२०२५ @ संघशताब्दी : कार्यक्रम सुरू झाले, तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्ष ढिम्मच!
पडघम - देशकारण
जयदेव डोळे
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भोपाळमधील संचालनाचे छायाचित्र विकीपिडियावरून साभार
  • Mon , 21 February 2022
  • पडघम देशकारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ Rashtriya Swayamsevak Sangh आरएसएस RSS भाजप BJP हिंदुत्व Hindutva हिंदू Hindu हिंदू-राष्ट्र Hindu Rashtra काँग्रेस Congress राष्ट्रवादी काँग्रेस NCP

‘तुम्ही कोणत्याही ब्राह्मणाला थोडे खरवडा, आत तुम्हाला एक चड्डीवाला दिसू लागेल’, असा एक छातीठोक दावा अगदी २५-३० वर्षांपूर्वी खूप जण करत. करणारे सारे बहुजन समाज म्हणवून घेणाऱ्या जातींमधले कार्यकर्ते, विचारक, प्रचारक असत. पाहता पाहता २०१४ उजाडले अन ब्राह्मणांची कातडी खरवडायचे सोडा, बहुजनांच्या कातडीवर ब्राह्मणी हिंदुत्वाचे गणवेश दिसू लागले. गळ्यांत भगवे कापड लोंबू लागले, कपाळावरचे गंध ‘मंदिर वहीं बनायएंगे’पासूनच लागले होते. ‘जय श्रीराम’ची घोषणा जोरात द्यायला ही बहुजनांची लोकसंख्या कामी लागली होती. संघाच्या शाखा बहुजनांनी ओसंडून वाहू लागल्या होत्या. ‘भाजपमध्ये कधी एकदा जाऊ अन धन्य होऊ’, असे झालेले कित्येक मर्द मराठे आणि ओबीसी मावळे त्यांच्या राजकीय पक्षांत घुसमटल्यासारखे वागत होते. कसलेही राजकीय तत्त्वज्ञान, निष्ठा आणि त्याग यांचा पत्ता नसलेली ही मंडळी नरेंद्र मोदी-अमित शहा या नवनेत्यांची ‘भक्त’ बनली. त्यांचे जाऊ द्या, त्यांना त्यांचा सवर्ण स्वार्थ पूर्ण करवून घ्यायला एक ब्राह्मणी धर्मनिष्ठ पक्ष हवाच होता. तो त्यांना मिळाला. पण त्यांना आता संभ्रम आणि संशय छळत राहणार. कारण भाजपची सत्तासूत्रे रा.स्व.संघाहाती असतात आणि तिथे तर चर्चा, सूचना, शर्ती यांना प्रवेशबंदी. मग काय होईल?

आता तमाम काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची वैद्यकीय महाविद्यालये चरक नामक वैद्याची शपथ पदवीधर विद्यार्थ्यांना द्यायला सज्ज झाली आहेत. त्यांच्याच विधी महाविद्यालयांत प्राचीन विधिशास्त्र अभ्यासक्रमांत ‘मनुस्मृतीं’चा, उपनिषदांचा व वेदांचा समावेश करायला चढाओढ करत आहेत. आकाशवाणीची अनेक विभागीय व स्थानिक केंद्रे बळजबरीने बंद करून त्या जागी ‘आकाशवाणी महाराष्ट्र’ अशा केंद्राचे कार्यक्रम ऐकवण्याची सक्ती त्यांच्या माहितीत नसते. पण त्यांच्या बातम्यांची सद्दी आता संपली. यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘एक देश, एक अभ्यासक्रम’ या फतव्यानुसार याच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पुढाऱ्यांच्या महाविद्यालयांत राष्ट्रीय शिक्षण सुरू होईल, तेही त्यांच्या गावी नसेल. त्यांची मुले कुठे तिथे शिकतात? संस्कृत भाषा शिकवण्याचा हुकूम केंद्र सरकारने सोडलेला आहेच. २०२५पर्यंत त्याची अमलबजावणी हे सोंगाडे बहुजन नारळ फोडून, सोवळे नेसून, स्तोत्रे म्हणत करतीलच!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

एवढे सारे मान झुकवून स्वीकारत आहात, तर संघाच्या शाखा प्रत्येक महाविद्यालयांत दररोज आयोजित करा, असा हुकूम आणखी दोन-तीन वर्षांत येणारच आहे. तेव्हा काय करतील, हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थाचालक, शिक्षणमहर्षी आणि शिक्षणसम्राट? ‘आम्हाला सहकारसम्राट अन शिक्षणसम्राट म्हणून हिणवू नका’, असे दटावणारे चक्क ज्यांनी ही विशेषणे घडवली त्यांच्याच पुढ्यात नम्रपणे उभे राहणार… कोई शक? हे असेच होणार! त्याला दुजोरा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेच्या पोटात शिरून आणि अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कवेत शिरून एकेकदा दिलेला आहेच.

आणखी काय काय बरे होऊ घातले आहे? १९९३ साली प्रा. सुधीर पानसे यांनी ‘असे असेल हिंदू-राष्ट्र’ या नावाची एक चित्रमय पुस्तिका लिहिली होती. लोकवाङमय गृह प्रकाशनाने ३० पृष्ठांची ही पुस्तिका छापली असली तरी प्रकाशक व मुद्रक रमेश पाध्ये यांनी ती ‘विज्ञाननिष्ठ भारत प्रकाशन’ या नावाने प्रकाशित केली होती. ७ व ८ एप्रिल १९८४ रोजी दिल्लीच्या विज्ञानभवनात धर्म-संसदेचे जे अधिवेशन पार पडले, त्यात ‘समस्त हिंदूंसाठी आचारसंहिता’ प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यातली काही सूत्रे १९९३पर्यंत अमलात येत असल्याचे पाहून प्रा. पानसे यांनी इशारेवजा हे लिखाण केले होते.

आता या पुस्तिकेला ३० वर्षे होत आली. तेव्हा खूप काही अमलात आणण्याचे कार्य गेल्या सात वर्षांपासून जोमाने आरंभले आहे, ते आपण पाहतोय. या पुस्तिकेचे तातडीने पुनर्मुद्रण करून तमाम राजकीय कार्यकर्ते, प्रचारक, विचारक यांना ती वाटली पाहिजे. खासकरून शिवसेना, सर्व काँग्रेस, सपा, बसपा, साम्यावदी, सारी जनता दले इत्यादी पक्ष कार्यकर्त्यांना (प्रा. पानसे यांचे काही मुद्दे या लेखासाठी वापरले आहेत.).

रा.स्व.संघ जन्मला १९२५ साली. त्याची शताब्दी २०२५ साली होणार. मात्र तोवर हिंदू-राष्ट्र स्थापित झालेच पाहिजे, अशा वेगाने संघ व त्याचा रोज नव्या नावांनी जन्मणारा परिवार कार्यरत झालेले आहेत. कर्नाटकाचे एक मंत्री ईश्वराप्पा यांनी तर तिरंग्याजागी भगवा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून लवकरच फडकेल, अशीही जाहीर भविष्यवाणी केली आहे. धर्म-संसद नावाने अधिवेशन घेणाऱ्यांनी मुसलमानांच्या कत्तलींची कल्पना मांडली. भाजपचे राज्यसभा सदस्य अल्फोन्स यांनी अदानी व अंबानी यांना पूज्य ठरवले. का, तर ते असंख्य भारतीयांना रोजगार देतात म्हणून! कंगना राणावत या नटीने २०१४ साली भारत स्वतंत्र झाल्याची घोषणा केली आणि ‘घोर’ मराठी नट विक्रम गोखले यांनी तिला दुजोरासुद्धा दिला.

‘भारताची राज्यघटना बदला’, अशा हिंदुत्ववादी आरोळ्या तर थेट १९५०पासून दिल्या जात आहेत. वाजपेयी पंतप्रधान असताना ‘घटना पुनराविलोकन समिती’ स्थापन करून तिचे कामकाज सुरूही झाले होते. तेव्हा खूप आरडाओरड झाल्याने ते काम वाजपेयींनी गुंडाळले. आताचा मोदींचा आणि संघाचा कावा असा असतो की, घटनेकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपल्याला हवे तेच करत जायचे! तरीही घटना बदलणयाची मनोकामना ते कधी ना कधी पूर्ण करतीलच. कारण हिंदू-राष्ट्र निर्मितीआड तीच मोठी अडसर आहे.

‘राज्यसभा टीव्ही’ व ‘लोकसभा टीव्ही ’अशा दोन स्वतंत्र वाहिन्या होत्या. दूरदर्शनची म्हणजे सरकारची मालकी त्यावर असली तरी अधिकार लोकसभा व राज्यसभा सभापती-अध्यक्ष यांचा असे. गेल्या वर्षी या दोन्हींचे विलीनीकरण करून एकच ‘संसद टीव्ही’ अशी वाहिनी तयार करण्यात आली. एक असणे, एक होणे, एक करणे, एक मानणे असा एकावरचा भरोसा आणि भिस्त हिंदुत्ववाद्यांचे जुनेच वैशिष्ट्य. एकाचा अर्थ असा की, दुसरा कुणी नसावा! एक तो एक असावा. तो एक म्हणजे हिंदूच होय. दुसरा म्हणजे मुसलमान, ख्रिश्चन, शीख आदी. फक्त एकाचाच गवगवा (एकीचा नव्हे) हा काही लोकशाही व्यवस्थेला रुचत नाही. लोकशाही म्हणजे एकशाही नसते. पण संघपरिवार सारे काही एकवटायला निघालेली एक न-नैतिक वृत्ती असल्याने तिला एकाच्या पुढचे आकडेच मान्य नाहीत.

देशाची फाळणी धर्मावर आधारित करण्याचा कार्यक्रम बॅरिस्टर सावरकर व बॅरिस्टर जिन्हा या दोघांनी अमलात आणला. पाकिस्तान वेगळे झाले. तरीही कोट्यवधी मुस्लीम भारतात राहिले. त्यांना दुय्यम दर्जा देण्याचे राजकारण हिंदुत्ववादी करत असतात. बहुसंख्याक-अल्पसंख्याक अशी विभागणीही संघाकडून केली जात नाही. सतत आम्ही एक, आमची एक, सर्व मिळून एक असा लटका प्रयत्न भेद मिटवायला केला जातो. एक असणे व ऐक्य असणे यातला फरक सर्व पक्षांनी समजावून सांगायला हवा.

१९८४च्या धर्मसंसेदत धर्मांतर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. आणि तो आता ऐरणीवर आणला जात आहे. ‘घरवापसी’च्या नावाने हिंदू धर्मात सामील करायचा खटाटोप अनेक ठिकाणी आरंभला आहे. धर्मांतर करतात असा संशय घेऊन चर्च व अन्य ठिकाणे उदध्वस्त केली जात आहेत. पुरावे, दाखले, साक्षीदार सादर न करता संशय उत्पन्न करत, हे हल्ले घडवले जातात. त्यावर भाजपेतर पक्ष काही बोलत नाहीत.

मठ-मंदिरांची व्यवस्था सरकारी नियंत्रणापासून मुक्त राजकीय प्रभावापासून लांब ठेवायचा इरादा या धर्मसंसदेला होता. त्याची वाच्यता कुणी अज्ञात, अप्रसिद्ध व्यक्ती करत राहतात. पण काही दिवसांनी भाजपच्या जाहीरनाम्यात यावी, असा आग्रह धरण्याचे नाटक पार पाडले जाईल. त्यासाठी काही धार्मिक व्यक्ती वापरल्या जातील. आणि ती मागणी २०२५पर्यंत पूर्ण केली जाण्याची आश्वासने देऊन निवडणुका जिंकल्या जातील.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

‘सेक्युलर’ या शब्दाचा संपूर्ण नायनाट करण्याचा हा एक डाव असणार. एकदा का मंदिरे व तीर्थस्थाने शासनमुक्त झाली की, प्रवेश, दर्शन, परंपरा यांबाबत नियम बदलून चातुर्वर्ण्याचा व्यवहार पुन्हा आणला जाईल. फक्त तो अघोषित असेल. धर्मसंसदेने मंदिरे, मठ आदींच्या व्यवस्थेसाठी प्रशिक्षित व्यवस्थापक व पुरोहित असावेत, असे सुचवले होते. या आधीची व ही सूचना यांची वाच्यता आणि अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत. रोजगार निर्मितीसाठी या प्रशिक्षणाचा शिरकाव थेट विद्यापीठीय अभ्यासक्रमांत करण्याचे धाडस येत्या काळात अपेक्षित आहे. धर्मच्युत झाल्यानेच समाजावर अनेक संकटे कोसळत आहेत, असा जाहीर आरोप संघपरिवारातला एखादा ज्येष्ठ करणारच नाही असे नाही. प्राचीन न्यायशास्त्राच्या आडून वेद, स्मृती, उपनिषदे यांचा उपयोग मंदिर व्यवस्थापन, प्रथापालन यांसाठी मोठी फौज उभी केली जाऊ शकते.

योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री करून संघाने शासक-धर्मगुरू यांचा मिलाफ घडवून आणला आणि त्यांच्याभोवती अनेक मिथके रचली. धर्मसत्तेवर आल्यास व राहिल्यास कसा समाज निर्धोक राहतो, शांततेत जगतो, हे ठसवण्यासाठी सदोदित संघपरिवार दोन गोष्टी करतो आहे. मुसलमान व ख्रिश्चन हे मुळातच उपद्रवी आणि नकोसे असतात, हे सांगत राहायचे. दुसरे, समाजवाद ही तत्त्वप्रणाली कशी धर्मद्रोही, नास्तिक, प्रथाभंजक आहे, हे समाजवादी पक्षाची सतत निंदा करत सुचवत राहायचे.

धर्माचरण करणारा पक्ष भ्रष्टाचारी नसतो आणि तो कायम पुण्यकर्म करत राहतो, असा प्रचार करून भाजप स्वत:ला लोकांपुढे आणतो. प्रत्यक्षात भ्रष्टाचार आणि प्रशासनिक दिरंगाई यांची प्रसिद्धी न व्हावी, यासाठी पत्रकार आणि माध्यमांचे मालक यांचा अतोनात छळ केला जातो. खोटेनाटे गुन्हे दाखल करून त्यांना बेजार केले जाते. आठ-दहा जण जिवे मारले गेले आहेत. मोदी व योगी यांच्यात राजकीय स्पर्धा असल्याचे भासवले जाते. खरे तर एकाचे भगवे वस्त्र अंगावर असते, दुसऱ्याचे अदृश्य!

देशात धर्मसत्ता आणायची प्रचंड धडपड उत्तर प्रदेशमधूनच यशस्वी होऊ शकते. त्यासाठी राम, महादेव, कृष्ण यांची त्या राज्यातली पूजास्थळे राजकीय मंच म्हणून वापरली जात आहेत. धर्म व राजकारण यांच्या ऐक्यामधूनच भाजपला सत्ता मिळते, हे उमगल्याने त्याचा तसा प्रयत्न तो अन्य राजकीय पक्षांनी करावा, यासाठी वातावरण तयार करतो.

हळूहळू सारे महत्त्वाचे पक्ष देवधर्म, प्रथा-परंपरा आणि कर्मकांडे यांच्या नादी लागली की, संघपरिवाराला भाजपचा उपयोग होईनासा झाला, तरी त्याचे काही बिघडणार नाही. अन्य कोणत्याही पक्षाला पाठबळ देऊन तो आपली सत्ता टिकवून ठेवेल. म्हणून धर्म, कर्मकांडे, देवदेव करत राहणारे तमाम राजकीय पक्ष संघपरिवासाठी मित्रासारखेच आहेत.

२०२५पर्यंत एमआयएमसारख्या पक्षाला त्याच्या धर्माचा सदासर्वदा उच्चार करत राहावा लागेल, अशा भूमिका घ्यायला लावले की, बस्स! आपापत:च हिंदू धर्माचे सारे अनुयायी धर्मकारण व राजकारण यांची सांगड घालायला तयार होतील, असाही कयास सध्याच्या घडामोडींवरून बांधता येतो. हिजाब, नमाज, मदरसे आदी मुद्दे जाणीवपूर्वक धगधगत ठेवले जात आहेत. एकदा का धर्म अग्रभागी आला की, धर्म ज्यांच्या हातात असतो, तो ब्राह्मण आपोआपच अग्रस्थानी येतो. लोकांनीच आम्हाला सत्ता दिली, असे सांगत त्यांना त्यांचे हरपलेले सत्ताकारण पुन:प्रस्थापित करता येईल. एवढा साधा हा मुद्दा आहे. पटतोय का?

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष चळवळे पक्ष नाहीत. सतत संघर्ष, आंदोलने त्यांचा स्वभाव नाही. वर्गलक्ष्यावर त्यांचा विश्वास नाही आणि दलितांच्या पक्षाची सत्ता यावी, असे त्यांना वाटत नाही. जातीव्यवस्थेवर थेट घाव घालून ती खिळखिळी करणे त्यांना रुचत नाही. त्यांचे हितसंबंध जातीव्यवस्थेत आहेत म्हणून. धर्माचा तिरस्कार वा अव्हेर ते कधी करणार नाहीत. त्यामुळे त्यांच्यात व भाजपमध्ये फरक कुठे आहे, ते त्यांनाही सांगता येणार नाही. उदारमतवाद, सहिष्णुता, सलोखा आणि सहजीवन असा राजकीय मार्ग त्यांनी स्वीकारलेला असतो. पण हे पक्ष बलाढ्य अशा मराठा जातीचे वर्चस्व टिकवण्याची धडपड करत असतात.

बहुमताचे आणि बहुसंख्येचे राजकारण लोकशाहीत अध्याहृत असते, त्याप्रमाणे मराठ्यांचे प्रभुत्व आपोआप मान्य करावे लागते. परंतु मक्तेदारी, दडपशाही आणि प्रतिवादाबद्दल असहिष्णुता हा त्यांचा गुणविशेष भाजपच्या हिंदू वर्चस्वाशी मिळतोजुळतो. ‘हिंदू’ हे नाव घेऊन कोणत्याही पक्षाला बलाढ्य जातीची पकड घट्ट करता येतेच. हिंदूंची जातीसंस्था टिकवण्याचे संस्थात्मक राजकारण भाजपला करायचे असल्याने लोकशाहीमधले संस्थात्मक राजकारण तो उदध्वस्त करत निघाला आहे.

तद्वत शिक्षण-सहकार-बँका-शेती या क्षेत्रांमधल्या संस्थांचे राजकारण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष करतात. संस्था रक्षणासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी तिन्ही पक्ष कशी दाखवतात, हे गेल्या तीन वर्षांत जगाने बघितले आहे. अनैतिकता धर्म-जात या सांस्कृतिक गोष्टींत खपून जाते, असा अनुभव गेल्या सात वर्षांत भारताने फार बघितली. त्यामुळे आधुनिक, पुरोगामी, लोकशाही राज्यव्यवस्थेतल्या नैतिक परंपरा इतक्या दुर्बल झाल्या आहेत की, त्या जाणीवपूर्वक सत्तासीन कराव्याच लागतील. अन्यथा एकेकाळी धर्माच्या सत्तेखाली जसे शूद्र, स्त्रिया, आदिवासी, बंडखोर आदी भरडले गेले, ते तसेच्या तसे पुन्हा घडेल.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव भाजपच्या विरोधात नव्या पक्षाची उभारणी व्हावी, असे म्हणाले आहेत. राज्यांचे अस्तित्व बिनधोक असावे, यासाठी नव्या राज्यघटनेचीही मागणी ते करत आहेत. ते मूळचे काँग्रेसी आहेत. जात, धर्म, परंपरा यांचे तेही वाहक आहेत. मात्र त्यांनी आपले हिंदुत्व भाजपच्या हिंदुत्वाहून फार भिन्न असल्याचे त्यांचे म्हणणे दिसते.

आणखी एक बाब काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष आणि मराठी भाषक यांनी फारच सहजतेने घेतलेली दिसते. किरीट सोमैय्या यांना भाजपने उमेदवारी न देता घरी बसवलेले होते. परंतु अचानक सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणापासून त्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. परवापर्यंत म्हणजे शिवसैनिकांच्या पाठलागामुळे ते पायरीवर पडेपर्यंत त्यांचा म्हणजे सोमैय्यांचा दबदबा प्रसारमाध्यमांत खूप वाढला. एक गुजराती कार्यकर्ता सतत काही ना काही ‘भानगड’ काढतो, आणि त्याला भरपूर प्रसिद्धी मिळत जावी, हे प्रकरण काय? ‘गुजराती विरुद्ध मराठी’ असे स्वरूप का दिले जात आहे? अन्य मराठी नेत्यांवर भाजपचा विश्वास नाही का? मुंबई महानगर पालिकेची निवडणूक एवढेच उद्दिष्ट त्यामागे आहे का?

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन कुठवर आली, असा प्रश्न विचारण्याऐवजी, ती मुळात कोणत्या गरजेमधून घोषित करण्यात आली, या प्रश्नाचा उलगडा काही होताना दिसत नाही. मुंबई आणि अहमदाबाद यांच्या दळणवळणात प्रचंड वाढ झाली म्हणून बुलेट ट्रेन आणावी लागते आहे, हे काही पटण्यासारखे नाही. तेव्हा ही बुलेट ट्रेन, सोमैय्यांच्या निमित्ताने मराठी नेत्यांना अडचणीत आणणे, हा जसा एक भाग झाला, तसा खुद्द पंतप्रधानांनी महाराष्ट्राने करोना पसरवल्याचा आरोप करणे, यात काय संगती आहे, सांगता येत नाही.

मुंबई महाराष्ट्राला मिळाल्याचे दु:ख १९६०पासून असंख्य गुजराती सोसत आहेत. मोदी व शहा यांच्या तावडीत गेलेला भाजप त्या दु:खावर इलाज शोधतो आहे काय? मुंबई केंद्रशासित करायची त्याची योजना आहे काय? मुंबई स्वतंत्र करायला काँग्रेसमधलेच अनेक नेते सरसावले होते. आम्हीच ती करून दाखवली, अशी घमेंड मोदी-शहा मारत आहेत काय? संयुक्त महाराष्ट्र चळवळीत संघ उतरला नव्हता. भाषावार प्रांतरचना त्याला मान्य नव्हती आणि केंद्रवर्ती राजकारण व सत्ता त्याला अभिप्रेत असते. त्यामुळे तोही मुंबई-महाराष्ट्र या संबंधांशी स्वत:ला जोडणार नाही.

मराठी माणूस व महाराष्ट्र यांच्या हिताचे राजकारण शिवसेना करते. पण आता तिलाही संभाव्य हिंदू-राष्ट्राचे राजकारण समजावून घेऊन काही आखणी करावी लागेल. भ्रष्टाचार, धाडी, धरपकड, दहशत, फोडाफोडी यांचा गदारोळ उडवून देऊन हळूच भाजप व संघपरिवार या तीन पक्षांची फजिती करू नये, म्हणजे मिळवली. या तिघांमुळे हिंदू-राष्ट्र आकारास आले तर संघ आनंदीच होईल. कारण संघ महाराष्ट्रातच जन्मला. गांधीजींचा खुनी मराठी आणि हिंदू-राष्ट्राचा संकल्प करणारेही मराठीच. म्हणून सावध होणे आवश्यक.       

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......