शब्दांचे वेध : पुष्प चौपन्नावे
आजचे शब्द : Frequency illusion, the Baader–‘Meinhof phenomenon आणि Synchronicity
१.
आज दोन नावीन्यपूर्ण आणि वेगळ्या संकल्पनांची थोडक्यात ओळख करून घ्यायची आहे. या लेखाची कल्पना मला डॉ. सतीश बेंडीगिरी यांनी सहज म्हणून विचारलेल्या एका प्रश्नावरून सुचली आणि त्यासाठी माहिती देण्याचं सौजन्य सुप्रसिद्ध कनेडियन भाषाविद जेम्स हर्बेक यांनी दाखवलं. या दोघांचेही आभार.
आधी या एका सिनेरिओबद्दल. तुम्ही रोज घराबाहेर निघता आणि तुमची जी काय कामं आहेत, ती सगळी आटोपून घरी परत येता. सगळं काही रूटिन, नॉर्मल असतं. तोच परिचित माहोल, काही तेच ओळखीचे चेहरे. असं वर्षानुवर्षं सुरू असतं. आणि अचानक एक दिवस असा येतो की, तुम्हाला भोवतालच्या वातावरणात काही सूक्ष्म बदल झालेला जाणवतो. कालपर्यंत तुम्हाला जे जाणवलं नाही, नजरेला पडलं नाही, ते आसपास सगळीकडे जाणवू लागतं, दिसू लागतं. उदाहरणार्थ, अचानकच तुमच्या भोवतीच्या कोड असलेली माणसं ठळकपणे दिसायला लागली. पहिल्या दिवशी तुम्हाला त्याचं काही वाटणार नाही, पण असं जर रोजच होऊ लागलं तर तुम्ही विचार कराल ना? अरे, कालपरवापर्यंत तर मला हा माणूस इथे कधीच दिसला नाही, मग आजच कसा दिसला? इतकंच नाही, तर नंतर तुम्ही जिथे जिथे जाता तिथेही तुम्हाला अशीच माणसं प्रकर्षानं दिसू लागतात. हे असं अचानक का घडू लागलं? थोडा विचार केल्यावर तुमच्या लक्षात येतं की, चार-पाच दिवसांपूर्वी तुम्ही एका तज्ज्ञ डॉक्टरनं कोड या विषयावर लिहिलेला लेख एका वर्तमानपत्राच्या पुरवणीत वाचला होता. त्यानंतर लगेचच हे प्रकरण सुरू झालं. म्हणजे हा त्या लेखाचा परिणाम तर नाही ना? सुप्त मन, सहचरी कल्पना, असं काही असेल का या मागे, की निव्वळ योगायोग? तुम्हाला काहीच कळत नाही. पण पुढचे काही दिवस तरी हा सिलसिला चालू असतो. या उदाहरणासारखी अनेक उदाहरणं आपल्याला माहीत असतील. या प्रक्रियेला काही तांत्रिक नाव आहे का?
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
मी जेम्स हर्बेकला विचारलं, तेव्हा त्यानं क्षणाचाही विलंब न करता मला सांगितलं की, मानसशास्त्रज्ञ याला ‘Frequency illusion’ किंवा ‘the Baader–Meinhof phenomenon’ किंवा ‘frequency bias’ या नावानं ओळखतात.
म्हणजे काय? फ्रिक्वेंसी म्हणजे वारंवारिता. एखादी गोष्ट वारंवार, पुन्हापुन्हा, सातत्यानं घडणं. पुनरावृत्ती. इल्युजन म्हणजे भ्रम. Frequency illusion हा एक प्रकारचा cognitive bias आहे, म्हणजे संज्ञानात्मक पूर्वग्रह. आपल्या मनात जे असतं, ते किंवा तसंच वारंवार घडून येणं, ते जाणवणं. एखादी गोष्ट पहिल्यांदाच पाहिल्यानंतर किंवा अनुभवल्यानंतर ते तसंच आपल्याला पुन्हापुन्हा जाणवत राहणं. त्यामुळे अनेकांना तर हा सततच भ्रम झाल्यासारखं वाटत असतं. होतं काय की, एखादी गोष्ट पहिल्याच वेळी आपल्या मनात खोलवर रुतून बसते आणि मग तिची आठवण, जाणीव आपल्याला सारखीसारखी होत राहते, अगदी गरज नसतानाही, अनपेक्षितपणे. जे मनात आहे, ते किंवा तसंच सभोवताली सगळीकडेच आहे, असा संभ्रम तुम्हाला होऊ लागतो. जमिनीतून उगवल्यासारखी ती गोष्ट सगळीकडे दिसू लागते आणि तुमचा पिच्छा पुरवते.
आता याचा Baader–Meinhofशी काय संबंध? ज्यांना जागतिक राजकीय घडामोडींबद्दल वाचायला आवडतं, त्यांना १९७०च्या आसपास पश्चिम जर्मनीत उदयाला आलेल्या बाडर माईन्हॉफ या अती-वामपंथी क्रांतिकारी संघटनेविषयी वाचल्याचं स्मरतच असेल. हिलाच ‘Red Army Faction’ (RAF) असंही नाव होतं. Andreas Baader, Ulrike Meinhof, Gudrun Ensslin आणि Horst Mahler यासारखे काही लोक तिचे नेते होते. तिथल्या सरकारच्या मते ही एक दहशतवादी चळवळ होती. पूर्व जर्मनीतल्या वामपंथी सरकारचे हे समर्थक होते. बॉम्बस्फोट, राजकीय हत्या, सशत्र दरोडे, लोकांना खंडणीसाठी ओलिस ठेवणे, यासारख्या अनेक बेकायदा कारवाया या संघटनेमार्फत पुढची ३० वर्षं युरोपभर केल्या गेल्या, विशेषतः प. जर्मनीत. १९९८च्या सुमारास या संघटनेचा अस्त झाला.
Terry Mullen नावाच्या माणसानं १९९४ साली एका वर्तमानपत्राला ‘वारंवारिता-भ्रम’ या विषयावर पत्र लिहून असं कळवलं की, Baader–Meinhof हे नाव त्यानं ज्या दिवशी पहिल्यांदा वाचलं, त्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी हेच नाव पुन्हा त्याच्या पुन्हा दुसरीकडे कुठेतरी वाचण्यात आलं. या चमत्कारिक योगायोगाला काय म्हणावं, हा त्याचा प्रश्न होता. हे पत्र वाचून अनेक वाचकांनी आपल्यालाही अशाच प्रकारचे अनुभव आले असल्याची माहिती कळवली. त्यानंतर यावर खूप चर्चा झाली आणि अशा प्रकारच्या घटनांचं मग ‘the Baader–Meinhof phenomenon’ असं नामकरण करण्यात आलं.
‘Frequency illusion’ ही संज्ञा मात्र २००६ साली Arnold Zwicky या अमेरिकन भाषाशास्त्रिय प्राध्यापकानं तयार केली. हा भ्रम कसा होतो, यावर तो असं म्हणतो की, दोन वेगळ्या cognitive biases म्हणजे संज्ञानात्मक पूर्वग्रहांच्या मिश्रणातून तो तयार होतो. एक असतो selective attention bias. यात आपल्या स्वतःला महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी आपण सहजतेनं, पटकन बघतो, लक्षात ठेवतो, आणि अन्य गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. याच्या सोबतच पुष्टीकरण पूर्वग्रह confirmation bias काम करू लागतो. आपलंच म्हणणं किंवा समजूत तेवढी खरी आणि बाकीचे तर्क बिनकामाचे, अशी आपणच आपली धारणा करून घेतो आणि त्यादृष्टीने पुरावे शोधतो. भलेही विरुद्ध बाजूचे पुरावे काहीही म्हणोत किंवा ते कितीही मजबूत असेनात का.
‘छिन्नमनस्कता’ (स्किझोफ्रेनिया, schizophrenia) या मानसिक रोगाच्या रुग्णांना हा भ्रम जास्त प्रमाणात होऊ शकतो आणि तो घातकही ठरू शकतो. कोर्टात साक्ष देणाऱ्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबानीवर या भ्रमाचा प्रभाव पडला आहे, अशीही काही उदाहरणं बघायला मिळाली आहेत. पण एरवी तो तसा एक साधासुधा, निरुपद्रवी भ्रम आहे. जास्त खोलात जाऊन त्याची वैद्यकीय चिकित्सा करणं या ठिकाणी अप्रस्तुत ठरेल.
‘Frequency illusion’ किंवा ‘Baader–Meinhof phenomenon’ हा भ्रम आपल्याला एखादी घटना, वस्तू, कल्पना, शब्द, अशा कित्येक प्रकारांतून होऊ शकतो. तो कोणालाही होऊ शकतो. कमकुवत माणसांना जास्त. याची नित्याची काही उदाहरणं म्हणजे, रोजची खरेदी, महगड्या वस्तूंचं शॉपिंग, पैशांची गुंतवणूक, व्यवसायाबद्दलच्या नव्या कल्पना, मार्केटिंग, सोशल मीडिया, नवीन शब्द, आणि अगदी एखाद्याच्या प्रेमात पडणंसुद्धा. यातल्या कोणत्या ना कोणत्या मार्गानं हा भ्रम तुमच्या आयुष्यात कधी तरी डोकावून गेला असू शकतो. नीट आठवून बघा.
समजा तुम्ही पांढऱ्या रंगाचे जोडे विकत घ्यायला गेला आहात. दुकानात गेल्यावर तुम्हाला तिथे पांढर्या रंगाचे जोडेच जोडे दिसू लागतील. लोकांच्या पायावरही हीच पादत्राणं तुम्हाला दिसतील. मोटर कार किंवा घर विकत घ्यायच्या वेळी तुम्हाला अचानकच जास्त किमतीच्या कार किंवा महागड्या घरांचे पर्याय नजरेस दिसू लागतील. हे आपोआप होतं. किंमत जेवढी जास्त, तेवढी ती वस्तू चांगली, असा आपला एक (गैर)समज असतो. त्यानुसार आपलं मन आपल्याला नकळत त्या दिशेनं धावू लागतं. म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणाऱ्या मित्राकडून त्याविषयी ऐकल्यावर या मार्गानं कोट्यधीश झालेल्या लोकांच्या कहाण्या आपोआपच तुम्हाला दिसू लागतील. एखादा शब्द तुम्ही पहिल्यांदा वाचल्यावर काही दिवस तोच शब्द तुम्हाला सगळीकडे दिसायला लागेल. एवढंच नाही तर तो शब्द अमुक ठिकाणी चपखलरीत्या वापरत येईल, असं तुम्हाला वाटू लागतं. किती तरी अशी उदाहरणं आपल्या दैनंदिन व्यवहारात आपल्याला शोधून काढता येतील.
हा ‘frequency bias’ तुमच्याआमच्या आयुष्यात सततच डोकावणार आहे, हे नक्की. त्यानं काही बिघडत नाही. फक्त, त्याच्या प्रभावाखाली येऊ नका, एवढंच. त्याला विरोधही करू नका. तो येतो, काही काळ थांबतो, आणि निघून जातो. मग पुन्हा येतो... हे चालूच राहणार. तुम्ही ठाम रहा.
२.
आता दुसऱ्या संकल्पनेबद्दल. Synchronicity म्हणजे एकाच वेळी घडणाऱ्या दोन किंवा अधिक गोष्टींचं परस्परांशी असलेलं नातं किंवा संबंध. Synchronic म्हणजे कालनिरपेक्ष, एककालीन.
याबाबत जेम्स हर्बेकनं त्याच्या ‘SESQUIOTICA’ या ब्लॉगवर कालच एक छान माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. त्याच्याच आधारे मी हा मजकूर लिहिला आहे. घडलं असं की, काही दिवसांपूर्वी एका खूप जुन्या हिंदी सिनेमागीताचा श्वेतश्यामल व्हिडिओ मी माझ्या मित्राला पाठवला. तो बघताच मित्र हातभर उंच उडाला. कारण या गाण्यात जी हिंदी अभिनेत्री होती, तिला तो अगदी आदल्याच दिवशी एका ठिकाणी अनपेक्षितरीत्या भेटला होता. योगायोगानं त्या वेळी ते दोघं एकाच हॉटेलात रहायला होते. ते गाणं रेकॉर्ड झालं, तेव्हा तिचं वय असेल २५-३०. आज ती नव्वदीच्या पुढे आहे. माझ्या मित्र तिचा चाहता असल्यामुळे त्यानं मग तिच्याशी खूप गप्पा केल्या, तिच्या कारकिर्दीच्या जुन्या आठवणी तिनं सांगितल्या. दोघांनाही एकमेकांना भेटून आनंद झाला.
ही एक अचानक घडून आलेली भेट होती. त्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी योगायोगानं याच अभिनेत्रीचा तो व्हिडिओ मी त्याला पाठवला. मला तर त्यांच्या या chance encounterबद्दल काहीच कल्पना नव्हती. माझ्या मित्रानं मग मला फोन करून या योगायोगाला काय म्हणावं, हा प्रश्न विचारला. मी हर्बेकला विचारलं.
तसं पाहिलं तर हा खरोखरच एक योगायोग होता, त्यात विशेष असं काही नव्हतं. आनंद, सुख देणारा अनुभव. इंग्रजीत याचं a chance encounter (सहज घडलेली भेट) अथवा a felix moment (आनंदी क्षण) किंवा a fortuitous occurrence (मुद्दाम न ठरवता, अचानक घडून आलेली एक चांगली घटना) असं काहीसं वर्णन करता येईल. हर्बेकनं मात्र यासाठी ‘सिन्क्रोनिसिटी’ हा शास्त्रीय शब्द सुचवला. दोन विभिन्न पण काहीश्या मिळत्याजुळत्या घटना साधारणपणे एकाच वेळी किंवा एका पाठोपाठ घडल्या, तर त्यांच्यात काही कार्यकारण भाव असू शकतो का, एकीचं दुसरीशी काय नातं असू शकतं, हे आपण तपासून बघतो. ती मानवी प्रवृत्ती आहे.
‘सिन्क्रोनिसिटी’ या शब्दाच्या आधारे आपण त्याचा खुलासा करू शकतो, असं हर्बेक म्हणतो. या योगायोगाला काही (गूढ) अर्थ नसतो. आपलं मन तसा अर्थ शोधतो, त्या घटनांचं आपसात काही नातं आहे, असं आपल्याला वाटतं. कारण आपण त्यांच्यात मुळात नसलेल्या, पण आपल्याला जाणवलेल्या कार्यकारण भावामुळे चकित झाले असतो. एका पाठोपाठ त्या घडल्या, एवढाच काय तो संबंध, बाकी काही नाही. पण आपल्याला ते छान वाटतं आणि आपण उगीचच खोलात शिरून त्याची मानसशास्त्रीय शवचिकित्सा करू लागतो. शेक्सपिअरच्या शब्दात सांगायचं तर त्या वेळी आपला कवी बनतो आणि आपण नसलेल्याला असलेलं ठरवू बघतो-
The poet’s eye, in a fine frenzy rolling,
Doth glance from heaven to Earth, from Earth to
heaven,
And as imagination bodies forth
The forms of things unknown, the poet’s pen
Turns them to shapes and gives to airy nothing
A local habitation and a name.
(A Midsummer Night’s Dream 5.1.18)
या प्रकारचे अनुभव जगात अनेकांना अनेकदा आले आहेत. कार्ल युंग नावाच्या प्रख्यात पाश्चात्य शास्त्रज्ञानं या प्रकारच्या अनुभवांचा अभ्यास केला आहे. तो याला ‘acausal’ (निरुद्देश) असं म्हणतो. यदृच्छेनं (randomly) एकाच वेळी घडून आलेल्या घटना या पलीकडे त्याला महत्त्व नसावं. युंगनं ‘Synchronicity : An Acausal Connecting Principle’ या नावाचा एक ग्रंथ लिहिला असून त्यात त्यानं त्याच्या एका महिला पेशंटच्या बाबतीत त्याला आणि तिला आलेला अनुभव सांगितला आहे. मात्र हे जरी खरं असलं तरी हेही अंतिम सत्य नाही, हे पण तितकंच खरं. मानसशास्त्रज्ञांचा अभ्यास सतत सुरूच असतो. कोणास ठाऊक, उद्या एखादा नवा युंग या मनोव्यापारावर काही नवा प्रकाश टाकूही शकेल.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
.................................................................................................................................................................
हर्बेक म्हणतो की, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही तरी कथा असतात. त्या इतरांना कळाव्यात अशी आपली इच्छा असते. त्यांच्यातल्या आकृतीबंधांच्या कशीदाकारीनं आपण आपली जीवनकथा रंगवतो, सजवतो, मनोरंजक करून इतरांना सांगतो. सिन्क्रोनिसिटी हे त्याचंच एक माध्यम आहे. हर्बेकनं याबाबत जर्मन तत्त्वज्ञ शॉपनहॉवर (Arthur Schopenhauer) याचं एक विधान उद्धृत केलं आहे-
“As Schopenhauer put it in Parerga and Paralipomena (E.F.J. Payne’s translation), all events in life stand “in two fundamentally different kinds of connection”: firstly, in the objective, causal connection of the natural process; secondly, in a subjective connection which exists only in relation to the individual who experiences it, and which is thus as subjective as his own dream.”
(आयुष्यातल्या प्रत्येक घटनेकडे दोन विरुद्ध प्रकारच्या नजरांनी बघता येतं. पहिली, तटस्थपणे कार्यकारण भाव शोधून; आणि दुसरी, व्यक्तीसापेक्ष विचारांतून.)
तात्पर्य काय? सिन्क्रोनिसिटीच्या अनुभवांनी आपलं आयुष्य सुखद होतं. जीवनातली ही मजा कायम घेत रहा. आयुष्याच्या महावस्त्रावर विविध खऱ्या आणि आभासी आकृतीबंधांची वेलबुट्टी काढत रहा, आपली कथा आपणच रंगवत रहा. हसत रहा.
हर्बेकचा सिन्क्रोनिसिटीवरचा मूळ लेख वाचण्यासाठी या दुव्याला भेट द्या-
https://sesquiotic.com/2022/02/01/synchronicity
..................................................................................................................................................................
लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.
the.blitheringest.idiot@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment