अजूनकाही
गैरसमज आणि अपमाहिती यांचा जन्म होतो अज्ञानातून. आपल्याकडे मनाचे आरोग्य या विषयाबाबत अज्ञानच फार. आणि म्हणून गैरसमजही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार वा विकार आहे म्हटले की, त्याला वेडच लागले आहे, अशा पद्धतीने लोक विचार करताना दिसतात. तर हा समाजाच्या मनातील ‘केमिकल लोचा’च. यात समाधानाची बाब एकच की, हल्ली हा लोचा जरी कमी कमी होत चाललेला दिसतो. निदान शहरी भागात तरी. याचे श्रेय द्यावे लागेल या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि सातत्याने लिहिणाऱ्या डॉक्टरांना, तज्ज्ञांना. डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. राजेंद्र बर्वे, डॉ. शुभांगी पारकर यांच्यासारख्या अनेकांची नावे या संदर्भात घेता येतील. त्यातीलच एक नवे नाव - डॉ. वृषाली राऊत. ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ हे त्यांचे या विषयावरचे पुस्तक.
कामगार म्हटले की, लागलीच आठवतात ‘कामगार आहे मी तळपती तलवार आहे’ या पंक्ती. त्या लिहिताना कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नजरेसमोर होता मुंबईतल्या कापड गिरण्यांतला कामगार. डाव्या संघटनांच्या झेंड्याखाली हक्कांसाठी लढणारा. आज ना त्या गिरण्या राहिल्यात, ना तसा कामगार उरलाय. जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरण या दोन गोष्टी ९० नंतर आपल्याकडे आल्या आणि हळूहळू त्यांनी कामगार या वर्गाचा चेहरामोहराच बदलून टाकला. संघटित कामगारवर्ग ही संकल्पना मोडीत निघू लागलेली आहे. जुन्या गढीच्या पडक्या भिंती उराव्यात तशी त्यांच्या संघटनांची अवस्था झालेली आहे. आणि कामगारांचे कंत्राटी नोकर झाले आहेत. हे केवळ औद्योगिक क्षेत्रातच घडलेले आहे असे नव्हे. पांढरपेशा उद्योगांतील, व्यवसायांतील कर्मचाऱ्यांची अवस्थाही काही वेगळी नाही.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
डॉ. वृषाली जेव्हा कामगारांचे मानसिक आरोग्य म्हणतात, तेव्हा त्यांच्या नजरेसमोर हे समग्र कामगार-कर्मचारी विश्व असते. त्यात डॉक्टर असतात, शिक्षक असतात, पोलीस, सैनिक, वकिल, न्यायाधीश, संगणक अभियंते, झालेच तर राजकीय कार्यकर्ते, वाहनचालक, पत्रकार हे सारे असतात. त्यामुळे हे पुस्तक केवळ औद्योगिक क्षेत्रातील कामगारांबद्दल असावे, असा समज शीर्षकामुळे होत असला, तरी ते तसे नाही. खरे तर ते समाजाच्या एका मोठ्या भागाच्या मानसिक आरोग्याबद्दल आहे. सर्वांसाठीच ते का महत्त्वाचे ठरावे, याचे हे एक उत्तर.
लेखिका या स्वतः औद्योगिक मानसशास्त्रज्ञ आहेत. माहिती-तंत्रज्ञान उद्योगातील मानसिक आरोग्याच्या समस्या या विषयावर त्यांनी पीएच.डी. केली आहे. अनेक वर्षे त्या आयटी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांत यासंदर्भात काम केलेले आहे. व्यक्ती करत असलेले काम आणि त्याचे मानसिक आरोग्य यांचा निकटचा संबंध आहे. हे त्यांनी जसे अभ्यासले आहे, तसेच ते पाहिले आहे. त्या सांगतात, ‘काम करताना जसे शरीर झिजते तशीच मनाची पण झीज होते, जी डोळ्यांनी दिसत नाही मात्र त्याचे परिणाम शारीरिक पातळीवरसुद्धा दिसतात.’ मन आणि शरीर यांचे एकत्रित काम आणि त्याचा व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर होणारा परिणाम यावर जागतिक पातळीवर अभ्यास झालेला आहे. लेखिकेने भारतीय संदर्भात त्याचा विचार केला आहे. आपली समाजव्यवस्था, शिक्षणाची आणि कामाची पद्धत हे समजून घेत या विषयाची मांडणी त्यांनी केली आहे. या दृष्टीने या पुस्तकातील पहिले - ‘आरोग्य व त्याचे प्रकार’ हे प्रकरण लक्षणीय.
जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार आरोग्य म्हणजे काय, तर रोग किंवा अशक्तपणा नसणे. तसेच शारीरिक, मानसिक व सामाजिक कल्याण असणे. यात आणखी एक प्रकार येतो. तो आर्थिक आरोग्याचा. डॉ. वृषाली यांनी या पुस्तकातून या चारही प्रकारांची नेमकेपणाने ओळख करून दिलेली आहे. त्यांचे निर्धारक काय आहेत, त्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, हे सांगितले आहे. आपण अनेकदा हे लक्षातच घेत नसतो की, सामाजिक आणि आर्थिक आरोग्य हे त्या समाजातील व्यक्तींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अवलंबून असते. आर्थिक आरोग्य हे मानसिक आरोग्याशी जुळलेले असते. याचा साधा अर्थ असा, की व्यक्तीच्या दुखण्यांतून सामाजिक आजार वाढू शकतात आणि सामाजिक विकार हे व्यक्तीच्या दुखण्यांना कारणीभूत ठरतात. डॉ. वृषाली यांनी या दिशेने या प्रकरणाची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या काळाच्या पार्श्वभूमीवर हा प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा.
आजचा हा काळ संगणकाने पछाडलेला. मानसिक आरोग्याला त्याचा मोठा धोका. इंटरनेटचा, समाजमाध्यमाचा अतिवापर, त्यातून निर्माण होणारा माहितीचा कचरा आणि त्याचे अतिओझे - इन्फर्मेशन ओव्हरलोड, या सगळ्यांत मानवी मेंदूला पांगळे करण्याची शक्ती आहे. किंबहुना ते घडत असलेले आपण पाहतच आहोत. समाजातील जल्पकांच्या हिंस्त्र झुंडी तर आपण पाहतच आहोत, परंतु आपल्या आजुबाजूला समाजमाध्यमांच्या अतिवापराने मानसिकदृष्ट्या आजारी पडलेल्या अनेक व्यक्ती सहज दिसू लागल्या आहेत. त्यातील कोणी चिंताग्रस्त आहे, कोणास औदासिन्याने झपाटले आहे, कोणी अतिचंचल झाले आहे, तर कोणी नार्सिसिस्ट म्हणजेच आत्मकेंद्री.
डॉ. राऊत सांगतात - ‘जसे दारू, सिगारेट, कोकेनने मेंदूतील सर्किट बदलतात तसेच सोशल मीडियानेपण मेंदूतील रचना बदलून व्यसन लागते… कोकेन व सोशल मीडिया हे मेंदूंवर जवळपास सारखेच काम करतात. फेसबुकने डिप्रेशन - औदासिन्य वाढते, ट्विटरने अँक्झायटी - चिंता वाढते. इन्स्टाग्राम तर मानसिक आरोग्यासाठी सगळ्यात धोकादायक.’
ते कसे याचा लेखिकेने केलेला उहापोह मुळातून वाचण्यासारखा आहे. आपल्याला असलेले धोके थोडे खोलात जाऊन समजून घेणे केव्हाही फायद्याचे. ते धोके समजले, तरच त्यावरचे उपाय शोधता येतील. ‘वेगवेगळ्या व्यवसायातील लोकांचे मानसिक आरोग्य’ हे प्रकरण यासंदर्भात महत्त्वाचे ठरावे.
लेखिका सांगतात, की अजूनही भारतात व्यावसायिक आरोग्याला गांभीर्याने घेतले जात नाही. त्याची विविध कारणे आहेत. गधामेहनत करणारा तोच कामसू, कामाच्या तासांपेक्षा जास्त वेळ थांबून काम करणारा तो कार्यक्षम, एकही सुटी न घेता काम करणारा तो प्रामाणिक, असे अनेक गैरसमज आहेत. व्यावसायिक आजार असतात हेच अनेकांना माहीत नसते. त्यामुळे त्यांचे निदान वगैरे तर दूरचीच गोष्ट.
याचा परिणाम अखेर कामगार, कर्मचारी यांच्या कार्यक्षमतेवर आणि पर्यायाने उद्योग, व्यवसायाच्या नफ्यावर होत असतो. प्रत्येक क्षेत्राची काम करण्याची पद्धत वेगळी. त्यामुळे तेथील मासिक आरोग्याचे प्रश्नही वेगळे. डॉ. वृषाली राऊत यांनी अशा काही महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश या प्रकरणात केला आहे. ते त्या-त्या क्षेत्रातील व्यक्तींना उपयुक्त तर ठरतीलच, परंतु अन्य क्षेत्रातील कामगार-कर्मचाऱ्यांनाही त्यातून विचाराची दिशा मिळू शकेल.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
ताण, झोप, भावना, व्यसन हे मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक. त्यात आणखी एकाचा समावेश होतो. तो म्हणजे एर्गोनॉमिक्स. कामाच्या ठिकाणच्या पर्यावरणाचा कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या परिणामाचे जीवशास्त्रीय दृष्टीकोनातून मापन करणारी ही अभियांत्रिकी शाखा. या सगळ्याची शास्त्रशुद्ध माहिती एका स्वतंत्र प्रकरणातून लेखिकेने दिली आहे. मानसिक अनारोग्यास कारक ठरणारे हे तमाम घटक अंतिमतः कार्यक्षमतेवर प्रहार करत असतात. तेव्हा त्यांची माहिती घेणे एक व्यक्ती म्हणून जितके आवश्यक, तेवढेच ते संस्था, उद्योग, व्यवसाय यांनाही गरजेचे ठरावे. अखेर त्यातच त्यांचा लाभ आहे.
आरोग्यासारख्या विषयावरील लेखनात अनेकदा एक अडचण उद्भवते. त्यात शास्त्रीय परिभाषा वापरावी लागते. ते मग पाठ्यपुस्तकीय बनून जाते. त्याऐवजी ते अतिसोपे करावयास जावे, तर त्यातील काटेकोरपणा हरवून भोंगळपणा येतो. विषयाचे गांभीर्य लयास जाते. एकंदर कसरतीचेच काम ते. डॉ. वृषाली यांनी ती व्यवस्थित साधल्याचे दिसते. बोजडपणा टाळून पण विषयाची आवश्यक लय ढळू न देण्याचा प्रयत्न त्यांनी प्रामाणिकपणे केला आहे. ‘अक्षरनामा’तून यापूर्वी लिहिलेल्या लेखांचा अनुभव बहुधा त्यांना येथे कामास आला असावा.
एकंदर, समाजाच्या आणि कामगार-कर्मचाऱ्यांच्या वेल-बीईंगसाठी - स्वास्थ्यासाठी - आवश्यक असलेली माहिती देण्याचा हा लेखिकेचा प्रयत्न. सर्वे सन्तु निरामयाः ही त्यामागील कळकळ. यामुळे लाभदायी वाचन या सदरात हे पुस्तक नक्कीच मोडते.
‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ - डॉ. वृषाली राऊत
मैत्री पब्लिकेशन, पुणे, पाने - २००, मूल्य - ३०० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5382/Kamgaranche-Manasik-Arogya-
.................................................................................................................................................................
लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांचे ‘प्रोपगंडा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
ravi.amale@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment