अजूनकाही
मोठं होणं म्हणजे काय, मी तीस वर्षांपूर्वी जी होते, त्यात आणि आज काय फरक आहे, असा कधीतरी विचार करते. तेव्हा वाटतं, आताच्या आणि तेव्हाच्या माझ्यात एकच फरक आहे, काळजातली कळ… आता बारा महिने चोवीस तास सतत माझ्या काळजात एक कळ उठलेली असते. आईपणाची कळ! ही कळ कदाचित बापाच्या काळजातही असेल, ते मला माहीत नाही. पण कित्येकदा मला वाटतं, कधी ही कळ जाईल आणि मला मुक्त होता येईल… आणखी दोन वर्षांनी? चार वर्षांनी? दोन्ही मुलांचं शिक्षण संपलं की? कधी? पण मन उत्तर देतं, ‘तू जिवंत असेपर्यंत ही कळ अशीच काळजात राहणार….’ मुलं कुठेही गेली, काहीही करत असली तर सतत, त्यांचा विचार, त्यांची काळजी, त्यांचं कौतुक. बरं, याचा अर्थ आपण मुलं सोडून काहीच करत नाही असा नाही… इतर व्यवहारही सुरू असतात, पण तरीही कुठेतरी खोलवर ही कळ असतेच. हीच कळ खूप जास्त प्रमाणात जाणवली गेल्या आठवड्यात. धाकटीला आजीआजोबांकडे सोडून मोठ्याला घेऊन मी ‘लॉयन’ हा सिनेमा बघायला गेले. खरं तर सिनेमाचा विषय माहीत होता, ज्या सरू ब्रायरलीच्या आत्मकथनावर हा चित्रपट आधारलेला आहे, त्याची मुलाखतही नुकतीच वाचली होती. त्यामुळे कथेतला कोणताच भाग धक्कादायक नव्हता.
गोष्ट समजायला खूप सोपी. मध्यप्रदेशातल्या खांडव्यातल्या एका छोट्या खेड्यात दोन भाऊ- सरू आणि गुड्डू राहत असतात. दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या बाईची ही दोघं मुलं. गुड्डू चौदा पंधरा वर्षांचा, तर सरू पाच वर्षांचा. ट्रेनमधले कोळसे चोरून ते एका दुकानदाराला द्यायचे आणि मग त्या बदल्यात पेलाभर दूध मिळवायचं, असा उद्योग गुड्डू करत असतो. ‘आता मी पण खूप ‘मोठ्ठा’ झालोय, आता मी पण दादाला मदत करणार’ हे लहानगा सरू ठरवतो. एका रात्री गुड्डू घराबाहेर पडत असताना त्याच्या विरोधाला न जुमानता सरू दादाबरोबर रेल्वे स्टेशनला येतो. लहानग्या सरूच्या डोळ्यात रात्रीची अनावर झोप असते. त्याला तिथंच ‘झोपून राहा, इकडंतिकडं जाऊ नकोस’ असं बजावून गुड्डू कामाला जातो. रात्री अचानक जाग आल्यावर सरू घाबरतो आणि भावाच्या शोधात एका ट्रेनमध्ये चढतो. ही ट्रेन त्याला सोळाशे मैल दूर कोलकात्याला घेऊन येते. आई, भावापासून दुरावलेलं हे लहान लेकरू वणवण फिरतं, पण आईकडे, गुड्डूकडे परत जाण्याची आस सोडत नाही… ही आस त्याच्यात कायम असते पुढे ऑस्ट्रेलियात दत्तक म्हणून गेल्यानंतर… तब्बल पंचवीस वर्षांनंतरही.
नव्या आयुष्यात सगळं काही आलबेल असताना गुड्डू आणि अम्मी त्याच्या आसपास भटकताना त्याला दिसतात. ‘ते अजून मला शोधताहेत, मला त्यांच्याकडे परत जायचंय’ या विचारानं तो जवळपास वेडा होतो. पण आधुनिक विज्ञानाच्या मदतीनं, अर्थात गूगल अर्थच्या माध्यमातून अविरत प्रयत्न केल्यानंतर त्याला एक दिवस अचानक त्याचं गाव दिसतं. त्यानं आपल्या गावी परतणं, हाच त्याच्या पंचवीस वर्षांच्या तगमगीवरचा उपाय ठरतो…
तर मी सांगत होते माझ्या काळजातल्या कळांबद्दल. हा सिनेमा बघताना पहिली कळ उठली ती सिनेमाच्या पहिल्याच दृष्यातून… गुड्डू आणि सरू दोघं एका ट्रेनवर चढून कोळसे चोरतात हा तो प्रसंग. कुठेही घरातल्या अठराविश्व दारिद्र्याचं रडगाणं नाही. दिसतं ते भावाभावामधलं सुंदर नातं. पिशवीभर दुधासाठी दोघं जीव धोक्यात घालून कोळसा चोरतात. पण कामगिरी फत्ते झाल्यावर गुड्डूला सरूचं किती कौतुक! ‘तू खूप मोठा झालास रे!’ असं कौतुक गुड्डूने केल्यावर सरूची छाती इंचभर फुलते. कोळसा मिठाईवाल्याला दिल्यानंतर त्यांना मिळतं पावशेर दूध. पण सरूची नजर तिथं कढईत तळल्या जाणाऱ्या गरमागरम जिलब्यांवर जाते. तो गुड्डूला विनवतो, ‘एकदा मला तू जिलब्या खायला देशील ना रे?’ गुड्डू त्याला ‘हो’ म्हणत असताना, आपल्याला त्याच्या डोळ्यांतला निग्रह दिसतो… एक दिवस हा भावाला जिलबी खायला नक्की घालणार!
पुढे भावाशी ताटातूट झाल्यावर लहानगा सरू अचानक प्रौढ होतो. जग किती वाईट आहे, याचा अनुभव येत असतानाच आई आणि भावाचा शोध तो थांबवत नाही. नवी आई - बाबा - भाऊ मिळाल्यानंतर काही वर्षं मनाच्या कोपऱ्यात बंद करून ठेवलेल्या आठवणी जाग्या होतात, भारतीय मित्राकडे एका पार्टीत जिलबी खाल्यानंतर. जिलबीचा तो वास त्याला लहानपणाकडे, त्याच्या भावाकडे इतका खेचून नेतो की, रात्रंदिवस त्याचा पिच्छा सोडत नाही. सिनेमात सरू मोठा झाला तरी माझ्या नजरेसमोरून ते पाच वर्षांचं लेकरू हटायला तयारच नव्हतं. आता कसं होणार याचं, कुठे झोपणार हा, काय खाणार, याला कोणी इजा तर करणार नाही ना…. एक ना अनेक प्रश्न…
दरवर्षी भारतात ऐंशी हजार मुलं हरवतात. आई-वडलांपासून दुरावलेल्या मुलांचं काय होत असेल याची थोडीफार कल्पना सरूचा प्रवास बघताना येते. सिनेमाची कथा माहीत असतानाही, ‘नको रे बाबा, नको झोपूस आता, नाही तर दुरावशील तू गुड्डूपासून’ असं मी मनातल्या मनात त्याला विनवत होते. इकडे माझ्या डोळ्यांना धारा लागलेल्या, तिकडे बाजूला बसलेला माझा मुलगाही बावरलेला. आता हा कधी आपल्या आईला भेटेल, या विचाराने भांबावलेला. हा भावनातिरेक इतका असह्य होता की, एका क्षणी मी मलाच विचारलं, ‘हे काय चाललंय? हा सिनेमा आहे. एवढं डोळ्याला धारा लागण्यासारखं काय झालंय?’ मग मन सहा वर्षांपलीकडे गेलं. निस्सीमला घेऊन त्याचा बाबा बागेत गेला होता. मी म्हटलं, ‘माझी कामं आटोपून मी येते.’ बाजारहाट झाल्यावर निस्सीमला आवडते म्हणून कोरडी भेळ बांधून घेत असताना, अजयचा फोन आला- ‘निस्सीम हरवलाय.’ मी म्हटलं, 'ही काय गंमत आहे?’ त्याचा स्वर ऐकून पटलं की, तो गंमत करत नव्हता. मी बागेच्या दिशेनं पळत सुटले. पाच मिनिटाचं अंतर सरता सरेना. रस्ताने अचानक काळे कपडे घाललेल्या माणसांचे जथ्थे दिसायला लागले. पाच-सहा बसेसमध्ये भरून ही मंडळी बहुदा मुंबईच्या सफरीवर आली होती आणि संध्याकाळी बागेत बसायला आली होती. त्या दोन-चार मिनिटांत प्रत्येकाकडे मी संशयानं बघत होते. त्यांची गर्दी इतकी प्रचंड होती की, इतर काहीच दिसेना.
… शेवटी एकदाची मी निस्सीमच्या आवडत्या जंगल जिमला पोचले. तेवढ्यात एक माणूस तिथं, निस्सीमला घेऊन पोचला. झालं होतं ते असं - त्या मोठ्या जंगल जिमला तीन घसरगुंड्या होत्या. त्यातल्या ज्या घसरगुंडीवरून तो खाली येत होता, त्याच्या शेवटी त्याचा बाबा उभा होता, पण गर्दी, रेटारेटी इतकी होती की, तो तिथून न येता दुसरीकडून आला आणि बाबाला शोधत हरवला. बागेत फारसे लाईट्स नसल्यानं आणि गर्दीमुळं आणखी भरकटला. त्याला रडताना पाहून त्या भल्या माणसानं त्याची विचारपूस केली, निस्सीमनेही अगदी व्यवस्थित उत्तरं देऊन त्याच्या बाबाचा दहा आकडी मोबाईल नंबर त्याला दिला. त्याने फोन करून बाबाला शोधलं आणि निस्सीमला ताब्यात दिलं. पण हे करत असताना तो आम्हाला रागावला. म्हणाला, ‘तुमचं नशीब म्हणून कुणा गुंड मवाल्याला नाही तर मला तुमचा मुलगा मिळाला.’ निस्सीमला त्याच्याकडून ताब्यात घेताना आमचा इतका भावनातिरेक झाला होता की, त्याचे आभारही मानायचे राहून गेले.
ही बातमी आमच्या प्रचंड मोठ्या देशस्थी कुटुंबात पसरायला वेळ लागला नाही. सगळ्यांचे फोन आले. माझी एक जाऊ म्हणाली, ‘भक्ती, तुम्ही त्याचे नीट आभार मानले नसतील तर त्याला फोन करा. कधीकधी या गोष्टी राहून जातात आणि मग आयुष्यभर वाटेल की, त्याचे आभार मानायला पाहिजे होते.’ आमच्या मोबाईलवर त्याचा नंबर होताच, लगेचच त्याला फोन केला आणि मनापासून आभार मानले. आज त्याचं नाव माझ्या लक्षात नाही, त्याचा काहीही संपर्क नाही. पण मी म्हणते, तो एक माणूस होता, त्याच्यातल्या माणुसकीनं माझा मुलगा मला परत मिळाला!
लहानग्या सरूला बघितल्यावर कुठेतरी पुन्हा त्या दोन मिनिटांसाठी बावरलेलं माझं लेकरू त्याच्यात दिसलं आणि वर्षांनुवर्षं त्याचा शोध घेणाऱ्या आईमध्ये कुठेतरी मलाच बघत होते… पंचवीस वर्षांनी का होईना तिच्या गोष्टीचा शेवट सुखाचा झाला, पण दरवर्षी हरवणाऱ्या त्या ऐंशी हजार मुलांचं आणि त्यांच्या आईबाबांचं काय? त्यातली किती घरी परततात आणि किती नव्यानं आयुष्य सुरू करतात, किती जणांचं आयुष्य सुरू होण्याच्या पूर्वीच संपतं…
bhaktic3@hotmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment