अजूनकाही
मराठीतील प्रसिद्ध लेखक डॉ. अनिल अवचट यांचं नुकतंच निधन झालं. त्यांचं ‘आणखी काही प्रश्न’ हे पुस्तक तत्पूर्वी प्रकाशित झालं आहे. समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला अवचटांनी लिहिलेलं हे मनाेगत...
..................................................................................................................................................................
सुनंदा गेली आणि वाटलं, आता आपलं लेखन बंद होणार. लिहायला तिचं प्रोत्साहन, गावोगावी हिंडायला तिची मुभा, म्हणून तर मी लिहिता होतो. आता पुढे काय? पण तसं झालं नाही. नंतरही मी लिहिता राहिलो. ‘आणखी काही प्रश्न’ हे पुस्तक प्रसिद्ध होताना माझं मलाच आश्चर्य वाटतं आहे.
१९६६-६८च्या दरम्यान मी लिहायला सुरुवात झाली. १९६९मध्ये माझं पहिलं पुस्तक आलं. आता २०२१ संपत आलं तरी मी लिहितोच आहे. ५० हून अधिक वर्षं. काही उत्तमोत्तम लेखकांचं साहित्य महान; पण त्यांची कारकीर्द दोन-चार पुस्तकांत आटोपलेली. माझ्याही लिखाणात अनेक चढ-उतार आले, पण कधी खंड पडला नाही. ‘वेध’च्या एकपानी स्फुटापासून लिखाणाला सुरुवात झाली. त्या आठवड्यात जे सुचेल, जे दिसेल त्यावर भाष्य. पुढे लिखाण जरा विस्तृत झालं. ‘छेद’ आणि ‘रिपोर्टिंगचे दिवस’ ही त्या लिखाणाची पुस्तकं. ते लिखाण घटनांवर आधारित होतं. त्यानंतरचा टप्पा म्हणजे ‘कोंडमारा’ पुस्तकातले लेख. एखाद्या घटनेवरची प्रतिक्रिया म्हणून लिहिले गेलेले. ती घटना घडली नसती, तर तो लेखही झाला नसता. ज्यांच्यावर अत्याचार झालाय, त्यांच्याकडे जायचं, घटना सांगोपांग समजून घ्यायची. मग अत्याचार केलेल्यांकडे जायचं आणि त्यांची बाजू ऐकायची. मग पोलीस, तलाठी, अलिप्त माणसं यांच्याकडे वळायचं. शेवटी निष्कर्ष काढायचा.
हळूहळू या लिखाणात घटनेचा भवताल डोकावू लागला. पडकी घरं, रिकामी स्वयंपाक घरं, बरगड्या निघालेली कृश मुलं, घाबरलेली-सुन्न माणसं अशी सगळी दृश्यं या लेखात येऊ लागली. वेश्यांवरच्या लेखात वेश्यावस्त्या, त्या कळकट्ट इमारती, तिथली दुकानं, नाना वस्तू विकणारे लोक, वेश्यांच्या खोल्या, तिथलं दारिद्रय, सगळ्या परिसराला व्यापून असलेला वीर्याचा वास असं बरंच काही. बस्तरच्या आदिवासी भागात गेलो होतो, तिथल्या एका झोपडीत एकच म्हातारी बसलेली. झोपडीत ना काही सामान, ना अन्नाचा कण. जसं जसं नवं जग, नवे समाज, नवे प्रश्न पाहत गेलो, तसं ते सारं वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लिहीत गेलो. विषयांनुसार शैली बदलत गेली.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
नंतरच्या काळात माझ्या लिखाणात निसर्ग डोकावू लागला. त्याचं मुख्य कारण माझे मित्र श्री. द. म्हणजे बापू महाजन. त्यांच्याबरोबर जंगलं, देवराया फिरलो. प्रभू वगैरे मित्रांनी कर्नाटकातली जंगलं दाखवली. आजवर माणसांचे प्रश्न पाहत-लिहीत आलो होतो. या मित्रांनी निसर्गावरच्या संकटांची जाणीव करून दिली. वाटलं, माणसं आपलं संरक्षण करू शकतात, स्थलांतर करू शकतात, पण झाडं अगदीच हतबल. आजवर गरिबांची बाजू घेत होतो. आता झाडांची, पाणवठ्यांची, हिमनद्यांची बाजू दिसू लागली. मग तसं लिहिणं सुरू झालं. एकातून दुसरे विषय समोर येऊ लागले. मालवण भागात मच्छिमारांच्या हाल-अपेष्टांविषयी जाणून घेत होतो. जाऊन पाहणी केली. तिथे प्राध्यापक अनिल रानडे भेटले. त्यांनी फिशरी कॉलेजमधलं म्युझियम दाखवलं आणि माझे डोळेच उघडले. केवढी विविधता. जगण्याच्या किती तर्हा... आणि हे सगळं माणसाच्या संहारामुळे धोक्यात आलंय. माझ्या पाहणीचा रोखच बदलला.
हळूहळू प्रत्येक वेळी माणसांपलीकडच्या या दुसऱ्या जगाकडेही माझं लक्ष जाऊन लागलं. माणूस स्वसंरक्षण करू शकतो, तसं निसर्गाला करता येत नाही, हा विचार जास्त प्रभावी झाला. साल बोअरर नावाचा किडा आल्याची अफवा पसरली आणि त्या नावाखाली हजारो साल वृक्ष सपाट झाले. थोडक्यात, निसर्गापुढची खरी समस्या म्हणजे माणूसच आहे, याची जाणीव होऊ लागली.
मी प्रश्नांवर लिहू लागलो, तसं काही लोक म्हणू लागले, अमक्या प्रश्नावर लिहा. पण मला असं ठरवून लिहिता येत नाही. आतमध्ये त्या विषयाची ठिणगी पडावी लागते, मग मला कोणी थांबवू शकत नाही. कुठला विषय कधी भिडेल ते आधी सांगता येत नाही. बलुतेदारांच्या पाहणीसाठी बारामतीजवळच्या माळेगावला गेलो. बारामतीत सगळे संडास जुन्या पद्धतीचे होते. मेहतरांनी स्वच्छ ठेवलेले. ते पाहिले. मैल्याच्या टोपल्या ओढून बाहेर काढायच्या आणि त्या डोक्यावरून वाहून न्यायच्या. एके दिवशी मीही त्यांच्यासोबत काम करू लागलो. तेव्हा त्यांनी मला स्वीकारलं. त्यांचं जगणं माझ्यासमोर उलगडू लागलं. मग बलुतेदार हा मूळ विषय बाजूला पडला आणि याच विषयाच्या मागे लागलो. तालुक्याच्या बहुतेक गावी आणि छोट्या शहरात त्या वेळी शौचालयांची हीच पद्धत होती. सगळीकडे फिरलो. लिहीत गेलो.
होरपळलेलं जग या विषयाकडे आपण वळू हे लेख लिहिण्यापूर्वी माहीतही नव्हतं. माझी मेहुणी डॉ. माधुरी गोरे बर्न्स वॉर्डमध्ये काम करत होती. तिने तिचे विभाग दाखवायला नेलं, तोपर्यंत या विषयाची ठिणगी पडली नव्हती. पण जेव्हा ती पडली, तेव्हा त्यात ओढलाच गेलो. या समस्येच्या मागेही गरिबी हे कारण होतंच. छोटी घरं, स्वयंपाकघरात ओटा नसल्याने बसून स्वयंपाक. त्यातून स्टोव्हवर. त्यातून पदर पेटले जायचे. कधी पेटवलेही जायचे. माधुरीकडून या प्रश्नाच्या कितीतरी बाजू कळल्या. चेहरा भाजल्यावर विद्रूप होऊन जायचा. त्यामुळे बायकांचे नवरेच काय, मुलंही जवळ फिरकायची नाहीत. मग त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न समोर उभा रहायचा.
प्रत्येक प्रश्नाला सामाजिक बाजू असते. मग तो एड्सग्रस्तांचा प्रश्न असो, किंवा घटस्फोटित आई-वडिलांच्या मुलांचा प्रश्न असो. जंगलतोडीचा प्रश्न असो, की क्षारपड जमिनींचा प्रश्न असो. असे अनेक प्रश्न प्रत्यक्ष जाऊन पाहिले. पूर्वी समाजांबद्दल, घटनांबद्दल लिहायचो, तेव्हा फिरणं जास्त असे. पण अलीकडचे विषय असे की, त्यात अभ्यासाची गरज भासू लागली. मी तसा अभ्यासू नाही. पण तरी ढोबळमानाने माझा अभ्यास असे आणि तो माझ्या वाचकांना पुरेसा असे. धरणात अमुक तमुक टीएमसी पाणी हे, असं म्हणण्यापेक्षा धरण पाण्याने निम्मंच भरलं आहे, हे समजायला सोपं. माझ्या लेखांना आकडेवारीचं ओझं होतं. मी सर्वसामान्य, माझ्यासारख्याच वाचकांसाठी लिहितो. मला आकडे झेपत नाहीत, तर माझ्या लेखाला आणि वाचकांना ते कसे झेपणार?
आकडेवाडीचं महत्त्व मला माहीत आहे. शास्त्रीय स्वरूपातल्या लेखात ती असणं आवश्यक आहे. काही लेखांमध्ये ती नसणं हा दोष धरला जातो. पण इथे माझ्या लेखांचा हेतू वेगळा. मला वाचकांना या प्रश्नांचं अस्तित्त्व जाणवून द्यायचं होतं. त्या प्रश्नांमुळे लोकांच्या आयुष्यावर काय परिणाम झालाय ते सांगायचं होतं. मग उगीच शास्त्रीय भाषा कशाला? उलट शास्त्रीय ज्ञान सोप्या शब्दांत समजावून सांगायला हवं. ते कसं करायचं? मग मी त्या त्या क्षेत्रातल्या ज्ञानी मंडळींचा शोध घेऊ लागलो.
नशिबाने मला प्रत्येक लेखावेळी असे ‘गुरूजन’ मिळत गेले. श्री. द. महाजन, जिऑलॉजीचे करमरकर सर, कीटकशास्त्रातला रघुनाथ डुंबरे अशी कितीतरी मंडळी. काही खरोखर गुरूच्या वयाची, तर काही माझ्यापेक्षा कितीतरी लहान. पण तरी तीही माझी गुरूच. गुरूकडून विद्या घेताना ती गाळून घ्यावी लागते. कारण ज्ञान अथांग आहे. आपली गरज बाटलीभर पाण्याची. सर्व ज्ञान मिळवण्याचा अट्टाहास कशाला? म्हणून मी तपशीलांपेक्षा मर्म समजून घेण्यावर भर देऊ लागलो.
मधल्या काळात मला एक नवा गुरू भेटला. कामधेनूच जसा. जे मागाल त्याचं उत्तर मिळेल. तो म्हणजे गूगल. नमस्कार नको, गुरुपौर्णिमा नको, त्याच्या घरी जाऊन त्याचा वेळ खायला नको. उलट तोच हवा तेव्हा आपल्या घरी हजर. विषय टाईप केला की, माहितीची-लेखांची-दृष्टीकोनांची माळच समोर येते. त्यातला पसंतीचा लेख निवडून निवांतशीर वाचावा. विषय समजून घ्यावा.
अशा नाना गुरूजनांकडून समजून घेऊन मांडलेले हे आणखी काही प्रश्न. ते समजून घेताना मनाला वेदना होतात. बहुतेक सगळे प्रश्न माणसाने तयार केलेले. माणूस खरंतर एवढा बुद्धिमान. पण आपली हाव, अतिरिक्त तहान, वखवख आणि ती भागवण्यासाठी निसर्गसंहार करताना हे पुढे आपल्या मुळावर येणार हे त्याला कसं कळलं नाही? १९९० सालानंतर हा संहार जास्त फोफावला. जागतिकीकरणानंतर रोज नवनवे प्रश्न. थेट मुळापर्यंत पोहोचून विनाश करणारे. सतलज नदीच्या काठावरची दाट देवदाराची जंगलं तोडली आणि तिथे तब्बल ४२ की ४५ बांध बांधले. कशासाठी? तर वीजनिर्मितीसाठी. वीज कोणासाठी? तर सिमल्यासाठी आणि दिल्लीसाठी.
काही प्रश्नांना ते जबाबदार, तर काही प्रश्नांना आपण. सगळ्यांनीच जागं झालं पाहिजे. हे प्रश्न चिघळत जाण्यापासून रोखण्यासाठी आपल्याला जमेल तेवढं काम केलं पाहिजे. त्यासाठी या पुस्तकाची मदत होईल ही अशी आशा आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
माझा हा ५०-६० वर्षांचा लेखन प्रवास. इतक्या सातत्याने एखादी गोष्ट मी करू शकतो, हे माझं मलाच खरं वाटत नाही. तसं चित्र, ओरिगामी, लाकडातली शिल्पं वगैरेही केली. पण ती अधूनमधून. लहर लागली तर करायचं, नाहीतर विसरून जायचं. पण लिखाणाचं मात्र तसं झालं नाही. कुणी मागे लागलं नाही, कुणा संपादकाची ऑफर नाही, तरी लिहीत राहिलो.
‘आणखी काही प्रश्न’ हे त्या प्रवासातलं शेवटचं पुस्तक तर नव्हे? मुळीच नाही. मला कधीही सुचू शकतं. काहीही, कितीही. मोठमोठे लेख लिहिले, तशा छोट्या कविताही लिहिल्या. कथा लिहिणार नाही, असं म्हणत मुलांसाठी छोट्या कथांचे तीन संग्रह झाले. प्रखर वास्तव लिहिलं, तसं तरल ललितही लिहिलं.
जे मनात आलं ते लिहीत गेलो. अजूनही आलं मनात तर लिहीनही. कदाचित लिहूच नये असं वाटलं तर? तर काय वाहवाच! डोक्यावर गोधडी पांघरून मस्त झोपून जाणं.
‘आणखी काही प्रश्न’ - अनिल अवचट
समकालीन प्रकाशन, पुणे
मूल्य - २०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment