अनिल अवचट : उपेक्षित विषयांना समाजमनाच्या पृष्ठस्तरावर आणणारा लेखक
ग्रंथनामा - झलक
सुशील धसकटे
  • अनिल अवचट (जन्म - १९४४, मृत्यु - २७ जानेवारी २०२२)
  • Fri , 28 January 2022
  • संकीर्ण श्रद्धांजली अनिल अवचट Anil Awachat

डॉ. अनिल अवचट हे नाव महाराष्ट्राला सर्वपरिचित आहे ते दोन गोष्टींमुळे : एक, त्यांच्या खास ‘अवचटी शैली’तील ‘रिपोर्ताज’ या ललित गद्यलेखनामुळे आणि दोन, पुण्यात त्यांनी उभ्या केलेल्या ‘मुक्तांगण’ या व्यसनमुक्ती केंद्रामुळे.

माझा त्यांचा प्रत्यक्ष फार परिचय नसला तरी, अवचट मला भेटले ते मी विद्यार्थी असताना, म्हणजे पहिल्यांदा शाळेत असताना पाठ्यपुस्तकांमधून. माझी आठवण बरोबर असेल तर त्या पाठाचं नाव होतं - ‘अनिकेत.’ या ‘अनिकेत’नं एक अनामिक हुरहुर त्या वेळी लावली होती. पुढे बीएला त्यांचा ‘माणसं’ हा लेखसंग्रह अभ्यासाला होता आणि तिथंच खर्‍या अर्थानं त्यांच्या लेखनाशी चांगला परिचय झाला. अभ्यासाच्या निमित्तानं ‘माणसं’ अनेक वेळा वाचलं. एमएला असताना अख्खाच्या आख्खा एकेक लेखक वाचून काढायचा असं ठरवून आनंद यादव, व्यंकटेश माडगूळकर, रा. रं. बोराडे, भालचंद्र नेमाडे, जी. ए. कुलकर्णी, चिं. त्र्यं. खानोलकर, भास्कर चंदनशिव, बी. रघुनाथ, दुर्गा भागवत आदी अनेक लेखक अक्षरश: झपाटून वाचून काढले. त्यातलं अनिल अवचट हे एक नाव!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

अवचटांच्या सामाजिक पोत असलेल्या ललित गद्यपर लेखनानं त्या वेळी मला प्रचंड झपाटून टाकलेलं होतं. एखादी सामाजिक घटना वा प्रश्‍न/समस्या घेऊन, त्याच्याशी संबंधित सर्व तपशीलवार माहिती गोळा करून तिचा नीट अभ्यास करायचा, प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन संबंधितांना भेटून त्यांच्याशी संवाद साधायचा, आणि मग खास ‘अवचटी शैली’त त्याचं संगतवार विश्‍लेषण करणारा दीर्घ लेख लिहायचा, असं सर्वसाधारण त्यांच्या लेखनाचं स्वरूप म्हणता येईल. असा ‘रिपोर्ताज’ हा लेखनप्रकार मराठीत त्यांनी रुजवला.

तरल व संवेदनशील मन, शोधक दृष्टी, अभ्यासू व जिज्ञासू वृत्ती, असे उपजत गुण असलेल्या अवचटांचा मूळ पिंड सामाजिक कार्यकर्त्याचा. डॉ. बाबा आढावांसारख्या अनेक ज्येष्ठांसमवेत ते महाराष्ट्रभर खेडोपाडी वावरले-फिरले. एवढेच नव्हे तर एसेम जोशी, जेपी यांच्यासोबत त्यांनी बिहारमधल्या पूर्णिया जिल्ह्याचा दौराही केलेला आहे. पूर्णियात काही काळ राहून तिथल्या एकंदर सामाजिक प्रश्‍नांचा व स्थितीचा अभ्यासही केलेला आहे. ‘पूर्णिया’ला नरहर कुरुंदकरांची दीर्घ व विवेचक प्रस्तावना आहे. समाजातील विविध प्रश्‍नांवर, घटनांवर, समस्यांवर लिहिताना त्यांच्यातील ‘सच्चा’ सामाजिक कार्यकर्ता जागृत होतो. हाच ‘सच्चा’ कार्यकर्ता त्या त्या प्रश्‍नांच्या मुळाशी जाऊन खर्‍या वास्तवाचा शोध आणि वेध घ्यायला त्यांना प्रवृत्त करतो. त्यांचं सबंध लेखन म्हणजे सर्वसामान्य उपेक्षित, पीडित आणि बहुजन माणसांसाठी काहीतरी करू पाहणारं, तळमळणारं, धडपडणारं एका ‘सच्च्या’ कार्यकर्त्याचं मन आहे.

ज्या विषयाकडे एरव्ही कुणाचं सहज म्हणून लक्ष जात नाही, आणि समजा गेलंच तर, ते त्यांना फार महत्त्वाचं वाटत नाही, अशा अनेक अत्यंत महत्त्वाच्या उपेक्षित विषयांना अवचटांनी समाजमनाच्या पृष्ठस्तरावर आणून ठेवलेलं आहे. विजय तेंडुलकर लिहितात, ‘‘किंबहुना त्याची भोवतालच्या घटनांकडे किंवा माणसांकडे बघण्याची नजर विलक्षण चौकस, शोधक आणि मुळात शंकेखोरच आहे.’’

त्यांच्या एकूण लेखनावर एक नजर टाकल्यास हे स्पष्टपणे दिसते. उदा. ‘माणसं’, ‘वस्त्या माणसांच्या’, ‘अंधेर नगरी निपाणी’ (माणसं); ‘बावड्याचा बहिष्कार’, ‘पारधी मेळावा’, ‘मराठवाडा दंगल : दोन घटना’, ‘सत्यभामेची विटंबना’, ‘पोलीस कोठडीतील मृत्यू’ (कोंडमारा); ‘अंधश्रद्धांचे गुरू’, ‘अंधश्रद्धांची केंद्रे’, ‘अंधश्रद्धांचे बळी’ (संभ्रम); ‘वस्त्या वेश्यांच्या’ (धागे उभे आडवे); ‘बस्तरचं अरण्यरुदन’ (प्रश्‍न आणि प्रश्‍न) इत्यादी इत्यादी.

या सर्वांमधून अवचट अन्यायग्रस्तांचे, पिचलेल्यांचे, नाडलेल्यांचे आणि महत्त्वाचे म्हणजे जगण्यासाठी केविलवाणी धडपड करणार्‍यांचे अक्षरश: कितीतरी ‘प्रश्‍न आणि प्रश्‍न’ उपस्थित करतात. हे सगळं वाचल्यावर आपल्यासमोर नक्कीच एक प्रश्‍न उभा राहतो की, अवचट हे जे मांडतायत ते आपल्याच देशातील-समाजातील आहे काय? किंवा भारतातलं, नव्हे महाराष्ट्रातलंच आहे काय? याचं उत्तर ‘होय.’

आपल्याच देशातील व समाजातील या दुसर्‍या चित्राशी आपण किती अनभिज्ञ असतो, हे अवचटांचे लेखन वाचल्यावर जाणवते आणि असा प्रश्‍न आपल्यासारख्या ‘सुरक्षित व स्व-कोषात असणार्‍या’, ‘आत्ममग्न जीवनशैली’त मश्गूल असणार्‍यांच्या मनाला पडणंही साहजिक आहे. कारण आपल्या भोवती, समाजात जनावराचं जीवन जगणारे कुणीतरी आहेत, दोन घासांसाठी परिस्थितीशी नाना तर्‍हेने संघर्ष करणारे कुणीतरी आहेत किंवा एकूण समाजव्यवस्थेच्या दृष्टीनं घातक असणारं काहीतरी समाजात घडतंय, याची कानोकानी खबरही आपल्याला नसते. किंबहुना ‘जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचंय?’, या खुशाल वा बेफिकीर वृत्तीतून त्याकडे आपण दुर्लक्ष करतो.

अवचटांच्या दृष्टीनं ही स्थिती अतिशय अस्वस्थ करणारी असते आणि याच अस्वस्थतेतून ते सामाजिक बांधीलकीच्या नात्याने तटस्थपणे या सर्व समस्यांची, प्रश्‍नांची उकल करू पाहतात. त्यांच्या मुळाशी जातात. प्रत्यक्ष भिडतात. अशोक शहाणे यांनी अवचटांच्या लेखनाचं एका वाक्यात मार्मिक विश्‍लेषण केलंय, ‘‘त्याच्या एकेका प्रसंगातून जीवघेणी कोंडी उभी राहते नि तिला संदर्भ निव्वळ सामाजिक उरत नाही.’’

.................................................................................................................................................................

डॉ. अनिल अवचटांच्या पुस्तकांच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://bit.ly/2FJw7OZ

.................................................................................................................................................................

‘माणूस’ हा अवचटांच्या विचारांचा, चिंतनाचा आणि लेखनाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. माणसांविषयी त्यांना कमालीची आस्थाही आहे. माणूसपणाच्या व माणुसकीच्या उत्कट ओढीतूनच ते माणसांविषयी पोटतिडिकीनं लिहितात. त्यामुळे त्यांचं लेखन जिवंत, प्रसंगी धगधगीत वाटतं. पण या धगधगीतपणामध्ये नुसत्याच ज्वाळा आहेत का, तर नाही, त्याला लालित्याची व बोलभाषेची जोड आहे; व्यापक दृष्टी व अभ्यास आहे; परखडपणा आहे; तटस्थवृत्तीनं केलेलं विश्‍लेषण व निरीक्षण आहे.

हे सर्व करताना अवचट त्यात एका विशिष्ट मर्यादेपर्यंत गुंतलेले असतात - त्यात ते अडकून पडत नाहीत. त्यातूनच वाचकांना खिळवून ठेवणारी त्यांची म्हणून स्वत:ची एक लेखनशैली तयार झालेली आहे. अवचटांच्या पुस्तकांच्या अर्पणपत्रिका हाही एक वैशिष्ट्यपूर्ण मुद्दा आहे. अर्थगर्भ व सूचक भाष्य करणार्‍या अर्पणपत्रिकेच्या ओळी मनाला स्पर्शून व खूप काही सांगून जाणार्‍या आहेत. उदा. ‘समाजाने ज्यांना भटकंती बहाल केली त्या सर्व उपर्‍यांना अपराधी भावनेनं अर्पण’ (माणसं); ‘नशिब काढायला अमेरिकेत जाऊ इच्छिणार्‍या भारतातल्या (तरुण) भाग्यविधात्यांना... काळजीपूर्वक’ (अमेरिका); ‘गावागावांतल्या दहशतीविरुद्ध एकाकी लढणार्‍या अप्रसिद्ध कार्यकर्त्यांना - हा थोडा हातभार’ (कोंडमारा) इत्यादी इत्यादी. ‘तेच ते’ अशा प्रकारची टीका त्यांच्या लेखनावर झाली खरी, पण एक गोष्ट मोकळ्या मनाने मान्य करावी लागते, ती म्हणजे अवचटांचं लेखन हा मराठीतील एक महत्त्वाचा सामाजिक व वाङ्मयीन दस्तऐवज आहे. त्यांच्या लेखनाने मराठी वाङ्मयात निश्‍चित अशी चांगली भर घातली, हे निर्विवाद.

अवचटांनी ‘स्वत: विषयी’ही मनमोकळेपणे लिहिलंय. पत्नी सुनंदा यांच्याबद्दल लिहिताना अवचटांमधील खोल अंतरीची भावनिक ओल प्रकर्षानं जाणवते. एखादा संवेदनशील पुरुष आपल्या पत्नीवर किती भरभरून आणि निस्सिम प्रेम करू शकतो, तिच्या विषयीच्या आठवणी किती हळुवारपणे, पण रसरसून व्यक्त करू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे अवचट होय!

येथे मला डॉ. आ. ह. साळुंखे यांची तीव्रतेनं आठवण होतेय. डॉ. साळुंखे यांनीही ‘तुझ्यासह आणि तुझ्याविना’ या पुस्तकात आपल्या पत्नीविषयी अतिशय समरसून लिहिलंय. या पुस्तकाची फार चर्चा झाली नाही. मात्र प्रत्येक पुरुषानं (आणि स्त्रीवादींनीसुद्धा) अवचट यांचं ‘स्वत:विषयी’ आणि साळुंखे यांचं ‘तुझ्यासह तुझ्याविना’ ही दोन पुस्तकं आवर्जुन वाचली पाहिजेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

- अवचट भाषणं करतात, व्याख्यानं देतात, परंतु ती रूढार्थानं भाषणं नसतात : आपुलकीनं लोकांशी साधलेला ‘संवाद’ असतो.

- संत कबीर हा त्यांच्या मनस्वी चिंतनाचा व आस्थेचा विषय आहे : कधी कधी ते जाहीरपणे कार्यक्रमांमधून कबीर यांची कवनंही गातात.

- अवचट चित्रकारही आहेत : हातात कागद व पेन्सिल घेऊन पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये चित्रे रेखाटण्यात मग्न अवचटांना मी कैक वेळा पाहिलंय.

- अवचट उत्तम ओरिगामी करतात : अनेक कार्यक्रमांच्या व्यासपीठावर जेव्हा इतरांची भाषणं चालू असतात, तेव्हा अवचटांचे कान त्या भाषणांकडे व डोळे हातातल्या ओरिगामी-कागदावर!

एक स्वच्छंदी, आनंदी आणि भरभरून आयुष्य जगणारा व माणसांवर उत्कट प्रेम करणारा माणूस - अनेकांसाठी ‘बाबा’ असलेला.

संदर्भ :

१. अवचट, अनिल (२००६) : वेध, ‘प्रस्तावना’ : विजय तेंडुलकर, पृ. ५,   दुआ. फेब्रुवारी, नीलकंठ प्रकाशन, पुणे.

२. शहाणे, अशोक (२००५) : नपेक्षा, ‘बांधिलकी- मागे वळून’, पृ. ५०,   पआ. एप्रिल, लोकवाङ्मय गृह, मुंबई.

(‘जे आहे ते’ या सुशील धसकटे यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या लेखसंग्रहातून साभार)

.................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा

अनिल अवचट खरंच आपले कोण लागतात? त्यांचं आणि आपलं नातं नेमकं काय आहे?

डॉ. अनिल अवचट - बहुतेकांचा ‘बाबा’!

बाबा ‘अनप्रेडिक्टेबल’ आहे, पण तो फटकून राहणारा नाही, तर बरोबर घेऊन जाणारा आहे!

तुम्ही काही म्हणा, जोपर्यंत लिहावंसं वाटतंय, तोपर्यंत सुचेल तसं, सुचेल ते मी लिहीत राहणार आहे!

.................................................................................................................................................................

लेखक सुशील धसकटे कादंबरीकार आणि प्रकाशक आहेत. ‘जोहार’ ही त्यांची कादंबरी बहुचर्चित ठरली आहे.

hermesprakashan@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......