उद्या, ३० जानेवारी २०२२. महात्मा गांधींचा ७४वा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने हा विशेष लेख…
.................................................................................................................................................................
नोआखलीमध्ये दंगे उसळल्यानंतर गांधी तेथे चार महिने जाऊन राहिले. जानेवारी १९४७मध्ये नोआखलीतील गावांमध्ये धार्मिक सदभाव निर्माण करण्यासाठी त्यांनी पदयात्रा करण्याचे ठरवले. दररोज सकाळी साडेसहा वाजता पदयात्रेला सुरुवात होत असे. त्या वेळी गांधी आपल्या सहकाऱ्यांना गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे ‘एकला चालो रे’ ही कविता गाण्यास सांगत. असे दररोज होत असे. तेव्हा त्यांच्या पदयात्रेचे वार्तांकन करणाऱ्या सैलेन चॅटर्जी या ‘युनायटेड प्रेस ऑफ इंडिया’च्या पत्रकाराने त्यांना विचारले की, ‘हीच कविता का गायची, दुसरी का नाही?’ तेव्हा गांधी म्हणाले, ‘मला असे वाटते की, ही कविता गुरुदेवांनी माझ्यासाठीच लिहिली आहे.’
बंगाली लेखक प्रमथनाथ बिशी यांनी ‘रवींद्र साहित्यामध्ये गांधीचरित्राचा पूर्वाभास’ नावाचा एक निबंध लिहिला होता. त्यात त्यांनी असे लिहिले आहे की, टागोरांचा गांधींशी परिचयदेखील नव्हता, त्या काळात त्यांनी गांधींसारखी व्यक्तिरेखा आपल्या साहित्यामध्ये निर्माण केली होती. त्यांच्या कविता, कादंबऱ्या आणि नाटकांमध्ये गांधीविचार व्यक्त होत होते. म्हणजे भारत ज्या चक्रव्यूहात फसला होता, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे आणि तो दाखवणारी व्यक्ती कशी असेल, याचे एक काल्पनिक चित्र टागोरांनी आपल्या साहित्यात निर्माण केले होते. त्यानंतर त्याचे मूर्तीमंत रूप होऊन गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले. टागोरांच्या साहित्यात जसे आपल्याला गांधींच्या आगमनाचे संकेत मिळतात, तसेच त्यांच्या एका कवितेत आपल्याला गांधींच्या मृत्यूचेदेखील संकेत मिळतात. टागोरांकडे भविष्यात डोकावण्याची अद्भुत शक्ती होती, असे मला अजिबात म्हणायचे नाही. परंतु हा योगायोग आपले लक्ष त्या कवितेकडे नक्कीच आकर्षून घेतो.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
सर्वप्रथम आपण या कवितेची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. ३१ डिसेंबर १९२९ रोजी काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात ‘पूर्ण स्वराज’चा ठराव मंजूर झाला आणि त्यासाठी सत्याग्रह सुरू करण्याचे सर्व अधिकार गांधींना देण्यात आले. १८ जानेवारी १९३० रोजी टागोर गांधींना साबरमती आश्रमात भेटले. तेव्हा त्यांनी या वेळी सत्याग्रहाचे स्वरूप कशा प्रकारचे असेल, असा प्रश्न गांधींना विचारला. त्यावर गांधींनी उत्तर दिले, “मी दिवस-रात्र विचार करतो आहे. परंतु मला सभोवताली पसरलेल्या अंधारातून कोणताही प्रकाशाचा किरण येताना दिसत नाही. पण जरी आज आपल्याकडे प्रतिकाराचा कार्यक्रम नाही, तरीदेखील आपण स्वातंत्र्याच्या आपल्या उद्दिष्टाचा उद्घोष करणारच.” काही दिवसांनंतर गांधींना तो प्रकाशाचा किरण सापडला. त्यांनी दांडी यात्रा सुरू केली, तेव्हा टागोर युरोप दौऱ्यावर होते. तेथून त्यांचे लक्ष सतत भारतात होणाऱ्या घडामोडींकडे होते. गांधींनी मिठाचा कायदा मोडला, संपूर्ण देशभर आंदोलन पसरले, हजारो स्त्री-पुरुषांना अटक झाली, अखेर गांधींनादेखील अटक झाली. १२ जुलै रोजी टागोर जर्मनीला गेले. तेथे २० जुलै रोजी त्यांनी बव्हेरिअन आल्प्स पर्वत राजीत वसलेल्या ओबेरामेरगौ (Oberammargau) या गावात ‘पॅशन प्ले’ पाहिला.
येसू ख्रिस्ताच्या अखेरच्या दिवसांवर आधारित पारंपरिक नाटकाला ‘पॅशन प्ले’ म्हणतात. तीनशे वर्षांपूर्वी त्या गावात प्लेगची साथ पसरली, तेव्हा गावकरी चर्चमध्ये जमले आणि त्यांनी परमेश्वराला नवस केला की, गावातून प्लेग दूर झाला, तर दर दहा वर्षांनी एकदा ते गावात पॅशन प्ले चे आयोजन करतील. त्यानंतर गावातून प्लेग नाहीसा झाला. गावकऱ्यांनी श्रद्धेने पॅशन प्ले चे आयोजन केले. टागोर तेथे पोहोचले, तेव्हा तीनशे वर्षांपासून ती परंपरा अव्याहतपणे सुरू होती. नाटकाच्या मंचनाशी संबंधित सर्व कामे गावकरी स्वतः करत.
अंधारात चाचपडणाऱ्या गांधींना त्यांच्या श्रद्धेने दाखवलेला मार्ग, गावकऱ्यांनी श्रद्धेने जपलेली पॅशन प्ले ची परंपरा, त्यात मनुष्य जातीला प्रेम आणि करुणेचा संदेश देणाऱ्या येसू ख्रिस्ताला सुळावर चढवून देण्यात आलेल्या वेदनादायी मृत्यूचा प्रसंग, यांचा टागोरांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि त्यांनी संपूर्ण रात्र जागून एक कविता लिहून काढली.
टागोरांनी मूळ इंग्रजीत लिहिलेली ही एकमेव कविता आहे. तिचे मूळ शीर्षक आहे- ‘The Child’. ती १९३१ साली पुस्तकरूपात प्रकाशित झाली. पुढील वर्षी टागोरांनी ‘शिशुतीर्थ’ या शीर्षकाखाली तिचे बंगालीत भाषांतर केले. टागोरांना स्वतःला आवडणाऱ्या कवितांपैकी ही एक. जगातील साहित्य-समीक्षकांच्या मते ही कविता टागोरांच्या सर्वोत्कृष्ट कवितांपैकी एक आहे. परंतु टागोरांच्या इतर प्रसिद्ध कवितांप्रमाणे वाचकांना ती फारशी परिचित नाही.
या कवितेत दहा कडवे आहेत. त्यात सुरुवातीला टागोर मनुष्य जातीच्या आदिम अवस्थेचे चित्रण करतात. तो अंधकारपूर्ण काळ होता आणि मनुष्याला त्याच्या अस्तित्वाचे कारण, जीवनाचे उद्दिष्ट आणि जगण्याचा सम्यक मार्ग माहीत नव्हता. मनुष्य आणि हिंस्त्र प्राण्यांच्या वृत्तीत काही अंतर नव्हते. मनुष्य विकार वासनांनी ग्रस्त होता. उपभोगातच तो सुख शोधण्याचा विफल प्रयत्न करत होता. माणूस दुःखी होता, अस्वस्थ आणि निराश होता. परंतु हा काळ मनुष्याने केवळ आदिम अवस्थेतच अनुभवला आहे, असे आपण म्हणू शकत नाही. मनुष्याच्या इतिहासात या आदिम प्रेरणा वेळोवेळी उचल खाताना आपण पाहतो.
या पार्श्वभूमीवर एका अंधाऱ्या रात्री पर्वताच्या शिखरावर उभा एक श्रद्धाळू माणूस (याला टागोर मूळ कवितेत ‘Man of faith’ म्हणतात.) दुःखाने विव्हळ झालेल्या माणसांना आशेचा किरण दाखवतो. तो म्हणतो, “माणसांनो निराश होऊ नका. या अज्ञानाच्या दलदलीतून एक महान माणूसच आपल्याला बाहेर काढणार आहे.” त्याच्या या भाकिताकडे सर्व जण दुर्लक्ष करतात. कारण परोपकार नावाचे काही या जगात अस्तित्वात आहे, याची त्यांना कल्पनादेखील नसते. आदिम पाशविकता हीच चिरंतन असते, असा त्यांचा विश्वास असतो. तरीही तो श्रद्धाळू माणूस त्यांना आशा दाखवतच राहतो. एक दिवस दुःखाचा कडेलोट झाल्यानंतर ते सर्व जण त्या श्रद्धाळू माणसाला शरण जातात. आकाशातले कृष्णमेघ दूर होतात. पहाट होते आणि त्या श्रद्धाळू माणसाला पूर्वेकडे भविष्याच्या आशावादाचे प्रतीक असलेल्या ताऱ्याचे दर्शन होते. तो सर्वांना सोबत घेऊन त्या ताऱ्याच्या दिशेने एका दीर्घ यात्रेवर निघतो. सोबत येणाऱ्यांमध्ये स्त्री-पुरुष, राजा-रंक, अबाल-वृद्ध, सामर्थ्यवान आणि दुबळे, सुदृढ-अपंग, असे सर्व जण असतात. त्या श्रद्धाळू माणसासाठी ती एक तीर्थयात्रा असते, मुक्तीचा मार्ग असतो. परंतु त्याच्या मागे येणाऱ्यांसाठी तो स्वतःचा स्वार्थ साधण्याचा मार्ग असतो. त्यापैकी कोणाला राजसत्ता हवी असते, तर काहींना संपत्ती, काहींना अद्भुत शक्ती हवी असते, तर काहींना अनंत उपभोग घेण्याचे साधन हवे असते. असे जगातल्या विविध प्रदेशातून आलेले सर्व जण... कोणी चालत, कोणी उंट, घोडे किंवा हत्तीवर बसून त्या श्रद्धाळू माणसाच्या मागे जात राहतात.
दिवसांमागून दिवस, रात्रींमागून रात्री पालटतात. तो श्रद्धाळू माणूस तप्त वाळवंट, अवघड डोंगरदऱ्या, खाचखळग्यांनी युक्त अशा त्या कठीण मार्गावरून चालत राहतो. तेदेखील त्याच्या मागे चालत राहतात. काही जण थकून जातात, त्यांचे पाय हुळहुळे होतात. काही जन संतप्त होतात आणि त्यांच्या मनात शंकाकुशंका निर्माण होतात. यात्रेला सुरुवात केली, तेव्हा हा मार्ग इतका कठीण असेल, याची त्यांना कल्पना नव्हती. जेव्हा त्यांना पावले उचलेनात, तेव्हा फरफटत जाणाऱ्या प्रत्येक पावलागणिक ते त्याला विचारू लागतात, “आणखी किती चालावे लागेल?” त्यावर उत्तर न देता तो श्रद्धाळू काहीतरी गुणगुणत राहतो. ते रागावतात आणि त्यांच्या मुठी आवळू लागतात. परंतु ते त्याला थांबवू शकत नाहीत. क्षितिज दुरावतच जाते आणि त्यांना त्या प्रवासाचा तिटकारा येऊ लागतो. त्यांचे चेहरे कठोर बनतात आणि तोंडातून निघणाऱ्या शिव्या-श्रापाचा ध्वनी कर्कश होऊ लागतो.
पुन्हा रात्र होते. हवेच्या झोताने एकमेव दिवादेखील विझतो. काळोख अधिक गडद होतो. त्या गर्दीतला एक जण उभा राहतो आणि त्या श्रद्धाळू माणसाकडे क्रूरपणे बोट दाखवून म्हणतो, “हा प्रेषित नव्हे, पाखंडी आहे. याने आपल्याला फसवले आहे.” त्या आवाजात अनेक आवाज मिसळतात. एक जण पुढे येऊन श्रद्धाळू माणसावर प्रहार करतो. त्यापाठोपाठ अनेक जण संतापाने त्याच्यावर तुटून पडतात. रात्रीच्या काळोखात आपण काय करत आहोत, याचे भान त्यांना राहत नाही. अखेर तो श्रद्धाळू जमिनीकडे तोंड करून निश्चेष्ट होतो, तेव्हाच ते थांबतात.
तो गतप्राण होतो, तेव्हा आसमंतात मोगऱ्याचा मंद सुगंध दरवळत राहतो. दूरवर कोठेतरी कोसळणाऱ्या जलप्रपाताचा आवाज ऐकू येत असतो. जणू ते क्रौर्य पाहून निसर्ग अश्रू ढाळत असतो. आपल्या हातून काय घडले आहे, याची जाणीव हळूहळू यात्रेकरूंना होते. रात्र अनंत असल्यासारखी भासते. दुःख निराशेने विव्हल झालेले ते एकमेकांना दोष देऊ लागतात. अखेर पहाटेची पहिली किरणे पर्वत शिखरांवर पडतात. मृतप्राय पडलेल्या त्या आकृतीकडे ते रोखून पाहू लागतात. स्त्रिया दुःखाने आकांत करतात आणि पुरुष शरमेने आपल्या हातांनी स्वतःचे चेहरे झाकून घेतात. काही जण गुपचूप तेथून निसटून जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांनी जो गुन्हा केला, त्यामुळे ते त्या मृत माणसाशी एका अदृश्य शृंखलेने कायमचे बांधले जातात. संभ्रमावस्थेत यात्रेकरू एकमेकांना विचारतात, ‘आता आपल्याला मार्ग कोण दाखवेल?’
पूर्वेकडून आलेला एक म्हातारा ते सर्व पाहत असतो. तो पुढे येऊन म्हणतो, ‘‘हा जो बळी पडला आहे, हाच आपल्याला मार्ग दाखवेल. आपण साशंक होऊन त्याचा त्याग केला. आपण संतापून त्याची हत्या केली आणि आता आपण प्रेमाने त्याचा स्वीकार करूया. कारण मरूनदेखील तो आपल्या सर्वांमध्ये जिवंत आहे.”
ते ऐकून एका नव्या प्रेरणेने सर्वजण त्या म्हाताऱ्याच्या मागे जाऊ लागतात. यात्रा पुन्हा सुरू होते. त्यांच्या मनातील स्वार्थभावना संपलेली नसते, परंतु त्या बळी पडलेल्या श्रद्धाळू माणसाच्या चैतन्याने त्यांच्यात प्रवेश केलेला असतो. वाटेत कधी हरित प्रदेश येतात, तर कधी ओसाड माळराने, कधी संपन्न नगरे, तर कधी उजाड नगरांचे भग्न अवशेष लागतात. अनेक दिवस-रात्र प्रवास चालूच राहतो. ते पार थकून जातात, परंतु एकमेकांना प्रोत्साहन देत ते चालतच राहतात. या वेळी ते कोणालाही दोष देत नाहीत.
मग एक दिवस पहाटे आकाशाकडे पाहत तो म्हातारा म्हणतो, “मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत.” सर्व जण आजूबाजूला पाहतात. ते एका गावात पोहोचलेले असतात आणि तेथे रोजचा नियमित दिनक्रम शांतपणे चालू असतो. रस्त्याच्या दुतर्फा शेतांमधील उभ्या पिकांवरील कणसे टपोऱ्या दाण्यांनी भरलेली असतात, बायका डोक्यावरून पाण्याने भरलेल्या घागरी घेऊन येत असतात, गुराखी गुरांना घेऊन रानाकडे निघालेला असतो, लाकूडतोड्या लाकडे तोडत असतो आणि कुंभाराचे चाक कालचक्राप्रमाणे फिरत असते. यात्रेकरूंच्या मनात प्रश्न उभे राहतात, “राजाचा किल्ला कोठे आहे? सोन्याची खाण कोठे आहे? अद्भुत शक्तींचे रहस्य सांगणारा तो ग्रंथ कोठे आहे? तो सर्वज्ञ ऋषी कोठे आहे?" म्हातारा समोर दिसणाऱ्या तलावाच्या दिशेने चालू लागतो. तेदेखील त्याच्या मागे जातात. तलावाच्या काठी ताडाचे वन असते आणि त्या वनात एक गवताने शाकारलेली झोपडी असते. तो म्हातारा झोपडीचे दार ठोठावत म्हणतो, "आई, दार उघड!”
दार उघडते. आत गवताच्या बिछाण्यावर आई आपल्या नवजात बालकाला मांडीवर घेऊन बसलेली असते. सकाळची किरणे त्या बालकाच्या मस्तकावर पडतात. तो म्हातारा एकतारा वाजवत म्हणतो, “या अनादी अनंत बालकाचा जयजयकार असो!” सर्व यात्रेकरू स्त्री-पुरुष, राजे-रंक, अबालवृद्ध गुढगे जमिनीवर टेकवून जयजयकार करतात, “या अनादी अनंत बालकाचा जयजयकार असो!” आणि येथे कविता संपते.
आता या कवितेतील श्रद्धाळू माणसाचे पात्र कोणाची आठवण करून देते, ते सांगा पाहू? याबाबतीत टागोरांचे चरित्रकार कृष्ण कृपलानी आणि समीक्षकांमध्ये एकमत आहे की, त्यांनी हे पात्र निर्माण करण्यामागे गांधीजींचा प्रभाव होता. परंतु ही कविता केवळ एक महापुरुष किंवा एखाद्या प्रसंगापुरती सीमित नसून ती मानवी समाजाच्या मानवतेच्या दिशेने वाटचालीचा एक मोठा पट आपल्या समोर मांडते. मानवाच्या या प्रवासात त्याला मार्ग दाखवणारे महावीर, गौतम बुद्ध, मोझेस, येसू ख्रिस्त, प्रेषित मोहम्मद आणि आधुनिक काळात गांधींसारखे महापुरुष होऊन गेले. या महापुरुषांनी केवळ स्वतःचा परमार्थ साधण्याचा प्रयत्न केला नाही, तर आपल्यासोबत समाजालादेखील परमार्थाच्या मार्गावर मार्गस्थ केले. या प्रवासात लोकांनी विकारग्रस्त होऊन अज्ञानाने येसू ख्रिस्त आणि गांधींची क्रूरपणे हत्यादेखील केली. परंतु मृत्यूनंतरदेखील ते दीपस्तंभाप्रमाणे मानवी समाजाचे पथदर्शन करत आहेत. त्यामुळे मानवाचा प्रवास थांबलेला नाही.
शैलेश पारेख या समीक्षकाच्या मते कवितेच्या शेवटी जी आई आपल्याला भेटते, ती पृथ्वीचे प्रतीक आहे आणि ते नवजात बालक मनुष्याच्या मूळ निर्विकार निर्मळ स्वरूपाचे प्रतीक आहे. प्रत्येक मनुष्य असे निर्मळ मन घेऊन जन्माला येतो. मग या समाजात वाढत असताना विकार-वासना त्याच्या मनाचा ताबा घेतात आणि तो आपले मूळ स्वरूप गमावून बसतो. ही मानवी समाजाची शोकांतिका आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे मनुष्याने आपल्या विकाररहित मूळ स्वरूपाकडे परतणे.
टागोर डिसेंबर १९३०मध्ये अमेरिकेत दिलेल्या एका भाषणात म्हणाले होते की, गांधी आपल्या अंतर्मनात खोलवर पोहोचतात आणि तेथील शत्रूंवर (विकारांवर) आघात करतात. म्हणजे कवितेत वर्णन केलेला खडतर प्रवास हा मानवाचा अज्ञानाकडून आत्मसाक्षात्काराच्या दिशेने होत असलेला प्रवास आहे. विलिअम वर्डस्वर्थच्या ‘The Child is father of the Man’ या एका कवितेतील पंक्तीत हेच भाव व्यक्त करतात. टागोर आणि गांधी या दोघांना असा विश्वास वाटत होता की, मानव सभ्यतेकडे वाटचाल करत आहे. आधुनिकोत्तर विचारवंतांना हा विचार ‘युटोपियन’ वाटू शकतो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आता दुसरा प्रश्न म्हणजे त्या श्रद्धाळू माणसाची हत्या करण्यात सहभागी असलेले, परंतु गुपचूप तेथून निसटून जाण्याचा प्रयत्न करणारे ते लोक कोण? टागोर लिहितात की, त्यांनी जो गुन्हा केला आहे, त्यामुळे ते त्या मृत माणसाशी एका अदृश्य शृंखलेने कायमचे बांधले जातात. गांधींची हत्या एका व्यक्तीने नव्हे, तर विकारग्रस्त अशा एका विचारसरणीने केली. नथुराम गोडसे त्या विकारग्रस्त विचारांनी प्रभावित होऊन बिर्ला हाऊसमध्ये पोहोचला आणि प्रार्थनेसाठी निघालेल्या गांधींवर तीन गोळ्या झाडू शकला, ते समाज म्हणून आपल्या सर्वांचे अपयश होते. ती विचारसरणी द्वेषावर आधारित आहे. परंतु गांधींच्या हत्येशी जोडली गेल्यामुळे नकळत तिच्यावर गांधींच्या प्रेमाच्या संदेशाचा अंकुश कायमचा बसला आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
जेव्हा जेव्हा ती विचारसरणी द्वेषाचा अंधकार पसरवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा गांधींचा संदेश दिव्याप्रमाणे तो अंधार दूर करण्यासाठी नेहमीच अवतीर्ण होतो, कारण कवितेतील श्रद्धाळू माणसाप्रमाणे मरूनदेखील गांधी आपल्या सर्वांमध्ये जिवंत आहेत आणि राहणार आहेत. तसे पाहता गांधीजी आपल्या हयातीतच अखिल मानव समाजाशी मनाने एकरूप झाले होते. त्यामुळे आत्मसाक्षात्काराच्या दिशेने सुरू असलेल्या या यात्रेत त्या विचारसरणीचे लोकदेखील आपले सहप्रवासी आहेत. या कारवाँमध्ये ते आज पिछाडीवर राहिले आहेत, परंतु त्यांना सोबत घेऊनच आपल्याला पुढे जायचे आहे.
संदर्भ -
१) Krishna Kripalani, Rabindranath Tagore A Biography, Visva-Bharati, Calcutta, 1980.
२) Shailesh Parekh, The Child: A Poem in English by Rabindranath Tagore.
३) Ed. Sisir Kumar Das, The English Writings of Rabindranath Tagore, Sahitya Akademi, New Delhi, 1994.
.................................................................................................................................................................
लेखक श्याम पाखरे के. सी. महाविद्यालयामध्ये (चर्चगेट, मुंबई) इतिहास विभागात सहायक प्राध्यापक आहेत.
shyam.pakhare111@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment