अजूनकाही
बिजापुरात १५३५ साली इब्राहिम आदिल शाह (पहिला) याने सुलतानपदाच्या तख्तावर बसताच काही क्रांतिकारक बदल केले. त्यामुळे पुढे ‘महाराष्ट्र धर्म’ आकाराला आला. त्याने दरबारात शिया परंपरांच्या जागी सुन्नी परंपरा आणल्या. इराणी पद्धतीच्या टोप्या घालायला बंदी केली. चारशे म्लेंच्छ (अरबी–पश्चिमी) सरदारांना बाहेरचा रस्ता दाखवला (ज्यांना रामरायानं लगोलग स्वतःकडे रुजू करवून घेतलं!). त्यांच्या जागी दख्खनी आणि हबशी सरदार, सैनिक ठेवले. फारशी भाषेत लिहिले जाणारे महसुली खात्याचे दस्तऐवज मराठी आणि कानडीत भाषेत ठेवायला सुरुवात केली.
या कामासाठी त्याला त्या काळात ब्राह्मणांशिवाय कुणी सापडलं नसणार. त्यामुळे सुलतान इब्राहिम आदिल शाहच्या दरबारात ब्राह्मणांची उठबस आणि दबदबा वाढला. न्यायव्यवस्थेचं दस्तऐवजदेखील त्याने मराठी आणि कानडीत लिहिले. ते जोपासले जातील, हे पाहिलं. हे काम पुन्हा ब्राह्मणांकडे आलं. त्यामुळे धर्मसभेचं महत्त्व कायम राहिलं. न्यायनिवाडे मराठीत व्हायला लागल्यावर गाव-खेड्यातील तंटे-बखेडे न्यायालयात जाऊ लागले. त्यासाठी लागणारे पुरावे, निकाल यांचे दस्तऐवजीकरण होऊ लागलं.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
बहामनी सुलतानांच्या काळात म्हणजे १४व्या शतकात ‘कागद’ निर्मितीचं तंत्र पर्शिया – अरेबियातून दख्खनी–पश्चिम म्हणजे आजच्या महाराष्ट्राला अवगत झालं होतं. पण तरी इब्राहिम आदिल शाहच्या आधी, अहमदनगरच्या निझामशाहीत स्थानिक भाषांना लिखाणात महत्त्व दिल्याचे पुरावे नाहीत. बिजापुरात दख्खनी विकसित होत होती, तर पूर्वेकडल्या कुतूबशाहीत तेलगू भाषेला इतका राजाश्रय मिळाला होता. इतका की, तिथले सुलतान ‘तेलिगू सुलतान’ म्हणून ओळखले जात.
सुलतान इब्राहिम (१५५० -८०) ‘इभरामा चक्रवर्ती’ म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याने आणि त्याचा सरदार अमीन खान याने तेलगू साहित्याला प्रोत्साहन, पुरस्कार दिले. तीच परंपरा नंतर येणाऱ्या कुतूबशाही सुलतानांनी चालवली. त्यांनी हिंदू मिथकं वापरून साहित्य रचलं, ‘महाभारता’चा तेलगू अनुवाद केला... जणू पूर्वीच्या काकतीय राजांचेच वंशज! पण कागदाचा जो वापर मराठीत महसूल खातं, न्यायनिवाड्याचे दस्तऐवज निर्माण करण्यासाठी झाला, तसा तेलगूत झालेला दिसत नाही.
तर, तुकारामाच्या ‘गाथा’ इंद्रायणीत बुडवल्यानंतर १३ दिवसांत पुन्हा प्रगट होतात. याबाबतीत ‘त्या तुकारामाच्या अनुयायांनी पुन्हा लिहून काढल्या’ हा सांगितलेला किस्सा खरा असू शकतो. किंवा महाराष्ट्रभर विखुरलेल्या त्यांच्या अनुयायांनी (ज्यात बहिणाबाई ही त्यांची ब्राह्मण शिष्याही होती) या गाथेच्या प्रती जपून ठेवल्या असतील, ज्या लगेच एकत्र केल्या गेल्या. कुणबी जातीत जन्मलेल्या आणि किराणा दुकान चालवणाऱ्या तुकारामाला लिहिता-वाचता येत होतं, ते दुकानाचे व्यवहार लिहीत होते. याचा अर्थ तुकारामासारख्या शूद्रांनाही व्यवहार ज्ञान मिळत होतं, त्याची बंदी नव्हती, पण धार्मिक संस्कृत साहित्य वाचण्या–लिहिण्याची बंदी होती.
तुकारामाच्या गाथा इंद्रायणीत बुडवण्याची वेळ तेव्हाच्या रामेश्वर भट्ट या ब्राह्मणानं आणली. ‘तुका शूद्र असून वेदांमधले ज्ञान कशाला गावबहाल करतात’ असा त्याचा आक्षेप होता. कारण धर्मसत्तेत ब्राह्मणांच्या स्थानाला त्यांनी आव्हान दिलं होतं. ब्राह्मणी वर्चस्वातून पसरवलेल्या अंधश्रद्धांवर प्रहार केले होते. म्हणजे आतापर्यंत चातुर्वर्ण्य चौकटीच्या तत्त्वज्ञानाचा वापर करून ब्राह्मण ज्या शेतकरी जातींना कायदेशीर मान्यता देत होते, ती चौकट तुकाराम ओलांडू पाहताहेत, असा धोका निर्माण झाला होता. जे लेखनतंत्र वापरून ब्राह्मणांनी आपलं स्थान १७व्या शतकापर्यंत बळकट केलं होतं. ते तुकोबाच्या हाती जाणं आणि त्या माध्यमातून ब्राह्मणी अधिसत्तेला आव्हाण देणं, त्यांना सहन होत नव्हतं.
तुकाराम जेव्हा वारकरी संप्रदायात लोकप्रिय होत होते, त्या वेळी रामदास स्वामी महाराष्ट्राला विठोबाऐवजी रामाची आराधना करावी, हे सांगत होते. ‘नीच प्राणी गुरुत्व पावला, तेथे आचारचि बुडाला, वेदशास्त्र ब्राह्मणाला, कोण पुसे’ अशी खंत व्यक्त करणारा रामदासांचा अभंग तेव्हाच्या समाजात वेदशास्त्रांचं आणि ते सांगणाऱ्या ब्राह्मणांचं वर्चस्व ठेवू पाहणाऱ्यांचं प्रातिनिधिक उदाहरण असलं पाहिजे. भक्तीपरंपरेचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला, म्हणजे सर्वांत आधी ब्राह्मणांना कागदाच्या उपलब्धतेमुळे त्यांना कागदावर अभंग, ‘ज्ञानेश्वरी’ लिहून काढता आले, असाही होतो.
पण शेतीतंत्रात तरबेज शेतकरी जातींनी पशुपालक जातींनाही असंच जेरीस आणलं होतं. सातव्या शतकात पंढरपूरच्या आजूबाजूचा भाग ‘पांडरंगपल्ली’ म्हणून ओळखला जात होता. म्हणजे जंगली टोळ्यांचा प्रदेश! युद्धकाळात पशुधन निबीड अरण्यात हलवून युद्धखोरांपासून त्याचं संरक्षण करता येत होतं, पण शेतीचं नुकसान होई. त्यामुळे तोपर्यंत पठारावर कृषिसंस्कृती मूळ धरू शकली नव्हती.
यादव काळात म्हणजे आठव्या शतकापासून पशुपालक जातींनी व्यापलेल्या दख्खनच्या पठारावर शेतकरी जाती हळूहळू वसाहती निर्माण करू लागल्या. दख्खनच्या पठारावर शेतकरी जाती - कुणबी, माळी - स्थिरावत असताना त्यांच्यात आणि पशुपालक धनगर जातींमध्ये संघर्ष होऊ लागला. शैव विठोबा हे दैवत मुळात चतुर्वर्णांकित कुणबी– शेतकरी– वैष्णव धर्माच्या परिघाबाहेरच्या धनगर समाजाचं होतं. एकदा पठारावर जम बसवल्यार शेतकरी जातींनी शैव विठोबाला स्वीकारलं, पण त्याचं वैष्णवीकरण करून. वारकरी संप्रदायानं त्याला चालना दिली.
११८९ साली पंढरपुरात तयार झालेल्या विठ्ठल मंदिरातला विठोबा आपल्या गायींचं रक्षण करताना मरण पावला होता. पण मंदिर बनलं, तेव्हापासूनच ब्राह्मण पुरोहित तिथं जम बसवते झाले. त्यांनी विठोबाला विष्णूचा अवतार करून टाकलं.
दख्खनच्या पठारावर आधी कोळी, मग गवळी, मग धनगर, मग कुणबी-माळी स्थायिक होत गेले, तसे त्यांचे आपापसांत आणि एकमेकांत संघर्ष घडले, शहिद निर्माण झाले, पुजले गेले, त्यांचे देव बनले, जे नंतर येणाऱ्यांनी उचलून धरले. या संघर्षात ब्राह्मणांनी जे अधिक मोबदला देऊ शकतील, त्यांची बाजू घेतली. मराठी भाषेवर पोसली जाऊन वारकरी भक्तीचळवळ चांगलं बाळसं धरू लागली होती, पण तिला कागदावर उतरायला इब्राहिम आदिल शाहने मराठीला दिलेलं महत्त्व कामी आलं होतं.
१३२०च्या दशकात तुघल्लकानं दख्खन काबीज केल्यावर पुढच्या २० वर्षांत त्याच्याविरुद्ध बंडाळी झाली होती आणि सुलतानशाह्या उदयाला आल्या होत्या. पूर्वीच्या यादव, होयसाळा पंड्या, काकतीय काळात जी भाषिक राष्ट्र–राज्यं उदयाला आली होती, जवळपास तोच प्रदेश एकेका सुलतानशाहीनं कोरला.
सुलतानशाहीच्या काळात आणखी एक क्रांती झाली, ती म्हणजे बारा बलुतेदारांचं सैनिकीकरण! आधी तुघल्लकाच्या दिल्लीवर तैमूरने आक्रमण केलं, म्हणून सुलतानांना तो जवळचा वाटू लागला. आणि मग कोकणच्या समुद्री किनाऱ्यावरून अरबांशी व्यापार–मैत्री सुरू झाली. पण लगेच या प्रेमाला ओहोटी लागली. म्लेंच्छविरोधी भावना सुलतानांमध्येही बळकट झाली. स्थानिक जनतेतून सैन्य उभं व्हायला चालना मिळाली. त्यामुळे आपापल्या गावातल्या शेतीलाही संरक्षण मिळालं. ज्याची ऐपत असेल त्याने तलाव खोदावा, आजूबाजूच्या जमिनीला सिंचनाची सोय मिळवून द्यावी आणि स्वतःचं सैन्य उभारावं- जे या नाहीतर त्या सुलतानासाठी लढवावं, असं होत गेलं.
१६व्या शतकापर्यंत स्थानिकांमधून सैन्य उभारणाऱ्या सरदारांना सुलतानांनी पदरी ठेवायला सुरुवात केल्यावर या सरदारांना गरज पडेल, तसं कर्ज द्यायलाही ब्राह्मण पुढे आले. आपली सेवा बळकट जातींना देत आपली प्रभुसत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न ब्राह्मण जातींनी केला. रामदास स्वामी म्हणतात तसे ‘वेदशास्त्र पारंगत’ ब्राह्मणांचं महत्त्व सुलतानशाहीत कमी झाल्याने सावकारीचा मार्ग ब्राह्मणांनी अवलंबला असणार.
शेतीचं तंत्र विकसित होत होतं, त्याचा अवलंब करणाऱ्या जातींची भरभराट होत होती. तेव्हा त्यांची बाजू घेतली, तर कागदाचा वापर करून लिखित दस्तऐवज निर्माण करणाऱ्या आदिल शाहकडून मोबदला घेऊन त्यालाही सेवा दिली.
महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरेनं मराठी या भाषेची वीण घट्ट करत, सोबत पशुपालक जातींच्या देवाला आपल्या सोयीनं परावर्तीत केलं. या संघर्ष आणि समेटाच्या पार्श्वभूमीमुळे महाराष्ट्रात जातवार उतरंड असली तरी संसाधनं आणि आर्थिक विषमताही उत्तरेतल्या किंवा दक्षिणेतल्या प्रांतांतल्या इतकी गहिरी झाली नाही, असे रिचर्ड ईटनसारखे इतिहासकार नमूद करतात.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
प्रत्येक वेळी विकसित तंत्र वापरणाऱ्यांमुळे ज्यांचं नुकसान झालं, त्यांच्यात भांडणं झाली, त्यात जे वरचढ ठरले त्यांचा इतिहास त्यांच्या सोयीनं लिहिला गेला, पण मागे राहिले त्यांचाही विसरला गेला नाही.
प्रत्येक युगात एक तुका एका नव्या तंत्रावर स्वार होऊन पुढे येतो आणि त्याला ट्रोल केलं जातं, पण तुका काही विस्मृतीत जात नाही. सत्याग्रहाचं तंत्र विकसित करणाऱ्या, त्याचा प्रचार ‘यंग इंडिया’, ‘इंडियन ओपिनियन’ यांसारख्या वर्तमानपत्रांमधून करणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांनीही तुकारामाचे अभंग इंग्रजीत अनुवादित केले होते. एका अर्थी ते विठोबा, तुकोबाचे वारसदार होतात. पण पुढे तेही ट्रोल होतात.
वर्तमानपत्रांना आज सोशल मीडियानं मागे टाकलं आहे. प्रभुत्व आणि समानतेसाठीच्या संघर्षात सोशल मीडिया बजावत असलेली भूमिका प्रत्येक युगात कोणत्या ना कोणत्या तंत्रज्ञानानं बजावलेली आहे. त्यावर कोण स्वार होतं, यावर जय-पराजयाचं पारडं कुठल्या बाजूला झुकणार ते ठरतं.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment