशी माझा चाळीस वर्षांहून अधिक संबंध आहे. मी नित्यनेमाने ग्रंथालयात वाचन करतो. मला कुठेच कधी हे पुरावे कसे मिळाले नाहीत? समितिसदस्यांनी जाहीर सभेत आपले विचार साधार मांडावेत. माझ्यासारख्या अन्य अज्ञ जनांस याचा नक्कीच फायदा होईल. माझ्याकडून काही वावगे विधान झाले असल्यास कृपाळू अभिजात मराठी भाषासमितीचे सदस्य मला क्षमा करतील, याचा विश्वास वाटतो.
संमोहनम् - संपा. महेश अ. देवकर, लता महेश देवकर
देशना बौद्ध आणि संबंधित विद्या अध्ययन संस्था, पुणे
पाली आणि बौद्ध अध्ययन विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
मराठी आवृत्तीचे मूल्य - ६०० रुपये
इंग्रजी आवृत्तीचे मूल्य - ८०० रुपये
पुस्तकासाठी संपर्क - deshanainstitute@gmail.com, palilibrary@unipune.ac.in किंवा
विठ्ठल पवार - ९०२१७ १८६१९
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment