अजूनकाही
“Loneliness and the feeling of being unwanted is the most terrible poverty.” - Mother Teresa
चीनचे अरबपती जॅक मा गेल्या काही महिन्यांत सोशल मीडियावरून गायब झाले आहेत. त्यांच्या नावावर नको ते खपवणारे, त्यांचे प्रेरणादायी व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणारे लोक कुठे आहेत? इतके दिवस दिसणारी लोकप्रिय व्यक्ती अचानक कुठे गेली, हा प्रश्न या लोकांना पडला नसेल?
इटलीमध्ये एक ७० वर्षीय स्त्री तिच्या घरात एकटी राहत होती. तिचा दोन वर्षांपूर्वी घरातच मृत्यू झाला, मात्र आजूबाजूच्या लोकांना तिच्या घराच्या आजूबाजूला झाड वाढल्याचं दिसल्यावर ते लक्षात आलं. मग पोलिसांना बोलावलं गेलं. त्यांना घरात त्या मृत स्त्रीचं ‘ममी’ झालेलं शरीर दिसलं. ती त्याच अवस्थेत दोन वर्षं टेबलवर पडून होती.
या दोन घटना काय दर्शवतात? चोवीस तास कनेक्टेड असलेल्या या जगात मानवी नाती कोणत्या पातळीवर आली आहेत?
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
हिंदी चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचे सिनेमे बऱ्यापैकी वेगळे व भडक म्हणता येईल, असे होते. पण त्यांत मानवी नात्यांचे खूप बारीक कंगोरे बघायला मिळतात. ‘फील गुड’ नसले म्हणून ते अनेकांना आवडत नाहीत, पण त्यातून आपल्या आयुष्याची वेगळी बाजू बघायला मिळते. ‘पेज ३’ हा त्यांच्या सुरुवातीच्या चांगल्या सिनेमांपैकी एक. त्यातील ‘कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पे?’ हे गाणं आठवून बघा. अनेक वर्षांनी अचानक हे गाणं ऐकलं, तेव्हा लक्षात आलं की, हिंदी सिनेमातला खोटेपणा, बडेजाव व नाती वापरून फेकून देण्याची वृत्ती आपल्या जगण्यातसुद्धा उतरली आहे.
भारतीय लोकांना सिनेमाचं प्रचंड आकर्षण आहे. त्यातले सुंदर, चकाकते लोक, त्यांचं वागणं, याचं अप्रूप आणि त्यांच्यासारखी वागण्याची धडपड प्रत्यक्ष आयुष्यात अनेक जण करत असतात. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वर्षानुवर्षं हे लोक व त्यांची भव्य प्रतिमा प्रसारमाध्यमांनी जनमानसावर हुशारीनं बिंबवली आहे. ज्यांनी आपलं जीवन सुसह्य केलं, त्या वैज्ञानिकांबद्दल विचारलं तर मोजून पाच नावंसुद्धा आपल्याला आठवणार नाहीत, याउलट सिनेमातील बिनडोक लोकांबद्दल पीएच.डी. करावी इतकी माहीत असते. गेल्या काही वर्षांत आयटी उद्योगानं बदलललेली संस्कृती आणि या आगीला हवा देणारा सोशल मीडिया, यामुळे ‘कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पे’ हे गाणं आपल्या आयुष्याला तंतोतत लागू पडते.
कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पे
दो पल मिलते हैं, साथ-साथ चलते हैं
जब मोड़ आये तो, बच के निकलते हैं
कितने अजीब रिश्ते हैं.
मानवी नात्यांचा इतका भेसूर चेहरा या आधी कधीच बघायला मिळाला नाही. विशेष करून गेल्या दोन दशकांत मध्यमवर्गात अचानक आलेल्या पैशानं बुद्धी गहाण ठेवून चकाकतं आयुष्य कसं जगता येईल, याची चढाओढ सुरू झाली. मैत्री, व्यवसाय किंवा अगदी लग्नसुद्धा भावनेपेक्षा पैसा व प्रतिष्ठा यासाठी व्हायला सुरुवात झाली. अर्थात जे नातं व्यवहारावर सुरू होतं, ते फार दिवस टिकत नाही. त्यामुळे जास्त फायद्यासाठी जुनी नोकरी, मैत्री किंवा अगदी जोडीदारसुद्धा बदलणं सुरू झालं. माझ्या ओळखीची तीन वेळा घटस्फोट झालेली एक स्त्री आहे. ती अजूनही आयटी उद्योगात काम करते. जे लोक भावनिक असतात, त्यांना या गोष्टीचा त्रास होतो, मात्र बहुतेकांनी ट्रेंड म्हणून प्रवाहासोबत जाणं पसंत केलं आहे. ‘पेज ३’मध्ये केंद्रस्थानी असलेल्या तीन मुली व त्यांना येणारे अनुभव, हे घरापासून लांब राहून शिक्षण घेणार्या व नोकरी करणार्या बहुतांश मुली/स्त्रिया घेतात. अशा अनुभवातून पुरुषसुद्धा सुटत नाहीत.
यहाँ सभी अपनी ही धुन में दीवाने हैं
करे वही जो अपना दिल ठीक माने है
कौन किसको पूछे, कौन किसको बोले
सबके लबों पर अपने तराने हैं
ले जाये नसीब किसको कहाँ पे
कितने अजीब रिश्ते हैं...
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
‘पेज ३’मधील एका श्रीमंत स्त्रीचा नवरा तिने चालवलेल्या अनाथ आश्रमातील लहान मुलांचं लैंगिक शोषण करत असतो. हा धक्का सहन न होऊन ती आत्महत्या करते. तिच्या शोकसभेत आलेले लोक ब्रँडेड वेशभूषेत बिझनेस, पार्टी अशा गोष्टींची चर्चा करत असतात. हे पहिल्यांदा सिनेमा बघताना खूप धक्कादायक वाटत असलं तरी आता आपल्या बहुतेकांच्या आयुष्यात थोड्या बहुत प्रमाणात, अशीच परिस्थिती आहे.
अशीच निर्लज्ज मानवी नाती आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला उगवली आहेत. नेटवर्किंगच्या नावाखाली असंख्य वस्तू आपल्या माथी मारणारे आणि नको त्या गरजा निर्माण करून ‘we care’ म्हणणारी मंडळी बघितली की, या लोकांसाठी माणूस निव्वळ नफा मिळवून देणारा ग्राहक आहे, असं वाटतं.
वाढत्या आत्महत्या व व्यसनं या एकटेपणा व निराशा याचं चिन्ह आहेत. आजूबाजूच्या लोकांना जिवंत असूनही आपल्या अस्तित्वानं काही फरक पडत नसेल, तर त्याला अर्थ काय, या विचारातून काही लोक आयुष्य संपवत आहेत. आई-वडिलांच्या प्रतिष्ठेनुसार मार्क नाही मिळाले, त्यांच्या मर्जीनुसार लग्न नाही केलं किंवा अगदी क्षुल्लक मतभेदावरून अनेक जण स्वत:चा व कधी कधी एकमेकांचा जीव घ्यायला मागे-पुढे बघत नाहीत.
घरातून बाहेर पडल्यावर दुसऱ्या शहरात एकटं राहताना कुणावर विश्वास ठेवावा, हे कठीणच असतं. आयटीच्या चकाचक दुनियेत हरवलेले, बदललेले व अगदी ओळखू न येणारे अनेक लोक माझ्या बघण्यात आहेत. पीएच.डी. करताना पैशाच्या मागे धावणाऱ्या आयटीच्या ग्लॅमरस आयुष्यातील एकटेपण, भकासपणा आणि त्यातून येणारे मानसिक आजार याचं जवळून दर्शन झालं. पण गंमतीची गोष्ट अशी की, तरीही अनेकांना ते सोडायचं नाहीये.
या चंगळवादी दुनियेत प्रत्येक व्यक्तीची एक ग्राहक म्हणून किंमत असते. त्यानुसार तिच्या आजूबाजूची नाती बदलतात. वय, लिंग, पैसा कमवण्याची क्षमता, तो खर्च करण्याची वृत्ती, यावरून आपल्या आजूबाजूची नाती बदलतात. सोशल मीडिया आपल्या अस्तित्वाचं सर्टिफिकेट आहे. तुमच्या जीवनातील फक्त चांगल्या गोष्टीच सोशल मीडियावर टाकायच्या, किंबहुना त्या नसतील, तर तशा त्या करून घ्यायच्या, कारण कोणालाही दुःख, त्रास, वगैरे ‘फालतू’ गोष्टींसाठी वेळ नाही. सगळ्यांना फक्त ‘सब चंगासी’ आयुष्य हवं आहे. या आनंदाच्या दुनियेत हळव्या मनाच्या कवी, लेखकांना व कलाकारांना अजिबात जागा नाही. त्यामुळे सगळीकडे आपल्याला प्रेरणा, यशाची हमखास खात्री देणारी मंडळी दिसतात.
ख्वाबों की ये दुनिया हैं, ख्वाबों में ही रहना हैं
राहें ले जाये जहाँ संग-संग चलना हैं
वक़्त ने हमेशा यहाँ नए खेल खेले हैं
कुछ भी हो जाये यहाँ, बस खुश रहना हैं
मंज़िल लगे करीब सबको यहाँ पे
कितने अजीब रिश्ते हैं.
‘पेज ३’ या सिनेमाच्या केंद्रस्थानी असलेल्या तीन स्त्रिया तीन वेगवेगळ्या मार्गानं जातात. एक वयापेक्षा अतिशय मोठ्या वयाच्या व्यक्तीशी लग्न करून अमेरिकेत जाते, दुसरी एका सुपरस्टारकडून धोका मिळूनही परत त्याच मार्गानं जाण पसंत करते, तर तिसरी हळव्या मनाची असते. ते त्या वातावरणात राहूनही अलिप्त राहायला शिकते.
महाविद्यालयात असताना पाहिलेला हा सिनेमा तेव्हा फार बटबटीत वाटला होता. त्याउलट त्याच वेळेस आलेला ‘रंग दे बसंती’ खूप भावला होता. पण आता आपलंच आयुष्य ‘पेज ३’ झाल्याचं जाणवतंय, ‘रंग दे बसंती’सारखी व्यवस्था बदलणारी क्रांती, हे दिवास्वप्नच होऊन राहिलं आहे.
ठोकर भी खाना हैं, चलते भी जाना हैं
वादा किया तो वो, किसको निभाना हैं
यहाँ सबको सारे दाँव आज़माने हैं
सभी एक दूजे से ज़्यादा सयाने हैं
कितने अजीब रिश्ते हैं...
वाढलेल्या औद्योगिकीकरणानं आपल्या वाटेल्या आलेल्या व्यावसायिक भूमिका आपल्यावर हावी झाल्याचं दिसतं. कुठल्याही नात्यात आपण मुख्यत्वे करून आपलं काम, व्यावसायिक मूल्य दाखवून सुरुवात करतो (त्यात लग्नही आलं). व्यावसायिक मूल्य कधीही बदलू शकतं. ते बदलतं तेव्हा आपल्याला त्रास होतो. व्यावसायिक भूमिका खूपच गंभीरपणे घेतल्यानं व्यक्ती म्हणून वाढ खुंटलेल्या, अति पैसा कमावूनही समाधानी नसलेली मंडळी बघितली की वाटतं, कशासाठी हा अट्टाहास? यातून आपण काय मिळवणार आहोत? या भूमिकांमध्ये अडकलेले लोक ‘स्व’ विसरतात आणि भूमिकेला स्वत:चं व्यक्तिमत्त्व समजून आयुष्याची मजा घालवतात.
व्यावसायिक भूमिका व व्यक्तिमत्त्वं यांच्या सरमिसळीमुळे अनेक जण ‘हायब्रीड’ (गणपती, नरसिंह) झाले आहेत. त्यांच्यातील हाडामांसाची व्यक्ती कधी संपून चाणाक्ष व्यावसायिक भूमिका कधी सुरू होते, हे कळतही नाही.
एकदा भूमिकेत शिरलं की, तिचे ताण-तणाव, भीती व इतर सर्व भावना घेऊन आपण जगायला सुरुवात करतो व तिथेच आपला आत्मा मूक होतो, काही काळानंतर शरीर मृत्यू पावतं.
वेश्येकडे जाणारे अनेक पुरुष मन मोकळं करायला कोणीतरी हवं म्हणून जातात. त्यांना असं कुणीतरी हवं असतं, जे त्यांना दोषी न ठरवता आपलंसं करेल, प्रेम देईल… कारण साधारण दुनियेतील नियमानुसार पुरुषांना पैसा, सत्ता, विशिष्ट शारीरिक ठेवणं असल्याशिवाय समाजमान्य जोडीदार मिळत नाही. अमेरिकेत काही ठिकाणी ‘girlfriend experience’ (GFE) म्हणून वेश्यांकडून एक सेवा दिली जाते. त्यात खऱ्या प्रेमासारखा अनुभव मिळतो, अर्थात त्यासाठी पैसे द्यावे लागतात.
मानवी नाती सुरळीत राहावी म्हणून कामगार संघटना कर्मचार्यांची अनेक प्रकारे मदत करू शकतात, पण साम्राज्यवादाच्या अवकृपेनं कामगार संघटना बर्यापैकी निष्प्रभ केल्या गेल्या आहेत. त्यामुळे कामाशी संबंधित नाती अतिशय असुरक्षित आहेत. परिणामी कामगारांच्या आयुष्यावर वाईट परिणाम होऊन सामाजिक स्वास्थ्य खालावलं आहे.
मोठी स्वप्नं बघा, ती पूर्ण करण्यासाठी उर फुटेस्तोवर धावा, हे नवीन जमान्याचं ब्रीदवाक्य आहे. बरं ही स्वप्नंदेखील आपली असतात का? तर तसंही नाही. आई-वडिलांना हवं असलेली, ज्या समूहात जन्माला आलो आहे त्याच्या फायद्याची, माध्यमांनी आपल्यावर लादलेली आणि चंगळवादी वृत्तीनं दाखवलेली असतात.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
पैशानं विकत मिळाला तरच तो आनंद, या भ्रमामुळे आपण निर्व्याज आनंद, निरागसता व कोणत्याही फायद्याशिवाय असलेली नाती विसरून गेलो आहोत. मला स्वत:ला हा अनुभव बऱ्याच वेळा आला आहे की, आपण भलेही आनंदासाठी नातं जोडतो, बहुतेक मंडळी त्यातून त्यांच्या सोयीचे अर्थ काढत असतात. यामुळे एकटेपणा वाढून काही लोक आत्मघाती निर्णय घेतात.
इटलीतील त्या स्त्रीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर तेथील सरकारने आत्मचिंतन करायचं ठरवलं आहे. आपल्याकडे करोनाच्या काळात वेगवेगळ्या कारणानं इतके लोक अकाली मृत्यू पावले, त्यावर आपण देश व समाज म्हणून काय केलं? व्यवहारी जगात भावनांना स्थान नाही, हे मान्य, पण भावनेच्या जगात व्यवहार शिरला की, सगळं उलट होतं. तेच सध्या आपल्याकडे दिसतं. राजकारण, प्रशासन, गावाची चावडीपासून ते थेट घरातील नात्यात अतिरंजितपण आला आहे. हुशार म्हणवणारी मंडळी बालिशपणे, सूडबुद्धीनं वागत आहेत. यालाच घरात ‘कली’ शिरणं असं देखील म्हणता येईल का?
..................................................................................................................................................................
लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत मानसशास्त्रज्ञ आहेत.
vrushali31@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment