अजूनकाही
ग्रहणाचे वेध महिन्याभरापासून लागलेच होते. वय वर्षे ९२ म्हणजे अकाली निधन असे म्हणता येणार नाही, परंतु या नावाने सलग, कमीत कमी ६०-७० वर्षे लोकांच्या मनावर गारुड केले आणि ते दिवसेंगणिक वाढत गेले. या आवाजाचे पृथक्करण करण्याचा, नक्कल करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, परंतु हातातून पारा निसटून जावा, त्याप्रमाणे प्रत्येक वेळेस प्रयत्न अपुरे पडले.
लताबाईंचा आवाज गोड होता, त्यांच्या गळ्याची रेंज अफाट होटी, ही आणि अशी अनेक वैशिष्ट्ये त्याच्या गायनाविषयी मांडली गेली आहेत. तरीही हा आवाज दशांगुळे वर राहिला. त्याचे संपूर्ण विश्लेषण होऊ शकले नाही. इतकी वर्षे लोकांच्या मनावर राज्य करायचे, ही बाब अजिबात सोपी नाही. गायन करताना वेळोवेळी नवीन मानदंड तयार केले आणि ते त्यांनीच मोडून, नवीन साचे निर्माण केले. सर्जनशीलतेचे नवीन पायंडे पाडले.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
जरा खोलात विचार केला तर त्यांची गायकी १९४५पासून अव्याहतपणे लोकांपर्यंत पोहोचत होती. प्रत्येक दशकात, स्वररचनेचे नवीन साचे तयार झाले, नवनवीन कल्पना उदयाला आल्या, तंत्रज्ञान तर अफाट बदलले, परंतु या सगळ्यात कायम राहिला तो लताबाईंचा आवाज. अर्थात आवाजात निसर्गनियमाप्रमाणे स्थित्यंतरे झाली. स्थित्यंतरे होऊन देखील बदलली नाही, ती त्यांची गायकी!! आवाजाचा गोडवा वयोमानानुसार कमी होणे, क्रमप्राप्तच असते आणि त्यानुसार आपल्या गायकीचा अंदाज त्यांनी बदलला.
आपली शैली बदलणे ही फार मोठी सांस्कृतिक घटना असते आणि ती सगळ्यांना झेपते असे नाही. लताबाईंनी इथे आपले प्रभुत्व निर्विवादपणे सिद्ध केले. काळाला सजगपणे सन्मुख गेल्या आणि प्रत्येक दशकातील बदल नुसते आत्मसात केले नाही, तर त्याच्यावर आधारित गायकी बदलून, मी मघाशी म्हटले तसे सर्जनशीलतेचे नमुने पेश केले. आवाजात पुढे पुढे धार आणली, शब्दोच्चाराची परिभाषा तयार केली.
लताबाईंनी आयुष्यभर शब्दप्रधान गायकीच स्वीकारली. त्यामुळे कलाकृतीच्या सादरीकरणात त्यांनी नेहमी शब्दांना यथोचित मान दिला. वास्तविक मराठी भाषिक गायिका परंतु उर्दू भाषेवर इतके प्रभुत्व मिळवले की, त्यांचे उच्चार उर्दू मौलवींनीदेखील मान्य केले. याचा परिणाम असा झाला, उर्दू शब्दोच्चार, ही या गायिकेची खासियत झाली. अर्थात मराठी भाषिक असल्याने मराठी भाषेतील गाणी गाताना शब्दोच्चाराचा त्रास होण्याचे काहीही कारण नव्हते, तरीही मराठी गाण्यांत त्यांनी स्वतःची गायकी वेगळी ठेवली. असाच प्रकार इतर भाषिक गाणी गाताना त्यांनी स्वीकारला. त्यांनी गायलेली बंगाली भाषेतील गाणी, खुद्द बंगालमध्ये कमालीची लोकप्रिय झाली आणि ती केवळ गायकीने लोकप्रिय झाली नसून, बंगाली भाषा उच्चारताना, आवाजात त्या भाषेचा विशिष्ट गोलावा असतो आणि ठराविक शब्द हे त्याच भाषेच्या संस्कृतीतून आलेले भावतात. हे वैशिष्ट्य लताबाईंनी कायम ठेवले होते. अगदी २००० सालानंतर आलेल्या निवडक चित्रपटगीतांतूनदेखील दाखवले.
भाषिक प्रभुत्व हा एक भाग झाला, परंतु त्याव्यतिरिक्त मी वर म्हटल्याप्रमाणे स्वररचनेच्या वेगवेगळ्या ‘संस्कृती’ त्यांनी आत्मसात केल्या. हे काम अतिशय अवघड आहे. जवळपास शेकडो संगीतकारांनी त्यांच्याकडून गाणी गाऊन घेतली. प्रत्येक संगीतकाराचे स्वतःचे खास वैशिष्ट्य असते आणि त्यानुरूप स्वररचना तयार होतात. त्या सगळ्या शैली आत्मसात करणे, हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. संगीतकाराच्या मनात असलेली स्वररचना, शक्य तितक्या तशीच आपल्या गायकीतून प्रतिबिंबित करण्याचे आव्हान त्यांनी कायम स्वीकारले. वर सांगितल्याप्रमाणे आवाजातील गोडवा, हे एकमेव वैशिष्ट्य निश्चित सांगता येणार नाही. आणखी काही विशेष गुणांची आता विचार करूया.
आपल्या दीर्घ कारकिर्दीमुळे लताबाईंना जवळपास तीन पिढ्यांचे श्रोते मिळाले. याचाच वेगळा अर्थ, भारतीय संस्कृतीशी संबंधित नजीकचा भूतकाळ, चालू वर्तमान काळ आणि संभावनांनी भरलेला भविष्यकाळ, या तिन्हींशी लताबाईंची सांगीतिक नाते प्रस्थापित झाले, असे सहज म्हणता येईल.
चित्रपट संगीतात अनेक विशेषांचा संभव, त्यांचा प्रसार आणि त्यांचे ग्रहण हे संपर्क माध्यमांमुळे होतात. परिणामतः लताबाईंची गायन फार विविध संदर्भात ऐकले गेली. याचाच वेगळा अर्थ असा लावता येतो, सहज उपलब्धी, त्यांचे सहज आकलन आणि त्यांचा टिकाऊपणा, हे मुद्दे लताबाईंच्या आवाजाच्या जोडीने ओघानेच आले. वास्तववादी मर्यादांपासून वा बंधनांपासून पार्श्वगायनाने गीताची मुक्तता केली.
याचा परिणाम असा झाला की, आपल्या निर्मितीतील मूळ संदर्भांच्या निरपेक्ष राहणारी अशी स्वतंत्र, स्वतःची कारकीर्द चित्रपट गीताला लाभली. भारतीय चित्रपट गीताच्या अनुरोधाने विचार केल्यास, वास्तववाद, रोमँटिसिझम, प्रयोगशीलता इत्यादींचा अनुनय करताना संगीत-सौंदर्याबाबत एक वेगळी तत्त्वप्रणाली नक्की करून तिचा पाठपुरावा चिकाटीने आणि मन:पूर्वक केला. परिणामी चित्रपट संगीताचा टिकाऊपणा कमालीचा वाढला, असे नक्की म्हणता येते.
लताबाईंचा तारता - पल्ला अतिशय विस्तृत होता. तिला सर्व दिशांनी चपलगती चलन शक्य होते. त्यामुळे वय वाढूनही आवाजाचे गुणधर्म बरेचसे तसेच राहणे, हे त्यांचे मुख्य वैशिष्ट्य राहिले. तसेच लताबाईंच्या आवाजातील ज्या एका गुणाचे अगणित संगीत-सौंदर्यशास्त्रीय परिणाम झाले आहेत, त्याचे वर्णन ‘प्रसाद’ असे करता येईल. मध्ययुगीन संगीतशास्त्रीय साहित्यातून चर्चित झालेल्या या संज्ञेने माध्यम म्हणून आवाजाची पारदर्शकता कशी आहे, याकडे लक्ष वेधले गेले. ज्या आवाजात प्रसादगुण असतो, त्यामुळे त्यातून सादर होणारे संगीत श्रोत्यांना थेट, लगेच आणि मूळ संगीतातील सर्व किंवा प्रमुख गुणांचा अपभ्रंश न होता पोहोचले. ही उपलब्धी केवळ अजोड अशी म्हणावी लागेल.
लताबाईंच्या या प्रसादगुणांमुळे मुळात जसे आहे, ते श्रोत्यांपर्यंत पोहोचू शकले आणि याच कारणास्तव संगीतकार लैताबाईंच्या हवाली आपल्या स्वररचना करायचे. या मध्ये दुसरी शक्यता अशी, आपला दीर्घानुभव आणि सांगीत क्षमता यामुळे लताबाई आपापल्या आवाजातून रचनाकाराच्या संगीतात जाणता-अजाणता भर घालत असत आणि त्यामुळे रचनेची गुणवत्ता वाढीस लागली.
लताबाईंच्या आवाजाच्या संदर्भात आणि त्यांच्या सांगीत गुणवत्तेच्या दर्जाबाबत आपल्या प्राचीन भारतीय संगीतशास्त्रात आणखी एक सुंदर कल्पना महत्त्वाची आहे, असे मांडले आहे आणि तिचा निर्देश ‘शारीर’ या संज्ञेने केला जातो. प्रकट होत असलेल्या रागाच्या योग्य त्या भावनिक गाभ्याशी थेट पोहोचण्याची आवाजाची क्षमता या गुणाने शक्य होते. संगीताचा गाभा आणि त्याचा आविष्कार यांच्या दरम्यानच्या प्रक्रिया यांना इथे बाजूला सारले जाते. कारण लताबाईंचा आवाज अडथळ्याशिवाय भावनेपर्यंत पोहोचला गेला.
लताबाई गीतरचनेचे ग्रहण किती लवकर करतात, याचे वर्णन अनेक संगीत रचनाकारांनी केले आहे. गीताची भावभावना कोणती, रचनेत नेमकी कुठे अनुस्यूत आहे आणि संबंधित रचनेचा इष्ट तो भावनिक आशय कुठल्या कलाकारीने वा कारागिराने साधता येईल, याचा मागोवा घेता येतो. जे परिणाम थोडेफार साधण्यासाठी इतरांना जिथे अनेक कष्ट घ्यायला लागतात, त्याचा तत्सम परिणाम लताबाई काही मिनिटांतच साधायच्या आणि याचे बहुतेक शास्त्रोक्त गायकांना नेहमीच नवल वाटत आलेले आहे.
शारीर हा एक मूर्त गुणविशेष आहे. परंतु शरीररचनांशी संबंधित मूर्त, वस्तुनिष्ठ आणि देहसंबद्ध घटकांप्रमाणे तो आवाज हमखास, त्वरित आणि त्यांनी योग्य प्रकारे व्यक्त होतो. म्हणून या आवाजाचे वर्णन ‘शारीर’ असे केले आहे.
लताबाईंच्या आवाजातील ‘लालित्य’ हे अत्यंत अनन्यसाधारण असे लक्षण म्हणता येईल. सर्व कलात्म, सौंदर्यात्म प्रयत्नांचे अनिवार्य लक्षण म्हणून लालित्याचा उल्लेख केला जातो. कुठलीही कला वा शैलीअसो, या शक्तीच अनिवार्यपणे कार्यरत असतात. जेव्हा केव्हा ती कलाकृती बनते तेव्हा लालित्य या लक्षणाची उपस्थिती असणे गरजेचे असते. बऱ्याच अंशी लालित्य अशारिरी असते, पण त्याचा आधार मात्र अनेककेंद्रिय क्रिया असाच असतो.
श्रोत्यांना या सर्वांच्या पलीकडे नेणारे आणि अनुभवातीत पोहोचवणारे दुसरे तत्त्व कालानुभवाची अंतिम अवस्था म्हणून उल्लेखली जाते. त्यालाच दुसऱ्या शब्दात ‘आनंद’ असे म्हणता येईल. लताबाईंनी हा आनंद श्रोत्यांना आयुष्यभर दिला. काळाच्या बदलांचे सजगपणे अवगाहन करून शैलीमध्ये आवश्यक ते बदल घडवून आणले. आपले गायन कायम ‘सुरीले’ कसे राहील, याची दक्षता घेतली आणि मुख्य म्हणजे मायक्रोफोनवर आवाज कसा लावायचा असतो, याचा असामान्य मानदंड निर्माण केला. लताबाईंची आणि त्यांच्या क्षेत्रातील सगळ्याच गायक/गायिकांची गायकी ही नेहमीच तंत्रज्ञानावर आधारित असते आणि ते तंत्रज्ञान लताबाई जवळपास कोळून प्यायल्या होत्या, असे म्हणायला प्रत्यवाय नसावा.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
.................................................................................................................................................................
लताबाई या अपवादस्वरूप गायिका ठरल्या, कारण त्यांनी ललित संगीताला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले आणि तसे करताना, सादरीकरणात कधीही किंचितदेखील शिथिलता आली नाही. आपल्या कलेशी आपण किती प्रामाणिक असावे, याचे असामान्य उदाहरण पुढील पिढ्यांसमोर ठेवले. आता लताबाईंची काही, मला भावलेली, पछाडून टाकणारी काही गाणी सांगतो... ज्यातून माझ्या वरील विवेचनाचा यथास्थित पुरावा म्हणून मांडता येईल.
१) तुम क्या जानो, तुम्हारी याद में
२) रुठ के तुम तो चल दिये
३) हमारे बाद अब इस महफिल में
४) वो तो चले गये ऐ दिल
५) चांद फिर निकला
६)ओ सजना बरखा बहार आयी
७) रहते थे कभी उनके दिल में
८) तू चंदा मैं चांदनी
९) रसिक बलमा
१०) नाम गुम जायेगा
अर्थात लताबाईंची कुठली गाणी घ्यायची हा सार्वकालिक प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर अजिबात सोपे नाही. अर्थात असे अत्यंत अवघड कोडे टाकून, पुढील कलाकारांच्या पिढ्यांना अत्यंत समृद्ध वारसा प्रदान करून आज आपल्यातून निघून गेल्या आहेत. आणखी काय आणि किती लिहायचे? हा देखील कायम अनुत्तरित राहणार प्रश्न ठेवून त्या गेल्या. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, इतकेच मी म्हणू शकतो.
..................................................................................................................................................................
लेखक अनिल गोविलकर शास्त्रीय आणि चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.
govilkaranil@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment