‘शिवराळां’च्या महाराष्ट्र निर्मितीत आपलाही खारीचा वाटा आहे, त्याबद्दल आपले अभिनंदन!
पडघम - राज्यकारण
रवि आमले
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 01 February 2022
  • पडघम राज्यकारण शिव्या शिवराळपणा ठाकरी भाषा जल्पक ट्रोल्स टिळक आगरकर आचार्य अत्रे बाळासाहेब ठाकरे

हे आपणही ‘ठाकरी’ भाषेत सांगू शकतो, पण सध्या साध्याच भाषेत सांगू या. एक अविवेकी आणि बथ्थड असा समाज निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या तमाम थोरांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स आता आपण गल्लोगल्ली लावले पाहिजेत. त्यांचे कार्य आता पूर्णत्वास पोचले आहे!

श्रीमान बिचुकले, पाठक, भाऊ, कुठलीशी गावठी क्विन वगैरे मंडळी आता या महाराष्ट्रात महामहीम झाली आहे. जल्पकांची वानरसेना तर होतीच. ती पूर्वी गल्लीबोळात होती. मोर्चांत, सभांत कधी कधी दिसायची. आता ती थेटच व्यास-पीठावर आलेली आहे. पूर्वीच्या हिंदी चित्रपटांत नायक वेगळा, खलनायक वेगळा आणि विनोदवीर वेगळा असे असायचे. मग अँग्री यंगमॅन आला. आणि मग नंतर हे सारेच एक झाले. नायकच कधी खलनायक, तर कधी विनोदवीर. तद्वत हल्ली नेते हेच जल्पक आणि जल्पक हेच नेते, असे समीकरण जुळून आलेले आहे. आपण फार पूर्वीपासून जे सांस्कृतिक महिको बियाणे पेरत आलो, त्याचाच हा जोमदार टारफुला आता महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक शिवारात फुलून आलेला आहे.

या राज्यात शिवशाही नावाचा एक प्रकार येऊन गेला. ही शिवशाही सतराव्या शतकातील नव्हे. ही आताची. ‘मेड इन यूएसए’ म्हणजे आपल्या त्या उल्हासनगरातल्या यूएसए बनावटीच्या सामानासारखी. हुबेहूब वाटणारी, पण डमीच. तर त्या वेळी मे. पुं. रेगे नावाचे एक गृहस्थ होते महाराष्ट्रात. विचार नावाचा उद्योग करायचे ते. तत्त्वज्ञानबित्त्वज्ञान वगैरे भानगडीत रमलेले असायचे. तर त्यांनी तेव्हाच पेपरात लेख लिहून त्या शिवशाहीतल्या ठाकरी भाषेबद्दल इशारा देऊन ठेवला होता. ही ठाकरी भाषा म्हणजे नेमके होते तरी काय?

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

तर शिवराळपणा हे तिचे व्यवच्छेदक लक्षण. शिव्या, निंदा, कुचाळकी, टवाळी, हे तिचे व्याकरण. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तिला प्रतिष्ठा दिली. तिचे नामकरणही केले. मोठा दरारा होता त्या भाषेचा. त्यावरच रेगे यांनी त्यांची तत्त्वज्ञानात्मक तोफ डागली. पण तेव्हा महाराष्ट्राने व येथील सुजाण मध्यमवर्गाने ते फारसे मनावर घेतले नाही. बुद्धिजीवी म्हणत हेटाळलेच त्या रेगेप्रभृत्तींना. हे बुद्धिजीवी, तर्कनिष्ठ म्हणजे आता ज्यांना आपण सारे हार्डवर्कवाले लोक, हार्वर्डवाले म्हणतो, ते. या हार्वर्डींकडे तसेही कोणी लक्ष द्यायचेच नसते. त्यानुसार आपण तेव्हाही त्यांकडे दुर्लक्षच केले. ते बरेच झाले म्हणायचे. अन्यथा आज आपण जी भाषिक प्रगती केली आहे, ती झालीच नसती. अर्थात या प्रगतीच्या पायाभरणीचे अवघे श्रेय त्या ठाकरी भाषिकांचे नव्हे. त्याआधीपासून तत्सम भाषा या महाराष्ट्रदेशी राजकीय-सामाजिक क्षेत्रात होतीच.

लोकमान्य बा. गं. टिळक आणि सुधारककार गो. ग. आगरकर यांचे मराठी साहित्य, तत्त्वज्ञान, राजकीय-सामाजिक क्षेत्र यांतील योगदान अजोड, अमोल. पण त्यांच्या पत्रकारितेसही शिवराळपणाचा विकार होताच. आगरकरांनी कधी टिळकांस ‘ग्रामसिंह’, ‘अधम’ म्हणावे, तर कधी टिळकांनी आगरकरांना ‘गवताच्या गंजीवरील कुत्र्याची’ उपमा द्यावी. कधी सडक्या मेंदूचे म्हणावे, तर कधी गावाबाहेरचा महारोगी म्हणून हिणवावे. टिळकांनी कधी गो. कृ. गोखल्यांना ‘अधीर तरतरीचे व अविचारी अतएव परप्रत्ययनेय बुद्धीचे तरुण सेक्रेटरी,’ असा टोला हाणावा.

आणि ‘केसरी’, ‘सुधारक’मधील हा शिमगा पाहून ‘अरुणोदय’ने ‘दोघेही विचारशून्य, ज्ञानशून्य व हलकट’ म्हणून शेणगारा फवारावा. तर हे तेव्हाही चाललेले होते. ते चिपळूणकर, टिळक, आगरकरांच्या पत्रकारितेत होते, तसेच बहुजनांच्या पत्रकारितेतही होते. आणि या पत्रकारितेने त्या-त्या वर्गातील मध्यमवर्गास अगदी छान छान वाटत असे. ज्या व्यक्तींच्या सावलीजवळही आपण पोचू शकत नाही, त्या प्रतिष्ठितांना कोणी अशा प्रकारे शब्दचपला मारत असेल, तर त्याने हा मध्यमवर्ग अगदी शिरशिरून जात असे.

टिळक-आगरकरांच्या पत्रकारितेचा हा खरे तर क्षुल्लक आणि टाकाऊ भाग. पण तो त्यांनी केल्याने प्रतिष्ठेस पावला आणि तो म्हणजेच पत्रकारिता, तो म्हणजेच राजकीय टीका, असा एक समज आपण करून घेतला. संपादक बाळासाहेब ठाकरे काय वा संपादक आचार्य अत्रे काय, यांनी ‘आम्ही चालवू पुढे हा वारसा’ म्हणत हीच पत्रकारिता पुढे नेली. आचार्य अत्रे यांच्या झेंडूच्या काही फुलांतील खोबरे अगदीच खवट होते. पण तेही मिटक्या मारत खाल्ले आपल्या महाराष्ट्राने!

आणि एकदा भाषेतील सभ्यता, सुसंस्कृतता, नेमस्तपणा म्हणजे नेभळटपणा आणि शिवराळपणा म्हणजे शौर्य हे नक्की झाल्यानंतर मग असे शूरवीरच आदर्श ठरू लागले. पुढची सारी मराठी पत्रकारिता याच चाकोरीतून फिरताना दिसते. याचा परिणाम समाजावर होणारच. तो झालाही.  

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

याचा अर्थ हा शिवराळपणा केवळ पत्रकारितेतूनच आला असे नव्हे. तो समाजात होताच. येथे ओव्या होत्या, तशा शिव्याही होत्या. भाषिक शस्त्रच ते. शब्दांच्याच शस्त्राने समोरच्याच्या वर्मी घाव घालून त्यास मानसिकदृष्ट्या घायाळ करायचे, हे त्याचे कार्य. तसेच ते राग, संताप, वैफल्य, हतबलता व्यक्त करण्याचे माध्यमही. शिव्यांचे शब्द कधी ग्राम्य असतील, असभ्य असतील, कधी ते नागरी सांस्कृतिक अलवणात लपेटलेले असतील. त्यांस प्रतिष्ठा मात्र कदापि नव्हती. ते सभ्य मानले जात नसत. पत्रकारितेने त्यांस जाहीर मानपत्र दिले.

आता यावर कोणी म्हणेल, की - पण या महाराष्ट्रदेशी शिव्यांची आणखी एक परंपरा आहे. आपल्या संतांनीही शिव्या दिलेल्या आहेत. खरेच आहे ते. आपल्या तुकोबांनी काही अभंगातून थेट शिव्याच घातलेल्या आहेत. पण त्या शिव्या कोणा व्यक्तीस उद्देशून दिलेल्या नाहीत. त्या प्रवृत्तींना दिलेल्या शिव्या आहेत. ‘बुडती हे जन न देखवे डोळा’ या अस्वस्थतेतून आलेला आक्रोश आहे तो. त्यांचा हेतू समाजसुधारणा आहे आणि देणारे तुकोबा आहेत. कोणी छाटीतले गुंड नव्हेत. आईच्या तोंडातील मुलाला उद्देशून गेलेले ‘रे मेल्या’ हे उद्‌गार आणि तुकोबांनी घातलेल्या शिव्या यांची जातकुळी एकच आहे. पाळण्यातल्या बाळाच्या टेरीवर कपाशीच्या हाताने चापटी मारावी तशा त्या शिव्या. तेथे दुखावणे नाही, तेथे हिंसा नाही. स्वार्थ नाही. तेथे चांगुलपणा आहे. त्या शिवी घालणाऱ्या जीभेवर लक्षावधी समयांचे पावित्र्य आहे.

हे झाले तुकोबांसारख्या संतांचे. पण सामान्य जनांचे काय? त्यांच्या तोंडात काय शिव्या नव्हत्या काय? होत्याच. आणि आहेतच. च्यायला, मायला हे तर सर्रासच. आपली मालवणी बोली पाहा. तिच्यात तर शिव्या हे भाषिक सहजोद्गार म्हणून येतात. पण हे असे असले, तरी सामाजिक व्यासपीठावर कधी त्यांचा हारतुरे घालून सत्कार झालेला नव्हता. आज पाहावे तो समग्र शिवराळपणा हा आपल्या सामाजिक-राजकीय जीवनात तोंड वर करून मिरवताना दिसतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

परिणामी ज्यांना सभ्य-सुसंस्कृत म्हणावे, असे नेतेही समोर ध्वनिक्षेपक येताच शिमगा करू लागतात. शाळकरी मुलांनी तोंड लपवून मास्तरच्या खोड्या काढाव्यात, तसा असभ्यपणा आपले प्रतिनिधी अगदी विधिमंडळाच्या आवारातही करताना दिसतात. काही पुढारीच काय, त्यांच्या सुविद्य बायकाही अशोभनीय भाषेत समाजमाध्यमांतून टोमणेबाजी करताना दिसतात. आणि एकदा आपले तरुणतडफदारलाडके वगैरे नेतेच असे करत असतील, तर मग त्यांच्या अनुयायांनी चेकाळून न जावे, तर काय करावे?

धरणाचे पाणी आजुबाजूच्या गावांतील विहिरींत झिरपावे, तसे आज या असभ्य शिवराळपणाचे झाले आहे. तो चमकोगिरीचा, नेतेपणाचा राजमार्ग झालेला आहे. आपल्या देशाचे असंख्य भावी आधारस्तंभ त्याच मार्गावरून ‘कदम कदम बढाये जा’ म्हणत चाललेले आहेत.

आणि आपल्याला एकदम वाटते, की ते भाऊ आणि ती चिमुकली ताई एकदम एवढी फेमस कधी झाली? आमच्या मुलाबाळांचे सांस्कृतिक पुढारपण कशी करू लागली? हा महाराष्ट्र शिवराळांचा कधी झाला?

तर हे होतच होते. नेत्यांच्या भाषणांतून, समाजमाध्यमांतील प्रतिक्रियांतून, कधी आपण स्वतःच करत असलेल्या जल्पनेतून ते दिसतच होते. आज पोरांनी जरा गोंधळ केला, तर आपल्याला देशाच्या या भावी आधारस्तंभांची चिंता वाटू लागली एवढेच.

खरे तर आता आपण आपलीच पाठ थोपटून घेतली पाहिजे, की अविवेकी, बथ्थड आणि शिवराळ समाजाच्या निर्मितीत आपलाही खारीचा वाटा आहे.

.................................................................................................................................................................

लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांचे ‘प्रोपगंडा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

ravi.amale@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......