‘युनिक फीचर्स’चे एक संस्थापक आणि ‘अनुभव’ मासिकाचे संपादक सुहास कुलकर्णी यांचं ‘अवलिये आप्त’ हे व्यक्तिचित्रांचं पुस्तक नुकतंच समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात अरुण टिकेकर, ना. धों. महानोर, निरंजन घाटे, निळू दामले, सदा डुम्बरे, एकनाथ आव्हाड, आमटे कुटुंबीय आणि अनिल अवचट यांची व्यक्तिचित्रं आहेत. त्यातील ‘दोस्त गुरुजी’ या अवचटांच्या व्यक्तिचित्राचा हा संपादित अंश...
..................................................................................................................................................................
काही माणसं खूप आधीपासून आपल्या आयुष्याचा भाग असतात, पण प्रत्यक्ष आयुष्यात बर्याच नंतर भेटतात. अनिल अवचट यांच्या बाबतीत माझं असंच झालं. शाळा-कॉलेजमध्ये असताना जी पहिली लक्षात राहतील अशी पुस्तकं वाचली, त्यात अवचटांची पुस्तकं होती. या अर्थाने अवचट आयुष्यात आले ते वयाच्या सोळाव्या-अठराव्या वर्षी. लेखक म्हणून. पण त्यांची प्रत्यक्ष भेट आणि संवाद सुरू होण्यासाठी त्यानंतर तब्बल पंचवीस वर्षं जावी लागली. पण जेव्हा त्यांची भेट झाली, त्यानंतर हा आवडता लेखक मित्रच बनून गेला.
पूर्णिया, वेध, छेद, संभ्रम, कोंडमारा, धागे आडवे उभे, धार्मिक, माणसं, वाघ्या-मुरळी, प्रश्न आणि प्रश्न अशी पुस्तकं वाचतच आमची पिढी मोठी झाली. आपल्या मध्यमवर्गीय जगण्याच्या पलीकडे एक जग आहे, याची जाणीव या पुस्तकांनी करून दिली होती. आपल्या सुरक्षित कोषातून बाहेर पडण्याची ऊर्मी त्यातून मिळाली होती. त्यामुळे या सर्व काळात त्यांच्याबद्दल सतत एक कृतज्ञतेची भावना मनात असे. आई-वडील आपल्याला चालायला-बोलायला शिकवतात, पण काही माणसं जगाकडे बघायला शिकवतात. त्यात अनिल अवचट नि:संशय!
मला आठवतं, ‘पूर्णिया’ हे बिहारचं अंतरंग दाखवणारं त्यांचं पुस्तक मी अधाशासारखं वाचलं होतं. तिथली समाजव्यवस्था, जमीनदारी, अस्पृश्यता, वेठबिगारी, कंगाली यांचं त्यांनी केलेलं वर्णन वाचून मुळापासून हादरलो होतो. अवचटांचं ते पहिलं पुस्तक. तेव्हापासून वाचक म्हणून मी त्यांच्या कच्छपिच लागलो. त्यांनी लिहायचं नि आपण वाचायचं. बास!
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
पुण्यात शिकायला आलो तेव्हा कॉलेजमध्ये अभ्यास मंडळं वगैरे उपक्रम आम्ही करत असू. तेव्हा त्यांच्या घरी गेल्याचं आठवतं. साल असेल १९८५-८६. कशासाठी गेलो होतो ते आठवत नाही, पण ती भेट आठवते. पत्रकारनगरमधील त्यांच्या घरात बाहेरच्या हॉलमध्ये एक मोठीच्या मोठी जाड सतरंजी घातलेली होती. घरात खुर्च्या-सोफे वगैरे नेहमीची बैठकव्यवस्था नव्हती. घरात आलेल्याने सतरंजीवरच बसायचं. तेही आपल्यासोबतच बसणार. बोलणार. जसं त्यांचं घर साधंसं होतं, तसेच तेही अगदी साधे वाटले होते. दहा-वीस मिनिटांची ती भेट, पण त्यांच्या साधेपणामुळे लक्षात राहिली.
पुढे आम्ही मित्रांनी ‘युनिक फीचर्स’ ही माध्यमसंस्था सुरू केली. तेव्हा आम्ही विविध क्षेत्रांतील नामवंतांच्या मुलाखती घेऊन दैनिकांना पाठवायचो. त्यात आमच्यापैकी कुणी त्यांचीही मुलाखत घेतली असणार. आमच्या माध्यमसंस्थेबद्दल कुतूहल वाटून ते एक-दोनदा आमच्या ऑफिसवर आल्याचं आठवतं. ते आले. गप्पा मारून, चौकश्या करून गेले. तेव्हा अनेक लेखक, सामाजिक कार्यकर्ते वगैरे ऑफिसला येत-जात. तरुण पोरांनी काही तरी नवा प्रयोग चालवलाय, या कुतूहलापोटी ही ज्येष्ठ मंडळी भेटायला यायची. अवचटही तसेच आलेले. मी ऑफिसात होतो, पण कामात होतो. मी भेटलोच नाही त्यांना. पुढे बर्याच वर्षानंतर त्यांची-माझी दोस्ती झाली. तेव्हा म्हणाले, ‘‘मी तुमच्या ऑफिसवर आलो होतो, पण तेव्हा तू माझ्याकडे बघितलंही नव्हतंस. असं का?’’ आधी काही तरी थातुरमातुर उत्तरं दिली; पण ते ऐकेनात. शेवटी मी त्यांना म्हटलं, ‘‘अहो, तुमचे माझ्यावर मोठे उपकार आहेत. एकलव्यासारखा मी तुमच्याकडून शिकत आलोय. माझ्या मनात तुमच्याविषयी केवळ कृतज्ञताच आहे. पण मला मोठ्या माणसांची भीती वाटते. त्यांच्यापासून दूरच राहिलेलं बरं, असं वाटतं. आपल्याला आवडणार्या माणसांजवळ गेलं, तर ती भ्रमनिरास करतात. मला तुमच्याबाबत विषाची परीक्षा नव्हती घ्यायची.’’ हे ऐकून ते हसले. म्हणाले, ‘‘माझ्या बाबतीत नाही ना झाला तुझा भ्रमनिरास?’’
त्यांची-माझी खरी ओळख झाली ती २०१० साली. दहा वर्षांपूर्वी. त्याआधी दोन वर्षांपूर्वी आमची भेट झाली होती, पण ती ओझरती. डॉ. प्रकाश आमटे यांचं आत्मचरित्र- ‘प्रकाशवाटा’ -आम्ही प्रकाशित केलं होतं. त्याच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होणार होता. आमटे कुटुंबीयांचं काम माहीत असलेला, त्यांच्याशी वैयक्तिक नातं असलेला उद्घाटक आम्हाला हवा होता. अवचटांचं नाव पुढे आलं. त्यांना विचारलं. त्यांनी होकार दिला. कार्यक्रमाला आले, बोलले आणि गेले. याला काही भेट म्हणता येणार नाही.
खरी भेट झाली त्यानंतर दोन वर्षांनी. त्याची गोष्ट मोठी गमतीशीर आहे. अवचट जसे लेखक, तसेच ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’चे संस्थापकही. त्यांच्या पत्नीने, सुनंदाने सुरू केलेल्या या केंद्राच्या स्थापनेपासून ते त्यांच्यासोबत होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ही संस्था वाढवली. या संस्थेच्या कामाबद्दल, तिच्या प्रवासाबद्दल अवचटांनी पुस्तक लिहावं, असं आमच्यात बोलणं चाललं होतं. तसं आम्ही त्यांना विचारलंही होतं. ते काही केल्या दाद देत नव्हते. पण अखेर त्यांनी मनावर घेतलं आणि पुस्तक लिहून काढलं. आम्ही खूष झालो. ज्या लेखकाची पुस्तकं वाचत आपण मोठे झालो, त्याचं पुस्तक प्रकाशित करायला मिळतंय याचा आनंद वाटत होता.
हस्तलिखित माझ्या हाती पडल्यानंतर मी ते झपाट्याने वाचून काढलं. झकास लिहिलेलं पुस्तक होतं ते. एखाद्या संस्थेचा इतिहास, विकास, कार्यशैली, वैशिष्ट्यं ठोकळेबाजपणा न येता कसा लिहावा, याचं हे पुस्तक उत्तम उदाहरण होतं. घटना, घडामोडी, किस्से, आठवणी, माणसांच्या गमती सांगत त्यांनी मुक्तांगणची गोष्ट सांगितली होती. पण या हस्तलिखितात काही दोषही जाणवत होते. अवचटांची तोवर तीसेक पुस्तकं प्रकाशित झालेली असली तरी ते प्रामुख्याने लेखसंग्रह होते. वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचं संकलन. हे पुस्तक त्यांनी सलगपणे लिहिलेलं होतं, पण लेखनकाळ मात्र सलग नव्हता. काही भाग अमेरिकेत दौर्यावर असताना लिहिला होता, तर काही भाग दुबई दौर्यात हाता-पायाचं फ्रॅक्चर होऊन तिथे अडकून पडलेले असताना लिहिलेला. उर्वरित भाग पुण्यात जमेल तसा. त्यामुळे लिहिताना अनवधानाने कुठे कुठे पुनरुक्ती झालेली होती. एखाद्या प्रसंगाचे तपशील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे होते. वाक्यरचना, शब्दयोजना याबाबतही हलक्या हातांनी संपादन करण्याची गरज होती.
पण एवढे मोठे लेखक; त्यांच्या हस्तलिखितावर काम करण्याची गरज आहे, हे त्यांना सांगणार कसं? पण चाचरत का होईना, त्यांना सांगितलं. त्यांना असं काही अजिबातच अपेक्षित नव्हतं. ते अगदी निश्चयाने आणि स्पष्टपणे म्हणाले, ‘‘माझ्या लिखाणाला आजवर कुणीही हात लावलेला नाही. मी जसं लिहिलं तसं छापून आलंय. तशी गरज आजवर कुणालाही वाटलेली नाही. अगदी श्री. पु. भागवतांनाही नाही.’’ त्यांनी स्वच्छ शब्दांत नकार दिला होता. एरवी माझा स्वभाव कुणाच्या परीक्षेला बसण्याचा नाही. पण मी त्यांना म्हटलं, ‘‘मी तुमच्या हस्तलिखितावर काम करतो आणि तुम्हाला दाखवतो. तुम्हाला माझं काम पटलं नाही, तर तुमचं पुस्तक आहे तसं छापूयात.’’ ते या प्रस्तावाला कसेबसे तयार झाले.
महिनाभर खपून मी त्यांच्या पुस्तकाचं संपादन पूर्ण केलं. त्यांचं त्यापूर्वीचं सर्व लिखाण मी वाचलेलं असल्यामुळे ते कसं लिहितात, कोणते शब्द वापरतात, कोणते अजिबात वापरत नाहीत, त्यांची वाक्यरचना कशी उलगडते, उद्गारवाचक चिन्हांशिवाय ते हवा तो परिणाम कसा साधतात, अशा सतराशे साठ गोष्टी मला माहीत होत्या. त्यांच्या शैलीला अजिबात धक्का न लावता, उलट त्यांची शैली अधिक उठावदार करत मी माझं काम पूर्ण केलं. दुरुस्त्या वगैरे करून टंकलिखित प्रूफ त्यांना बघायला दिलं. त्यांनी ते घरी जाऊन शांतपणे वाचलं. चार-आठ दिवसांनी प्रुफ घेऊन आले. पुस्तकभरात फक्त पाच-दहा दुरुस्त्या करून आणल्या होत्या त्यांनी. म्हणाले, ‘‘मी अख्खं पुस्तक वाचलं, पण मला त्यात कुठे संपादन केल्याचं दिसलं नाही. मी म्हटलं होतंच की, माझ्या मजकुराला हात लावण्याची गरज नाही.’’ मी हसलो. म्हटलं, ‘‘म्हणजे हे स्क्रिप्ट फायनल?’ ते म्हणाले, ‘‘अर्थात! मी लिहिलं तेव्हाच ते फायनल होतं!’’
मी तेव्हा काही बोललो नाही. म्हटलं, कशाला यांच्याशी पंगा घ्या? उगाच यांचा पापड मोडायला नको! थोडे दिवस गप्प राहिलो. पुस्तक छापून झाल्यानंतर त्यांना म्हटलं, ‘‘रागावणार नसाल तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायचीय.’’ त्यांच्या हस्तलिखितावर मी पेन्सिलीने केलेलं काम त्यांना दाखवलं. त्यांना म्हटलं, ‘‘हे जरा बघा.’’ त्यांनी पानं उलटवली.. जिकडे-तिकडे दुरुस्त्या. बारीक बारीक गोष्टी निवडून दुरुस्तलेल्या. काही वाक्यं, काही मजकूर कापून त्याऐवजी नवा मजकूर लिहिलेला. ते पाहत राहिले. म्हणाले, ‘‘मी प्रुफं वाचली तेव्हा मला असं वाटलं की, माझं लिखाण जसंच्या तसं ठेवलं गेलं आहे. एवढं रंगकाम झाल्याचं माझ्या लक्षातच आलं नाही! तू एवढं काम करूनही माझ्या लक्षात आलं नाही, याचा अर्थ तू काम चांगलं केलंस. याच्यापुढे माझ्या लिखाणाचं संपादन करण्याचे सर्वाधिकार तुझ्याकडे!’’
या घटनेमुळे अवचटांनी स्वत:भोवती बांधलेली चिरेबंदी भिंत कोसळली आणि नवं नातं निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. नातं विणण्यात पुढाकार अर्थातच त्यांनी घेतला. त्यांचा अधूनमधून फोन येऊ लागला. थोड्या चौकश्या, थोड्या गप्पा होऊ लागल्या. मधूनच कधी तरी ते ऑफिसवर येऊ लागले. कधी घरी बोलावू लागले. वागणं अगदी साधंसुधं. पारदर्शक. मोकळंढाकळं. प्रेमळ. जीव लावणारं. त्यांच्या घरी गेलं की, गप्पांमध्ये मध्येच बासरी काढणार, वाजवणार. मधेच एखादी गाण्याची लकेर घेणार. कधी मूडमध्ये असतील तर शास्त्रीय चीज म्हणून दाखवणार. हे अवचट मला माहीत नव्हते. त्यांचं ‘छंदांविषयी’ हे पुस्तक वाचलं होतं आणि त्यांचा छांदिष्टपणाही माहीत होता. पण तो असा समोरासमोर उलगडणं अंगावर रोमांच उभं करत असे. ऑफिसमध्येही येत तेव्हा पिशवीत ओरिगामीचे कागद, बासरी वगैरे असेच त्यांच्यासोबत. ‘अरे, आज एक नवं गाणं शिकलोय. बासरीवर वाजवून दाखवू?’ असं विचारणार आणि हौशी, शिकाऊ मुलाच्या उत्साहाने चुका करत करत वाजवून दाखवणार. कधी एखादं गाणं म्हणणार, कधी एखादी चीज गाऊन दाखवणार. ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा हैं’ म्हणता म्हणता त्या गाण्याच्या आसपासची गाणी म्हणायला लागणार. मैफलच! ऑफिसमधील मित्रांना कळत नसे, की लेखक आलेत भेटायला आणि केबिनमधून गाण्याचे आवाज का येताहेत? नंतर त्यांनाही सवय होऊन गेली.
पण ज्यांना हा उपक्रम माहीत नसे त्यांची मोठी गंमत होत असे. एकदा एका कार्यक्रमानिमित्त कॉर्पोरेटमधील मोठे अधिकारी, प्रशांत जोशी मुंबईहून पुण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अवचट होते. कार्यक्रम संपल्यावर आम्ही सगळे ऑफिसमध्ये आलो. थोडं औपचारिक बोलणं झालं. पण औपचारिकता अवचटांच्या अंगात नाहीच अजिबात. त्यामुळे थोडी संधी मिळताच लागले की बुवाजी गायला! आम्हाला ते सवयीचं होतं, पण प्रशांत गोंधळले. तेही खरं तर अवचटांच्या लेखनाचे चाहते, त्यांचं सगळं वाचलेले वगैरे. थोड्या वेळाने अवचट त्यांना म्हणाले, ‘‘तुम्हाला नाही आवडत गाणी?’’ ते म्हणाले, ‘‘आवडतात की!’’ अवचट म्हणाले, ‘‘मग गा की!’’ थोड्या वेळाने पाहावं तर ते कॉर्पोरेटसाहेब आणि अवचट एकत्र गायला लागलेले. धमालच सगळी! नंतर प्रशांत म्हणाले, ‘‘हा दिवस मी आयुष्यात कधी विसरणार नाही!’’
अवचटांचं हे असं सहज वागणं इतरांनाही सहज बनवतं. तुम्ही कोण आहात, कोणत्या पदावर आहात, किती पैसे बाळगून आहात वगैरे गोष्टी गळून जातात आणि तुमच्यातला निखळ माणूस फक्त उरतो. अशी किमया ते लीलया करून टाकतात. शिवाय ते असं मुद्दामून वगैरे करतात असं नाही. ते असेच आहेत, ते असेच वागतात.
अगदी सुरुवातीला ते ऑफिसात आले की, मनावर दडपण असे, पण हळूहळू ते विरून गेलं. आले की, अर्धा-पाऊण तास गप्पागोष्टी-गाणी करणार नि मग निघणार. कशासाठी आले होते हे, असा प्रश्न नंतर फिजूल बनत गेला. कामासाठीच कशाला भेटायचं, असा त्यांचा रोख असे.
पुढे पुढे त्यांचं ऑफिसात येणं वाढलं. फोनचं प्रमाणही वाढलं. मग रोजचा फोन सुरू झाला. दुपारी साडेतीन वाजता त्यांचा फोन येणार म्हणजे येणारच. फोन करण्याचं कारण काय? अर्थातच काहीही नाही. सहज गप्पा-चौकश्या. पाच-दहा मिनिटांचा फोन. मला फोन करायच्या आधी त्यांचा फोनवरूनच गाण्याचा एक क्लास असे. तिथे जे शिकलेलं असे तेही ते मला फोनवर गाऊन दाखवत. फोनवर असं काहीही घडे. कधी स्वत:च्या दौर्यांबद्दल सांगतील, तर कधी कुठल्या आमंत्रणांबद्दल. कधी कुठे केलेल्या भाषणाबद्दल सांगतील, तर कधी कुठल्या मुलाखतीबद्दल. कधी कोणत्या विषयावर लिहितायेत याच्याबद्दल बोलतील, तर कधी कुठल्या विषयाची माहिती मिळत नाही याबद्दल. कधी ओरिगामीच्या नव्या मॉडेलबद्दल, कधी चित्राबद्दल. कधी युरोप-अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांच्या भावलेल्या गोष्टीबद्दल, कधी किशोरी अमोणकरांच्या मैफिलीतल्या आठवणींबद्दल. गप्पांना आणि विषयांना मर्यादा नाही.
कधी पेपर-चॅनेलवरच्या बातम्या ऐकून माझ्याकडे विचारणा करणार. जगात काय चाललंय याची चर्चा करणार. स्थलांतरितांच्या प्रश्नापासून पर्यावरणीय प्रश्नांपर्यंत. आर्थिक धोरणांपासून राजकीय पक्षांच्या भूमिकांपर्यंत. अमेरिकन निवडणुकीपासून आपल्याकडच्या राजकीय साठमारीपर्यंत. राजकारणाच्या उथळीकरणापासून गरिबांच्या न सुटणार्या प्रश्नांपर्यंत. त्यांनी प्रश्नं विचारायचे आणि मी माझ्या बुद्धीने उत्तरं द्यायची, हे आता ठरून गेलंय. ‘तू माझी जगाची खिडकी आहेस बाबा,’ असं ते मला म्हणतात तेव्हा गंमत वाटते. ज्या माणसाने आपल्याला जगाकडे बघायला शिकवलं, तोच आपल्याकडून आजचं जग समजून घेतोय, ही गंमत नाही तर काय!
पण ही गंमतही कमी वाटावी अशी गंमत पुढे आहे. आम्ही दोघं कुठे भेटलोय, बोलणं चाललंय आणि तिथे तिसरा कुणी उपस्थित असेल तर तो अवचटांना ओळखत असतो. (ते पुण्याचे सार्वजनिक ‘बाबा’च आहेत ना!) पण आमचं नातं कळावं म्हणून मी म्हणतो, ‘‘हे आमचे गुरुजी आहेत. यांच्याकडून आम्ही खूप शिकलो.’’ हे वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच अवचट माझ्याकडे हात दाखवत म्हणणार, ‘‘अहो, हेच आमचे गुरुजी आहेत. आमची जगाची खिडकी!’’ त्यांच्या या बोलण्याने अगदी संकोचायला होतं.
असो. तर सांगत होतो त्यांच्या-माझ्या फोन-संवादाबद्दल. आमची ही फोनाफोनी तेव्हा माझ्या आसपासच्या लोकांत ‘दुपारचा फोन’ या नावाने ओळखली जाऊ लागली. मी ऑफिसमध्ये असो, बाहेर असो; पुण्यात असो, देशात कुठेही असो- त्यांचा फोन येणारच. तेही पुण्यात असोत-नसोत, साडेतीनचा फोन ते करणारच. मी एखाद्या गावी आहे, असं म्हटलं तर तिथल्या चौकश्या करणार. तिथे ते केव्हा गेले होते, कोणता विषय तिकडे जाऊन लिहिला होता हे सांगणार. त्या विषयाबद्दल, अनुभवाबद्दल सांगणार. असं काहीही. त्यांचा स्वभाव खरं तर शिस्तीचा वगैरे अजिबात नाही, पण साडेतीनचा फोन मात्र घड्याळाला गजर लावून केल्यासारखा ते करत. कशासाठी? माहीत नाही. कदाचित त्यांनाही ते माहीत नसावं!
पण कुणालाही आश्चर्य वाटेल, या दुपारच्या फोनमधून एक नव्हे, दोन नव्हे, तीन पुस्तकं तयार झाली. मजा अशी, की ही पुस्तकं व्हावी असा विचारही अवचटांच्या मनात तोपर्यंत आलेला नव्हता. नेहमीप्रमाणे दुपारचा फोन चालला होता. अवचट म्हणाले, ‘‘अरे, आज एक गंमत झाली. घरात आवराआवरीत मला माझे जुने लेख सापडले. आधी ते माझे आहेत हे आठवतच नव्हतं, पण हळूहळू आठवायला लागलं. १९७० ते ७५ दरम्यानचे लेख आहेत हे.’’ मी म्हटलं, ‘‘याचा अर्थ मी जेमतेम शाळेत पोहोचलो होतो तेव्हाचे लेख आहेत हे. मला वाचायचेत ते लेख.’’
त्यांनी लेख पाठवले. मी ते वाचले. मग दोन दिवसांनी म्हणाले, ‘‘आणखी काही लेख सापडलेत, तेही पाठवतो.’’ तेही लेख वाचले. जुना खजिना सापडल्यासारखं झालं. तरुण असताना अवचट मनोहर, साधना, माणूस वगैरे साप्ताहिकांत रिपोर्टिंगवजा लिहीत; ते हे लेख होते. त्यांच्या कोणत्याही पुस्तकात समाविष्ट न झालेले. सत्तरच्या दशकातली राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक हालचाल त्या लेखांमध्ये प्रतिबिंबित झालेली होती. तीही अवचटांच्या रिपोर्ताज शैलीत. मी त्यांना म्हटलं, ‘‘या लेखांचं आपण पुस्तक करूयात.’’ ते म्हणाले, ‘‘इतक्या जुन्या लेखांचं पुस्तक?’’ मग आमचं काय काय बोलणं झालं. ते तयार झाले. आपल्याकडे पत्रकारांची एका विशिष्ट चौकटीत रिपोर्टिंग करण्याची पद्धत आहे. ती बाजूला ठेवून अवचटांनी कुठले कुठले कार्यक्रम, पत्रकार परिषदा, मुलाखती, बैठका, दौरे वगैरे ‘कव्हर’ करून रीतसर मोठे रिपोर्ताज लिहिले होते. ती शैली पुस्तकाच्या रूपाने पुढे आणली गेली. या पुस्तकाचं नाव- ‘रिपोर्टिंगचे दिवस’.
अवचटांची कधी ऑफिसमधे फेरी झाली किंवा मी त्यांच्या घरी गेलो, तर गप्पांच्या सोबतीला जसं त्यांचं गाणं-बजावणं चाललेलं असे, तसंच कधी ते चित्रं काढत, कधी ओरिगामीची मॉडेल्स, कधी लाकडाचं कोरीवकाम. त्यांचं जे चाललेलं असे त्यावर बोलणं होई. एकदा ते चित्र काढत बसले होते. त्यांचं चित्रं काढणं म्हणजे कसं? एकीकडे गप्पा चालू आणि दुसरीकडे कागदावर काही तरी आकार रेखाटत बसणं. जमलं तर पुढे जाणं, मन उडालं तर तो कागद टाकून देणं. त्यांची थोडीशी चित्रं मी ‘छंदांविषयी’ या पुस्तकात बघितली होती. मी त्यांना म्हटलं, ‘‘मला तुमची चित्रं बघायचीयत. दाखवाल?’’ म्हणाले, ‘‘कुठे कुठे माळ्यावर, कपाटावर, बॉक्सेसमध्ये असतील ती चित्रं. काढावी लागतील, शोधावी लागतील.’’ मी म्हटलं, ‘‘मी शोधतो.’’
मग जिकडे-तिकडे चढून सुटी चित्रं, अल्बम, वह्या असं सगळं गोळा केलं. रिक्षात घालून सगळा ऐवज ऑफिसात आणला. झटकून, पुसून, साफ करून बघण्याचं सत्र सुरू केलं. अचंबित व्हावं अशी होती ती चित्रं. केवढ्या वेगवेगळ्या शैलींतील! पोस्टकार्डाच्या आकारापासून फूट दोन फूट आकाराची. पेन्सिलची, पेनाची, स्केचपेनाची, रंगीत खडूंची, ऑइल पेस्टल्सची, पातळ-जाड रेषांची, चेहर्यांची, झाडांची, मोरांची, निसर्गाची, कशाकशाची. ती चित्रं पाहून मन हरखून गेलं. मनात आलं, हा आनंद इतरांनाही मिळायला हवा. पुस्तक व्हायला पाहिजे या चित्रांचं.
अवचटांना म्हटलं, तर ते अडून बसले. म्हणाले, ‘‘ही चित्रं मी माझ्या आनंदासाठी काढलीत. चित्रांचं प्रदर्शन करायचं नाही, असं मी पूर्वीच ठरवून टाकलंय. माझी चित्रं माझ्यापुरतीच राहू देत.’’ पण मी हट्ट सोडला नाही. पटवलंच त्यांना. अखेरीस ते तयार झाले. ‘माझी चित्तरकथा’ नावाचं देखणं पुस्तक तयार झालं. त्यांची चित्रं आणि त्यांचं चित्रांविषयीचं म्हणणं, असं ते पुस्तक आहे. मनोगतात त्यांनी या पुस्तकाच्या प्रक्रियेबद्दल छान लिहिलंय. पिझारो या दुर्लक्षित चित्रकाराचं प्रदर्शन भरवलं गेलं, तेव्हा तो म्हणाला होता, ‘लुक दे हॅव फ्रेम्ड देम’. त्याच चालीवर अवचटांनी लिहिलंय, ‘लुक, ही प्रिंटेड देम.’ आपल्याच गुरुजींकडून असं म्हटलं जायला नशीब लागतं!
याच चालीवर त्यांच्या लाकडाच्या शिल्पकलेवरील पुस्तक आकाराला आलं. त्यांनी केलेल्या शिल्पांचेही थोडे फोटो मी आधी पाहिलेले. मग त्यांच्या घरी गेलो असताना प्रत्यक्ष शिल्पं बघितली. या छंदाबद्दल सविस्तर लिहा असा लकडा त्यांच्यामागे लावला. पुस्तक होईल एवढा ऐवज आपल्याकडे आहे का, असं त्यांना वाटत होतं; पण लिहायला लागल्यावर त्यांनी भरभरून लिहिलं. आम्हीही मग शिल्पांची छान फोटोग्राफी केली आणि ‘लाकूड कोरताना’ नावाचं सुबक पुस्तक तयार झालं.
आधी म्हटल्याप्रमाणे ही तीनही पुस्तकं त्यांच्या डोक्यात नव्हती. त्यांच्या-सोबतच्या घसटीतून ती तयार झाली. एरवी लिखाणाबाबत अवचट ङ्गार हट्टी आहेत. त्यांच्या मनात असेल तरच लिहिणार. ‘अमुक विषयावर लिहा’ असं म्हटलं तर ते लिहीत नाहीत. नाही म्हणजे नाही. ढिम्म हलत नाहीत. पण इथे त्यांनी माझ्या आग्रहाखातर पुस्तकंच लिहिली. मला वाटतं, ‘मुक्तांगणची गोष्ट’ प्रकाशित करताना ‘सुसरबाई तुझी पाठ मऊ’ म्हणत भिडेखातर हाती आलेलं हस्तलिखित आहे तसं छापून टाकलं असतं, तर त्यांच्याशी असे संबंधच तयार झाले नसते. येणं-जाणं, गाठीभेटी, फोनाफोनीही झाली नसती. मग पुस्तकं कुठली डोक्यात चमकायला! ‘मुक्तांगण’च्या वेळी लेखकाने स्वत:भोवतीची तटबंदी कोसळू दिली म्हणूनच हे सारं घडू शकलं.
हे घडू शकलं कारण मुळात अवचट मनाने मोकळे आहेत. त्यांची स्वप्रतिमाही ‘आपण बावळट आहोत’ अशीच आहे. तसं ते उघडपणे म्हणतातही आणि तसं त्यांनी लिहिलंही आहे. आपण कोणी थोर आहोत, अशी पोज अजिबात नाही. आवडतं म्हणून लिहितो, आनंद मिळतो म्हणून चित्रं काढतो, सुचतं म्हणून ओरिगामी करतो, असं ते सहजपणे म्हणतात. खरं तर त्यांनी जे आणि जेवढं लिहिलं आहे, ते पाहता ते नि:संशयमराठीतले महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांनी आयुष्यभर मिशनर्यासारखं वंचितांचं, गरिबांचं, कष्टकर्यांचं जगणं समाजासमोर आणण्याचं काम केलं. हे सर्व लिखाण प्रत्यक्ष बघून, फिरून, बोलून, लोकांमध्ये वावरून केलं आहे. त्यामुळे त्यात रूक्षपणा, बोजडपणा अजिबात नाही. माणसांच्या बोलण्यातून ते विषय उलगडत नेतात. प्रसंग, घटना, वास्तव यांचं चित्रमय वर्णन ते करत जातात. त्यामुळे वाचक त्यांचं बोट धरून ते सांगतात ते सगळं बघतात. ते जसं बोलतात तसंच लिहितात. ही शैली खासच. त्यांना तसं म्हटलं, तर ‘यात कौतुक करण्यासारखं काय आहे? मला यापेक्षा वेगळं लिहिताच येत नाही,’ असं म्हणून ते मोकळे होतात.
अवचटांएवढं काम केलेला माणूस खरं तर किती कॉलर टाइट करून वागला असता! पण त्यांच्या डीएनएमध्ये ती फॅकल्टीच नाही. त्यांनी आयुष्यभर अत्यंत विपरीत परिस्थितीत लिखाणकाम केलं. त्यांचं सगळं लिखाण हे फिरतीवर आधारित होतं. स्वत: नोकरी वगैरे करत नसल्याने उत्पन्नाचा स्रोत नव्हता. डॉक्टर पत्नीच्या उत्पन्नावरच घर चालणार. त्यामुळे सगळं काम काटकसरीत. एसटीच्या लाल डब्याने खडखडत गावोगावी जायचं, कुणाकुणाकडे राहायचं आणि लिहायचं. मानधन काय मिळणार? झाला खर्च निघाला तरी धन्य मानायचं! अशा परिस्थितीत तीस-चाळीस वर्षं काम करणं म्हणजे खायची गोष्ट नाही. या सर्व काळात ना त्यांना कुणी अभ्यासासाठी पैसा पुरवला, ना स्कॉलरशिप वगैरे. मिळाली असेल तर अपवादात्मक. सगळं काम स्वयंप्रेरणेने आणि स्वयंखर्चाने. असं काम केलेल्या माणसाने एरवी स्वार्थत्यागाचे किती धिंडोरे पिटले असते! पण हेही त्यांच्या गावी नाही. मला वाटलं म्हणून मी केलं, असं त्यांचं सिंपल म्हणणं असतं.
मराठीमध्ये रिपोर्ताज पद्धतीचं लेखन सर्वांत पहिल्यांदा करणं आणि हा फॉर्म रुजवणं हे अवचटांचं मराठी पत्रकारितेला/साहित्याला योगदान आहे. पण त्यावर त्यांचं म्हणणं काय असतं? ‘‘मी लिहायला लागलो तेव्हा असा काही लेखनप्रकार जगात आहे, हेच मला माहिती नव्हतं. फार लोक म्हणायला लागले तेव्हा मी शोधाशोध केली, तर कळलं, की रिपोर्ताज हा फ्रेंच शब्द आहे आणि या प्रकारचं लेखन करणारे लोक जगात आहेत. मी या सगळ्याला अनभिज्ञ होतो. मला जसं लिहिता येत होतं तसं मी लिहित होतो. पण माझ्या लिखाणाला तुम्ही रिपोर्ताज म्हणत असाल, तर म्हणा बुवा!’’
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
अवचट एक गंमत सांगतात. म्हणतात, ‘‘मी सामाजिक विषयांवरही लिहिलं आणि ललित लेखनही केलं. पण ललित लेखक मला लेखक मानत नाहीत आणि पत्रकार मला पत्रकार मानत नाही. अशी माझी अवस्था आहे.’’ त्यामुळेच ते कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमांना अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उद्घाटक वगैरे म्हणून जातात, तेव्हा वृत्तपत्रांमध्ये त्यांचं वर्णन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असं केलं जातं. मजाच सगळी!
पण अवचटांना असं एखाद्या वर्णनात बंदिस्त करणं अवघडच आहे. ते जसे पत्रकार, लेखक आहेत तसेच ते सामाजिक कार्यकर्तेही आहेत. त्यांच्या कामाची सुरुवात १९७२च्या दुष्काळावेळेस झाली. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच ते बिहारमध्ये दुष्काळात मदत करण्यासाठी गेले. पुढे ‘युवक क्रांती दल’ या समाजवादी तरुणांच्या संघटनेकडे ओढले गेले. एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, विनायकराव कुलकर्णी, आचार्य केळकर यांच्या संपर्कात आले. मे. पु. रेगे, गं. बा. सरदार, दि. के. बेडेकर यांच्याकडून बरंच काही शिकले. डॉ. कुमार सप्तर्षींसोबत आंदोलनं वगैरे केली. दलित पँथर, छात्र युवा संघर्ष वाहिनी, भूमिसेना, हमाल पंचायत वगैरेंशीही त्यांचे संबंध होते. नामदेव ढसाळ, राजा ढाले, काळुराम दोधडे हे त्यातले काही मित्र.
आयुष्यातला काही काळ या चळवळींसोबत राहिल्यानंतर आपला पिंड कार्यकर्त्याचा नाही, असं मानून ते तिथून बाहेर पडले. पण सामाजिक प्रश्नांवर अव्याहतपणे लिहीत राहिल्याने ते जोडलेलेही राहिले. त्यांनी जसं प्रश्नांवर लिहिलं, तसं कार्यकर्ते आणि त्यांच्या कामावरही लिहिलं. डॉ. अभय बंग, अरुण देशपांडे, डॉ. हिरेमठ, डॉ. हिम्मतराव बावस्कर, सुरेखा दळवी, राजेंद्र केरकर अशा किती तरी कार्यरतांना त्यांनी महाराष्ट्रासमोर आणलं, त्यांना ओळख दिली, प्रतिष्ठा दिली. हे एका अर्थाने सामाजिक कामच झालं.
आणि प्रत्यक्ष सामाजिक कामाबद्दल बोलायचं, तर त्यांनी उभं केलेलं ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र’ आहेच की. गेल्या पस्तीस वर्षांत किती तरी हजार लोकांना ‘मुक्तांगण’ने व्यसनांच्या भीषण जगातून बाहेर काढलं आहे, पुन्हा जीवनाच्या पटरीवर आणलं आहे.
एवढ्या सगळ्या भूमिकांत मी अन्य कुठल्या माणसाला पाहिलेलं नाही. आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे यांच्यानंतर अवचटच असावेत.
‘अवलिये आप्त’ - सुहास कुलकर्णी
समकालीन प्रकाशन, पुणे
मूल्य - २०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment