अजूनकाही
१. मुंबईचे महापौरपद मिळवण्यासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकाएका नगरसेवकाची जमवाजमव करत असताना १० वर्षांपासून शिवसेनेबरोबर असलेल्या अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांचा पाठिंबा मिळवून भाजपने संख्याबळ ८४ वर नेले आहे. गवळी यांनी पाच वर्षे स्थायी समितीचे सदस्यत्व किंवा आरोग्य समितीच्या अध्यक्षपदाची मागणी केल्यामुळे शिवसेनेबरोबरची बोलणी फिसकटली होती. त्यानंतर त्यांनी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या निवासस्थानी भेट घेऊन भाजपला समर्थन देण्याची तयारी दर्शवली.
आजकालच्या तरुण बातमीदारांना बातम्याच लिहिता येत नाहीत नीट. ही बातमी अशी हवी होती :- अतिशय संस्कारशील घरात जन्मलेल्या आणि वडिलांकडूनच जनसेवेचं बाळकडू मिळालेल्या गीता गवळी यांना जनसेवेची आंच लागल्यामुळे त्यांनी निव्वळ सेवेच्या भूमिकेतून ही पदं मागितली होती. मात्र, शाहिस्तेखानाची बोटं छाटून विजयी झालेल्या मावळ्यांनाही सेवेची ओढ लागलेली असल्याने त्यांचा हिरमोड झाला. अखेर पारदर्शी, संस्कारी आणि सुस्वच्छ अशा भाजपाने त्यांच्या समर्पित वृत्तीला न्याय दिलेला दिसतो.
............................................................................................
२. ज्यांच्या नियुक्तीविरुद्ध विद्यार्थ्यांनी तब्बल १३९ दिवसांचा संप पुकारला आणि केंद्र सरकारला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले, त्या गजेंद्र चौहान यांना मुदतवाढ नाकारून पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदावरून नारळ देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. पुढील आठवड्यात नव्या मंडळाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
ही नकारात्मक बातमीदारी झाली. सकारात्मक बातमीदार असता तर त्याने लिहिलं असतं की, डाव्या, कम्युनिस्ट, समाजवादी, उदारमतवाद्यांचा बुजबुजाट झालेल्या व्यसनाधीन, बेबंद आणि अराजकवादी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षणाऐवजी आंदोलनाची थेरं करत बसलेल्या राष्ट्रद्रोही विद्यार्थ्यांच्या बिनबुडाच्या विरोधाला न जुमानता, देशातल्या बहुतेक सगळ्या चित्रपटकर्मींच्या नाकांवर टिच्चून गजेंद्र चौहान यांनी आपला कार्यकाल दिमाखात पार पाडला आणि ते सन्मानाने पायउतार झाले.
............................................................................................
३. असहिष्णू भारतीयांना भारतात जागा नाही, अशा शब्दांमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रामजस महाविद्यालयातील हिंसक घटनांवर भाष्य केले आहे. विद्यापीठात तर्कसंगत चर्चा आणि वादविवाद व्हावेत. मात्र त्यामुळे अस्वस्थता आणि अशांतता पसरणार नाही, याची काळजी घेतली जावी, असे म्हणत राष्ट्रपतींनी विद्यापीठांमधील परिस्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त केली.
राष्ट्रपती अचानक जागे झाले आणि त्यांनी लिहून दिलेल्या भाषणाऐवजी मनानं भाषण केलं, असं काही घडलं आहे का? कदाचित अधूनमधून रुचिपालट म्हणून राष्ट्रपतींना असंच भाषण लिहून दिलं गेलं असण्याचीही शक्यता आहे. ते काहीही बोलले, तरी कोणालाच काही फरक पडत नाही, ही खात्री असल्यानेच हा धोका पत्करला गेला असावा.
............................................................................................
४. आंदोलनं आणि वादांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला (जेएनयू) सर्वोत्तम विद्यापीठांच्या विभागात यंदाचा ‘व्हिजिटर्स अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सहा मार्चला राष्ट्रपती भवनात प्रदान करण्यात येईल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. राष्ट्रपतींनीच याबद्दलची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
अरे देवा, जेएनयूमध्ये मुळात काही शिकवतच नाहीत. तिथे विद्यार्थी आंदोलनं करायलाच येतात. कम्युनिस्ट कार्यकर्ते शिक्षणाच्या नावाखाली होस्टेलच्या सुविधांचा स्वस्तात लाभ घेतात. उच्चशिक्षणाच्या नावाखाली मध्यमवयापर्यंत जेएनयूमध्ये डेरा टाकला जातो. हे सगळं राष्ट्रपतींना माहिती नाही की काय? जिथे कोणी शिकवत नाही आणि काही शिकतही नाही, ते विद्यापीठ देशात सर्वोत्तम ठरवल्याने केवढं अराजक माजेल, याची काही कल्पनाच नाही की काय राष्ट्रपतींना?
............................................................................................
५. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ओम पुरींना श्रद्धांजली वाहिली जाते, मात्र हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांचा विसर पडला, अशा शब्दांत टीका करणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने असे उथळ पुरस्कार सोहळे बंदच केले पाहिजेत, असे वक्तव्य केले आहे.
भाई नवाझ, पाण्यात राहून माशाशी वैर करायचं नसतं. आज उथळ पुरस्कार सोहळे बंद करा म्हणतोस. उद्या उथळ सिनेमे काढणंच बंद करा म्हणशील. मग सगळी इंडस्ट्री बेरोजगार होईल आणि उथळ लोक पाहतील काय? हा उथळ लोकांच्या निवडस्वातंत्र्यावरचा घाला नाही का?
............................................................................................
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment