१.
तुम्ही युवक आहात याचं प्रमुख लक्षणं म्हणजे साप्ताहिक ‘मनोहर’चं वाचन, असं असण्याचा तो सत्तरीच्या दशकातला काळ होता. आताच्या भाषेत सांगायचं तर साप्ताहिक ‘मनोहर’ व्हायरल झालेलं होतं. ‘मनोहर’च्या अशाच एका अंकात मुंबईचे स्मार्ट महापौर सुधीर जोशी यांचं ‘इम्पाला’ या कारसोबतचं छायाचित्र पाहण्यात आलं. हिंदी चित्रपटांमुळे तेव्हा इम्पाला कार बाळगणं हे सर्वांत श्रीमंतीचं लक्षणं आहे, अशी माझ्या पिढीची धारणा झालेली होती. राजकीय नेता धोतर-सदरा किंवा फार तर पायजामा-कुर्ता अशा आणि तेही खादीच्या अवतारात बघायची सवय लागलेली असल्यानं जोशी यांचं ते टापटिप दिसणं एकदम मनात भरलं.
पूर्ण बाह्याचा शर्ट पॅंटमध्ये नीट इन केलेला, पायात बूट, डोईवरची उडणारी झुलपं, चष्म्याची ऐटबाज फ्रेम, त्या चष्म्याआडचे शांत डोळे, असं ते छायाचित्र अजूनही आठवतं. तेव्हा मी नुकताच पत्रकारितेत आलो होतो. ‘मनोहर’मधला जोशी यांच्यावरचा लेख कुणी लिहिला होता, ते आठवतं नाही, पण ते छायाचित्र पाहून आणि तो लेख वाचून त्यांना भेटण्याची जाम उत्सुकता निर्माण झाली. मग एका मुंबई भेटीत मुंबईच्या महापौरांच्या कार्यालयात जाऊन धडकलो. पत्रकार सांगून प्रवेश मिळवण्याइतके, पत्रकारितेची विश्वासार्हता मोठे असण्याचे ते दिवस होते. माझं ते धडकनं आणि मराठवाडी हेलातलं बोलणं सुधीर जोशींनी शांतपणे सहन केलं.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
जोशी यांच्याशी झालेली ती पहिली भेट माझ्या पक्की स्मरणात राहिली, पण पुढे काही वर्षांनी आमच्यातील घसट वाढल्यावर त्या भेटीचं स्मरण करून दिलं, तेव्हा जोशींना काहीच आठवेना. मी तपशिलात शिरलो, तेव्हा ‘हो हो, आठवलं’, असं म्हणत जोशींनी सात्वंन केल्याच्या शैलीत मला दिलासा दिला. हे जोशी यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्यं होतं. इच्छा असूनही त्यांनी कधी समोरच्या माणसाला दुखावलं आहे, असा अनुभव किमान मला तरी आला नाही. सौम्य आणि मनात कोणतेही लेचेपेचेपण नसणं, शिवाय शिवसेनाप्रमुखांची खास मर्जी असलेले नेते जोशी होते. तेव्हा शिवसेनेचे सर्वेसर्वा अर्थातच बाळासाहेब ठाकरे होते आणि सुधीर जोशी, मनोहर जोशी, वामनराव महाडिक, प्रभृती सातच ‘नेते’ आणि बाकी सर्व शिवसैनिक होते. शिवसेनेत हेच सात नेते आहेत, अशी अधिकृत घोषणा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वाक्षरीनं तेव्हा झालेली होती. छगन भुजबळ यांचा तेव्हा नेता म्हणून उदय व्हायचा होता आणि नारायण राणे वगैरे तर कोसो दूर होते.
२.
विधानपरिषद सदस्य झाल्यावर जोशींच्या नागपूर चकरा वाढल्या. नंतर त्यांच्या सोबतच्या शिवसेना आमदारांचीही संख्या वाढली. त्यात मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, छगन भुजबळ अशी भर पडत गेली. हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपूर बाहेरच्या मित्र आमदारांना एकदा तरी ‘रात्र भोज’साठी आमंत्रित करण्याची माझी सवय होती, कारण मुंबईला गेलो की, ही मंडळी फार ममत्वानं खाऊ पिऊ-घालत असत; त्यांची ‘सुदामी’ परतफेड करण्याचा माझा प्रयत्न म्हणजे हे ‘रात्र भोज’ असे. त्याला सुधीर जोशी आणि मनोहर जोशी आवर्जून प्रतिसाद देत. आमची गप्पांची मैफल रंगलेली असताना हातात सरबताचा ग्लास घेऊन सुधीरभाऊ माझ्या बेगम मंगलाशी गप्पा मारत असत. तिला विविध स्वादाच्या सुगंधी सुपारी खाण्याचा नाद होता. मुंबईहून येताना दादरच्या कोणत्या तरी दुकानातून सुधीरभाऊ वेगवेगळ्या स्वादाची सुपारी तिच्यासाठी आणत असत. जेवण संपल्यावर रात्री उशिरा अनेकदा सुधीर जोशी, प्रमोद नवलकर आणि मनोहर जोशी ऑटो रिक्षाने आमदार निवासात परतल्याचं पक्कं आठवतं. त्या ऑटोरिक्षात बसताना उंच, धिप्पाड सुधीरभाऊंना बरीच कसरत करावी लागत असे. पण त्याबद्दल त्यांनी कधीही कुरकुर केली नाही.
बाळासाहेब ठाकरे यांच्या खास मर्जीत असूनही जोशी यांना सत्तेच्या सर्वोच्च पदानं नेहमीच हुलकावणी दिली. खरं तर ते शिवसेनेचे मुंबईचे पहिले महापौर व्हायचे, पणती संधी मनोहरपंत जोशी यांनी बळकावली. महाराष्ट्राचे युतीचे पहिले मुख्यमंत्री व्हायचे, पण तीही संधी मनोहरपंत जोशी यांनीच हिसकावली, म्हणजे अक्षरक्ष: हिसकावलीच! मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदानंही त्यांना अशीच हुलकावणी दिली, असंही काहीसं अंधुकपणे आठवतं.
१९९५ साली शिवसेना-भाजप युतीचं सरकार सत्तारूढ होणार होतं, तेव्हा मुख्यमंत्री म्हणून सुधीर जोशी यांच्या नावालाच पहिली पसंती होती. तशी अधिकृत घोषणा झाली नव्हती, पण तसे स्पष्ट संकेत पत्रकारांना मिळालेले होते आणि शिवसेनाभवनाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी सुधीर जोशी यांच्या जय जयकारच्या दिलेल्या घोषणांनी तो परिसर दणाणून गेलेला होता. त्याआधारे बहुतेक सर्व वृत्तपत्रांच्या डाक आवृत्तीच्या अंकात ‘सुधीर जोशी युतीचे मुख्यमंत्री’ अशा हेडलाइन्स होत्या. मात्र रात्रीतून चित्र बदललं, मनोहर जशी मुख्यमंत्री झाले.
मुख्यमंत्रीपदाची माळ मनोहरपंतांच्या गळ्यात कशी पडली, ती कथा रोचक आहे. हे चित्र बदलवणाऱ्या महाराष्ट्राच्या ‘त्या’ नेत्याला एकदा मी आणि धनंजय गोडबोलेनं ‘सुधीर जोशी हे चांगले मुख्यमंत्री ठरले असते नं?’ असा प्रश्न विचारला, तेव्हा ते ‘जाणते’ नेते म्हणाले होते- ‘सुधीर जोशी फारच स्वच्छ आणि सज्जन आहेत.’ त्या एका वाक्यानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निकषाबद्दल माझे डोळे खाडकन उघडले, हे आणि मग असं प्रश्न मी कधीच कुणालाच विचारला नाही.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
मनोहरपंत जोशी मुख्यमंत्री झाले, पण त्यांच्यावर न्यायालयातील एका खटल्याची तलवार टांगती होती. त्यांच्या जावयाच्या एका भूखंडाशी संबंधित तो खटला होता आणि त्याचा निकाल मनोहरपंतांच्या बाजूनं लागणार नाही, असा सर्वांचाच तेव्हा होरा होता. पक्कं आठवतं, निकालाचा दिवस होता, तेव्हा विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू होतं. खटल्याचा निकाल जर मनोहरपंतांच्या विरोधात गेला, तर मुख्यमंत्रीपदाची शपथ सुधीर जोशी घेतील, असं वातावरण होतं. मनोहरपंतांनी राजीनामा दिला की, राज्यपाल मुंबईहून तातडीनं नागपूरला येतील आणि सुधीर जोशी यांचा शपथविधी होईल, असं वातावरण होतं. त्या दृष्टीकोनातून नागपूरच्या राजभवनात तयारीला सुरुवातही झाली होती. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असल्यामुळे नागपुरातच शपथविधी होणं सोयीचं होतं.
न्यायालयाच्या निकालाच्या आदल्या दिवशी रात्री सुधीर जोशी मुंबईहून नागपूरला डेरेदाखल झाले, तेव्हा त्यांना प्रशासकीय यंत्रणेकडूनही ‘भावी मुख्यमंत्री’ अशीच ट्रिटमेंट मिळालेली होती. सुधीर जोशीही सराव जामानिमा करूनच नागपुरात डेरेदाखल झालेले होते, पण का कोण जाणे निकाल मनोहर जोशी यांच्या बाजूनेच लागणार, असं त्याना वाटत होतं आणि दुसऱ्या दिवशी घडलंही तसंच. सुधीर जोशी पुन्हा एकदा आणि नंतर कायमच मुख्यमंत्रीपदापासून वंचित राहिले...
३.
त्या काळात सुधीर जोशींचे नागपुरातले खास मित्र मी आणि धनंजय गोडबोले होतो. तेव्हा ते महसूल मंत्री होते आणि अनेकदा मंत्रीपदाचा शिष्टाचार बाजूला ठेवून, बंदोबस्ताला फाटा देऊन माझ्या मारुती व्हॅनमध्ये सुधीर जोशी, धनंजय गोडबोले आणि मी असे आम्ही तिघे जण रात्री उशिरापर्यंत भटकत असू. पत्रकार सहनिवासच्या आमच्या सदनिकेत अनेकदा जोशी येत असत आणि बेगम मंगलाने बनवलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत. जोशी पूर्ण शाकाहारी होते; ते मंतरलेल्या सोनेरी पाण्याला स्पर्शही करत नसत. बेगमच्या हातचं थालीपीठ तर त्यांना विशेष आवडत असे. आमच्या घरी जर बसत नसू तर नागपूरच्या वर्धा रोडवर खापरीनंतर थोड्या अंतरावर असलेल्या धनंजय देवधरच्या ‘तंदूर’ हॉटेलमध्ये हिरवळीवर एका कोपऱ्यात रात्री उशिरापर्यंत आम्ही गप्पा मारत असू. त्या वेळी धनंजय देवधर अनेक शाकाहारी पदार्थांचा अक्षरश: मारा करत असे. प्रत्येक पदार्थ जोशी आवर्जून चाखून बघतच असत.
सुधीर जोशी यांच्या आमच्या घरच्या एका भेटीत गंमतच झाली. आम्हा तिघांशिवाय सुधीर जोशी यांचे मुंबईहून आलेले एक मित्रही सोबत होते. रात्री एकच्या सुमारास लिफ्टमधून आम्ही खाली उतरलो, तर तळमजल्यावर थांबण्याऐवजी लिफ्ट चार-पाच फूट खोल जाऊन लँड झाली. तेव्हा काही सेलफोन नव्हते आणि एवढ्या रात्री आरडा-ओरडा करूनही उपयोग नव्हता. शिवाय पत्रकारांची वसाहत असल्यामुळे ‘लिफ्टमध्ये महसूल मंत्री अडकले’, ही चौकटीतली बातमी पत्रकारांच्या हाती आयतीच होती. पाच-सात मिनिटं उलटली तरी आम्ही बाहेर आलेलो नाही, हे टेरेसवरून आमच्यावर लक्ष ठेवणाऱ्या बेगम मंगलाच्या लक्षात आलं. सहाव्या मजल्यावरून लिफ्टच्या जाळीच्या दरवाज्यातून तिनं ओरडून चौकशी केली, तेव्हा काय झालं ते मी तिला सांगितलं. तेवढ्या रात्री तिनं टेरेसवर जाऊन जाऊन नारायण ठाकरे या आमच्या सोसायटीच्या सहायकाला झोपेतून उठवून बोलावून आणलं. त्यानं तळमजल्यावर धाव घेत, लिफ्टचा दरवाजा उघडला. खाली एक स्टूल सोडला आणि आम्ही सर्व एक-एक करत बाहेर पडलो. पुढे अनेक महिने लिफ्टमधून सुटका हा आमच्यासाठी चर्चेचा विषय होता.
सुधीर जोशींच्या साधेपणाच्या अनेक आठवणी आहेत. मुंबई असो का नागपूर ते दौऱ्यावर असलेल्या ठिकाणी, भेट झाली तर रात्री खादाडी करत फिरणे, हा आमचा उद्योग असायचा. गप्पा, कविता, विनोद, हकिकती, आठवणींनी आमची मैफल कायमच बहरलेली असे. कोणत्याही हॉटेलमध्ये गेलं तरीही बिल देतांना सर्वांत प्रथम सुधीरभाऊंचा हात खिशाकडे जात असे. खरं सांगायचं तर, त्यांच्यासोबत असतांना आम्हाला कधी कोणत्याही हॉटेलमध्ये बिल अदा करण्याचा प्रसंगच आला नाही.
एक आठवण. महसूलमंत्री म्हणून सुधीर जोशी यांना राहायला ‘राईल स्टोन’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा बंगला मिळाला होता. त्यांचा वावर मालकासारखा तोऱ्यातला नसे. एकदा संध्याकाळी ‘राईल स्टोन’च्या व्हरांड्यात बसून गप्पा मारत असताना काहीतरी खाण्याचा विषय निघाला. त्या गप्पात ‘पिझ्झा’चा उल्लेख आला. तोवर मी पिझ्झा खाल्लेला नव्हता. तसं बोलण्यात आल्यावर सहायकाला बोलावून चीज पिझ्झा घेऊन येण्याचं सुधीरभाऊंनी सांगतांनाच त्याच्या हातावर पैसेही ठेवले. शासकीय निवासस्थानी आपल्या खाण्यापिण्यासाठी त्या काळात खिशातले पैसे काढून देणारे दोनच मंत्री पाहिले- एक, नितीन गडकरी आणि दुसरे, सुधीर जोशी.
४.
सुधीर जोशींचा स्वभाव हजरजबाबी. ते बोचरंही बोलत, पण अतिशय सौम्य आवाजात. युतीचं सरकार सत्तारूढ झालं, त्या वर्षीच्या एका दिवाळी अंकात मुख्यमंत्री असलेल्या मनोहरपंत जोशींविषयी सुधीर जोशी यांची एक मुलाखत प्रकाशित झाली. त्यात त्यांना विचारलेला एक प्रश्न होता ‘मनोहर जोशी यांचं शक्तीस्थळ काय?’
त्यावर त्यांचं उत्तर होतं- ‘त्यांना लक्ष्याचा एकच डोळा दिसतो.’
पुढचा प्रश्न होता- ‘मनोहर जोशींचा वीक पाँइंट काय?’
त्यावर उत्तर होतं- ‘त्यांना लक्ष्याचा एकच डोळा दिसतो !’
ही प्रश्नोत्तरं सुधीर जोशी अतिशय रंगवून सांगत, पण त्यात ‘मामा’ असलेल्या मनोहर जोशी यांनी आपल्याला सत्तेचं सर्वोच्च पद पहिल्या संधीत कधीच मिळू दिलं नाही, याचा विषाद नसे. ते गमतीत म्हणत, ‘मामानं भाच्यालाच ‘मामा’ बनवलंय’, आणि गप्पांचा विषय बदलत.
शिवसेनेत मनोहर जोशी आणि सुधीर जोशी ही मामा-भाच्याची जोडी प्रसिद्ध होती. पुढे ती महाराष्ट्राच्या राजकारणातही प्रसिद्ध पावली. मित्रवर्तुळ आणि पत्रकारितेत मनोहर जोशींना ‘पंत’, तर सुधीर जोशींना ‘भाऊ’ म्हटले जाई. शिवसैनिक पंतांचा उल्लेख ‘सर’ असा करत, तर सुधीर जोशी मात्र ‘सुधीरभाऊ’ म्हणून शिवसैनिकांतही लोकप्रिय होते.
माफक तरी हजरजबाबी बोलणं, शिवसैनिकांची वैयक्तिक खबरबात ठेवून काळजी घेणं, ही सुधीरभाऊंची खासीयत होती. मात्र शिवसेनेच्या ‘तोडपाणी’ राजकारणात ते कधीच पडले नाही. खरं तर, त्यांचा स्वभाव इतका स्वच्छ आणि वृत्ती सच्छील होती की, चेहऱ्यावर घोंघावणाऱ्या माशीला तरी त्यांनी हाकलून लावलं असेल की नाही, याची शंकाच आहे.
५.
नगरसेवक, महापौर, विधान परिषद सदस्य आणि मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीनं हुलकावणी दिल्यावर सुधीर जोशी कॅबिनेट मंत्रीही झाले. राज्य मंत्रीमंडळात दुसऱ्या क्रमांकाचं समजलं जाणारं महसूल खातं त्यांच्याकडे स्वभाविकपणे आलं. त्या वेळची एक आठवण सांगण्यासारखी आहे. महसूल यंत्रणेतील राज्यभरातील अधिकाऱ्यांची पहिली बैठक सुधीरभाऊंनी आयोजित केली. जवळजवळ साडेचार-पाच तास चाललेल्या या बैठकीत अधिकारी महसूल खात्याचे प्रश्न, जनतेच्या हिताच्या असलेल्या योजना, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडत होते. इतका प्रदीर्घ काळ बैठक चालली तरी सुधीर जोशी न कंटाळता अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत होते. आपल्या खात्याचा कॅबिनेटमंत्री आपलं म्हणणं इतक्या शांतपणे आणि इतका वेळ ऐकून घेतो, हा अनुभव महसूल खात्याला प्रथमच आला. ‘मंत्रीय’ तोरा नसलेल्या जोशींच्या या वृत्तीचं अधिकाऱ्यांना अप्रूप न वाटतं तर नवलच होतं. या पहिल्याच बैठकीत प्रशासनाला सुधीर जोशींनी आपलंसं केलं.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
मंत्री झाल्यावर सुरुवातीच्या काळात ‘शहरीबाबू’ समजल्या जाणाऱ्या सुधीर जोशी यांना विरोधी पक्षात राहून आल्यानं आणि महाराष्ट्र पिंजून काढल्यानं जनेतच्या प्रश्नाची सखोल जाण होती. शेतकऱ्यांना सातबारा उतारा मिळवण्यात कशा अडचणी येतात, याची जाण असल्यामुळेच सातबारा उतारा शेतकऱ्यांना घर पोहोच देण्याची संधी वाटणारी, परंतु महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी राबवली. हा उतारा संगणकीयकृत असावा, असाही त्यांचा आग्रह होता, पण ती संगणक युगाची प्रशासकीय यंत्रणेतही पहाटच होती. त्यामुळे घरपोहोच संगणकीयकृत उतारा, हे त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरायला उशीर लागला. या योजनेचे शिल्पकार सुधीर जोशी आहेत, हे आज अनेकांना ठाऊकही नसेल. ही बातमी तेव्हा त्यांनी सर्वप्रथम मला म्हणजे ‘लोकसत्ता’ला दिली होती.
महसूलसारखं ‘मलई’दार खातं मिळूनही कोणत्याही लाभाला सुधीर जोशी बळी पडले नाहीत. शिक्षणमंत्री म्हणूनही त्यांनी कोणाकडून काही ‘फेव्हर’ घेतल्याचं ऐकिवात आलं नाही. ते स्वत: किंवा त्यांचे कुणी कुटुंबीय कोणत्याच वादात सापडले नाही. विद्यमान काळात अविश्वसनीय वाटावं असंच हे, नाही का?
बातमी देण्याचं सुधीर जोशी यांचं वैशिष्ट्यंही सौम्यचं होतं. खूप आव आणून ते बातमी देत नसत; सहज सांगत ते थेट बातमी किंवा ‘हिंट’ देत असत. सवंग विधानं करणं, भडक आरोप करणं किंवा निव्वळ कंड्या पेरत राहणं, हा त्यांचा स्वभावच नव्हता. मराठवाडा विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करायला शिवसेनेचा विरोध होता. प्रत्यक्ष नामविस्ताराच्या वेळी सुधीर जोशी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते होते, पण त्यांनी कधी आगीत तेल ओतणारी किंवा माथी भडकवणारी विधानं केली नाहीत.
याच काळात एका दिवशी विषयावर एका महत्त्वाच्या क्षणी प्रतिक्रिया द्यायला सुधीर जोशी उपलब्ध होत नव्हते. नागपुरात ते रात्री ११ला पोहोचतील, अशी माहिती मिळाली. तेव्हा मी पत्रकारितेची सोय म्हणून सुधीर जोशी यांची संभाव्य प्रतिक्रिया लिहून ठेवली. रात्री उशिरा पोहोचल्यावर माझा निरोप मिळाल्यावर त्यांनी फोन केला. निमित्त सांगून एव्हाना ठेवलेली कम्पोज करून ठेवलेली प्रतिक्रिया मी वाचून दाखवली. त्यावर त्यांनी तात्काळ पसंतीची मोहोर उमटवली. इतकी मस्त वेव्ह लेन्थ’ आमच्यात जुळलेली होती!
६.
आधी महसूलमंत्री आणि मग शिक्षणमंत्री झाल्यावर सुधीर जोशी यांच्या मंत्रालयातील चेंबरमध्ये आठवड्यातून तीन-चारदा तरी चक्कर होत असे. दुपारच्या वेळी गेलं तर न जेवता बाहेर पडणं शक्यच नसे. (तेव्हा मी मुंबईत एकटा होतो आणि ते सुधीरभाऊंना माहिती होतं म्हणूनही असेल.) कार्यालयात आल्यावर फाईली आणि बैठकांच्या कामाचा सुधीरभाऊ तातडीvx निपटारा करत. मग त्यांच्या दालनात गप्पांची मैफल रंगत असे. मराठी नाट्य व चित्रसृष्टीतील अनेक कलावंत, क्रिकेटपटूंची माझी भेट सुधीरभाऊंच्या दालनातच झाली. यापैकी जवळजवळ प्रत्येकाचं, कोणतं न कोणतं काम सुधीरभाऊंनी निरपेक्ष भावनेनं केलेलं आहे, हे त्यांच्या बोलण्यातून लक्षात येत असे. मात्र त्याबाबत कोणताही आव त्यांच्या वागण्या-बोलण्यात कधीच नसे. या बैठकीदरम्यान येणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाची आणि लोकाधिकार समितीच्या कार्यकर्त्याची ते आवर्जून दखल घेत. यापैकी अनेकांच्या घरातल्या चुली सुधीरभाऊंच्या प्रयत्नांनी पेटलेल्या असत आणि त्याची कृतज्ञता कार्यकर्ते/सैनिकांत असे. त्या कृतज्ञतेपोटी सुधीरभाऊंच्या पाया पडत. ते त्यांना रोखू तर शकत नसत, पण त्या कृतीमुळे दाटून येणारा संकोच मात्र लपवून ठेवू शकत नसत.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
महसूलमंत्री असताना प्रवासात असताना सुधीर जोशींच्या कारचा अपघात झाला. गंभीर झाल्याने त्यांना प्रदीर्घ काळ सत्तेच्या दालनापासून लांब राहावं लागलं. त्यांचं महसूल खातं नारायण राणे यांच्याकडे गेलं. याच उपचाराच्या काळात सुधीरभाऊंचा कंपवाताचा (पार्किनसन्स) अधिक बळावला, तरी मोठ्या उमेद आणि जिद्दीनं त्यांनी मंत्रालयात पाय टाकला. त्यांच्याकडे शिक्षण खातं सोपवण्यात आलं. पुढे मुख्यमंत्रीपदाची सूत्रं मनोहर जोशींकडून नारायण राणेंकडे गेली. सेनेच्या सत्ताकारणाचा सारा बाजच बदलला. सुधीर जोशी जाहीरपणे काही व्यक्त झाले नाहीत, पण खाजगी बोलण्यात डावललं जाण्याची निराशा आली, हे मात्र खरं.
हळूहळू ते शिवसेनेच्या राजकारणातून दूर गेले. शिवसैनिकांच्या लेखी त्यांचं अस्तित्व ‘जय महाराष्ट्र’ घालण्याइतकं आणि दसरा मेळाव्यात व्यासपीठावरील हजेरीपुरतं राहिलं. हळूहळू सुधीर जोशी हे नाव असंख्यांच्या विस्मृतीत गेलं, तर अगणितांच्या स्मरणात मंदपणे तेवत राहिलं.
माझी त्यांची शेवटची भेट २००३ साली झाली. एकदा दादरमधून जात असताना अचानक आठवण आली म्हणून फोन करून त्यांच्याकडे गेलो. मुकुंदा बिलोलीकर माझ्यासोबत होता. जुजबी गप्पा झाल्या. चैतन्यानी सळसळलेलं सुधीर जोशी नावाचं झाड मलूल झालेलं होतं. ते काही बघवलं गेलं नाही.
साडेचार दशकाच्या पत्रकारितेत सर्वार्थानं स्वच्छ, निगर्वी, सालस आणि सात्त्विकही व्यक्तिमत्त्वाचे फारच मोजके राजकारणी आले. राजकारणापलीकडे जाऊन मैत्र जोपासणारे सुधीर जोशी त्या मोजक्यांपैकी एक. राजकारणाच्या विद्यमान मतलबी आणि कर्कश्श गलबल्यात सुधीर जोशी यांच्यासारखे नेते अनेकांना कल्पनारंजनही वाटू शकेल...
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment