‘अॅनिमल फार्म’ आणि ‘1984’ दोन अजरामर कादंबऱ्यांचा लेखक असा परिचय असलेल्या जॉर्ज ऑर्वेलने वैचारिक लेखनही मुबलक प्रमाणात केलेलं आहे. त्याचं हे लेखन अनेक भागांमधून प्रकाशितही झालं आहे, परंतु ते फारसं वाचकांना माहीत नाही. हाच धागा पकडून प्रा. मनोज पाथरकर यांनी ऑर्वेलच्या काही निवडक निबंधांचा आणि लेखांचा ‘जॉर्ज ऑर्वेल : निवडक निबंध आणि लेख’ या नावानं मराठीत अनुवाद केला आहे. या अनुवादाला त्यांनी मूळ लेखनाचा परिचय आणि त्यावरील भाष्य याची जोड दिली आहे. हा अनुवाद लवकरच मनोविकास प्रकाशनाकडून प्रकाशित होत आहे. या पुस्तकाची झलक दाखवणारा हा एक निबंध...
..................................................................................................................................................................
परिचय
ऑर्वेलने हा लेख ‘ट्रिब्युन’ या नियतकालिकात वाचकांच्या पत्रांना प्रतिक्रिया म्हणून लिहिला. १८७० नंतर जग आमूलाग्र बदलण्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा सर्वांत महत्त्वाचा वाटा होता. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांच्या काळात विविध वैज्ञानिक शोधांमुळे युद्धाचे स्वरूपच पालटून गेले. येणाऱ्या काळात वैज्ञानिक ज्ञानाशिवाय मानवी जीवनाचे पानही हलू शकत नाही, हे १९४५पर्यंत सर्वांच्याच ध्यानात आले होते. अर्थव्यवस्था आणि लष्करी सामर्थ्य या दोन्ही आघाड्यांवर वैज्ञानिक ज्ञानाचे महत्त्व लक्षात घेता शिक्षणात विज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर अंतर्भाव व्हायला हवा, हे मत सर्वमान्य झाले. आजही हे तेवढेच खरे आहे; विकसनशील देशांना तर विज्ञानशिक्षणाची जरा जास्तच आवश्यकता आहे. मात्र विज्ञानशिक्षणावर किंवा शास्त्रीय ज्ञानावर भर देताना ‘विज्ञान (शास्त्र)’ आणि ‘वैज्ञानिक (शास्त्रीय)’ या संकल्पनांचा आपला अर्थ स्पष्ट असायला हवा, असे ऑर्वेलला वाटते. विज्ञानाचे शिक्षण घेतलेल्यांनी राजकीय-प्रशासकीय क्षेत्रांत सहभागी व्हावे, ही चांगलीच गोष्ट आहे. पण त्याआधी विज्ञानशिक्षण म्हणजे काय, हे स्पष्ट व्हायला हवे. ‘विज्ञान (शास्त्र)’ या शब्दाच्या दोन अर्थांमध्ये नेहमीच गल्लत केली जाते, असे ऑर्वेलचे निरीक्षण आहे. शास्त्रीय ज्ञान म्हणजे भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र इत्यादींचे ज्ञान असा एक सर्वमान्य अर्थ आहेच, पण शास्त्राचा दुसरा अर्थ ‘विचार करण्याची, ज्ञान मिळवण्याची एक पद्धती’ असाही आहे. ऑर्वेलचा भर यातील दुसऱ्या अर्थावर आहे. कारण त्याच्या मते नेमकेपणाने विवेकनिष्ठ आणि चिकित्सक वृत्तीने विचार करणे मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत आवश्यक आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
आधुनिक समाजव्यवस्थेत एखाद्याला मिळणारे अधिकार त्याच्या शास्त्रीय ज्ञानावर अवलंबून असतात, असे साधारणपणे दिसून येते. अर्थातच तंत्रज्ञानावर आधारलेल्या जीवनपद्धतीत ‘वैज्ञानिक वर्चस्व’ आपोआप वाढीला लागते. बऱ्याचदा असे सुचवले जाते की, हे वर्चस्व प्रमाणाबाहेर वाढू न देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सामान्य जनतेला अधिकाधिक वैज्ञानिक (शास्त्रीय) शिक्षण देणे.
त्याच वेळी असेही म्हटले जाते की, शास्त्रज्ञांनी आपल्या कोशातून बाहेर येऊन राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रांत सक्रीय होणेदेखील महत्त्वाचे आहे. एक सर्वसाधारण सूचना म्हणून आपण सर्वच याच्याशी सहमत व्हायला हरकत नाही. मात्र त्याआधी आपल्याला ‘विज्ञान (शास्त्र)’ या शब्दाचा नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे, हे स्पष्ट करायला हवे. बऱ्याचदा हा शब्द ज्या विषयांतील प्रयोग नियंत्रित वातावरणात केले जाऊ शकतात, अशा काटेकोर शास्त्रांसाठी वापरला जातो. या अर्थानुसार रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र ही जशी शास्त्रे ठरतात, तशी अर्थशास्त्र किंवा समाजशास्त्र ही शास्त्रे ठरत नाहीत. खरे तर हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. मुळात आपण ‘शास्त्र’ किंवा ‘विज्ञान’ हा शब्द दोन वेगवेगळ्या (परंतु एकमेकांशी संबंधित) अर्थाने वापरत असतो. या दोन अर्थांमध्ये गल्लत केल्याने विज्ञानशिक्षणाचे नक्की उद्दिष्ट कोणते, हे स्पष्ट होत नाही.
साधारणपणे ‘विज्ञान’ हा शब्द दोन अर्थांचा निर्देश करतो. एक म्हणजे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र यांसारखी काटेकोर शास्त्रे (ज्यांना निसर्गविज्ञानाच्या शाखा - natural sciences - संबोधले जाते) आणि दुसरा म्हणजे निरीक्षण केलेल्या वास्तविक घटनांचे तर्काधिष्ठित विचारांद्वारे परीक्षण करून प्रत्यक्ष सिद्ध करण्याजोग्या परिणामांपर्यंत पोहोचण्याची एक पद्धती. आपण जर एखाद्या शास्त्रज्ञाला किंवा कोणत्याही सुशिक्षित माणसाला विज्ञानाचा अर्थ विचारला, तर बहुधा वरील दुसऱ्या (एक पद्धती) अर्थाजवळ जाणारे उत्तर येईल. मात्र रोजच्या लिहिण्या-बोलण्यात विज्ञान हे पहिल्या अर्थाने (निसर्गविज्ञानाच्या) घेतले जाते. विज्ञान म्हणजे प्रयोगशाळेत निर्माण होणारे ज्ञान अशा समजुतीतून डोळ्यांसमोर परीक्षानळ्या, बन्सेन बर्नर्स, सूक्ष्मदर्शिका, संवेदनशील वजनकाटे, आलेख इत्यादींचे चित्र उभे राहते. एखादा जीवशास्त्रज्ञ, खगोलतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ अथवा गणितज्ज्ञदेखील ‘शास्त्रज्ञ’ या पदवीला प्राप्त होतो. मात्र एखाद्या राजकीय मुत्सद्याला, कवीला, पत्रकाराला किंवा तत्त्वज्ञाला ‘शास्त्रज्ञ’ ठरवण्याचा प्रयत्न कोणीही करणार नाही.
नव्या पिढीला विज्ञान शिक्षण देणे आवश्यक आहे, यावर भर देताना सर्वांनाच असे म्हणायचे असते की, तरुण विद्यार्थ्यांना किरणोत्सर्ग, ग्रह-तारे किंवा त्यांच्या स्वतःच्या शरीरात घडणाऱ्या क्रिया यांबद्दल अधिकाधिक शिकवावे. विज्ञान शिक्षण याचा अर्थ फार कमी वेळात ‘अधिक नेमकेपणाने विचार करायला शिकवणे’ असा घेतला जातो.
विज्ञानाच्या दोन अर्थांमध्ये (निसर्गविज्ञान व एक पद्धती) होणाऱ्या गोंधळातून मोठाच धोका संभवतो. अधिकाधिक विज्ञान शिक्षणाचा आग्रह धरताना, हे गृहीत धरले जाते की, अशा प्रकारचे शिक्षण घेतलेली व्यक्ती सर्वच विषय अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. एखाद्या शास्त्रज्ञाची राजकीय मते किंवा कलेबद्दलचे विचार ‘सामान्य माणसा’ (layman)पेक्षा श्रेष्ठ आहेत असा समज यातून दृढ होऊ शकतो. वेगळ्या शब्दात सांगायचे तर बुद्धिमान शास्त्रज्ञांकडे जर जगाचे नियंत्रण गेले, तर त्यात आमूलाग्र सुधारणा घडून येतील, असे गृहीत धरले जाते. प्रत्यक्षात शास्त्रज्ञ केवळ निर्सगविज्ञानाच्या विशिष्ट शाखेतील तज्ज्ञ असतो. त्यामुळे विज्ञानाचे महत्त्व मान्य करण्याचा अर्थ असा घेतला जातो की, भौतिकशास्त्र वा रसायनशास्त्र यांतील तज्ज्ञांची राजकीय मते वकील किंवा कवींच्या मतांपेक्षा सत्याच्या जास्त जवळ असतात. आणि खरोखरच जगातील (विशेषतः प्रगत देशातील) लाखो लोक असेच गृहीत धरून चालतात.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
पण शास्त्रज्ञांचा निसर्गविज्ञानाबाहेरील प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टीकोन हा शास्त्रज्ञ नसलेल्यांपेक्षा अधिक वस्तुनिष्ठ असतो, हे कितपत खरे आहे? माझ्या मते असा निष्कर्ष काढण्यास फारसा आधार नाही. परंतु एका साध्या चाचणीतून कुणाही शास्त्रज्ञाचा ‘राष्ट्रवादा'सारख्या संकल्पनांबाबतचा दृष्टीकोन काय आहे, हे जाणून घेतल्यास हे कळून येईल. मिळणाऱ्या उत्तरांवरून दिसून येईल की, ‘विज्ञानाला स्थलकालाच्या मर्यादा नसतात, ते आंतरराष्ट्रीय असते’ हे प्रत्यक्ष व्यवहारात कुणीही मानत नाही. सर्वच देशातील वैज्ञानिक व तंत्रज्ञ त्यांच्या सरकारला डोळे झाकून पाठिंबा द्यायला तयार असतात. याउलट लेखक आणि कवी इतक्या सहजासहजी ‘राष्ट्रवादा’च्या प्रचाराला बळी पडत नाहीत. उदाहरणच घ्यायचे तर दुसऱ्या महायुद्धपूर्व काळातील जर्मनीचे घेता येईल. जर्मन वैज्ञानिक संप्रदायाने हिटलरला कोणताही विरोध केला नाही. दूरगामी दृष्टीने पाहता हिटलरने जर्मन विज्ञानाची अपरिमित हानी केली, पण हे करत असताना हजारो तज्ज्ञ तो आवश्यक समजत असलेल्या कृत्रिम तेल, जेट विमाने, रॉकेट्स आणि अणुबॉम्ब यांबद्दलचे संशोधन करण्यात व्यग्र होते. त्यांच्या सक्रिय सहभागाशिवाय जर्मन युद्धयंत्रणा सज्ज करता आली नसती.
त्याच वेळी जर्मन साहित्याच्या आणि पत्रकारितेच्या प्रांतात काही तरी वेगळे घडत होते. याबद्दलची परिपूर्ण माहिती उपलब्ध नसली तरी हे स्पष्ट दिसते की, ज्या संख्येने ‘शास्त्रज्ञांनी’ (ज्यू वगळता) नाझींच्या धोरणाला कंटाळून देशत्याग केला, त्याच्या कित्येक पटीने जास्त लेखक आणि पत्रकारांचा छळ केला गेला. अधिक धक्कादायक बाब म्हणजे, बरेचसे जर्मन शास्त्रज्ञ नाझींच्या ‘वंशविज्ञान’ नामक भंपकपणावर विेशास ठेवायला तयार होते. त्यांची मते प्रा. ब्रॅडी यांच्या The Spirit Structure of German Fascism या पुस्तकात पाहता येतील.
थोड्याअधिक फरकाने असे चित्र सगळीकडेच दिसते. जर्मनी तर दूरचे उदाहरण झाले. इंग्लंडमधील आघाडीच्या वैज्ञानिकांपैकी बहुतेक जण भांडवलदारी समाजव्यवस्था अपरिहार्य म्हणून स्वीकारताना दिसतात. उगाचच नाही, त्यांना सढळपणे ‘सर’सारखे किताब दिले जात. याउलट, टेनीसननंतर - लेखक म्हणता येईल अशा कुणालाही अशा पदव्या मिळालेल्या नाहीत (फार तर सर मॅक्स बिरबॉम यांचा अपवाद करावा लागेल). आणि जे इंग्रज वैज्ञानिक व्यवस्था स्वीकारत नाहीत, ते बहुधा ‘कम्युनिस्ट’ असतात, म्हणजेच त्यांच्या तज्ज्ञतेच्या प्रांतात ते कितीही बुद्धिप्रामाण्यवादी असले तरी काही निवडक गोष्टींबाबत ते चिकित्सक होणे टाळतात किंवा अप्रामाणिक असू शकतात. याचा अर्थ निसर्गविज्ञानांतील प्रशिक्षण आणि दुर्मीळ बुद्धिमत्ता मानवतावादी आणि साक्षेपी दृष्टीकोनाची हमी ठरू शकत नाहीत. जगातील अनेक राष्ट्रांत अणुबॉम्बवर गुप्तपणे आणि उत्साहाने काम करणारे शास्त्रज्ञ याचा मोठाच पुरावा आहेत. पण म्हणून सामान्य जनतेला विज्ञान शिक्षण द्यायचेच नाही का? अवश्य द्यायचे. पण हे नेहमी ध्यानात ठेवायचे की, विज्ञान शिक्षणाचा अर्थ जर इतिहास आणि साहित्य वगळून जास्तीत जास्त भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र शिकवणे असा घेतला गेला, तर ते शिक्षण कुचकामी ठरेल.
अशा एकांगी शिक्षणाचा परिणाम म्हणून सर्वसाधारण व्यक्ती आपल्या विचारांना अधिकाधिक अरूंद विषयात बंदिस्त करील. एवढेच नव्हे तर ज्याचे आपल्याला ज्ञान नाही, अशा गोष्टींबद्दल मनात तुसडेपणा बाळगील. अशा व्यक्तींच्या राजकीय ज्ञानापेक्षा एखाद्या अशिक्षित शेतकऱ्याची राजकीय वास्तवाची समज अधिक असेल. कारण कदाचित त्या शेतकऱ्याला थोड्या फार प्रमाणात अनुभवलेल्या इतिहासाची आठवण आणि संतुलित सौंदर्यंदृष्टी असू शकेल.
विज्ञानशिक्षणाचा खरा अर्थ ‘विचार करण्याची एक विवेकनिष्ठ, चिकित्सक आणि प्रयोगाधारित पद्धती शिकवणे’ असा घ्यायला हवा. ही पद्धती केवळ वास्तविक तथ्ये (facts) गोळा करण्यापुरती मर्यादित नसून समोर उभ्या ठाकणाऱ्या कोणत्याही प्रश्नाशी भिडताना उपयुक्त ठरेल. विज्ञान शिक्षणावर भर देणारे सर्वच वरकरणी हे मान्य करतील, पण खोलात जाऊन ही संकल्पना स्पष्ट करायला सांगितल्यास शेवटी सगळे ‘विज्ञानशिक्षण म्हणजेच निसर्गविज्ञानांचे शिक्षण’ - म्हणजेच अधिकाधिक तथ्ये गोळा करण्याचे शिक्षण - या समीकरणाकडेच वळतील.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
विज्ञान एक ज्ञानशाखा नसून ती जगाकडे बघण्याची, ते समजून घेण्याची एक पद्धती आहे, हा विचार प्रत्यक्षात स्वीकारणे जड जाते. यामागे ‘व्यावसायिक असूया’ असावी का, असा मला कधीकधी प्रश्न पडतो. विज्ञानाचा एक पद्धती अथवा दृष्टीकोन असा अर्थ घेणे म्हणजे पुरेसा विवेकाधारित विचार करणाऱ्या कुणालाही वैज्ञानिक ज्ञानापर्यंत पोहोचता येईल, असे मानणे. अर्थातच यामुळे रसायनशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ इत्यादी तज्ज्ञांची प्रतिष्ठा कुठेतरी कमी होणार आणि ते इतरांपेक्षा सर्वच बाबतीत जास्त ज्ञानी असतात, हा भोळसट समज लोप पावणार.
शतकभरापूर्वी चार्ल्स किंग्जलीने विज्ञानाला ‘प्रयोगशाळेत घाणेरड्या वासांची निर्मिती’ म्हटले होते. गेल्याच वर्षी एक तरुण रसायनतज्ज्ञ मोठा तीर मारल्याच्या आविर्भावात मला म्हणाला की, ‘काव्याचा माणसाला काय उपयोग आहे’ हेच कळत नाही. म्हणजेच लंबक असा दोन्ही टोकांना जाऊ शकतो. मला या दोन्ही प्रतिक्रिया सारख्याच अज्ञानमूलक वाटतात. आज विज्ञान झपाट्याने पुढे जात असताना सर्वसामान्यांना विज्ञानाचे शिक्षण देण्यावरील भर योग्यच आहे. पण त्याच वेळी शास्त्रज्ञांनाही थोड्या फार (मानव्यविद्याशाखांच्या) ‘शिक्षणा’चा फायदाच होईल, हे कुणीतरी ठासून सांगायला हवे.
समारोप
‘विज्ञान (शास्त्र)’ या शब्दाच्या दोन्ही अर्थांमधला भेद स्पष्ट करणे खूप महत्त्वाचे आहे. जसा सभोवतालच्या सृष्टीचा, निर्जीव व सजीव गोष्टींचा ‘वैज्ञानिक’ दृष्टीकोनातून अभ्यास केला जाऊ शकतो, तसाच इतिहास आणि तत्त्वज्ञान यांचाही केला जाऊ शकतो. इथे ऑर्वेल युरोपातील प्रबोधनकाळात विकसित झालेल्या विवेकनिष्ठता आणि चिकित्सक वृत्ती यांचा वारसा पुढे चालवताना दिसतो. इतिहासाचा अभ्यास केवळ स्फूर्तीदायी घटना जाणून घेण्यासाठी, अस्मिता जागवण्यासाठी किंवा वर्तमानाची भलामण करण्यासाठी केला जाणे पुरेसे नाही. त्याचा चिकित्सक वृत्तीने धांडोळा घ्यायला हवा जेणेकरून वर्तमानातील प्रश्नांकडे अधिक वास्तववादी आणि संवेदनशील दृष्टीकोनातून पाहता येईल.
विज्ञानाचा अर्थ केवळ निसर्ग-विज्ञानांपुरता मर्यादित केल्यास इतर विषयांकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज नाही, असा समज होऊ शकतो. यामुळे मानव्यविद्याशाखांचा विकास तर खुंटेलच, शिवाय निसर्ग-विज्ञानाचे शिक्षण घेणारा सर्वच बाबतीत सरस असल्याचे गृहीत धरले जाईल. अशा व्यक्तीला इतर विषयांच्या ज्ञानाची गरज नाही, अशीही समजूत सार्वत्रिक होऊ शकेल. याचा दूरगामी परिणाम मानवी अस्तित्व अधिकाधिक यांत्रिक आणि उपयुक्ततावादी होण्यात होईल.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
हे टाळायचे असेल तर एकीकडे साहित्य, समाज, अर्थव्यवस्था, राजकारण, इतिहास इत्यादींचा अभ्यास करणाऱ्यांना ‘अधिक नेमकेपणाने, विवेकनिष्ठ आणि चिकित्सक विचार करायला शिकवणे’ आवश्यक आहे; तर दुसरीकडे निसर्गविज्ञानांचा अभ्यास करणाऱ्यांना साहित्य, समाज, अर्थव्यवस्था, राजकारण, इतिहास इत्यादींचे ज्ञान देणे आवश्यक आहे. याबाबतीत टोकाच्या उपयुक्ततावादी भूमिका घेतल्यास विज्ञानाचा वापर विधायक दृष्टीने कसा करायचा, हे कळणेच कठीण होईल. परिणामी विज्ञानाने मानवी समाजासमोर उभी केलेली आव्हाने नीट समजूनदेखील घेता येणार नाहीत.
माणसाला ‘यंत्रे हाताळणारे यंत्र’ व्हायचे नसेल, तर त्याला निसर्गविज्ञानांच्या कक्षेबाहेर असणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना सामोरे जावेच लागेल. अश्मयुगातील संवेदना पुन्हा जागृत करून किंवा काल्पनिक इतिहासात रममाण होऊन हे होणार नाही. त्यासाठी ‘मानवाचा इतिहास’ आणि ‘त्याने निर्माण केलेल्या समाजव्यवस्था’ माणूस म्हणून वैज्ञानिक दृष्टीकोनातून समजून घ्याव्या लागतील. कुणीतरी सांगितले म्हणून किंवा परंपरेत म्हटले आहे म्हणून किंवा शास्त्रीय दृष्टीकोन अपुरा पडतो म्हणून, कोणतीही गोष्ट स्वीकारणे भलत्याच समस्या निर्माण करू शकते. यांतून आपण इतरांच्या हातचे बाहुले बनण्याचीच शक्यता अधिक आहे.
साहित्य-कला किंवा धर्माचा अभ्यास करणाऱ्यांनी विज्ञानाला केवळ उपयुक्ततावादी, दुय्यम दर्जाचे ज्ञान म्हणून हिणवू नये. तर निसर्गविज्ञानांच्या अभ्यासकांनी कला, साहित्य, धर्म, इतिहास इत्यादी समजून घेण्याला निरुपयोगी, अशास्त्रीय किंवा भावनाविवशतेचा आविष्कार समजू नये. मानवी जीवन दोन्ही अंगांनी कसे समृद्ध होईल, हे समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे म्हणजे ‘सुशिक्षित' होणे. यासाठी एकाच वेळी नाण्याच्या दोन्ही बाजू पाहण्याची किमया साध्य करावी लागेल.
जॉर्ज ऑर्वेल : निवडक निबंध आणि लेख
अनुवाद आणि भाष्य - मनोज पाथरकर
मनोविकास प्रकाशन, पुणे
मूल्य - २९९ रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment