बुलडाणा येथील ‘भारत विद्यालया’त ग्रंथपाल म्हणून कार्यरत असणाऱ्या नरेंद्र लांजेवार यांचे दीर्घ आजारानंतर काल (१३ फेब्रुवारी २०२२) निधन झाले. ते केवळ नोकरी म्हणून ग्रंथालय या क्षेत्राकडे कधीही पाहत नसत. याची साक्ष त्यांनी त्यांच्या शाळेत मुलांमध्ये वाचनाची रुची निर्माण व्हावी म्हणून जे विविध उपक्रम राबवले, त्यातून मिळते. त्यांचं व्यक्तिमत्त्व अतिशय निगर्वी आणि निरलस असं होतं. त्यांची मुलाखत एका अभ्यासक्रमाचा भाग म्हणून २०१८ साली घेतली होती. त्या दीर्घ मुलाखतीतील काही अंश ...
..................................................................................................................................................................
आपण आपल्या शाळेच्या ग्रंथालयात जे उपक्रम राबवले त्याला शाळेच्या व्यवस्थापनाकडून कधी विरोध झाला का? असल्यास आपण कसा मार्ग काढला?
नरेंद्र लांजेवार : आमची शाळा हीच मुळात उपक्रमशील आहे. पारंपरिक शिक्षणाच्या बाहेर विद्यार्थ्यांना काढण्यासाठी विविधांगी उपक्रमांवरच भर असतो. त्यामुळे ग्रंथालयाच्या वतीने जे उपक्रम राबवले जातात, (उदा. ग्रंथप्रदर्शनी, दिवाळी अंक प्रदर्शनी, वाचन प्रेरणा दिन, वाढदिवसाला ग्रंथालयास पुस्तक भेट, मराठी भाषा दिन, राष्ट्रीय ग्रंथ सप्ताह, बालदिन इ.) या सर्वांना शालेय व्यवस्थापकांकडून प्रोत्साहनच असते. विरोध जो होतो तो हाच की, मला वक्ता म्हणून किंवा पाहुणा म्हणून बऱ्याचदा बाहेरच्या शाळा, साहित्य संमेलनांमध्ये बोलवले जाते. अशा वेळेस शाळा किंवा व्यवस्थापन मंडळ मला ‘ऑन ड्युटी’ पाठवत नाही. अशा वेळी मी व्यक्तिगत रजा टाकून जातो.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
ग्रंथालय क्षेत्रात जे काही नवे बदल होत आहेत - तंत्रज्ञानाच्या पातळीवर - त्याबद्दल आपले काय मत आहे?
नरेंद्र लांजेवार : नव्या बदलांचा स्वीकार हा केलाच पाहिजे. आपण बदलण्यास तयार नाही आणि नव्या तंत्रज्ञानाचा आपल्याला लाभ हवा आहे, परंतु ते तंत्रज्ञान आपण अवगत करत नाही, ही खरी शोकांतिका आहे.
ग्रामीण भागात या बदलाचे वारे आले आहेत का? त्याला कसा प्रतिसाद मिळतोय?
नरेंद्र लांजेवार : ग्रामीण भागात या नवतंत्रज्ञानाचे वारे आले आहेत, त्याला नवीन पिढी बऱ्यापैकी साथ देत आहे. अॅण्ड्राईड फोन आता जवळपास प्रत्येकाच्या हातात दिसत असल्याने गुगलवरून हवी ती माहिती, हव्या त्या ठिकाणी सहज उपलब्ध होत असल्याने जणू आजच्या पिढीवर गुगलदेवता प्रसन्न आहे. आपण या नवतंत्रज्ञानाचे स्वागतच केले पाहिजे.
शालेय ग्रंथालयांची परिस्थिती सुधारावी म्हणून शासनाने कोणते धोरण आखायला हवे असे वाटते?
नरेंद्र लांजेवार : मुळात आज महाराष्ट्रातील शालेय ग्रंथालयांकडे प्रचंड दुर्लक्ष झाले आहे. महाराष्ट्रात लाखाच्या घरात शाळा आहेत. परंतु फक्त सहा हजार पूर्णवेळ ग्रंथपाल या शाळांमध्ये आहेत. अनेक महाविद्यालयांमध्ये ग्रंथालयच नाही, जेथे ग्रंथालय आहे तेथे प्रशिक्षित ग्रंथपाल नाही, कोणातरी शिक्षकांकडे ग्रंथालयाचा पदभार दिलेला आहे. तोही आपले इतर काम करून वेळ मिळाला, तरच ग्रंथालयाकडे बघतो. मुळात प्रत्येक शाळेत विद्यार्थी संख्येची अट न लादता शाळा तेथे प्रशिक्षित ग्रंथपाल असलाच पाहिजे. यासाठी आता शासनानेच पुढाकार घ्यावा. हजारो नव्हे लाखो विद्यार्थी आज शासनानेच वाचन संस्कारापासून दूर ठेवले आहेत. ज्या शाळांमध्ये ग्रंथालय, ग्रंथपाल आहेत, त्या शाळांना वर्षाकाठी निदान एक लाख रुपये वा प्रती विद्यार्थी एक हजार रुपये वार्षिक ग्रंथालय अनुदान द्यावे, जेणेकरून शालेय ग्रंथालये जिवंत वाटतील. ‘वाचन प्रेरणा दिना’ची घोषणा करून किंवा एक ‘पुस्तकाचे गाव’ तयार करून शासनाला आपली जबाबदारी विसरता येणार नाही. चांगले फर्निचर, इमारत, सुसज्ज वातावरण, संगणकीकरण, आठ-दहा दैनिके, पाच-पन्नास मासिकांची वर्गणी, पुस्तके, संदर्भ ग्रंथ, स्पर्धा परीक्षांची पुस्तके, ई-बुक्स असा सर्व परिपूर्ण साठा करण्यासाठी शालेय ग्रंथालयांना स्वतंत्र अनुदानाची गरज आहे.
सार्वजनिक ग्रंथालयांचा वाचकवर्ग कसा वाढवता येईल?
नरेंद्र लांजेवार : सार्वजनिक ग्रंथालयांची चळवळ शासनानेच मोडकळीस आणली. येथील कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी नसल्याने ते नैराश्याने ग्रस्त आहेत. अर्धपोटी किंवा उपाशी राहून कामे होत नाहीत. तरीही विविधांगी उपक्रम राबवून स्वत:चे व्हॉटस्अॅपवर ग्रुप करून, ज्या शाळा-महाविद्यालयांना ग्रंथालय नाही, त्या शाळा, महाविद्यालय आपल्याकडे दत्तक घेऊन सार्वजनिक ग्रंथालयांना वाचकवर्ग वाढवता येऊ शकतो. काही वसाहतींमध्ये सार्वजनिक ग्रंथालयांच्यावतीने घरपोच सेवा दिली तरीही वाचकवर्ग वाढविता येऊ शकतो.
वाचनाची आवड शालेयवयापासून विकसित करण्यासाठी काय करायला हवं, असं आपणाला वाटतं?
नरेंद्र लांजेवार : शालेयवयापासून विद्यार्थ्यांच्या आजूबाजूला पुस्तकांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर हवी. वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांनीही पुस्तकांचे दाखले मोठ्या प्रमाणावर द्यावयास हवे. शालेय वेळापत्रकांमध्ये ग्रंथालय तासिका ही अनिवार्य करावी. तसेच पूर्वी ज्याप्रमाणे पूरक अशा प्रत्येक वर्गासाठी वाचनमाला होत्या, त्या वाचनमाला पुन्हा सुरू कराव्यात. वाचनाच्या अनुषंगाने भाषा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प करावयास सांगणे, तोंडी परीक्षेच्या वेळेस विद्यार्थ्यांनी किती व कोणती पुस्तके वाचली यावर प्रश्न विचारणे, जे मुलं पुस्तक वाचत असतील त्यांना इतरांपेक्षा दोन गुण जास्त देणे किंवा वरची श्रेणी देणे असे काही अभिनव प्रयोग शाळा-शाळांमधून झाले, तरच शालेय जीवनात वाचन विकसित होण्यासाठी मदत होईल.
ग्रंथालय हे केवळ पुस्तकं देण्या-घेण्याचं ठिकाण न राहता सतत काहीतरी वाचनविषयक उपक्रम सुरू असणारं एक केंद्र असायला हवं असं वाटतं का?
नरेंद्र लांजेवार : मुळात ग्रंथालय हे काही पुस्तकांचे भांडार किंवा गोडाऊन नाही. तेथे फक्त देव-घेव करण्यापुरताच व्यवहार होत नाही, होऊ नये. ग्रंथालयाचे वातावरणच एवढे प्रसन्न हवे की, कोणत्याही कोपऱ्यात आपण बैठक मारून काहीतरी चांगले वाचू या, असे ग्रंथालयात येताक्षणीच वाटले पाहिजे. येथे साजेसे फर्निचर, मंद संगीताचा ध्वनी, आल्हाददायक प्रकाश, प्रसन्न वातावरण आणि हवे ते पुस्तक हाती घेऊन वाचण्याची मुभा असावी... वाचनालयं ही वाचन भूक वाढवणारी केंद्रे असावीत.
आपण तसे प्रयत्न केलेत का? निवडक उपक्रम सांगा.
नरेंद्र लांजेवार : मी माझ्या शालेय ग्रंथालयात कितीही वेळ बसा... कोणतेही पुस्तक वाचा... ग्रंथालयात बसून डबा खा... चॉकलेट खा... मनसोक्त वाचा... अधूनमधून मासिके चाळा, पुस्तक किंवा मासिकातील लेख जरी आवडला तरी एखाद्या लेखकाला पत्र लिहा... ग्रंथालयात मोफत पत्रसुविधा उपलब्ध करून दिली आहे. वाढदिवसाला आपणसुद्धा शालेय ग्रंथालयास पुस्तक भेट देऊन एक सुंदर अभिष्टचिंतन करणारे प्रमाणपत्र मिळवू शकता. जो जास्त वाचन करेल त्याला उत्तम वाचक, उत्कृष्ट वाचक पुरस्कार मी पुस्तकरूपाने दरवर्षी देत असतो.
इलेक्ट्रॉनिक साधनांच्या वाढत्या वापरामुळे वाचनावर काही परिणाम झाला आहे, असं वाटतं का?
नरेंद्र लांजेवार : इलेक्ट्रॉनिक साधनांच्या वाढत्या वापरामुळे प्रिंट-मीडियाच्या वाचनावर परिणाम झाला आहे. परंतु सोबतच ई-बुक्स वाचन व इतर माहितीचे देवाणघेवाण, चित्र वाचन, ऑडिओ-व्हिडिओ वाचन वाढले आहे, याचाही विचार झाला पाहिजे. प्रत्यक्ष पुस्तक वाचनातून ज्ञान मिळते. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून माहिती मिळते. आजच्या समाजाला फक्त माहिती हवी आहे. त्याला ज्ञानाची भूक नाही, ज्ञानाची भूक असणारा समाज घडवण्यात अनेक घटक जबाबदार असतात. ते सर्व अपयशी ठरल्याने समाजाला फक्त माहिती आणि मनोरंजन हवे असेल तर आपण काय बोलणार?
या माध्यमांच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणांना वाचनाकडे वळवण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे? भरपूर वाचन करणारी माणसं त्यांच्यासमोर मॉडेल्स (आदर्श) म्हणून उभी करण्यात आपण कमी पडतो का?
नरेंद्र लांजेवार : मुळात आज टेक्नॉलॉजीला शरण गेलेल्या तरुणाईला बाहेर काढण्यासाठी सकस अन्न आणि तोंडी लावण्यासाठी खाण्यात येणारी लोणची-पापड-कोशिंबीर यांची माहिती सांगणे गरजेचे आहे. रोजच्या आहारात आपण वरण-भात-भाजी-पोळी अशी सकस आणि पौष्टिक जेवणाची थाली घेतो. कोणी फक्त लोणचेच किंवा पापड खाऊन पोटभर जेवतो का? तर नाही. मुळात चवीपुरतीच ही इलेक्ट्रॉनिक्स साधनं वापरली पाहिजे. आपल्या आयुष्यात मीठ किंवा साखरेला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला द्यावयास हवे. ते जर जास्त झाले तर तब्येत त्वरित खालावते. त्याची लेव्हल म्हणजे डेंजर झोन. तसेही ते व्हाईट पॉयझन आहेच.
जी माणसं मूळ संहिता वाचतात त्यांची मॉडेल्स डोळ्यासमोर ठेवण्यापेक्षा आजचे जे सेलेब्रेटीज् आहेत, त्यांचे वाचनाबाबतचे मत आपण तरुणांना सांगितले पाहिजे. स्पर्धा परीक्षांमध्ये ज्यांना यश मिळाले आहे, त्यांनी कोणकोणती पुस्तके वाचली, ती इतरांना सांगितली पाहिजे. मुळात घरामध्ये शाळा- कॉलेजेस- नातेवाईक- मित्रपरिवारांमध्ये, माध्यमांमध्ये वाचनावर चर्चाच होत नाही. त्यामुळेसुद्धा आजच्या तरुणाईला वाचनाचे आकर्षण वाटत नाही. तसेही लोकांना जबरदस्ती दूध पाजावे लागते. दारूच्या दुकानावर बोर्ड नसला तरी पिणारे ते दुकान शोधून काढतात. आज अवांतर वाचन हे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले तरच काही आशावादी चित्र दिसून येईल.
भरपूर वाचन करणाऱ्या अशा व्यक्तींचा ग्रंथालयांना काही उपयोग करून घेता येईल? म्हणजे त्यांचं व्याख्यान आयोजित करणं वगैरे.
नरेंद्र लांजेवार : वाचन कशासाठी करावं, हे नेमकेपणानं अशा वाचन असणाऱ्या लोकांना सांगता आलं पाहिजे, तरच काही फायदा होईल. अन्यथा एखाद्या व्यक्तीचे वाचन बरे, चांगले, उत्तम आहे, परंतु तो खाजगी जीवनात जर विरोधाभासी वर्तन करत असेल तर त्याच्या जीवनात वाचनाचा काय लाभ झाला किंवा जो कोणी निरक्षर व्यक्ती आहे, त्याने एकही पुस्तक वाचले नाही, तरी तो मानवी मूल्यांचं त्याच्या खाजगी आयुष्यात समर्थन व संवर्धन करतो. या व्यक्तीचे समाजातील माणुसपणाचे योगदान महत्त्वाचे मानायचे की, भरपूर वाचन करणारा व्यक्ती आहे, परंतु त्याचे खाजगी जीवनातील वागणे चांगले नाही, त्याला आपण आदर्श मानायचे, हे आधी ठरले पाहिजे. मुळात नवीन पुस्तकांवर चर्चा करता येईल किंवा लेखक तुमच्या भेटीला, वाचनाने मला काय दिले? वाचन का आणि कशासाठी? हे सांगता येईलही, परंतु आजच्या पिढीला ललित वाङ्मयाच्या वाचनाकडे वळवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न हे करावेच लागतील.
ग्रंथालय क्षेत्रात सोशल मीडियाचा (फेसबुक, व्हॉट्सअॅप) प्रभावी वापर कसा करून घेता येइल? आपण ही माध्यमं ग्रंथालयीन कामासाठी वापरता का?
नरेंद्र लांजेवार : मुळात सोशल मीडिया हे समाज सहभागाचे माध्यम आहे. यावर एका विशिष्ट व्यक्तीची मालकी नाही. या माध्यमाचा खरं तर ग्रंथालयाच्या क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीने वापर केलाच पाहिजे. नवीन पुस्तकांची, जुन्या पुस्तकांची माहिती, काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन किंवा मी हे पुस्तक वाचले, मला आवडले, तुम्हीसुद्धा वाचा ही माहिती सांगण्यासाठी अशा सोशल मीडियाचा आपण वापर केलाच पाहिजे. प्रत्येक ग्रंथालयाचे फेसबुक पेज, व्हॉट्सअॅप ग्रुप असावा. त्यावर विचारांचे आदानप्रदान होते. फेसबुकवर कधी वाचनालयाचे लाईव्ह कार्यक्रमसुद्धा बघता येतात-करता येतात. समविचारी मित्र मिळवण्याचे व ते टिकवण्याचे हे सशक्त माध्यम आहे.
मी व्हॉट्सअॅपवर ग्रंथालयांच्या विविध ग्रुपवर सदस्य आहे. माझ्या फेसबुक पेजवर मी अधूनमधून वाचनाबद्दलचे अपडेट टाकत असतो. मला वाटते वाचन-संस्कृतीकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी, हा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी आपण आजचा सोशल मीडिया हा वापरलाच पाहिजे.
इतर शालेय ग्रंथपालांविषयी आपले काय निरीक्षण आहे? उदा. त्यांच्या कामाची पद्धत किंवा उत्साह याबाबतीत.
नरेंद्र लांजेवार : मुळात आपण ज्या व्यवसायात आहोत, त्या व्यवसायावर, त्या कामावर आपले मनापासून प्रेम पाहिजे. आज माझ्या ग्रंथालयाच्या क्षेत्रात नाव कमावून आनंद घेणारे फारच थोडे आहेत. काही जण घाण्याच्या बैलासारखे ग्रंथालयात काम करतात. परंतु त्यांनाच वाचनाची आवड नाही. मुळात ग्रंथपाल हा ज्ञानाच्या विश्वातील गाईड, मार्गदर्शक गुरू असतो. त्याला विविध ज्ञानशाखांची माहिती हवी. त्याला विविध कलांची आवड हवी, तो फक्त ग्रंथाचा पहारेदार नसावा. मुळात प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक मिळवून देण्याचं काम हे ग्रंथपालाचं काम आहे. ग्रंथालयात अशी हजारो पुस्तके असतात की, कधी त्यांना स्पर्शच झालेला नसतो. या बिचाऱ्या पुस्तकांचा काय अपराध की, त्यांना वाचकच मिळू नये?
ग्रंथपाल उत्साही, बोलका असला की, ग्रंथालयाची बाग फुलते. आपण जे काम करत आहोत, ती काही चॅरिटी (मोफत सेवा) नाही. या कामासाठी कमी का असेना, पण आपण त्याचा मोबदला घेतो. त्यामुळे ते काम प्रामाणिकपणेच केले पाहिजे, असे मला वाटते. ग्रंथालयात गेल्यानंतर आपले घरचे, बाहेरचे, संस्थेचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, ते बाजूला ठेवून काम एके कामच आपण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे.
माझ्या या क्षेत्रात अनेक मित्र चांगले प्रामाणिक प्रयत्न करतात. परंतु त्यांची कोणी दखलच घेत नाही. अनेक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी म्हणून ग्रंथपालांना ग्रंथालयाचे सोडून इतरच कामे जास्त करावयास सांगतात. नोकरी करावयाची म्हणून तेही बिचारे कार्यालयीन कामे करतात. मुळात संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक यांनाच जर वाचनाची अभिरुची नसेल, तर एकटा ग्रंथपाल ती सर्व जबाबदारी नाही पूर्ण करू शकत.
आपल्या वाचनाची सुरुवात कशी झाली? कोणती विशेष घटना किंवा एखाद्या व्यक्तीमुळे वाचन करायला सुरुवात झाली किंवा इतर काही कारणं?
नरेंद्र लांजेवार : वाचनामुळे बहुश्रुतता येते हे प्रथम ध्यानी आले. आपल्याला ज्या क्षेत्रातील माहिती नाही, ती पुस्तकांमधून मिळते. एकाच मानवी आयुष्यात आपण अनेक आयुष्य जगल्याचा अनुभव घेता येतो. इतर मित्रपरिवारांपेक्षा काहीतरी अधिकची माहिती आपल्या हाती आहे, याचाही अंदाज येतो. वाचनातून आपल्याला व्यक्तिगतरित्या समाधान आणि आनंद मिळतो, हे लक्षात आल्यावर मी ठरवून वाचन सुरूच ठेवले. वाचनातून आपल्याला आपले आत्मभान गवसण्यासाठी मदत होते. लेखनासाठी, बोलण्यासाठी अनेक विषय सुचतात.
मी पाचवी-सहावीत असेल (१९८०च्या काळात) तेव्हा बुलडाणा शहरातील गर्दे वाचनालयात आई-वडलांसोबत पुस्तक बदलवण्यासाठी जात असे. मोठ्यांसोबत बालवाचक म्हणून माझेही तेथे नाव नोंदवले होते. मी परिकथा, राक्षसकथा, गुप्तहेरकथा, उडती चटई, श्यामची आई, चाचा चौधरी, चंपक, चांदोबा अशी काही काही पुस्तके वाचत होतो. वडील मराठीसोबत हिंदी पुस्तके वाचत. आपले आई-वडील काय वाचतात म्हणून मी त्यांचीही मोठमोठी पुस्तके सातव्या वर्गात असल्यापासून वाचत असे. आईला वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, व. पु. काळे, ना. सं. इनामदार, शिवाजी सावंत, योगिनी जोगळेकर, बाबा कदम इ. लेखक आवडत. (१९७० ते १९८५च्या काळात हीच पुस्तके मोठ्या प्रमाणावर वाचली जात.) या लेखकांसोबत प्रेमचंद, महादेवी वर्मा, गुलशनकुमार, काही बंगाली साहित्य असं इयत्ता नववीपर्यंत सटरफटर वाचन झालं. शाळेत आम्हाला सातवी ते नववीपर्यंत एक खरात मॅडम होत्या. त्या चित्रपटांच्या स्टोरीज् ऑफ पिरेडमध्ये सांगायच्या. सिनेमाची कथा म्हणजे एक कादंबरीच असते, हे बालपणीच कळले. पुढे दहाव्या वर्गात असताना बुलडाणा शहरातील तहसील ऑफीसजवळ एका कडाच्या खोलीत ‘प्रगती वाचनालय’ नावाचे ग्रंथालय हो,ते त्याचा शोध लागला. ते शाळा व घर अशा बरोबर मध्यावर होते. तेथे काही विद्यार्थी एकत्र येऊन चर्चा करत, गप्पा मारत असत. नंतर लवकरच समजले की, एसएफआय नावाच्या विद्यार्थी संघटनेचा हा कट्टा आहे. मी पण त्यांच्यात सहभागी झालो. सुरुवातीला विद्यार्थी चळवळीत कमी आणि या प्रगती वाचनालयातच जास्त रमत गेलो. येथे रशियन साहित्याचा अनुवाद केलेली प्रगती प्रकाशनाची मास्कोवरून प्रिंट होऊन आलेली खूप पुस्तकं होती. बालसाहित्यापासून वैचारिक साहित्यापर्यंतची येथे बरीच पुस्तकं मुक्तद्वार पद्धतीनं हाताळता येत होती. येथेच दहावीत असताना प्रा. सदाशिव कुल्ली सरांची भेट झाली. त्यांच्या खाजगी ग्रंथसंग्रहातून हे वाचनालय सुरू झाले, याची जेव्हा माहिती मिळाली, तेव्हा या व्यक्तीबद्दल प्रचंड आदर वाटला. पुढे त्यांच्याच घरी आमचा दिवसभर मुक्काम असायचा. सर नाटकांमध्ये काम करत, सुंदर कविता वाचत, मोठमोठ्या लेखकांशी त्यांचा परिचय होता. ते उत्तम वक्ते होते. हे जसजसे माहीत होत गेले, तसतसा आमच्यावर त्यांचा प्रभाव वाढत गेला.
मी दहावीची परीक्षा दिल्यानंतर कुल्ली सरांनी मुद्दाम मला ‘भारताचा शोध’ हे पं. नेहरूंचे प्रचंड मोठे पुस्तक वाचायला सुचवले. मी पंधरा दिवसांत ते वाचले. त्यातील अनेक संदर्भ कळलेच नाहीत. सर म्हणाले, वाचत वाचत गेले की, आपोआप कळत जाते. मग मी मनोहर तल्हारांची ‘माणूस’, उद्धव शेळकेंची ‘धग’ वाचली आणि अभिजात साहित्याची गोडी वाटू लागली. याच वाचनालयाच्या रोजच्या चर्चांमध्ये सहभागी होऊ लागलो. कोणी चेखॉव्ह, कोणी टॉलस्टॉय, कोणी मारुती चित्तमपल्ली, कोणी जी. ए. कुलकर्णी, कोणी सुरेश भट, कोणी नारायण सुर्वे यांवर बोलत. मी यांचं काहीच वाचलेले नव्हते. मग मी पण ठरवले ज्या-ज्या पुस्तकांवर ही मोठी माणसं बोलतात, ती आपण वाचली पाहिजे. नंतर नेमाडेंची बारावीत असताना ‘कोसला’ वाचली आणि बस्स. आपल्याला आता खूप काही कळायला लागले, जणू डोक्यावर शिंगेच फुटलीत असे वाटून मी हवेतच तरंगत गेलो. ही नशा जास्त काळ टिकली नाही. नंतर प्रथम वर्गाला जी. ए., मारुती चितमपल्ली, अनिल अवचट हे वाचले आणि सामाजिक कार्यच कसे महत्त्वाचे आहे हेही पटले. कुमार शिराळकरांचे ‘उठ वेड्या तोड बेड्या’, पानसरेंचे ‘शिवाजी कोण होता” या पुस्तकांच्या अनेक प्रती आम्ही परिसरात विकल्या.
पुरोगामी व्यक्तींमध्ये उठणे-बसणे वाढत गेल्याने आणि पुस्तकांची गुहा (प्रगती वाचनालय) जवळच असल्याने वाचन बऱ्यापैकी झाले. याचा फायदा अजूनही होतो. माझ्या वाचनावर कुटुंब तथा सार्वजनिक वाचनालय आणि प्रा. डॉ. स. त्र्यं. कुल्ली सरांचा खूप मोठा प्रभाव आहे.
वाचनाच्या बाबतीत कोणाचं मार्गदर्शन (काय वाचावे-काय वाचू नये असं) मिळालं का? असल्यास त्याचे फायदे-तोटे? आणि सुरुवातीच्या काळात कोणाचं मार्गदर्शन न मिळाल्यामुळे काही तोटा झाला असं आता वाटतं का?
नरेंद्र लांजेवार : वाचनाच्या बाबतीत अकरावी-बारावीत सामाजिक बांधीलकीचे साहित्य वाचावे, असे मार्गदर्शन प्राचार्य हिम्मतराव चव्हाण, स. त्र्यं. कुल्ली यांनी केले. त्यांच्या सहवासाने फुले- आगरकर- शाहू- मार्क्स, अण्णा भाऊ साठे- सावरकर- गांधी यांचे बऱ्यापैकी वाचन झाले. याचा फायदा म्हणजे वैचारिक बैठक पक्की झाली. विवेकवादी विचारांची, लोकशाहीवादी वृत्ती विकसित होत गेली. सटरफटर, टाईमपास पुस्तकं वाचण्यापेक्षा सकस साहित्य, महत्त्वाचं वैचारिक साहित्य पारखण्याची दृष्टी विकसित होत गेली. वैचारिक साहित्याबरोबर संतसाहित्यातील तुकाराम, ज्ञानेश्वर, कबीर हेही समजून घेता आले. त्यामुळे उदारमतवादी जडणघडण झाली. मी कोणत्याही एका कडव्या विचारांच्या आहारी कधी गेलोच नाही. जे जे उदात्त-मंगलमय-विवेकी आहे, तेच मला पटू लागले. म्हणजे मला साने गुरुजी जेवढे आवडतात, तेवढे डॉ. बाबासाहेबही भावतात. मी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या महाराष्ट्र अंनिसवर मनापासून प्रेम करतो, तेवढेच मी मेधा पाटकरांच्या किंवा बाबा आमटे यांच्या कार्यकर्त्यांशी आपुलकीने वागतो. मला नामदेव ढसाळही आवडतात आणि तुकारामाची गाथाही आवडते, जी. एं.च्या कथाही भावतात आणि महेश एलकुंचवारांची नाटकंही. श्याम मनोहरांच्या कादंबऱ्याही... मला वाटते, हा माझ्यातील उदारमतवादी दृष्टीकोन वाचनामुळे विकसित झाला आहे.
पुस्तकांचा संग्रह करायला हवा असं कधी वाटायला लागलं आणि का?
नरेंद्र लांजेवार : मी सहावी-सातवीपासून ग्रंथालयात जात होतो. तेथील माणसे किती नशीबवान, कोणतेही पुस्तक घेऊन सहज वाचता येते. मला ग्रंथालयात काम करणाऱ्या लोकांचा तेव्हा हेवा वाटायचा. (पुढे मला हलवाई लोकांचाही हेवा वाटायचा की, यांना काय मस्त मिठाई खायला मिळते म्हणून!) अशी हजारो पुस्तके आपल्याही घरात हवी, असं बालमनाला वाटायचं. परंतु घरची परिस्थिती बेताची असल्याने तेव्हा पुस्तकं विकत घेणंही शक्य नव्हतं. तरी मला आठवतं, आठवीत असताना वडलांनी मला इंग्रजीची डिक्शनरी विकत घेऊन दिली. पुढे दरवर्षी तान्हापोळ्याच्या पैशातून किंवा खाऊच्या पैशातून मी काही पुस्तकं विकत घेतली. तेव्हा टॉकीजच्या बाहेर सिनेमातील गाण्यांची पुस्तकं पन्नास पैशांपासून दीड रुपयांपर्यंत विकत मिळत. एकदा जुन्या चित्रपटांच्या शंभर हिंदी व शंभर मराठी गाण्यांचं पुस्तक आणले व यातील बरीच गाणी पाठ केली. शाळेत ऑफ पिरीएडला गाण्यांच्या भेंड्या खेळणे, हा वर्गात उद्योग चालायचा. मग काय एका एका शब्दानं सुरू होणारी चार-पाच गाणी आपल्याकडे तयारच असायची. खूप गाणी पाठ झाली. गाणी पाठ करण्याच्या नादात हिंदी, मराठी कविताही पाठ झाल्या. पुढे एक एक करत अनेक पुस्तकांनी असा लळा लावला की, अरे हे आपल्याला हवेच. हा मोह वाढत गेला आणि एम. ए. मराठी करत असताना अभ्यासक्रमाची सर्व पुस्तकं हेतुपुरस्सर विकत घेतली. आपल्याला हवं ते पुस्तक, हव्या त्या वेळी वाचता यावं म्हणून, चांगल्या पुस्तकांचा संग्रह करता आला. आज रोजी माझा व्यक्तिगत संग्रह तीन हजारांपेक्षा जास्त पुस्तकांचा आहे. घरभर पुस्तकं अस्ताव्यस्त पसरलेली असतात. जणू पुस्तकं घरांमध्ये माणसांसारखी बोलत असतात.
पुस्तकांचा संग्रह करताना कोणत्या अडचणी आल्या किंवा येतात आणि त्यावर तुम्ही कशी मात करता? घरच्या मंडळींची प्रतिक्रिया कोणती असते?
नरेंद्र लांजेवार : संग्रह करताना जागेची अडचण होती. सुरुवातीला दोनच छोट्या खोल्यांमध्ये राहत होतो. पुढे चांगले घर बांधले, काही कपाटं विकत घेतली, त्यामध्ये पुस्तकांना जागा दिली. आपली पुस्तकं वाचून झाल्यावर ती इतरांच्याही कामी यावीत म्हणून माझ्या शाळेच्या ग्रंथालयात चार-पाच कपाटांत माझी व्यक्तिगत पुस्तकं ठेवली आहेत. मुलांना, शिक्षकांना तीसुद्धा देता येतात. जेव्हा जेव्हा आपण बाहेरगावी जातो, तेव्हा तेव्हा अनेक पुस्तकांची दुकानं असतात. मी कोणत्याही गावी कधीच कोणत्या मंदिरात दर्शनाला जात नाही. परंतु पुस्तकांच्या दुकानात अवश्य जातो. चार-दोन पुस्तकं विकत आणतो. माझ्या लहान मुलीला माहिती असते बाबा बाहेरगावी गेले ते पुस्तकच आणणार... आजवर जवळपास वीसपेक्षा जास्त ग्रंथालयांना पुस्तकं भेट म्हणून दिली आहेत. शक्यतोवर एका वेळेस शंभरपेक्षा जास्तच पुस्तकं भेट दिलीत. मी घरी गमतीनं म्हणतो, मी मेल्यावर माझ्या ग्रंथसंग्रहाचा जाहीर लिलाव करा, घरावरील सर्व कर्ज सहज फेडलं जाईल एवढी रक्कम निश्चितच या संग्रहातून उभी राहील.
घरची मंडळी (बायको नावाचा प्राणी) बोलून बोलून थकलीत. त्यांच्याही पचनी पडले की, हा माणूस आता काही सुधारत नाही. त्यामुळे तिलाही आता पुस्तकांची अडचण वाटत नाही.
माझ्या गावात पुस्तकं लवकर मिळाली नाही, तर ती मिळवण्यासाठी मी सरळ प्रकाशकांनाच व्ही.पी.पी.ने पार्सल पाठवण्यासाठी सांगतो किंवा ‘बुकगंगा डॉटकॉम’वरून खरेदी करतो. हमखास सात दिवसांत हवं ते पुस्तक घरपोच मिळतं.
रस्त्यावरून किंवा रद्दीच्या दुकानांतून पुस्तकं खरेदी करण्याच्या काही विलक्षण आठवणी आहेत का?
नरेंद्र लांजेवार : आमच्या शहरात रद्दीच्या दुकानात किंवा रस्त्यावर पुस्तक विक्री होत नाही. परंतु पुण्यात गेलो की, मुद्दाम रस्त्यावरच्या दुकानांकडे पाय वळतात. चुकूनमाकून एखाद्या वेळेस छान पुस्तकं मिळतात. मला खूप वर्षांपूर्वी पुण्यात जॉन रस्कीनच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद असलेला निबंधसंग्रह सहज मिळाला. म. गांधीजींना हे पुस्तक प्रेरणादायी वाटले होते.
आता यापुढे एकही पुस्तक खरेदी करायचं नाही असं कधी ठरवलं का? आणि त्यावर अंमलबजावणी केली का? केली असल्यास त्याचा अनुभव? जर अशी अंमलबजावणी करता आली नसेल तर ती का?
नरेंद्र लांजेवार : असं अजून तरी झालं नाही. नवनवे लेखक दरवर्षी पुस्तकरूपानं पुढे येत असतात. नव्यांचेही विचार समजून घेण्यासाठी त्यांचीही पुस्तकं वाचलीच पाहिजेत. आपल्याला जो दरमहा पगार मिळतो, त्यापैकी दहा टक्के पगार सामाजिक कार्यासाठी व दहा टक्के आपल्या आवडीच्या छंदासाठी आपण खर्च केलीच पाहिजे, या मताचा मी आहे. त्यामुळे महिन्यातून तीन-चार चित्रपट, काही मासिकांची वर्गणी, मुबलक दिवाळी अंक, काही नवीन पुस्तकं आपण विकत घेतलीच पाहिजे, असं मला वाटतं. कारण हा साहित्य-कला-भाषिक व्यवहार आहे. माझ्या व्यक्तिगत आनंदाचा तो एक हिस्सा आहे. लोक यापेक्षा जास्त पैसा व्यसनांवर खर्च करतात. आपण सांस्कृतिक आनंदावर खर्च करू या...
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
नव्यानं पुस्तकसंग्रह करू पाहणाऱ्या, वाचन करणाऱ्या तरुण-तरुणींना काय सांगाल?
नरेंद्र लांजेवार : नव्यानं पुस्तकसंग्रह करू पाहणाऱ्यांना एवढंच सांगेल - पुस्तके जरूर विकत घ्या, पण ती वेळ काढून नक्की वाचा. इंडोअर डेकोरेशनची गरज म्हणून त्यांचा संग्रह करू नका. जी पुस्तकं पुढील पाच-दहा वर्षं सहज पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटतील, तीच विकत घ्या. जी पुस्तकं आपल्या प्रोफेशनसाठी, व्यवसायासाठी किंवा आपल्या व्यक्तित्वासाठी महत्त्वाची वाटतात तीच विकत घ्या. अन्यथा विकत घेतलेली पुस्तकं इतरांना भेट देणं मनाला रूचत नाही आणि घरात पुस्तकांचा साठा फक्त वाढत जातो.
नव्यानं वाचन करणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करण्याएवढा मी निश्चितच मोठा नाही. त्यांना मी एवढंच अनुभवातून सांगेल की, इतर छंदांपेक्षा वाचनाचा छंद हा आपला आपल्याशी संवाद घडवून आणणारा छंद आहे. कधी-कधी स्वत:शीच केलेला संवाद हा आपल्याला खूप मोठा आत्मविश्वास देऊन जातो. सकस साहित्याच्या वाचनामुळे आपली तर्कशक्ती विवेकी बनते व आपण इतरांच्या प्रभावाखाली येत नाही. बऱ्या-वाईटाची पारख होते. माणसं पारखण्याची कला आत्मसात होते. कोणत्याही बाबा-बुवा-मौलवी-महंतांच्या किंवा गुरूंच्या पायाशी आपली अक्कल गहाण राहत नाही. माणूस म्हणून आपण जन्माला आलो आहेत, त्यामुळे मनुष्यत्वाकडेच आपली वाटचाल कशी होईल, याचा आपण सातत्यपूर्ण विचार करू शकतो. सकस वाचनामुळे कोणत्याही एकांगी टोकाचा अतिरेकी विचार न करता, भावनाविवश न होता विवेकी, सारासार बुद्धीचा, उदारमतवादी दृष्टीकोन विकसित होण्यासाठी मदत होते. त्यामुळे वाचन आपल्या आयुष्यात महत्त्वाचे मानावे. जगाच्या पाठीवर फक्त मनुष्य हाच प्राणी आहे की, जो ज्ञान, माहिती मिळवण्यासाठी वाचन करतो. मग भले हे वाचन इलेक्ट्रिकल्स गॅझेटच्या माध्यमातून का होईना, परंतु अभिजात साहित्य कलाकृती या वाचल्याच पाहिजेत. बालपणापासून आम्हाला सवय नाही किंवा आता मराठी वाचन करणे जड जाते, असे म्हणून वाचनापासून दूर जाऊ नका. वाचन ही एकमेव कला अशी आहे, जी वयाच्या कोणत्याही वर्षापासून सुरू करता येते. तेव्हा ज्या वयात वाचन सुरू करण्याची इच्छा होईल, तेथून ‘श्रीगणेशा’ किंवा ‘पुनश्च हरीओम’ करावयास काहीच हरकत नाही.
..................................................................................................................................................................
लेखक विकास पालवे प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहेत.
vikas_palve@rediffmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment