‘बजाज ग्रूप’चे माजी संचालक राहुलकुमार बजाज यांचं नुकतंच, १२ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ८४व्या वर्षी निधन झालं. तेव्हापासून त्यांच्याविषयी अनेक जण वेगवेगळ्या आठवणी सोशल मीडियावर लिहीत आहेत. मराठीतील प्रसिद्ध विनोदी लेखक मुकुंद टाकसाळे यांचा त्यांच्याविषयीचा जवळपास ५० वर्षांपूर्वीचा हा विलक्षण आणि अदभुत अनुभव. यातून बजाज यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश पडतो. टाकसाळे यांच्या ‘नाही मनोहर तरी’ (मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई, १९९४) या लेखसंग्रहात हा लेख ‘मी आणि राहुलकुमार बजाज’ या नावानं प्रकाशित झाला आहे. त्यांच्या पूर्वपरवानगीनं तो इथं पुनर्मुद्रित करत आहोत.
..................................................................................................................................................................
बीएचा शेवटचा पेपर लिहून हातावेगळा केला आणि तत्क्षणी ‘आजपासून आपली बेकारी सुरू झाली, अशी हृदयभेदक जाणीव मला झाली. ‘लोअर मिडल क्लास’मध्ये (बाकी ‘लोअर मिडल क्लास’ तरी कसला? खरं तर ‘अपर लोअर मिडल’ क्लासच!) अख्खी हयात गेल्याचा तो परिणाम असेल. पुढे ‘जर्नालिझम करावं’ असा त्या वेळी तरी माझा डाव नव्हता. झालं शिक्षण भरपूर झालं; आता मिळेल ती नोकरी पकडायची, हे मी मनाशी पक्कं ठरवूनच टाकलेलं होतं.
अर्थात मी मनाशी रगड ठरवलं म्हणून नोकरी थोडीच मिळणार होती? म्हणजे माझ्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत मुळीच वाद नव्हता. ती वाईटच होती. तशातच बीएची पदवीही अजून हाती आलेली नव्हती. बीएला स्पेशल मराठी हा दिव्य विषय! बीएला मराठी घेतल्यानंतर महाराष्ट्रात तरी नोकरी मिळणं खूपच कठीण होतं. (‘अशक्य होतं’ म्हटलं तरी चालेल.)
निरेसारख्या खेडेगावातून मी एसएससी झालेलो. बारामतीसारख्या ग्रामीण भागातल्या कॉलेजात डिग्री घ्यायला आलेलो. बीएची ती टिनपाट डिग्री! पण ती देत असताना विद्यापीठाबरोबरच देवही नुसती परीक्षा बघत होता. तर आता एकदाची संपली परीक्षा! आता नोकरी! सालाबादाप्रमाणं मी मे महिन्याच्या सुट्टीसाठी लोणावळ्यात आलो. प्रिय वाचकहो, अगोदरच्या ‘अपर लोअर’ वर्णनाशी हे वाक्य विसंगत वाटतं, याची मला पूर्ण कल्पना आहे. पण माझा नाईलाज आहे. माझा एकुलता एक मामा हा लोणावळ्यात राहायचा. (अजूनही राहतो.) म्हणून आम्ही लोणावळ्याला जायचो. तो खामगावला राहत असता तर आम्ही खामगावला गेलो असतो. तो मांजरी बुद्रुकला राहत असता तर आम्ही मांजरी बुद्रुकला गेलो असतो. लोणावळा, खंडाळा, तिथला सिझन, भारी हॉटेल्स, ती सिनेमातल्यासारखी दिसणारी देखणी माणसं, तो सुप्रसिद्ध धबधबा यांचा आणि आमचा अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता. लोणावळ्याची ‘सदाशिव पेठ’ म्हणता येईल अशा ‘भांगरवाडी’ भागातल्या मामाच्या घरात आम्ही एकदाचे येऊन पडलो की, नंतर ‘सिझनमुळं दूध कसं महागलं, सिझनमुळं भाजी कशी महागली’ अशी चर्चा कानावर पडण्यापुरतचा आमचा आणि तिथल्या ‘सिझन’चा संबंध यायचा.
लोणावळ्याला येताना मी एसएससीचं सर्टिफिकेट, एफवायबीएची मार्कलिस्ट असा दस्तवेज बरोबर घेऊनच आलो होतो. पण तेवढ्या भांडवलावर कोण नोकरी देणार होतं? ओळख पाहिजे… ओळखीशिवाय नोकरी मिळणार नाही, हे सूर्यप्रकाशाइतकं ढळढळीत सत्य होतं.
ओळख… मोठा गहन प्रश्न होता.
मी मातुल-पितुल घराण्यांतले जवळचे-दूरचे चुकते नातेवाईक आठवून पाहिले. त्यांतला एखादा जरी कलेक्टरबिलेक्टर असता तरी त्यानं कुठंतरी चिकटवून दिलं असतं. पण ते होणे नव्हते! आमचा सर्वश्रेष्ठ मानला जाणारा नातेवाईक हा पुण्यात मिल्ट्री अकाउंटसमध्ये क्लार्क होता. दुर्दैव! दुसरं काय म्हणणार या परिस्थितीला?
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
एकदा दुपारी उघड्या अंगावर वर्तमानपत्रानं वारा घेत पहुडलो होतो. कॉलेजमध्ये मी दोन वर्षं ‘मॅगेझिन-सेक्रेटरी’ म्हणून निवडून आलेलो होतो. ‘या काळात कॉलेजला ज्या ज्या थोर व्यक्तींनी भेट दिलेली होती, त्यांपैकी कुणी मला नोकरी देऊ शकणारं होतं का?’ यावर माझं चिंतन चालू होतं.
युरेका! युरेका!! मला हुकमी नोकरी देऊ शकणारी व्यक्ती सापडली, राहुलकुमार बजाज! हे नाव आठवताक्षणी अर्धोन्मीलित नेत्रांनी पहुडलेला मी ताडकन उठून उभा राहिलो.
‘बजाज ऑटो’चे चेअरमन आणि मॅनेजिंग डिरेक्टर राहुलकुमार बजाज हे त्यांच्या काही कामासाठी म्हणून एकदा बारामतीला आले होते. ती संधी साधून कॉलेजनं त्यांना बोलावलं होतं. प्राचार्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी कॉलेजला अक्षरक्ष: धावती भेट दिली होती. ते कारमधून खाली उतरले, तेव्हा समोरच आम्ही ‘विद्यार्थी प्रतिनिधी मंडळा’तली मंडळी रांगेनं उभी होतो. क्रिकेटवीरांची करून देतात तशी प्राचार्यांनी आमच्यातल्या एकेकाशी त्यांची ओळख करून दिली. माझा नंबर आल्यावर प्राचार्यांनी माझं नाव त्यांना सांगितलं. त्यांनी हसून हस्तांदोलन केलं. तो क्षण कॅमेऱ्यानं नेमका टिपला होता आणि अमर करून ठेवला होता!
एवढ्यावर राहुलकुमार बजाज यांनी मला नोकरी द्यायला काहीच हरकत नव्हती. एवढ्या मोठ्या कारखान्याच्या चेअरमनला इतकी छोटी कामगिरी जमणार नाही, असं होणंच शक्य नव्हतं.
‘शुभस्य शीघ्रम्!’ चांगल्या कामाला वेळ कशाला लावायचा? मी शर्ट अडकवला आणि तडक लोकल पकडली. अगोदर फोन करून भेट ठरवण्यावर माझा विश्वास नव्हता. त्याचं साधं कारण हे होतं, की फोनची म्हणून एक संस्कृती असते, त्या संस्कृतीशी पूर्ण परिचय झाला नाही तर फोनवर बोलायचं म्हणजे संकट वाटतं. तेव्हा नकोच ते!
चिंचवडला उतरलो. स्टेशनबाहेर आल्यावर ‘बजाज ऑटो’ची फॅक्टरी कुठंय? असं विचारत विचारत निघालो. चालत चालत. खाली डांबरी सडक, वरून सूर्य आग ओकतोय. बस असणारच. पण कुठं बसला थांबायला वेळ घालवायचा? असा खेडवळ विचार करून चालतच निघालो झालं! घामानं शर्ट अंगाला चप्प चिकटला होता. ऊन मी म्हणत होतं. म्हणणारच. ते फक्त मे महिन्यातलं ऊन नव्हतं, तर बेकारीतल्या मे महिन्यातलं ऊन होतं!
चालतोय, चालतोय, पण आकुर्डीची फॅक्टरी काही दिसायला तयार नाही. एका दयाळू सायकलस्वारानं फर्लांगभरची लिफ्ट दिली. पायांना तेवढीच विश्रांती. पुन्हा तंगडेतोड सुरू. अखेर एकदाची ती सुप्रसिद्ध फॅक्टरी दिसली आणि मी सुटकेचा श्वास सोडला. फॅक्टरीच्या प्रवेशद्वारापाशी आल्यावरच मला अर्धीअधिक लढाई जिंकल्यासारखं वाटलं.
आत सिक्युरिटीच्या भल्यामोठ्या काचगृहात पोचल्यावर तिथल्या गार्डांनी ‘आज फॅक्टरीला सुट्टी आहे’ ही शुभवार्ता कानावर घातली. मी या बातमीनं खचण्याअगोदर तिथल्या कूलरमधलं तीन ग्लास पाणी गटागटा प्यायलो. कूलर अदभुत होता. बजाज स्कूटरचा ब्रेक जसा पायात असतो, तशा पद्धतीची योजना तो कुलर सुरू करण्याची होती. खाली पाय दाबला की, वरच्या नळातून थंडगार पाण्याची धार यायची. या गंमतीमुळं मी जरुरीपेक्षा एक ग्लास पाणी जास्त ढोसलं. (पुढंमागं राहुलकुमार बजाज यांच्यावर लिहिण्याचा प्रसंग आला तर ‘लाथ मारीन तिथं पाणी काढीन’ ही त्यांची कर्तबगार वृत्ती कशी प्रवेशद्वारातल्या कूलरपासूनच दृष्टीस पडत होती, हे आठवणीनं नमूद करायचं - हेही मी त्याच वेळी ठरवून टाकलं होतं.)
पाणी पिऊन झाल्यावर मला जरा टवटवी आली. चेहऱ्यावर थोडा आत्मविश्वासही आला असावा. मी एका गार्डला म्हणालो, “देखो भाई, मैं बारामती से आया हूं | मेरा राहुलकुमार बजाजसाहब के पास एक इम्पॉर्टण्ट और अर्जंट काम हैं | मुझे उनसे आजही मिलना हैं |”
सिक्युरिटी गार्डनं मला जवळच असलेला राहुलकुमार यांचा बंगला दाखवला. मी मनात म्हटलं, ते घरी सापडले तर फारच बरं. थोडं निवांतपणे, व्यवस्थित बोलता येईल. फॅक्टरी चालू असती तर तिथल्या खडखडाटात नीट बोलताही आलं नसतं. मी बंगल्याच्या फाटकापाशी येऊन उभा राहिलो. फाटकावर ‘Beware of Dogs’ अशी पाटी आहे का, हे काळजीपूर्वक पाहून घेतलं. नव्हती. फाटक उघडून आत प्रवेश करणार तोच बंगल्याचा माळी कुठून तरी धावत आला, म्हणाला, “कौन चाहिए?”
“राहुलकमार बजाजसाहब से मिलने के लिए मैं बहुत दूर से, मतलब बारामती से आया आया हूं | और मेरा जो काम हैं…”
“साब फॅक्टरी में ही हैं |” त्यानं उत्तर दिलं.
मी पुन्हा काचगृहात परतलो. तिथल्या मघाच्याच गार्डला म्हणालो, “राहुलकुमारसाहब अंदर फॅक्टरी में ही हैं |” ज्या अर्थी बंगल्यातून मला ही माहिती मिळाली, त्या अर्थी ‘हा फाटका माणूस तसाच कुणीतरी महत्त्वाचा माणूस असणार’ किंवा ‘त्याचं काम तरी महत्त्वाचं असणार’ असा विचार त्या गार्डनं केला आणि आत राहुलजींच्या पीएला फोन जोडला. पीएला माझा माहिती पुरवून झाल्यावर पीएनं त्या गार्डला“काय काम आहे?’ हे विचार असं सांगितलं असावं. त्यानं फोन चालू असताना मध्येच मला विचारलं, “क्या काम हैं |”
इथं मी धूर्तपणा दाखवला. पीएला मी नोकरीविषयी काही बोललो असतो, तर त्यानं मला बाहेरच्या बाहेर कटवलं असतं. म्हणून मी “पर्सनल काम हैं और वो मैं राहुलकुमार बजाजसाहब को ही बताउंगा!” असं उत्तर दिलं. गार्डनं हे उत्तर पीएपर्यंत पोचवल्यावर मध्ये अर्ध्या मिनिटाचा वेळ गेला. त्या काळात राहुलकुमारांचं आणि पीएचं काही तरी आपापसात बोलणं झालं असावं. गार्डनं रिसीव्हर ठेवता ठेवता ‘आप को साहब ने अंदर बुलाया हैं’ असं जाहीर केलं. एवढंच नव्हे तर त्यांचं ऑफिस मला सापडणार नाही म्हणून तो स्वत: माझ्याबरोबर त्यांच्या केबिनपर्यंत आला. सर्व फॅक्टरीभर आणि परिसरात कमालीची शांतता होती. सुट्टी असली तरी राहुलकुमार बजाज यांनी काही महत्त्वाच्या इन्यागिन्या लोकांची मिटिंग बोलावलेली होती. मी त्यांच्या केबिनपाशी पोचलो, तेव्हा ती मिटिंग संपलीच होती. चार-पाच एक्झिक्युटिव्हज रुबाबदारपणे बाहेर पडले.
सर्वांत शेवटी राहुलकुमार बजाज बाहेर आले. विलक्षण रुबाबदार व्यक्तिमत्त्व! त्या वेळी ते चाळिशीच्याही आतल्या वयाचे होते. माझ्याकडे बघून ते प्रसन्न हसले. त्या हसण्यानं मला थोडा धीर आला. “येस?” त्यांनी मला विचारलं.
बीएला माझा दुसरा विषय इंग्रजी असूनही आणीबाणीच्या प्रसंगी मला राष्ट्रभाषेचाच आधार वाटायचा. मी काही बोलण्यासाठी तोंड उघडणार एवढ्यात आतून त्यांची पीए बाहेर आला. त्यानं घाईघाईनं त्यांच्यासमोर उघडी फाइल धरली. मजकुरावर धावती नजर फिरवून राहुलकुमार यांनी उभ्याउभ्याच डाव्या हातानं झोकदारपणे सह्या ठोकल्या. मी स्वत: डावखोरा असल्यानं राहुलकुमारांएवढा मोठा माणूस माझ्यासारखा डावखोरा आहे, हे बघितल्यावर मला विलक्षण समधान वाटलं. (अमिताभ बच्चनला ‘आनंद’मध्ये डाव्या हातानं डायरी लिहिताना बघितल्यावरही मला असाच आनंद झाला होता.) सह्या घेऊन झाल्यावर पीए आत निघून गेला. आता आम्ही दोघंच एकमेकांसमोर उभे होतो : मी आणि राहुलकुमार बजाज!
“वो क्या है सर… मैं… मेरा नाम है मुकुंद टाकसाळे… मुझे जॉब की बहुत जरुरत है | मैं उसलिए बारामती से आया हूं | मैंने बीए के पेपर्स दिए है और…” मी तमाम हिंदी चित्रपट मनातल्या मनात आठवून भराभरा वाक्यं जुळवत बोलत होतो. राहुलकुमार यांनी अत्यंत प्रेमळ स्मितहास्य करत माझ्या खांद्यावर हात ठेवला. ते म्हणाले, “मुकुंद, कल आप सुबह आठ बजे हमारी फैक्टरी में आइए | हमारे पर्सोनेल मैनेजर अय्यर हैं - वे आपका इंटरव्ह्यू लेंगे | ओ.के.?”
“थँक यू. थँक यू व्हेरी मच.” मी प्रचंड म्हणजे प्रचंड खूश झालो.
म्हणजे आता ‘बजाज’मध्ये नोकरी मिळाल्यातच जमा होती! साक्षात राहुलकुमार बजाज यांनीच सांगितल्यावर तो पर्सोनेल मॅनेजर उद्या मला ‘नाही’ थोडाच म्हणणार होता? (एक गोष्ट : पर्सोनेल मॅनेजरचं नाव नेमकं काय होतं ते मला आठवत नाही. पण ‘अय्यर’सारखंच काहीतरी दाक्षिणात्य नाव होतं, हे खरं. तूर्त आपण त्यांना ‘अय्यर’चं म्हणू.)
उद्याचा इंटरव्ह्यू हा ‘फॉर्मलिटी’चाच एक भाग असणार हे उघड होतं. पण तरीही आपल्याकडून हयगय होता कामा नये. इंटरव्ह्यू चोख झाला पाहिजे. माझ्या मार्कलिस्टस लोणावळ्याला होत्या, आणि वक्तृत्वस्पर्धांची, कथाकथनाची प्रशस्तिपत्रकं, माझं साहित्य छापून आलेले कॉलेजच्या नियतकालिकांचे अंक, हे सारं बारामतीला होतं. हे सगळं एका रात्रीत गोळा करून उद्या मला सकाळी आठला आकुर्डीला बजाज फॅक्टरीत हजर व्हायचं होतं. राहुलकुमार बजाज यांचे (नोकरी दिल्याबद्दलच) मन:पूर्वक आभार मानून मी हवेत तरंगत तरंगतच चिंचवड स्टेशनवर येऊन पोचलो. या वेळी चालण्याचे श्रम जाणवलेच नाहीत. रस्ता तापला होता, पण चटके बसले नाहीत. ऊन रणरणत होतं, पण ताप जाणवला नाही. मी लोकल पकडून पुणे स्टेशनवर आलो. हळूहळू संध्याकाळ पडू लागली होती.
बारामतीला त्या वेळी साडेपाचच्या दरम्यान एक एसटी पुणे रेल्वे स्टेशन एसटी स्टँडवरून सुटायची. ती प्लॅर्टफॉर्मवरच लागलीच होती. लागलीच मी आत घुसलो. आत मरणाची गर्दी! कंडक्टर बिनरिझर्व्हेशनवाल्यांवर मनसोक्त तोंडसुख घेत होता. त्यानं वसवस करून गाडीभर उभे असलेल्यांना खाली उतरवलं. एरवी मीही एवढे जोडे खाण्यापेक्षा सरळ खाली उतरलो असतो; पण या वेळी उतरलो असतो तर उद्याची नोकरीच गेली असती! बस चालू झाल्यावर कंडक्टरला सर्व परिस्थिती समजावून सांगितली. त्यानं उदार अंत:करणानं तिकीट फाडलं. चार तास उभं राहून मी बारामतीला पोचलो.
स्टँडवरून तरातरा घराकडं निघालो. वाटेत एका सलूनपाशी कॉलेजमधले काही दोस्त उभे होते. त्या टोळक्याचं खरं तर माझ्याकडं लक्षही नव्हतं. पण मीच वेळात वेळ काढून तिथं थांबलो. एकाच्या हातातली सिग्रेट घेऊन एक-दोन झुरके मारले. मग घाईघाईनं त्याच्या हातात सिग्रेट परत देत मी म्हणालो, “चला, जातो राव. उद्या इंटरव्ह्यू आहे पुण्यात ‘बजाज’ला.”
“बजाजला?” अपेक्षेप्रमाणं कुणीतरी आश्चर्यचकित होऊन प्रश्न विचारला.
“हो, राहुलकुमार बजाज यांनीच बोलावलंय.” मी चेहऱ्यावर आणता येतील तेवढा सहजपणा आणून म्हणालो.
“आयला! जोरात हाये न् काय्!” अपेक्षेप्रमाणं ही प्रतिक्रिया आल्यावर मात्र मी घराकडं जवळजवळ धावतच सुटलो. घरी भराभरा कॉलेजच्या नियतकालिकांचे अंक, वक्तृत्वस्पर्धांची प्रशस्तिपत्रं वगैरे गोष्टी गोळा केल्या. एका प्लॅस्टिकच्या पिशवीत कोंबल्या आणि पुन्हा एसटी स्टँडकडे धाव घेतली.
‘वालचंदनगर-मुंबई’ ही रातराणी बारामतीहून त्या काळात रात्री दहाच्या दरम्यान सुटायची. मे महिना म्हणजे गर्दीला तोटा नाही. आता एवढ्या रात्री प्रवाशांना प्रवास करायची काही जरूर होती का? मला लोणावळ्यालाच जायचं असल्यानं कंडक्टरनं फार खळखळ न करता गाडीत घेतलं. गाडीत उभं राहायला का होईना पण जागा मिळाली, याचाच मला आनंद झाला. घोडे उभ्याउभ्याच झोपतात म्हणे, मी तसा उभ्या उभ्या पेंगतच चारेक तासांचा प्रवास केला. सुदैवानं पुण्याला बसायला जागा मिळाली. रात्री दोन वाजता. आता तासभर निवांत झोप मिळणार होती.
पहाटे तीनला लोणावळ्याच्या स्टँडवर उतरलो. तिथून भांगरवाडी दीड मैल आत. भुतासारखा एकटाच चालत चालत निघालो. माझ्याच चपलांचे आवाज आसमंतात भीतीदायक घुमत होते.
साडेतीनला मामाच्या घरी आलो. चालून चालून आणि एसटीतच उभं राहून राहून पायांचे अगदी तुकडे पडायची वेळ आली होती. तिथं दिवे वगैरे लावून अख्खं घरं जागं केल्यावर मी सुटकेस उघडून माझ्या एफवायबीएच्या मार्कलिस्टस बाहेर काढल्या. एसएससीचं सर्टिफिकेटही घेतलं. पहाटे चारला पाचचा गजर लावून आणि इतरांची पुरेशी झोपमोड करून मी झोपायसाठी अंथरुणावर अंग टाकलं. पण झोप काही येईना. डोळ्यांसमोर नोकरी मिळाल्याची सुखद, तर इंटरव्ह्यूची भयप्रद स्वप्नं दिसत होती.
पाचचा गजर ठणाणला. भराभर दाढी-आंघोळ उरकली. आजोबा, आजी, मामा, मामी, आई वगैरे ज्येष्ठ मंडळींना पुन्हा एकदा झोपेतून उठवून त्यांच्या पाया पडलो. एखाद्याची भल्या पहाटे झोपमोड करू नये असल्या शहरी ‘मॅनर्स’पेक्षा मला त्यांचे आशीर्वाद घेणं मोलाचं वाटत होतं. हा त्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे.
पुन्हा तंगडेतोड करत रेल्वेस्टेशनवर आलो. पहाटे सहाची लोकल पकडली. पेंगत, झोपत, डुलक्या घेत चिंचवडला आलो. स्टेशनबाहेर आल्यावर हॉटेलात एक झकास चहा मारला. आता बजाज ऑटोपर्यंत रिक्षानं जायचं हे मी ठरवूनच टाकलेलं होतं. एक तर चालण्याचं पायांत त्राणच उरलेलं नव्हतं. शिवाय आयुष्यातला पहिलावहिला इंटरव्ह्यू. तोही बजाजमधला! तो चेहऱ्यावरचा, मानेवरचा घाम पुसत पुसत देण्यात काय मजा? तिथल्या अधिकाऱ्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाची एकदम छाप पडली पाहिजे!
बरोबर आठला दहा मिनिटं कमी असताना मी बजाजच्या सिक्युरिटीपाशी हजर होतो. राहुलकुमार बजाज यांनी अय्यरसाहेबांना माझ्याबद्दल सांगून ठेवलेलं होतं. मी कारखान्यात प्रवेश केला. या वेळी कारखाना जोरात चालू होता. गणवेषांतले कामगार आपल्या कामात मग्न होते. यंत्रांच्या आवाजानं अख्खा कारखाना दणाणून निघत होता. अशाच आवाजाच्या पार्श्वभूमीवर मी अय्यरसाहेबांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. खरं तर इंटरव्ह्यू या वातावरणात व्हावा, असं मला मुळीच वाटत नव्हतं. कालच्यासारख्या शांत वातावरणात मला चार शब्द धड बोलता तरी आले असते. आता या खडखडाटात मी अय्यरसाहेबांवर काय छाप पाडणार? मी अगोदरपासूनच बऱ्यापैकी नर्व्हस झालो होतो.
अय्यरसाहेबांचं व्यक्तिमत्त्व काहीसं उग्र होतं. मी ‘गुड मॉर्निंग’ म्हणालो तेही त्यांच्या कानावर पडलं की नाही कुणास ठाऊक? त्यांनी मला माझी एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स विचारली. मी सांगितली. प्लॅस्टिकच्या पिशवीतून सर्टिफिकेटस काढून दाखवू लागलो. तर ते म्हणाले, “नो नो… इटस नॉट नेसेसरी. एनी टेक्निकल क्वालिफिकेशन्स?”
‘नो’
‘टायपिंग?’
‘नो’
त्यांच्या बहुतेक प्रश्नांना मी नुसते ‘नो’कार देत चाललो होतो. इतके ‘नो’कार दिल्यानंतर नोकरी काय मिळणार ते दिसतच होतं. तीन-साडेतीन मिनिटांनंतर अय्यर खेदानं मान हलवत म्हणाले, “यू कॅन गो.”
“बट सर… यू सी… प्लीज सी माय शॉर्टस्टोरीज पब्लिश्ड्… अल्सो आर्टिकल्स…” मी कॉलेजची मॅगेझिन्स बाहेर काढू लागलो.
“नो, दॅटस नॉट नेसेसरी. यू कॅन गो नाऊ.” त्यांनी अल्पावधीतच इंटरव्ह्यू संपवूनही टाकला.
मी खिन्न होत्साता बाहेर पडलो. सकाळची वेळ असूनही ऊन कालच्यापेक्षा जास्त जाणवत होतं. मला या प्रकारचा इंटरव्ह्यू मान्य नव्हता. मी बीएची परीक्षा दिलीय, हे कालच राहुलकुमार बजाज यांना स्पष्ट सांगितलं होतं. तरीही त्यांनी मला बोलावून घेऊन अय्यरसाहेबांच्या तावडीत का द्यावं? आणि अय्यरसाहेबांनी मी आणलेल्या कागदांपैकी एक चिटोरंसुद्धा बघण्याची इच्छा दाखवू नये ना! वास्तविक ‘शिवसेने’ची भूमिका मला कधीच मान्य नव्हती. त्याही काळात. तरीही त्या दिवशी माझ्यातला ‘शिवसैनिक’ जागा झाला. मी मनाशी संतापून म्हणालो, “हे साउथ इंडियन साले असेच! मराठी माणसाला ते कधीच पुढं येऊ देणार नाहीत!”
विशेषत: शेवटचा अपमान मला फार लागला. भावी मराठी लेखक स्वत: होऊन त्याचं छापून आलेलं लिखाण दाखवायचं म्हणतो आहे आणि हा अय्यरसाहेब त्याबद्दल काडीमात्रही उत्सूकता दाखवत नाही म्हणजे काय?
डांबरी रस्त्यावरून चिंचवडच्या दिशेनं चालताना मला अगदी भिंगुळवाणं वाटू लागलं. कालची प्रवासाची दगदग, रात्रभरचं जागरण, चुरचुरणारे डोळे… मला विलक्षण केविलवाणं वाटू लागलं. प्रवासखर्चापोटी माझे नाही म्हटलं तरी बाविसेक रुपये खर्च झाले होते आणि ही रक्कम त्या वेळी माझ्या दृष्टीनं खूपच मोठी होती.
लोणावळ्याला आलो तरी अय्यरसाहेबांनी माझी सर्टिफिकेटस, लिखाण न बघताच इंटरव्ह्यू घेतला, याचं शल्य मला राहून राहून बोचत होतं. ही सर्टिफिकेटस आणण्यासाठी मी केवढी यातायात केली होती! मी त्याच तिरमिरीत राहुलकुमार बजाज यांनी एक खरमरीत पत्र लिहिलं. पत्र अर्थातच हिंदी भाषेत होतं :
“… राहुलजी मैंने सर्टिफिकेटस लाने के लिए चिंचवड से पूना, पूने से बारामती, बारामती से रातराणी पकडकर फिर लोनावला, लोनावले से भोर होते ही चिंचवड, चिंचवड से आकुर्डी इतनी यातायात की | (‘यातायात’ या हिंदी शब्दाचा अर्थ ‘प्रवास’ असा होतो; पण मराठी अर्थानंही माझी बरीच यातायात झाली होती!) मेरा भाडेखर्चा करीब पच्चीस रुपये हो गया | अय्यरसाहब ने मेरे सर्टिफिकेटस भी देखे नहीं. यह कहा का इन्साफ हैं?...”
अय्यरसाहेबांच्या दुष्ट वागण्याचं माप हिंदी भाषेत त्यांच्या पदरात घालून मी मोकळा झालो होतो. माझा निषेध मी तीव्रपणे नोंदवलेला होता. या पत्राची राहुलकुमार बजाज दखल घेतील, असं समजण्याइतका मी नक्कीच भाबडा नव्हतो. हिंदी में यह खत लिखने के बाद मैंने मेरी तरफ से इस चैप्टर पर परदा डाला! म्हणजे माझ्याकडून मी हे सारं प्रकरण विसरून गेलो.
आणि काय आश्चर्य! आठवड्याच्या आत ‘बजाज ऑटो’चे चेअरमन आणि मॅनेजिंग डिरेक्टर, दस्तुरखुद्द राहुलकुमार बजाज यांचं तब्बल दोन पानी दिलगिरी व्यक्त करणारं पत्र पोस्टमननं आणून दिलं. मी चकणाच झालो. बजाजचं लेटरहेड, अप्रतिम कागद, MD PERS 29040 हा संदर्भ-क्रमांक आणि खाली साक्षात राहुलकुमार बजाज यांची सही. माझ्या ८ मे १९७३ ला पाठवलेल्या पत्राला त्यांनी ११ मे १९७३ला उत्तर पाठवलं होतं. पत्राचा स्वैर मराठी अनुवाद येणेप्रमाणे :
“प्रिय श्री. टाकसाळे,
तुमचं ८ मेचं पत्र मिळालं.
चिंचडवडला येण्यापूर्वी तुम्हाला बारामती आणि लोणावळ्याहून सर्टिफिकेटस गोळा करायची तसदी पडली, हे वाचून मला वाईट वाटलं.
आदल्या दिवशी आपली अगदी थोडा वेळ भेट झाली होती. इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला ही सर्टिफिकेटस कुठून-कुठून गोळा करायची आहेत, याची मला स्वाभाविकच कल्पना नव्हती. तुम्ही नुकतीच पदवी पराक्षी दिलेली आहे आणि निकाल अजून लागायचा आहे, याचीही मला कल्पना नव्हती. तुम्हाला रु. २५ खर्चावे लागल्याचं दु:ख मी समजू शकतो. आमच्या अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे तुमचा इंटरव्ह्यू घेतला, त्याबद्दलचं तुम्हाला वाटणारं दु:ख मी समजू शकतो. परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या : कंपनीलाही काही नियमांत विशिष्ट पद्धतीनंच काम करावं लागतं. तुमचा परीक्षेचा निकाल लागलेला नसल्यानं संबंधित अधिकारी तुमचा पद्धतशीर इंटरव्ह्यू घेऊ शकले नाहीत. तुम्ही निकालानंतर इंटरव्ह्यूसाठी यावं हेच त्यांचं म्हणणं होतं. नाहीतर मग त्यांना ‘ज्युनिअर पोस्ट’साठी तुमचा विचार करावा लागला असता. ‘ज्युनिअर पोस्ट’साठीसुद्धा आता व्हेकन्सी नव्हतीच. पण तशी ती असती तरी तुम्ही ‘ज्युनिअर पोस्ट’ स्वीकारायला तयार झाला असता का?
कृपया लक्षात घ्या : फक्त माझ्या एकट्याच्या इच्छेवर कंपनीत नोकरी दिली जात नाही. अर्जदाराची गुणवत्ता पाहून मुलाखत घेणारे संबंधित अधिकारी त्याला नोकरी द्यायची की नाही, ते ठरवतात.
तुमच्या खर्चाची भरपाई म्हणून मी रु. २५चा चेक सोबत पाठवीत आहे. जाता जाता एवढंच सांगतो : परीक्षेचा निकाल लागल्यावर तुम्ही आमच्या पर्सोनेल मॅनेजरना पत्र लिहा. जर त्या वेळी जागा भरायच्या असतील तर ते तुम्हाला मुलाखतीला बोलावतील.
आपला,
राहुल बजाज”
हे पत्र वाचून मला गहिवरून यायचंच काय ते बाकी राहिलं. आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू मी ‘असा’ दिला. त्याचा टीए, डीए चोख वसूल केला. (आता सांगायला काहीच हरकत नाही : माझे बावीसच रुपये खर्च झाले होते, पण मी तीन रुपये जास्तच वसूल केले!)
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आज हे सारं प्रकरणं आठवलं की, स्वत:च्याच मूर्खपणाचं हसू येतं. आज राहुलकुमार बजाज यांची अशी थेट भेट घ्यायची झाली तर मी शंभर वेळा मनाशी विचार करीन. पण ते वेडं वय होतं. ‘जिथं देवदूत जायला कचरतात, तिथं मूर्ख बेधडक घुसतात’ असं जे म्हणतात, ते उगाच नाही! (ही घुसखोरी पुढं पत्रकारितेत लुडबुड करताना मला बरीच उपयोगी पडली, हे मात्र तेवढंच खरं!)
पण त्या वेळचं राहुलकुमार बजाज यांचं सौजन्यशील वागणं आठवलं की, आजही आश्चर्य वाटतं. खरंच मोठ्या मनाचा माणूस! कुठला कोण भाबडा तरुण नोकरीच्या आशेवर त्यांच्याकडं येतो काय, ते त्याची गाठ घेतात काय, त्याच्या दुखावलेल्या मनावर फुंकर घालण्यासाठी समजूत काढणारं लांबलचक पत्र लिहितात काय, आणि नुकसानभरपाई म्हणून चक्क पंचवीस रुपयांचा चेक पाठवतात काय… सारंच अघटित!
बेकारीची सुरुवातच इतकी सुंदर आणि देखणी झाली की, माझा जगण्यावरची, माणसांवरची श्रद्धा लाख पटीनं वाढली. त्यामुळंच नोकरी न देऊनसुद्धा मी राहुलकुमार बजाज यांचा जन्माचा ऋणी आहे!
.............................................................................................................................................
लेखक मुकुंद टाकसाळे प्रसिद्ध विनोदी लेखक आहेत.
mukund.taksale@gmail.com
.............................................................................................................................................
मुकुंद टाकसाळे यांच्या ‘मुका म्हणे’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3459
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment