अजूनकाही
महाविद्यालयामध्ये असताना माझं वाचन पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, सुहास शिरवळकर, श्रीकांत सिनकर, रणजीत देसाई, ना. सं. इनामदार, द. मा. मिरासदार असं होतं. एकदा ग्रंथालयात ‘माणसं’ नावाचं पुस्तक दिसलं. लेखक अनिल अवचट. सर्वसामान्य माणसांचं वाचन कसं करायचं, हे मला या पुस्तकानं शिकवले. बरं, लिखाणात इतकी सहजता की, हा माणूस आपल्याशी गप्पा मारतो आहे, असंच वाटायचं. त्यानंतर ‘प्रश्न आणि प्रश्न’ वाचलं. आपल्या अवतीभोवती लोक कसे जगतात, त्यांचे प्रश्न काय असतात, हमाल, रोजंदारीवर जगणारा सफाई कामगार यांच्या प्रश्नांकडे आतापर्यंत असं कधी बघितलंच नव्हतं. असे प्रश्न मांडणाऱ्यांचा आविर्भाव ‘हमारी मांगे पुरी करो’ असाच काहीसा असायचा. पण त्यांच्या प्रश्नांचं जग समजावून सांगितलं अवचटांनी.
‘गर्द’ या लेखमालेचं पुस्तकरूप वाचनीय होतं आणि भंडावून सोडणारंही. त्यानंतर अधाशासारखा अवचट वाचत सुटलो. ‘पूर्णिया’, ‘धागे उभे आडवे’ ही पुस्तकं वाचली आणि अवचट म्हणजे एखादी गोष्ट कानात सांगणारा दाढीवालाच वाटू लागला. ‘धार्मिक’ वाचल्यामुळे अनेक ‘संभ्रम’ दूर झाले.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
अवचटांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे की, ‘बघा मी या बुवाबाजीची कशी पोल खोलतो’ असं काही नव्हतं. सहज उत्सुकतेपोटी जसे कामगारांचे प्रश्न समजावून घेतले, तसंच कुठे या आश्रमात जा, कुठे त्या मठात जा, कुठे देवस्थानांचे अर्थकारण बघ, असं करता करता अवचटांनी एका अभ्यासकाच्या नजरेतून ‘आँखो देखा हाल’ तटस्थपणे सांगितल्याचं जाणवलं. कुठेही जडजंबाळ शब्द नाहीत, ‘पोल खोल’ करत असल्याचा आविर्भाव नाही. एखादं पुस्तक वाघ मागे लागल्यासारखं कसं वाचावं, हे अवचटांनी त्यांच्या लेखनामधून शिकवलं.
त्यानंतर हाती आलं ‘स्वतःविषयी’. त्यापूर्वी काही आत्मचरित्रं वाचली होती. त्यामध्ये कुठे आत्मप्रौढी होती, कुठे तक्रारी होत्या, कुठे माझा संघर्ष सांगण्याचा अट्टाहास होता. पण अवचटांनी सांगितलेली स्वतःची गोष्टच वेगळी होती. विशेष आवडीचं प्रकरण म्हणजे ‘संगोपन’. मुक्ता आणि यशो या मुलींना ‘म्युनिसिपाल्टी’च्या शाळेत कसं पाठवलं, बालसुलभ उत्सुकतेनं माती खाणाऱ्या लहान मुलीला माती भाजून कशी खायला दिली, चिखलात खेळता खेळता स्कूटरला माती लावणाऱ्या मुलींना माती आणून देणारा त्यांचा बाबा काय काय प्रयोग करतो, याचं अप्रूप वाटलं.
खरं तर हे पुस्तक अगदी वेळेत हातात पडलं, कारण त्याच दरम्यान माझी कन्या सानियाचा जन्म झाला होता. मी आणि पत्नी निशानं हे प्रकरण नियमितपणे वाचत रहायचं आणि असंच प्रयोगशील पालक व्हायचं हे निश्चित केलं. आनंददायी शिक्षणाच्या प्रा. लीला पाटील यांच्या पुस्तकाला अवचटांची प्रस्तावना आहे, हे बघून प्रयोगशील शिक्षणाविषयी वाचन वाढवण्याचा नाद लागला. सुजाण पालक कसं व्हावं हे अवचटांच्या ‘संगोपन’ या प्रकरणानं शिकवलं.
‘अमेरिका’ हे अवचटांचं पुस्तक वाचायचं इतके दिवस टाळलं होतं, कारण ती ठराविक, चकचकीत वर्णनं वाचण्याचा विलक्षण कंटाळा आला होता. अवचटांची एकेक पुस्तकं वाचून संपवण्याचा घाट घातल्यामुळे ‘अमेरिका’ वाचायला सुरुवात केली आणि लक्षात आलं की, ही अमेरिका वेगळीच आहे. या पुस्तकानं सगळीकडे साचेबद्ध पद्धतीनं न बघता पाटी कोरी करून नव्या दृष्टीकोनातून अमेरिकेकडे बघण्याचा धडा शिकवला.
‘कार्यरत’सारख्या पुस्तकामधून अनोखी कामं करणारी माणसं समजली. ‘मोर’मधलं ते प्रकरण फारच भावलं, ज्यामध्ये अवचटांच्या मुलीला कोंबडी मारून खाणं आवडलं नाही, म्हणून या सद्गृहस्थानं मांसाहार करणं बंद केलं. या प्रकरणाचा शेवट मजेशीर आहे. मुली मोठ्या झाल्या आणि चिकन खाऊ लागल्या, परंतु त्यांच्या लहानपणी बोलल्या गेलेल्या त्या वाक्यानं अवचटांचा मांसाहार सुटला तो सुटलाच. हा शेवट इतक्या निरागसपणे केलाय की, आपण संभ्रमात पडतो आणि पुढचं प्रकरण वाचण्याआधी विचार करायला थोडा विराम घेतो.
यातले असे कबुलीजबाब इतक्या निरागसपणे सांगितले आहेत की, आपल्याला असलं काय जमणार नाही, असंच वाटायला लागतं. ‘मुक्तांगणची गोष्ट’, ‘रिपोर्टिंगचे दिवस’, ‘आणखी काही प्रश्न’सारखी पुस्तकं वाचताना समाजाच्या प्रश्नांकडे बघता बघता आपल्यातही काही बदल घडवतात.
.................................................................................................................................................................
डॉ. अनिल अवचटांच्या पुस्तकांच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
.................................................................................................................................................................
एक दिवस एका शास्त्रीय गायन मैफलीला मित्र अनुज खरे भेटला आणि म्हणाला, ‘चल माझ्याबरोबर.’ तो घेऊन गेला थेट अवचट बसले होते तिथं. अवचटांना म्हणाला, ‘बाबा, हा माझा मित्र, तुझा फारच मोठा फॅन आहे.’ त्यावर अवचट म्हणाले, ‘हो का, वाह, बैस इथंच.’ शेजारी बसलो खरा, पण त्यांच्याशी काय बोलणार? तरीही धीर एकवटून म्हणालो, ‘मी तुमची सगळी पुस्तकं वाचली आहेत. तुम्ही माझ्या घरी आलात तर मला आवडेल’. ‘अरे वा वा, येणार, पण मला अरे बाबा म्हणायचं.’ मी होकार दिला आणि एक दिवस हा सद्गृहस्थ घरी आला.
जितक्या अनौपचारिकपणे लेखन तसंच आणि तितकंच अनौपचारिक वागणं. ‘मला जरा तुझं घर शोधायचा आनंद घेऊ दे’, हे सांगून आणायला-सोडायला जाण्याच्या प्रथेला फाटा देणारं हे वेगळंच प्रकरण आहे, हे समजलं. फोन करताच नाव घेऊन बोलायची सवय मला ‘बाबा’मुळेच लागली. या एका साध्या कृतीमुळे मोबाईलवर पलीकडच्या व्यक्तीला काय वाटतं, याचा अनुभव प्रत्येकानं अनुभवावा असा आहे. रोजच्या जगण्यातला साधेपणा या दाढीवाल्या ‘बाबा’ने आपल्या वागण्यातून शिकवला.
हा माणूस किती गोष्टी शिकला, याला काही मर्यादाच नाही. काष्ठशिल्प, बासरीवादन, पेन्सिल न उचलता झटपट चित्रं काढणं, साधं सोपं वागणं आणि तसंच लेखन, फोटोग्राफी, ओरिगामी, अशा अनेक कला या अवलियाला अवगत होत्या, त्याही एका आयुष्यात!
दिलेल्या वेळेत आपण काय काय करू शकतो, याचा वस्तुपाठ देणारा बाबा होताच, पण जगन्मित्रही होता. त्याच्याबरोबर फिरताना त्याच्या ओळखीची अनेक माणसं भेटत. त्यांना तो सांगे, ‘हा माझा मित्र, सुहास’. ते ऐकल्यापासून अंगावर चढलेलं मूठभर मांस अजूनही उतरायला तयार नाही. शिवाय असा अभिमान बाळगणारे माझ्यासारखे असंख्य.
एकदा फोन करून अचानक विचारलं, ‘आहेस का रे घरी?’. आल्यावर पहिला प्रश्न- ‘तुझं आवडतं गाणं सांग’. मी किशोर-आशाची गाणी सांगितल्यावर ती त्याने उत्स्फूर्तपणे गायला सुरुवात केली, नंतर मलाही दोन गाणी गायला सांगितली. तासभर गाणी गायल्यावर अचानक म्हणाला, ‘चला आता, निघतो’.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
अशा अनेक घटना बाबाच्या संपर्कात असलेल्या अनेकांच्या आयुष्यात घडल्या असतील. कसलाही औपचारिकपणा न ठेवता माणसं जोडून त्यांच्या कला आत्मसात करणं, तू काय काम करतोस, खिचडी कशी करतोस, कोणता सिनेमा बघितलास, असं प्रश्न विचारून नवीन काही समजतं का, हे जाणण्याची मधुकर वृत्ती त्यानेच शिकवली.
‘सोपं करून कसं लिहावं, याची शिकवण मला तुझ्याकडूनच मिळाली’ असं मी प्रांजळपणे त्याला सांगितलं, तर म्हणाला, ‘अरे, मला ते तसलं गुरुबिरू काही करू नकोस. तू तुझ्या पद्धतीनं लिहितोयस तेच बरं आहे.’
माणसं कशी जोडावी, ‘कुतूहलापोटी’ प्रत्येक क्षेत्रामध्ये रस कसा घ्यावा, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मधुकर वृत्तीनं मुशाफिरी कशी करावी, असं बरंच काही अवलिया ‘बाबा’नं शिकवलं, त्याला सलाम, तितक्याच अनौपचारिकपणे…
.................................................................................................................................................................
हेही पाहा\वाचा
अनिल अवचट : उपेक्षित विषयांना समाजमनाच्या पृष्ठस्तरावर आणणारा लेखक
अनिल अवचट खरंच आपले कोण लागतात? त्यांचं आणि आपलं नातं नेमकं काय आहे?
डॉ. अनिल अवचट - बहुतेकांचा ‘बाबा’!
बाबा ‘अनप्रेडिक्टेबल’ आहे, पण तो फटकून राहणारा नाही, तर बरोबर घेऊन जाणारा आहे!
तुम्ही काही म्हणा, जोपर्यंत लिहावंसं वाटतंय, तोपर्यंत सुचेल तसं, सुचेल ते मी लिहीत राहणार आहे!
.................................................................................................................................................................
लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.
suhass.kirloskar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment