ही लढाई डेव्हिड आणि गोलियथची आहे. रशिया नावाच्या महाकाय गोलियथपुढे युक्रेन नावाचा डेव्हिड हार मानायला तयार नाही!
पडघम - विदेशनामा
आरती कुलकर्णी
  • रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्य वोलोदिमीर झेलेन्स्की. मध्यभागी युक्रेनचा नकाशा
  • Mon , 28 February 2022
  • पडघम विदेशनामा व्लादिमीर पुतिन Vladimir Putin वोलोदिमीर झेलेन्स्की Volodymyr Zelenskyy रशिया Russia सोव्हिएत रशिया Soviet Union युक्रेन Ukraine नाटो NATO अमेरिका America संयुक्त राष्ट्रसंघ United Nation

‘Mother is no more’ उद्ध्वस्त झालेल्या घराच्या अंगणातून जॅकेट घातलेला एक पाठमोरा माणूस मोबाईलवरून कुणाला तरी सांगतो आहे... त्याच्या अवतीभवती फक्त आकांतच आकांत आहे. हिवाळ्यामध्ये पानगळ झालेली झाडं शुष्कपणे उभी आहेत. टीव्ही फ्रेममध्ये डोकावणारं आभाळ पुरतं काळवंडून गेलं आहे...

मेट्रो स्टेशनमधल्या भूमिगत आसऱ्यांमध्ये जीवाच्या भीतीनं काही माणसं कुडकुडत बसली आहेत… एक आई आपल्या दोन मुलांना छातीशी कवटाळून मदतीची याचना करते आहे… आपल्याला तिच्या डोळ्यांत बघण्याचं धाडस होत नाही... टीव्ही कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये दुपट्ट्यात गुंडाळलेलं एक बाळ दिसतं आहे फक्त.

राजधानीवर हल्ला

एका उंच इमारतीच्या कितीतरी मजल्यांना मध्येच मोठ्ठं भगदाड पडलंय... युक्रेनची राजधानी कीव्ह, खार्किव्ह अशा आखीवरेखीव शहरांमधून आगीचे लोळ उठत आहेत... या भयग्रस्त देशांतून बाहेर पडण्यासाठी लोक त्यांच्या सुटकेस ओढत चालले आहेत... मागे अंगावरच्या गरम कपड्यानिशी धावत सुटलेल्या मुलांची फरफट सुरू आहे... युद्धग्रस्त निर्वासितांसाठी उभारलेल्या छावण्या, मदतीसाठी रांगा आणि माणसांचा आकांत तसाच सुरू आहे...

व्लादिमीर आणि वोलोदिमीर

युक्रेनचे हाल पाहवत नाहीत. व्लादिमीर पुतिन नावाचा रशियाचा सर्वेसर्वा या देशावर एकामागोमाग एक हल्ले करत चाललाय आणि वोलोदिमीर झेलेन्स्की नावाचा युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष जीवाची बाजी लावून आपल्या देशाला या हल्ल्यांपासून वाचवतो आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

व्लादिमीर आणि वोलोदिमीर या नावांचा अर्थ एकच. एक रशियन भाषेतलं आणि दुसरं युक्रेनमधल्या उच्चारांप्रमाणे. उच्चारामध्ये फरक आहे, तसाच या सारख्याच नावांच्या दोन माणसांमध्येही. व्लादिमीर म्हणजे सर्वशक्तिमान. आता या दोन व्लादिमीरपैकी सर्वशक्तिमान कुणाला म्हणायचं ते तुम्हीच ठरवा.

ही लढाई डेव्हिड आणि गोलियथची आहे. रशिया नावाच्या महाकाय गोलियथपुढे युक्रेन नावाचा डेव्हिड हार मानायला तयार नाही.

झेलेन्स्की यांचं आवाहन

‘ही रात्रही जाईल… नवा दिवस उगवेल…’ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आपल्या देशवासियांना धीर देतायत… रशियाचे हवाई हल्ले युक्रेनची राजधानी कीव्हपर्यंत येऊन पोहोचले. झेलेन्स्की यांनी कीव्ह सोडून निघून यावं, अमेरिकेनं प्रस्ताव दिला, पण झेलेन्स्की आपला देश सोडून कुठेही जायला तयार नाहीत. ‘आम्हाला शस्त्रास्त्रं हवी आहेत,  इथून पळून जाण्याची संधी नाही… मी इथेच आहे, कुठेही जाणार नाही.’ राजधानी कीव्हमधल्या एका प्रशस्त रस्त्यावर उभं राहून झेलेन्स्की त्यांच्या स्थानिक रशियन भाषेत बोलत होते. ‘मी युक्रेनसाठी आहे… युक्रेनमध्येच आहे’ हेच त्यांना सांगायचं होतं. रशियाविरुद्धच्या या घनघोर युद्धात ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ … असा पवित्रा घेऊन ते युक्रेनच्या भूमीवर उभे आहेत.

मदत आणि वाटाघाटी

अमेरिका, जर्मनी हे देश प्रत्यक्ष युद्धात उतरले नसले तरी या देशांनी युक्रेनला शस्त्रास्त्रं, फौजा, अर्थपुरवठा अशी सर्वतोपरी मदत केली आहे. ऑस्ट्रेलियासारख्या देशांनीही युक्रेनला औषधांचा पुरवठा केला आहे.

युद्ध कुणालाच नको आहे, म्हणूनच अखिल जग युक्रेनच्या सोबत आहे, पण तरीही पुतिन आणि त्यांच्या युद्धखोर रशियाशी वाटाघाटी कोण करणार? धगधगतं युक्रेन शांत कधी होणार? या प्रश्नांची उत्तरं सध्या कुणाकडेही नाहीत. त्यातच पुतिन यांनी रशियाच्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्रांना हाय अलर्ट दिला आहे. युद्ध थांबवण्यासाठीच्या वाटाघाटींमध्ये रशियाचाच वरचष्मा राहील, याची पुरेपूर खबरदारी पुतिन घेताहेत. वाटाघाटींचा एकेक तास महत्त्वाचा आहे.

दिमेत्रोंची हाक

तरीही रशियाच्या हल्ल्यांनी उदध्वस्त झालेल्या युक्रेनच्या नेत्यांनी धीर सोडलेला नाही. आधी झेलेन्स्की बोलले आणि मग युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी जगालाच मदतीसाठी साद घातली. शांततेसाठीच्या निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर उभं राहून धीराने बोलणाऱ्या दिमेत्रो कुलेबा यांच्या चेहऱ्यावरचा तणाव लपत नव्हता. कसा झाकला जाईल हा तणाव?

युक्रेनपासून इतक्या दूर अंतरावरच्या भारतात या देशाची दृश्यं पाहून अस्वस्थ वाटतं आहे, तर वोलोदिमीर झेलेन्स्की आणि त्यांचे सहकारी कशाकशातून जात असतील? मदतीसाठीची एकेक शक्यता, एकेक पर्याय त्यांनी धुंडाळून पाहिला असेल...

‘आम्हाला माहीतच होतं, एक ना एक दिवस हे होणार आहे. आम्ही तयारी केली होती याची…’ झेलेन्स्की अजिबातच बेसावध नव्हते.

युक्रेन नेमका आहे कुठे?

युक्रेन... रशियाच्या जवळच्या या देशावर गेले काही दिवस युद्धाचे ढग जमू लागले होते. हा देश पुन्हा एकदा बातम्यांमध्ये येऊ लागला, पण रशियाने प्रत्यक्ष युद्धाला तोंड फोडलं तेव्हा कुठे आपल्याला याचं गांभीर्य कळलं. हा देश नेमका कुठे आहे, हे पाहण्यासाठी आपण नकाशे उघडले. पूर्व युरोपमधला रशियाला लागून असलेला देश. या देशातल्या रशियाला लागून असलेल्या पूर्वेकडच्या प्रांतात रशियन भाषा बोलली जाते, तर पश्चिमेकडच्या प्रांतांमध्ये युक्रेनची स्थानिक भाषा. पश्चिमेकडच्या या प्रदेशातले लोक स्वत:ला युरोपच्या जवळचे मानतात.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

रशियाच्या विघटनानंतर स्वातंत्र्य

१९९१मध्ये सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि युक्रेनसोबतच सोव्हिएत रशियाच्या अधिपत्याखाली असलेले १५ देश स्वतंत्र झाले. त्यातला युक्रेन हा रशियाच्या खालोखालचा सर्वांत मोठा देश. इतिहासात गेलं तर कळतं, एकेकाळी युक्रेन रशियापेक्षाही प्रबळ होता. युक्रेनची राजधानी कीव्ह ही रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोपेक्षाही बलशाली होती. याचं कारण युक्रेनच्या भूगोलात दडलेलं आहे. History lies in Geography. बऱ्याच वेळा त्या प्रांताचा भूगोलच त्या प्रांताचा इतिहास ठरवतो हेच खरं.

युक्रेन का महत्त्वाचा?

युक्रेन हा नैसर्गिक साधनसंपत्तीने श्रीमंत असलेला देश. सुपीक जमीन, लोहखनिज, कोळशाच्या खाणी आणि तेलाचे साठे असलेला हा भलामोठा संपन्न प्रांत.

ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक निळू दामले सांगतात, “रशियामधून युरोपकडे ज्या तेलाच्या पाईपलाईन जातात, त्यातली एक युक्रेनमधून जाते. या पाईपलाइनसाठी आपली भूमी वापरू दिल्याबद्दल युक्रेनला जे भरघोस भाडं मिळतं, त्याचा युक्रेनच्या GDPमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. हे पाहिलं तर युक्रेनवर तेलाची अर्थव्यवस्था कशी अवलंबून आहे, याचा अंदाज आपल्याला येतो आणि म्हणूनच पुतिन यांना युक्रेन हवा आहे.’’

“खरं तर सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर झालेल्या बुडापेस्ट तहानुसार युक्रेनचं सार्वभौमत्व रशियाने मान्य केलं होतं, पण या समृद्ध, श्रीमंत प्रांतावरून रशियन नेत्यांची नजर हटेना. सोव्हिएत रशियाच्या विघटनामध्ये युक्रेन स्वतंत्र होऊ दिला हीच मोठी चूक झाली, असं रशियाच्या नेत्यांना वाटत आलं आहे. व्लादिमीर पुतिन यांनी तर युक्रेनवर पुन्हा ताबा मिळवण्याचा निर्धारच केलाय. युक्रेन ताब्यात आला, तर रशिया पुन्हा एकदा बलशाली बनेल आणि अमेरिका आणि युरोपसारख्या पाश्चात्य देशांना आपण जोरदार टक्कर देऊ, असा पुतिन यांचा मनसुबा आहे.’’

क्रिमियाचा घास

पुतिन यांनी याची सुरुवात केली क्रिमियापासून. हा द्वीपकल्प रशिया आणि युक्रेनच्या मध्ये आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये बंधुभाव जागृत व्हावा, म्हणून त्या वेळचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांनी १९५४मध्ये क्रिमिया हा प्रांत युक्रेनला बहाल केला होता, पण पुतिन सत्तेत आल्यापासून त्यांची नजर क्रिमियावर होती. अखेर १६ मार्च २०१४मध्ये क्रिमियामध्ये सार्वमत घेतलं गेलं आणि क्रिमिया रशियामध्ये विलीन झाला. एका रक्तरंजित संघर्षाची अखेर झाली, पण क्रिमियाच्या विलिनीकरणानंतर रशिया आणि युक्रेन यांच्यामधलं वैर धगधगत राहिलं. युक्रेनच्या डानबास प्रांतातल्या बंडखोरांना पुतिन यांनी चिथावणी दिली आणि युक्रेनला सतत अस्थिर ठेवलं.

युक्रेनची अस्मिता

तसं पाहिलं तर रशिया आणि युक्रेन हे जुळे देशच म्हणावे लागतील. युक्रेनमध्ये तिघांमधला एक जण रशियन भाषा बोलतो आणि सहामधला एक जण वांशिकदृष्ट्या रशियन आहे, असं आकडेवारी सांगते. असं असलं तरी युक्रेनची म्हणून एक वेगळी अस्मिता आहे, वेगळी संस्कृती आहे. रशियाने युक्रेनवर दावा करणं युक्रेनियन लोकांना अजिबात मान्य नाही. युक्रेनचे आत्ताचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की २०१९मध्ये याच अस्मितेच्या मुद्द्यावर निवडून आले. काहीही झालं तरी रशियाला युक्रेनचा घास घेऊ देणार नाही, असं म्हणणाऱ्या झेलेन्स्कींना युक्रेनच्या नागरिकांनी भरघोस मतांनी विजयी केलं.

अभिनेते आणि कॉमेडियन

वोलोदिमीर झेलेन्स्की हे अभिनेते आणि कॉमेडियन आहेत. अवघ्या ४४ वर्षांचा हा तरुण राष्ट्राध्यक्ष आपल्या देशाची अस्मिता सांभाळण्यासाठी प्राणांची बाजी लावून लढतो आहे. एक कॉमेडियन जबाबदार नेत्याची भूमिका पार पाडतो आहे आणि बड्याबड्या देशांच्या राष्ट्राध्यक्षांचं वागणं मात्र विनोदी आहे, असं संदेश सोशल मीडियावर फिरतायत ते यामुळेच. खरं तर झेलेन्स्की यांचा जन्म दक्षिण युक्रेनमधल्या रशियन भाषा बोलणाऱ्या प्रांतातला, पण युक्रेनच्या माणसांना नेमकं काय हवं आहे, हे ते जाणून आहेत.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

जिंकू किंवा मरू

त्यांच्यासाठी युक्रेनची जनताही तळहातावर जीव घेऊन रस्त्यावर उतरली आहे. कोणी आई तिच्या दोन मुलांना घरी ठेवून मदतछावणीत स्वयंसेवक बनली आहे. कुणी रशियाच्या बॉम्बम्बहल्ल्यांना तोंड देण्यासाठी घरगुती पद्धतीचे बॉटलबॉम्ब बनवतायत, तर कुणी निर्वासितांच्या मुलांना कपडे, अन्न, औषधं पुरवण्यासाठी दिवसरात्र झटतं आहे. 

ही माणसं आपल्याच देशात ठिय्या देऊन असली तरी आतापर्यंत एक लाखांहून जास्त युक्रेनवासियांनी हाती लागेल ते घेऊन आपल्या कुटुंबकबिल्यासह बाहेरचा रस्ता धरला आहे. युक्रेनला लागून असलेल्या पोलंडच्या सीमेवर निर्वासितांचे जथ्थेच्या जथ्थे येऊन थडकतायत. काही जणांनी आपल्या मुलांना पुढे पाठवलंय... आणि स्वत: हल्ल्यांना तोंड देत ‘करेंगे या मरेंगे’ या निर्धाराने आपल्या भूमीतच ठाण मांडलं आहे.

चेर्नोबिलचा महास्फोट

अशा जिगरबाज माणसांच्या युक्रेनने याआधी कायकाय पाहिलं नाही... १९८६मध्ये ज्या चेर्नोबिलच्या अणुभट्टीमध्ये भयंकर स्फोट झाला, ती अणुभट्टी याच युक्रेनमध्ये. त्या वेळी युक्रेन सोव्हिएट रशियामध्ये होता... चेर्नोबिलच्या अणुस्फोटात इथल्या पिढ्यान् पिढ्या उद्ध्वस्त झाल्या. अजूनही इथे किरणोत्सर्ग आहे आणि त्यामुळे कुणी इथे पाऊलही टाकू शकत नाही.

‘Ghost town’ असं म्हटल्या जाणाऱ्या चेर्नोबिलमध्ये आजही स्मशानशांतता आहे... तिथे फिरणारा जायंट व्हीलचा पाळणा आजही थबकून उभा आहे. युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाच्या फौजांनी या चेर्नोबिलचा ताबा मिळवला. ही चढाई सांकेतिक होती. आज चेर्नोबिल घेतलं, उद्या अख्खा युक्रेन गिळंकृत करू, हेच पुतिन यांना जगाला सांगायचं होतं. 

NATOवर खापर

‘वाटाघाटी सुरू झाल्या तरी आमचे हल्ले थांबणार नाहीत,’ पुतिन यांच्या धमक्या सुरूच आहेत. एवढंच नव्हे तर पुतिन यांनी आपल्या अण्वस्त्र दलालाही सतर्क राहण्याचे आदेश दिले. त्यांना युक्रेनवर हल्ला चढवायचाच होता आणि त्याचं खापर ते फोडतायत नाटोवर. NATO म्हणजेच North Atlantic Treaty Organisation. ही अमेरिका, युरोपमधले देश आणि अन्य काही देशांची लष्करी संघटना आहे. सध्या या संघटनेत ३० देश आहेत. युक्रेनला या संघटनेचं सदस्यत्व हवं आहे आणि पुतिन यांची मळमळ हीच आहे. ‘युक्रेनला NATOचं सदस्यत्व दिलंत तर गंभीर परिणाम होतील’, युद्ध छेडल्यापासून पुतिन याच NATO देशांवर गरळ ओकतायत.

रशियाच्या हल्ल्यात सापडलेल्या युक्रेनला अमेरिकेसह NATOच्या सदस्य देशांनी मदत तर पाठवली आहे, पण हे देश युक्रेनच्या बाजूने प्रत्यक्ष युद्धात उतरलेले नाहीत.

कीव्ह, खार्किव्ह… युक्रेनची एकेक शहरं युद्धाने बंजर होऊ लागली आहेत... दिवसरात्र लढाई सुरू आहे. युद्धात युक्रेनचे आणि रशियाचे किती सैनिक मारले गेले याची गणतीच नाही. आम्ही युक्रेनच्या नागरिकांना लक्ष्य करणार नाही, असं पुतिन म्हणत असले तरी या युद्धात आतापर्यंत २००हून जास्त नागरिकांचा बळी गेला आहे.

‘आपण माणसांचे मृत्यू आकड्यांमध्ये मोजतो, पण एक माणूस गेला तर त्याच्याशी संबंधित पन्नासेक कुटुंबांना त्याची झळ पोहोचते, हे आपण लक्षात घ्यायला हवं,’ आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार निळू दामले सांगतात. त्यांच्या मते, जो युक्रेन आधीच सार्वभौम आहे, त्याचं सार्वभौमत्वच मान्य न करणं हे अत्यंत गैर आहे आणि त्यामुळेच या युद्धात सगळ्यांचीच सहानुभूती युक्रेनला आहे.

विद्यार्थी आणि युक्रेनच्या सुना

भारतातून युक्रेनमध्ये शिकण्यासाठी गेलेले कितीतरी विद्यार्थी आता मायदेशी परततायत. ते सुखरूप आहेत, पण तरीही व्हिडिओ कॉलवर आपल्या पालकांशी बोलणारे ते आणि त्यांच्या चिंताग्रस्त आईवडिलांचे चेहरे पाहिले की, गलबलून जायला होतं. एवढंच नाही तर भारतामधल्या काही कुटुंबांमध्ये युक्रेनच्या सुनाही आहेत. त्यांच्या माहेरच्या देशाची काळजी म्हणूनच भारतातल्या कितीतरी जणांना लागून राहिली आहे.

रशियाचे हल्ले सुरू झाले, तेव्हा पहिल्याच दिवशी युक्रेनच्या हायवेवर स्थलांतरितांचे लोंढे जमू लागले, ट्रॅफिक जाम होत होते, ATM बाहेर रांगाच रांगा लागल्या होत्या... लोक भयग्रस्त होऊन सैरावैरा पळत होते. त्यांची भाषा कळत नसली तरी त्यांना काय म्हणायचंय, हे जगाला कळत होतं.  

पुतिन यांचा दुराग्रह

Everything is fair in love and war असं म्हणतात, पण हे Fair कुणासाठी? तर रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये बसून आदेश सोडणाऱ्या हुकूमशहा पुतिन यांच्यासाठी. खरं तर रशिया आणि युक्रेनमधले नागरिक एकमेकांच्या विरोधात नाहीत. कित्येकांचे सगेसोयरे दोन्ही देशांत आहेत, पण युक्रेनचा ताबा मिळवण्याचा या एका माणसाचा हट्ट आहे, दुराग्रह आहे आणि या सामर्थ्यशाली हुकूमशहापुढे सगळेच हतबल आहेत.

पुतिन यांना तुम्ही नाझी जर्मनीची उपमा द्या, त्यांची हिटलरशी तुलना करा... क्रूरकर्मा म्हणा, शाप द्या, तळतळाट द्या... त्यांना कशाची पर्वा नाही. युक्रेनचा समावेश रशियामध्ये केल्याशिवाय शांत बसायचंच नाही, असा चंग त्यांनी बांधला आहे. मग तो जॅकेटवाला पाठमोरा माणूस आपली आई गेल्याची वार्ता का सांगेना... मग मदतीसाठी एखादी आई आपल्या मुलाला छातीशी कवटाळून का धरेना... स्थलांतरितांच्या मुलांची किती का परवड होईना... पुतिन यांना तमा नाही... करोनानंतर कुठेतरी सावरू पाहणाऱ्या युक्रेनलाच नव्हे, तर जगालाच पुतिन यांनी युद्धाच्या खाईत लोटलं आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

युद्ध किती काळ चालणार?

युक्रेनमधला गोठवणारा हिवाळा अजून संपलेला नाही, युद्ध किती काळ चालणार, या संहारातून कसं सावरणार, हे माहीत नाही, पण रशियाच्या मुस्कटदाबीपुढे हरायचं नाही, असा निर्धार वोलोदिमीर झेलेन्स्की आणि त्यांच्या देशवासियांनी केला आहे.

आक्रमक रशियावर निर्बंध घातले जातायत, हे युद्ध फक्त युक्रेनचं नाही, तर अखिल मानवजातीविरुद्ध आहे, अशी भूमिका सगळ्याच देशांनी घेतली आहे. रशियाने युक्रेनमधून सैन्य मागे घ्यावं आणि हा संहार थांबवावा, असंच सगळ्यांचं म्हणणं आहे. या वाटाघाटींनंतर हे युद्ध कदाचित थांबेलही आणि पुढचा संहार टळेलही, पण या घनघोर युद्धात युक्रेनची जी वाताहत झाली, त्याची नुकसान भरपाई कोण देणार? युद्धग्रस्त युक्रेनमधल्या माणसांच्या वेदना कशा थांबणार? आणि करोनाच्या खाईतून सावरणारं जग या युद्धाच्या सावटातून बाहेर कधी येणार? हे कळीचे प्रश्न आहेत.

..................................................................................................................................................................

हेही पहा\वाचा

आज युक्रेनची गत ‘रामायणा’तल्या विभीषणासारखी झालीय. रशिया आणि नाटो देश त्याला ‘बिभीषण’सारखा घरभेदी मानायला लागले आहेत

रशिया-युक्रेन संघर्ष : अमेरिका, युरोपियन राष्ट्र, नाटो, चीन आणि भारत

..................................................................................................................................................................

लेखिका आरती कुलकर्णी मुक्त पत्रकार आहेत.

artikulkarni262020@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......