‘डोकं शाबूत आहे’ : ही कादंबरी वाचून कदाचित आपल्यालाही स्वतःचा नव्यानं शोध घेता येईल
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
श्रीकांत कामतकर
  • ‘डोकं शाबूत आहे’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 11 February 2022
  • ग्रंथनामा शिफारस डोकं शाबूत आहे Doka Shabut Aahe गीता जोशी Geeta Joshi

‘डोकं शाबूत आहे’ ही गीता जोशी यांची पहिलीच कादंबरी एकप्रकारे मानवी मनोव्यापाराचं जिगसॉ पझलच आहे. या कादंबरीतून मनू या मुलाचा बालवाडी ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक आणि मानसोपचारतज्ज्ञ म्हणून व्यावसायिक प्रवास फ्लॅशबॅक आणि फास्ट-फॉरवर्ड पद्धतीनं उलगडतो.

अर्थसंपन्न, ज्ञानसंपन्न आणि विचारसंपन्न कुटुंबात वाढणारा मनू, घरात तीन पिढ्यांच्या नातलगांचा वावर, आलवणात वावरणाऱ्यांपासून परदेशात शिकणाऱ्यांपर्यंत सगळ्यांचाच प्रभाव, या सगळ्यांचे आचारविचार, संस्कार असूनही मनूच्या बालमनाला रोज पडणारे असंख्य प्रश्न, त्यांची उत्तरं मिळवताना होणारी गोची आणि हुरहूर उलगडत जाते. कुतूहलानं विचारलेल्या साध्यासाध्या प्रश्नांना मिळणारी ‘गप्प बैस फार शहाणा आहेस’, ‘शास्त्र असतं ते’ किंवा ‘मोठा झाल्यावर कळेलच की’ अशी वळसा घालणारी तकलादू उत्तरे, त्यातून बालमनाला येणारी बेचैनी वाचकाला स्वानुभवाच्या आठवणींत गुरफटणारी आहे. काही प्रसंगांत तर प्रकाश नारायण संतांच्या लंपनचीच आठवण होते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

मनू व त्याची कधी वरचढ ठरू पाहणारी धाकटी बहीण सई यांच्यातली स्पर्धा किंवा मनू आणि त्याच्या मित्रांची गॅंग, परस्परांतील दोस्ती-दुश्मनीचे, फायटिंग व शायनिंगचे किस्से त्यांची पौगंडावस्थेतील मन:स्थिती, मनूसाठी आई म्हणजे तर ‘लव्ह-हेट रिलेशनशिप’चे शेवटचे स्टेशनच. रुसवे-फुगवे, चिडणे-कुढणे सगळे आईभोवतीच, तिच्याबरोबरच्या नात्याच्या वर्तुळाची त्रिज्या नेहमी मोठी आणि सर्वांत जास्त प्रभावही तिचाच. बाबा, आजी-आजोबा, बाकी सगळे जरा त्याला त्याच्या गटातले, सांभाळून घेणारे वाटतात, पण तेही एका मर्यादेपर्यंतच.

मनूच्या शैक्षणिक प्रवासातील अडथळ्यांच्या कच्च्या-पक्क्या रस्त्यांची, वळणांची, गतिरोधकाची, गर्दीची, बंद सिग्नल्सची, खोट्या नियमांची, मोठ्या शिक्षांची, चकवण्याची आणि थकवण्याची ही कहाणी त्याच्या नजरेतून पुढे येते, तेव्हा त्यांची दाहकता अंगावर येते.

एका विद्यार्थ्याच्या नजरेतून आपल्या प्रचलित शिक्षणव्यवस्थेचे पोस्टमार्टेम बघताना चक्रावायला होते. यापूर्वी शिक्षणव्यवस्थेतल्या प्रश्नांसंबंधीच्या ‘कोसला’ (डॉ.भालचंद्र नेमाडे) ‘निशाणी डावा अंगठा’ (रमेश इंगळे उत्रादकर) या कादंबऱ्यांनीही असेच वाचकांना अस्वस्थ केले होते. मनू या शिक्षणव्यवस्थेचा पाया कसा कमकुवत झाला आहे ते दाखवतो. ‘Only thing that interferes with my learning is my education’ हे अल्बर्ट आईन्स्टाऊन यांचं कादंबरीत शेवटी दिलेलं अवतरण खरं वाटू लागतं.

मनू मानसोपचारतज्ज्ञ डॉ.मानव राजहंस होतो, तोच मुळी ‘डोके शाबूत आहे, ठेवणारच आहे’ या जिद्दीचं दर्शन घडवणारा म्हणून. फास्ट-फॉरवर्डमध्ये त्याचे काही पेशंट आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याशी होणाऱ्या संवादातून आपल्याला जगण्याचा अविभाज्य भाग बनलेल्या प्रश्नांचं वादळ घोंगावताना दिसतं. डिप्रेशन, सिझोफ्रेनिया, पॅनिक डिसोर्डर फोबिया, ओसीडी, हिस्टेरिया डॉ.मानवकडे येणाऱ्या रोजच्या पेशंट्सच्या रोगनिदानांची ही शास्त्रीय नावं.

एका सेशनमध्ये फक्त पाचच पेशंट, नंतर पंधरा मिनिटांचा विराम, ही मानवची कामाची पद्धत... जणू त्यांच्या साऱ्या समस्यांचा निचरा करून मगच नव्या समस्यांना सामोरं जायला मेंदू तयार करायचा...

आपला आवडता औषधशास्त्राचा सोडून मानसोपचारासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात मानव जातो, डॉक्टर अल्बर्ट एलिस यांच्या ‘रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी’च्या या उपचार पद्धतीशी त्याची मैत्री होती. विवेकनिष्ठ विचारातून वर्तन-परिवर्तन यापेक्षा डोकं शाबूत आहे, हे समजवणारं दुसरं काय असणार!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आत्महत्येचा प्रयत्न करणारा अमोल मेरिट आणि कौतुक यांची सवय असलेला संशोधक, पण स्वतंत्र निर्णयक्षमता नाही, आई-वडिलांचे लाड यातच गुरफटलेला. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेली स्मिता त्याच्याशी प्रेमविवाह केलेला असतानाही जुळवून घेऊ शकत नाही. अशीच कहाणी, पराग आणि अमृताची. दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर. आपल्याच कामात बुडालेले, पण एकमेकांना पुरेसा वेळच न देणारे. स्पर्म टेस्टवरून त्यांचं बिनसतं. ते मानवकडे येतात. अशा अनेक रुग्णांशी व कुटुंबियांशी संवाद करताना मानवला समजते- मोडकळीस आलेला जिव्हाळा, दुरावलेले कौटुंबिक नातेसंबंध, पराकोटीची अंधश्रद्धा, भौतिक सुखाच्या मोजपट्टी वरची न सुटणारी नजर, वास्तवापेक्षा डिजिटल आभासी जगातच राहण्याची प्रवृत्ती. या साऱ्यांचा मूळ कशात आहे, तर, विवेकी विचारशक्तीचा अभाव, दिखाऊ भौतिक समृद्धीचा प्रभाव, नकार पचवण्याची हरवलेली ताकद, आत्ममग्नता... ही यादी मारुतीच्या शेपटासारखी वाढतच जाणारी...

स्वतःच्या शिक्षण प्रवासात, डोकं शाबूत ठेवण्याचा धडा पक्का केलेला मानव म्हणूनच आपल्या भोवतीच्या समस्यांना डोकं शाबूत ठेवून सामोरं जातो, इतकंच नव्हे तर आपल्याकडे येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनाही चिकाटीनं ही ‘जगण्याची कला’ शिकवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सभोवतालच्या दैनंदिन जगण्यात या प्रश्नांची सोडवणूक कशी होणार, हा विचार आपल्या प्रत्येकाच्याच मनात येतो.

ही कादंबरी वाचून कदाचित आपल्यालाही स्वतःचा नव्यानं शोध घेता येईल.

‘डोकं शाबूत आहे’ - गीता जोशी

सृजन गंध प्रकाशन, सोलापूर

मुखपृष्ठ - रविमुकुल

पाने - ४१६

मूल्य - ४१० रुपये.

.................................................................................................................................................................

डॉ.श्रीकांत कामतकर

drkamatkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......