अजूनकाही
‘पटेली’ या बहुचर्चित कादंबरीचे लेखक अविनाश उषा वसंत यांचा ‘कविता ह्या हिणवलेल्या’ हा कवितासंग्रह साहित्यविश्वात दाखल होतो आहे. प्रस्तुत संग्रहाच्या शीर्षकापासूनच ही वेगळी कविता असली पाहिजे, असे वाटते. आणि कविता वाचल्यानंतर ते खरेही ठरते. कवी स्वतःच्या कवितांना हिणकस ठरवल्या गेल्याचा एक पुरावाच कवितासंग्रहाच्या शीर्षकातून देतो आहे.
मलपृष्ठावर कवीने स्वत:चा पत्ता गिरणगाव, मुंबई असा दिलेला आहे. त्याचे वास्तव्य गिरणगावात असल्याचा हा आणखी एक धागा कविता वाचण्यासाठी वाचकाला उद्युक्त करतो. कारण, गिरणगाव म्हटले की, मराठी कवितेत सर्वप्रथम आठवतात ते नारायण सुर्वे! मुंबई या मायावी नगरीतले कष्टकरी, कामगार वर्गाचे हलाखीतले जगणे सुर्वे यांनी मराठी कवितेत प्रभावीपणे चित्रित केले. त्यांच्यानंतर नामदेव ढसाळ यांच्या कवितेनेही मुंबईतील विविध स्तरांतील माणसांच्या जगण्याचा उभा-आडवा छेद अत्यंत सूक्ष्मपणे आणि वेधकरित्या घेतला आहे. असो.
तर मुंबईच्या गिरणगावात वास्तव्य करणाऱ्या या तरुण कवीच्या कविता जेव्हा आपण वाचायला लागतो, तेव्हा साहजिकच मनात कुतूहल निर्माण होते. मुखपृष्ठावरील गिरणीचे चित्र, पोस्टाचे तिकीट, त्यावर असलेला नायगाव पोस्ट ऑफिसचा शिक्का या सगळ्या गोष्टी आपल्याला या कवितेला असलेली पार्श्वभूमी अधोरेखित करताना दिसतात.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
या कविता चार भागांत विभागलेल्या आहेत. पहिला भाग ‘दिवसाची उठचळ’, दुसरा भाग ‘गिरणगावातून मुंबईतली उठबस’, तिसरा भाग ‘कोयना एक्स्प्रेस’ ही एक स्वतंत्र दीर्घकविता, तर चौथा भाग ‘उत्तररात्रीचं किडुक मिडुक’... अशा एकंदर ४६ कविता आपल्याला भेटतात. कवितेचे पीक भरघोस असण्याच्या काळात गिरणगावातला एक तरुण आपली जगण्याच्या असोशीतून आलेली निरीक्षणे प्रामाणिकपणे मांडतो आहे, हे चित्र निश्चितच सुखद आहे.
या कवितेला विचारांची डूब आहे. कवितेतून व्यक्त होत असताना कवी भाषेचे कसलेही अवडंबर माजवताना दिसत नाही. जे पोटातून आले आहे, तेच ओठांवर आहे, या भूमिकेतून झरणारी सहज, ओघवत्या बोलीभाषेतली ही कविता मुंबई आणि गिरणगावातल्या बोलीभाषेचा सहज उत्कट आविष्कार करताना कुठेच ढळत नाही.
‘सम्यक’ ही पहिलीच कविता कवीची दिशा आणि भूमिका स्पष्ट करते. सध्याच्या जात आणि धर्माच्या विखारी प्रचाराच्या काळात प्रत्येक व्यक्तीकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात असताना कवीला अशा माणसाला भेटायचं आहे, जो कसलाही भेद करणार नाही, ज्याला तुच्छता माहिती नसेल, ज्याला कसलीच नाती नसतील. या कवितेतून कवी वर्तमानातील सम्यकतेच्या गरजेला आवाहन करू पाहतो आहे.
समकालाचे नेमके भान कवीला आहे. ते प्रकट करताना तो म्हणतो, ‘ठरवतात हे लोक माणसाचं चरित्र एक दोन शब्दांत.’ सद्यस्थितीत माणसाला लगेचच तात्काळ निकालात काढण्याची वृत्ती बळावते आहे. त्याला ‘प्रतिगामी’ किंवा ‘पुरोगामी’ अशा गटात विभागले जात आहे. म्हणूनच कवी आठवण करून देतो की, आपला जो पूर्वज होता त्याला कसलेही चरित्र नव्हते. माणसानेच सारे भेद, गट-तट आपल्या स्वार्थासाठी निर्माण केलेले आहेत. शेवटी कवी असा आशावाद प्रकट करतो की, ‘चरित्र असल ना मानवाचेय मानवतावादी!’
कविता अस्वस्थतेतून निर्माण होते. समाजात जगत असताना मानवी जगण्याला भेडसावणारे प्रश्न, जाणवणारे ताण-तणाव, उपस्थित केले जाणारे सवाल कवी आपल्या कवितेतून अधोरेखित करत असतो. कवीच्या शब्दांना चिंतनाचे अस्तर लाभल्यामुळे कविता समाजाभिमुख होत असते. या संग्रहातल्या कवितेत या शक्यता ठळकपणे जाणवतात.
‘आई’ या कवितेतून कवी गिरणगावातील प्रत्येकाची आई आपल्या डोळ्यांसमोर उभी करत असतानाच समष्टीचे प्रखर भानदेखील अधोरेखित करतो. ‘धारवाला’ या कवितेतून धार लावणाऱ्या व्यक्तीचे चित्र रेखाटत हिंदू-मुस्लीम दंगलीचे संदर्भ नोंदवताना ‘ठिणग्या उडतात पत्तर का चलता चकार धार लागते पण कुणीच धारधार व्हवू नये धार लगतालगता जिंदगी का पत्तर व्हतो काला’ असे सूचक विधान करून दंगल ही कुणाच्याच हिताची नसते, हे परखड सत्य प्रत्येकाला निक्षून सांगण्याचा प्रयत्न करतो.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
कवीचे निरीक्षण सूक्ष्म आणि तरल आहे. समाजमाध्यमांवरील त्याने टिपलेली छायाचित्रे, विविध घटना-प्रसंग, घडामोडींना दिलेली प्रतिक्रिया याची साक्ष देतात. ‘रि-डेव्हलपमेंट’ या कवितेतून गिरणागावाचे रि-डेव्हलपमेंटच्या गोंडस नावाखाली होणारे वस्त्रहरण कवी
‘तुझ्याच फुकटच्या पाण्यावर जगणारे ते बांडगुळ कधी कळणार बे
गणपतीच्या स्टेजसाठी खो - खो कबड्डीचे मैदान तू विकलेस कवडीमोलात
आता तू ‘इको टाइम्स’ वाचतो ना’
अशा ओळींतून गडद करतो.
तर ‘कविता ह्या हिणवलेल्या’ शीर्षक कवितेत कवी आपल्या कवितांचा प्रवास उलगडतो. आपल्या कविता या रात्री जागर करणाऱ्या, धोक्याचे सूचन करणाऱ्या, आणि कुणीही वाली नसलेल्या असल्यानेच त्यांचा हा हिणवलेला पसारा सहजासहजी कुणाच्याच पचनी पडला नाही, प्रकाशकांची हेटाळणी कवी आणि कवितेच्या वाट्याला आली.
‘पावसाळा’ या कवितेत अब्दुलचाचा हे प्रातिनिधिक पात्र उभे करत बदाबदा कोसळणारा पाऊस आणि खवीस पावसाळा सगळ्यांसाठीच चांगला नसतो, कारण, ‘घरात घुसणारा पाऊस करतो घरघुशी,
उचलतो माणसं,
पन्हाळ्याच पाणी तिथं नेहमी बाद बाद पडत,
पावसाची सर थांबत नाय,
कोणी भेटत नाय सर,
कण्या खाऊन कणा उभारतो
कोळंबी करून केळ विकतो पथारीवर
बाद बाद पावसात’
ही भीषण परिस्थिती सर्वसामान्य माणसाला हतबल करते. तशाही परिस्थितीत प्रत्येक प्रसंगाशी दोन हात करण्याचे बळ एकवटून झगडणारा हा अब्दुलचाचा कवितेतून आपल्याला भेटतो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
‘मुंबई १’ आणि ‘मुंबई २’ या दोन कविता एकप्रकारे मुंबानगरीचे आत्मचरित्रच आहेत आणि त्याचबरोबर ‘अंतर्बाह्य करतोय स्पर्धाच स्वत:च्या शरीरातल्या पेशींशी’ असे म्हणत या मायावी नगरीशी एकरूप आणि तादात्म्य पावल्याची ग्वाही कवी आपल्याला देतो. ‘एक कोटच घर’ या कवितेतून कवी स्वप्नाची राखरांगोळीच मांडतो, कारण स्वप्नांचा पाठलाग करण्यातच आयुष्य कधी शेवटाकडे येते, हेच कळत नाही. ‘सर्वसामान्यांच्या जगण्यातली अभाववग्रस्तता’ या कवितेतून ‘स्वप्न हे स्वप्नच असते एक कोट घराचे साबणपाण्यातले बुडबुडे फोडतात शहरातले वॉचमन त्याच पोट त्यावर’ हे वास्तव प्रकट करतो.
प्रस्तुत संग्रहातील कविता, तिची भाषा वाचकाला गुंतवून ठेवते, कारण ही कविता अनुभवांशी प्रामाणिक तर आहेच, पण ती तितकीच सहज आणि सोपी आहे. ती कुठेही बोजड वाटत नाही. या कविता वाचत असताना नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, प्रकाश जाधव यांच्या कवितांची आठवण होते. कुठलाही आव न आणता, कसलाही पवित्रा न घेता ही कविता सरळपणे वाचकाला भिडते. शीर्षक ‘कविता ह्या हिणववलेल्या’ असे असले तरी प्रत्यक्षात या कवितांमध्ये यत्किंचितही हिणकसपणा जाणवत नाही. उलट काळाच्या ओघात नष्ट होत चाललेल्या गिरणगावाचे उरले-सुरले अवशेष मांडणारी ही अस्सल कविता आहे.
..................................................................................................................................................................
लेखक नानासाहेब गव्हाणे साहित्याचे अभ्यासक आहेत.
gavhanenanasahebcritics@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment