अजूनकाही
‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र’ ही नोंदणीकृत न्यासाच्या स्वरूपातील कायदेशीर व आर्थिक रचना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सुमारे ३० वर्षांपूर्वी स्थापन केली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रचे कार्य या ट्रस्टमार्फत चालते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हयातीत आणि त्यानंतरदेखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व आर्थिक व्यवहार हे सदर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळामार्फत केले जातात. या ट्रस्टच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत प्रतापराव पवार हे या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ राम ताकवले हेदेखील सदर ट्रस्टचे सुरुवातीपासून ते आजअखेरपर्यंतचे विश्वस्त आहेत. निळू फुले, राजा पाटील, सदाशिव अमरापूरकर, दादासाहेब नाईकनवरे, अनंत लिमये, डॉ. दाभोलकरांचे अगदी सुरुवातीपासूनचे सहकारी सुकुमार मंडपे, तसेच डॉ. दाभोलकर यांच्या निर्घृण खुनानंतर विश्वस्त मंडळाच्या विनंतीवरून, जबाबदारी पार पडण्याच्या भूमिकेतून विश्वस्त झालेल्या शैला दाभोलकर, हे या ट्रस्टचे काही आजी-माजी विश्वस्त आणि पदाधिकारी आहेत. ट्रस्टमधील सर्व निर्णय हे साधकबाधक चर्चेनंतर सहमतीने घेतले जातात.
२०१३ साली सदर ट्रस्टचे ट्रस्टी झालेल्या श्री अविनाश पाटील यांना त्यांची अक्षमता आणि ट्रस्टविरोधी कारवाया, यामुळे या ट्रस्टच्या विश्वस्तपदावरून सर्वानुमताने गेल्या वर्षीच काढून टाकलेले आहे. अविनाश पाटील यांनी ‘विवेक जागर’ नावाचा स्वतंत्र ट्रस्ट स्थापन केल्यानंतर, त्यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र’ हे आमचे अधिकृत नाव वापरू नये, याची त्यांना वेळोवेळी समज दिलेली आहे. तसेच अविनाश पाटील यांचा आमच्याशी कोणताही कायदेशीर अथवा आर्थिक संबंध नाही, हे लोकांनादेखील अवगत करून दिलेले आहे.
या पार्श्वभूमीवर अविनाश पाटील यांनी केवळ वैयक्तिक आकसाच्या पोटी ‘हमीद–मुक्ता दाभोलकर गटाने अंनिस महाराष्ट्र ट्रस्ट ताब्यात घेतला’ अशा स्वरूपाचे जे जाहीर आरोप केले आहेत, ते धादान्त खोटे आहेत, हे या पत्राच्या माध्यमातून आम्ही जाहीर करू इच्छितो. हमीद आणि मुक्ता दाभोलकर हे या ट्रस्टचे ट्रस्टी नाहीत. त्यांनी, तसेच एकाही ट्रस्टीने आजअखेर एकदाही एक नवा पैसादेखील ट्रस्टकडून मानधन किंवा प्रवासखर्च किंवा अन्य कारणाने घेतलेला नाही. उलट ट्रस्टसाठी अनेक वेळा पैसे जमा करून दिले आहेत.
ट्रस्टचे सध्याचे साताऱ्यातील कार्यालयदेखील दाभोलकर कुटुंबीयांनी मोफत वापरण्यास दिलेल्या जागेत चालते. ट्रस्टमार्फत चालवल्या जाणाऱ्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’चे सांगली येथे कार्यालय आहे. येथूनच वार्तापत्र निघते. ही जागा सोडता ट्रस्टची कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. त्यामुळे ट्रस्टच्या मालमत्तेवर कुणी ताबा घेतला, हे अत्यंत खोडसाळ आणि असत्य आरोप आहेत, हे आम्ही नमूद करू इच्छितो.
ट्रस्टकडे असलेले पैसे हे महाराष्ट्रील जनतेने अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करण्यासाठी विश्वासाने या ट्रस्टला दिलेले आहेत. ट्रस्टचे विश्वस्त मंडळ अत्यंत जागरूकपणे, पूर्णपणे स्वयंसेवी पद्धतीने, सदर कामासाठी त्याचा विनिमय करण्याचे काम करते. त्याचे सर्व हिशोब हे वेळच्या वेळी धर्मदाय कार्यालयाला सादर केले जातात. ट्रस्टकडील निधी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करण्यासाठी वापरला जातो. त्याचा कोणालाही वैयक्तिक लाभ घेता येऊ शकत नाही, हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र या ट्रस्टच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या कार्याचे अध्यक्ष हे मानदपद स्थापनेपासून मा. एन. डी. पाटील यांच्याकडे होते. त्यांच्या निधनाने रिक्त झालेले पद हे कार्यकर्त्यांशी संवाद करून, संमतीने संघटनेच्या हितचिंतक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्या सरोज पाटील यांना स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आणि त्यांनीदेखील सर्व पार्श्वभूमी समजून घेऊन ते स्वीकारले आहे. ही पूर्णपणे कायदेशीर बाब आहे. त्याच्याशी ‘विवेक जागर ट्रस्ट’चे अविनाश पाटील यांचा काहीही संबंध नाही.
व्यक्तीकेंद्री नेतृत्वाच्या पलीकडे जाऊन सामूहिक नेतृत्वाचा एक अभिनव प्रयोग गेले, एक वर्ष ट्रस्ट अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या सोबत राबवत आहे. यामध्ये राज्य पातळीवर कार्याध्यक्ष, प्रधान सचिव, राज्य सरचिटणीस ही सर्व पदे रद्द केली आहेत. त्यामुळे आजमितीस आमच्या समितीचा कोणीही कार्याध्यक्ष नाही. राज्यातील सहा विभागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १५ समकक्ष कार्यकर्त्यांची राज्य कार्यकारी समिती, ही यंत्रणा निर्माण करण्यात आलेली आहे.
याला मदत आणि मार्गदर्शन करणारे ३५ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे सल्लागार मंडळदेखील स्थापन करण्यात आले आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाशी संबंधित १२ उपविभागांचे कामदेखील अशाच पद्धतीने सहा लोकांच्या गटाच्या माध्यमातून नियोजन आणि कार्यवाही करून पार पाडले जात आहे. मेंढा (लेखा) गावाप्रमाणे सर्व सहमतीने व विकेंद्रित लोकशाही पद्धतीने सामाजिक काम चालवण्याची ही पद्धत आहे. गेल्या वर्षभरात या विकेंद्रित पद्धतीने सहमती निर्माण करण्याची प्रक्रिया घडवून आणून कार्यकर्ते आणि ट्रस्ट यांच्या सहभागातून महाराष्ट्रात जोमाने काम चालू आहे.
‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या मुखपत्राचे कामदेखील ट्रस्ट आणि कार्यकर्ते यांच्या सहयोगाने चालू असून, त्याचेदेखील प्रत्यक्षात पाच हजार आणि ऑनलाईन पन्नास हजारांपेक्षा अधिक वाचक आहेत, असे निवेदन अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे सचिव या नात्याने अध्यक्ष श्री प्रतापराव पवार आणि सर्व विद्यमान विश्वस्तांच्या मार्फत श्री दीपक गिरमे यांनी दिले आहे.
- दीपक गिरमे
सचिव, अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्ट
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Swapnil Hingmire
Thu , 03 February 2022
पुण्यातून एक प्रचंड खपाचे एक मराठी दैनिक प्रकाशित होते. या दैनिकात आपल्या देशातील दोन उच्चभ्रू अध्यात्मिक गुरूंचे लेख नियमित प्रकाशित होतात. यातील एक गुरु “जगण्याची कला” सांगतो. स्वतः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे या गुरुबद्दल प्रतिकूल मत आहे [1]. दुसऱ्या गुरूंनी आपले “साम्राज्य” कसे उभे केले यावर सध्या विविध माध्यमांमधून बराच खल होतो आहे [2]. याच दैनिकात एक आयुर्वेद तज्ज्ञ नियमित लेख लिहित होते . यांचे गर्भsधारणेबद्दलचे एक पुस्तक प्रसिद्ध असून ते अनेक भाषांमधून अनुवादित केले गेले आहे. आयुर्वेदाबरोबर ते अजून “जीवनावश्यक” मार्गदर्शन करतात जसे की पितृपंधरवड्यात काय करावे [4,5]. अशा गुरूंच्या आणि आयुर्वेदतज्ञाच्या अ-वैज्ञानिक विचारांचा एका मोठ्या खपाच्या दैनिकाच्या माध्यमातून त्यांच्या वाचकांवर काय परिणाम होत असेल असे आपणास वाटते? याहून महत्वाचे म्हणजे हे दैनिक ज्या माध्यम समूहाचे आहे त्याचे अध्यक्ष हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विश्वस्त आहेत [3]. हा एक विरोधाभास नाही का? (मध्यंतरी या विश्वस्तांच्या इंजिनियर चिरंजीवानी श्री श्री रवी शंकर यांची "गाय" या विषयावर मुलाखत घेतली होती ) एका माध्यम समूहाच्या अध्यक्षाची व एका सामाजिक संघटनेच्या विश्वस्ताची त्या त्या संस्थेच्या जडण-घडणी मध्ये नेमकी काय भूमिका असते वा असावी? महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते म्हणून दीपक गिरमे यांचे याबद्दल काय मत आहे? संदर्भ: 1. http://marathi.antisuperstition.org/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%a2%e0%a5%8b%e0%a4%82/ 2. https://www.newslaundry.com/2021/05/18/propped-by-press-and-politicians-how-jaggi-vasudev-became-sadhguru. 3. http://marathi.antisuperstition.org/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5/. 4. https://www.esakal.com/family-doctor/treatment-unknown-article-written-dr-shree-balaji-tambe-218755 5. https://www.esakal.com/family-doctor/paternal-side-treatment-genital-mutilation-216972