नेहरूंनी कोरियाचे नाव घेत महागाईबाबत हात झटकले, हा अपप्रचाराचाच नमुना...
पडघम - देशकारण
रवि आमले
  • माजी पंतप्रधान पं. नेहरू आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Tue , 08 February 2022
  • पडघम देशकारण पं. नेहरू Nehru काँग्रेस Congress नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP

शब्दांशब्दांत तिरस्कार, सूर हेटाळणीचा, समोरच्याला चिडवण्याचा… मोदी संसदेत बोलत होते महागाईवर आणि टीका करत होते नेहरूंवर, की - नेहरूंनी… लालकिल्ल्यावरून… भाषण केले… म्हणाले कोरियातील लढाईसुद्धा आम्हांला प्रभावित करते. तिच्यामुळे वस्तूंचे भाव वाढतात. आणि हे आमच्या नियंत्रणाच्याही बाहेर जातात… देश के सामने देश का पहला प्रधानमंत्री हात उपर कर देता हैं.

तर हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी. ते त्यांच्या नेहमीच्या शैलीत नेहरूंवर टीका करत होते. त्यांचे म्हणणे असे की, ‘वैश्विक परिस्थिती की दुहाई देकर पल्ला झाड लेते थे’ हे काँग्रेसवाले, हे नेहरू.

परंतु यात मोदी चुकीचे काही सांगत होते का? ते अनेकदा तथ्यांची मोडतोड करतात. खोटा इतिहास रेटून सांगतात. त्यांचे हे रेटणे मात्र फारच प्रामाणिक असते. याचे कारण त्यांचा त्यावर मनःपूर्वक विश्वास असतो. विन्स्टन चर्चिल यांचा १८९७ सालातला एक वक्तृत्वकलेविषयीचा एक निबंध आहे. त्याचे शीर्षक - ‘स्कॅफोल्डिंग ऑफ ऱ्हेटरिक’. त्यात ते चांगल्या वक्त्याबद्दल म्हणतात - ‘त्याची मते बदलू शकतात… पण (हा) वक्ता जेव्हा बोलत असतो, तेव्हा त्याचा स्वतःचा त्या बोलण्यावर विश्वास असतो. तो अनेकदा विसंगत असू शकेल. पण तो कधीही जाणीवपूर्वक अप्रामाणिक नसतो.’

तर याच प्रामाणिकपणाने मोदी नेहरूंविषयी बोलत होते. मात्र या वेळी ते खरेच बोलत होते. नेहरू खरोखरच तसे म्हणाले होते. ‘अगर वहां कोरिया में लडाई हो. तो उसका असर यहां पड जाता हैं. चिजों के भाव बढते हैं. हमारे काबू के बाहर जाते हैं. अगर अमरिका में कोई बात हो, तो उसका असर यहां भी चिजों के दाम पे पड जाये…’ ही नेहरूंचीच वाक्ये होती. महागाईवरील काँग्रेसच्या टीकेला उत्तर म्हणून नेहरू ती आपल्यासमोर फेकत होते. पण त्यात आक्षेप घ्यावा असे काय आहे?

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

वरवर पाहता, त्यात आक्षेपार्ह, टीकास्पद असे काहीही नाही. पण आपण खोल विचार करणारे असू, तर लक्षात येते की, मोदींच्या भाषणातील नेहरू टीका ही केवळ ‘व्हाट्स अबाऊटरी’ नव्हती. तो लोकानुबोध - पर्सेप्शन - निर्मितीचा खेळ होता. त्याचा परिणाम लागलीच दिसून आला. मोदींनी सुरू केलेल्या त्या खेळात त्यांची भाटचारणांची आणि जल्पकांची सेना तातडीने सहभागी झाली. त्यांनी नेहरूंवर दुगाण्या झाडण्यास सुरुवात केली. त्यांचा सूर असा की, नेहरू जनतेला कसे मूर्ख बनवत होते ते पाहा. कोरियात युद्ध झाले आणि त्याचा परिणाम भारतावर होतो, येथे महागाई वाढते असे सांगून ते हात झटकत होते.

येथे दुहेरी फायदा आहे. नेहरूंवर टीकाही होते आणि याचाच वापर मोदी सरकारवर महागाईवरून काँग्रेसने टीका केलीच, तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी करता येईल. या लोकानुबोध निर्मितीसाठी मोदींनी ‘प्रोपगंडा’चे एक तंत्र मोठ्या चलाखीने वापरले आहे. ते म्हणजे - डिस्टॉर्ट म्हणजे विरुपन. ते नेहरूंच्या वाक्यांचे नाही केले त्यांनी. ते केले त्या उद्‌गारांच्या पार्श्वभूमीचे. नेहरूंची विधाने मोदींनी अशा प्रकारे पेश केली की, कोणास वाटावे नेहरू किती बालीश. कोरियातील युद्धाचा भारतातील महागाईशी संबंध जोडतात. हे कोरियन युद्ध, त्याची कारणे, परिणाम याविषयी भारतातील सर्वसामान्यांना फारशी माहिती असण्याचे कारण नाही. आणि त्या अज्ञानावर तर मोदींची भिस्त असते.

हे युद्ध आहे १९५० सालातले. दुसऱ्या महायुद्धानंतर, १९४५ साली कोरियाची फाळणी झाली. त्यातील उत्तर कोरिया कम्युनिस्टांच्या प्रभावाखाली आले. दक्षिण कोरिया अमेरिकेच्या. २५ जून १९५० रोजी कम्युनिस्ट उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर आक्रमण केले. यानंतर दोनच दिवसांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा मंडळाने दक्षिण कोरियात फौजा पाठवण्याचा निर्णय घेतला. अमेरिका आणि ब्रिटनच्या फौजा आता कोरियात कम्युनिस्टांच्या पाडावासाठी लढू लागल्या. शीतयुद्धातील ही पहिली लढाई. त्यात अमेरिकी लष्कराने पहिल्याच झटक्यात उत्तर कोरियाच्या सेनेचा धुव्वा उडवला. त्यांना सीमेपार हुसकवून लावले. ३८ अक्षांश ही ती सीमा. तेथवर अमेरिकी फौजा गेल्यानंतर पुढे काय? युद्ध थांबायला हवे होते. पण अमेरिकेचे जनरल डग्लस मॅकार्थी यांनी ठरवले की, आता कम्युनिस्ट कोरियाचा खात्मा करायचा.

दक्षिण कोरियाचे नेतेही अखंड कोरियाचे स्वप्न पाहत होतेच. यातून ठरले असे की, कोरियाची सीमा चीनला ज्या यालू नदीपाशी भीडते तेथपर्यंत चालून जायचे. हे युद्ध पेटवू नका, हा नेहरूंचा अमेरिकेस सल्ला होता. अमेरिकेने ३८ अक्षांश ओलांडल्यास चीन त्या युद्धात हस्तक्षेप करील, ही गोपनीय माहिती भारताचे राजदूत के. एम. पण्णिकर यांना मिळाली होती. तेही संयुक्त राष्ट्रसंघास नेहरूंनी कळवले होते. पण अमेरिकेचा त्यावर विश्वास बसला नाही. त्यांनी युद्ध पुढे रेटले. त्यामुळे चीनच्या फौजा युद्धात उतरल्या आणि त्यांनी अमेरिकेचा अभूतपूर्व असा पराभव केला. ३४ हजार अमेरिकी सैनिक मारले गेले त्यात.  

हे साधेसुधे युद्ध नव्हते. या संघर्षातून तिसरे महायुद्ध पेटते की काय, अशी भयशंका निर्माण झाली होती तेव्हा. रशिया, चीन, अमेरिका, ब्रिटन अशी तेव्हाची महा-राष्ट्रे त्यात होती. तेव्हा आजच्या एवढे जागतिकीकरण नव्हते हे खरे. पण जेव्हा अशी बडी राष्ट्रे युद्धात उतरत असतात, तेव्हा जगाचे अर्थकारण डळमळीत होत असते. महागाई भडकत असते. आता हे समजण्यासाठी ‘एंटायर पोलिटिकल सायन्स’ची पदवी असायला हवी असे नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबतचे सामान्य ज्ञानही त्यासाठी पुरेसे आहे. या युद्धाने अमेरिकेतही महागाईची आग भडकली होती.

हे युद्ध तिकडे सुरू झाले होते, तेव्हा भारताची स्थिती काय होती? देश स्वतंत्र होऊन पुरती तीन वर्षेही झाली नव्हती. ब्रिटिशांनी देशाच्या अर्थव्यवस्थेची दुर्दशा केलेली होती. फाळणीच्या जखमा देहावर होत्या. जगाच्या इतिहासातील एक सर्वांत मोठे स्थलांतर झाले होते. त्याचा भार अर्थव्यवस्थेवर होताच, तशात एक युद्ध झाले होते. युद्धात कोणीही जिंको, नुकसान होते ते दोघांचेही. देशात अन्नधान्याची प्रचंड टंचाई होती. देश अन्नधान्याच्या बाबतीत आयातीवर अवलंबून होता. देशाचे दरडोई उत्पन्न २५५ रुपये इतके कमी होते. रोगराई प्रचंड होती.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

.................................................................................................................................................................

१९५१ साली देशात फक्त १८०० पदवीधर डॉक्टर होते. एकंदर त्या काळात भारत अर्थआजारी होता. आणि अशात जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले होते. कोरियन युद्ध आणि त्यामुळे निर्माण झालेली जागतिक परिस्थिती हा आपल्यासाठी दुष्काळात तेरावा महिनाच. नेहरू लोकांना ते समजावून सांगत होते. भाषणात पुढे ते देशातील लालची साठेबाजांवर टीका करीत होते. लोकांना वस्तुस्थितीची जाणीव करून देत होते. लाल किल्ल्यावरचे पंतप्रधानांचे भाषण त्यासाठी तर असते. यात महागाईपासून हात झटकण्याचा प्रश्न येतोच कुठे?

तुम्ही मोदीभाट वा भक्त असाल, तर उर्मटपणे विचाराल - मग? हे हात झटकणे नाही तर काय आहे? तुम्ही नेहरूंच्या दोषांवर पांघरूण घालता. कारण तुम्ही पुरोगामी आहात, सेक्युलर आहात, काँग्रेसी आहात वगैरे वगैरे… अशा द्वेषभक्तांच्या नेहरूविरोधास सीमा नाही. त्याला अर्थात त्यांचाही इलाज नाही. तर अशा कोणत्याही व्यक्तीपूजकाला ‘मित्रा, लवकर बरा हो’ म्हणण्याखेरीज कोण काय करू शकतो?

द्वेषभक्त नसाल, तर आशा आहे की, इतिहासाकडे वर्तमानाच्या चष्म्यातून न पाहता नेमकेपणे भिडाल. आणि लक्षात घ्याल, की नेहरूंनी कोरियाचे नाव घेत महागाईबाबत हात झटकले हा अपप्रचाराचाच नमुना आहे.

.................................................................................................................................................................

लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांचे ‘प्रोपगंडा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

ravi.amale@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......