अजूनकाही
वाचनाच्या प्रवासात अनेक पुस्तके आपल्याकडे येत असतात. नुकतेच यतींद्र मिश्र यांनी लिहिलेले हिंदीतले ‘लता सुर-गाथा’ हे पुस्तक हाताशी आले. तब्बल ६५० पानांचे पुस्तक एका बैठकीत वाचून संपवले तेव्हाच स्वस्थता लाभली. इतक्या बारीक-बारीक गोष्टी नव्याने समजत गेल्या की, विचारता सोय नाही. लतादीदींचे गाणे ऐकतच आपली पिढी लहानाची मोठी झाली. त्यांच्यावरचं इतके छान पुस्तक मराठीत अभावानेच आले असावे.
लतादीदींबद्दल अनेकांनी लेख लिहिले आहेत. दीदींशी आपुलकीने गप्पा मारणारे, त्यांच्यावर लेख लिहिणारे अनेक आहेत, पण नीट अभ्यास करून, सामान्यांना समजेल अशा भाषेत मांडणारे फारच थोडे. त्यापैकीच एक यतींद्र मिश्र. तब्बल सहा वर्षे निव्वळ फोनवर बोलून हे पुस्तक सिद्ध झालेलं आहे. माणूस फोनवर त्याच्याशीच मोकळेपणाने बोलतो, ज्याच्यावर विश्वास असतो. दीदींचा विश्वास लेखकाने कमावला. रोज संध्याकाळी सातची वेळ फोनवर बोलण्याची ठरलेली असायची. कधी-कधी बोलणे संपून फोन बंद केल्यावरदेखील दीदींचा फोन लेखकाला जायचा. एखादी आठवण, एखादा किस्सा परत नव्याने सांगितला जायचा.
एकदा लेखकाने फोन करायला तब्बल अर्धा एक तास उशीर केला. दीदी रागावल्या नाहीत, पण संभाषण संपताना इतकेच म्हणाल्या की, ‘माझं पडद्यावरचं गाणं फार-फार तर तीन ते चार मिनिटांचं असायचं आणि आज फोनला तीस मिनिटे उशीर म्हणजे ‘किती गाणी तुम्ही चुकवलीत ते तुम्हीच बघा,’ अशा शेलक्या शब्दांतला अहेर दीदींकडून मिळाल्यानंतर वेळेवर फोन न करण्याची लेखकाची काय बिशाद?
या पुस्तकात दीदींनी त्यांच्या लहानपणापासूनचा सगळा संघर्ष स्वत:च्या शब्दांत सांगितला आहे. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक आठवणी प्रथमच या पुस्तकातून रसिकांसमोर आल्या आहेत. दीदींचा मिश्किल स्वभाव तर पानापानांतून जाणवतो. त्यांचा आवाज काळाला ओलांडून जाणारा होता, यावर तमाम संगीतकारांचा विश्वास होता.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
शास्त्रीय गाण्यातले बरेच जण आक्षेप घेतात की, दीदींना शास्त्रीय गायन जमलं नसतंच, पण ताईंची शास्त्रीय गायनाची तालीम पक्की होती. त्यांच्या संगीताच्या शिक्षणाची सुरुवातच हंसध्वनीसारख्या रागाने झाली होती, असे त्या सांगतात. दीदींबद्दल पं. अशोक रानडे लिहितात की, दीदींच्या आवाजातल्या तीन-चार मिनिटांच्या गाण्याने एखादा अनवट रागदेखील प्रस्थापित होतो. एक अख्खी पिढी गाणं शिकायला दीदींमुळे बाहेर पडली, असेही लेखक आपल्याला समप्रमाण दाखवून देतो.
दीदींनी आपल्या मदतनीसांबद्दल फारच ममत्वाने यात लिहिलं आहे. गुलाम हैदरने केलेली सुरुवातीची मदत, कवी शैलेंद्रचं आजारपणात रोज येऊन दीदींशी गप्पा मारणं, अशा अनेक खाजगी गोष्टींबद्दल दीदी मोकळेपणाने बोलतात. त्या काळात दीदी आपलं नावही रेडिओवर ऐकायला यावं म्हणून स्वत:च एखाद्या गाण्याची फर्माइश पाठवायच्या. जेव्हा रेडिओ घ्यायची ऐपत आली, तेव्हा घरी येऊन रेडिओवर गाणी ऐकता-ऐकता मध्येच गाणे थांबवून के. एल. सैगल गेल्याची बातमी दिल्यावर त्यांना तोच रेडिओ अपशकुनी वाटला, म्हणून त्यांनी तो परत केला. चित्रपटक्षेत्रात शकुन-अपशकुन यांचं जरा प्रस्थच असतं.
एकदा प्रसिद्ध संगीतकार चित्रगुप्तांचं गाणं रेकॉर्ड होणार होतं. स्वत: चित्रगुप्त लंगडत-लंगडत स्टुडिओत येताना बघून दीदींचा जीव कळवळला. त्या त्यांना म्हणाल्या, ‘‘काही होतंय का?’’ तर चित्रगुप्त आपली चप्पल दाखवत म्हणाले, ‘‘अगं काही नाही, या चपलेचा अंगठा तुटला आहे.’’ दीदींना वाईट वाटले. म्हणाल्या, ‘‘चला, आपण अगोदर तुम्हाला नवीन चप्पल घेऊया. मग गाणे रेकॉर्ड करू.” तर चित्रगुप्त दीदींना थांबवत म्हणाले, ‘‘अगं असू दे, माझ्याकडे चपला बऱ्याच आहेत, पण ही माझी लकी चप्पल आहे म्हणून मी रेकॉडिंर्गला याच चपला घालतो.” अशा अनेक किश्शांची पुस्तकभर पखरण आहे.
स्वत:च्या कष्टांच्या दिवसांबद्दल बोलतानादेखील दीदी उगाच करुण होत नाहीत. त्यांच्या गाण्यातला दर्द /नजाकत, शब्दोच्चार या सगळ्या मागे दीदींची तपश्चर्या होती. उपाशी-तापाशी राहून स्टुडिओतल्या; धूळ मातीत बसून वेळी-अवेळी गायलेली दीदींची अजरामर गाणी आपल्यास आजही सुखावतात, अपार आनंद देतात, पण त्या मागे उपसलेले कष्ट वाचून वाचकही बऱ्याचदा हळवा होऊन जातो. सुरुवातीला एका मंदिराशेजारी दीदींचं वास्तव्य होतं. सकाळच्या वेळी दीदी आपल्या गाण्याचा रियाज त्या मंदिरात बसून करायच्या, त्यावर लेखक म्हणतो की, असला सुरमयी आवाज ऐकायला देवही प्रत्यक्ष तिथे हजर होत असावेत!
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
दीदींना नाझिर हिकमतच्या कविता आणि कवी माहीत होता हे वाचून तर मी आश्चर्यचकितच झालो. तुर्कस्तानच्या बंडखोर नाझिर हिकमत या कवीला शिक्षा म्हणून संडासच्या टाकीत बुडवून ठेवायचे. त्यातूनही तो आपल्या कविता जोरकसपणे म्हणत रहायचा. त्याच्यावर लक्ष ठेवणारे सैनिकच नंतर त्याची कविता म्हणायला लागले. अशा कवीची माहिती करून घेणे, त्याबद्दल संवेदना व्यक्त करणे खरेच अचाट आहे. त्या काळातले हे संवेदनशीलतेचं एक दुर्मीळ लक्षण आहे.
अनेक मोठ्या कलाकारांच्या सहवासामुळे माझं गाणं समृद्ध झालं असं त्या कबूल करतात. शास्त्रीय संगीतातले दिग्गज ऐकताना त्यांच्या सारखी तान आपल्याला घेता यावी, असा प्रयत्न सतत दीदींनी केला आणि काही गाण्यात तो अंमलातही आणला. दीदींना एकटं भटकायला खूप आवडतं, पण प्रसिद्धीच्या झोतामुळे ते दिवसेंदिवस अवघड होत गेलं. याच कारणास्तव म्हणजे सफलतेची किंमत म्हणून माझा भारत बघायचा मात्र राहून गेल्याची खंत दीदी व्यक्त करतात.
अनेक संगीतकारांना भैरवी रागात गाणी रचायला खूप आवडायचं. ‘छोड गये बालम’ (शंकर जयकिशन), ‘छोड दे सारी दुनिया’ (कल्याणजी आनंदजी), ‘दिल का खिलौना हाय टूट गया’ (वसंत देसाई) अशी या रागातली दीदींची गाणी अजरामर झाली आहेत, पण स्वत: दीदींना मात्र भैरवी गायला आवडत नाही, हे वाचून आपणही चमकतो. दीदी गाताना सूर पकडण्यासाठी एका व्हायोलीन वादकाला जवळ बसण्यास सांगत, यासारखे संदर्भ वेगळे आणि खरेच कालातीत आहेत.
एके ठिकाणी लेखक आपल्याला सांगतो आता वाचणं थांबवा आणि दीदींनी गायलेल्या एका दुर्लक्षित चित्रपटातील (शंकर हुसैन १९७७) खय्यामने संगीत दिलेलं गाणं ऐका. खरंच सांगतो ‘अपने आप....’ हे गाणं आज माझ्या संग्रहातलं खास गाणं ठरलं आहे. दीदींचा मखमली आवाज, खय्यामचं संगीत, कैफ भूपालीची रचना यात दीदींचा आवाज मन भरभरून राहतो. त्यांचं ‘अपने आप...’ म्हणणं आपल्याला पार हळवं करून टाकतं, मग नकळत आपण दीदींच्या अनेक गाण्यांमध्ये असेच गुंतत जातो. पुस्तक बाजूला राहते.
दीदींचा मुलायम आवाज आणि आपण इतकेच उरतो. अनेक वादग्रस्त मुद्द्यांबद्दल लेखकाने दीदींना बोलतं केलं आहे. राजकपूर, एस्.डी. बरोबरचं भांडण, ओ.पी. नय्यर बरोबर न जुळलेला सूर... सुमन कल्याणपूरकरबद्दल छेडले असता दीदींचे वाक्य काळजात घुसते. दीदी म्हणतात, ‘प्रतिभा के साथ आपका मौलिक होना भी जरुरी हैं!’
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
दीदींना खाण्यात जिलेबी आवडते किंवा मुंबईतल्या गेलॉर्ड हॉटेलमध्ये त्या काळातले तमाम संगीतकार, दिग्दर्शक एकत्र जमायचे आणि मजा करायचे, हे ऐकून माहीत होते, पण पुस्तकात वाचल्यानंतर अस्मदिक बरोड्यातल्या गेलॉर्डमध्ये नित्यनियमाने निदान चहा तरी पिण्यासाठी जातातच.
अगदी एके ठिकाणी दीदी केसांना कुठले तेल लावतात असाही प्रश्न लेखक करतो, तेव्हा दीदी हसून याही प्रश्नाचे उत्तर मला द्यायला लागेल का? असे उलट विचारून साधेपणाने त्याचे उत्तर देऊन टाकतात.
अनेक पुरस्कार दीदींना मिळाले. अगदी भारतरत्नसारखादेखील, तरीही तिरुपतीच्या देवस्थानाने दिलेला पुरस्कार दीदींना मोलाचा वाटतो आणि त्याहीपेक्षा सुरुवातीस कष्टाच्या दिवसात माईंचे गमावलेले तमाम दागिने स्वत:च्या पैशाने परत करून दिल्यावर आईच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान दीदींना अधिक मोलाचे वाटते.
यतींद्र मिश्रसारख्या हिंदी लेखकाने दीदींचा कमावेलला विश्वास त्यांच्या संवादातून पानोपानी जाणवतो. अॅमेझॉनवर या पुस्तकाची चौकशी करताना आजतागायत एकट्या डोंबिवलीतच या पुस्तकाच्या तब्बल २६ प्रती विकल्या गेल्या आहेत असेही कळले. लताप्रेमींसाठी हे पुस्तक म्हणजे खरे तर एक पर्वणीच आहे. यात स्वत: दीदींनी आपल्या आवडत्या १६ गाण्यांची यादीही दिली आहे. संदर्भसूची / छायाचित्रं यामुळे पुस्तकाचा भारदस्तपणा नक्कीच वाढला आहे.
तब्बल ३६ भाषेत गायलेल्या दीदींचे सात्त्विक रूप या पुस्तकाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे!
(‘शब्द रुची’च्या मे २०१९च्या अंकातून साभार)
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Lata-Sur-Gatha-Yatindra-Mishra
.................................................................................................................................................................
गणेश मनोहर कुलकर्णी
magnakul@rediffmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment