२५ जानेवारी हा ‘राष्ट्रीय मतदार दिन’. त्यानिमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्यातर्फे ‘लोकशाही समजून घेताना’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात महाराष्ट्रातील ३३ मान्यवर लेखकांच्या लोकशाहीच्या विविध पैलूंचा आढावा घेणाऱ्या लेखांचा समावेश आहे. या पुस्तकातील लेख ‘अक्षरनामा’वर २ फेब्रुवारीपासून क्रमश: प्रकाशित करत आहोत...
..................................................................................................................................................................
आपण जसं बोलतो, तशाच मराठी आणि इंग्रजी हायब्रीड भाषेत हा लेख लिहिला आहे; कारण आजच्या समाजमाध्यमाची भाषाही तशीच आहे.
इंटरनेट हे एक फॅड आहे, काही दिवसांतच त्याचा उदोउदो करणाऱ्या लोकांची नशा उतरेल, सोशल मीडिया ही एक वावटळ आहे, सोशल मीडियाचा आणि प्रत्यक्ष जगण्याचा काही संबंध नाही, अशा आशयाच्या बातम्या एके काळी आंतरराष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्रांत जाणकार पत्रकार लिहीत होते. पण, आजचं वर्तमान याच्या एकदम उलट दिसतं.
इंटरनेट, डिजिटल क्रांती या पाठोपाठ एकेका सोशल मीडियाची निर्मिती झाली. नवनव्या समाजमाध्यमांच्या निर्मितीची ही प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. आज सोशल मीडियाचा वापर करून सत्ता टिकवली जाते, खेचली जाते. काय केलं जात नाही, हाच खरा तर प्रश्न आहे, एवढं हे माध्यम आज आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलं आहे. आपल्या एकशे वीस कोटी जनतेत मोबाइल फोन, इंटरनेट, व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, कू, टेलिग्राम, क्लबहाऊस, इत्यादी मीडियाचा वापर करणारे लोक कमी आहेत.
जे लोक ही समाजमाध्यमं वापरत आहेत, त्यांच्या हातात जादू-पॉवर एकवटलेली आहे. मार्केट, सरकारं, सरकारच्या पॉलिसी; इतकंच काय, तर जे लोक इंटरनेट आणि सोशल मीडिया वापरत नाहीत, अशांची मनं काबीज करणं, त्यांची मतं ठरवण्यासाठी अनुकूल वा प्रतिकूल कल तयार करणं, अशा खूपशा गोष्टींना ही जादू अप्रत्यक्षपणे प्रभावित करत असते.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
गंमत बघा, अगदी वैयक्तिक आयुष्याकडेच बघू या. आपले फ्रेंड्स, नातलग आणि असे लोक, ज्यांच्याबद्दल आपल्याला कुतूहल आहे, काळजी आहे; पण त्यांच्याशी अगदी दररोजचा संपर्क नसतो. या सगळ्यांच्या आयुष्यात काय चालू आहे, याचा अंदाज डोळे झाकून बांधला जातो, तो म्हणजे सोशल मीडियावरचं त्यांचं अस्तित्व पाहून. खरं तर ते व्हर्च्युअल म्हणजे आभासी जग आहे. पण, या आभासी जगात तुमची उपस्थिती नसली, की लगेच म्हटलं जातं – ‘हल्ली कुठे गायब…?’ म्हणजे आभासी जग हेच आपल्या नकळत आपलं खरं जग झालंय. जे या जगाचा भाग नाहीत, त्यांनाही त्यात यायचं आहे. काही जणांसाठी आजही समाजमाध्यमं एकदम नवखी, काही जणांकरता अनोळखी, काहींकरता परिचयाची, काहींकरता हक्काची, तर काहींसाठी सवयीची झाली आहेत. इथेही प्रस्थापित आणि विस्थापित प्रकार तयार होत आहेत. जे लोक इथे चांगलेच रुळलेले आहेत, त्यांना इथल्या गेम्सच्या खाचाखोचा नीट कळल्या आहेत. त्यामुळे आपापल्या विचार-प्रसारासाठी, प्रोपगंडासाठी, प्रेम किंवा द्वेष पसरवण्यासाठी, फंड रेजिंग करण्यासाठी वगैरे कारणांसाठी या माध्यमाचा वापर केला जातो. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनणं, सोशल मीडियाचा वापर कसा करायचा याची कन्स्लटन्सी चालवणं, ही क्षेत्रं आता स्वतंत्र करिअर्स झाली आहेत.
‘टिकटॉक’ नावाचं अॅप बंद झालं. पण, त्यावरून आलेला ग्रामीण भागातला मध्यमवर्ग आणि गोरगरीब जनतेने तयार केलेल्या इनोव्हेटिव कटेंटचा महापूर, हे काय होतं? ज्यांना व्हर्च्युअल जगातल्या प्रस्थापितांनी स्वत:चे नियम बनवून त्याबाहेर ठेवलं, त्यांनी हे साचलेपण झुगारून दिलं होतं. ‘इन्स्टाग्राम’वर एलिट्स, उच्चभ्रू किंवा ‘आहे रे’ वर्गातले लोक फिल्टर्स वापरून चकाचक रील्स आणि व्हिडिओ टाकतात, तर आम्ही का नाही व्यक्त व्हायचं, आम्हांला हवा तसा सोशल मीडिया आम्ही वापरणार, हे टिकटॉकच्या वापरातून ‘नाही रे’ वर्गानेही दाखवून दिलं.
‘स्नॅपचॅट’सारख्या अॅपवर असलेली एक वेगळीच दुनिया आणि त्यातल्या करामती ‘मी टू’ मोहिमेच्या तक्रारींमधून दिसून आल्या. तरीही अल्लड किंवा कुमारवयीन मुलांमधली या अॅपची लोकप्रियता अजिबात घटलेली नाही.
जीवनातली सगळी अंगं सोशल मीडियाने व्यापलेली आहेत. डेटिंग, कॅज्युअल सेक्स, प्रेम, मैत्री यांसाठीदेखील आता सर्व प्रकारच्या, सर्व वयोगटांतल्या व्यक्तींसाठी डेटिंग अॅप्स आलेली आहेत. तुम्हांला वाटेल, लोकशाहीसाठी सोशल मीडियाचा काय उपयोग होतो, या लेखात हा इतर फापटपसारा कशासाठी? तर त्यालाही कारण आहे.
फेमिनिझमच्या चळवळीचं ब्रीदवाक्य आहे- ‘पर्सनल इज पोलिटिकल’. ही जी इतर सर्व समाजमाध्यमांची जंत्री आपण पाहिली, त्यात आपलं पारंपरिक यू-ट्युबही आलंच. त्यावर जाहिराती, प्रायोजक कटेंट, म्हणजेच स्पॉन्सर्ड कटेंटही भरपूर असतो. तुमचं मन आणि मेंदू काय दिशेने विचार करतोय किंवा त्याला काय दिशेने विचार करायला लावायचा, याचा कंट्रोल या सगळ्याच सोशल मीडियाच्या व्याकरणाचं मूळ आहे. तुम्हांला वाटत असतं, मी तर फक्त ब्राऊज करतेय किंवा करतोय, म्हणजे बाजारात चक्कर मारून येतो, तसं सहज सोशल मीडियाला भेट देतोय. पण, हे दिसतं तितकं वरवरचं उरलेलं नाही.
‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘The Great Hack’ नावाची डॉक्युमेंटरी आहे, ती तुम्ही नक्की बघा. म्हणजे सोशल मीडिया आणि लोकशाही यांचा काही थेट संबंध नाही, म्हणणारे सध्याच्या वास्तव जगापासून किती तुटलेले आहेत हे तुम्हांला कळेल.
अगदी हा लेख लिहीत असतानाच ‘द वायर’ या भारतातील डिजिटल वृत्तसंस्थेने दोन वर्षं संशोधन करून एक अहवाल प्रसिद्ध केला. ‘टेक फॉग’ नावाच्या अॅपच्या माध्यमातून तुमच्या मोबाइलमधल्या व्हॉटसअॅपमध्ये तुमच्या नकळत केलेला शिरकाव, ट्विटरवरचे ट्रेंड हायजॅक करणं आणि या सगळ्याचं थेट कनेक्शन निवडणुकीतल्या निकालापर्यंत कसं पोहोचतं, हे याद्वारे मांडण्यात आलं आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मिसइनफर्ममेशन - खोटी आणि चुकीची माहिती - लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी आणि मेंदूमध्ये भिनवण्यासाठी फेसबुकचा पद्धतशीर कसा वापर केला, हे आता उघड झालंय; आणि अमेरिकेत याची चौकशीही सुरू आहे. फेसबुकने जे काही केलं, त्याचा अमेरिकन लोकशाहीवर कसा परिणाम झाला, याचे रिपोर्ताज तिथल्या वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले आहेत. मुद्दा हा आहे की, जगभरात ही घुसळण चालू असताना भारतीय लोकशाही त्यापासून अलिप्त कशी राहू शकेल?
आणखी एक वेगळा, पण सोशल मीडियाशी एक प्रकारे जोडलेला मुद्दा म्हणजे अल्गोरिदम. प्रत्येक सोशल मीडियाचा आणि गूगलचा अल्गोरिदम मिळून ठरवतो की, तुम्ही मोबाइल हातात घेतल्यावर तुमच्या सोशल मीडियावरचा कोणता कटेंट तुम्हांला पहिल्यांदा दिसेल, त्या खालोखाल काय येईल.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
उत्कृष्ट पत्रकारिता करणाऱ्या आंतरराष्ट्रीय माध्यमांसहित भारतातील माध्यम-कंपन्यांचा त्यामुळेच गूगलसोबत सध्या संवाद किंवा भांडण सुरू आहे. या समूहांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्या दाखवून गूगल अधिकाधिक पॉवरफुल बनत चालली आहे; आणि हा नफा वाटून मिळण्यासाठीचं हे भांडण सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू आहे. पण, एकूणच अल्गोरिदमच्या चक्रात सारासार विवेक हरवत चाललाय हे नक्की. तुम्ही टाईप करायच्या आधी तुमच्या विचारांना साजेशी बातमी, कटेंट, व्हिडिओ, गाणं, ट्विट्स, फेसबुकवरच्या आणि इन्स्टाग्रामच्या पोस्ट्स तुमच्या डोळ्यांसमोर सजेशनच्या माध्यमातून येतात. मेंदूवर या माध्यमाचं गारूड एवढं असतं, की विचार करायचीपण गरज उरलीय, असं वाटत नाही.
पूर्वी लोक टीव्हीवर बातम्या, डिबेट पाहायचे. सकाळी, अगदी दिवसभर घरात, बाहेर, सार्वजनिक लायब्ररीमध्ये बसून वृत्तपत्रं वाचली जात. आता मात्र टीव्हीवरच्या बातम्यांच्या लिंक्स शेअर केल्या जातात व्हॉटसअॅपवरून आणि त्या पाहिल्या जातात मोबाइलवर. वृत्तपत्रांची हार्डकॉपी घेणं अनेकांनी बंद केलं आहे, त्याऐवजी डिजिटल फॉर्ममधली कॉपी वाचली जाते. मग जी बातमी सोशल मीडियावरून सर्वाधिक शेअर केली जाते, ती अधिक वाचली जाते.
विचार करा, की सोशल मीडियावर गोष्टी अधिकाधिक पेरण्याची शक्ती ज्यांच्याकडे असेल, त्यांच्याकडे एक प्रकारे समाजमनावर अधिराज्य गाजवण्याची ताकदच असणार की नाही! पुस्तकांच्या बाबतीतही हेच आहे. आज घरबसल्या व्हॉट्सअॅपवर पुस्तकांच्या पीडीएफ शेअर केल्या जात आहेत. म्हणजे डिजिटल क्रांती आली. चौथा स्तंभ, पुस्तकं, शॉपिंग, डेटिंग, बँकिंग आणि बरंच काही डिजिटल झालं. पण, सोशल मीडियासोबतच त्या डिजिटलची ताकद आणि पर्यायाने सोशल मीडिया वापरणाऱ्या मासेस - एका मोठ्या समूहाची विचार करण्याची ताकद - ठरावीक लोकांकडे वर्ग झाली. त्याला बॉट्सची साथ दिली जाते. मोजके लोक एका मोठ्या समूहाला संमोहित करून त्यांना त्याच व्हर्च्युअल जगात गुंतवून ठेवतात. हळूहळू बाहेरच्या खऱ्या जगात जे सुरू असतं ते, आणि सतत व्हर्च्युअल मीडियावर जे पाहिलेलं असतं ते, एकच वाटू लागतं.
हिंसा, माथी भडकवणारी भाषणं, द्वेष, दुसऱ्या समूहाबद्दलचा विखार, बेगडी बढाया, आम्ही सांगू तेच राष्ट्रप्रेम, संकुचित केली जाणारी अभिव्यक्तीची जागा, सत्तेच्या मग्रुरीची भाषा इत्यादी इत्यादी सगळं क्लिक्स मिळवण्यासाठी व्हर्च्युअल जगात मांडलेला पट असतो. हळूहळू तो खऱ्या जगात अवतीभोवती दिसू लागतो, पण त्यातला विद्वेष, हिंसा यामुळे माणूस बधिर बनतो. सोशल मीडियामध्ये ही ताकद आहे. लोकशाहीला ती जागंही करू शकते, तसं बधिरही करू शकते. मला नाही वाटत, की लोकशाहीला संपवू शकतील सोशल मीडियातली ही सोंगं; पण, बधिर होऊन पडलेल्या लोकशाहीला कितीतरी धोके संभवतात. नव्या उर्जेची फुंकर मारायची की, समूहाला ताब्यात ठेवण्यासाठीची ताकद म्हणून त्यांचा वापर करायचा, हे सोशल मीडिया कुणाच्या हातात आहे, यावरून ठरतं.
देशातील काही महत्त्वाच्या लोकांच्या फोनमध्ये ‘पेगासिस’ नावाचं हेरगिरी करणारं सॉफ्टवेअर वापरण्यात आल्याचे आरोप झाले. त्याबद्दलचे तंत्रज्ञानाचे पुरावे देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने याविषयी सध्या एका समितीची स्थापना केलेली आहे. ही घडामोड आजच्या काळातल्या सर्व प्रकारच्या आव्हानांचं प्रतिबिंब आहे. कारण, समाज म्हणून, मानवी समूह म्हणून आणि जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशांपैकी एक म्हणून, आपण कोणत्या धोकादायक वळणावर उभे आहोत, ते यातून दिसून येतं.
झालंय असं की, आपल्या देशातील जातिव्यवस्था, वर्गीय भेद आणि वाढत चाललेली ‘आहे रे’-‘नाही रे’ यांच्यातील दरी, समूह-समूहांमधले कलह, दूषित मतप्रवाह, या सगळ्याचा परिणाम मतं बनवण्यात कसा होतो, याचा अभ्यास सोशल मीडिया चालवणाऱ्यांनी केला. तशी सॉफ्टवेअर्स त्यांनी तयार केली. जो त्यांना अधिक मोबदला देतो, त्यांच्यासाठी ती वापरली जातात. कुणी विचार केला होता की, आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञानाच्या या काळात आपल्याला मिस-इनफर्मेशनशी लढणं, ही सर्वात मोठी लढाई असेल किंवा पोस्ट ट्रूथच्या जगात जगावं लागेल? हिंदू-मुस्लिंमामध्ये लावलेली भांडणं आणि समाजात कालवलेलं विष यामध्ये सोशल मीडियाचा सर्वाधिक वाटा आहे.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर झाला. तेव्हा काहीसं त्याचं नवलं वाटत होतं, कौतुक वाटत होतं आणि मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती. पण, काय घडतंय हे समजायच्या आत या बदलांनी संपूर्ण देशाच्या मानसिकतेवर कब्जा केला. सोशल मीडियाचा वापर करून देशामध्ये राजकीय ध्रुवीकरण टोकाला पोहोचवण्यात आलं. यामध्ये अर्थातच मार्केटचे नियमही आपसूक लागू होतात. टीव्ही चॅनेल्सवर काय दाखवलं जाणार, वेबसाइट्सवर काय लिहिलं जाणार याची निवड होते ती; कशाला क्लिक्स मिळणार, काय वाचलं जाणार यावरून. पण, एखादा महत्वाचा प्रश्न, त्याच्या तांत्रिक बाजू, त्याचे किचकट तपशील, अस्वस्थ करणाऱ्या कुठल्याही घडामोडी हे सगळं वाचण्यापेक्षा, पाहण्यापेक्षा, विचार करण्याऐवजी मन-मेंदूला उत्तेजित करणारे, विचार करायचे कष्टही घ्यायला न लावणारे, रेडीमेड विचार तुमच्या मनात आणून बसवणारा सोशल मीडिया लोकांनी हळूहळू आपलासा केला.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
‘व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी’चे असे अनेक पदवीधर आज आपल्या आजूबाजूला दिसतात. पूर्वी माहितीचा, अभ्यासाचा स्रोत हा पुस्तकं, संशोधनात्मक शोधनिबंध, मुलाखती वगैरे होता. कट्ट्यावरच्या गप्पांमधली माहिती पडताळणी करून मग त्यावर विश्वास ठेवला जायचा. पण, आता या सोशल मीडियाने माणसाच्या आयुष्यात अशी मुशाफिरी करणं सुरू केलं, की सगळंच हाताबाहेर गेलं. सोशल मीडियावरच्या तथाकथित गोष्टी व्हॉटसअॅपच्या माध्यमातून घराघरांत पोहोचल्यात. मग व्हॉटसअॅपवरून पोहोचवली जाणारी ही माहिती खरी असेल, पडताळणी केलेली असेल, द्वेष पसरवणारी नसेल, ही जबाबदारी समूह म्हणून आपण कशी घेणार आहोत, हे मोठं आव्हान आहे.
‘Alt News’च्या संस्थापकांपैकी एक असेलेले प्रतीक सिन्हा सांगतात की, येणाऱ्या काळात शालेय अभ्यासक्रमामध्येच मिस-इनफर्मेशन कशी ओळखायची, याचं शिक्षण द्यावं लागणार आहे. यावरून अंदाज बांधू शकतो की, लोकशाहीसमोर सोशल मीडियाने केवढं मोठं आव्हान उभं केलं आहे.
लोकशाहीमध्ये केंद्रस्थानी असतात लोक. भारतीय लोकशाहीने स्वीकारलेल्या मॉडेलनुसार लोकप्रतिनिधींनीच्या मार्फत राज्यकारभार चालवला जातो. त्यामुळे निवडणुकीतील आकड्यांचे खेळ म्हणजेच लोकशाही, एवढं मर्यादित अपुरं चित्रं आज समाजावर बिंबवण्यात आलं आहे. पण, लोकशाहीची व्याख्या व्यापक या आकड्यांच्या पलीकडची आहे. सोशल मीडियावर बॉट्सच्या मदतीने घाऊक खाद्य टाकलं जातंय, त्याच्या गुंगीत जनता तल्लीन आहे. लोकशाही म्हणजे केवळ निवडणुकीतले आकडे नव्हे, तर दैनंदिन जगण्याशी संबंधित अशी ती विचारधारा आहे. त्याचं आपण काय करणार आहोत, हा प्रश्न आहे.
थोडक्यात, सोशल मीडिया हा दुधारी शस्त्रासारखा आहे; पण अगदीच क्वचित चांगल्या गोष्टींसाठी त्या माध्यमाचा वापर होतोय. ठरावीक समूहाकडून त्याचा गैरवापर करून लोकशाही पोखरली गेल्यानंतर आपल्या लक्षात आलंय की, अरे, सोशल मीडियावरून काय रतीब लागलाय, ते गांभीर्याने पाहिलं पाहिजे. थोडासा नाराजीचा आणि चिंतेचा स्वर या लेखाला आहे, कारण आजची मुलं ही उद्याची नागरिक असतात.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
या लेखाच्या शेवटी ‘बुल्लीबाई’ आणि ‘सुल्ली डिल्स’ यांच्याबद्दल बोललचं पाहिजे. मुस्लीम महिलांचा जाहीर लाइव्ह लिलाव करण्याच्या चार घटना अलीकडे उघडकीस आल्या. ‘बुल्लीबाई’ अॅप हे त्यातलं सर्वांत अलीकडचं उदाहरण. १८ ते २१ वर्षांची तरुण मुलं यामागची मुख्य सूत्रधार असल्याचं तपास यंत्रणा सांगत आहेत. ट्विटर, यूट्युब, क्लबहाऊस यांचा असा गैरवापर होईल, हे दहा वर्षांपूर्वी कुणी म्हटलं असतं, तर वेड्यात काढलं गेलं असतं. पण, मुस्लिम विद्वेषासाठी तरुणांचा आणि सोशल मीडियाचा वापर केला जात आहे आणि तसं केल्याबद्दल आपल्याला कुठलीही लाज वाटत नसल्याचं यांपैकी काही तरुण मुलं सांगत आहेत.
सोशल मीडियाचा लोकशाहीवर झालेला थेट परिणाम यापेक्षा दुसऱ्या कुठल्या उदाहरणातून मांडता येईल? कोविड महामारीच्या काळात तीन-चार वर्षांच्या मुलांच्या हातात पालकांना नाराजीने मोबाइल द्यावा लागत आहे. ई-लर्निंग हे न्यू नॉर्मल होत आहे. अशा वेळी समाजमाध्यमांवरून आपण - एक किंवा काही व्यक्ती - यांच्या गायब होण्याने मूळ प्रश्न सुटणार नाहीत. तर त्याच्या मुळाशी जाऊनच ते सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल. ते सोपं अजिबात नाही, पण अशक्यही नाही. अशा भयंकराच्या दरवाजात लोकशाही उभी आहे.
आर्टिफिशिअल इंटिलिजन्स,
बॉट्स, अल्गोरिदम,
ट्रेंड्स... थांबा... थांबा थोडं…
डोकं गरगरतंय माझं…
म्हणाली सत्तर वर्षांची आपली तरुण लोकशाही...
तिच्या डोकेदुखीवर उपाय करण्याऐवजी
तिला जा निघून म्हणायचं आणि
हुकूमशाहीला बोलवायचं…
इतकंही सोप नसतं राजकारण करणं...
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
लेखिका अलका धुपकर डिजिटल माध्यमात पत्रकार आहेत.
alaka.dhupkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment