प्रसिद्ध लेखक डॉ. अनिल अवचट यांचं काल पुण्यात वयाच्या ७७व्या वर्षी निधन झालं. २०१९ साली त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्तानं त्यांचे मित्र आणि ‘साप्ताहिक सकाळ’चे माजी संपादक सदा डुम्बरे यांनी ‘वेध अवलियाचा’ हे पुस्तक संपादित केलं आहे. यात श्रीपाद ब्रह्मे, यशोदा वाकणकर, सुश्रुत कुलकर्णी, सानिया भालेराव, आभा भागवत, आश्लेषा महाजन आणि अन्वर हुसेन यांनी अवचटांच्या विविध पुस्तकांविषयी लिहिलेल्या ३७ लेखांचा समावेश आहे. अवचटांच्या साहित्याचा साकल्यानं आढावा घेणारं हे पहिलंच पुस्तक आहे. त्याला डुम्बरे यांनी लिहिलेली ही विवेचक प्रस्तावना...
..................................................................................................................................................................
अनिल अवचट लिहिते लेखक आहेत. गेले अर्धशतक त्यांची लेखणी अखंड स्रवते आहे. आजमितीला त्यांची चाळीसएक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आगामी काळात आणखी काही होतील. असे असूनही ‘साहित्यिक’ म्हणून त्यांची गणना होत नाही. बालवाङ्मयासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला असला तरी ‘बालसाहित्यकार’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली नाही. अधूनमधून ते कविता करत असले तरी कवींनी त्यांना आपल्यात घेतलेले नाही. कथा-कादंबऱ्यात असते, त्या जातकुळीचे मूलद्रव्य अवचटांच्या लेखनात असले तरी ते ‘वाङ्मयकार’ नव्हेत. प्रचलित व्याख्येत बसवता येईल असे त्यांचे लेखन नाही. या सर्व साहित्यप्रकारांतील आशय आणि शैलीचा एकात्मिक आविष्कार त्यांच्या लेखनात दृग्गोचर होत असला, त्याच गुणवत्तेचे व्यक्तिचित्रण आणि समाजदर्शन तिथे आढळत असले, मानवी भावभावनांचा पट उलगडत असला, जग बदलण्याची ऊर्मी आणि स्वप्नभंगाचे दु:ख एकत्र वास करत असले तरी समीक्षकांना ‘सर्जनशील लेखक’ या वर्गवारीत, कोटीक्रमात त्यांना बसवता येत नाही.
असे असूनही मग अवचट एवढे लोकप्रिय लेखक का आहेत? त्याचे कारण लेखकाला ललामभूत नसलेले अनेक अवगुण अवचटांमध्ये आहेत. उदाहरणार्थ, वाङ्मयातील ‘कल्पित’ वास्तवापेक्षा त्यांना समाजातील प्रखर वास्तवाशीच भांडणतंटा करायचा असतो. लेखकराव अनेकदा समाजापासून फटकून असतो, त्याशिवाय आपले लेखन सार्वत्रिक आणि सार्वकालिक होणार नाही, अशी धास्ती त्याला वाटत असते. अवचटांचे तसे नसते. ते अखंड सामाजिक असतात. हा समाज त्यांना बदलायचा असतो. त्यातील अन्याय, अत्याचार त्यांना वेशीवर टांगायचे असतात. विशिष्ट व्यक्ती वा समाजघटकांना न्याय मिळवून द्यायचा असतो. ते अन्यायग्रस्तांच्या बाजूने प्रस्थापित व्यवस्थेला अवघड प्रश्न विचारतात. दंभस्फोट करतात. त्यांच्यातला परिवर्तनवादी कार्यकर्ता, संवेदनशील माणूस, शोधपत्रकार त्यांच्या लेखकपणावर मात करतो.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
वास्तवावर कलात्मक लेप चढवून ते मढवण्याऐवजी वास्तव ते शब्दांनी टिपून घेतात आणि लेखनाची संरचना, त्याचा आकृतीबंध, त्यातील रसनिष्पत्ती यांची फिकीर न करता रोखठोकपणे तुमच्यापुढे सादर करतात. वाचकाला आनंद मिळवून देणे हे काही त्यांचे लेखन उद्दिष्ट नसते. वाचक रागावला, संतापला, अस्वस्थ झाला की, दुःखी झाला, याचे सोयरसूतक त्यांना नसते. इंग्रजी शब्द वापरायचा तर त्यांचे लेखन ‘रॉ’ असते. संस्कारीत नसते. अवचट लोकप्रिय आहेत, ते या त्यांच्या ‘रॉ’ लेखनासाठी.
आशय आणि शैलीची एकात्मता साधणारे लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. जखमेवर मलमपट्टी न करता ती उघडी करून वाचकाला दाखवण्याचे त्यांचे (अ)वैद्यकीय कौशल्य व्यावसायिक नाही. वेदनेतील सुखमयता आणि त्यातील अंतविर्रोध प्रकट करणारी त्यांची शैली ‘अवचट शैली’ म्हणून आता ख्यातकीर्त झाली आहे. मराठीतील ललितेतर गद्य लेखनात मन्वंतर घडवून आणण्याचे श्रेय त्यांना द्यायला प्रत्यवाय नसावा. वाचकांनी आपल्या लेखनापाशी थांबू नये, त्यातून कृतिशील व्हावे, विचार करावा, चिंतनशील व्हावे, संवेदनशील व्हावे असे त्यांना वाटत असावे का? वाचकाला असा कोणताही छुपा किंवा उघड संदेश ते देत नाहीत. निदान लेखनात ते समाजसुधारक नसतात. त्यांची दृष्टी सत्यशोधनाची असली तरी ते अग्रलेख लिहीत नाहीत. कशाचा तरी जोरदार पुरस्कार किंवा निषेध करण्याच्या फंदात पडत नाहीत. ते उत्तम प्रकाशचित्र काढतात, आणि चांगले चित्रकारही आहेत. त्याच गुणांचा आविष्कार त्यांच्या लेखनातून होतो. शब्द, वाक्य आणि शैली ते कॅमेरासारखी आणि विसंगती, उपरोध, उपहास, व्यंग शस्त्रासारखे वापरतात. त्यातून निर्माण झालेले चित्र वाचकाला दाखवतात. आणि तिथेच थांबतात.
‘मिडियम इज द मेसेज’ या मार्शल मॅकलुहान यांच्या प्रसिद्ध उक्तीसारखे. अवचट आपली भूमिका वाचकांवर थोपवत नाहीत. त्यांच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करत नाहीत. त्यांच्या प्रतिपादनात आवेश नसतो. अहमहमिका नसते. वाचकाला ते गुदमरून टाकत नाहीत. भाषेच्या प्रपातात विस्मयचकित करत नाहीत. उत्तेजित करत नाहीत की, गोठवून टाकत नाहीत. वाचकांशी त्यांचा संवाद असतो, पण त्यातून ते प्रेमाचे पाश निर्माण करत नाहीत. अंतर ठेवून असतात. त्या अंतराला ‘इस्थेस्टिक डिस्टन्स’ म्हणा हवे तर. वाचकाला आपल्या स्वायत्ततेची हमी मिळाल्यामुळे, मूल्यात्मक निर्णय घेण्याचे त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहिल्याने अवचटांचे लेखन त्यांना आवडत राहते. म्हणून अवचट लोकप्रिय होतात. कथाकार आणि कादंबरीकारांना हेवा वाटावा एवढी लोकप्रियता त्यांच्या वाट्याला येते. लोकप्रिय होण्याच्या कोणत्याही युक्त्या, प्रयुक्त्या आणि क्लृप्त्या ते जाणीवपूर्वक टाळतात, कारागिरी आणि सजावटीच्या वाटेला जात नाहीत, हेच त्यांच्या लोकप्रियतेचे आद्य कारण आहे.
अवचट लोकप्रिय व्हायचे, शैलीखेरीज तेवढेच महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी लेखनासाठी निवडलेले विषय. त्यांचे बहुतेक विषय दुसऱ्या किंवा तिसऱ्या जगाशी संबंधित आहेत. मराठी मध्यमवर्गाशी फटकून असलेले हे जग आहे. या जगातले प्रश्न, ती समाजरचना, त्या माणसांचे जगणे, त्यातले शोषण, अन्याय, अत्याचार, त्याला जबाबदार असलेली प्रस्थापित व्यवस्था, या व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणणारे कार्यकर्ते, त्यांच्या संघटना, असा फार व्यापक पट त्यांच्या लेखनात असतो. हे विषय त्यांना नैसर्गिकपणेच भावतात, त्याचा शोध घ्यायला ते प्रवृत्त होतात कारण त्यांच्या मूळ प्रेरणा परिवर्तनवादी कार्यकर्त्याच्या आहेत.
अवचटांची जडणघडण ज्या काळात झाली, तो हा सामाजिक, राजकीय बदलांसाठी संघर्ष करणाऱ्या प्रागतिक, समतावादी, विवेकवादी, विज्ञानवादी चळवळींचा कालखंड आहे. मंतरलेला कालखंड आहे. प्रस्थापितांच्या विरोधातील विद्रोहाला समाजमान्यता, किमान सहानुभूती असण्याचा काळ आहे. तोच मुख्य विचारप्रवाह आहे. अवचटांची लेखन कारकीर्द याच कालखंडात विकास पावली. त्यांचे नाव झाले. दबदबा निर्माण झाला. अवचट वाचणे हे क्रमप्राप्तच झाले. ललित लेखनाच्या सामाजिक इतिहासातील हा कालखंड अवचटांना अनुकूल होता. त्यांच्या लेखनाला प्रेरणा देणारा, वाचकांचा उत्साही प्रतिसाद मिळणारा. साठोत्तरी महाराष्ट्राचेच ते लेखक आहेत. हा महाराष्ट्र वेगळा आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
बिहारच्या भीषण दुष्काळात जयप्रकाश नारायण आणि एस.एम.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेने पुण्यातील वैद्यकीय पथक मदतीसाठी तिथे गेले. अवचट त्याचा भाग होते. तेथील पूर्णिया जिल्ह्यातील परिस्थितीचे मर्मभेदी चित्रण करणारे ‘पूर्णिया’ हे त्यांचे पहिले पुस्तक. १९६९मधील. सामाजिक शोधासाठी बाहेर पडलेल्या अवचटांना स्वत:तील लेखकाचाही शोध इथे लागला. लेखनाचा एक नवा ‘फॉर्मही’ त्यांना गवसला. ‘रिपोर्ताज’ या नावाने तो नंतर लोकप्रिय झाला. अनेकांनी त्या शैलीचे पुढे अनुकरणही केले.
‘वेध’, ‘छेद’, ‘माणसं’, ‘संभ्रम’, ‘वाघ्या मुरळी’, ‘कोंडमारा’, ‘गर्द’, ‘धागे आडवे उभे’, ‘धार्मिक’, ‘कार्यरत’ ही त्यांची नंतरची सगळी पुस्तके अशी बुरखा फाडणारी, दंभस्फोट करणारी, वस्त्रहरण करणारी आहेत. वास्तविक हे सगळे लेखसंग्रह आहेत. त्यातील लेख त्या काळातील अनेक प्रतिष्ठित, लोकप्रिय मासिके, साप्ताहिकात प्रकाशित झालेले आणि त्यामुळे बहुचर्चित होते. लेखांना उदंड प्रतिसाद मिळाला, चर्चांना ऊत आला, आणि त्यातील ऊर्जाबळावर पुस्तकांच्या आवृत्त्या संपत राहिल्या. ‘माणसं’ या पुस्तकाच्या तर तेरा-चौदा आवृत्त्या निघाल्या. मौजेचे प्रकाशन असूनही! अवचटांचे अंतर्भेदी लेखन, सुभाष अवचटांची आक्रमक आणि ठसठशीत रेखाटने आणि मुखपृष्ठ, ज्येष्ठ समाजवादी नेते आणि चिंतक नानासाहेब गोरे यांची विचारपरिप्लुत प्रस्तावना, आणि स्वागतशील मराठी वाचक. सगळेच गणित जुळून आलेले.
अवचटांच्या या लेखनामुळे मराठी माणसांपुढे एक नवे जगच अवतीर्ण होत होते. अंधारातले जग. फडके-खांडेकर आणि तत्सम लेखकांनी निर्माण केलेल्या एका आभासी जगाकडे आशाळभूतपणे पाहणाऱ्या मराठी वाचकांना हे वास्तविक जग तीव्र मानसिक धक्का देणारे होते. त्यांना दु:ख माहीत झाले होते, ते जास्तीत जास्त बाबा आमटे यांच्या आनंदवनातील कुष्ठरोग्यांचे. तिथे देणगीची मनीऑर्डर करून समाजसेवेचा सोपा मार्ग उपलब्ध होता. उन्हाळी शिबिरात श्रमदान करून भावनिक विरेचन करता येत होते. अवचटांनी दाखवलेल्या या जगाच्या दर्शनासाठी पर्यटनाची सोयच उपलब्ध नव्हती. सोसवतही नाही आणि सांगताही येत नाही, अशा दु:खाच्या नव्या जातकुळीला सामोरे जाण्याची अनवट वाट अवचटांनी मराठी वाचकांना उपलब्ध करून दिली. त्यांचे आकाश विस्तारून दिले. अनुभव विश्वाचा परीघ वाढवला. साहित्यिक आणि समीक्षक नसूनही मराठी साहित्यातील समाजदर्शनाकडे पाहण्याची एक प्रगल्भ जाणीव निर्माण केली. त्याचे नवे मानदंड निर्माण केले. किमान नव्या शतकाच्या उदयापर्यंतचा कालखंड त्यांच्या या समाजसाक्षेपी लेखनाने अर्थपूर्ण झाला होता.
अवचटांचे लेखन जरी गरीब, दलित, वंचित, परिघावरील माणसांसंबंधी होते, तरी त्यांचा वाचक मुख्यत्वे मध्यमवर्गीयच होता. ‘पुलं’चाच वाचक. पण तोपर्यंत तरी, म्हणजे ९०चे जागतिकीकरण सुरू होईपर्यंत, परिवर्तनवादी चळवळींचा तोच मुखंड होता. या वर्गाची सामाजिक जाणीव जागी होती. अवचटांच्या लेखनविषयांसंबंधी त्यांना कणव होती. प्रबोधनाच्या चळवळीतून विकसित झालेला उदारमतवादी, समावेशक विचारव्यूह त्यांनी आपला मानला होता. आपण त्याचे पाईक आहोत असे त्यांना वाटत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून हा वारसा अधिक भक्कम झाला होता. आणीबाणीच्या काळातही त्याचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा मानणारा किंवा एकूणच संवेदनशील, समाजमनस्क असा हा मध्यमवर्ग जागतिकीकरणानंतर मिळालेल्या संधीमुळे नवश्रीमंत झाला, व्यक्तीवादी झाला आणि चंगळवादीही झाला. समाजाचे वैचारिक नेतृत्व करण्याची आकांक्षा हरवून बसला. अवचटांच्या लेखनविषयांशी संवादी राहिला नाही.
आर्थिक भरभराटीमुळे त्याची परिभाषा बदलली. ‘त्यागाकडून स्वार्थाकडे’ असा जीवनशैलीतील बदल त्याने आत्मसात केला. अवचटांचे लेखन छापणारी माध्यमेही काळानुसार बदलली आणि अवचटांच्या लेखनानेही कूस बदलली. मूल्यभान तेच, पण समाजचित्रण आणि व्यक्तिचित्रणातून ते अधिकतर आत्मचित्रणाकडे वळले. बाहेर बघायच्याऐवजी आत बघू लागले. सामाजिक चित्रणाकडून आत्मचिंतनाकडे वळले. अंतर्मुख झाले.
अवचटांचा मूळ पिंड कलाकाराचा. चित्र, शिल्प, रेखाटने, संगीत, वाचन, ओरिगामी आणि असे कितीतरी छंद त्यांचे. तसे छांदिष्टच म्हणायचे. किती नाद केले. त्यातून लेखनाचे नवे विषय त्यांना खुणावू लागले. ‘स्वत:विषयी’, ‘आप्त’, ‘छंदांविषयी’, ‘जगण्यातील काही’, ‘दिसले ते’, ‘माझी चित्तरकथा’ ही पुस्तकांची शीर्षके अवचटांचे रूपांतर, अवस्थांतर सूचित करतात. नव्या बाजारकेंद्री जगाला प्रतिक्रिया देत बसण्याऐवजी प्रतिसादाची वैयक्तिक परंतु सर्जनशील वाट धरणे अवचटांना अधिक सुखदायी वाटले असणार. कथा-कादंबऱ्यांपेक्षा आत्मकथनात्मक लेखन वाचण्याकडे वाचकांचाही कल वाढत होता. त्यामुळे अवचटांची ही पुस्तकेही वाचकप्रिय झाली. ती अर्थात आत्मपर असली तरी खाजगी नव्हती, वैयक्तिक होती. या दोन्हीतील सीमारेषा फार धुसर असतात आणि त्या सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरतच असते. माझे आयुष्य वाचून वाचकाला काहीतरी मिळाले पाहिजे, या हेतूने त्यांनी हे लेखन केलेले नाही. त्यांच्या अभिव्यक्तीच्या प्रेरणा स्वान्तसुखाय असल्या तरी त्यांचे व्यक्तिगत जीवन तसे कलात्मकच असल्याने त्यांचे खाजगीपण सार्वजनिक होणे, हेही सौंदर्यभान जागवणारेच होते.
बाहेरच्या बाजारकेंद्री जगाचा मूल्यव्यूह बदलल्यामुळे निर्माण झालेल्या परात्मभावाने संवेदनशील माणसांचा कल अधिक मूलगामी व चिरंतन गोष्टींचा ध्यास घेत असणार. अशा वेळी निसर्गाचा त्याला मोठा आधार वाटतो. अवचटांना तर मुळात सगळ्याच गोष्टींचे कुतूहल. मुंग्यांपासून हत्तीपर्यंत. नवनव्या गोष्टी जाणून घेण्याची त्यांची जिज्ञासा अफाट आहे. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की, ते शेवटपर्यंत तिचा पाठलाग करतात.
डॉ. अनिल अवचटांच्या पुस्तकांच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
अवचटांच्या आयुष्यातील एकविसावे शतक हे निसर्गशोधाचे आहे, असे म्हटले तर फारशी अतिशयोक्ती होणार नाही. झाडे, प्राणी, पक्षी व कीटकांपासून ते सूक्ष्मजीवांपर्यंत कशाचाच अपवाद त्यांनी केला नाही. निसर्गातील गुंतागुंतीची प्रमेये फार सोप्या भाषेत त्यांनी उलगडून दाखवली. त्यासाठी त्या त्या क्षेत्रातील दिग्गज अभ्यासकांना शरण जाण्यात त्यांनी कमीपणा मानला नाही. विद्यार्थ्याची भूमिका या वयात निभावणे जरा कठीणच. अवचटांनी ते साध्य केले. त्यांनी मोठ्यांसाठी लिहिले, तसे लहानांसाठीही. ‘सृष्टीत-गोष्टीत’ या पुस्तकासाठी तर बालवाङ्मयाच्या क्षेत्रातील साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला आणि ‘कुतूहलापोटी’ हे पुस्तक गुलबकावलीतील गोष्टींसारखे वाचकप्रिय झाले. अर्थात निसर्गाविषयी लिहितानाही त्यांच्यातील सामाजिक प्राणी सचेतन होताच. त्यांची परिसर स्नेही-इकोफ्रेंडली- भूमिका इथेही अधोरेखित झाली. माणसांपासून निसर्गापर्यंत, अवचट कायम कमकुवतांच्या बाजूने, न्यायाच्या बाजूने उभे दिसतात. त्यांचे लेखन आणि त्याचा रूपबंध यात कालौघात बदल झाला असला तरी मूळ वैचारिक बैठक तीच आहे. स्वत:च्या आतल्या आवाजाला साक्षी ठेवून त्यांनी आपल्या निष्ठा जपल्या आहेत. त्यात तडजोड केलेली नाही.
अवचटांच्या लोकप्रियतेची कारणे शोधताना त्यांच्या लेखनवैशिष्ट्याचा एक पैलू वारंवार आणि ठळकपणे सामोरा येतो. तो म्हणजे अवचट प्रामुख्याने कथनकार आहेत. स्टोरी टेलर. त्यांच्या लेखनात कथेच्या सर्व घटकांचा आढळ असतो. घटना, प्रसंग, पात्रे, परिस्थिती, परिसर, स्वभावदर्शन, संघर्ष वगैरे वगैरे. लेखक सूत्रधार असला तरी अवचटांच्या लेखनात पात्रांना खूपच स्वातंत्र्य असते. लगाम लावून, वेसण घालून पात्रांना ते करकचून बांधून ठेवत नाहीत. त्यामुळे रूपबंध तोच असला तरी प्रत्येक लेख वेगळा असतो. आता कथा किंवा गोष्ट हा आदिम वाङ्मयप्रकार आहे. काळाच्या ओघात तावून सुलाखून निघाला आहे. अनेक अंगांनी विकसित झाला आहे. सगळ्यांनाच तो भावतो. कथा आवडत नाही असा माणूस सापडणार नाही. अवचटांना हा फॉर्म फार लवकर गवसला, आणि त्याच्यावर त्यांनी प्रभुत्वही मिळवले.
अवचटांना हा रूपबंध कुठे सापडला असावा? त्यांच्या आत्मकथनात्मक लेखनात त्याचे उल्लेख सापडतील. त्यांचे सगळे बालपण आणि शालेय जीवन जिथे व्यतीत झाले त्या ओतूरचा हा प्रभाव. कथा, कीर्तन, प्रवचन, निरूपण, व्रतवैकल्ये ही अवचटांच्या मूलत: धामिर्क-सांस्कृतिक कुटुंबाची देणगी आहे. ही सगळी कथेकरी मंडळी त्यांच्या घरचे आदरातिथ्य स्वीकारीत, तिथेच मुक्काम करत आणि आपली सेवा रुजू करत. रामदासबुवा मनसुखांपासून मामासाहेब दांडेकरांपर्यंत अनेकांचा उल्लेख त्यांनी केला आहे. या सर्वांचा सहवास अवचटांना लाभला. त्या वातावरणाने झालेल्या संस्कारांचा ठसा त्यांच्या लेखनात सहजच उमटला असेल. ‘माझी चित्तरकथा’ या चित्रकलेवरील त्यांच्याच एका पुस्तकाच्या शीर्षकाची उसनवारी करून म्हणता येईल की, होय, त्यांच्या लेखनात कथा आहे आणि ती चित्तवेधक आहे.
या कथानकाला अर्थगांभीर्य देणारी अनेक विचारसुक्ते त्यांच्या लेखनात आढळतात, ही वाचकाला मिळालेली बक्षिसी असते. अवचटांच्या आत एक तत्त्ववेत्ता लपलाय. व्यक्ती, प्रसंग, घटना... त्यांच्या चिंतनाला कोणतेही निमित्त पुरते. त्यातून निष्पन्न होणारी सुक्ते त्यांच्या लिखाणात इतस्तत: विखुरलेली असतात. उदा. ‘ज्याला भोवतीचा प्रदेश पाहायचाय त्यानं भरधाव वाहनात बसायचं कशाला?’ प्रत्येक वाचक आपापल्या संदर्भात त्याचा अर्थ लावत बसेल. शहाणीव व्यक्त करणाऱ्या या अर्थगर्भ कुप्या मजकुरात मिरवत मात्र नाहीत, अंग चोरून कोपऱ्यात उभ्या असतात. अवचट आपल्या वाचकांवर आक्रमण करत नाहीत, त्यांना कह्यात घेत नाहीत, वाचकांशी त्यांचे नाते सौजन्याचे, व सभ्यतेचे आहे, असे मी म्हणतो ते प्रत्येकाने स्वत: अनुभवायचे आहे.
अवचटांच्या आत जसा एक तत्त्वचिंतक दडला आहे, तसे एक लहान मूलही. मुलांना जशी प्रत्येक गोष्टीची उत्सुकता असते, कुतूहल असते तसेच अवचटांचे. त्याचे पर्यवसान मग लेखापासून कलाकृतीच्या निमिर्तीपर्यंत कशातही होते. विद्यमान काळात पंचाहत्तर म्हणजे काही फार वय नव्हे. पण या वयातही ही उत्सुकता, नाविन्याचा शोध घेण्याची वृत्ती जरा दुर्मीळच म्हटली पाहिजे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
अवचट माझे फार जवळचे स्नेही आहेत. गेली चाळीस वर्षे पुण्यात आम्ही एकाच कॉलनीत राहतो. शिवाय आम्ही गाववाले. ओतूरचे. त्यांच्याविषयी व्यक्ती म्हणून मी भरभरून लिहू शकतो. पण तो मोह मी इथे निग्रहाने टाळला आहे. या पुस्तकाचे ते प्रयोजन नाही म्हणून. हे पुस्तक केवळ त्यांच्या लेखनासंबंधी आहे. त्यांची लेखन कारकीर्द पन्नास वर्षांची म्हणजे प्रदीर्घच म्हणायची. आजही ते लिहिते लेखक आहेत. नेहमीप्रमाणे यंदाही पाच-सात दिवाळी अंकांत त्यांची उपस्थिती असणारच आहे. मित्राखेरीज आमचे लेखक-संपादक असेही नाते आहे. ते पूर्णपणे व्यावसायिक आहे. त्यात मैत्रीचा घोळ नाही. मी ‘साप्ताहिक सकाळ’चा संपादक असताना दिवाळी अंकासाठी लागोपाठ पंधरा-वीस वर्षे मला त्यांचे सर्वोत्तम, परंतु अंकाच्या प्रकृतीला साजेसे लेखन मिळत राहिले. दिवाळी अंकांच्या लेखकांच्या नामावलीत अवचट असणे, हे त्या काळी तरी फार प्रतिष्ठेचे मानले जात असे. त्यामुळे या माझ्या प्रस्तावना लेखात पुस्तकांच्या पलीकडच्या अवचटांचे दर्शन कटाक्षाने टाळले आहे.
अवचटांचा अमृतमहोत्सव हे या पुस्तकाचे निमित्त आहे. वाढदिवसानिमित्त ‘बाबाला’ काय भेट द्यावी, याविषयी झालेल्या कौटुंबिक चर्चेतून अवचटांची मुलगी यशोदा वाकणकरला ही पुस्तकाची कल्पना सुचली. तरुण पिढीला अवचटांच्या पुस्तकांविषयी, लेखनाविषयी काय वाटते, ते लेखन आज किती प्रस्तुत आहे, याचा शोध घेण्याकरता हा लेखन प्रपंच. एकाच लेखकाच्या सर्व पुस्तकांचा आस्वादक पद्धतीने पुनर्शोध घेण्याचा असा प्रयत्न कदाचित मराठीतील पहिलाच लेखन प्रकल्प असावा. प्रस्तुत पुस्तकातील सर्व लेखक मंडळी ‘यशो’चे आणि परस्परांचेही मित्र आहेत. त्यांनी मुक्तपणे लिहिले आहे. ‘अवचट’ या लेखकाच्या मोठेपणाच्या दडपणाखाली नाही. त्यांच्या उत्साहाला आणि ऊर्मीला ‘संपादकीय’ वळण देण्याचे मी जाणीवपूर्वक टाळले आहे. या पुस्तकाचे नवेपण, ताजेपण सुकणार नाही, एवढीच मी काळजी घेतली. प्रकाशनानंतरच हे पुस्तक अवचटांच्या हाती जाणार आहे. ७५व्या वाढदिवशी ही अनोखी भेट स्वीकारायला त्यांना नक्कीच आवडेल!
‘वेध अवलियाचा’ - संपादक सदा डुम्बरे
अमलताश बुक्स, पुणे | पाने : २९४, मूल्य - ३०० रुपये
.................................................................................................................................................................
हेही पाहा\वाचा
अनिल अवचट : उपेक्षित विषयांना समाजमनाच्या पृष्ठस्तरावर आणणारा लेखक
अनिल अवचट खरंच आपले कोण लागतात? त्यांचं आणि आपलं नातं नेमकं काय आहे?
डॉ. अनिल अवचट - बहुतेकांचा ‘बाबा’!
बाबा ‘अनप्रेडिक्टेबल’ आहे, पण तो फटकून राहणारा नाही, तर बरोबर घेऊन जाणारा आहे!
तुम्ही काही म्हणा, जोपर्यंत लिहावंसं वाटतंय, तोपर्यंत सुचेल तसं, सुचेल ते मी लिहीत राहणार आहे!
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment