अरुण जाखडे हे जिरायती तर सुनील मेहता हे बागायती शेती करत होते, असे म्हणावे लागते. पण मूलत: ते दोघेही शेतकरीच होते!
पडघम - सांस्कृतिक
विनोद शिरसाठ
  • मेहता पब्लिशिंग हाऊसचे बोधचिन्ह व सुनील मेहता आणि पद्मगंधा प्रकाशनाचे बोधचिन्ह व अरुण जाखडे
  • Sat , 05 February 2022
  • पडघम सांस्कृतिक मेहता पब्लिशिंग हाऊस Mehta Publishing House सुनील मेहता Sunil Mehta पद्मगंधा प्रकाशन Padmagandha Prakashan अरुण जाखडे Arun Jakhade

गेल्या आठवड्यात मराठी ग्रंथप्रकाशनाच्या क्षेत्रात विशेष दु:खदायक म्हणावेत असे दोन मृत्यू झाले. मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक-प्रकाशक सुनील मेहता यांचे १३ जानेवारीला निधन झाले आणि त्यानंतर तीनच दिवसांनी पद्‌मगंधा प्रकाशनाचे संस्थापक-संचालक अरुण जाखडे यांचे निधन झाले. त्यातील मेहता हे वयाने साठीच्या आतच होते आणि जाखडे यांनी नुकतीच पासष्टी ओलांडली होती. दोघेही इतके कार्यक्षम व कर्तृत्ववान होते की, आणखी एक-दोन दशके चांगले कार्यरत राहू शकले असते आणि त्यांच्याकडून उत्तमोत्तम अशी हजार-दोन हजार तरी पुस्तके सहज प्रकाशित होऊ शकली असती. कारण दोघेही आता पूर्ण आत्मविश्वासाने घोडदौड करत होते, महत्त्वाचे म्हणजे राज्य व राष्ट्रीय स्तरांवरील ग्रंथव्यवहाराची नस त्यांना सापडली होती. आणखी विशेष हे की, त्या दोघांच्या वृत्ती, अभिरूची, कार्यपद्धती आणि ध्येयधोरणे यात बरीच तफावत होती; तरीही त्यांची वाटचाल परस्परांना पूरक व मराठी ग्रंथव्यवहाराला पुढे घेऊन जाणारीच होती, त्या दोघांच्या वाटचालीवर ओझरता दृष्टिक्षेप टाकला तरी हे स्पष्ट होईल.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

सुनील मेहता हे १९८७ पासून प्रकाशन व्यवसाय करत होते, मात्र मेहता प्रकाशनाची स्थापना त्यांचे वडील अनिल मेहता यांनी त्याच्या दहा वर्षे आधीच केली होती. अर्थात, ग्रंथविक्रेते म्हणून कोल्हापुरात दीर्घकाळ काम केल्यानंतर अनिल मेहता यांनी प्रकाशनसंस्था सुरू केली होती आणि पहिल्या दशकात कमी पुस्तके प्रकाशित केली असली तरी मेहता प्रकाशनाची चांगली ओळख निर्माण केली होती. मात्र सुनील मेहता यांनी सूत्रे हातात घेतली आणि पुढील साडेतीन दशकांत मेहता पब्लिशिंग हाऊसला मराठी प्रकाशन व्यवसायात अव्वल स्थानावर घेऊन जाण्याइतपत मजल मारली. या काळात त्यांनी लहान-मोठी अशी साडेतीन हजार पुस्तके प्रकाशित केली. म्हणजे वर्षाला कमीत कमी शंभर आणि आठवड्यात दोन असे ते प्रमाण आहे. यात प्रामुख्याने इंग्रजीतून मराठीत आणि हिंदी, कन्नड, बंगाली इत्यादी भारतीय भाषांतून मराठीत आणलेली पुस्तके अर्ध्याहून अधिक असतील. उर्वरित पुस्तके मराठीतील नव्या-जुन्या साहित्यिकांची आहेत. दर्जेदार निर्मिती, वितरणाचे मोठे जाळे, मोठ्या जाहिराती आणि आक्रमक पद्धतीने मार्केटिंग ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये राहिली आहेत. राष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गज नेत्यांची चरित्रे वा आत्मचरित्रे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोबेल व अन्य पुरस्कार विजेत्यांची पुस्तके धडाकेबाज पद्धतीने त्यांनी मराठीत आणली.

त्याशिवाय भारतातील सुधा मूर्ती यांच्यापासून गुलजार यांच्यापर्यंतच्या अनेक लेखकांची पुस्तकेही मराठीत आणली. मराठीतील व्यंकटेश माडगूळकर ते विश्वास पाटील या दरम्यानच्या लेखकांची यादीही खूप मोठी सांगता येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गजांना पुण्यात आणून वाचक-लेखक संवाद घडवणे, हे काम आज तुलनेने सोपे झाले असले तरी, सुनील मेहता यांनी त्याचा प्रारंभ दोन दशकांपूर्वी केला, तेव्हा त्याची अपूर्वाई खूप जास्त होती.

शिवाय इ-बुक हा प्रकारही जेव्हा मराठी वाचकांना केवळ ऐकून माहीत होता आणि मराठीतील बहुतेक सर्व प्रकाशक त्याकडे उदासीनतेने किंवा तुच्छतेने पाहत होते तेव्हा, म्हणजे २०१३ मध्येच सुनील मेहता यांनी त्यांची दोनेक हजार पुस्तके इ-बुक स्वरूपात आणली होती. गेल्या वर्षी कोविड काळात आठ-दहा महिने प्रकाशन व्यवहार ठप्प होता, तेव्हा त्या इ-बुक्सच्या विक्रीत दोनशे ते तीनशे पटीने वाढ झाली, तेव्हा त्यांची ‘व्हिजन’ काय प्रकारची होती, याचा प्रत्यय आला.

मेहता यांनी देश-विदेशातील किती लेखकांशी, प्रकाशकांशी, अनुवादकांशी संपर्क-संवाद ठेवला, याचा विचार केला तर अचंबित व्हावे लागते. हे सर्व करायचे तर आर्थिक व्यवहार तेवढेच चोख व प्रवाही ठेवावे लागतात आणि ती कसरत सतत करावी लागते.

अरुण जाखडे यांची प्रकाशकीय वाटचाल अगदी वेगळ्या पद्धतीने झाली. अहमदनगर जिल्ह्यातून पुणे शहरात ते आले एका कंपनीत नोकरी करण्यासाठी. शेतकरी कुटुंबातून आलेले व विज्ञानाचे पदवीधर असल्याने त्यांचा साहित्याशी थेट संबंध कमीच आला. पण वाचन-लेखनाची आवड जोपासत गेल्यावर, कंपनीतील कामगारांसोबत काही कृती-कार्यक्रम सुरू झाले आणि त्यातून पद्‌मगंधा दिवाळी अंक व पद्‌मगंधा प्रकाशन यांचा जन्म झाला. अगदीच नवख्या किंवा रूढ अर्थाने लेखक म्हणता येणार नाही अशांचे लेखन प्रकाशित करण्याचे काम त्यांनी १९८८नंतरची पाच-सात वर्षे केले. आणि त्यानंतर मात्र अभिजात साहित्य, समीक्षा, गंभीर, वैचारिक लेखन यासाठी पद्‌मगंधा प्रकाशन क्रमाक्रमाने लहान-मोठे प्रकल्प राबवत राहिले. त्यांनी साडेतीन दशकांच्या वाटचालीत साडेसातशे पुस्तके प्रकाशित केली. म्हणजे वर्षाला २५ आणि महिन्याला दोन असे ते प्रमाण दिसते. पण त्यांनी हाताळलेले लेखक व विषय यावर नजर टाकली आणि त्यांची एकहाती काम करण्याची शैली लक्षात घेतली तर हे प्रमाण निश्चितच कमी नाही.

रा.चिं. ढेरे, गणेश देवी अशा अभ्यासक संशोधकांची लोकसाहित्य व भाषा या विषयांवरील मोठी पुस्तके काढणे आणि ती सर्वदूर पोहोचवणे हे सोपे काम नव्हते. शिवाय, र.धो. कर्वेंपासून आगाथा ख्रिस्ती यांच्यापर्यंतचे मोठे प्रकल्प मार्गी लावणे, हे खूप जिकिरीचे काम होते. अनुवादाच्या क्षेत्रांतही त्यांनी काही महत्त्वपूर्ण पुस्तके आणली. पाऊलो कोएलोची ओळख पहिल्यांदा मराठीला झाली ती पद्‌मगंधामुळेच आणि सिमोन द बोव्हुआर यांचे ‘सेकंड सेक्स’ किंवा हिलरी क्लिंटन यांचे आत्मचरित्र ही अशी यादीही खूप मोठी आहे.

अरुण जाखडे यांचे वर्तन व व्यवहार हे वरवर पाहता जुन्या पठडीतील जाणवत असे, पण आतून पाहिले तर ते बराच पुढचा विचार करत असत, हे त्यांना जवळून पाहिलेल्यांच्या लक्षात येत असे. अन्यथा दिल्लीतील जागतिक पुस्तक मेळाव्यांना भेटी देणे आणि ग्रंथविक्री व ग्रंथनिर्मितीसाठी नवनवे प्रस्ताव पुढे आले, तर त्याला उत्साहाने प्रतिसाद देणे, हे त्यांना शक्य झालेच नसते.

सुनील मेहता आणि अरुण जाखडे यांचे योगदान नीट समजून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांची सूची नजरेखालून घालायला हवी. नंतर त्यांतील लेखक आणि त्या पुस्तकांचे आशय-विषय किती विविध व सखोल आहेत हे समजून घ्यायला हवे. त्यानंतर ही पुस्तके महाराष्ट्रातील व राज्याच्या बाहेरील किती संस्था, संघटना, विद्यापीठे यांना कशी उपयुक्त ठरली, याचा तपास करायला हवा. आणि मग किती प्रकारचे वाचक, लेखक, अभ्यासक, संशोधक यांना ही पुस्तके उपयुक्त ठरली यांचा शोध घ्यायला हवा. त्यानंतर त्यांनी किती विविध लेखक, अनुवादक मराठीत नव्याने आणले किंवा नावारूपाला आणले याची उजळणी करायला हवी.

शेवटी किती प्रकारचे विषय, लेखनप्रकार पहिल्यांदा मराठीत आणून किंवा पुन्हा पुन्हा आणून किती नवी दालने खुली केली किंवा समृद्ध केली, याचाही शोध घ्यायला हवा. अशा पद्धतीने व टप्प्याटप्प्याने फक्त तपशील उभे केले आणि त्यांची नीट जुळवणी केली, तर कोणीही जाणकार माणूस थक्क होऊन जाईल. या दोन्ही प्रकाशनसंस्थांच्या वाटचालीत अनेक घटकांचा सहभाग होता, म्हणूनच इतके होऊ शकले हे खरे; पण त्यांच्या मागची दूरदृष्टी, कल्पकता व अथक मेहनत या दोघांची होती हे निर्विवाद!

त्यामुळे त्यांचे हे काम कोणत्याही चांगल्या व मोठ्या साप्ताहिकाने, दैनिकाने, शिक्षणसंस्थेने केलेल्या कामाइतकेच किंबहुना जास्त तोलामोलाचे आहे असेच म्हणावे लागेल. मात्र तशी मान्यता किंवा प्रतिष्ठा या दोघांना आणि असे काम करणाऱ्या अन्य प्रकाशकांनाही मिळत नाही. याचे कारण ‘प्रकाशन’ व्यवहाराकडे पाहण्याचा आपल्या समाजाचा दृष्टिकोन पुरेसा विकसित झालेला नाही. अनेक वेळा तर बराच सदोष असतो. याचे कारण लेखक व वाचक या दोन्ही वर्गात प्रकाशन व्यवसायाबाबत अद्याप बरेच अज्ञान, गैरसमज आहेत. किंबहुना निरक्षरता आहे असे म्हणावे लागेल.

मुळात प्रकाशन चालवणे म्हणजे वाचक, लेखक, अनुवादक, संपादक, मुद्रित शोधक, चित्रकार-मुखपृष्ठकार, मुद्रक, बाईंडर, जाहिराती इत्यादी अनेक घटकांची मोट बांधावी लागते. यातील प्रत्येक घटकाच्या कमी-अधिक लहरी सांभाळणे, अव्यवस्थितपणा अनुभवणे, अनेक घटकांमध्ये सातत्याचा व परिपूर्णतेचा अभाव असणे हे सर्वच प्रकाशकांच्या वाट्याला कमी-अधिक प्रमाणात येतेच. आणि ते करताना नवनिर्मितीचा आनंद व व्यवहाराची गणिते जुळवण्याची धाकधूक अशी संमिश्र भावना सतत मनात बाळगावी लागते. कारण एवढे करूनही प्रकाशन व्यवसाय १० ते २० टक्के यापेक्षा अधिक परतावा देऊ शकत नाही. त्यातील काही पुस्तकेच नफा देतात, काही पुस्तके भरपूर तोटाही देतात. शिवाय प्रकाशकाने स्वत: खर्च केलेला वेळ, ऊर्जा व श्रम लक्षात घेतले, तर बहुतांश वेळा तो आतबट्ट्याचाच व्यवहार असतो.

त्यामुळे एका मर्यादित अर्थाने प्रकाशन व्यवहार हा शेती करण्यासारखाच प्रकार असतो. अर्थातच, जिरायती व बागायती शेतीत जेवढा फरक असतो, तो इथेही असतोच. आणि म्हणून तसा विचार केला तर अरुण जाखडे हे जिरायती तर सुनील मेहता हे बागायती शेती करत होते, असे म्हणावे लागते. पण मूलत: ते दोघेही शेतकरीच होते हे लक्षात घ्यावे लागेल.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

...............................................................................................................................................................

एक चांगली गोष्ट अशी आहे की, या दोन्ही प्रकाशनसंस्था पुढील काळात अधिक भरभराटीला येऊ शकतील, अशी अनुकूल परिस्थिती आहे. कारण सुनील मेहता व अरुण जाखडे यांच्या मुलांना या कामात नुसताच रस व गती आहे असे नसून, नव्या काळाशी सुसंगत राहता येईल, अशी व्हिजनही आहे. त्या मुलांवर विशेषत: अखिल मेहता व अभिषेक जाखडे यांच्यावर आता दु:खाचा डोंगर कोसळलेला असणे साहजिक आहे. मात्र त्यांची इतकी पूर्वतयारी झालेली आहे की, इतका भक्कम पाया व विस्तार असलेल्या प्रकाशनसंस्था चालवताना त्यांच्या कर्तृत्वाला नवे धुमारे फुटतील.

अधिक महत्त्वाचे म्हणजे त्यांना आपल्या पित्यांनी मागे ठेवलेल्या आठवणी पूर्वीचे प्रत्येक पुस्तक हाताळताना प्रेरणा देत राहतील, प्रत्येक नवे पुस्तक प्रकाशित करताना आंतरिक बळ देत राहतील. आणि त्यासाठी हजारो लेखक व लक्षावधी वाचकांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी राहतील! त्यामुळे साधनेच्या वतीने  त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सुनील मेहता व अरुण जाखडे यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!

‘साधना’ साप्ताहिकाच्या २९ जानेवारी २०२२च्या अंकातून साभार

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......