अजूनकाही
“An open Facebook page is simply a psychiatric dry erase board that screams, “Look at me. I am insecure. I need your reaction to what I am doing, but you’re not cool enough to be my friend. Therefore, I will just pray you see this because the approval of God is not all I need.”
― Shannon L. Alder
फेसबुकचं छोटं भावंड म्हणून ओळख असलेल्या इन्स्टाग्रामचा सर्वांत लोकप्रिय सोशल मीडिया अॅपमध्ये चौथा क्रमांक असून १ बिलियन लोक त्याचा दर महिन्याला वापर करतात. या ‘इन्स्टाग्राम’वर ‘थेरगाव क्विन’ म्हणून जबरदस्त फॉलोअर्स असणाऱ्या दोन मुलींनी नक्की काय केलं की, त्यांना अटक झाली, असं अनेकांना वाटलं. काही म्हणाले, ‘कितीतरी मोठे लोक शिवराळ भाषा वापरतात, एआयबीसारख्या कार्यक्रमांत तर हे सर्रास चालतं, मग याच मुलींनी काय चूक केली?’ काहींना वाटलं, निव्वळ शिव्या देऊन या मुलींनी ७० हजार फॉलोअर्स कसे मिळवले?
लक्ष वेधणं हेच चलन (attention is currency) असणाऱ्या सध्याच्या अर्थव्यवस्थेत आल्यापैकी बहुतेक जण लक्ष वेधून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसतो. माझ्या ओळखीतल्या एकाने सोशल मीडिया, विशेषकरून फेसबुक बंद करायचं, हा प्रयोग काही महिने करून बघितला. ही व्यक्ती २०१०पासून फेसबुकचा वापर करत आहे, तरीही तिच्या बहुतेक ओळखीतल्यांनी, नातेवाईकांनी तिचं काय झालं, हेसुद्धा विचारलं नाही. तीने काही महिन्यांनी परत अकाऊंट सुरू केल्यावर त्याच लोकांनी ‘कुठे होता?’ वगैरे प्रश्न आपुलकी दाखवत विचारले. या छोट्या प्रयोगातून हे लक्षात आले की, मध्यमवर्गीय सोशल मीडियाच्या किती आहारी गेले आहेत.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
सर्वसाधारण अमेरिकन व्यक्ती आपला फोन एका दिवसात २६२ वेळा पाहते आणि त्यातील सगळ्यात जास्त वेळा ती सोशल मीडियाचा वापर करते. स्मार्टफोनवर असणाऱ्या वेगवेगळ्या नप्सचा संबंधित मोबाईलधारक जास्तीत जास्त वापर कसा करेल, अशीच बनवलेली असते. त्यासाठी रितसर मानवी वर्तणुकीचा वेगवेगळ्या पण अनैतिक तत्त्वांचा वापर करून केला जातो. ही अॅप्स या दोन प्रकारची असतात. पहिला प्रकार, supplement आणि दुसरा, म्हणजे addictive. supplementमध्ये बँक, उबेर, ओला, झोमॅटो यासारखी अॅप्स येतात, तर addictiveमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप, टिकटॉक, इन्स्टाग्राम व ट्विटर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म येतात. ही अॅप्स Persuasive Designच्या तत्त्वांचा वापर करून बनवलेली असतात. त्यांची रचना मानवी मेंदूवर वेदनाशामक औषधासारखा परिणाम करते. Motivation, ability आणि trigger या तीन घटकांवर आधारलेलं डॉ. बी. जे. फॉग यांचं ‘Fogg Behavior Model’ व्यक्तीला प्रेरित करून एखादी वस्तू किंवा सेवा घेण्यास कसं भाग पाडता येईल, यासाठी वापरलं जातं.
‘Royal society of public health’ यांनी ब्रिटनमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असं आढळून आलं आहे की, गेल्या २५ वर्षांत चिंता व औदासीन्य यांत ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या सर्वेक्षणानुसार इन्स्टाग्राम हे मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं सर्वांत हानिकारक अॅप आहे.
(पहा - https://www.rsph.org.uk/our-work/campaigns/status-of-mind.html
इन्स्टाग्रामवरील ९० टक्के वापरकर्ते वयवर्षं ३५च्या खालील आहेत. ते दररोज ५४४ मिलियन छायाचित्रं इन्स्टाग्रामवर टाकतात. ज्यांनी इन्स्टाग्राम वापरलं असेल त्यांना माहीत असेल की, अगदी सुरुवातीला अकाउंट सुरू केल्यानंतर जे फीड (छायाचित्रं/व्हिडिओ) येतं, ते सूचक वा थेटपणे स्त्री-पुरुषांच्या शारीरिकसंबंधांशी निगडित असतं. काही छायाचित्रं अतर्क्य पण लक्ष वेधून घेणारी असतात. त्या छायाचित्रांतील रचना आपण स्वप्नात बघतो, तशा विचित्र, वस्तूस्थितीशी संबंध नसणाऱ्या असतात. त्यामुळे आपली नजर त्यावर खिळून राहते आणि आपल्याला स्क्रोल करून आणखी बघावंसं वाटतं.
एखादं बक्षीस मिळाल्यावर किंवा नशेचा पदार्थ घेतल्यावर जे डोपामिन मेंदूत स्त्रवतं, तेच सोशल मीडियाच्या लाईक्स, कमेंट्समुळेही स्त्रवतं. त्यामुळे जसे लहानपणी लागलेले दारू, सिगरेट, कोकेनचे व्यसन सुटत नाही, तसेच सोशल मीडियाचेसुद्धा सुटत नाही. वाढत्या वयात ‘स्व’च्या कल्पना अपरिपक्व असतात. घरी समजून घेणारे, योग्य मार्ग दाखवणारे आई-वडील, भाऊ-बहीण, आजी-आजोबा, योग्य शिक्षक नसतील तर मुलं-मुली सिनेमाच्या/ टीव्हीच्या/ सोशल मीडियाच्या आभासी जगात रममाण होतात. आधीच्या काळात ‘थेरगाव क्वीन’सारखी तरुणाई गुन्हेगारीच्या मार्गाने जायची, आता ती इन्स्टाग्राम/फेसबुकसारख्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं समाजविघातक गोष्टी करताना दिसतेय.
एवढं विघातक अॅप या कंपन्यांनी का तयार केलं असावं? उत्तर सोपं आहे- फायदा. आपण जितकं जास्त स्क्रोल करणार, तितका महसूल वाढतो. त्यामुळे आपण २४ तास या अॅपवर असावं, अशी या कंपन्यांची इच्छा असते. त्यांना आपल्या आरोग्याशी काहीही घेणंदेणं नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींना ‘customer experience’च्या नावानं खपवलं जातं. ग्राहकाला जे आवडतं, ते आम्ही देतो, असं सोशल मीडिया व अगदी ओटीटी प्लॅटफॉर्मसारख्या कंपन्या स्पष्टीकरण देतात. User customizationमुळे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या फेसबुक/ इन्स्टाग्राम/ ट्विटरवर दिसणारा मजकूर त्याच्या मेंदूच्या रचनेनुसार असतो. मेंदूची रचना आपण जे लाइक्स, कमेंट्स, फॉलो करतो, त्यावरून या कंपन्यांना कळते.
एखादी गोष्ट आपल्या सुप्त मेंदूत असते, जी आपल्याला माहीत नसते. सगळ्या सोशल मीडिया व ओटीटी कंपन्यांकडे चाणाक्ष बुद्धिमत्ता असलेले मानसशास्त्रज्ञ आहेत. ते या सुप्त मेंदूपर्यंत पोहोचू शकतात. ज्यांचे मेंदू परिपक्व आहेत, त्यांचं ठीक आहे, ते विचार करून थांबू शकतात, मात्र अपरिपक्व मेंदूंना हीच गोष्ट मोहात टाकते. त्यांच्या मेंदूचा नियंत्रणाचा भाग पुरेसा विकसित नसल्यानं व्यसन चटकन लागतं आणि ते सुटण्याची शक्यता कमी असते.
एकंदरीत सर्व ठिकाणी सेक्स व हिंसा यांवरील मजकूर, छायाचित्रं वा व्हिडिओ सर्रास दिसतात. हे सर्व खरं तर प्रौढांसाठी असतं, पण स्मार्टफोनमुळे ते अगदी एक वर्षाच्या बाळालाही पाहता येतं. मग त्याचा परिणाम होणार!
बहुतेक सोशल मीडिया अॅप्स अमेरिकन कंपन्यांची असून त्यावर अमेरिकन-संस्कृतीची छाप आहे. संगीत, सिनेमा व नृत्य अशा बहुतेक आघाड्यांवर अमेरिकन कला बऱ्यापैकी मुक्त लैंगिक आयुष्याचा प्रचार-प्रसार करते. ‘मला तुझा उपयोग असेल तर तू माझा सखा’ अशा एका वाक्यात ‘वापरा व फेका’छाप अमेरिकन-संस्कृतीचं वर्णन करता येत. ही वृत्ती त्यांच्या नागरिकांत व राजकारण्यांच्या वागण्यातून सहज दिसते. व्हिएतनाम युद्ध, आखाती घुसखोरी अशा घटना असोत वा अगदी ‘प्लेबॉय’, पॉर्न विश्व किंवा जगभरात लोकप्रिय असलेला अमेरिकन व्यावसायिक सिनेमा वा ‘फ्रेंड्स’सारख्या मालिका असोत, या सगळ्यातून स्वार्थी व कामुकतेभोवती फिरणारी अमेरिकन-संस्कृती दिसून येते.
गेल्या २० वर्षांत इंटरनेट व सॅटेलाईटमुळे जग जवळ आलं. त्यामुळे हीच संस्कृती जगभरात पसरली, लोकप्रिय झाली. सोशल मीडिया कंपन्या त्याचा कळस आहेत. यातील बहुतेक कंपन्या शाळा/कॉलेज अर्धवट सोडलेल्यांनी काढलेल्या आहेत. (इन्स्टाग्रामचा संस्थापक Kevin Systrom हा स्टॅनफर्ड विद्यापीठातून Symbolic Systems Programचा विद्यार्थी होता. यात तंत्रज्ञान व मानवी वर्तणूक यांचा अभ्यास केला जातो.) त्यांना जग बदलायचं होतं, असं त्यांचं म्हणणं आहे. जगाचं जास्त नुकसान कुणी केलं, ‘प्लेबॉय’च्या Huge Hefnerने की, फेसबुकच्या झुकरबर्गने, याचा नीट अभ्यास करायला हवा. कारण याचा प्रचंड दुष्परिणाम भारतासारख्या विकसनशील देशांवर झाला आहे.
काहीही करून लक्ष वेधून घेणारा भारतातील तरुण वर्ग ‘अमेरिकन’ होण्याच्या नादात स्वतःचं व देशाचं नुकसान करून घेत आहे. थेरगाव क्वीन व इतर अनेक Influencersचं आयुष्य प्रत्यक्षात अत्यंत वाईट आहे, पण फिल्टर, एअर ब्रश वापरून जे प्रत्यक्ष मिळत नाही, ते आभासी दुनियेत का होईना मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न, या भरकटलेल्या तरुणाईला विनाशाकडे नेणारा आहे.
वेश्या व्यवसायात नाइलाजानं जावं लागणाऱ्या स्त्रियांना शिकून, साधारण आयुष्य जगायची इच्छा असते. त्यांना त्यांचं काम आवडत नाही, पण मजबुरीनं करावं लागतं. इन्स्टाग्रामवर स्वतःच्या शरीराचं प्रदर्शन मांडणाऱ्या सर्वसाधारण मुलींना हे सत्य कोणीतरी सांगण्याची गरज आहे किंवा वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांशी त्यांची भेट घालून द्यायला हवी, म्हणजे मग त्या त्यांच्या आयुष्याशी किती भयंकर खेळ खेळत आहेत, हे उमजेल.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
अमेरिकेत सामाजिक स्वास्थ्य अजिबात चांगलं नाही. मानसिक आरोग्याचे प्रश्न, कुमारी माता, लैंगिक आजार, घटस्फोटाचं भयंकर प्रमाण, आत्महत्या, गुन्हेगारी हे अमेरिकेचे प्रश्न आता भारताचेही झाले आहेत. मध्यमवर्गसुद्धा ‘अमेरिकन’ मानसिकतेचा झाला आहे. एकटी राहू, मानसिक आजारांसाठी गोळ्या खाऊ, पण शेजाऱ्यांशी फटकून वागणार, नातेवाईक दूरच ठेवणार व आपापलं बघणार, असले प्रकार जर बुद्धिमान वर्गात होतात, तर निम्न, खालच्या वर्गात काय होत असेल?
सोशल मीडियामुळे स्वतःविषयी भलते समज व दुसऱ्यांविषयी भलते गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे एकंदरीत नात्यात नकोसा तणाव, दुरावा व असूया वाढीस लागून सर्व प्रकारची नाती चटकन तुटतात. सेक्सला केंद्रस्थानी ठेवून सोशल मीडियाची रचना करण्यात आलेली आहे. तुम्ही सोशल मीडियावर छायाचित्रं टाकली नाहीत, म्हणजे तुम्ही आयुष्य जगत नाही, असं आपल्या मेंदूचं कंडिशनिंग करण्यात सोशल मीडिया यशस्वी ठरला आहे. sexually desirable असण्याभोवतीच आपलं आयुष्य केंद्रित करून अत्यंत उथळ अशा व्यक्ती समाजात ‘हिरो’ ठरवल्या जात आहेत. थेरगाव क्वीन हे त्यातीलच एक ठळक उदाहरण.
सिग्मंड फ्राईड व कार्ल युंग यांच्यासारख्या मानसोपचारतज्ज्ञांनी अमेरिकेच्या या वृत्तीबद्दल आधीच लिहून ठेवलं आहे. फ्राइडने अमेरिकेला ‘एक भयंकर चूक’ म्हटलं आहे, ज्याचा आता प्रत्यय येत आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की, या वृत्तीचा खुबीनं जगभरात प्रसार करण्यात अमेरिकन माध्यमं यशस्वी ठरली आहेत. पण ते आपल्या समाजाला अजूनही उमगलेलं नाही. सॉफ्टवेअर उद्योगानं या अमेरिकन संस्कृतीला भारतात रुजवलं आणि आता सोशल मीडियामुळे ही वृत्ती भारतीय समाजात भिनत चालली आहे.
चीनने लहान मुलांमधील वाढते प्रश्न बघून इंटरनेटच्या वापरावर बंधनं आणलीत. चिलीमध्येसुद्धा नागरिकांचा डेटा खासगी कंपऱ्यांना वापरता येणार नाही, याबाबतचा कायदा येऊ घातला आहे. युरोपात गूगलवर बंधनं आहेत. १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात मात्र आपली भविष्याची पुंजी असलेली तरुणाई वाया जात आहे. ज्या देशांत व्यसनांचं प्रमाण जास्त असतं, त्या देशातील सामाजिक, राजकीय व आर्थिक परिस्थिती अस्थिर असते. सध्याचा भारतातला गोंधळ बघता तरुणाई व्यसनांकडे वळली, तर नवल नाही.
..................................................................................................................................................................
लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत मानसशास्त्रज्ञ आहेत.
vrushali31@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment