मार्खेजच्या निधनानंतर शेकडो मृत्यूलेख आणि डॉक्यूमेंट्रीज प्रसिद्ध झाल्या. मार्खेजचं चरित्र आणि आत्मचरित्रही प्रकाशित झालं आहे. मात्र यापैकी कुठेही न भेटणारा मार्खेज या पुस्तकात भेटतो
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
सुनील तांबे
  • डावीकडे गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ पत्नी मर्सेडिजसह, उजवीकडे ‘A Farewell to Gabo and Mercedes’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Mon , 07 February 2022
  • ग्रंथनामा दखलपात्र गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ Gabriel García Márquez मर्सेडिज गार्सिया Mercedes García अ फेअरवेल टू गाबो अँड मर्सेडिज A Farewell to Gabo and Mercedes रॉड्रिगो गार्सिया Rodrigo Garcia

‘वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड’ ही कादंबरी १९६७च्या मध्यावर ब्युनॉस आयर्स (अर्जेंटिनाची राजधानी) येथे प्रसिद्ध झाली. एका आठवड्यात २० हजार प्रतींची पहिली आवृत्ती संपली. दर आठवड्याला कादंबरीची नवी आवृत्ती बाजारात थडकू लागली. गॅब्रिअल गार्सिया मार्खेज हा लेखक रातोरात मशहूर झाला. स्पॅनिश भाषेतील या कादंबरीचा ३० भाषांमध्ये अनुवाद झाला. कोट्यवधी प्रती आजवर विकल्या गेल्या आहेत. ‘मॅजिकल रिअलिझम’ अर्थात ‘जादूई वास्तववाद’ ही संज्ञा या कादंबरीने लोकप्रिय केली. मार्खेजची पहिली कादंबरी, ‘लीफ स्टॉर्म’ १९५५ साली प्रकाशित झाली होती. प्रसिद्धी, मानसन्मान आणि पैसा मिळवण्यासाठी मार्खेजला एक तप प्रतीक्षा करावी लागली.

अनेक घटना-प्रसंगांची गुंफण असलेली ही कादंबरी बुएंदा कुटुंब आणि मोकँडो या गावाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाची कहाणी सांगते. या कादंबरीत दक्षिण अमेरिकेचा इतिहास सूत्ररूपाने एकजीव झाला आहे. “त्यांच्या आग्रहामुळे जोझ आर्केडियो बुएंदाने तीस रिआल दिले आणि तंबूच्या मध्यभागी गेला. केसाळ देहाचा, डोक्याचा चकोट केलेला एक राक्षस तिथे बसलेला होता. त्याच्या नाकात तांब्याचं कडं होतं आणि त्याच्या पायाला बांधलेल्या साखळदंडाचं एक टोकं समुद्री चाच्यांच्या एका पेटाऱ्याला जोडलं होतं. राक्षस त्या पेटाऱ्याकडेच पाहत होता. त्याने त्या पेटाऱ्याचं झाकण उघडलं आणि थंडगार हवेचा झोत बाहेर आला. आतमध्ये एक प्रचंड मोठा पारदर्शक ठोकळा होता. त्या ठोकळ्यात असंख्य सुया होत्या आणि त्यामध्ये सूर्यास्ताचा प्रकाश रंगीत ताऱ्यांच्या तुकड्यात साठवून ठेवण्यात आला होता. जोझ आर्केडियो बुएंदा गांगरून गेला, आपण काय सांगणार याकडे मुलांचे कान लागले आहेत, याची जाणीव होऊन तो पुटपुटला- हा जगातला सर्वांत मोठ्ठा हिरा आहे. नाही, तो बर्फ आहे, जिप्सी म्हणला.”

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

आणखी एक उदाहरण पाहा- “(जोझ आर्केडियोच्या) रक्ताचा एक ओघळ दरवाजातून बाहेर आला, बैठकीची खोली पार करून रस्त्यावर गेला, आणि सरळ रेषेत पुढे जाऊ लागला, काही पायर्‍या खाली उतरला मग काही पायर्‍या वर चढला, तुर्कांच्या गल्लीतून पुढे गेल्यावर कोपर्‍यावर उजवीकडे वळला, मग डावीकडे. त्यानंतर काटकोनात थेट बुएंदा कुटुंबाच्या घराकडे जाऊ लागला, बंद दरवाजाच्या खालून व्हरांड्यातून पुढे सरकला, भिंतींना बिलगून चालू लागला जेणेकरून बैठकीच्या खोलीतीला गालिचा खराब होऊ नये, दुसऱ्या बैठकीच्या खोलीत पोचला, तिथून मोठं वळण घेऊन त्याने जेवणाचं टेबल चुकवलं मग बिगोनियाची झाडं असलेल्या पोर्चमधून जाऊ लागला, औरलियानो जोझला अमरान्ता गणित शिकवत होती. तिच्या खुर्चीखालून तिला न कळता तो जेवणाच्या खोलीतून मुदपाकखान्यात बाहेर आला, ब्रेड करण्यासाठी तिथे उर्सुला ३३ अंडी फोडण्याच्या तयारीत होती. रक्ताचा ओघळ पाहून उर्सुला उद्गारली- जोझ आर्केडियो मेला.”

साध्या बर्फाच्या ठोकळ्याचं असं वर्णन करून वाचकावर गारुड करणं म्हणजेच साधारण वस्तूंमध्ये (वास्तवात) अद्भुताचा आविष्कार करायचा आणि अतिशय अतर्क्य गोष्टी अगदी दैनंदिन घटनेसारख्या सपाटपणे सांगायच्या. सभोवतालचं वास्तव अनोळखी करण्याचं हे तंत्र आहे. त्यामध्ये लेखकाच्या बालपणाची स्मृती नाही, तर तिचं प्रतिनिधीत्व करणारी कथात्मता आहे. वास्तवाचा कायापालट करून दोन परस्परविरोधी भासणार्‍या बाबी- उदाहरणार्थ जीवन-मृत्यू, जागृती-स्वप्न, जादू-वास्तवता, इत्यादींना सामावून घ्यायचं. वास्तवाच्या सीमा एवढ्या ताणायच्या की, जादू वा अद्भुत अतर्क्य घटना वाचकाने दैनंदिन घटनांसारख्या सहजपणे स्वीकारायला हव्यात. पाश्चात्य आधुनिकतेच्या वरवंट्याखाली चिरडल्या गेलेल्या समूहांच्या अभिव्यक्तीचा रस्ता जादूई वास्तववादाने मोकळा केला. त्यांच्या जगण्याला, त्यांच्या संस्कृतीला आत्मविश्वास दिला. जादूई वास्तववादाचा शोध मार्खेजने लावलेला नाही, मात्र कथात्म लेखनात त्याचा उपयोग करण्याचं तंत्र मार्खेजने जवळपास पूर्णत्वाला नेलं. जगभरातील करोडो वाचकांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं.

गार्सिया मार्खेजला १९८२ साली साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळाल्याचं जाहीर झालं  त्यादिवशी बाराकिला या शहरातले टॅक्सी ड्रायव्हर्स एका सुरात आपआपल्या टॅक्स्यांचे हॉर्न्स वाजवू लागले. आर्काटाका या मार्खेजच्या जन्मगावी एक इलेक्ट्रिशियन आणि एक शेतकरी, गावाच्या चौकात त्यांच्या आवडीच्या मार्केझच्या कथा-कादंबर्‍यांची नावं एकमेकांना घडाघडा सांगू लागले. बाराकिला शहरातली एक वर्गशिक्षिका म्हणाली, कमालीच्या दारिद्र्यात तिची आई आणि आजी कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी झुंजत होत्या, त्या वेळी ती ‘वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड’ ही कादंबरी वाचत होती. त्या कादंबरीची नायिका, उर्सुलाही एकामागून एक संकटं कोसळताना मोकंडो एकत्र ठेवण्यासाठी अशीच धडपड करत होती. उर्सुला या पात्रातून मला प्रेरणा मिळाली असं ती वर्गशिक्षिका म्हणाली. एक बातमीदार वेश्यावस्तीत गेला, तिथल्या एका वेश्येला त्याने विचारलं की, तिने कधी मार्खेजचं नाव ऐकलं आहे का? ती म्हणाली, माझ्याकडे आलेला एक जण मार्केझच्या कादंबरीबद्दल बोलत होता.

मार्खेजच्या पत्नीचं नाव, मर्सिडीस बार्चा. मार्खेज पत्रकार होता. लेखनात करिअर करू पाहत होता. पण त्याला यश मिळत नव्हतं. कामासाठी तो देश-विदेशात हिंडत होता. ‘वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड’ ही कादंबरी लिहिताना मार्खेजने निर्धन होता. घरातल्या वस्तू गहाण ठेवल्या वा विकून टाकल्या. उधारीवर मास, पाव घेऊन मर्सिडीस संसार करत होती. ‘क्रॉनिकल ऑफ डेथ फोरटोल्ड’ या कादंबरीत मर्सिडीस नावानिशी अवतरते. मार्खेजच्या काही कथा, ‘इन इव्हिल अवर’, ‘नो वन राईटस् टू कर्नल’ यासारख्या इन्यागिन्या कलाकृती वगळता मर्सिडीस मार्खेजच्या लिखाणात या ना त्या प्रकारे डोकावते.

२०१४ साली मार्खेजचं निधन झालं. २०२० साली मर्सिडीसचं. या दम्पतीला दोन मुलं. रॉडरिगो आणि गोंझॅलो. रॉडरिगो पटकथा लेखक आणि दिग्दर्शक आहे, तर गोंझॅलो डिझायनर आहे. ‘अ फेअरवेल टू गाबो अँण्ड मर्सिडीस’ हे पुस्तक रॉड्रिगोने लिहिलंय. गॅब्रिअल गार्सिया मार्खेज ऊर्फ गाबो हा पुस्तकाचा नायक आहे, तर मर्सिडीस नायिका. मार्खेजच्या निधनानंतर शेकडो मृत्यूलेख आणि डॉक्यूमेंट्रीज प्रसिद्ध झाल्या. मार्खेजचं चरित्र आणि आत्मचरित्रही प्रकाशित झालं आहे. मात्र यापैकी कुठेही न भेटणारा मार्खेज या पुस्तकात भेटतो. पटकथा लेखक होणं ही मार्खेजची महत्त्वाकांक्षा होती. त्याने काही पटकथा लिहिल्याही. परंतु साहित्यिक-पत्रकार हीच मार्खेजची ओळख राहिली. रॉडरिगोसोबत पटकथा लिहिण्याचा संकल्प त्याने सोडला होता. कॅन्सरवरील उपचारानंतर मार्खेजला विस्मरणाचा रोग जडला. त्यामुळे पटकथेवरची चर्चा भलतीकडेच जायची म्हणून मी तो नाद सोडला, असं रॉडरिगोने अत्यंत व्यथितपणे नमूद केलंय. हे पुस्तकही पटकथेच्या ढंगानेच लिहिलं आहे. परंतु या पटकथेवर कधीही चित्रपट निघणार नाही.

स्मृतीभ्रंशाचा रोग झाल्यावर मार्खेज घराच्या बागेत हिंडत असतो. त्याची सेक्रेटरी सोबत असते. मार्खेज म्हणतो, “मी रडतोय.” सेक्रेटरी चक्रावते, कारण त्याच्या डोळ्यात अश्रू नसतात. “कोरड्या डोळ्यांनी पण मी रडतोय, माझ्या डोक्याचा कचरा झालाय हे कळतंय मला.” स्मृतीभ्रंश झाल्यावरही मार्खेजमधला लेखक पूर्णपणे मेलेला नव्हता. एक दिवस बागेत फेरफटका मारताना मार्खेज म्हणला, “हे माझं घर नाही, माझ्या घरी माझा बिछाना वडलांच्या पलंगाशेजारी आहे.” वस्तुतः मार्खेजला आठवत होते बालपणीचे, आजोबा-आजींसोबतचे दिवस. त्या वेळी त्याचा बिछाना, आजोबांच्या शेजारी असायचा. आठ वर्षांपर्यंत मार्खेज त्या घरात राहात होता. त्यानंतर सांगण्याजोगं काहीही माझ्या आयुष्यात घडलं नाही, असं मार्खेजने नोंदवलंय.

‘वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड’ या कादंबरीतलं मध्यवर्ती पात्र—कर्नल ऑरलियानो बुएंदा, त्याच्या आजोबांवरच बेतलेलं आहे. मार्खेजला आपली जीवनसाथी, मर्सिडीस बारीकसारीक तपशीलांसह आठवत होती, पण ती समोर असेल तेव्हा तो तिला ओळखत नव्हता.

मार्खेज मृत्यूशय्येवर असताना काही बायका त्याला भेटायला येतात. त्याच्या खोलीतून येणारा हास्यकल्लोळ ऐकल्यावर रॉडरिगो तिकडे जातो. तुम्हा सगळ्यांशी रत होणं शक्य नाही मला, असं मार्खेजने म्हटल्याने हास्याचा फवारा त्या खोलीतून बाहेर आला होता.

‘वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड’ या कादंबरीची नायिका उर्सुला मृत्यू पावते पवित्र गुरुवारी. या दिवशी येशू ख्रिस्ताने शेवटचं जेवण घेतलं. त्या दिवशी घरात शिरलेली पाखरं खिडक्यांच्या तावदानांवर आपटून मरण पावतात असं वर्णन आहे. मेक्सिको सिटी येथील मार्खेजच्या घरात गच्चीवर एक तावदानांची खोली आहे. त्या खोलीत एक पाखरू शिरलं आणि बाहेर जाण्याच्या धडपडीत काचेवर आपटून मेलं. कोचावर मार्खेज जिथे बसायचा तिथेच नेमकं ते पडलं. नेमक्या त्याच दिवशी म्हणजे पवित्र गुरुवारी मार्खेजने शेवटचा श्वास घेतला, असं रॉडरिगोने नोंदवलंय. 

मार्खेजच्या पार्थिवाचं दहन करण्यात आलं. अस्थिकलश लोकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. शेकडो लोकांनी फुलं, शोकसंदेश त्यासमोर ठेवले. मार्खेज-मर्सिडीसचे मित्र-मैत्रिणी, वाचक, चाहते, नातेवाईक यांनी तिथे हजेरी लावली. तो एक सोहळाच झाला. कोलंबिया आणि मेक्सिको या दोन देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी हजेरी लावली. मेक्सिकोच्या राष्ट्रप्रमुखाने आपल्या भाषणात मर्सिडीसचा उल्लेख मार्खेजची विधवा असा केला. त्यामुळे रॉड्रिगो आणि गोंझॅलो दोघेही नाराज झाले. मर्सिडीसही वैतागली. कार्यक्रमानंतर भेटलेल्या पत्रकाराला मर्सिडीस म्हणाली, “मी पुनर्विवाह करणारेय, मी कुणाचीही विधवा नाही, मी मर्सिडीस आहे.”

वर्तमानाचं वर्णन करताना रॉड्रिगो बेमालूमपणे भूतकाळाचे संदर्भ व तपशील तो गुंफतो. लिखाणाला विश्वासार्हता येण्यासाठी आकडेवारी देतो. दुःख, नाराजी, विनोद अशा अनेक संमिश्र भावनांचं चित्रण एका वाक्यात करतो. मार्खेजच्या कथा, कादंबर्‍या, रिपोर्ताज, चरित्र, आत्मचरित्र यांच्यामध्ये नसणारा मार्खेज आणि मर्सिडीस तो वाचकापुढे मांडतो. रोड्रिगो स्थायिक झालाय लॉस एंजिल्समध्ये, तो काम करतो इंग्रजी भाषेत.

मेक्सिको वा कोलंबिया आणि अमेरिका ही दोन संपूर्ण वेगळी जगं आहेत. केवळ भाषा, समाज आणि सांस्कृतिकदृष्ट्या नव्हे, तर या दोन वेगळ्या मनोवस्था आहेत, असं तो सांगतो. मार्खेजचं निधन झालं, त्या दिवशी पवित्र गुरुवार होता. त्यामुळे वर्तमानपत्रांच्या कार्यालयात फोन घ्यायलाही बातमीदार नव्हते. अखेरीस निधनाची बातमी सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्यात आली. तिथून ती लोंढा प्रसारमाध्यमांत पोचली. वृत्तवाहिन्यांनी मार्खेजच्या थोरवीवर कार्यक्रम प्रसारित करायला सुरुवात केली. हे कार्यक्रम आम्ही टीव्हीवर पाहात होतो आणि शेजारच्या खोलीत मार्खेजचं पार्थिव होतं, अशा भेदक, परंतु तरल नोंदी रोड्रिगो करतो.

रॉड्रिगोच्या लेखनात मार्खेजच्या अनेक लकबी दिसतात. ‘वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड’ या कादंबरीवर वेब सिरीज बनवण्याचे हक्क नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत. या प्रकल्पाचं पटकथा लेखन, दिग्दर्शन रॉड्रिगो गार्सिया करणार आहे.

‘ए फेअरवेल टू गाबो अँण्ड मर्सिडीस’ हे पुस्तक केवळ झलक आहे रॉड्रिगोच्या लेखनाची, पिच्चर अभी बाकी हैं!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

.................................................................................................................................................................

ता.क. - मार्खेजची इंदिरा

मार्खेजला केवळ दोन मुलगे नाहीत, तर एक मुलगीही आहे. तिचं नाव इंदिरा. मेक्सिकन पत्रकार आणि लेखक सुझान कॅटो आणि मार्खेज यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमसंबंधांत झालं. मार्खेजपासून सुझानला झालेल्या मुलीचं नाव, इंदिरा कॅटो. (ती चित्रपट दिग्दर्शिक आहे. तिच्या डॉक्युमेंटरीजना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.) मात्र याबाबत मार्खेज, सुझान आणि मार्खेजचं कुटुंबिय या सर्वांनी कमालीची गुप्तता पाळली. मार्खेजच्या आत्मचरित्रात वा मार्खेजच्या अधिकृत चरित्रात आणि रॉड्रिगोच्या पुस्तकातही या संबंधांबाबत एक ओळही नाही. मर्सिडीससोबत ५० वर्षांच्या सहजीवनानंतर मार्खेज आणि सुझान यांचे प्रेमसंबंध बहरले. सार्वजनिक, खाजगी आणि गोपनीय असं तीन अंगी जीवन असतं, असं मार्खेज म्हणत असे.

मार्खेजच्या गोपनीय जीवनातील ही घटना या वर्षीच्या जानेवारी महिन्यात कोलंबियातील ‘एल युनिव्हर्सल’ या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली. मार्खेजच्या कुटुंबियांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मुलीचं नाव इंदिरा का ठेवलं, याचा उलगडा केवळ सुझानच करू शकते. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाने मार्खेज प्रभावित झाला होता. ‘वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड’ ही कादंबरी वाचल्यानंतर इंदिरा गांधींनी क्यूबाचा राष्ट्रप्रमुख फिडेल कॅस्ट्रोला विनंती केली की, ‘नवी दिल्लीत होणार्‍या अलिप्त राष्ट्र परिषदेसाठी मार्खेजलाही तुमच्यासोबत आणा.’ कॅस्ट्रोच्या स्वागताला स्वतः इंदिरा गांधी विमानतळावर आल्या होत्या. राजशिष्टाचारानुसार फिडेल कॅस्ट्रो विमानातून आधी उतरला. त्याचं स्वागत केल्यावर इंदिराजी विमानात गेल्या आणि त्यांनी विचारलं, ‘मार्खेज कुठे आहे?’ इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्त्वात स्त्रीत्व आणि सत्तेचा मिलाफ होता, असं मार्खेजने नोंदवलंय.

A Farewell to Gabo and Mercedes - Rodrigo Garcia

Publisher ‏ : ‎ HarperVia (15 August 2021)

Hardcover ‏ : ‎ 176 pages

MRP : ₹ 499

(‘साधना’ साप्ताहिकाच्या ५ फेब्रुवारी २०२२च्या अंकातून साभार)

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा - 

https://www.amazon.in/Farewell-Gabo-Mercedes-Gabriel-Marquez/dp/0008487898/ref=tmm_hrd_swatch_0?_encoding=UTF8&qid=&sr=

..................................................................................................................................................................

लेखक सुनील तांबे मुक्त पत्रकार आहेत. 

suniltambe07@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......