अजूनकाही
आज शहरीकरणामुळे व बंद दरवाज्याच्या फ्लॅट संस्कृतीमुळे शेजारपण नाहीसे झाले आणि शेजारधर्मही हरवला आहे. त्यात आपल्यासारख्या नसणाऱ्या लोकांकडे संशयाने, द्वेषाने पाहण्याच्या वृत्तीत वाढ होत आहे. हिजाब घालण्यावरून कर्नाटकात सुरू झालेला आणि आता देशभर पसरलेला वाद हे केवळ एक उदाहरण म्हणता येईल.
या पार्श्वभूमीवर साठ-सत्तरच्या दशकांतील श्रीरामपूर शहरातील माझ्या बालपणीच्या शेजारधर्माविषयीच्या आठवणी प्रातिनिधिक स्वरूपाच्या म्हणता येतील. अर्थात अशाच इतरांच्याही आठवणी असतीलच.
श्रीरामपुरात आम्ही राहायचो ती चाळ बहुजातीय आणि बहुधर्मीय होती. आमच्या एका भिंतीला लागून एक आणि समोर एक, अशी दोन मुसलमानांची घरं होती. दुसऱ्या भिंतीला लागून मराठा कुटुंबाचं घर, तर समोर माळी कुटुंबांची तीन घरं होती. दुसऱ्या एका टोकाला आणखी एक मुसलमान घर होतं. थोड्या अंतरावर असलेल्या एकमजली इमारतीत इतर जातींतली आणि मारवाडी समाजाची घरं होती, तर चाळीच्या अगदी शेवटच्या टोकाला दगडी बांधकामाची बैठी घरं होती. चार दशकांपूर्वी श्रीरामपूर सोडलं असलं तरी मला ती सगळी घरं, तिथली कुटुंबं आणि या सर्व शेजाऱ्यांचे आपापसांतले व्यवहार अजूनही ठळकपणे आठवतात.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
लहानपणी या शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या वेगळ्यापणाची जाणीव झाली, ती त्या घरांतल्या बायांच्या कपाळांवरून. माझी आई दररोज सकाळी अंघोळ झाल्यावर कुंकवाचा करंडा समोर ठेवून आधी कपाळावर गोल मेण लावायची आणि त्यावर कुंकू. शेजारच्या एकमेव मराठा घरातली बाईसुद्धा माझ्या आईसारखेच गोल कुंकू लावायची. समोरच्या माळी घरांतल्या सगळ्या बाया कपाळावर मध्यभागी कुंकवाची आडवी बारीकशी चिर लावायच्या. विधवा असलेल्या म्हाताऱ्या बायांच्या कपाळावर लालऐवजी काळे कुंकू असायचे. कपाळ मोकळे ठेवायची मुळी प्रथाच नव्हती. आणि हो, चाळीतल्या तिन्ही मुसलमान घरांतल्या बायांच्या कपाळावर कुंकू नसायचे. त्यामुळे त्यांची ओळख लगेच पटायची. या मुसलमान बाया बुरखा कधीही घालत नसत.
या मुसलमान, माळी, मराठा आणि आमच्या घरातील बायांचा पोषाखाबाबत मात्र समान धागा होता, तो म्हणजे या सर्व बायांचा पदर कायम डोक्यावर असायचा. एखादे वेळेस तो डोक्यावरून ढळला आणि घरातला वडीलधारा पुरुष किंवा परपुरुष आला की, अगदी प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे पदर डोक्यावर ओढला जायचा.
शेजारच्या माडीवरच्या आणि दगडी भिंतीच्या वरच्या जातींतल्या घरातल्या प्रौढ आणि म्हाताऱ्या बाया मात्र नऊवारी किंवा सहावारी लुगड्याचा पदर डोक्यावर न घेता खांद्यावरून घ्यायच्या, तरुण बाया तो सरळ मागे पाठीवर टाकायच्या! पलीकडच्या इमारतीतील मारवाडी कुटुंबांतील बाया घरातले वडीलधारे पुरुष समोर आले की, चेहऱ्यावर घुंगट ओढत असत.
याशिवाय शेजारच्या काही बायांच्या कपाळावर, गालांवर आणि हातांवर काही गोंदलेले असायचे. त्यावरूनसुद्धा त्या बाईच्या जातीबाबत थोडाफार अंदाज यायचा. माझ्या आईच्या एका हातावर तर ‘सुभेदार’ असे आईबाप लहानपणीच गेलेल्या तिच्या भाच्याचे नाव कोरलेले होते. लहान-मोठ्या सुया, काळे दोरे, करंगोटे, बिब्बे आणि इतर काही औषधी वस्तू टोपलीत घेऊन दारोदारी येणाऱ्या वैदू आणि इतर भटक्या समाजाच्या बायांचा चेहरा, अशा हिरव्यागार गोंदणांनी पूर्ण रंगलेला असायचा. पुढे गोव्याला शिक्षणासाठी गेलो, तेव्हा तेथे अनेक मित्रमैत्रिणींच्या उजव्या हाताच्या अंगठ्यापाशी क्रुसाचे चिन्ह गोंदवलेले दिसायचे. त्यावरून ती व्यक्ती गोवन कॅथोलिक आहे, हे लक्षात यायचे.
मुसलमान घरांचा अपवाद सोडल्यास चाळीतल्या सगळ्या विवाहित बायांच्या गळ्यात काळी पोत असलेले मंगळसूत्र असायचे. आमच्या घरातही माझ्या आईच्या आणि वहिनींच्याही गळ्यात मंगळसूत्र असायचे. त्यात सोन्याच्या एक-दोनच पातळशा पाळी असत आणि बाकी काळे पिवळे मणी असत. सणासुदीला, लग्नासारख्या मंगल कार्यक्रमाला अनेक बाया नाकात नक्षीदार नथ घालायच्या.
मला आठवते, वयाने माझ्या आईहून लहान असलेली माझी मावशी तर बाराही महिने नाकात नथ घालायची. बशीने चहा पिताना ती नाकातली नथ बाजूला सारायची, तिची ती करामत पाहून आम्ही लहान मुले खूप हसायचो. नाकात सोन्याची किंवा चांदीची मुरणी आणि कानांत सोन्याचे डुल, हे इतर दागिने मुसलमान आणि इतरही सर्व बाया घालत असत.
आमच्या चाळीत आसपासच्या सर्व घरांतले लोक वशट खाणारे होते. त्यामुळे मांसाहारी पदार्थ शिजवताना, ओले-सुके मासे तळताना आणि भाजताना कुणाच्याही भावना दुखावल्या जात नसत. एक शेजारधर्म म्हणून खाद्यसंस्कृतीविषयी कधीही बाऊ केला जात नसायचा वा कुणी नाकही मुरडत नसायचे.
असा वेगवेगळा पेहराव करणाऱ्या, कुंकू लावणाऱ्या आणि न लावणाऱ्या, दागदागिन्यांचे तऱ्हेतऱ्हेचे प्रकार असणाऱ्या विविध जातींच्या आणि धर्माच्या या बाया वर्षांतून अनेकदा एकत्र यायच्या आणि मला खात्री आहे, आजही नक्कीच अशाच प्रकारे येत असतील.
उन्हाळ्यात पूर्ण वर्षभर पुरेल इतक्या कुरडया, शेवया किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पापड करायचे असायचे. त्या काळात कुटुंबातल्या व्यक्तींची संख्या जास्त असायची, पाहुण्यारावळ्यांसाठी, लेकीबाळींसाठी, शिक्षणासाठी बाहेरगावी राहणाऱ्या मुलांसाठी या पदार्थांची वर्षभराची बेगमी करावी लागायची. अशा वेळी चाळीतल्या सर्वच महिला एकमेकींवर पूर्ण अवलंबून असत. भल्या पहाटे कुरडया आणि शेवया करण्यासाठी पूर्वतयारी झाली की, मग शेजारपाजारच्या बाया कंबराला पदर खेचून मदत करायला येत असत. त्यानंतर गप्पागोष्टी करत, एकमेकींची चेष्टा करत त्या त्या घराचे पदार्थ बनत.
मला आठवते, आमच्या घरी खास शेवया करण्यासाठी केलेले घडी करण्याजोगे चारपाच नक्षीदार लाकडी पाट होते. स्टुलावर बसून शेवयाचे पीठ या पाटांवर मळत सरासरा शेवया वळल्या जायच्या आणि त्याच वेगाने आम्ही मुले शेवयाचे ते बारीकसे सूत ताटांवर घेऊन लगेच सुकायला ठेवत असू. हा कार्यक्रम ऊन डोक्यावर येण्याआधीच आटपायचा.
आमच्या घरी म्हणजे मार्थाबाईच्या शेवया झाल्या की, मग शेजारच्या शांताबाईच्या कुरडया बनवल्या जायच्या आणि नंतर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या घरी हाच कार्यक्रम होत असे. आमच्या घरचे शेवयांचे पाट मग त्या घरी नेले जायचे, कुरडयांसाठी शेजारच्या घरांतले सोयरे मागवले जायचे. बनवलेल्या शेवया आणि कुरडया उन्हात वाळवण्यासाठी काथ्यांनी विणवलेल्या लाकडी बाजा आसपासच्या घरांतून आणल्या जायच्या. पावसाची चाहूल लागण्याआधी म्हणजे मृग नक्षत्राच्या आगमनाआधी कुरडया, शेवया, पापड हे सर्व पदार्थ बनवले जायचे.
लगीनसराई सुरू झाल्यावर एखाद्या घरात लग्न असले की, पूर्ण चाळीत उत्साह पसरायचा. लग्नघरातल्या अंगणात मांडव पडला की, रंगीबेरंगी बांगड्यांचा संच घेऊन कासार यायचा, एखादवेळेस कासार बाई यायची. मग आसपासच्या प्रत्येक घरातल्या मुली आणि बाया आळीपाळीने कासारासमोर मांडी घालून बसायच्या. समोर बसलेल्या बाईचा हात हातात अलगद घेऊन मग तो कासार पुरुष किंवा बाई जुन्या बांगड्या खटकन हलकेच दाबून एकामागे एक असे करत मोडून टाकत आणि नव्या बांगड्यांसाठी जागा केली जाई.
अशा प्रकारे लग्नघराकडून लग्नाच्या निमित्ताने शेजारपाजारच्या सर्व महिलांना दोन्ही हातांत डझन किंवा अर्धा डझन हिरव्या बांगड्यांचा चुडा भरवला जाई. विशेष म्हणजे बांगड्यांबाबत या वेगवेगळ्या जातिधर्माच्या आणि संस्कृतीच्या महिलांमध्ये कुठलाही फरक नसे. लगीनसराईत अनेकदा या विविध जातीधर्मांच्या बायांच्या या बांगड्या अगदी हातांच्या कोपरांपर्यंत पोहोचायच्या.
हळदीच्या दिवशी मांडवात नवरदेवाला किंवा नवरीला हळद लावायला, या शेजारणी पुन्हा जमायच्या. हळद लावलेल्या आणि कपाळाला मुंडाळ्या किंवा बाशिंग बांधलेल्या नवरदेवाला आणि नवरीला शेवया खाण्यासाठी बोलावले जायचे. ‘गडांगणेर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाला नवरदेव वा नवरीबरोबर करवले आणि करवल्या जात असतात. वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा लोकसंस्कृतीचा हा प्रकार महाराष्ट्रात ठराविक ठिकाणीच आढळतो. या गडांगणेरसाठी चाळीतल्या सगळ्या घरांत आमंत्रण असायचे, जातीधर्माचा अजिबात भेदभाव नसायचा.
अडीअडचणीच्या काळात ज्वारी-बाजरीचे आठवाभर किंवा पातेलेभर पीठ शेजाऱ्यांकडून उसनवारीवर आणले जायचे, ऐनवेळी मीठ-मिरच्यांसाठी शेजाऱ्यांचे दार खटखवण्यास कुणाला कधी शरम वाटत नसे.
चाळीतल्या या अनेक घरांचे वेगवेगळे धार्मिक उत्सव असायचे आणि त्यात इतरांना आवर्जून सहभागी केले जायचे. दिवाळीला आमच्याकडे शेजाऱ्यांकडून फराळाची अनेक ताटे यायची आणि ख्रिसमसनिमित्त आमच्या घरांतून त्या सर्व घरांत करंज्या, लाडू, अनारशा वगैरे पदार्थांची ताटे पोहोचत असत. रमजान ईदला चाळीतल्या तिन्ही मुसलमान घरांतून इतर सर्व घरी गरमागरम गोड शिरकुर्मा पोहोचता व्हायचा.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
‘बिनवेशींचे गाव’ अशी श्रीरामपूरची ओळख आहे. इथला रामनवमी उत्सव म्हणजे सर्व शहरवासियांचा सण असायचा. रामनवमीची मेनरोडवर रात्री निघणारी मिरवणूक आणि रथावर सारखा इकडेतिकडे फिरत असणारा लांब शेपटीचा मारुती पाहायला लहानथोर मंडळी गर्दी जमायची. रामनवमी संपली की, लगेच रेल्वेपुलाच्या पलीकडे असलेल्या दर्ग्याचा सण असायचा. तिथे भरणारा उरुस आणि कव्वालीचा कार्यक्रम सगळ्यांचेच आकर्षण असायचा.
शेजाऱ्यांच्या किंवा परिसरातील इतर जातिधर्माच्या लोकांच्या विशिष्ट पद्धतीचे कुंकू लावण्यावरून किंवा न लावण्यावरून, मंगळसूत्र अशा दागिन्यावरून तसेच घुंघट, बुरखा किंवा हिजाब अशा पेहरावावरून, खाद्यसंस्कृती किंवा इतर रितीरिवाजांमुळे कधीही वाद, झगडा झाल्याचे आठवत नाही. उलट अडीअडचणीला हेच लोक पाठीशी उभे राहून आपला शेजारधर्म पाळत असत, इतरांचाही असाच अनुभव असेल.
..................................................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment